`ज्ञानोदय' मराठी भाषेतले सर्वाधिक दीर्घायुषी नियतकालिक
२० जून १८४२ रोजी - १८० वर्षांपूर्वी - अहमदनगर येथे अमेरिकन धर्मगुरु रेव्ह. हेन्री बॅलेन्टाईन यांनी `ज्ञानोदय' हे मराठी नियतकालिक सुरु केले.
त्याआधी दहा वर्षे आधी - १८३२ साली - बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले पहिले वृत्तपत्र `दर्पण' सुरु केले होते. पण `दर्पण' अल्पायुषी ठरले.
महात्मा जोतिबा फुले `ज्ञानोदय' नियतकालिकाचे एक वर्गणीदार होते.
सावित्रीबाई फुलेंची विद्यार्थिनी मुक्ता साळवेचा " मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध', १८८५च्या ज्ञानोदय मासिकाच्या दोन अंकांमध्ये प्रसिद्ध झाला होता.
`ज्ञानोदय' आजही पुण्यातून प्रसिद्ध होतो, त्यामुळे मराठी भाषेतले सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेले हे नियतकालिक आहे. अशोक आंग्रे हे विद्यमान संपादक आहेत.
पुण्यातूनच प्रसिद्ध होणारे दैनिक `केसरी' आणि जेसुईट फादरांच्या (सोसायटी ऑफ जिझस किंवा येशूसंघ ) संस्थेतर्फे प्रकाशित होणारे 'निरोप्या' हे मासिक ही मराठीतील सर्वाधिक दीर्घायुषी नियतकालिके.
`ज्ञानोदय'चे संस्थापक संपादक अमेरिकन तर 'निरोप्या'चे संस्थापक-संपादक जर्मन, (पुणे डायोसिसचे) आर्चबिशप हेन्री डोरिंग !
ज्येष्ठ साहित्यिक डॉ अनुपमा उजगरे यांनी ज्ञानोदय च्या पहिल्या अंकातील संपादकीय आज येथे पोस्ट केले ते मी शेअर करत आहे.
----
'ज्ञानोदय' पहिला अंक(अहमदनगर)
२० जून १८४२
संपा.रेव्ह.हेन्री बॅलेन्टाईन
जरीमरी
यंदा ठिकठिकाणीं जरीमरीचा वाखा फार झाला आहे... नगरामध्यें जरीमरीचा उपद्रव फार झाला नाहीं.बाजारगप्पाप्रमाणें मोजलें असतां एका महिन्यांत चारपांचशें माणसें मरावीं, परंतु अशा गप्पांवर कांहीं विश्वास ठेवावयाचा नाहीं. जर पांच माणसें मेलीं तर पंधरा ह्मणावें अशी चाल आहे...या वाक्यामुळें लोक घाबरलें आणि देवाचा क्षोभ आह्मांवर झाला असें बोलतात. फार करून सर्व लोक समजतात कीं, पटकीं पापामुळें आहे, कोणी ह्मणतात कीं इंग्लिश लोक या देशांत आल्यामुळें हा उपद्रव झाला आणि दोष सरकारवर घालितात.
परंतु फार करून लोक आपल्या पदरीं पाप घेऊन देवाला किंवा देवीला प्रसन्न करायाला उपाय करितात. हिंदु धर्मांतले जे लोक ते असें समजतात कीं, हें मरी देवीचे खेळ आहेत ह्मणून लोक गांवाबाहेर एखादें बागेंमध्यें जेवण करून इची पूजा करितात. घोडनदीस फौजदाराने सर्व लोकांस आज्ञा दिली कीं, गांवाबाहेर जाऊन देवीची पूजा करावी.
नगरामध्यें कांहीं दिवसामागें ब्राह्मण आणि विशेषेंकरून कारकून मंडळी यांनी बहुत पैका खर्च करून होम केले आणि एक तरुण मांगीण आणून तिला चांगले लुगडें व चोळीं नेसवून गळ्यांत माळा घालून आणि नैवेद्य देऊन तिचें चांगलें पूजन केलें आणि तिला गाड्यावर बसवून वाजंत्री आणि समागमें बहुत लोक गांवाबाहेर मिरवीत गेलें. परंतु या सर्व उपायांनीं कांहीं होत नाहीं तरी लोक असें करीत जातात.
हा रोग कसा उत्पन्न होतो? ज्यांनीं याचा शोध केला ते असें समजतात कीं, लोक अगोदर आपली प्रकृती बिघडवून मग हा रोग लागतो आणि आपली प्रकृती कशी बिघडवितात तर खादाडपणानें बहुत फळें आंबे वगैरे खाण्यानें व लग्नाकरितां सारी रात्र जागे राहण्याने आणि रांडबाजी करण्यानें आणि भयानें इत्यादिक. सारांश, जेणेंकरून मन अस्वच्छ होतें तेणेंकरून हा रोग लागण्यास शरीर तयार होतें...
खादाडपणा हें पाप आहे. जरी जेवण फुकट मिळतें तरी माणसें पशुधर्माप्रमाणें चालली असतां देव शिक्षा देईल... सर्व लोकांनीं ईश्वराचें भजन करून सर्व पाप सोडावें... ब्राह्मण लोकांनीं मांगणीचें पूजन करूं नये, परंतु आपल्या पापाविषयीं पश्चात्तापी होऊन ईश्वराजवळ प्रार्थना करावी.
संदर्भ :'ज्ञानोदय'ची पहिली १००वर्षे, १८४२-१९४१.
संपा. : भा.पां.हिवाळे.
--अनुपमा निरंजन उजगरे
संपादक 'ज्ञानोदय',२००३-२००४
No comments:
Post a Comment