बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
कामिल पारखे
कामिल पारखे
goo.gl/GvGRs5
हजार शब्दांच्या तोलाचा असल्याने फोटोला वृत्तपत्रविश्वात खूप महत्त्व आहे. आज तंत्रज्ञानामुळे फोटो मिळवणे सोपे असले तरी एकेकाळी यासाठी किती सायास करावे लागत हे सांगणाऱ्या आठवणी.
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते. त्यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ मध्ये आताच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमे आताइतकी जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली नव्हती. मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तोपर्यंत रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते. एके काळी ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नसे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याविषयी जगातील अनेक देशांत कुतूहल होते. एके काळी ब्रिटिशांनी जेथे राज्य केले होते त्या देशांत आणि इतरही ठिकाणी हा विवाह ठरला, तेव्हापासूनच पुढील काही महिने हे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेतील गोड सोहोळा, 'फेरीटेल वेडिंग' आहे असेच वृत्तपत्रांतून आणि इतर प्रसारमाध्यमातून रंगविले जात होते. याचे एका कारण म्हणजे खुद्द डायना यांचे व्यक्तिमत्व होते. प्रिन्स चार्ल्सने तिशी पार केली असली तरी लेडी डायना स्पेन्सर लग्नाच्या वेळी केवळ वीस वर्षांची होती. प्रसारमाध्यमातून ब्रिटिश राजघराण्याच्या परंपरा, या शाही विवाहाची पूर्वतयारी, डायना यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वगैरे संदर्भात भरपूर काही लिहिले जात होते. या शाही लग्नानिमित्त स्मरणिका ठरतील अशा अनेक वस्तू बाजारात आल्या होत्या. दिनांक २९ जुलै १९८१ रोजी पार पडलेला हा विवाह त्या काळात जगभरातील सर्वाधिक लोकांनी टेलीव्हिजनवर पाहिलेली घटना होती.
जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेल्या या घटनेचा वृत्तांत देण्यासाठी गोव्यात पणजी येथील 'द नवहिंद टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी - बिक्रम व्होरा यांनी - मोठी व्यूहरचना केली होती. द नवहिंद टाइम्स हे त्यावेळी गोव्यातील एकमेव इंग्रजी वृत्तपत्र होते. गोमंतक, नवप्रभा आणि राष्ट्रमत ही स्थानिक मराठी वृत्तपत्रे होती. महाराष्ट्रातील मराठी दैनिकांनी तोपर्यंत गोव्यात प्रवेश केला नव्हता. या सर्व वृत्तपत्रांना लग्नाची बातमी पीटीआय वगैरे वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रे फोटोंसाठी फार मोठया प्रमाणात प्रेस इन्फॉर्मशन ब्युरोवर (पीआयबी) अवलंबून असत. दिल्ल्लीतून पीआयबीने पाठविलेली तीन-चार दिवसांपूर्वीच्या घटनांची छायाचित्रे सर्वच वृत्तपत्रे वापरत असत. या फोटोंचे ब्लॉक करुन नंतर ते छापले जात असत. हा ब्लॅक अँड व्हाईट छपाईचा जमाना होता, वृत्तपत्रांत रंगीत छपाई सुरू होण्यास आणखी दोन दशकांचा कालावधी लागणार होता. लंडन येथील या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी मिळणे अशक्यच होते. संपादक व्होरा यांनी मात्र आपल्या दैनिकात या राजघराण्यातील लग्नाचा फोटो दुसऱ्याच दिवशीच्या अंकात छापण्याचा चंग बांधला होता.
त्याकाळात महाराष्ट्रात टेलीव्हिजनचे कार्यक्रम फक्त मुंबई आणि नजिकच्या परिसरात दिसत असे. जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यातही टेलीव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले तरी आमचे संपादक बिक्रम व्होरा हे गोव्यात टेलीव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. त्यांनी मिरामार येथील आपल्या बंगल्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम पाहता यावे यासाठी आपल्या टेलिव्हिजनसाठी एक उंच अँटेना लावली होती. त्याशिवाय त्या अँटेनाला एका बुस्टरही लावला होता. त्यामुळे मुंबई दूरदर्शन केंद्राने प्रसारित केलेले सर्व कार्यक्रम त्यांना अगदी स्पष्टपणे पाहता येत असत. गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे संपादक व्होरांनी ठरविले होते.
त्यानुसार राजघराण्यातील लग्नाच्या तारखेच्या आधी काही दिवस फोटोग्राफर सतीश नायक याने संपादकांच्या घरी जाऊन रंगीत तालीम घेतली. टेलीव्हिजनसमोर कॅमेरा स्टॅन्ड लावून त्याने टेलीव्हिजनवर चाललेल्या कार्यक्रमाचे चांगल्यात चांगले फोटो काढण्याचा सराव केला. त्यानंतर लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यांच्या वेळी सतिशसह संपादक आणि आम्ही काही बातमीदार टेलिव्हिजनसमोर श्वास रोखून उभे होतो. त्या लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे सतीश कॅमेराचा खटका खटाखट दाबू लागला. लग्नाची चित्रे चालू असेपर्यंत कॅमेराचे शटर वेगाने फिरत गेले. व्हिजुल्स संपेपर्यंत सतीश घामाघूम झाला होता. त्यानंतर तो फोटोच्या प्रिन्टस काढण्यासाठी निघून गेला आणि आम्ही इतर जण दैनिकाच्या ऑफिसात गेलो.
एक तासानंतर सतीश फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता. काही फोटो अगदी मस्त आले होते. संपादकांनी त्यापैकी एका फोटोची छापण्यासाठी निवड केली. फोटो अर्थातच पान एकवरच जाणार होता. दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्सच्या पान एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला आणि फोटो कॅप्शनवर 'टेलिव्हिजन फोटो: सतीश नायक' अशी बायलाइनही होती! अशा प्रकारची बायलाईन वृत्तपत्रीय इतिहासात बहुदा पहिल्यांदाच वापरली गेली असेल.
दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच वृत्तपत्रांनी चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद टाइम्सकडेच होता! आमच्या दैनिकाने याबतीत बाजी मारली होती. संपादक बिक्रम व्होरांनी केलेले नियोजन कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यानंतर पुढे अनेक दिवस म्हणजे पणजीत टेलीव्हिजन टॉवर येईपर्यंत काही विशेष बातम्यांसाठी या दैनिकात टेलीव्हिजन फोटोची बायलाईन्स असे. (संपादक बिक्रम व्होरा नंतर अनेक वर्षे आखाती देशांतील गल्फ न्यूज आणि खलीज टाइम्स या आघाडीच्या इंग्रजी दैनिकांचे संपादक होते.)
महाराष्ट्रातही एक लग्न १९७०च्या दशकात खूप गाजले होते. अकलूजचे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या चिरंजीवांचे त्यांनी मोठया थाटात केलेल्या लग्नामुळे त्यांना लक्षभोजने मोहिते पाटील अशी उपाधी चिकटली होती. (बहुधा गोविंद तळवलकरांनी प्रदान केलेली) या लग्नावर त्याकाळात वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली होती. या लग्नासंबंधी अनेक आख्यायिका आहेत. असे म्हणतात की मोहिते पाटलांनी विविध ग्रामपंचायतींच्या फलकांवरच कुंकू लावून अख्ख्या गावाला लग्नाचे निमंत्रण दिले होते. वऱ्हाडी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी विहिरीतच बर्फाच्या लादी टाकल्या होत्या. या लग्नाची तक्रार थेट पंतप्रधान इंदिरा गांधींकडेच गेल्यावर मोहिते पाटलांनी आपल्या हिंदीत मॅडमकडे स्पष्टीकरण केले होते. अकलूज तालुक्यातील अनेक गावांतील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील लग्नांना ते हजर असल्याने आपल्या घरातील लग्नासाठी या सर्वांना आमंत्रण देणे आवश्यकच होते असे ते म्हणाले होते. शंकरराव मोहिते पाटलांचा असा दांडगा जनसंपर्क होता! सन १९९०च्या दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात आले होते तेव्हा त्यांच्या लग्नाची ही कथा मी माझ्या सहकारी बातमीदारांना सांगितली होती तेव्हा सर्वच जण चकित झाले होते हे आठवते.
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा विवाहाचा गोव्यातील दैनिकात फोटो वापरताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला, अगदी तसाच प्रकार एक दशकानंतर शरद पवार यांची कन्या सुप्रिया यांच्या लग्नाबाबतही झाला होता. दिनांक ४ मार्च १९९१ ला बारामती येथे संध्याकाळी झालेल्या या लग्नाचा फोटो दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्सप्रेसच्या मुंबई-पुणे आवृत्तीत छापण्यासाठी आम्हाला खूप आटापिटा करावा लागला होता.
या लग्नाला पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान राजीव गांधी वगैरे अनेक व्हीव्हीआयपी मंडळी उपस्थित होती. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्यातील विविध खात्यातील प्रमुखांना लग्नाचे निमंत्रण होतेच तसेच गावोगावच्या कार्यकर्त्यांनाही होते. त्याकाळात कोल्हापूरला केंद्रीय उद्योग खात्याचे संचालक असलेले आणि आता निवृत्तीनंतर चिंचवडला माझ्याशेजारी राहणारे विजय देशपांडे या लग्नाला उपस्थित होते. 'त्याकाळात गावोगावचे कार्यकर्ते पवारांच्या घरच्या लग्नाची आपल्याला आलेली पत्रिका आपल्या खिशात बाळगून अभिमानाने इतरांना दाखवत असत' असे ते सांगतात. 'कोल्हापुरातून आम्ही काही सरकारी अधिकारी या लग्नासाठी आलो होतो. लग्नास खूप लोक हजर होते तरी लग्न मात्र साधेपणाने पार पडले. बटबटीत थाटमाट असा मुळीच नव्हता. लग्नास उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांस एकएक पेढा दिला गेला, सर्वांना जेवण नव्हतेच, असे देशपांडे सांगतात.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा बारामतीत झालेल्या या लग्नाचा फोटो पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांत येणे आवश्यक होते. पण डेडलाईनची समस्या होती. संध्याकाळी लग्नाचे फोटो काढून झाल्यानंतर बारामतीतून फोटोग्राफर पुण्याला यायला किमान तीन तास लागले असते आणि इंडियन एक्सप्रेसची डेडलाईन संपली असती. त्याकाळात इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचा डेस्कचा स्टाफ मुंबईतच असायचा. प्रकाश कर्दळे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक होते. आम्ही बातमीदार मुंबईला बातम्या पाठवायचो आणि तेथील डेस्कवरची माणसे दैनिकाची सर्व पाने तयार करून पुण्याला छपाईसाठी पाठवत असत. (याच कारणामुळे पुण्यातील आम्हा पत्रकारांना गणेश चतुर्थीनंतरच्या दिवसाची आणि अनंत चतुर्दशीनंतरच्या दिवसाचीही सुट्टी मिळायची. याचे कारण म्हणजे मुंबईत पेपर विक्रेते गणेश चतुर्थीनंतर तर पुण्यातील विक्रेते अनंत चतुर्दशीनंतर सुट्टी घेतात) डेडलाईन पाळण्यासाठी बारामतीहून लग्नाचा फोटो पुण्यात लवकरात लवकर आणण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने आपली यंत्रणा कामाला लावली होती. त्याकाळात नव्यानेच विकसित झालेले फॅक्स मशिन घेऊन संगणक खात्याचे इंजिनियर मकरंद येरवडेकर बारामतीला गेले होते. फोटोग्राफरने फोटो काढल्यानंतर तिथेच 'डेव्हलप' करून त्यांचे प्रिंट्स काढले. त्यानंतर येरवडेकर यांनी पुण्याच्या ऑफिसला हे फोटो फॅक्स केले. इकडे पुण्याच्या ऑफिसात आम्ही फॅक्स मशिनपुढे श्वास रोखून फोटो कसा येतो हे पाहत होतो. एकदाचे ते लग्नाचे फोटो आमच्यासमोर झळकले आणि आम्ही हुर्र्रे करून अक्षरश: ओरडलोच!
काही दिवसांपूर्वी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचे दुसरे चिरंजीव प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाचा सोहोळा टेलिव्हिजनवर लाईव्ह पाहत असताना १९८१ च्या त्या 'फेरिटेल' लग्नसमारंभाची आणि १९९१च्या सुप्रिया सुळेंच्या लग्नाची साहजिकच आठवण झाली. या दोन्ही लग्नांचे फोटो वृत्तपत्रात ताबडतोब छापण्यासाठी आम्हाला किती प्रयत्न करावे लागले होते याची आठवण झाली. त्यानंतर आतापर्यंत तंत्रज्ञानाने जी मोठी झेप घेतली आहे त्याची त्या काळात कुणी कल्पनाही केली नव्हती.
No comments:
Post a Comment