श्रावण, अगदी जुलै महिन्यासारखं एकदम आभाळ अंधारून येऊन श्रावण सरतानाचा तो पाऊस कोसळत होता. पाऊस असल्याने बायकोला तिच्या शाळेत सोडण्यासाठी मी कारनं गेलो होतो. तिला शाळेत सोडून परत पुणे-मुंबई हमरस्त्यावर आलो, तर पावसाचा जोर कमी होऊ लागला आणि नंतर चक्क बंद झाला.
`श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा, उलगडला झाडांतून अवचित मोरपिसारा..’ हे लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं नुसतं आठवूनच अंगावरून नाजूकसा मोरपिसारा फिरवल्याचा अनुभव आला. त्याशिवाय, ऊन अन् पावसाचा तो लपंडाव पाहताना बालकवींच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे..’ या पंक्ती आठवल्या नसत्या तरच नवल!
कॉलनीत गाडी घेऊन परतलो आणि मी थक्कच झालो. ही माझी दररोजची पायवाट. या कॉलनीत मी तब्बल तीस वर्षे राहतो आहे. इथं राहायला आलो तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं. त्या वेळी या भागात केवळ चार-पाच इमारती उभ्या राहत होत्या आणि जेमतेम शंभर एक लोक राहायला आले असावेत. आता जवळपास वीस इमारती आहेत आणि दोन-तीन हजार लोक वास्तव्याला असतील. पण, कॉलनीतलं आजचं हे रूप मला खूपच आनंदित करून गेलं.
कॉलनीतील रस्त्यांवर, इमारतींवर आणि उंच झाडांवर कोवळी, चमकदार सूर्यकिरणं पडली होती. आसपासचा परिसर अन् माझा मूडसुद्धा अगदी प्रसन्न भासत होता. आमच्या इमारतीसमोरच्या रस्त्यापाशी मीच लावलेल्या पारिजातकाच्या झाडापाशी गाडी लावली. घाईघाईनं खाली उतरलो. मोबाइल घेतला अन् आसपासच्या त्या झाडांची विविध अंगांनी, वेगवेगळ्या कोपऱ्यातून फोटो खेचत सुटलो.
ही मोहक सूर्यकिरणं आणि त्यामुळं उजळलेला परिसर काही क्षणांत बदलू शकतो नि आकाश पुन्हा काळंकभिन्न होऊ शकतं, हे मी जाणून होतो.
इथल्या एकूणएक झाडांचा, अगदी त्यांच्या जन्मापासूनचा इतिहास मला माहीत आहे. इथल्या काही चौकांत आणि काही बंगल्यांसमोर वटवृक्षांच्या भ्रूणहत्या घडल्या, त्याचाही मी साक्षीदार आहे. कारण त्यापैकी काहींना मी स्वतः बादलीनं पाणी आणून जगवले होते. अशा कितीतरी झाडांना मी जीवदान दिले. त्यांना यदाकदाचित वाचा फुटली तर त्यांची कहाणी ते नक्की सांगतील तुम्हाला अन् इतर कुणालाही...
सध्या इथं महापालिकेच्या शहाणपणानं आणि खरं पाहिलं तर वरच्या अति उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीमुळे खूप मोठी जागा बांधकामापासून वाचली आहे आणि महापालिकेनं तिथं सुंदर बगीचा आणि मुलांसाठी पार्क केला आहे.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या आमच्या सदनिकेच्या गॅलरीतून मी तीस वर्षांपूर्वी बोरीबाभळींच्या दाट झाडांनी भरलेली ही जागा पाहत असे. त्या साऱ्या परिसरात पाय ठेवण्याची कुणी हिंमत करू शकत नसे किंवा तशी गरजही नसायची. या दाट बोरीबाभळींच्या जंगलात प्रत्येक झाडावर सुगरणीची कितीतरी घरटी आकाराला येत असत. चिमण्या अन् इतर पक्ष्यांची किलबिल नव्हे, किलकिलाट वर्षभर चालू असायचा. त्या झाडांखाली जमिनीवर आणि जमिनीखाली किती नाग-साप होते, याची कल्पनाही करता येणार नाही. आणि हे सगळं याच इमारतीला लागून होतं, हे आता सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही.
आमच्या इमारतीशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीपाशी असलेल्या मोकळ्या जागेत मी पहिल्यांदा बागकामाला सुरुवात केली, तेव्हा तिथे मला चक्क एक मुंगसाचं बीळ आणि त्याचं छोटं कुटुंब आढळलं होतं. कितीतरी वनचरांचा हा हक्काचा नि नैसर्गिक अधिवास होता. पूर्वी शेतजमीन असलेल्या या जागेत हळूहळू एकापाठोपाठ एक इमारती उभ्या राहत गेल्या अन् त्या साऱ्यांचा हा नैसर्गिक अधिवास आक्रसत गेला. या मुक्या प्राण्यांचे दर्शनही बंद झाले. पण, त्याबद्दल ना कुणाला खेद ना खंत होती.
हा पाऊस थांबल्यानंतर नि समोरचा परिसर सूर्यकिरणांनी उजळल्यावरही आणि कारची काच साफ करण्यासाठी वायपरची गरज संपल्यावरसुद्धा समोरचे अंधुक दिसत होते. गाडीच्या काचांवरचे पाणी वायपरच्या काड्यांनी दूर केले होते,.. डोळ्यासमोरचं दृश्य धूसर होत होतं...
‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे..’ अशी स्थिती असली, तरी आता माझ्या कॉलनीतल्या घनदाट झाडांबाबत असं म्हणता येणार नाही, याची मला मनोमन जाणीव होऊ लागली आहे. आणि त्याला कारण आहे, परवा घडलेली एक घटना.
त्या दिवशी एक भली मोठी क्रेन आणून तिच्या मदतीने आमच्या इमारतीसमोरची पंधरा-वीस वर्षे जुनी असलेली कडुनिंबाची, वडापिंपळांची आणि इतर काही मोठी झाडं जमीनदोस्त करण्यात आली. अशा वेळी मी लांब कुठं तरी, शून्यात नजर फिरवून अश्रू लपवत राहतो. दिवसाढवळ्या झाडांची होत असलेली ही कत्तल कुणीही रोखू शकत नव्हते.
काहींनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या कत्तलीसाठी संबंधित विभागांकडून रीतसर परवानगी मिळवली आहे, असं सांगण्यात आलं होतं. रस्त्यावरच्या कत्तल झालेल्या झाडांच्या बदल्यात समोरच्या जागेत दुप्पट झाडी लावण्यात येतील, अशीही दिलासा देणारी पुस्ती जोडण्यात आली होती.
अशा घटना गावागावांत आणि शहरांत सगळीकडंच सर्रास होतात आणि याबाबत आपण काहीच करू शकत नाही. माझे डोळे भरून येतात तसे इतरांचेही येत असतील अन् तेसुद्धा अशीच हतबलता अनुभवत असतील, हे मी समजू शकतो. त्यामुळे सध्या आहे त्या वृक्षराजींसोबत निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्यायचा, न जाणो उद्या-परवा माझ्या नजरेसमोर किंवा अपरोक्ष तीसुद्धा नाहीशी व्हायची !
आणि याच भीतीने मी लागोपाठ या झाडांचे आणि हिरवाईचे फोटो खेचत सुटलो होतो. या निसर्गरम्य दृश्यांना निदान फोटोंमध्ये सुरक्षित ठेवण्याचा हा माझा केविलवाणा प्रयत्न होता.
असाच अनुभव मी काही वर्षांपूर्वी माझ्या आधी राहत असलेल्या इमारतीत घेतला होता. तिथं मागच्या बाजूला मी लावलेलं शेवग्याचं झाड अशुभ असतं म्हणून, रातराणीच्या दाट झुडपांमुळे नाग-साप येतात म्हणून आणि अशाच काहीबाही कारणांनी अनेक झाडं, रोपटी तोडली गेली होती. नंतर कितीतरी दिवस तिकडं फिरकण्याची माझी हिंमत झाली नव्हती, इतका त्या वृक्षतोडीने मी अस्वस्थ झालो होतो.
ही अस्वस्थता फार काळ राहिली नाही, कारण मी तिथल्याच समोरच्या इमारतीत राहायला आलो, तेव्हा नवी फुलबाग आणि नवी झाडं लावण्यासाठी मला आधीपेक्षाही कितीतरी मोठी जागा खुणावत होती. आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला.
आता आमच्या इमारतीसमोर डोलत असलेली हिरवीजर्द वृक्षराई हे माझ्या मेहनतीचं फळ... हे सगळं एकदम आठवलं अन् मनातली मरगळ लगेच दूर झाली.
अगदीच निराश होण्याचं कारण नव्हतं. सगळं काही संपलंय, असं काही नव्हतं. खूप झाडं लावता येतील, अशा कितीतरी जागा आपल्या इमारतींच्या समोर आणि आसपास आजही आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि वृक्षप्रेमी शेजारपाजाऱ्यांच्या मदतीने आजही पुन्हा नवी हिरवाई फुलवता येईल, असा विश्वास आहे.
या नुसत्या विचारानेच ती उदासीनता अन् मनात दाटलेलं मळभ जाऊन ‘आत’ही लख्ख, उबदार ऊन पडल्याच्या आनंद मी अनुभवतो आहे. आणि या उत्कट जाणिवेनंच पुन्हा एकदा ही कोवळी रविकिरणं मन प्रसन्न करताहेत.
‘शुभस्य शीघ्रम्’ अन् ‘पुनश्च हरिओम!’ ही दोन्ही वचने एकाच वेळी मनातल्या मनात घोळवत मीसुद्धा मग लगेचच कुठून नव्या वृक्षारोपणाची सुरुवात करता येईल, याचा विचार करू लागलो.
दिव्यमराठी मधला लेख
Camil Parkhe
No comments:
Post a Comment