Tuesday, June 21, 2022

 दहावी,  बारावीचा निकाल पैसे कमवण्यासाठी एक धंदाच 

श्रीरामपूरला एका मराठी दैनिकात मी कामाला होतो तेव्हाची ही गोष्ट. चार दशकांच्या माझ्या इंग्रजी पत्रकारितेच्या कारकीर्दीत मी जेमतेम तीनचार महिने एका मराठी दैनिकात काम केले. या मराठी दैनिकात जे काम केले ते काम त्याआधी आणि नंतरही कधी केले नाही.
 
साल होते १९८८. गोवा सोडून मी महाराष्ट्रात परतलो होतो. संध्याकाळी सातच्या दरम्यान मुंबईतल्या महाराष्ट्र विधीमंडळ कामकाजाचे समालोचन रेडीओवर लागायचे ते आमच्या दैनिकातले उपसंपादक टेबलवर ट्रांझिस्टर ठेवून ऐकायचे आणि त्यानुसार दुसऱ्या दिवसाच्या आवृत्तीच्या पान एक आणि आतल्या पानाच्या बातम्या लिहिल्या जायच्या. रेडिओवरचे धावते समालोचन ऐकून श्रीरामपूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाची असेल ती बातमी एकटाकी लिहिली जायची आणि लगेच कंपोंझिंगला पाठवली जायची. 
 
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) किंवा युनायटेड न्युज ऑफ इंडिया (युएनआय) या वृत्तसंस्था प्रादेशिक किंवा जिल्हा दैनिकांसाठी तेव्हा आणि आजही बातम्या देत नसतात. 
 
रात्री बारा वाजता नाईट ड्युटी संपल्यावर स्थानिक मुख्य मटका पेढीला फोन करून विजेत्या मटक्याचे आकडे विचारून ते पान एकला चौकटीत `सोना- चांदी', `मुंबई - कल्याण' किंवा `ओपन - क्लोज' अशा सांकेतिक नावांनी लावून मग घरी जायचो. 
 
पेपरचे वाचक या मटक्याच्या आकड्यासाठीच पेपर घ्यायचे. पुण्यातसुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले ' केसरी ' सारखे पेपर या मटक्याच्या अंकासाठीच खपायचे. 
 
त्याशिवाय दररोज `आजचे भविष्य' हे सदर सुद्धा सकाळी ड्युटीवर असलेले उपसंपादक लिहायचा. उदाहरणार्थ, पाहुणे येतील, पोट बिघडेल, अकस्मात धनलाभ, खिसा सांभाळा, गोड बातमी मिळेल, मनशांती बिघडेल, प्रवास घडेल वगैरे. 
 
तर एक दिवस आमच्या दैनिकाच्या मॅनेजरने एक फतवा काढला की सर्व कर्मचारी उद्या सकाळीच ऑफिसात येतील आणि कुणीही दांडी मारू नये.
 
दुसऱ्या दिवशी ऑफिससमोर ही तुडुंब गर्दी, बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नव्हता. 
 
एका खिडकीपाशी एकदोन सिनियर कर्मचारी मुलांकडून आणि इतर लोकांकडून चिठ्ठीचपाटीवर नंबर घेऊन, समोरच्या यादीत पाहून पास की नापास सांगत होते आणि त्याबदल्यात प्रत्येकी एक रुपया घेत होते. 
 
खिडकीपाशी जमा होणाऱ्या गल्ल्याकडे मॅनेजरसाहेब जातीने लक्ष घालून होते, हेराफेरीला मुळी वावच नव्हता.
एसएससी बोर्डाने प्रत्येक दैनिकांना छापण्यासाठी दहावीचा निकाल दिला होता, दुसऱ्या दिवशी तो छापण्याआधी दैनिकाच्या मॅनेजमेंटचे लोक तो निकाल सांगून पैसे कमावत होते. 
 
त्याकाळात दहावी बारावीचा निकाल राज्यातील सर्व दैनिके छापत असत म्हणजे पास झालेल्यांचे नंबर आणि त्यांचा क्लास. ज्यांचा नंबर नाही ते नापास असत. त्याकाळात बहुसंख्य विद्यार्थ्यांना नापास करण्याकडेच बोर्डाचा अधिक कल असायचा. बहुसंख्य मुलं गणितात आणि इंग्रजीत गचकायचे. माझ्या वेळेस दहावीचा निकाल २७ टक्के होता. गणितात मी थोडक्यात म्हणजे एक मार्काने वाचलो. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
 
तर नंतर लक्षात आले की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवर दैनिकांचा दहावी आणि बारावी परीक्षा निकालावेळी पैसे कमवण्यासाठी हा एक धंदाच होता. वाममार्गाने कमावलेला हा पैसा दैनिकाच्या कुठल्या खात्यात दाखवला जाई ते मला माहित नाही. 
 
गोव्यात जवळजवळ एक दशकभर मी नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा कॅम्पस (शैक्षणिक) रिपोर्टर होतो. मात्र गोव्यात आमच्या किंवा नवप्रभा या मराठी जुळ्या दैनिकाने किंवा प्रतिस्पर्धी गोमंतक, हेरॉल्ड वगैरे वृत्तपत्रांनी दहावी अन बारावी निकालाबाबत असा काळाबाजार धंदा केला नव्हता. 
 
वृत्तपत्र व्यवसायातील एक अत्यंत शरमिंदा करणारी ही आणखी एक गोष्ट. 
 
आज दहावीचा निकाल. त्यानिमित्त ही घटना आठवली. 

No comments:

Post a Comment