पुण्याचे एका खऱ्या अर्थाने लँडमार्क असणारे सिटी चर्च आहे.
पुण्याचे एका खऱ्या अर्थाने लँडमार्क असणारे सिटी चर्च आहे.
पुण्यात क्वार्टर गेटपाशी YMCA ( Young Men's Christian Association ) चे प्रशस्त आवार हे येथील एक मोठे लँडमार्क आहे. अलका थिएटर चौकापासून सुरु होणारा आणि मुख्य पेठांतून जाणारा लक्ष्मी रोड येथून तिरकातिरका होत जात शहराच्या दोन भिन्न संस्कृतींना जोडत अरोरा टॉवरपाशी पुणे कॅम्पात संपतो.
या YMCA च्या शेजारीच जराशा अडवळणीला असलेले आणि शहराचे एका खऱ्या अर्थाने लँडमार्क असणारे सिटी चर्च आहे.
क्वार्टर गेट येथील हे सिटी चर्च हे पोर्तुगीज वारसा असलेल्या मुंबई आणि वसई वगळता महाराष्ट्रातले पहिलेवहिले कथोलीक चर्च. या उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व कॅथॉलिक चर्चेसचे सिटी चर्च हे त्या अर्थाने मदर चर्च.
महाबळेश्वर या हिल स्टेशनवर भर बाजारपेठेत असलेले होली क्रॉस चर्च हे १८३१ साली बांधलेले एक छोटेसे चर्च महाराष्ट्रातील दुसरे सर्वात जुने कथोलीक चर्च.
मराठा सत्तेचा अखेरचा काळ पाहिलेले हे छोटेसे टुमदार सिटी चर्च हे त्याकाळी पुणे शहराचे एक टोक होते. म्हणून आवर लेडी ऑफ इम्यॅक्युलेट कंसेपशन चर्च ( Our Lady of Immaculate Conception Church ) असे बारसे झालेले हे चर्च आजतागायत सिटी चर्च याच नावाने ओळखले जाते.
माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या या चर्चचा इतिहास गंमतीदार आहे.
पुणे कॅथोलिक डायोसिसची स्थापना १८६७साली होऊन या धर्मप्रांतासाठी पुण्यात स्वतंत्र बिशप नेमण्यात आले. मात्र गोव्यातील पोर्तुगीज आणि भारतातील ब्रिटिश राजसत्ता भिन्न असतानासुद्धा पुण्यातले हे छोटेसे चर्च दिडशे वर्षे पोर्तुगीजांच्या अधिपत्यात असलेल्या गोवा आर्चडायोसिसच्या अखत्यारीत राहिले होते.
या सिटी चर्चशी निगडीत कथोलिक चर्चमधला एक इतिहास आणि कालखंड जोडलेला आहे.
मध्ययुगात युरोपमधल्या काही देशांतील दर्यावर्दी लोक नवे जग शोधायला बाहेर पडले, तेव्हा नव्या वसाहती निर्माण करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. यामुळे पोपमहाशयांनी पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड वगैरे कथोलीक देशांत संपूर्ण जगाची चक्क वाटणी केली! यात पोर्तुगालच्या वाटेला इंडिया म्हणजे गोवा आला होता.
नंतरचा पोर्तुगीज इंडिया म्हणजे गोव्यातील चर्चच्या हद्दीतील ब्रिटिश इंडियातील पुण्यातील हे सिटी चर्च... हद्द्वाद ही चर्चची सुध्दा एक डोकेदुखी राहिलेली आहे.
दोन भिन्न राजकीय सत्ता असताना येथील चर्चवर गोव्याच्या चर्चचा अधिकार होता, इथल्या धर्मगुरुंची नेमणूक Estado da India म्हणजे पोर्तुगीज इंडिया किंवा गोव्यातून तिथले आर्च बिशप करत असत..
काही दशकांपूर्वी या चर्चचा पुण्यात मुख्यालय असलेल्या पुणे डायोसिसमध्ये समावेश करण्यात आला. अगदी आजही मूळच्या गोवन किंवा पुणेस्थित गोंयकारांचे चर्च अशी या चर्चची प्रतिमा आहे.
या चर्चच्या शेजारीच कौलारी छत असलेली पूना गोवन इन्स्टिट्युटची वास्तू अनेकांनी पाहिली असेलच..
या सिटी चर्चशेजारीच ऑर्नेला बॉईज स्कुल आणि सेंट क्लेर गर्ल्स स्कुल आहे.
हे सिटी चर्च, पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटसमोर असलेले सेंट झेव्हियर्स चर्च आणि रेस कोर्ससमोरचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल ही पुण्यातली जुनी कॅथॉलिक चर्चेस, त्याशिवाय सेंट मेरीज चर्च, पुणे शहराच्या मैलाचा दगड असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसशेजारी (जिपीओ ) शेजारचे सेंट पॉल चर्च, ख्राईस्ट चर्च ही जुनी प्रोटेस्टंट चर्चेस.
एकेकाळी म्हणजे शतकापूर्वी गौरव पाहिलेल्या यापैकी काही चर्चमधली भाविकांची संख्या हळूहळू रोडावत चालली आहे. तरीदेखील येणाऱ्या या ख्रिसमसनिमित्त ही चर्चेस पुन्हा एकदा नवी झळाळी अनुभवतील.
Camil Parkhe December 23, 2021
No comments:
Post a Comment