Showing posts with label London. Show all posts
Showing posts with label London. Show all posts

Saturday, September 24, 2022

 जगभर, भारतात  गाजलेली लग्ने 

 

गोव्यात कॉलेजात असताना आणि नवहिंद टाइम्स मध्ये बातमीदार असताना लंडनमध्ये साखरपुडा होऊन तिथेच झालेले प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांचे लग्न तेव्हा जगभर गाजले. जगभरच्या नियतकालिकांत या `फेरी टेल' म्हणून गणल्या जाणाऱ्या लग्नाविषयी कितीतरी दिवस रकानेच्या रकाने लिहिले जात होते. `विसाव्या शतकाचे मोठे लग्न' असे वर्णन त्यावेळी केले गेले होते.

पुण्यात इंडियन एक्सप्रेसच्या कॅंपातल्या ऑफिसात होतो तेव्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विजयसिंह मोहिते पाटील आमच्याशी गप्पा करायला आले होते. ते गेल्यानंतर मग मी माझ्या सहकाऱ्यांना या मंत्रीमहोदयांच्या लग्नाची गोष्ट सांगितली तेव्हा सगळे जण थक्क झाले होते. 
 
अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटलांचे सत्तरच्या दशकातले लग्न महाराष्ट्रभर गाजले होते ते त्यांचे वडील सहकारनेते शंकरराव मोहिते पाटील यांच्यामुळे. या लग्नासाठी वरपित्यांनी गावोगावच्या लोकांना आमंत्रण दिले होते. असं म्हणतात कि या लग्नाच्या आवतणासाठी घरटी आमंत्रण देण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या बोर्डालाच कुंकू-तांदळाचा टिळा लावण्यात आला होता. आणि ही मंडळी खरंच लग्नाला आली पण.वऱ्हाडासाठी पाण्यासाठी विहिरींत बर्फाच्या लाद्या सोडण्यात आल्या होत्या, अशा अनेक दंतकथा आहेत. 
 
 
बहात्तरच्या दुष्काळात असे लग्न झाले याची तक्रार दिल्लीत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींकडे करण्यात आली होती. ``मी तर या सगळ्या गावातील लोकांच्या बारशाला, लग्नांना, मयतीला गेलेलो आहे, मग त्यांना घराच्या लग्नाचे आमंत्रण द्यावे लागणार ना?'' असे त्यांनीं इंदिराबाईंना आपल्या हिंदी भाषेत उत्तर दिले होते. 
 
महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी या लग्नावर सडकून टीका करताना अग्रलेखात शंकरराव मोहिते पाटलांना 'लक्षभोजने' ही उपाधी लावली ती या नेत्याला कायमची चिकटली. 
 
सुप्रिया पवार आणि सदानंद सुळे यांचे बारामतीतले १९९१ सालचे लग्न गाजले ते वेगळ्या अर्थाने. 
 
वधुपिता होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार आणि वऱ्हाड मंडळींत पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान राजीव गांधी, जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला वगैरेंचा समावेश होता. 
 
 
मोस्ट सुटेबाल बॉय वा मोस्ट सुटेबल गर्ल त्यांची लग्ने गाजणारच. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर असे अनेक तारे आता अवतरले आहेत 
 
सत्तरच्या दशकात आजच्या सारखी समाजमाध्यमे नव्हती तरी राजेश खन्ना आणि `बॉबी’ डिंपल कपाडिया यांचे लग्न अनेकांच्या पचनी पडले नव्हते. त्याच्या बरेच वर्षे आधी `मदर इंडिया'त सुनिल दत्तच्या आईची भूमिका केल्यानंतर नर्गिसने सुनील दत्तशी लग्न केल्यावर अशाच काही कोलाहल झाला होता असे म्हणतात 
 
महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या घरातल्या लग्नाची चर्चा मागच्या आठवड्यात वृत्त वाहिनींवर झाली. काय ते लग्न आणि काय ते एकेकाचे आहेऱ .. 
 
कालपरवा विश्वसुंदरी सुश्मिता सेन आणि `आयपीएल' जनक ललित मोदी यांचे एकत्रित फोटो झळकल्यावर अशीच नवी चर्चा झाली.  

Camil Parkhe

Tuesday, April 12, 2022

शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री


शहरात नव्यानेच सुरु झालेल्या विविध गृहोपयोगी, हस्तकला आणि बचतगटांच्या कलाकृतींच्या आणि उत्पादनांच्या प्रदर्शनाला गेलो होतो. दरवर्षी आमच्या शहरात वर्षांतून दोनदा महिन्याभराच्या कालावधीसाठी भरणाऱ्या या प्रदर्शनाला बायकोसह मी आवर्जून जात असतो, त्याचे कारण आम्हा दोघांनाही शॉपिंग करणे आवडते आणि दुसरे म्हणजे नित्योपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू - अगदी कपडेसुद्धा - येथे स्वस्त दरांत मिळकत असतात. तर परवा या प्रदर्शनाला गेलो आणि अंग अगदी आनंदाने मोहोरून गेले.

पाचशे चौरस मिटर क्षेत्राच्या आसपास भरलेल्या त्या प्रदर्शनाला लोक अगदी उत्साहाने आले होते आणि ते पाहून आनंद होण्याचे कारण तसे वेगळेच होते. जवळजवळ दोनअडीच वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन भरले होते आणि इतक्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच लोक तोंडाला मास्क लावून की होईना पण मोठ्या संख्येनें जमले होते. कोरोनाच्या साथीमुळे गेली अनेक महिने अशाप्रकारे कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येणे शक्य झाले नव्हते.पण आता कोरोनाचे संकट नियंत्रणात आले आहे हे समोरच्या लोकांच्या गर्दीवरुन स्पष्ट होत होते.
माझ्या मनात घोळत असलेल्या या भावना तिथे जमलेल्या इतर लोकांमध्ये असण्याची शक्यता होती. एकदिड तासांच्या भ्रमंतीनंतर प्रदर्शनास्थळाच्या एका कोपऱ्यात `एक्झिट' असे बाणाच्या चिन्हाने दर्शवलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. सामान घेऊन कारच्या दिशेने वळण्याआधी प्रवेशद्वारापाशीच असलेल्या एका स्वतंत्र दालनाकडे माझे लक्ष गेले आणि मी जागच्याजागी थिजलो.
गेली अनेक वर्षे या प्रदर्शनाला मी येत असलो तरी अशा प्रकारचे स्वतंत्र भव्य दालन मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्या दालनाचे नाव वाचून त्या क्षणी मला काय वाटले हे व्यक्त करणे खूप अवघड आहे.
त्या दालनाच्या प्रवेशदारात ठळकपणे लिहिले होते. ``शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री''
विविध विषयांवरची पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे वेड मला माझ्या लहानपणापासून लागलेले असले तरी मला त्या दालनाकडे जाऊसे वाटेना. दोन्ही हातांत विविध वस्तूंनी भरलेल्या पिशव्या घेऊन मी त्याच जागेवर थिजून राहिलो होतो याचे कारण कि वाचण्यायोग्य पुस्तकांची किलोंच्या मापाने विक्री ही कल्पनाच मला खिन्नखिन्न करुन गेली होती.
गोव्यात आणि कोकणात अनेक ठिकाणी बांगडा, सार्दिन वगैरे मासळी वाट्याने विकतात, इतरत्र ही मासळी किलोच्या मापाने विकली जाते, काही ठिकाणी केळी डझनावार विकली जाते तर काही ठिकाणी किलोने विकली जातात. एक वर्षांपूर्वी दमण येथे मेथीची भाजी किलोने विकली जाते हे पाहून असाच मी गारगार झालो होतो. तरीसुद्धा हे सर्व ठीक आहे पण पुस्तकांची किलोंनी विक्री ?
पुस्तकांचे मूल्य कसे मोजले जावे याविषयी काही ठोकताळे असू शकत नाही. अनेकदा अभ्यासासाठी नोट्स घेतलेल्या जुन्या वह्या रद्दीत काढाव्या लागतात तेव्हा त्या वह्यांचे खरेखुरे मूल्य त्या परिश्रमपूर्वक नोट्स तयार करणाराच जाणत असतो. तीच बाब वर्षानुवर्षे गोळा केलेल्या पुस्तकांचीही असते.
दहापंधरा वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनीरिंगचे पदवीधर असलेले एक स्नेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आणि आपल्या सरकारी निवासस्थानाचा ताबा देण्याआधी त्यांनी आपल्याकडे असलेल्या तांत्रिक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संच हुबळी येथील इंजिनियरिंग असोसिएशनकडे सुपूर्द केला. देशात विविध ठिकाणी आणि त्याचप्रमाणे परदेशांत कामानिमित्त गेल्यावर ही पुस्तके त्यांनी जमा केली होती.
काही वर्षांनी परदेशातील एक इंजिनियरने या वाचनालयाला भेट दिली असता या संग्रहाकडे त्याचे लक्ष गेले आणि इतकी अमूल्य असलेली पुस्तके कोठून मिळवली आणि या पुस्तकांच्या फोटोकॉपीज मिळू शकतील का अशी विचारणा त्याने ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांना त्या पुस्तकांचे खरेखुरे मूल्य समजले !
ब्रिटिश जेसुईट धर्मगुरु असलेल्या फादर थॉमस स्टिफन्स यांनी गोव्यात सतराव्या शतका च्या सुरुवातीला 'ख्रिस्तपुराण' या मराठी महाकाव्याची रचना केली. देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित झाली नसल्याने हे पुस्तक पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात रोमन लिपीत छापण्यात आले, त्या दृष्टीने मराठीतील हे पहिले छापील पुस्तक. या ख्रिस्तपुराणाची देवनागरी लिपीतील एक प्रत जस्टीन एडवर्ड ॲबट यांना लंडनमधील स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज एका ग्रंथालयात आढळली.
कोण हे जस्टीन एडवर्ड ॲबट?
अहमदनगर येथे अनेक वर्षे राहिलेल्या अमेरिकन मिशनरी ॲबट यांनी अमेरिकेत परतल्यावर `पोएट्स ऑफ महाराष्ट्र' ही ग्रंथमाला लिहून मराठी संत वाड्मय इंग्रजीत आणण्याचे फार महत्त्वाचे योगदान दिले आहे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या उभारणीसाठी आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी त्याकाळात तीन हजार डॉलर्सची मदत केली होती. त्यांचे तैलचित्र भारत इतिहास संशोधन मंडळात आजही आहे.
माझ्या 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकात जस्टीन एडवर्ड ॲबट यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे.
तर लंडनमधल्या ख्रिस्तपुराणाच्या देवनागरी लिपीतील प्रतीविषयी याविषयीचे एक पत्र ॲबट यांनी मुंबईतल्या The Times of India इंग्रजी दैनिकात १९२५ साली लिहिले. काही दशकानंतर या जुन्या पत्राविषयी संदर्भ मिळाल्यावर पुण्यात पेपल सेमिनरीत प्राध्यापक असणारे फादर हान्स स्टाफनर यांनी लंडनमधल्या देवनागरी लिपीतील या ख्रिस्तपुराणाची मायक्रोफिल्म मिळवली आणि त्यातून देवनागरी ख्रिस्तपुराणाच्या दोन प्रती केल्या,
त्यापैकी एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर वाचनालयात ठेवण्यात आली आहे. दुसरी प्रत नारायण पेठेतल्या स्नेहसदन जेसुईट संस्थेत आहे !
काही पुस्तकांचे मुल्य ठरविणेसुद्धा शक्य नसते हे यावरुन दिसून येईल.
माझ्या शहरातल्या एका वाचनालयात गेली अनेक वर्षे मी जात आहे. काही वर्षांपूर्वी या वाचनालयात पुस्तके निवडण्यासाठी, बदलण्यासाठी येणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा आणि इतरांचा चांगला राबता असायचा. गेली काही वर्षे मात्र तिकडे कुणी फिरकतही नाही. पुस्तके शोधण्यासाठी ओळीने लावलेल्या कपाटांकडे मी जातो तेव्हा उडणाऱ्या धुळीपासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल लावावा लागतो. तिथे शेल्फवर रांगेत रचून ठेवलेल्या पुस्तकांना खूप काळ कुणी हातही लावलेला नाही हे लगेच कळते. मात्र पुस्तकांचे नाव आणि विषय पाहून यापैकी कुठले पुस्तक आधी वाचायला घ्यावे असा गोंधळ उडावा इतकी ही पुस्तके अमूल्य आणि दुर्मिळ आहेत.
अलिकडेच `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' या जेसुईट फादर टोनी जॉर्ज यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना वाचत होतो. `स्वातंत्र्यपूर्व काळातील (१८५० ते १९५०) धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तींची आत्मनिवेदने : सामाजिक आणि वाड्मयीन अभ्यास'' हा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकासाठी संशोधन करताना त्यांना फार महत्त्वाचा ग्रंथऐवज अहमदनगर कॉलेजमध्ये मिळाला.
मुंबईत अंधेरीइथल्या `विनयालय' या जेसुईट संस्थेतल्या प्राध्यापक असलेल्या फादर टोनी जॉर्ज यांनी लिहिले आहे: ''अहमदनगर कॉलेजच्या पुराभिलेख शाखेमध्ये नगरहून निघून गेलेल्या अनेक प्रोटेस्टंट मिशनरींची ग्रंथसंपदा पोत्यांत बंदिस्त होती. त्या जीर्णावस्थेत असलेल्या ज्ञानातून अभ्यासाविषयाचे ग्रंथ निवडले. परंतु ते हातांतच कोसळत असत, झेरॉक्स, फोटोमध्ये त्यांना बंदिस्तही करता येत नव्हते. ते बरेचसे हातांनी लिखित स्वरुपात उपलब्ध केले.''
अशाच स्वरुपाची कितीतरी अमुल्य असलेली ग्रंथसंपदा कितीतरी खासगी, निमसरकारी किंवा सरकारी वाचनालयांत धूळ गोळा करत असेल याची कल्पना करता येते. क्वचितच एखादा रत्नपारखी येतो आणि त्यातून आपल्याला हवे असलेले रत्ने निवडून, गोळा करून जातो.
रस्त्यांवर फुटपाथवर विक्रीला असलेल्या जुन्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांमधून खूपदा दुर्मिळ असलेली पुस्तके मिळतात याचा अनुभव अनेकांना आलेला असतो.
पुण्याला गेलो कि `सकाळ' ऑफिसातून परतताना शनिवारवाड्याजवळच असलेल्या `साधना' च्या पुस्तक स्टॉलला मी नेहेमी भेट देतो. तेथे गेल्यावर लगेच आत न शिरता त्या आवारातच दाराबाहेर टेबलावर ठेवलेल्या जुनी पुस्तके, स्मरणिका, दिवाळी ग्रंथ आणि गौरव ग्रंथ मी चाळतो. निम्म्या किंमतीत ही पुस्तके असतात. या टेबलावर ठेवलेली कितीतरी मौल्यवान पुस्तके आणि इतर अंक मी गोळा केलेली आहेत.
त्यामुळेच त्या प्रदर्शनात किलोच्या मापात पुस्तके विकली जाताना पाहून माझ्या भावना संमिश्र होत्या. छापून झालेली, नवीकोरी असलेली ती शेकडो पुस्तके स्वस्त आणि किलोच्या दरात विकून टाकून निदान काही वाचकांना तरी वाचनसंस्कृतीचा लाभ मिळवून देण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता. न जाणो, त्या पुस्तकांतून काही जणांना ज्याचे मोलही करता येणार नाही असा आनंद आणि लाभ मिळू शकेल.
काही महिन्यांपूर्वी मीसुद्धा माझ्याकडची कितीतरी जुनी इंग्रजी आणि मराठी पुस्तके अशीच ग्रंथालयांना आणि इतरांना देऊन टाकली होती. ही पुस्तके `चांगल्या घरात' जावी एव्हढीच एक भावना होती.
त्या प्रदर्शनस्थळांतील विविध दालनांकडे गर्दीचे लोंढे दिसत होते तर पुस्तकविक्रीच्या या प्रशस्त दालनात काही मोजकेच लोक दिसत होते. इतर भरगच्च दालनांतल्या विक्रीला असलेल्या वस्तू आणि या दालनातील विक्रीला असलेली पुस्तके यांना मात्र एकाच तराजूच्या तागडींमध्ये मोजता येणार नव्हते हे नक्की. त्यांचे वेगळे मूल्य जाणण्यासाठी पारख करणारी दृष्टी मात्र हवी.

Wednesday, December 9, 2020

समाजवादी नेते नानासाहेब गोरे




मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला नुकताच रुजू झालो होतो आणि शहरातील बातमीच्या वातावरणाची आणि संस्कृतीची ओळख करून घेत होतो. नोव्हेंबर १९८९ चा हा काळ. स्थानिक बातमीसाठी आणि बाहेरील बातम्यांसाठी स्थानिक जोड किंवा आशय देण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील पुण्यात खूप लोक आहेत हे लक्षात आले. गोव्यात बातमीदारी करताना ज्येष्ठ्य स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर, मार्क्सवादी नेते जॉर्ज वाझ, नारायण देसाई वगैरे मंडळींचा अशा कामांसाठी मदत व्हायची. औरंगाबादमध्ये लोकमत टाईम्सचे काम करताना मराठवाडा स्वात्रंत्र्यसेनानीं गोविंदभाई श्रॉफ, सुभाष लोमटे, कॉम्रेड भालचंद्र कानगो, ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर वगैरेंशी बोलून बातमी तयार व्हायची.
पुण्यात तर अशा लोकांचे मोठे भांडारच होते. तर अशा आपापल्या क्षेत्रांतील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ असलेल्या मंडळींमध्ये समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि ग. प्र. प्रधान, माजी मंत्री आणि पर्यावरणवादी मोहन धारीया, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ, डॉ निलम गोऱ्हे, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि गोविंद स्वरुप अशी भलीमोठी यादी होती.
या सर्व ज्येष्ठ मंडळींमध्येही काही जणांचे व्यक्तिमत्व अगदी उठून दिसायचे ते त्यांच्या ज्ञान आणि अनुभवांच्या शिदोरींमुळे. ना. ग. (नारायण गणेश) किंवा नानासाहेब गोरे हे अशांपैकी एक व्यक्तिमत्व. काही वर्षांपूर्वीच लोकसभेवर निवडून आल्यानंतर जनता पक्षाच्या राजवटीत इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी केलेले काम हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अगदी अलिकडचे पद. त्याआधी कितीतरी वर्षे देशातील एक आघाडीचे समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, लेखक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्यामुळे इंडियन एक्सप्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकासाठी बातम्या लिहितांना त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची नेहेमी गरज पडायची आणि नानासाहेबांनी कधी नाही म्हटले वा विशिष्ट कारणांमुळे 'कोट' देण्याचे टाळले असे मला आठवत नाही.
नानासाहेब गोरे यांच्या आडनावाची इंग्रजी स्पेलींग Gore असे नसून Goray अशी आहे हे इंग्रजी वृत्तपत्राच्या पुण्यात नव्यानेच आलेल्या बातमीदाराला बजावले जायचे. त्याकाळात एखादी मोठी घटना घडली की त्यात्या क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तीला त्यांच्या घरी व ऑफिसांत लँडलाईनवर फोन करुन त्यांचे मत विचारायचे अशी पद्धत होती. बातमीदार लोक आताही असेच पण मोबाईलवर वा ईमेलवर प्रतिक्रिया विचारतात. ( रिऍक्शन देणारे म्हणून रिऍक्शनरी लोक, असे काही पत्रकार गंमतीने म्हणत ).
नानासाहेब गोरे ज्या पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्याविषयी मला आजही नवलमिश्रीत अचंबा वाटतो. त्याचे कारण म्हणजे नानासाहेबांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया विचारली की ते लगेच म्हणायचे, ''हं , घ्या लिहून...! '' त्यांना फोन करण्याआधी बातमीदाराने पेन आणि नोटपॅडसह तयारीत असणे गरजेचे असायचे. अन त्यानंतर काही मोजक्याच वाक्यांत अगदी मुद्देसूदपणे कुठलेही पाल्हाळ न लावता नानासाहेब आपले मत अक्षरश: डिक्टेट करायचे. दोनतीन पॅराग्राफची ती प्रतिक्रिया कसलाही बदल न करता अगदी जशीची तशी वापरण्यासारखी असायची. एक शब्द जास्त नाही आणि एक शब्द कमी नाही. नेहेमीच्या अनुभवामुळे आणि एखादी घटना घडल्यावर नानासाहेबांचा फोन दिवसभर खणखणत राहणार हे ठरले असायचे. नानासाहेबांनी वाढत्या वयातही प्रतिक्रियेला नकार देऊन कुणाही पत्रकाराला नाराज केले नव्हते.
काही काळानंतर नानासाहेब गोरे यांच्या सदाशिव पेठेतील एकमजली वाडेवजा जुन्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली. त्यानंतर या भेटीगाठी वाढत गेल्या. या सदाशिव पेठेत त्यावेळी अनेक समाजवादी नेतेमंडळी राहत होती. मी पुण्यात येण्याआधीच एस. एम. जोशी यांचे निधन झाले होते. नानासाहेबांच्या घराच्या आसपास राहणाऱ्या इतर समाजवादी साथी मंडळींमध्ये शिरुभाऊ लिमये आणि ग. प्र. प्रधान यांचा समावेश होता. नानासाहेबांना भेटण्यासाठी एक चिंचोळा जिना चढून जावा लागत असे. त्यांची मुलगी परदेशात असल्याने या घरात नानासाहेब एकटेच राहायचे, त्यांचे जेवणखाण करण्यासाठी केअरटेकर होती. नानासाहेबांची वामकुक्षी झाल्यानंतर दुपारी साधारणतः तीननंतर मी त्यांना भेटायला जायचो. बहुतेक वेळेस पूर्वसूचना नसायची, मात्र भेटण्यासाठी ही कधीही अट नसायची.
एकदा आम्ही बोलत असताना चारच्या सुमारास केअरटेकरने आवाज दिला, तसे नानासाहेब जागेवरुन उठले आणि समोरच्या डायनिंग रुममध्ये गेले.
भिंतीला असलेल्या बिनागज वा पडदे नसलेल्या खिडकीतून ते तिथे दुपारचा चहाबिस्कीट घेत होते हे मला दिसत होते. पाचच मिनिटांत नानासाहेब परतले आणि आमची मुलाखत पुन्हा सुरु झाली. नानासाहेब एकटेच राहत असल्याने आणि माझ्यासारखे अनेक उपटसुंभ व्यक्ती त्यांना दररोज भेटायला येत असल्याने त्यांनी या सर्वांनां चहापाणी वा इतर आदरातिथ्य करावे अशी अपेक्षा करणेच चुकीचे होते. मात्र काही पत्रकारमंडळी ''जरा थांबा, मी चहा घेऊन येतो..!'' या पुणेरी वाक्याने नानासाहेबांची चेष्टाटवाळी करत असत हे मी अनुभवले होते. मात्र नानासाहेबांच्या घरच्या परिस्थितीचीं जाणिव झाल्यावर मला या वागणुकीत गैर दिसले नाही.
हीच गोष्ट स्वतःचे फोटो देण्याबाबतची. नानासाहेबांना एकदा मी एका लेखाबरोबर वापरण्यासाठी त्यांचा एक फोटो मागितला. त्यावर ''फोटोग्राफर बोलवा, नवा फोटो काढा, मी तयारच आहे !'' असे ते म्हणाले. पत्रकारांची मुलाखतीसाठी रांग लागलेली असताना प्रत्येक बातमीदाराला ब्लॅक अँड व्हाईट का होईना पण फोटो देणे त्यांना शक्य नव्हते आणि काही गरजही नव्हती. मुलाखत दिल्यावर त्या पत्रकाराने त्या लेखाचे कात्रण द्यावे अशीही अपेक्षा ते ठेवत नसत.
याच्या अगदी उलट अनुभव नानासाहेबांचे जवळचे शेजारी आणि गोवा मुक्तिसंग्रामात नानासाहेबांबरोबरच कारावासाची शिक्षा झालेल्या शिरूभाऊ लिमये यांचा. नानासाहेबांच्या तुलनेने शिरुभाऊ तसे 'लो प्रोफाईल' नेते वा कार्यकर्ते. शिरुभाऊंची मी मुलाखत घेतल्यानंतर मी त्यांच्याकडे एखादा फोटो देण्याची मागणी केली तेव्हा भोळ्या सांबाप्रमाणे त्यांनी मला गोव्याच्या आग्वाद तुरुंगातील आणखी एका नेत्याबरोबरचा एक दुर्मिळ कृष्णधवल फोटोच माझ्यापुढे ठेवला ! टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे प्लस पुरवणीत गोवा मुक्तिसंग्रामाबद्दलच्या माझ्या लेखात नानासाहेब गोरे आणि शिरुभाऊंच्या मुलाखतीसह तो दुर्मिळ फोटो प्रसिद्ध झाला.
नानासाहेब गोरे यांच्या मुलाखतीवर आधारीत लेख मी गोव्यात 'गोमंतक'ला पाठवला तेव्हा गोमंतक'चे संपादक नारायण आठवले यांनी गोव्याच्या मुक्ती सोहोळ्यानिमित्त काढलेल्या खास पुरवणीत तो लेख कव्हर स्टोरी म्हणून वापरला होता.
या ज्येष्ठ विचारवंत आणि राजकिय नेत्याशी एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी बोलताना मी माझ्या अल्पमतीनुसार एक शंका मांडली होती आणि तेव्हा रागाने भडकलेले नानासाहेब मला अजूनही चांगले आठवतात. समाजवादी, साम्यवादी अशा वैश्विक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाषेच्या आणि प्रादेशिक मुद्यावर संकुचित भुमिका का घ्यावी आणि त्यासाठी १०५ लोकांना हौतात्म्य पत्करावे लागले असा माझा बाळबोध प्रश्न होता.
संतापलेल्या नानासाहेबांनी त्यावेळी ‘’कामिल, आपण चांगला, नीट अभ्यास करुन प्रश्न उपस्थित करावे’’ असे त्यावेळी मला सुनावले होते. ‘’तुम्ही लिहित असलेला हा लेख छपाईला पाठविण्याआधी मला दाखवा’’, असेही त्यावेळी त्यांनी मला बजावले होते.
अलिकडेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वर्यू आचार्य अत्रे यांच्या खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि भारतसुद्धा सोडून परदेशातच स्थायिक झालेल्या एका कन्येचे वृदापकाळाने निधन झाले अशी बातमी वाचली तेव्हा नानासाहेबांबरोबर उडालेल्या या छोट्याशा खडाजंगीची मला आठवण झाली होती. त्यानंतर काही दिवस नानासाहेबांची भेट घेणे मी टाळले होते.
नानासाहेबांच्या त्या अगदी छोट्याशा गढीत प्रवेश करताना आणि धोतर, सदरा पेहेरावात असलेल्या नानासाहेबांशी बोलताना त्यांच्या साधेपणाचे मला नेहेमी आश्चर्य वाटायचे. त्याकाळात मी डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोरच्या हॉटेल हिल्व्ह्यू -प्रिया लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर राहत होतो. मात्र रशियाचा दौरा करताना आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना युरोपातील जीवनशैलीचा मी अनुभव घेतला होता. त्यामुळे १९४२च्या चले जाव आंदोलनात शिक्षा झालेल्या, गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या, १९५७ ला पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेल्या आणि नंतर राज्यसभेचेही सभासद असलेल्या, वर्षातून काही महिने अमेरिकेत आपल्या मुलीबरोबर राहणाऱ्या आणि मुख्य म्हणजे ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त असलेल्या माणसाशी आपण बोलत आहोत यावर विश्वास ठेवणे अवघड व्हावे अशी त्यांची साधीसुधी जीवनशैली होती.
दोनतीन वेळेस त्यांचे डायनिंग टेबल असलेल्या आतल्या खोलीत जाण्याचा योग आला तेव्हा भिंतींना लागून असलेल्या लाकडी कपाटांतील पुस्तकांकडे मी नीट पाहून घेतले होते. स्वतः नानासाहेबांनी अनेक पुस्तके लिहिली होती हे मला माहिती होतेच. त्यांच्या तुरुंगवासातील दिवसांवर आधारीत एक लेख मला शाळेत पाठयपुस्तकात अभ्यासालाही होता.
नानासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर निर्माण होण्यास आणखी एक कारण होते. शासकीय आणि खासगी वैद्यकीय कॉलेजांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी मृतदेहांचा तुटवडा पडतो म्हणून देहदानाची चळवळ सुरु करणारे सोहोनी यांच्याबाबाबत मी इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक बातम्या छापल्या होत्या. सत्तरी ओलांडलेल्या सोहोनी यांच्या देहदान चळवळीस पाठबळ देणाऱ्या पुण्यातील दोन प्रमुख व्यक्तींमध्ये ना. ग. गोरे यांचा समावेश होता. यापैकी दुसरी व्यक्ती होती उद्योगपती शंतनुराव तथा एस. एल. किर्लोस्कर.
नानासाहेब आणि शंतनुराव या दोघांनीही मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरुन देहदानाच्या चळवळीस आपला सक्रिय पाठिंबा आहे असे जाहीर केले होते. देहदान चळवळीचा प्रचार करताना सोहोनी नेहेमी या दोन समाजधुरीणांचा उल्लेख करत असत. विशेष म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या व्यक्तिचित्राचा समावेश असलेले 'उत्तुंग' हे संजय सोनवणी यांनी प्रकाशित केलेले माझे पुस्तक भेट देण्यासाठी किर्लोस्कर यांनाही याच काळात मी सोनवणी यांच्याबरोबर भेटलो होतो. मात्र नानासाहेबांचा आपल्या देहदानाचा हा निर्णय त्यांच्या अमेरिकेतील मुलीने देहदानाविरुद्ध भूमिका घेतल्याने पूर्ण होऊ शकला नाही.
एक मात्र खरे कि त्याकाळात नानासाहेबांशी बोलताना आपण किती मोठ्या, विद्वान आणि अनुभवसमृद्ध व्यक्तीशी बोलतो आहोत याची त्यावेळेस जाणिव झाली नव्हती. मी त्यांच्या गाठीभेटी घेत होतो त्यावेळेपर्यंत ना. ग. गोरे या व्यक्तीच्या जीवन आणि कार्याविषयी प्रतिष्ठेच्या मराठी विश्वकोशात यदुनाथ थत्तेलिखित एक नोंदही प्रसिद्ध झाली आहे याची मला माहितीही नव्हती.
त्यांच्या मुलाखतीवर आधारीत गोवामुक्ती संग्रामावर लिहिलेला लेख पणजीतल्या दैनिक 'गोमंतक'चे संपादक नारायण आठवले यांनी छापला होता.

 

पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पात्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात  स्पष्ट केली होती. आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.

परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शास्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. 

पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल पण अखेर असेच घडले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.

कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या पंतकालीन मराठी साहित्यिकांची तोपर्यँत गोमंतकाबाहेरच करत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावे अशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.

पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी दिवंगत एस. एम. जोशी यांची घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. एसेम  यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले. पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली. जुन्या आठवणींना

ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मग ती सशस्त्र असो व निशस्त्र पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.

गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा डमोचन सहायक समितीचे नानासाहेब एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली. समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही येवेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती. आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस त्रिस्तव बॅगांझा कुर्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वात्यंत्रसेनानाची याप्रसंगी भाषणे झाली होती.

नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी  व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८  पर्यंत पोहोचली. यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. ३ उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती. या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात, गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. भारत छोडो ये १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती येवसलीही आम्हाला दिसून आली.   

आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते, ज्या परिस्थितीत गोवा, दमण बी दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही सत्यभूत होऊ इच्छितो ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा-दमण-दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकराव्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढादिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील. या पात्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू याना पाठविण्यात आली होती.

या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना  यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. किडीबकुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अम्नेस्टी इंटरनॅशनलमुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.

केवळ  स्वातंत्र्याचे  नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती. या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आई वडिलांना धक्काच  बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले, असे नानासाहेब म्हणतात. नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.  

नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात अशी विचारणा पंतप्रधान नेहरूंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली. पण हि पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत. नानासाहेबांनी हसत हसत सांगितले.

नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेवढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.

या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळ सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू श्री. पीटर अस्वारीस, बॅरिस्टर पै आणि श्री. गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली, गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र करू शकतील काय असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला. पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचे कधीच मागे गेला आहे आता एकाच पर्याय राहिलेला  आहे म्हणजे लष्करी कारवाई असे मी पंडितजींना दिले असे श्री.  म्हणतात .   लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले व पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती. श्री. गोरे पुढे म्हणतात.

स्वातंत्र्यसैनिकांचा सशस्त्र निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला. नेहरुंच्या आदेशावरून भारत, गोवा, दमण आणि दिवमध्ये केला अन गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्मा सांडलेले रक्त आणि स्वातंत्र्य श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला. 

Wednesday, August 15, 2018

दोन लग्नांच्या फोटोंची गोष्ट


गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

दोन लग्नांच्या फोटोंची गोष्ट
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८      



कामिल पारखे
goo.gl/GvGRs5  

हजार शब्दांच्या तोलाचा असल्याने फोटोला वृत्तपत्रविश्वात खूप महत्त्व आहे. आज तंत्रज्ञानामुळे फोटो मिळवणे सोपे असले तरी एकेकाळी यासाठी किती सायास करावे लागत हे सांगणाऱ्या आठवणी.
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते. त्यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ मध्ये आताच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे  जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमे आताइतकी जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली  नव्हती. मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तोपर्यंत रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे  भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते. एके काळी ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नसे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याविषयी जगातील  अनेक देशांत  कुतूहल होते. एके काळी ब्रिटिशांनी जेथे राज्य केले होते त्या देशांत आणि इतरही ठिकाणी हा विवाह ठरला, तेव्हापासूनच पुढील काही महिने हे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेतील गोड सोहोळा,  'फेरीटेल वेडिंग' आहे असेच वृत्तपत्रांतून आणि इतर प्रसारमाध्यमातून रंगविले जात होते. याचे एका कारण म्हणजे खुद्द डायना यांचे व्यक्तिमत्व होते. प्रिन्स चार्ल्सने तिशी पार केली असली तरी लेडी डायना स्पेन्सर लग्नाच्या वेळी केवळ वीस वर्षांची  होती. प्रसारमाध्यमातून ब्रिटिश राजघराण्याच्या परंपरा, या शाही विवाहाची पूर्वतयारी, डायना यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वगैरे संदर्भात भरपूर काही लिहिले जात होते. या शाही लग्नानिमित्त स्मरणिका ठरतील अशा अनेक वस्तू बाजारात आल्या होत्या. दिनांक २९ जुलै १९८१ रोजी पार पडलेला हा विवाह त्या काळात जगभरातील सर्वाधिक लोकांनी टेलीव्हिजनवर पाहिलेली घटना होती. 
जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेल्या  या घटनेचा वृत्तांत देण्यासाठी गोव्यात पणजी येथील 'द नवहिंद टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी - बिक्रम व्होरा यांनी -  मोठी व्यूहरचना केली होती.  द नवहिंद टाइम्स हे त्यावेळी गोव्यातील एकमेव इंग्रजी वृत्तपत्र होते. गोमंतक, नवप्रभा आणि राष्ट्रमत ही स्थानिक मराठी वृत्तपत्रे होती. महाराष्ट्रातील मराठी दैनिकांनी तोपर्यंत गोव्यात प्रवेश केला नव्हता. या सर्व वृत्तपत्रांना  लग्नाची बातमी पीटीआय वगैरे वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रे फोटोंसाठी फार मोठया प्रमाणात प्रेस इन्फॉर्मशन ब्युरोवर (पीआयबी) अवलंबून  असत. दिल्ल्लीतून पीआयबीने पाठविलेली तीन-चार दिवसांपूर्वीच्या घटनांची  छायाचित्रे  सर्वच वृत्तपत्रे वापरत असत. या फोटोंचे ब्लॉक करुन नंतर ते छापले जात असत. हा ब्लॅक अँड व्हाईट छपाईचा जमाना होता, वृत्तपत्रांत रंगीत छपाई सुरू होण्यास आणखी दोन दशकांचा कालावधी लागणार होता. लंडन येथील या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी मिळणे अशक्यच होते. संपादक व्होरा यांनी मात्र आपल्या दैनिकात या राजघराण्यातील लग्नाचा फोटो दुसऱ्याच दिवशीच्या अंकात छापण्याचा चंग बांधला होता. 
त्याकाळात महाराष्ट्रात टेलीव्हिजनचे कार्यक्रम फक्त मुंबई आणि नजिकच्या परिसरात दिसत असे. जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यातही टेलीव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले तरी आमचे संपादक बिक्रम व्होरा हे गोव्यात टेलीव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. त्यांनी मिरामार येथील आपल्या बंगल्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम पाहता यावे यासाठी आपल्या टेलिव्हिजनसाठी एक उंच अँटेना लावली होती. त्याशिवाय त्या अँटेनाला एका बुस्टरही लावला होता. त्यामुळे मुंबई दूरदर्शन केंद्राने प्रसारित केलेले सर्व कार्यक्रम त्यांना अगदी स्पष्टपणे पाहता येत असत. गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे संपादक व्होरांनी ठरविले होते. 
त्यानुसार राजघराण्यातील लग्नाच्या तारखेच्या आधी काही दिवस फोटोग्राफर सतीश नायक याने संपादकांच्या घरी जाऊन रंगीत तालीम घेतली. टेलीव्हिजनसमोर कॅमेरा स्टॅन्ड लावून त्याने टेलीव्हिजनवर चाललेल्या कार्यक्रमाचे चांगल्यात  चांगले फोटो काढण्याचा सराव केला. त्यानंतर लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यांच्या वेळी सतिशसह संपादक आणि आम्ही काही बातमीदार टेलिव्हिजनसमोर श्वास रोखून उभे होतो. त्या लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे सतीश कॅमेराचा  खटका खटाखट दाबू लागला. लग्नाची चित्रे  चालू असेपर्यंत कॅमेराचे शटर वेगाने फिरत गेले. व्हिजुल्स संपेपर्यंत सतीश घामाघूम झाला होता. त्यानंतर तो फोटोच्या प्रिन्टस काढण्यासाठी निघून गेला आणि आम्ही इतर जण दैनिकाच्या ऑफिसात गेलो. 
एक तासानंतर सतीश फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता. काही फोटो अगदी मस्त आले होते. संपादकांनी त्यापैकी एका फोटोची  छापण्यासाठी निवड केली. फोटो अर्थातच पान एकवरच  जाणार होता. दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्सच्या पान एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला आणि फोटो कॅप्शनवर  'टेलिव्हिजन फोटो: सतीश नायक' अशी बायलाइनही होती! अशा प्रकारची बायलाईन वृत्तपत्रीय इतिहासात बहुदा पहिल्यांदाच वापरली गेली असेल. 
दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच वृत्तपत्रांनी चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद टाइम्सकडेच होता! आमच्या दैनिकाने याबतीत बाजी मारली होती. संपादक बिक्रम व्होरांनी केलेले नियोजन कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यानंतर पुढे अनेक दिवस म्हणजे पणजीत टेलीव्हिजन टॉवर येईपर्यंत काही विशेष बातम्यांसाठी या दैनिकात टेलीव्हिजन फोटोची बायलाईन्स असे. (संपादक बिक्रम व्होरा नंतर अनेक वर्षे आखाती देशांतील गल्फ न्यूज आणि खलीज टाइम्स या आघाडीच्या इंग्रजी  दैनिकांचे संपादक होते.)
महाराष्ट्रातही एक लग्न १९७०च्या दशकात खूप गाजले होते. अकलूजचे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या चिरंजीवांचे त्यांनी मोठया थाटात केलेल्या लग्नामुळे त्यांना लक्षभोजने मोहिते पाटील अशी उपाधी चिकटली होती. (बहुधा गोविंद तळवलकरांनी प्रदान केलेली) या लग्नावर त्याकाळात वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली होती. या लग्नासंबंधी अनेक आख्यायिका आहेत. असे म्हणतात की मोहिते पाटलांनी विविध ग्रामपंचायतींच्या फलकांवरच कुंकू लावून अख्ख्या गावाला लग्नाचे निमंत्रण दिले होते. वऱ्हाडी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी विहिरीतच बर्फाच्या लादी टाकल्या होत्या. या लग्नाची तक्रार थेट पंतप्रधान इंदिरा गांधींकडेच गेल्यावर मोहिते पाटलांनी आपल्या हिंदीत मॅडमकडे स्पष्टीकरण केले होते. अकलूज तालुक्यातील अनेक  गावांतील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील लग्नांना ते हजर असल्याने  आपल्या घरातील लग्नासाठी या सर्वांना आमंत्रण देणे आवश्यकच होते असे ते म्हणाले होते. शंकरराव मोहिते पाटलांचा असा दांडगा जनसंपर्क होता!  सन १९९०च्या दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात आले होते तेव्हा त्यांच्या लग्नाची ही कथा मी माझ्या सहकारी बातमीदारांना सांगितली होती तेव्हा सर्वच जण चकित झाले होते हे आठवते.   
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा विवाहाचा गोव्यातील दैनिकात फोटो वापरताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला, अगदी तसाच प्रकार एक दशकानंतर शरद पवार यांची कन्या सुप्रिया यांच्या लग्नाबाबतही झाला होता. दिनांक ४ मार्च १९९१ ला बारामती येथे संध्याकाळी  झालेल्या या लग्नाचा फोटो दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्सप्रेसच्या मुंबई-पुणे आवृत्तीत छापण्यासाठी आम्हाला खूप आटापिटा करावा लागला होता.  
या लग्नाला पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान राजीव गांधी वगैरे अनेक व्हीव्हीआयपी मंडळी उपस्थित होती. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्यातील विविध खात्यातील प्रमुखांना लग्नाचे निमंत्रण होतेच तसेच गावोगावच्या कार्यकर्त्यांनाही होते. त्याकाळात कोल्हापूरला केंद्रीय उद्योग खात्याचे संचालक असलेले आणि आता निवृत्तीनंतर चिंचवडला माझ्याशेजारी राहणारे विजय  देशपांडे या लग्नाला उपस्थित होते.  'त्याकाळात गावोगावचे कार्यकर्ते पवारांच्या घरच्या लग्नाची आपल्याला आलेली पत्रिका  आपल्या खिशात बाळगून अभिमानाने इतरांना दाखवत असत' असे ते सांगतात.  'कोल्हापुरातून आम्ही काही सरकारी अधिकारी या लग्नासाठी आलो होतो. लग्नास खूप लोक  हजर  होते तरी लग्न मात्र साधेपणाने  पार पडले. बटबटीत थाटमाट असा मुळीच नव्हता. लग्नास उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांस एकएक पेढा दिला गेला, सर्वांना जेवण नव्हतेच, असे देशपांडे सांगतात.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा बारामतीत झालेल्या या लग्नाचा फोटो पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांत येणे आवश्यक होते. पण डेडलाईनची समस्या होती. संध्याकाळी लग्नाचे फोटो काढून झाल्यानंतर बारामतीतून फोटोग्राफर पुण्याला यायला किमान तीन तास लागले असते आणि इंडियन एक्सप्रेसची डेडलाईन संपली असती. त्याकाळात इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचा डेस्कचा स्टाफ मुंबईतच असायचा. प्रकाश कर्दळे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक होते. आम्ही बातमीदार मुंबईला बातम्या पाठवायचो आणि तेथील डेस्कवरची माणसे  दैनिकाची सर्व पाने तयार करून पुण्याला छपाईसाठी पाठवत असत. (याच कारणामुळे  पुण्यातील आम्हा पत्रकारांना गणेश चतुर्थीनंतरच्या दिवसाची आणि अनंत चतुर्दशीनंतरच्या दिवसाचीही सुट्टी मिळायची. याचे कारण म्हणजे मुंबईत पेपर विक्रेते गणेश चतुर्थीनंतर तर पुण्यातील विक्रेते अनंत चतुर्दशीनंतर सुट्टी घेतात)  डेडलाईन पाळण्यासाठी बारामतीहून लग्नाचा फोटो पुण्यात लवकरात लवकर आणण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने आपली यंत्रणा कामाला लावली होती. त्याकाळात नव्यानेच विकसित झालेले फॅक्स  मशिन घेऊन संगणक खात्याचे इंजिनियर मकरंद येरवडेकर बारामतीला गेले होते. फोटोग्राफरने फोटो काढल्यानंतर तिथेच 'डेव्हलप' करून त्यांचे प्रिंट्स काढले. त्यानंतर  येरवडेकर यांनी पुण्याच्या ऑफिसला हे फोटो  फॅक्स केले. इकडे पुण्याच्या ऑफिसात आम्ही फॅक्स मशिनपुढे श्वास रोखून फोटो कसा येतो हे पाहत होतो. एकदाचे ते लग्नाचे फोटो आमच्यासमोर झळकले आणि आम्ही हुर्र्रे करून अक्षरश: ओरडलोच!         
काही दिवसांपूर्वी  प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचे दुसरे चिरंजीव प्रिन्स हॅरी  आणि मेगन मार्कल  यांच्या लग्नाचा सोहोळा टेलिव्हिजनवर लाईव्ह पाहत असताना  १९८१ च्या त्या 'फेरिटेल' लग्नसमारंभाची  आणि १९९१च्या  सुप्रिया सुळेंच्या लग्नाची साहजिकच आठवण झाली. या दोन्ही लग्नांचे फोटो वृत्तपत्रात ताबडतोब छापण्यासाठी आम्हाला किती प्रयत्न करावे लागले होते याची आठवण झाली. त्यानंतर आतापर्यंत तंत्रज्ञानाने जी मोठी झेप घेतली आहे त्याची त्या काळात कुणी कल्पनाही केली नव्हती.