Saturday, May 13, 2023

जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता.

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

शियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते.

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत.

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली.

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...


माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता
जानकी अक्का म्हणाली. ``वळीखलंस ह्याला -
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती ''
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
पुढे, एका सभेत मी बोलत होतो,
तर, या मंदीचे कारण काय ?
दारिद्र्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,
आणि घडाघडा बोलतच गेला
परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता,
मी म्हणालो -
`आता इतिहासाचे आपणच नायक आहोत
या पुढच्या सर्व चरित्रांचेही '
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला
`अरे, कविता-बिविता लिहितोस कि काय
छान, छान
मलासुद्धा गटे आवडायचा. '
---
नारायण सुर्वे
*जाहिरनामा" (पॉप्युलर प्रकाशन)



No comments:

Post a Comment