Showing posts with label Conversion. Show all posts
Showing posts with label Conversion. Show all posts

Friday, December 6, 2024

नारायण वामन टिळक

काल `साधना' च्या बुक स्टॉलमध्ये एक तास घालवला. एक पुस्तक घ्यायचे मनात होते, पण निर्णय होत नव्हता.

नवनवी पुस्तके घेऊन घरात पडून राहतात, हातातल्या कामांमुळे वाचून होत नाहीत. हा नेहेमीचा अनुभव. शेवटी ते पुस्तक विकत घेऊन बॅगेत टाकले आणि प्रस्तावनेचा बराचसा भाग मेट्रोच्या परतीच्या प्रवासात वाचून काढला.

हे पुस्तक आहे सुधीर रसाळ लिखित` वाड्मयीन संस्कृती'.

पुस्तकाच्या शीर्षकाशी तसे मला काही देणेघेणे नाही, पुस्तक मी निवडले ते त्यातील नव्वद पानांच्या एका दीर्घ लेखामुळे.

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचा तर परिचय देण्याची गरज नाही. या पुस्तकातील ज्या दीर्घ लेखाने मला आकर्षित केले तो लेख नारायण वामन टिळक यांच्यावर आहे.

नारायन वामन टिळक हे मराठीतील पंचकवीमधले एक. लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचित्रां'तून आपण सर्वांना ते परिचित असतात,

पाठ्यपुस्तकांत असलेल्या `दया आणि शांती' `तू तर माझ्याही पुढे गेलीस!' अशा धड्यांतून आणि `केवढे हे क्रौर्य', `वनवासी फुल' अशा कवितांमुळे त्यांचे नाव खास लक्षात राहते.

`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत टिळकांचे अल्पचरित्र आहे.

पण याहून अधिक नारायण वामन टिळकांचे खूप काही भरीव योगदान आहे.

ख्रिस्ती धर्म. मराठी भाषा, भारतीय परंपरा आणि संस्कृती, इथल्या मातीतल्या संतांचे लिखाण या संदर्भात ना. वा. टिळकांनी भारतीय आणि विशेषतः मराठी ख्रिश्चनांना खूप काही दिले आहे.

टिळकांचे निधन झाले मुंबईत, ते ख्रिस्ती होते तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचे दफन न होता मुंबईतच दहन झाले,

त्यांच्या अवशेषांना नंतर अहमदनगर इथल्या कबरस्थानात ठेवून तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.

`तुकानिर्मित सेतूवरुनी /
मीही आलो ख्रिस्ताचरणी //

अशी टिळकांची एक ओळ प्रसिद्ध आहे,

यावरून त्यांची वाटचाल आणि मराठी ख्रिस्ती समाजात रुढ केलेल्या अनेक परंपरांची कल्पना येऊ शकेल.

टिळकांची अनेक गायने आजही महाराष्ट्रातील चर्चेसमध्ये किबोर्ड, पेटी आणि तबल्याच्या सुरांत गायली जातात.

येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म पाश्चात्य नाही, पौर्वात्य आहे, हे टिळकांनी ठासून मांडले.

आम्ही ख्रिस्ती झालो म्हणजे या मातीत आणि देशात उपरे होत नाही हा त्यांचा सिद्धांत आजही मांडला जातो.

सुधीर रसाळ यांनी नारायण वामन टिळकांचा हा राष्ट्रवाद अन या मातीशी नाळ सांगणारा ख्रिस्ती धर्म आणि परंपरा याबाबत या दीर्घ लेखात विस्तृतपणे लिहिले आहे, ते हा लेख चाळताना लक्षात आले.

हा लेख मी अजून वाचलाही नाही.

मात्र आज सकाळीच लक्षात आले ६ डिसेंबर नारायण वामन टिळकांची जयंती. त्यामुळे या महान व्यक्तीविषयी काही शब्द लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.

नारायन वामन टिळकांना अभिवादन !

Sunday, December 18, 2022

निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे

नारायण वामन टिळक ख्रिस्ती झाल्यानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतिबरोबर नांदायला तयार नव्हत्या. त्यांना आपल्या बरोबर आणण्यासाठी टिळकांना खूप प्रयत्न आणि कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या, त्यांच्या घरच्यांशी धाकटपटशा करावा लागला आणि खूप प्रयत्नानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतीबरोबर राहू लागल्या, मात्र काही काळ त्या स्वतः चा वेगळा स्वयंपाक करत असत.

असाच प्रकार ख्रिस्ती झालेल्या अनेकांच्या बाबतीत झाला आहे. बाबा पद्मनजी वगैरेबाबत .
यावर तोडगा म्हणून त्याआधी खूप वर्षांपूर्वी घेतलेलं एक पाऊल वाचून मात्र मला हसूच आलं.
वर्ध्याला होऊ घातलेल्या आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या 'सावलीचा शोध’ (मौज प्रकाशन गृह -२०१२) या पुस्तकात ही घटना एका प्रकरणाच्या सुरुवातीलाच दिली आहे.
साल १८५३ आणि स्थळ वाराणशी. इथल्या तुरुंगात प्रत्येक कैद्याला स्वतः स्वयंपाक करण्याची परवानगी रद्द करून सामायिक अन्न शिजवण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं घेतला होता. मात्र त्यामुळे जातीचे रोटी निर्बंध मोडतात म्हणून कैद्यांनी दंगा केला होता. म्हणून वाराणशी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वाजंत्रीसह चक्क एक मिरवणूक निघाली होती.
''चार भोयांच्या खांद्यावर एक मेणा होता. त्यात एक तरुण बसला होता. मेण्यासोबत पंधरावीस लोक हातात काठ्या घेऊन चालले होते,. शिवाय दोनतीन गोरी माणसेही मिरवणुकीबरोबर चालत होती. ही मिरवणूक वाराणशीतील एका मराठी ब्राह्मणाच्या घराजवळ थांबली. घरासमोर थांबलेली ती मिरवणूक पाहून वाड्यातील जोगळेकर मंडळी फार घाबरून गेली. त्यांचा जावई ख्रिस्ती झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी वयात आलेल्या आपल्या लेकीला धर्मांतरित नवऱ्याकडे पाठवायला त्यांनी नकार दिला होता. आता मेण्यात बसून २०-२५ माणसे आणि दोनतीन युरोपियांना घेऊन तो आला होता. त्याचा हेतू दांडगाईचा दिसत होता. जोगळेकरांनी घराचे दर्शनी दार लावून घेतले आणि आतून कडी-आगळ घातली.
मेण्यातून उतरलेल्या निळकंठनें दारावर थाप मारुन लक्ष्मीला - आपल्या बायकोला - आवाज द्यायला सुरुवात केली. जोरजोरात आवाज दिले तरी कोणी दार उघडेना. शेवटी दोनचार आडदांड मंडळींनीं सरळ दार वर उचलून कोंड्यातून उचकटून ते काढले आणि ही मंडळी आत घुसली. चारदोन खोल्यांच्या घरात कोणत्या खोलीत लक्ष्मी आहे हे शोधणे अवघड नव्हते. समोर नवऱ्याला पाहतात लक्ष्मी थरथर कापत स्तब्ध उभी राहिली. नवऱ्याने हात धरून तिला बाहेर काढले. घरातील इतरांचा विरोध मोडून काढण्यात आला, लक्ष्मी आपल्या नवऱ्यासह मेण्यात बसली आणि मेणा परत निघाला. ''

लक्ष्मीच्या वयाच्या सातव्या वर्षी झालेल्या लग्नानंतर त्या दोघांची निघालेली ही दुसरी अशी वरात. फरक इतकाच कि या दुसऱ्या वरातीत त्या दोघांच्याही घरांतली कुणीही नव्हते. मिरवणूक वाराणशीच्या चर्च मिशनरी सोसायटीच्या आवारात गेली आणि तिथे एका छोट्या घरात निळकंठ अन लक्ष्मीचा संसार सुरु झाला.
पतीचे धर्मांतर हा हिंदू कायद्याप्रमाणे पत्नीशी आपोआप होणार विवाहविच्छेद समजला जाई आणि त्यामुळे आपल्या अद्याप हिंदू असलेल्या बायकोला आपल्याजवळ नांदण्यास परत आणणें हा धर्मांतरित नवऱ्यासाठी मोठाच जटिल प्रश्न होऊन जाई असं चपळगावकरांनीं नीलकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे यांच्यावरील या प्रकरणात यासंदर्भात म्हटलं आहे.
आज सकाळीच निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे (किंवा गोऱ्हे) यांच्यावरचे या पुस्तकातलं हे प्रकरण मी वाचत होतो .आणि राज्यात आंतर-जातीय आणि आंतर-धर्मीय विवाहावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वयक समिती नेमण्यात येते आहे असं वृत्तपत्रांत लगेच वाचलं.
प्रखर टिकेमुळं आता आंतर-जातीय विवाह या समितीच्या कचाट्यातून वाचला असंही कळालं.


लक्ष्मीबाई आणि नारायण वामन टिळक, विदुषी पंडिता रमाबाई, बाबा पद्मनजी प्रभुती खूप नशीबवान कि शंभर-दोनशे वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात जन्माला आले,
नाहीतर आजच्या आधुनिक, प्रगत काळात त्यांची काही खैर नव्हती असंच आता म्ह्नणायला हवं.

Thursday, September 8, 2022

 बाबा पदमनजी 

 

मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून बाबा पदमनजी सुपरिचित आहेत. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्‍नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी 1857 साली ‘यमुनापर्यटन‘ ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. 

जवळजवळ सव्वाशे पुस्तके लिहून बाबांनी मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे वाङ्मयप्रकारांची दालने समृद्घ केली. 
 
बाबा पदमनजी त्या काळातील एक प्रमुख समाजसुधारकही होते. आपल्या साहित्यातून त्यांनी प्रचलित विविध घनिष्ट सामाजिक रीतिरिवाजांवर टीका केली. पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिश आमदानीच्या काळात महाराष्ट्रातील समाज जीवनास नवी दिशा देणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये बाबा पदमनजींचा समावेश होतो.
 
बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 च्या मे महिन्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. मात्र त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. बाबा पदमनजी हे कासार जातीचे होते. त्यांचे वडील पदमनजी माणिकजी यांनी दक्षिण कोकणात सब असिस्टंट सर्व्हेअर व बिल्डर म्हणून काम केले होते, नंतर त्यांची बेळगावात बदली झाली. 
 
बेळगावातच लंडन मिशनच्या शाळेत बाबा पदमनजींनी शिक्षण घेतले. 1847 साली वर्षभर त्यांचे एडन येथे वास्तव्य होते. तेथून परल्यानंतर 1849 साली त्यांनी मुंबईतील काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च विद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यालयात नारायण शेषाद्री हे मूळचे चित्पावन ब्राह्मण समाजातील, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेले शिक्षक शिकवित असत. 
 
या काळातच बाबा पदमनजी यांची हिंदू समाजातील चालीरीतींविषयी, जातिभेदांविषयीची मते बदलत गेली. त्याकाळात अत्यंत गुप्त रीतीने स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचे ते सभासद बनले. . मात्र त्याकाळात समाजसुधारणांबाबत कर्मठ मंडळींचा कडवा विरोध लक्षात घेऊन परमहंस मंडळीच्या स्थापनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असे. 
 
मात्र या मंडळीच्या एका सभासदाने या सभेच्या सदस्यांची यादीच प्रसिद्ध केली. 
 
परमहंस मंडळीच्या सभासदांच्या या यादीने त्याकाळात समाजात मोठी खळबळ निर्माण केली होती. या सभेच्या सदस्यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल आहे, हे सर्व सभासद लवकरच ख्रिस्ती होणार अशीही वदंता सगळीकडे पसरली.
बाबा पदमनजींच्या वडिलांनी त्यामुळे बाबांना ताबडतोब घरी म्हणजे साताऱ्याजवळील उडतरे गावी बोलावून घेतले. बाबा पदमनजींनी 3 सप्टेंबर 1854 रोजी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी बेळगाव येथे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 
 
आपण धर्मांतर का केले याची कारणे बाबांनी ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिली होती. या धर्मांतराचे वृत्त तत्कालीन अनेक मराठी नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले.
 
सोळा वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत.
बाबा पदमनजींचे महात्मा जोतिबा फुले यांच्याशी चांगले संबंध होते. बाबा पदमनजी हे अनेकदा बी.पी. किंवा बा.प. या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी लेख लिहित असत. महात्मा फुल्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या पुस्तकाला बाबांनी प्रस्तावना लिहिली होती व प्रस्तावनेखाली बी.पी. अशी सही केली होती. 
 
त्याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘शिवाजीचा पोवाडा’ या पुस्तकाची प्रूफेही बाबांनी तपासली होती.
 
बाबा पदमनजी त्याकाळात ख्रिस्ती समाजात खूप लोकप्रिय होते असे दिसून येते. त्यांच्या धर्मातरास 40 आणि 50 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास समारंभ झाले होते व या समारंभाचे वृत्तान्तही प्रसिद्ध झाले होते.
 
त्यांनी स्वतःही काही नियतकालिकांचे अनेक वर्षे प्रकाशन केले. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका (धाकटी), ‘सत्यदीपिका (थोरली)’, सत्यवादी, कुटुंबमित्र आणि ऐक्यदर्शक पत्रिका ही बाबांनी चालविलेली नियतकालिके. 
 
समाजाचे उपेक्षित घटक असणाऱ्या बालविधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुल्यांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना प्रचंड सामाजिक प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. अशावेळी बाबांनी आपल्या या स्नेह्यास पाठबळ पुरविले.
‘सत्यदीपिका’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारखे ख्रिस्ती मिशनरी आणि ` ज्ञानोदय’ सारख्या मिशनरींच्या मुखपत्राने जोतिरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली, असे ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी आपल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड पहिला) या ग्रंथात नमूद केले आहे.
 
मराठी साहित्यातील कादंबरी, शब्दकोश, निबंधसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्र, मृत्युलेख वगैरे विविध वाङ्मयप्रकारांत मोलाची भर टाकणाऱ्या बाबा पदमनजींना आपल्या या साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचे भाग्य लाभले. अर्थात यासाठी त्यांची जाहिरातपद्धती आणि ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी पद्धती उपयुक्त ठरल्या. 
 
आपल्या या साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत जाण्यासाठी बाबा प्रकाशनपूर्व सवलीची किंमत, भरपूर जाहिरात वगैरे मार्केटिंग तंत्रांचा कुशलतेने वापर करत. त्यामुळे त्यांच्या हयातीत ‘यमुनापर्यटन‘च्या तीन आवृत्या हातोहात खपल्या. 
 
आपल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत ही कादंबरी कुणी खरेदी केली याची बाबांनी सरळसरळ यादीच प्रकाशित केली. या यादीमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, शेख दाऊद गुलाम महंमद, शिक्षणतज्ज्ञ रेव्ह. जॉन विल्सन, रेव्ह. नारायण शेषाद्री, मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ आदी त्याकाळच्या नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
 
या सामाजिक पुढाऱ्याचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्ट 1906 रोजी मुंबईत निधन झाले. मुंबईतील शिवडी येथे त्यांचा पार्थिव देह पुरण्यात आला.
 
एखाद्या वाङ्मयप्रकारातील पहिली वहिली कृतीच मोठी प्रक्षोभक, वादग्रस्त आणि तत्कालीन समाजातील एखाद्या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्‍नाचा वेध घेणारी क्वचितच असते, ‘यमुनापर्यटन‘ ही पहिली वहिली कृती त्यादृष्टीने अपवादात्मकच म्हणाली लागेल, असे बाबा पदमनजींचे चरित्रकार डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे. 
 
एकोणिसाव्या शतकात विधवांची स्थिती आणि त्यांचा पुनर्विवाह हा अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय होता. विधवांच्या प्रश्‍नावर लिहिलेल्या या कादंबरीस बाबांचे एक स्नेही आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग यांनी छापील 27 पानांची संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेचा 18 पानांचा मराठीतील सारांशही बाबांनी आपल्या या कादंबरीबरोबर प्रसिद्घ केला. 
 
विधवांच्या पुनर्विवाहाची गरज दादोबा पांडुरंगांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडली. त्यामुळे ‘यमुनापर्यटन‘ या कादंबरीद्बारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा कादंबरीकाराचा हेतू होता हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण‘ असे ठेवले त्यावरूनही हेच स्पष्ट होते.
 
बाबा पदमनजींनी ‘शब्दरत्नावली‘ या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस 1860 साली प्रसिद्घ केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ कोशकार पीटर मार्क रॉजेट थिसॉरस या प्रसिद्घ समानार्थी शब्दांच्या कोशाच्या धर्तीवर ‘शब्दरत्नावली‘ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
विशेष म्हणजे रॉजेट थिसॉरसची पहिली आवृत्ती 1852 साली प्रसिद्घ झाली. त्यानंतर केवळ आठ वर्षातच रेव्ह. पदमनजींनी आपला ‘शब्दरत्नावली‘ कोश प्रसिद्घ केला. 
 
मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी मराठी भाषेतील एक प्रमुख कोशकर्ते म्हणूनही ओळखले जातात. संस्कृतमध्ये ‘निघंटु‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोश या वाङ्मयप्रकाराचा मराठीत सर्वप्रथम पाया रेव्ह. विल्यम केरी या बॅप्टिस्ट मिशनरीने 1810 साली रचला. 
 
बाबा पदमनजी यांनी 1860 साली इंग्लीश आणि मराठी कोशाचा संक्षेप (A Comprehensive Dictionary-English and Marathi) या नावाचा त्यांचा पहिला शब्दकोश प्रसिद्घ केला. बावीस हजारांहून अधिक शब्द असलेल्या या कोशाची दुसरी आवृत्ती 1870 साली तर तिसरी आवृत्ती 1889 साली प्रसिद्घ झाली.
 
पुण्याच्या भवानी पेठेत बोहरा दफन भूमी जवळ त्यांच्या नावाने चौक आहे.
 
 
  ^^
 
 
( संदर्भ : ‘बाबा पदमनजी' : काल व कर्तृत्व’-डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई 400 032 (1979).
 
^^^
( `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' , लेखक कामिल (पारखे (वितरक सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७) मधील एक प्रकरण ) 

Friday, June 11, 2021

पंडिता रमाबाई


ख्रिस्ती मिशनरींचे योगदान

 कामिल पारखे

 वितरक:  सुगावा प्रकाशन

          1881 मध्ये कलकत्ता शहरात एका वीस वर्षांच्या मराठी युवतीचे आगमन झाले आणि तिच्या विद्वत्तेच्या तेजाने, संस्कृतवरील प्रभुत्वाने तेथील सामाजिक पुढारी चकित झाले. कलकत्त्याच्या विद्वान मंडळींनी या युवतीचा सत्कार घडवून तिला ‘सरस्वती’ उपाधी बहाल केली. विशेष म्हणजे ‘रमाबाई डोंगरे’ हे नाव धारण करणाऱ्या या युवतीचे नाव महाराष्ट्रात तोपर्यंत कुणीही ऐकले नव्हते. त्यानंतर प्रसिद्धीचे वलय होऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे व पुण्याजवळील केडगाव ही त्यांची उर्वरित आयुष्यातील कर्मभूमी बनली. कलकत्त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती चिकटलेले प्रसिद्धीचे वलय त्यानंतर त्यांना संपूर्ण आयुष्यभर चिकटले.

          प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात वावरणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील प्रत्येक घटना समाजासमोर येत असतात. या घटनांबद्दल त्या व्यक्तीला कधी हार तर कधी प्रहार स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. पंडिता रमाबाई तर चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखविले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील सर्व अनाथ आणि असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदूषीने खंबीरपणे तोंड दिले. पंडिता रमाबार्इंचे जीवन म्हणजे सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथाच आहे.

          पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ यागावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्‍वर डोंगरे हे संस्कृतपंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकविले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. पंधरा वर्षे तीर्थार्टन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्यावेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके बनले. तेथूनच रमाबार्इंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली.

          आई-वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालूच ठेवली. त्यानंतर काही महिन्यातच रमाबार्इंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंनी संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरतच राहिले. त्यांना आसरा देणारे, मायेने त्यांची काळजी घेणारे या जगात आता कुणी उरले नव्हते. तीन-चार वर्षे हजारो मैलांचा पायी प्रवास करत श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाई 1878 साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात मात्र या भाऊ-बहिणीच्या ज्ञानाची कदर करणारे लोक त्यांना भेटले. आधुनिक विचारसरणीच्या ब्राह्मो समाजाच्या आणि कलकत्त्यातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.

          श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंच्या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्‍चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत यावेळी रमाबार्इंना ‘सरस्वती’ उपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ या नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.

रमाबार्इंविषयी मुंबईच्या एका दैनिकात 1878 च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली:

          “हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.”

          या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, बावीस वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्‍न रमाबार्इंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले.

          महाराष्ट्राला रमाबार्इंची ओळख झाली ती अशाप्रकारे. पंडिता रमाबार्इंच्या जीवनातील अनेक घटनांनी पुढील काळात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अनेकदा ढवळून टाकले. रमाबार्इंचा कलकत्त्यातील विद्वानांनी केलेला सत्कार आणि या महिलेविषयी महाराष्ट्रात झालेली त्यावेळची चर्चा रमाबार्इंच्या महाराष्ट्रातील पुढील जीवनाची एकप्रकारे नांदीच ठरली.

          त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे 8 मे 1880 रोजी निधन झाले. आई-वडिलांच्या तसेच थोरल्या बहिणीच्या निधनानंतर रमाबार्इंना निदान आपल्या थोरल्या भावाचा तरी आधार होता. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर तोही आधार संपला. कर्नाटक प्रांत सोडून आलेल्या या तरुण अविवाहित महिलेला आता कुणाचाही आधार नव्हता.

          श्रीनिवासशास्त्री हयात असताना त्यांची आणि रमाबार्इंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर बिपीन बिहारींनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली आणि 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला. त्याकाळात रमाबार्इंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला या घटनेने पुन्हा एकदा समाजात खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करत असत. 16 एप्रिल 1881 रोजी रमाबार्इंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला.

          रमाबार्इंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनंतर बिपीन बिहारींचा 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला. थोड्या काळाच्या अवधीत वडील, आई, थोरली बहीण आणि थोरला भाऊ यांच्या निधनाचं दु:ख सहन करणाऱ्या रमाबार्इंवर आता पतीच्या निधाची आपत्ती कोसळली. त्यानंतर आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडिता रमाबार्इंनी महाराष्ट्राची वाट धरली.

          रमाबाई महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच या विदूषीची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुण्यात आल्यावर रमाबार्इंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. रमाबार्इंच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याविरुद्ध समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबार्इंना भावनिक आधार दिला. पुण्यात पंडिता रमाबार्इंचे आगमन झाल्यानंतर या तेजस्विनीच्या सभा आयोजित करण्यात प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि रमाबाई रानड्यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील आपल्या वास्तव्यात पंडिता रमाबार्इंनी लोकजागृतीचे विशेषतः महिलांच्या प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्यास पुण्यातील समाजसुधारकांचा मोठा पाठिंबा लाभला. रमाबार्इंच्या पुढाकाराने पुण्यात, अहमदनगर, सोलापूर आणि मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली.

          एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातसमाजजागृतीचे कार्य करणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये पुरुषांचीच अधिक संख्या होती. ज्या थोड्याफार महिला या क्षेत्रात काम करत होत्या त्या सर्वांना त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांचे पूर्ण पाठबळ लाभले होते व त्यामुळे आपल्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल टीकेस त्या तोंड देऊ शकल्या. पंडिता रमाबाई मात्र परप्रांतातून एकट्या आल्या होत्या. एक छोटी मुलगी वगळता त्यांना कुटुंबातील कुणाही व्यक्तीचा वा नातलगाचा आधार नव्हता. त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीचे काम हाती घेणे किती कठीण होते हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सहन कराव्या लागलेल्या टीकेमुळे आणि हालअपेष्टांमुळे सिद्ध झाले होते. स्वत:च्या वैयक्तिक जीवनातसुद्धा रमाबार्इंनी खूप दु:ख सोसले. तरीसुद्धा सामाजिक प्रबोधनाचा काटेरी मार्ग त्यांनी निवडला हे विशेष.

          याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. या हंटर कमिशनसमोर दिलेली पंडिता रमाबार्इंची हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष त्यावेळी खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलीत सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी या साक्षीत सुचविले. हंटर कमिशनच्या सदस्यांनी यावेळी रमाबार्इंची उलटतपासणीही घेतली. रमाबार्इंना त्यावेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. रमाबार्इंच्या साक्षीने खुद्द सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबार्इंच्या साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे रमाबार्इंच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले. अशाप्रकारे रमाबार्इंनी परदेशगमन करण्यापूर्वीच त्यांची कीर्ती इंग्लंडमध्ये पोहोचली.

          त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबार्इंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. त्यांची मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह 29 सप्टेंबर 1883 रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या घटनेपासून या विदूषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर तेथे त्या ख्रिस्ती होतील ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्याकाळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.

          इंग्लंडमध्ये 1886 पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबार्इंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबार्इंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.

          आनंदीबार्इंच्या पदवीदान समारंभानंतर रमाबार्इंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. अमेरिकेतील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत भारतातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबार्इंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या ‘रमाबाई असोसिएशन’ या संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.

          हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालविणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.

          भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबार्इंनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ 11 मार्च 1889 रोजी ‘शारदा सदन’या संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन पुढे त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या. बाया कर्वे यांनी ‘माझे पुराण’ या आपल्या आत्मचरित्रात शारदा सदनातील दिवसांचे वर्णन केले आहे. गोदूबार्इंप्रमाणेच अनेक बालविधवांना शारदा सदनात शिक्षण आणि निवारा मिळाला.

          दीड वर्षानंतर म्हणजे 1880 च्या नोव्हेंबरात रमाबार्इंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. शारदा सदन ज्या संस्थेतर्फे चालविले जात होते ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने शारदा सदनचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये असा असोसिएशनच्या सल्लागार मंडळींचा आग्रह होता. मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवित असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील कोवळ्या वयाच्या मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई शारदा सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, रमाबाई छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले.

          शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदूबार्इंचा धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला तेव्हा पंडिता रमाबार्इंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. या समारंभाबद्दल महर्षी कर्व्यांनी आपल्या ‘आत्मवृत्त’ या आत्मचरित्रात लिहिले आहे, “आपल्या पहिल्याविद्यार्थिनीची योग्य व्यवस्था लागत आहे हे पाहून त्यांना (रमाबार्इंना) अतिशय आनंद झाला होता. सदनातील विद्यार्थिनींनाही आपल्या एका मैत्रिणीला संसारसुखाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यामुळे आणि विधवांच्या भावी सुस्थितीचे द्वार मोकळे होत चालल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता.” बाया कर्वे यांनी आपल्या ‘माझे पुराण’ आत्मचरित्रात म्हटले आहे, ‘बार्इंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयालाकर्व्यांना कपडे दिले.’ पंडिता रमाबार्इंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान केले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी मोजक्या व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला.

          शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबार्इंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या 1889 च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबार्इंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने 30 डिसेंबर 1889 च्या अंकात दिले.

          1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने थैमान घातले. यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कडक तपासणीमुळे सामान्य लोकांच्या झालेल्या हालाविरुद्ध पंडिता रमाबार्इंनी आवाज उठविला. ‘गार्डीयन’ या इंग्रजी साप्ताहिकात रमाबार्इंनी या संदर्भात एक पत्र लिहिले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उपस्थित झालेल्या या विषयाच्या संदर्भात उत्तर देताना लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी रमाबार्इंचे हे पत्रच वाचून दाखविले.

          1895 साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील बारा मुली रमाबार्इंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेत विधवाविपनाचा निषेध करणारा व विधवांना स्वावलंबी करण्याबाबतचा ठराव ‘इंडियन सोशल रिफॉर्म’चे संपादक के. नटराजन यांनी मांडला. त्यावेळच्या भाषणात नटराजन म्हणाले, “विधवांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा जो पायंडा पंडिता रमाबार्इंनी घालून दिला आहे व या शहरात त्यांचे कार्य इतक्या यशस्वीपणे चालू आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज माझ्याने राहवत नाही. काही धर्मांतरे झाली त्यांच्याबद्दल रमाबार्इंवर जे टीका करत आहेत त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटत नाही. ठोकळेबाज धर्ममतांवर माझा विश्‍वास नाही. आपल्या बंधूंचे भले करणे हा मी सर्वोच्च धर्म समजतो. भुकेल्याला अन्न देणे हे अत्यंत उच्च दजाचे धार्मिक कृत्य व श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. पंडिताबाई व तिचे अमेरिकेतील मित्र व सहायक यांचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आपण ते कधीही फेडू शकणार नाही; मग धर्ममतांबद्दल कितीही मतभेद असो.”

          रमाबार्इंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. रमाबाई असोसिएशनच्या नियमानुसार शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठविलेच नसते. या संदर्भात शारदा सदनातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांचे बाया कर्व्यांनी पुढील शब्दात वर्णन केले आहे. ‘सहा महिने ब्राह्मणाची बाई मिळाली नाही म्हणून माझे जेवणही मलाच करावे लागे. गोविंदराव व काशीबाई कानिटकर, हरी नारायण आपटे आदी मंडळी केव्हा तरी सदनात आली म्हणजे एखाद्या वेळी त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करावा लागे.’

          आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी शारदा सदनात त्यांनी सुखात राहावे, असे रमाबार्इंना वाटे. शारदा सदनातील घटनांकडे लक्ष असणारे लोक ‘रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळविते’ असे म्हणत. शारदा सदनातील बालविधवांच्या या खाण्यापिण्यावरून एकदा केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांत वादही झाला होता. बाया कर्व्यांनी या संदर्भात लिहिले आहे, रमाबाई असोसिएशनची सल्लागार मंडळी म्हणे ‘आपल्या जातीतील विधवांनी चैनीने राहणे बरे नव्हे’, पण रमाबार्इंना ते आवडत नसे. पूर्वीचे दिवस त्यांच्या मनात येत. त्या म्हणत, ‘मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली. मी त्यांना सुखात ठेवायचे ठरविले, ते कमी होणे शक्य नाही.’

          शारदा सदनातील दिवसांबद्दल कृष्णाबाई गद्रे यांनी लिहिले आहे, ‘काय त्या बंगल्याची शोभा व काय तो सुंदर फुलांनी शृंगारलेला बगीचा, जिकडे पाहिजे तिकडे मोकाट फिरण्याची आम्हाला मुभा, दिवाणखाना देखील आमची बैठकीची जागा. सुंदर कोचाखुर्च्यांवर बसून गप्पा माराव्यात, बागेत जाऊन जाई, जुई, मोगरा, चमेली, बकुळी व मधुमालतीच्या वेण्या गुंफून केसावर लावाव्यात. रमाबार्इंनी आम्हाला फुलांची, पक्ष्यांची व झाडांची माहिती देऊन दुर्बिणीतून (सूक्ष्मदर्शक यंत्रांतून) त्यांचे निरीक्षण करण्यास शिकवले. काय ते लाड? अशा सुंदर वातावरणात आपले दिवस घालवायला कोण बालविधवा येणार नाही? कधी कधी रमाबाई स्वत: पहाटेस उठून आम्हाला आगाशीवर नेऊन नक्षत्रे वगैरे मोठ्या आवडीने शिकवीत.

          रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबार्इंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले कार्य चालूच ठेवले.

          त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. अनेकदा या कोवळ्या मुलींची प्रौढ पुरुषांशी लग्ने लावली जात असत. यामुळे अनेक मुलींवर वैवाहिक सुख भोगण्याआधीच बालविधवा होण्याची आपत्ती कोसळे. या बालविधवांना त्यानंतर अत्यंत उपेक्षित जीवन जगावे लागे. त्यांच्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींकडून आणि समाजाकडून त्यांची उपेक्षा होत असे. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकानुसार बारा वर्षांपेक्षा लहान असलेल्या स्त्रीशी तिच्या नवऱ्याने शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार होता. या विधेयकामुळे स्त्रियांच्या हालअपेष्टा कमी होणार असल्याने या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबार्इंनी पुढाकार घेतला.

          संमतीवयाच्या विधेयकामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात. विशेषत: पुण्यात मोठा वाद निर्माण झाला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. त्यातच समाजातील सनातनी मंडळींचाही या विधेयकास विरोध अपेक्षितच होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. महिलांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या पंडिता रमाबाई या विधेयकास पाठिंबा देण्यासाठी महिलांना संघटित करू लागल्या. संमतीवयाच्या विधेयकाच्या निमित्ताने पुण्यातील दोन गटांनी एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. या संघर्षात अल्पसंख्य असणाऱ्या आगरकर, पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर या समाजसुधारकांना अर्थातच मोठी किंमत चुकवावी लागली.

          संमतीवयाच्या विधेयकास पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईत झालेल्या एका सभेचे चालकत्व पंडिता रमाबार्इंकडे होते, तर अध्यक्षस्थानी कॉर्नेलिया सोराबजी या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या. त्यानंतर पुण्यात आर्य महिला समाजाच्या वतीने पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकरांनी सभा आयोजित केली. या सभेत पाच-सहा महिलांचा अपवाद वगळता इतर महिलांनी या विधेयकास पाठिंबा व्यक्त करणाऱ्या ठरावावर सह्या केल्या, असे त्यावेळी आगरकरांच्या ‘सुधारक’ पत्रात छापून आले.

          न. चिं. केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रात या सभेबद्दल खालील माहिती दिली आहे. या लिखाणावरून पंडिता रमाबार्इंच्या स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो. केळकरांनी लिहिले आहे.

          ‘सौ. काशीबाई कानिटकर यांनी बिलाचे समर्थन केले, पण दुसरी एक बाई उठून म्हणाली, या बिलान्वये तुमच्या जावयावर उद्या खटला झाला तर तो तुम्हांस आवडेल काय? काशीबाई पडल्या हाडाच्या हिंदू. त्यांच्याने उत्तर देववेना. रामाबाईही हाडाच्या हिंदूच, पण धर्मांतराने त्यांचे सर्वच विचार बदललेले होते. काशीबाई निरुत्तर झाल्यावर रमाबाई म्हणाल्या, ‘बेहेत्तर आहे. मुलीपेक्षा जावई अधिक नाही.’ हे उत्तर पंडिता रमाबाईंच्या सडेतोड स्वभावास धरूनच होते. हा स्वभाव धर्मांतराने नव्याने बनलेला नव्हता.’

          संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज विशीच्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. शंभर वर्षांपूवी मात्र बारा वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबार्इंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले.

          मध्य भारतात 1897 साली भीषण दुष्काळ पडला तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबार्इंनी आश्रय दिला. या मुलींच्या मदतीला रमाबाई धावून गेल्या नसत्या तर या मुलींना मृत्यूलाच सामोरे जावे लागले असते.

          रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील ‘रमाबाई असोसिएशन’ने दहा वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. 1898 मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ या संस्थेच्या मदतीने रमाबार्इंनी पुण्याजवळील केडगाव येथे ‘मुक्ती सदन’चे काम सुरू केले. त्यानंतर रमाबार्इंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालविला.

          केडगाववात पंडिता रमाबार्इंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई, अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी ‘कृपासदन’ उघडले. या परित्यक्ता स्त्रियांचे त्यांनी पुनर्वसन केले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबार्इंनी ‘प्रीती सदन’ सुरू केले.

          भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील ‘बर्तमय सदनात’ आश्रय देऊन रमाबार्इंनी त्यांचे पुनर्वसन केले. येशू ख्रिस्ताने बर्तमय नावाच्या अंधाला दृष्टी दिली असे बायबलमध्ये सांगितले आहे. बर्तमय सदनातील अंध महिलांना ‘ब्रेल’ने एकप्रकारे दृष्टीच दिली. बर्तमय सदनात या अंधांना स्वेटर विणण्याची, वेताच्या खुर्च्या बनविण्याची, टोपल्या तयार करण्याची कला शिकविली जाई. त्यामुळे या अंध महिला आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या.

          केडगावात स्थायिक झाल्यानंतर लवकरच म्हणजे 1905 साली पंडिता रमाबार्इंनी संपूर्ण बायबलचे मराठी भाषांतर करण्याचे कार्य हाती घेतले. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य चालू राहिले. संपूर्ण बायबलच्या भाषांतरास त्यांना अठरा वर्षे लागली. बायबलचा जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. संपूर्णबायबलच्या इंग्रजी भाषांतराच्या अनेक आवृत्त्या रमाबाईंच्या काळातसुद्धा उपलब्ध होत्या. तरीसुद्धा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचे या विदूषीने ठरविले आणि त्यासाठी या दोन्ही भाषांचा त्यांनी अभ्यास केला.

          कर्नाटकात जन्मलेल्या रमा डोंगरेला कानडी भाषा येत होती, वडिलांमुळे तिने संस्कृतवर प्रावीण्य मिळविले आणि रमा पुढे ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ बनली. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळविले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या. चाळिशी उलटल्यानंतर त्या आता बायबलच्या भाषांतरासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करू लागल्या. मुक्ती सदनातील दीड-दोन हजार अनाथ मुली आणि महिलांची जबाबदारी असताना पंडिता रमाबाई आपल्या विविध कार्याचा व्याप सांभाळत असत हे विशेष.

          बायबलच्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. पंडिता रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबार्इंचे वयाच्या चाळिसाव्या वर्षी निधन झाले. आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचा आघात रमाबार्इंनी खंबीरपणे सोसला आणि बायबलच्या भाषांतराचे काम चालूच ठेवले. बायबलचे भाषांतर हे त्यांच्या अखेरच्या जीवनातील मिशन बनले होते. भाषांतर पूर्ण होण्याआधी आपला मृत्यू होऊ नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. रमाबार्इंचे बायबलचे भाषांतर त्यांच्या स्वत:च्या केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. 4 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबार्इंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठविले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.

संदर्भ

1. ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई’- लेखक आणि प्रकाशक - देवदत्त नारायण टिळक, शांतिसदन, आग्रा रोड, नाशिक (1960).

2. ‘वधस्तंभाचे सेवक’ - लेखक-थिओडोर विल्यम्स - मराठी अनुवाद - डी. वाय. गायकवाड, प्रकाशक - औटरिच प्रकाशन, इंडियन इव्हँजेलिकल मिशन, 7 लँगफोर्ड रोड, बंगलोर 560025 (1991).

3. ‘भारत आणि ख्रिस्त’ - लेखक-फादर हान्स स्टाफनर (येशूसंघ) मराठी अनुवाद - डॉ. वा. पु. गिडे, प्रकाशक - मार्ग प्रकाशक, स्टीफन्स निवास, 2008, संत विन्सेंट मार्ग, पुणे 411001 (1988).

4. ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय (फादर स्टीफन्स ते इ.स. 1960 अखेर)’-लेखक -डॉ. गंगाधर नारायण मोरजे, प्रकाशक - डॉ. पी. एस. जेकब, प्राचार्य, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर आणि डॉ. मॅथ्यू लेदर्ले (येशूसंघ), स्नेहसदन, 250 शनिवार पेठ, पुणे 411030, (वितरक - अ.ज.प्रभू, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, 1334शुक्रवार पेठ, पुणे 411 002 (1984).