Thursday, September 8, 2022

 बाबा पदमनजी 

 

मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून बाबा पदमनजी सुपरिचित आहेत. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी 1857 साली ‘यमुनापर्यटन‘ ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. 

जवळजवळ सव्वाशे पुस्तके लिहून बाबांनी मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे वाङ्मयप्रकारांची दालने समृद्घ केली. 
 
बाबा पदमनजी त्या काळातील एक प्रमुख समाजसुधारकही होते. आपल्या साहित्यातून त्यांनी प्रचलित विविध घनिष्ट सामाजिक रीतिरिवाजांवर टीका केली. पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिश आमदानीच्या काळात महाराष्ट्रातील समाज जीवनास नवी दिशा देणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये बाबा पदमनजींचा समावेश होतो.
 
बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 च्या मे महिन्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. मात्र त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. बाबा पदमनजी हे कासार जातीचे होते. त्यांचे वडील पदमनजी माणिकजी यांनी दक्षिण कोकणात सब असिस्टंट सर्व्हेअर व बिल्डर म्हणून काम केले होते, नंतर त्यांची बेळगावात बदली झाली. 
 
बेळगावातच लंडन मिशनच्या शाळेत बाबा पदमनजींनी शिक्षण घेतले. 1847 साली वर्षभर त्यांचे एडन येथे वास्तव्य होते. तेथून परल्यानंतर 1849 साली त्यांनी मुंबईतील काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च विद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यालयात नारायण शेषाद्री हे मूळचे चित्पावन ब्राह्मण समाजातील, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेले शिक्षक शिकवित असत. 
 
या काळातच बाबा पदमनजी यांची हिंदू समाजातील चालीरीतींविषयी, जातिभेदांविषयीची मते बदलत गेली. त्याकाळात अत्यंत गुप्त रीतीने स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचे ते सभासद बनले. . मात्र त्याकाळात समाजसुधारणांबाबत कर्मठ मंडळींचा कडवा विरोध लक्षात घेऊन परमहंस मंडळीच्या स्थापनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असे. 
 
मात्र या मंडळीच्या एका सभासदाने या सभेच्या सदस्यांची यादीच प्रसिद्ध केली. 
 
परमहंस मंडळीच्या सभासदांच्या या यादीने त्याकाळात समाजात मोठी खळबळ निर्माण केली होती. या सभेच्या सदस्यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल आहे, हे सर्व सभासद लवकरच ख्रिस्ती होणार अशीही वदंता सगळीकडे पसरली.
बाबा पदमनजींच्या वडिलांनी त्यामुळे बाबांना ताबडतोब घरी म्हणजे साताऱ्याजवळील उडतरे गावी बोलावून घेतले. बाबा पदमनजींनी 3 सप्टेंबर 1854 रोजी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी बेळगाव येथे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 
 
आपण धर्मांतर का केले याची कारणे बाबांनी ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिली होती. या धर्मांतराचे वृत्त तत्कालीन अनेक मराठी नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले.
 
सोळा वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत.
बाबा पदमनजींचे महात्मा जोतिबा फुले यांच्याशी चांगले संबंध होते. बाबा पदमनजी हे अनेकदा बी.पी. किंवा बा.प. या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी लेख लिहित असत. महात्मा फुल्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या पुस्तकाला बाबांनी प्रस्तावना लिहिली होती व प्रस्तावनेखाली बी.पी. अशी सही केली होती. 
 
त्याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘शिवाजीचा पोवाडा’ या पुस्तकाची प्रूफेही बाबांनी तपासली होती.
 
बाबा पदमनजी त्याकाळात ख्रिस्ती समाजात खूप लोकप्रिय होते असे दिसून येते. त्यांच्या धर्मातरास 40 आणि 50 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास समारंभ झाले होते व या समारंभाचे वृत्तान्तही प्रसिद्ध झाले होते.
 
त्यांनी स्वतःही काही नियतकालिकांचे अनेक वर्षे प्रकाशन केले. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका (धाकटी), ‘सत्यदीपिका (थोरली)’, सत्यवादी, कुटुंबमित्र आणि ऐक्यदर्शक पत्रिका ही बाबांनी चालविलेली नियतकालिके. 
 
समाजाचे उपेक्षित घटक असणाऱ्या बालविधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुल्यांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना प्रचंड सामाजिक प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. अशावेळी बाबांनी आपल्या या स्नेह्यास पाठबळ पुरविले.
‘सत्यदीपिका’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारखे ख्रिस्ती मिशनरी आणि ` ज्ञानोदय’ सारख्या मिशनरींच्या मुखपत्राने जोतिरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली, असे ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी आपल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड पहिला) या ग्रंथात नमूद केले आहे.
 
मराठी साहित्यातील कादंबरी, शब्दकोश, निबंधसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्र, मृत्युलेख वगैरे विविध वाङ्मयप्रकारांत मोलाची भर टाकणाऱ्या बाबा पदमनजींना आपल्या या साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचे भाग्य लाभले. अर्थात यासाठी त्यांची जाहिरातपद्धती आणि ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी पद्धती उपयुक्त ठरल्या. 
 
आपल्या या साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत जाण्यासाठी बाबा प्रकाशनपूर्व सवलीची किंमत, भरपूर जाहिरात वगैरे मार्केटिंग तंत्रांचा कुशलतेने वापर करत. त्यामुळे त्यांच्या हयातीत ‘यमुनापर्यटन‘च्या तीन आवृत्या हातोहात खपल्या. 
 
आपल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत ही कादंबरी कुणी खरेदी केली याची बाबांनी सरळसरळ यादीच प्रकाशित केली. या यादीमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, शेख दाऊद गुलाम महंमद, शिक्षणतज्ज्ञ रेव्ह. जॉन विल्सन, रेव्ह. नारायण शेषाद्री, मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ आदी त्याकाळच्या नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
 
या सामाजिक पुढाऱ्याचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्ट 1906 रोजी मुंबईत निधन झाले. मुंबईतील शिवडी येथे त्यांचा पार्थिव देह पुरण्यात आला.
 
एखाद्या वाङ्मयप्रकारातील पहिली वहिली कृतीच मोठी प्रक्षोभक, वादग्रस्त आणि तत्कालीन समाजातील एखाद्या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचा वेध घेणारी क्वचितच असते, ‘यमुनापर्यटन‘ ही पहिली वहिली कृती त्यादृष्टीने अपवादात्मकच म्हणाली लागेल, असे बाबा पदमनजींचे चरित्रकार डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे. 
 
एकोणिसाव्या शतकात विधवांची स्थिती आणि त्यांचा पुनर्विवाह हा अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय होता. विधवांच्या प्रश्नावर लिहिलेल्या या कादंबरीस बाबांचे एक स्नेही आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग यांनी छापील 27 पानांची संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेचा 18 पानांचा मराठीतील सारांशही बाबांनी आपल्या या कादंबरीबरोबर प्रसिद्घ केला. 
 
विधवांच्या पुनर्विवाहाची गरज दादोबा पांडुरंगांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडली. त्यामुळे ‘यमुनापर्यटन‘ या कादंबरीद्बारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा कादंबरीकाराचा हेतू होता हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण‘ असे ठेवले त्यावरूनही हेच स्पष्ट होते.
 
बाबा पदमनजींनी ‘शब्दरत्नावली‘ या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस 1860 साली प्रसिद्घ केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ कोशकार पीटर मार्क रॉजेट थिसॉरस या प्रसिद्घ समानार्थी शब्दांच्या कोशाच्या धर्तीवर ‘शब्दरत्नावली‘ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
विशेष म्हणजे रॉजेट थिसॉरसची पहिली आवृत्ती 1852 साली प्रसिद्घ झाली. त्यानंतर केवळ आठ वर्षातच रेव्ह. पदमनजींनी आपला ‘शब्दरत्नावली‘ कोश प्रसिद्घ केला. 
 
मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी मराठी भाषेतील एक प्रमुख कोशकर्ते म्हणूनही ओळखले जातात. संस्कृतमध्ये ‘निघंटु‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोश या वाङ्मयप्रकाराचा मराठीत सर्वप्रथम पाया रेव्ह. विल्यम केरी या बॅप्टिस्ट मिशनरीने 1810 साली रचला. 
 
बाबा पदमनजी यांनी 1860 साली इंग्लीश आणि मराठी कोशाचा संक्षेप (A Comprehensive Dictionary-English and Marathi) या नावाचा त्यांचा पहिला शब्दकोश प्रसिद्घ केला. बावीस हजारांहून अधिक शब्द असलेल्या या कोशाची दुसरी आवृत्ती 1870 साली तर तिसरी आवृत्ती 1889 साली प्रसिद्घ झाली.
 
पुण्याच्या भवानी पेठेत बोहरा दफन भूमी जवळ त्यांच्या नावाने चौक आहे.
 
 
  ^^
 
 
( संदर्भ : ‘बाबा पदमनजी' : काल व कर्तृत्व’-डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई 400 032 (1979).
 
^^^
( `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' , लेखक कामिल (पारखे (वितरक सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७) मधील एक प्रकरण ) 

No comments:

Post a Comment