Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Tuesday, September 15, 2026

 


विद्यानंद बापट आणि बायबलमधील आदाम आणि इव्ह यांच्यामार्फत मानवजातीला मिळालेले ओरिजनल सिन किंवा मूळ पाप.

विद्यानंद बापट कुणाच्या तावडीत आतापर्यंत तरी लागलेले नाहीत, तसेच ते कुणालाही सोडत नसतात.

तर परवाच्या बापटांच्या पत्रकार परिषदेत ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांच्या धर्मग्रंथांत समान असलेल्या आदाम आणि इव्ह यांचा विषय निघाला.

बापटांनी पत्रकार परिषदेत `ओरिजनल सीन' चा उल्लेख केला आणि मी चमकलो.

महाभारत आणि इतर ग्रंथांतील अनेक दाखले, सुभाषिते बापट आपल्या बोलण्यात पेरत असतात, मशिदीवरील भोंग्यांचा त्यांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे.

मात्र ख्रिस्ती धर्मातील सिद्धांताचा विस्तृत उल्लेख मी त्यांच्या बोलण्यात पहिल्यांदाच ऐकत होतो.

बापट यांच्याबरोबरीने पत्रकार परिषदेच्या आयोजक या नात्याने मंचावर असलेल्या अश्विनी सातव डोके यांनीसुद्धा बायबलचा संदर्भ येताच माझ्याकडे वळून पाहिले, असाही भास मला त्यावेळी झाला.

बायबलमधील पहिल्याच म्हणजे उत्पत्तीच्या ( Genesis) अध्यायात सर्पाच्या रुपातला सैतान इव्ह हिला फितवून तिला आणि तिच्यामार्फत आदामला देवाने मना केलेले फळ अर्थात `फॉरबिडन फ्रूट' खायला भाग पाडतो.

हेच ते पहिल्या मानवांनी केलेले मूळ पाप किंवा सर्व मानवजातीला जन्मतः आलेले ओरिजनल सीन.

येशू ख्रिस्ताची कुमारी माता मारिया (निष्कलंक गर्भसंभव किंवा Immaculate Conception ) हिचा एकमेव अपवाद वगळता इतर कुठलाही मानव ओरिजनल सीन किंवा मूळ पापावाचून जन्मलेला नाही असा कॅथोलिक धर्मात एक डॉग्मा म्हणजे धर्मसिद्धांत आहे. 

बाप्तिस्मा स्नानसंस्काराने व्यक्तीची या मूळ पापापासून मुक्तता होते अशी ख्रिस्ती धर्मात श्रद्धा आहे.  येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूने मानवावरील हे ओरिजनल सीन, मूळ पाप धुऊन निघाले अशा श्रद्धेचा संदर्भ बापटांनी या पत्रकार परिषदेत दिला.

गोव्यात धेम्पे कॉलेजात पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी तत्वज्ञान हा माझा खास विषय होता.  विविध धर्मांचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी ऑफ रिलिजन्स हा माझा अभ्यासासाठी एक विषय होता. 

बापट यांचा विविध विद्याशाखांत आणि विषयांत मुक्त संचार आहे, याचे मला निश्चितच कौतुक वाटते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलसुद्धा.

आपली रॅशनलिस्ट किंवा विवेकवादी भुमिका याबाबत कुठलीही लपाछेप न करता आपली भूमिका ते निःसंदिग्धपणे' मांडत असतात.

पत्रकार परिषदेत अनेक संवदेनाशील विषयांवर बापट यांना प्रश्न विचारण्यात आले आणि आपल्या विवेकनिष्ठ भुमिकेला साजेशी अशी बापट यांनी उत्तरे दिली.

विद्यानंद बापट यांना प्रत्यक्ष पाहण्याचा, त्यांचे बोलणे ऐकण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग.

टेलीव्हिजनवर मुलाखत पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात जमीनअस्मानाचा फरक असतो.

पत्रकारांनी पत्रकारांसाठीच आयोजित केलेली ती एक लाईव्ह पत्रकार परिषद होती.  मात्र एकही प्रश्न न विचारता या पत्रकार परिषदेत मी मौन राखले.

त्यांना विचारण्यासारखे माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.  विशेषतः त्यांच्या आजवरच्या वैचारिक जीवनप्रवासाबद्दल.

उदाहरणार्थ एक झलक.  `देव रिटायर करा' असे म्हणणाऱ्या डॉ. श्रीराम लागूंचा पुढाकार असलेल्या नाशिकच्या नास्तिक परिषदेत विद्यानंद बापट यांनी हजेरी लावली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापेक्षा डॉ. लागू आपल्याला अधिक जवळचे वाटतात, असे एका प्रश्नाचे उत्तर म्हणून या पत्रकार परिषदेत बापटांनी सांगितले.

पुढे कदाचित बापटांना ऑफलाईन भेटण्याचा योग आला तर माझ्या मनातील प्रश्न मी निश्चितच त्यांना विचारेन.



Camil Parkhe 



Saturday, September 5, 2026

red with Pub

lic
प्रसारमाध्यमांची व्यावसायिकता आणि माणुसकीशी बांधिलकी
परवा विद्यानंद बापट हे बेदम मारहाण आणि त्यांची लाथाबुक्क्यांनी तुडवणूक होण्यापासून थोडक्यात वाचले.
पुण्यात टिळक रोडपासून जवळच असलेल्या एका चौकात मुलाखत देताना हल्लेखोर त्यांच्या कानशिलात केवळ एक जोरदार थप्पड देऊ शकला.
तिथे असलेल्या दोन व्यक्तींनी लगेचच हल्लेखोराला पूर्ण ताकदीने प्रतिकार केल्याने बापट यांच्यावरील एक बाका प्रसंग टळला.
त्यादिवशी त्या घटनास्थळी बापट यांच्या भुमिकेशी सहमत असणार काही लोक होते, असहमत असणारेही होते.
त्याशिवाय त्या वर्दळीच्या ठिकाणी ये-जा करणारे अनेक लोक होते.
दोन व्यक्तींमध्ये झगडा, संघर्ष होत असेल तर तिथे असलेले लोक क्वचितच हस्तक्षेप करतात.
समोर हिंसा होत असताना त्रयस्थ व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यास या त्रयस्थ व्यक्तीच अनेकदा हिंसेचे बळी ठरत असतात याचा अनुभव नेहेमी येत असतो. एक क्राईम रिपोर्टर म्हणून अशा घटनांचे मी अनेकदा वार्तांकन केले आहे.
तर त्या भर दिवशी भर चौकात एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विद्यानंद बापट आपले मत मांडताना अचानक एका हल्लेखोराने बापट यांच्या कानशिलात लगावली तेव्हा तेथे असलेल्या फक्त दोन व्यक्तींनी या हल्लेखोरास पूर्ण ताकदीनिशी रोखले.
हल्लेखोरास रोखणाऱ्या याच दोन व्यक्तींनी असा प्रतिकार करावा हे खरे पाहता पूर्णतः अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते.
हल्लेखोऱ्याने बापट यांना थप्पड मारल्यानंतर तिथे असलेल्या एका मध्यमवयीन महिलेने तत्क्षणी हल्लेखोऱ्याचा उगारलेला हात अडवला आणि बापट यांना वाचवले.
आपल्या मुलाखतीत बापट नेहेमीच सांगत असतात कि ''लोकांनी मला स्वतःला फार महत्त्व देऊ नये, माझ्यावर टीका करू नका, त्याऐवजी मी मांडतो त्या मुद्द्यांना उत्तरे द्या, त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा.''
विशेष म्हणजे या हातघाईच्या लढाईच्या बिकट प्रसंगी ती धाडसी महिला त्या हल्लेखोऱ्याला नेमके हेच सुनावत होती. मला त्या महिलेचे फार कौतुक वाटले.
बापट यांना बेदम मारहाणीपासून रोखण्यास त्याशिवाय आणखी एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली.
खरे तर त्या व्यक्तीने असे करणे त्याच्या व्यवसायिक हिताच्या अगदी विरुद्ध होते.
बापट यांच्या मुलाखतीचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओग्राफरने बापट यांच्यावर हल्ला होताच लगेचच आपले चित्रण थांबवले आणि हल्लेखोऱ्याला एका हाताने ढकलत बापट यांच्यापासून दूर नेले.
आपल्यापैकी अनेक जण छोट्या आकाराचे पण महागडे मोबाईल वापरत असतात. प्रसारमाध्यमांतील फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांचे कॅमेरे किती महागडे असतील याची कल्पनाच केलेली बरे.
तर बापट यांच्यावर हल्ला होताच या व्हिडिओग्राफरने एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोऱ्याला पूर्ण शक्तींनिशी मागे लोटत नेले.
या अवधीत तिथे जमलेल्या लोकांना विद्यानंद बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य झाले. तरीसुद्धा लांबूनच तो हल्लेखोर ' बापट याला मी सोडणार नाही, मी त्याला मारणार आहे,'' असे जोरजोरात ओरडून सांगत होता. यावेळी ती महिला त्याला असे करु नकोस म्हणून सांगत होती.
या मारहाणीच्या झालेल्या चित्रणात हे दृश्य तुम्ही पाहू शकता.
हल्लेखोऱ्याने बापट यांच्या कानशिलात लगावली याचे चित्रण केवळ `टिव्ही नाईन' या वाहिनीकडेच आहे. या चित्रणामुळे या वाहिनीचा टिआरपी नक्कीच भरपूर वाढला असेल.
जर या व्हिडीओग्राफरने बापट यांच्या हल्लेखोऱ्याला रोखण्याऐवजी त्याला हल्ला चालू ठेवण्यास पूर्णतः मोकळीक दिली असती आणि या हल्ल्याचे चित्रण चालू ठेवले असते तर या वाहिनीकडे या हल्ल्याच्या एक्सल्युझिव्ह चित्रणाचे अधिक फुटेज, काही सेकंदाऐवजी काही मिनिटांचे झाले असते.
व्हिडिओग्राफर म्हणून हा हल्ला चालू ठेवणे नक्कीच त्याच्या व्यावसायिक हिताचे आणि बांधिलकीचे होते.
मात्र व्यावसायिक बांधिलकी आणि हित याऐवजी या व्हिडीओग्राफरने माणुसकीला प्राधान्य दिले.
खरे पाहता ही घटना इतक्या वेगाने घडली कि `हे बरे कि ते बरे' याचा विचार करण्यास त्या व्हिडिओग्राफरला मुळी वेळच मिळाला नाही.
त्यामुळे बापट यांच्या मदतीस जाऊन हल्लेखोऱ्यास रोखण्याची कृती व्हिडिओग्राफरकडून उत्स्फूर्तपणे घडली.
व्यावसायिक हिताऐवजी माणुसकीस जपण्याची व्हिडीओग्राफरची ही कृती पूर्ण विचारांती नव्हती तर ती एक प्रतिक्षिप्त कृती होती.
व्यावसायिक हितापेक्षा माणुसकीशी बांधिलकीला प्राधान्य मिळाले.
हा प्रसंग पाहताना आफ्रिकेतील एका देशात दुष्काळात मरणासन्न अवस्थेतील हाडांचा सापळा बनलेल्या एका बाळाकडे एक गिधाड बुभूक्षित नजरेने पाहत आहे, असा क्षण टिपलेल्या एका फोटोला एक जगप्रसिद्ध पारितोषक मिळाले होते ते आठवले.

Camil Parkhe



Thursday, March 26, 2026

 



गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचीत नाही. ते नाव परिचित असण्याची शक्यता कमीच आहे, याचे कारण या अमेरिकन व्यक्तीला भारतात कार्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी मिळाला.
मात्र या अल्प कालावधीत गॉर्डन हॉल आणि त्यांच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी सहकाऱ्यांनी मुंबईत आणि भारतात एका नव्या पर्वाची मुहूर्तवेढ रोवली.
आधुनिक भारताचा इतिहास गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नामोल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे व्याकरण, शब्दकोश तसेच गद्य शुद्धलेखन त्याशिवाय या भाषेतील पुस्तकांची छपाई याबाबतीत परदेशी लोकांनी फार मोलाचे योगदान केलेले आहे.
विल्यम कॅरी, जेम्स थॉमस मोल्स्वर्थ, मेजर थॉमस कँडी यांची नावे यासंदर्भांत घेतली जातात. याच काळात भारतात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत पायाभूत स्वरुपाचे कार्य करणारी व्यक्ती म्हणून गॉर्डन हॉल यांचा उल्लेख करता येईल.
आधुनिक काळातील ते एक आद्य अमेरिकन मिशनरी होते.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या गॉर्डन हॉल यांनी कॉलऱ्याच्या भीषण साथीत नाशिकच्या परिसरात आजारी लोकांना औषधोपचार केले आणि त्यावेळी त्यांनाच या रोगाची लग्न होऊन नाशिकजवळ दोडी दापूर येथे वयाच्या अवघ्या ४१ वर्षी २० मार्च १८२६ रोजी त्यांचे निधन झाले.
मुंबईत पहिल्यावहिल्या आधुनिक पद्धतीच्या शाळा स्थापन करणाऱ्या तसेच १८२४ साली मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरीचे या शुक्रवारी, दिनांक २० मार्चपासून द्विशताब्दी स्मृतीवर्षे सुरु होत आहे.
मुंबई बंदरात १२ फेब्रुवारी १८१३ रोजी हार्मनी या बोटीतून तीन अमेरिकन प्रवासी उतरले. हे प्रवासी होते अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट.
भारतात आलेले हे पहिले अमेरिकन मिशनरी होते. काही काळानंतर अमेरिकेतून कॅरॅव्हान या जहाजाने रोजी अँडोनिराम जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे भारतात आले.
या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
पश्चिम भारतात अमेरिकन मराठी मिशन स्थापन करुन पुढे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले.
ब्रिटिश संसद दर दहा वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण करत असे.
त्यानुसार त्याकाळात मुंबईत आणि भारतात ख्रिस्ती मिशनरींना कार्य करण्याची मुभा नव्हती.
असे असले तरी मुंबईत काम करण्याच्या या मिशनरींचा दृढ निर्णय होता.
मुंबईत आल्याक्षणी त्यांनी इथली मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरु केला.
सॅम्युएल नॉट यांनी ५ मार्च १८१३ रोजी आपल्या आईवडलांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते :
``आमची परिस्थिती अनिश्चित असली तरी आम्ही मराठी भाषेचा अभ्यास सुरू करीत आहोत. आम्ही दृश्यावर विसंबून नव्हे तर विश्वासावर चालत आहोत. एक फार बोलघेवडा काळा माणूस आमच्यासोबत बसून दररोज तीन-चार तास आम्हाला ही भाषा शिकवत आहे.”
गार्डन हॉल आणि नॉट या दोघांनी अमेरिकन मिशन बोर्डाच्या सेक्रेटरीला १७ मार्च १८१३ रोजी एक पत्र लिहून त्यात म्हटले होते:
`` “येथे राहण्याची आमची आशा इतकी दृढ आहे की आम्ही लगेचच मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.”
मुंबईत राहिल्यानंतर व मराठी भाषा शिकल्यानंतर हॉल व नॉट यांनी १८१५ मध्ये एक इंग्रजी शाळा काढली. त्यात २५ मुले शिकत होती. याशिवाय दोन मराठी शाळांत ४० मुले होती.
सुरुवातीला त्यांना शिक्षक मिळण्यास अडचण पडली, पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्या मराठी शाळांत शिकवू लागले. पुढल्या वर्षी या शाळांची संख्या वाढली व एकूण ३०० विद्यार्थी झाले.
सन १८१८ मध्ये अमेरिकन मिशनच्या अकरा शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.
या अमेरिकन मिशनरींनी मुंबईतच १८२४ साली मुलीची पहिली शाळा सुरु केली.
आधुनिक काळात मुंबईत आलेल्या या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात असंख्य अडचणी आल्या.
याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
पुढील काळात जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी मराठीचे व्याकरण आणि शब्दकोश रचले, त्यामुळे नंतरच्या काळातल्या मिशनरींना आणि ईस्ट इंडिया कंपनी अधिकाऱ्यांना मराठी भाषा शिकणे अधिक सोपे झाले.
अमेरिकन मिशनचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्मप्रसारासाठी त्यांनी लहानसहान पुस्तिका लिहिण्यास सुरुवात केली, बायबलच्या मराठी भाषांतराचे काम तातडीने सुरु केले.
ही पुस्तके छापण्यासाठी मुंबईत लाकडी छापखानासुद्धा सुरु केला.
त्यासाठी मराठी भाषेतील टाईप किंवा फॉन्ट्स तयार केले. हे खूपच मेहनतीचे आणि पायाभूत स्वरूपाचे काम होते याबद्दल शंकाच नाही.
त्यासाठी आद्य मिशनरींना श्रेय द्यायलाच हवे.
`ए स्क्रिप्चर ट्रॅक्ट' ( A Scripture Tract ) ही अमेरिकन मिशनने धर्मासंबंधी १८१७ साली छापलेली पहिलीच पुस्तिका किंवा ट्रॅक्ट होय. ती पुस्तिका बहुधा गॉर्डन हॉल यांनी तयार केलेल्या पुस्तिकांपैकी एक होती.
ही पुस्तिका आठ पानांची होती आणि १० मार्च १८१७ रोजी ती छापखान्यात छापण्यात आली. त्या आवृत्तीच्या १५०० प्रती छापण्यात आल्या होत्या.
याच घटनेतून मराठी ख्रिस्ती साहित्याची सुरुवात झाली अशी माहिती रेव्हरंड ब्रूस यांनी दिली आहे असे श्री. म. पिंगे यांनी लिहिले आहे.
मुंबईत छापखान्याची उभारणी झाल्यानंतर बायबलच्या नव्या कराराचे भाषांतर १८२६ मध्ये प्रसिद्ध झालें.
अमेरिकन मिशनचे हे मराठी बायबल गॉर्डन हॉल, सॅम्युएल न्यूवेल, होरेंशिओ बार्डवेल, जॉन निकोलस व अँलन ग्रेव्हज् या मिशनरींनी केले. यापैकी बार्डवेल १८१६ मध्ये व ग्रेव्हज् हे १८१८ मध्ये भारतात आले होते.
या पाच मिशनरींपैकी सॅम्युएल न्यूवेल १८२१ मध्ये, जॉन निकोलस १८२४ मध्ये मरण पावले. होरेंशिओ बार्डवेल १८२१ मध्ये अमेरिकेस परत गेले, अँलन ग्रेव्ह्ज १८४३ पर्यंत कार्य करून महाबळेश्वर येथे मरण पावले.
``या पाचही मिशनरींनी मृत्यूचा धोका पत्करूनसुद्धां बायबलच्या भाषांतराचे कार्य पुरे केले,'' असे त्यांच्याविषयी वर्णन श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात केले आहे.
ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय गॉर्डन हॉत यांनी तीन शिक्षणविषयक पुस्तके लिहिली होती. लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले.
अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी नमूद केले आहे.
गॉर्डन हॉल यांनी पुण्यातसुद्धा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला होता याचा उल्लेख पिंगे यांनी या ग्रंथात केला आहे.
मिशन छापखान्यात छापलेली मराठी पुस्तके आणि हिंदुस्थानी भाषांतील पुस्तके पुण्यात वाटण्यासाठी १८२३ साली गॉर्डन हॉल यांनी दोन नोकरांना पुण्यात पाठवले होते.
त्यांच्याबरोबर हॉल यांनी शिफारसपत्रे सुद्धा दिली होती त्यात म्हटले होते:
"This is to certify that the bearers hereof viz. Samuel and Benjamin Jews have been in our employ as school masters for several years. They are now furnished by us with a small quantity of Mahratta and few Hindoostanee books, which they are authorised to distribute gratuitously to such persons as may desirous of receiving them.
पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन् यांनी मुंबईतील कंपनी सरकारला पत्राद्वारे कळविले की ही धार्मिक पुस्तके वाटण्यास सरकारची मदत आहे अशी लोकांची समजूत झाली आहे व ती सरकारला हानिकारक होईल.
कलेक्टर रॉबर्टसन् यांनी त्या दोघांना पकडले व त्यांना त्यांच्या पुस्तकांसह घाटाखाली हद्दपार केले.
पुण्याचे कमिशनर चॅप्लिन यांनी मुंबई सरकारचे मुख्य सेक्रेटरी न्यूनहॅम यांना यासंबंधी कळविलें की धार्मिक पुस्तकांच्या वितरणाने कंपनी सरकारबद्दल लोकांमध्ये भिती निर्माण होईल.
मिशनरींच्या या कामाला पायबंद घालणें आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचविले होते.
याबाबत कंपनी सरकारने गॉर्डन हॉल यांना कळवले तेव्हा गॉर्डन हॉल, निकोलस व अँलन ग्रेव्हज या तीन मिशनरींनी आपली बाजू मांडून सांगितले कि असे करणे काही आक्षेपार्ह नाही व पेशव्यांच्या काळापासून आपण धार्मिक पुस्तके वाटत आहोत आणि भारतातही ती वाटली जातात.
मार्च १८२६ मध्ये नाशिक परिसरात कॉलऱ्याची तीव्र साथ असताना तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी गॉर्डन हॉल थांबले होते.
वैद्यकीय प्रशिक्षण असल्याने आजारी लोकांना त्यांनी औषधे दिली. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तिथेच त्यांची एक दगडी समाधी बांधण्यात आली होती.
March 20, 2026 दोनशेव्या स्मृतिदिनानिमित्त गॉर्डन हॉल यांना आदरांजली.

Camil Parkhe March 19, 2026


Thursday, December 25, 2025

 


नाताळाच्या पूर्वसंध्येला खूप काही गोष्टी करायच्या असतात. माळावरचा ख्रिसमस स्टार आणि इतर डेकोरेशन उतरून खाली आणून सजावटीची सुरुवात करणे वगैरे.
यावेळी आणखी एक काम होते. केकसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या दापोडीतल्या बेकरीतून केक आणणे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमावर्ती भागात दापोडी इथे असलेल्या `अलंकार' बेकरीच्या केकला खूप मागणी असते, नाताळाआधीच खूप जणांच्या, संस्थांच्या आगाऊ घाऊक ऑर्डर्स या बेकरीला मिळतात.
सणानिमित्त अनेकांना नाताळ केक आणि फराळ द्यायचा असल्याने या बेकरीतून दहाबारा केक मी घेऊन आलो.
आमच्या परिसरात बहुतेक बेकरी मालक मुसलमान आहेत आणि दरवर्षी त्यांनी नाताळ आणि ईस्टर सणानिमित्त बनवलेल्या केकला प्रचंड मागणी असते.
केक घेतल्यानंतर बेकरी मालकाला मेरी ख्रिसमस म्हणून सणाच्या आगाऊ शुभेछा देण्यास मी विसरलो नाही..
संध्याकाळी दयानंद ठोंबरे यांनी `अलौकिक परिवार'चा ख्रिसमस अंक दिला. `अलौकिक परिवार'चा हा पंधरावा नाताळ विशेषांक.
आता इतर ख्रिसमस अंकांची प्रतीक्षा आहे.
Camil Parkhe


Monday, October 6, 2025

 

धर्मपीठाच्या प्रमुख पदावर - पोप, शंकराचार्य, मौलवी, रब्बी, दलाई लामा किंवा इतर कुठलेही सर्वोच्च धर्माचार्य म्हणून महिलेची नेमणूक झाली आहे अशी नुसती कल्पनाच करा.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात काल शुक्रवारी ३ ऑकटोबर , २०२५ रोजी एक महत्त्वाची घटना घडली.
या घटनेची किती वृत्तपत्रांनी नोंद घेतली आहे, किती लोकांपर्यंत या ऐतिहासिक, भवितव्याला एक वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनेची माहिती पोहोचली आहे हे मला माहित नाही.
ख्रिस्ती धर्मपिठाच्या इतिहासात नव्हे मानवी इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण घडला आहे..
भारतात आणि इतर अनेक देशांत अस्तित्व असलेल्या इंग्लंडच्या अँग्लिकन चर्चच्या ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कँटरबरीच्या आर्चबिशपची जबाबदारी एका महिलेला देण्यात आली आहे.
अनेक शतकांपासून इंग्लंडचे राजा/ राणी अँग्लिकन चर्चचे प्रमुख आहेत.
कँटरबरीचे आर्चबिशप जागतिक अँग्लिकन चर्चचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आहेत,
सारा मल्लली (वय ६३ वर्षे) यांना इंग्लंड येथील कँटरबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशप म्हणून नेमण्यात आले आहे
बहुतांश प्रमाणात पुरुषसत्ताक सत्तेचा इतिहास असणाऱ्या मानवी संस्कृतीत ही घटना खूप महत्त्वाची आहे.
याचे हादरे पुढे सतत बसणार आहेत हे नक्की.
परंपरेनुसार अँग्लिकन चर्चचे प्रमुख असलेल्या ब्रिटिश राजे / राणी आहेत. अँग्लिकन चर्चच्या आर्चबिशप पदासाठी उमेदवारांची निवड इंग्लंडच्या चर्चच्या संस्थेने केली जाते आणि याबाबत पंतप्रधानांना सल्ला दिला जातो.
त्यानंतर अँग्लिकन चर्चचे प्रमुख असलेल्या ब्रिटिश राजे / राणी यांच्याकडून अधिकृतरीत्या नूतन आर्चबिशपच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले जाते,
अँग्लिकन चर्चच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला, कारण ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कँटरबरीच्या आर्चबिशपची जबाबदारी एका महिलेला देण्यात आली आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात आजतागायत कुठल्याही धर्माचे सर्वोच्च पद किंवा प्रेषित पद महिलेला देण्यात आलेले नाही.
इतकेच नव्हे तर परमेश्वर किंवा देव पुरुष आहे असेच सगळीकडे गृहीत धरलेले आहे.
य पार्श्वभूमीवर एक महिलेची सर्वोच्च धर्माचार्य म्हणून नेमणूक होणे ही एक अत्यंत क्रांतीकारक घटना आहे असे मी समजतो.
ही नेमणूक महत्त्त्वाची आहे याचे कारण म्हणजे जगातील सर्वच धर्मांत आजही पुरुषसत्ताक वागणूक असते आणि स्त्रियांना अन्यायकारक, दुय्यम दर्जाची वागणूक देणे योग्य नाही असा संदेश या घटनेतून सगळीकडे जाणार आहे.
चर्च ऑफ इंग्लंड हे अनेक बाबतींत सुधारणा राबवण्यात अग्रेसर राहिले आहे.
इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या अँग्लिकन चर्चमध्ये महिलांना धर्मगुरूपद देण्याची परवानगी १९९० च्या दशकाच्या मध्यापासूनच देण्यात आली आहे.
याउलट जगात सर्वाधिक अनुयायी असलेल्या आमच्या कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणा गोगलगायीच्या मंद गतीने होत असतात. कॅथोलिक आणि इतर अनेक पंथांच्या चर्चेसमध्ये महिलांना आजही धर्मगुरू होता येत नाही,
चर्च ऑफ इंग्लंडच्या संपूर्ण जगात १६५ देशांत ८५० लाख अनुयायी आहेत. भारतात, महाराष्ट्रात आणि पुण्यामुंबईत अँग्लिकन चर्चचे अस्तित्व आहे.
उदाहरणार्थ, पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय आणि खडकी येथील सेट मेरीज चर्च, मुंबई-पुणे हमरस्त्यावर खडकी येथील ऑल सेंट्स चर्च, पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोस्ट ऑफिसाशेजारी असलेले सेंट पॉल चर्च वगैरे.
सन १९९८ ला दीक्षा मिळालेल्या चित्रलेखा आढाव ( विवाहानंतर चित्रलेखा जेम्स ) या चर्च ऑफ इंग्लंडच्या पुण्यातील पहिल्या महिला धर्मगुरू. पुण्यात सध्या पाच दीक्षित महिला धर्मगुरू आहेत.
रेव्हरंड सोफिया मकासरे यांची दोनेक वर्षांपूर्वी पुलगेटजवळील सेंट मेरीज चर्चच्या प्रमुख धर्मगुरू म्हणून निवड झाली होती.
धर्मगुरुपदाची दीक्षा मिळून एखादा चर्चची सूत्रे मिळणाऱ्या शहरातील त्या पहिल्याच महिला. मात्र अलिकडेच त्या इंग्लंडला धर्मगुरु म्हणून गेल्या आहेत.
या चर्च ऑफ इंग्लंडची महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यांत चर्चेस आहेत हे ऐकून अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
नगर शहराजवळ असलेल्या करंज या गावातील अँग्लिकन चर्चने काल शनिवारी ४ ऑकटोबरला आपला १०२वा वर्धानपनदिन किंवा सण साजरा केला.
सारा मल्लली हे पद स्वीकारणाऱ्या १०६व्या धर्मगुरू आहेत. त्या आपले पद पुढील वर्षांच्या जानेवारीमध्ये स्वीकारतील.
कँटरबरीचे आर्चबिशप काय करतात?
सार्वजनिक जीवनातही एक महत्त्वाची भूमिका निभावतात — कारण त्यांना इंग्लंडच्या संसदेमधील ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’मध्ये खासदारकीचे एक पद राखीव असते.
याचा अर्थ असा की ते महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणू शकतात, धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करतात.
दोन मुलांची आई असलेल्या मल्लली यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये ३५ वर्षांहून अधिक काळ सेवा केली.
समानलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास अखेर परवानगी देण्याच्या २०२३च्या निर्णयाचे त्यांनी “चर्चसाठी आशेचा क्षण” असे वर्णन केले होते .
कँटरबरी आर्चबिशप म्हणून नियुक्तीनंतर सारा मल्लली यांनी मँचेस्टरमधील यहुदी उपासना स्थळी झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी म्हटले चर्चची जबाबदारी आहे की “यहुदी समुदायासोबत उभे राहावे आणि यहुदीविरोधाला विरोध करावा.”
त्या स्वतः पहिल्या महिला आर्चबिशप आहेत यावर त्यांनी फारसा भर दिला नाही.

Camil Parkhe

Monday, August 18, 2025

 

Chandu Borde

परवा एका कार्यक्रमानिमित्त अचानक क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्याशी संवाद घडला.

'शब्दसेवा' या नव्या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनासाठी ते व्यासपीठावर असणार होते.
मासिकाचे प्रकाशक व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांनी मलाही तिथे बोलण्यास सांगितले होते.
क्वार्टर गेटपाशी असलेल्या वायएमसीए सभागृहात कार्यक्रम होता. पत्रकार आणि शतायुषी ज्ञानोदय मासिकाचे माजी संपादक अशोक आंग्रे या नव्या मासिकाचे संपादक आहेत. डॉ. अमित त्रिभुवन सूत्रसंचालक होते.
या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या बारामतीच्या आणि वैद्यकीय सेवेची दीर्घ परंपरा असलेल्या कोल्हटकर कुटुंबाचे बारामतीच्या पवार कुटुंबाशी तीन पिढ्यांचे खूप जवळचे नाते.
या संबंधामुळेच डॉ संजीव कोल्हटकर यांच्या आग्रहामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा ऑगस्ट या भरगच्च कार्यक्रमांच्या दिवशीसुद्धा या कार्यक्रमास येण्याचे तात्काळ मान्य केले होते.
डॉ. दादासाहेब कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना अचानक पुण्याऐवजी बीड येथे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यास जावे लागल्याने ते या कार्यक्रमास येऊ शकणार नव्हते.
हा बदल अचानक झाला होता.
कार्यक्रमाआधी आम्ही चहापानासाठी एका टेबलापाशी जमलो असताना अचानक आयोजकांनी ही बातमी चंदू बोर्डे यांना कळवली
आणि आता `तुम्हीच मुख्य पाहुणे म्हणून बॅट हातात घ्यावी' अशी जरा भीतभीतच विनंती केली.
मी त्यांच्या समोरच बसलो होतो, त्यांच्या चेहेऱ्यावरची प्रतिक्रिया न्याहाळत होतो.
पाचसहा वाक्यांच्या प्रस्तावनेनंतर चंदू बोर्डे यांनी `हा राखीव खेळाडू आता मैदानावर जाईल' अशी संमती दिली आणि आयोजकांचा जीव भांड्यात पडला.
चंदू बोर्डे यांच्या अनेक कार्यक्रमाला बातमीदार म्हणून मी हजेरी लावली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याशी संभाषण करण्याची माझी ही पहिलीच वेळ.
आमच्याबरोबर असलेले एक गृहस्थ चंदू बोर्डे यांच्याशी क्रिकेटबाबत बोलत होते.
सत्तरच्या दशकातील आघाडीच्या क्रिकेटपटूंची नावे आणि त्यांच्या खेळण्याच्या तऱ्हा आणि विशिष्ट लकबी याविषयी बोलणे चालू होते.
इतर खेळाडूंबरोबर एकनाथ सोलकर यांचाही विषय निघाला होता .
त्या सर्वच क्रिकेटपटूंची नावे मला माहित होती तरी विषय तिथेच समाप्त होत होता.
क्रिकेटक्षेत्रात एके काळी ` चंदया' आणि `पँथर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतःविषयीसुद्धा ते बोलले.
चंदू बोर्डे यांनी अलीकडेच जुलै २१ला वयाची नव्वदी पार केली आहे, हे लक्षात ठेवून मी हे सर्व ऐकत होते. इतर अनेक गोष्टी मनात टिपून घेत होतो.
चंदू बोर्डे हे पुण्यातल्या रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्चचे सभासद.
पद्मश्री आणि पद्मभूषण किताबाचे मानकरी. राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले पुण्याचे एक भूषण.
आपल्या भाषणात चंदू बोर्डे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
या कार्यक्रमानंतर लवकरच त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला हवा असे त्याच क्षणी ठरवले.

Camil Parkhe August 17, 2025