देहविक्री हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय
श्रीरामपूरला आमच्या घरापासून चारशे-पाचशे मीटर अंतरावर आणि आमच्या सोमैय्या शाळेच्या मागे दहावीस घरांची वस्ती होती. आमच्या चाळीतल्या घरांसारखीच ही घरे सुध्दा कुडांची आणि पांढऱ्या मातीने बांधलेली होती. मात्र तरी या वस्तीला ` सफेद गल्ली’ किंवा ` पांढरी वस्ती’ या नावाने ओळखले जायचे.
या सफेद गल्लीला मी अनेकदा लांबून पाहिले, तिथून अगदी जवळून जाण्याची अनेकदा वेळ आली. या गल्लीत बहुधा एकदोन खोल्या असणाऱ्या घरांची समोरासमोर असलेली दारे होती, तिथल्या बाया अनेकदा दारापाशी बसून मशेरीनं दात घासत आपापसांत गप्पा मारत बसलेल्या दिसायच्या, किराणा दुकानावर त्या यायच्या, तेव्हा त्यांच्यापैकी काहींचे, विशेषतः प्रौढ बायांचे चेहरे काहीसे वेगळे, फुगलेले वाटायचे.
त्या `सफेद गल्ली’पाशी असलेल्या बाजारतळासमोरच्या मैदानावर आठवडी बाजाराच्या दिवशी शुक्रवारी तमाशाचे खेळ व्हायचे. या तमाशाबाबत वडीलधारी लोकांमध्ये खुलेपणाने कधी चर्चा झाल्याचे मी कधीही ऐकले नाही तसेच या पांढऱ्या घरांबाबत आणि त्या घरांत राहणाऱ्या बायांबाबत कधी वाईट किंवा चांगले बोललेले मी कधी ऐकले नाही. त्याकाळी शाळेच्या मागे त्या परिसरातील लोकांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेने पुरुषांसाठी बारा आणि बायांसाठी बारा संडास बांधले होते. ते `बारा संडास’ असा अगदी सहजगत्या उल्लेख व्हायचा तसेच त्यामागची ती `पांढरी गल्ली’ असा तितक्याच सहजतेने उल्लेख व्हायचा.
शरीरधर्मासाठी दोन्हीही आवश्यकच..
सत्तरच्या दशकात गोव्यात मी शिकत असताना आणि नंतरच्या काळात पणजीला बातमीदारी करत असताना वॉस्को शहराजवळचा बायना बिच हा `रेड लाईट एरिया’ म्हणून प्रसिद्ध होता. समुद्रकिनारी असलेले बंदर अनेकदा कायम नौकानयनावर असलेल्या लोकांची आणि सैनिकांची शरीरसंबंधांची भूक भागवत असत.
ऐंशीच्या दशकात गोव्यात ताळगावला आमच्या `द नवहिंद टाइम्स’ आणि `नवप्रभा’ या जुळया इंग्रजी-मराठी दैनिकांतील आम्ही तीन सहकारी नारळांच्या झाडांनीं वेढलेलं एक बैठे टुमदार कौलारु घर भाड्याने घेऊन एकत्र राहत होतो. दरमहिना पाचशे रुपये भाडे होते या पाच खोल्यांच्या घराचे. आमच्यातल्या एक ज्येष्ठ सहकारी आपल्या पार्टनरबरोबर या घरात राहत असायचा, वेश्यागमनासाठी बायना बिचवर कि इतर कुठंकुठं हा माझा सहकारी जायचा तेव्हा तिथल्या या तरुणीला तो आपल्याबरोबर राहण्यासाठी म्हणून कायमचा घेऊन आला होता. मूळची कर्नाटकची असलेली ती आम्हा सगळ्यांबरोबर हिंदीत बोलायची. एका खोलीत मी आणि माझ्याच वयाचा, विशीच्या आसपास असलेला तो दुसरा तरुण सहकारी राहायचा.
या बंगलीवजा घराच्या आतल्या कुठल्याही रुमला दारं नव्हती आणि खिडक्यांनाही गज नव्हते. रात्री खूप उशिरा मी आलो कि स्वयंपाकघराच्या एका खिडकीची वरची कडी विशिष्ट पद्धतीनं खोलून मग ती खिडकी उघडून इकडंतिकडं न बघता मी सरळ माझ्या खोलीकडं जायचो.
एक दिवस मी रात्री घरी आलो तर या मुलानं मला सांगितलं कि सावंतवाडीहून त्याची मामेबहिण आज मुक्कामाला आली आहे, त्यामुळं त्या रात्री मी त्या रुमबाहेर झोपावं. काही हरकत न घेता मी त्याच्या सांगण्याप्रमाणं केलं. काही दिवसांनी तो मुलगा त्याच्या दोन चुलत कि मामे बहिणींना घेऊन आला होता आणि मग परत मला त्या खोलीबाहेर झोपावं लागलं.
दोनतीन दिवसांनी त्या मुलाच्या नातेवाईक बहिणींचा विषय सहज आमच्या तिसऱ्या सहकाऱ्याच्या पार्टनरशी बोलताना निघाला तेंव्हा ती एकदम खोखो हसत सुटली. मी मख्खपणे तिच्याकडं पाहत राहिलो तेव्हा ती हिंदीत मला म्हणाली, '' कामिल, तुम्ही किती बावळट आहात ! त्यानं तुम्हाला त्या मुली त्याच्या चुलत आणि मामे बहिणी आहेत असं सांगितलं आणि तुम्ही त्यावर सरळसरळ विश्वास ठेवला ? कमाल आहे बाई तुमच्या भोळसटपणाची आणि मुर्खपणाची! '' आणि ती पुन्हा तोंडाला पदर लावून पुन्हा हसत सुटली तेव्हा कुठं माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला!
गोव्यात मी पत्रकारितेची सुरुवात केली ती मुळी एज्युकेशन कॅम्पस आणि क्राईम रिपोर्टर म्हणूनच. दोन्हींचे जग अगदी वेगवेगळे. क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस, गुन्हेगारी विश्व आणि कधी ना कधी कायदा उल्लंघन करणारे लोक आणि त्यामुळे पोलिसांशी संबंध येणारे लोक यांच्याशी जवळून अनुभव आला. पोलिसांकडून या ना त्या कारणामुळे पकडले जाणारे लोक चोर वा गुन्हेगार असतातच असे नाही, याचा अनेकदा अनुभव आला.
पणजी पोलिस स्टेशनवर मुख्य असलेला फौजदार अलेक्स फर्नांडिस हा माझा जवळचा मित्र आणि क्राईम बिट सांभाळत असलेल्या माझ्यासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत. पणजीतल्या आझाद मैदानावरच्या पोलिस मुख्यालयातली माझी भेट अलेक्सला `हाय’ केल्याशिवाय, त्याचाशी दोन शब्द बोलल्याशिवाय पुरी होत नसायची. कधीकधी फौजदार अलेक्स मला त्याच्या पोलिस जीपमधून पणजीतल्या `राऊंड’वर किंवा अगदी गुन्ह्याच्या घटनास्थळी घेऊन जायचा.
त्यादिवशी मात्र अलेक्स मला एका वेगळ्याच कामगिरीवर घेऊन गेला. त्यावेळी अंमलात असलेल्या `सिटा’ म्हणजे सप्रेशन ऑफ इममॉरल ट्रॅफिक ॲक्टीव्हीटीज अँक्टनुसार छापा घालण्यास आपण जात आहोत असे ऐकल्यावर मी सावध झालो होतो. आता या अँक्टमधील `सप्रेशन’ शब्दाची जागा `प्रिव्हेंशन’ ने घेतल्याने `सिटा’ ऐंवजी `पिटा’ असे नामानिधान झाले आहे.
पोलिस जीप पणजीहून चारशे वर्षांचा पोर्तुगीजकालीन पाटो पुल आणि पणजी बसस्टॅण्ड ओलांडून ओल्ड गोव्याच्या दिशेने धावू लागली आणि रायबंदर येथे रस्त्याशेजारी एकमजली इमारत असलेल्या एका लॉजपाशी थांबली. जीपमधल्या काही पोलिसांनी धावत जाऊन लागलीच मोक्याच्या जागा घेतल्या आणि इतर पोलिस तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावरच्या बंद खोल्यांना जोरजोराने ओरडत धडका देऊ लागले. सगळीकडे एकच गोंधळ माजला. दुपारचे चारपाच वाजले असावे.
त्यानंतर काय घडले ते सर्व काही येथे सांगता येणार नाही. मात्र सगळ्याच रूम्सचे दरवाजे काही क्षणात उघडले गेले आणि जेमतेम अब्रू राखण्यासाठी आवश्यक असणारे कपडे असलेले स्त्रीपुरुष पॅसेजमध्ये उभे राहिले.
आपण दोघे कोण आहोत, म्हणजे नवराबायको की दुसरे कोण आहोत, इथे कशासाठी आलो आहोत वगैरे सांगण्यात मग काही वेळ गेला. त्याकाळात आधार कार्ड वगैरे ओळखपत्रे नसायची, वैवाहिक संबंध दर्शवण्यासाठी मंगळसूत्रे दाखवले जायचे.
`कारवारचा शिक्षक’ म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या एका मध्यमवयीन इसमाने अखेरीस आपल्याबरोबर असलेली महिला `आपली बायको नाही’ याची कबुली पाच मिनिटांत दिली. असेच इतरांच्या बाबतीत घडले, त्यांची चौकशी करुन पकडलेल्या महिलांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि लॉजच्या काही नोकरांना पोलिस स्टेशनवर आणले गेले.
देहविक्रीशी संबधित असलेल्या हॉटेलमधील लोकांबाबत आणि इतरांबाबत कशाप्रकारे कारवाई केली जाते याचा मी अनुभवलेला हा प्रसंग. पुढच्या काळात क्राईम रिपोर्टिंग करताना हा अनुभव खऱ्या अर्थाने पथदर्शक ठरला.
भारतातल्या प्रचलित कायद्यानुसार देहविक्रीच्या गुन्ह्यांत महिलेला दोषी किंवा गुन्हेगार ठरवले जात नाही, उलट `पिडित’ म्हणून त्यांची सुधारणागृहात रवानगी होते आणि संबंधित लॉजचे मॅनेजर, कामगारवर्ग वगैरेंना वेश्याव्यवसाय चालवण्यावरून अटक होते, लॉजचे मालक मात्र नेहेमीच या कारवाईपासून दूरच असतात.
एकदा रात्री पणजी पोलिस स्टेशनवर नव्यानेच रुजू झालेल्या आणि नाईट ड्युटीवर असलेल्या एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाबरोबर जीपने राऊंडला मी गेलो होतो. रात्री साडेदहाच्या आसपास पोलिस स्टेशनवर परतलो तेव्हा दर्शनी खोलीत कोपऱ्यात विशीच्या आसपास असलेली एक महिला दोन्ही पाय दुमडून, अवघडून बसलेली दिसली. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या कंपाल ग्राउंडजवळ रस्त्यावर उभी राहून ती गिऱ्हाईक शोधत उभी होती म्हणून तिला पोलिस चौकीत आणले होते. बहुधा तिच्याच सुरक्षितेच्या कारणास्तव.
वेश्याव्यवसायाचा विषय निघाला कि मला आजही ती कोपऱ्यात अवघडून बसलेली ती तरुणी हमखास आठवते.
काही वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलीसह युरोपच्या सहलीवर होतो तेव्हाची गोष्ट. पॅरीस शहर जगातली रोमान्स नगरी आणि फॅशनचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पॅरीसच्या आठवड्याभरच्या त्या वास्तव्यात आम्ही मॉन्तमार्ट या भागात राहत होतो. पॅरीसमधलं सर्वात मोठे आणि उंच टेकडीवर असलेले चर्च म्हणजे बॅसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट (पवित्र हृदयाची बॅसिलिका) इथं आहे आणि या चर्चच्या खालचा परीसर चित्रकला, फोटोग्राफी वगैरे कलांसाठी जगप्रसिद्ध आहे. गेल्या काही शतकांत मॉन्तमार्ट इथं नामवंत चित्रकारांनी हजेरी लावली आहे.
मॉन्तमार्ट इथल्या भूमिगत आणि जमिनीवर असलेल्या मेट्रोमार्गाभोवती फिरताना मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटायचं ते म्हणजे इथं असलेली सेक्स टॉईज विकणारी अनेक दुकानं.
त्यानंतर मला कळालं कि हा परिसर आणखी एका गोष्टीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे ती म्हणजे देहविक्री. आम्ही दररोज ज्या हॉटेलात जेवणासाठी जायचो तिथल्या मूळचा ट्युनिशियन असलेल्या मॅनेजरनं मला सांगितलं कि रात्री दहानंतर शक्यतो रस्त्यावर फिरू नका, कारण त्यावेळी देहविक्रीसाठी आमंत्रण देणाऱ्या महिला जागोजागी उभ्या असतात, आपल्या गिऱ्हाईकाच्या शोधात फिरत असतात.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ला `सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा आणि भारताचा पत्रकार प्रतिनिधी म्हणून थायलंड येथे भरलेल्या उद्योगविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला मी हजर होतो. भारतातल्या सहा पत्रकारांमध्ये आणि जगातल्या ७४ पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे आणि या व्यवसायात महिलांबरोबर पुरुषसुद्धा आहेत. आशिया खंडातली सेक्स कॅपिटल’ असाच थायलंडचा बोलबाला आहे.
बँकॉक इथल्या आमच्या हॉटेलसमोर असलेल्या मसाज पार्लरच्या किंवा `स्पा'च्या मुली आणि महिला दिवसभर आणि रात्रभर रस्त्यावर चालणाऱ्या पुरुषांना आपल्याकडं हाक मारून बोलवत असायच्या.
गोव्यात पर्यटक म्हणून गेल्यावर तिथं दारु प्यायलाच हवी किंवा पुण्यात मित्रांबरोबर मजा मारण्यासाठी आल्यावर तिथल्या बुधवार पेठेत जायलाच हवं असं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या काही तरुणांना वाटत असतं. तसंच थायलंडला आल्यावर तिथल्या मसाज पार्लरला भेट द्यायलाच हवी, त्याशिवाय या देशाची सहल पुर्ण होऊ शकत नाही, असाच अनेकांचा समज असतो.
आमच्या एका कॉमन मित्राच्या बोलण्यावरुन थायलंडची कीर्ती कानावर पडलेल्या माझ्या पत्नीनंसुद्धा हा `स्पा'चा काय प्रकार आहे त्याचा अनुभव घे असं मला सांगितलं म्हणजे चक्क बजावलंच होतं !
बॅंकॉंकला रस्त्यांवरच्या इमारतींत जागोजागी ` हेल्थ स्पा', `थाई मसाज’ असं लिहिलेलं आढळतं. तिथं ग्राहकांच्या हातापायाला किंवा पूर्ण अंगाला मसाज करणाऱ्या मुली, महिला रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांना पारदर्शक काचांमुळे स्पष्ट दिसतात. ग्राहक कोचवर पडून त्याच्या शरीराला तेल लावून मुली आणि महिला मसाज करत असतात आणि असे चारपाच ग्राहक आपापल्या कोचावर ओळीने बसलेले, पालथे पडलेले बाहेरुन स्पष्ट दिसत असते. अशी मालिश करवून घेताना आडूनलपून राहण्याची मुळी गरजच नसते.
हा, मात्र काही `हेल्थ स्पा'मध्ये आंबटशौकीन ग्राहकांना `इतर' सेवा पुरवण्यासाठी आतल्या भागांत, पहिल्या मजल्यांवर वेगळे कक्ष असतात. आणि विशेष म्हणजे ही सर्व सेवा कायदेशीर असते, पोलिसांची किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाची तिथे धाड पडण्याची भीती मुळीच नसते.
थायलंडच्या कीर्तीला जागून त्यानुसार माझ्याबरोबर असलेला एक भारतीय पत्रकार दररोज रात्री नवनव्या मसाज पार्लरला भेट देत होता.
पहिल्या दिवशी घाबरत घाबरत मीही माझ्या पत्रकार मित्रासह आमच्या हॉटेलसमोरच असलेल्या `स्पा'मध्ये गेलो आणि तो मित्र `आतल्या’ भागात गेल्यावर मी स्वतःच्या अंगाखांद्याला मसाज करवून घेतला. नाहीतर भारतात परतल्यानंतर मित्रांनी आणि इतरांनी वेड्यात काढले असतं अशी भीती होती. त्या तरुण मुलींकडून असा मसाज करवून घेताना मी स्वतःच प्रचंड अवघडलो होतो आणि वेळेच्या आधीच '' बस्स, इतकं पुरं झालं !'' म्हणून स्वतःची सुटका करुन घेतली आणि हुश्श्य केलं.
खूप वर्षांपूर्वी पंचविशीच्या उंबरठ्यावर मी असताना बल्गेरिया येथे अनुभवलेला असाच एक प्रसंग त्यावेळी आठवला होता. बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना काही आठवड्यांनंतर केस खूप वाढले म्हणून मी एका सलून मध्ये शिरलो. तेव्हा अनपेक्षितपणे तिथं काम करणाऱ्या एका तरुणीनं केस कापण्यासाठी माझ्या डोक्याचा ताबा घेतला होता. नंतर डोक्याला मालिश पण केली होती. तेव्हा तो अर्धा पाऊण तास मी असाच बावचळून आणि अवघडून गेलो होतो हे आठवलं.
अशा प्रसंगाला मला तोंड द्यावं लागणार अशी मला कल्पना असती तर कदाचित माझा प्रतिसाद आणि वागणं जरा दुसऱ्या प्रकारचं असलं असतं ! सोफिया शहराच्या बांकिया उपनगरात माझ्या रुमवर परतल्यावर हा प्रकार मी इतर भारतीय पत्रकारांना सांगितला होता. दुसऱ्या दिवशी मग यापैकी अनेकांनी केस कापण्यासाठी सोफियाची लोकल ट्रेन पकडली होती.
थायलंडच्या दौऱ्यात मित्र बनलेला हा पत्रकार सहकारी माझ्याहून दहा वर्षांनी लहान होता, त्या पत्रकार सहकाऱ्यासारखं आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचं, आतल्या कक्षात जाण्याचं मला धाडस झालं नाही. `स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज विक' हे प्रसिद्ध वाक्य आहे. इथं अगदी उलट स्थिती होती, फ्लेश इज विलिंग बट द स्पिरिट इज विक ! पुर्वसंचित नैतिक, धार्मिक व सामाजिक संस्कारांचं दडपण, ओझं असं सहजासहजी झुकारता येत नाही हेच खरं ! मग एखादे कृत्य कायदेशीर किंवा बेकायदेशीर असो वा नसो !
देहविक्री करणे हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे असं म्हटलं जातं. वेश्यांना किंवा व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना (पुरुषांना नव्हे !) नेहेमीच तिरस्करणीय वागणूक मिळत आली आहे. व्यभिचार करणाऱ्या किंवा नैतिक गैरवर्तन करणाऱ्या दोन महिलांचा बायबलमध्ये नव्या करारात उल्लेख येतो.
ज्युंच्या प्राचीन कायद्यानुसार व्यभिचार करणाऱ्या महिलेला लोकांनी सार्वजनिकरित्या दगडाने ठेचून ठार करण्याची शिक्षा दिली जात असे. व्यभिचार करताना पकडल्या गेलेल्या एका महिलेचा ``आपण काय न्यायनिवाडा करताल?'' असं येशू ख्रिस्ताची परिक्षा करण्याच्या हेतूनं, त्याला अडचणीत टाकण्यासाठी विचारलं जातं. त्या स्त्रिला दगडानं ठेचण्याच्या शिक्षेचं येशूनं समर्थन न केल्यास तो धर्मशास्त्राविरुद्ध आहे असं सांगायला हे लोक टपलेलं असत.
मात्र, ``तुमच्यापैकी ज्या कुणी आतापर्यंत एकही पाप केलेलं नसेल त्या व्यक्तीनं त्या व्यभिचारी महिलेच्या अंगावर पहिला दगड टाकावा'' असं जमिनीवर मातीत बोटांनी लिहून येशू सांगतो आणि ते ऐकून तिथं जमलेले सगळे लोक हातातला दगड खाली टाकत एकापाठोपाठ तेथून पाय काढतात अशी ही एक मार्मिक कथा आहे.
वेश्याव्यवसाय सर्वाधिक प्राचीन असला तरी कायमच तिरस्करणीय राहिला आहे. इतकेच नव्हे तर स्त्रीपुरुषांचे असलेले शारीरिक संबंधसुद्धा नैसर्गिक, पवित्र मानले जात नाही. अगदी विवाहित पतिपत्नींचेसुद्धा. आपल्याकडं आणि खरं पाहिलं तर जगात सगळीकडे सर्व समाजांत आणि धर्मांत शरीरधर्म वाईट असंच समजलं जातं.
``ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यु'' असलं तत्त्वज्ञान एकेकाळी खूप लोकप्रिय आणि त्यामुळं पौंगडावस्थेत नुकत्याच येणाऱ्या तरुण मनाला घाबरुन सोडणारं होतं. त्यामुळे दैवी संबंधांमुळं किंवा अनैसर्गिक पद्धतीने झालेले जन्म श्रेष्ठ असं समजलं गेलं आणि अशाप्रकारे जगात विविध धर्मांतली दैवतासमान मानल्या गेलेल्या व्यक्ती दैवी किंवा अनैसर्गिक संबंधांतून जन्माला आली असं दाखवलं गेलं.
याचं सरळसरळ कारण म्हणजे स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध एकतर तिरस्करणीय किंवा हीन मानले गेले. पृथ्वीवर तपस्या करणाऱ्या ऋषीमुनींना त्यापासून प्रवूत्त करण्यासाठी आणि त्यांना वाममार्गाला ( !) लावण्यासाठी मग स्वर्गातून अप्सरा पाठवल्या जातात. स्त्री म्हणजे मोक्षमार्गातली एक धोंड असाच सगळीकडं मानलं गेलं आहे.
स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक असलेल्या शरीरसंबंधांविषयी असलेल्या घृणेमुळे पुढे ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक धर्मगुरुंवर अविवाहीत राहण्याचं बंधन आलं जे आजतागायत कायम आहे. प्रोटेस्टंट पंथांत मात्र विवाहित धर्मगुरु असतात. भारतीय प्राचीन संस्कृतीत साधूसंतांनी, गुरुवर्यांनी आणि देवमाणसांनी संसारी असणे, प्रापंचिक असणे तितके तिरस्करणीय समजले जात नसायचे, हे विविध ऋषीमुनींच्या उदाहरणांनी स्पष्ट होते. आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेऊन मिशनरी वृत्तीनं सेवा करण्याचं व्रत घेणाऱ्या कॅथोलिक ख्रिस्ती धर्मगुरुंचं अनुकरण मात्र भारतात काही संघटनांनी केलं आहे.
स्त्री किंवा एकूणच कामजीवन हे मोक्षमार्गातली र्धोंड मानले गेले आहे त्यामुळेच `सावधान; असं कानावर पडताच किंवा पडण्याआधीच काही जण बोहल्यावरुन मागे फिरतात. मी स्वतःसुद्धा जेसुईट धर्मगुरु होऊन आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेण्याचं ठरवलं होतं. नंतर हा निर्णय मी बदलला तो काही वेगळ्या कारणांनी, केवळ लग्न करण्यासाठी नाही.
औपचारिकरीत्या संन्यासी व्रतबद्ध होण्याआधीच मी `सावधान' होऊन माघारी फिरलो आणि त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी गृहस्थाश्रम स्विकारला.
वेश्या केवळ स्त्रियाच असतात किंवा वेश्या व्यवसाय केवळ स्त्री आणि पुरुष या दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच चालतो ही एक गैरसमजूत आहे. गेल्या काही वर्षांत या समजुतीला तडे गेल्याचे दिसत आहेत. अलीकडेच डॉ. माधवी खरात यांनी लिहिलेली आणि कुणाल हजेरी यांच्या चेतक बुक्सने प्रकाशित केलेली `जिगोलो’ या नावाची पुरुष वेश्याच्या जीवनावरची कादंबरी मी त्या विषयाच्या नाविन्यामुळं एका बैठकीत वाचून काढली.
काही वर्षांपूर्वी सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ आणि उषा वाघ यांनी अमेरिकेतील वेश्याव्यवसाय या शीर्षकाचा मी अनुवाद केलेले एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळी या व्यवसायातील शोषणाची माहिती झाली.
देहविक्री करणाऱ्या महिलांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, वेश्यांनासुद्धा चांगले जीवन जगात आले पाहिजे, असा त्यावेळी बंडखोर, क्रांतिकारक वाटणारा विचार सुरक्षित कामजीवन आणि भारतातील संततीनियमन चळवळीचे आद्य प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडला होता. र. धो. कर्व्यांच्या काळातील वेश्याव्यवसाय आणि वेश्यांची स्थिती आणि सद्यस्थिती यात निश्चितच मोठे अंतर आहे.
सत्तरच्या दशकात दुर्गा भागवत यांनी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांबाबत केलेले एक विधान खूप वादग्रस्त ठरले होते. या विधानाचा विपर्यस्त अर्थ काढून दुर्गा भागवत वेश्याव्यवसायाचे समर्थन करतात असा आरोप केला गेला होता.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा' हा काव्यसंग्रह वेश्यांची वस्ती असलेल्या मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातले जीवन आणि भाषा चित्रित करतो. या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना लिहिण्याआधी तेँडुलकर यांनी कामाठीपुरा येथला बराचसा परीसर आपल्या पायाखाली घातला होता, कारण इथले जीवन आणि भाषा मध्यमवर्गीय समाजाला आणि लेखकांना पूर्णतः अपरिचित होता.
दुर्गाबाई भागवत यांना त्यांच्या `पैस’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त महिला मंडळाने आयोजित केलेला त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना भागवत म्हणाल्या कि, ''वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळायला हवी.'' त्यांच्या या विधानाचा धागा पकडत नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा' कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजा ढाले म्हणाले, ''ज्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यावे असे वाटते त्यांनींच हा धंदा करावा !''
ढाले यांच्या या विधानाने मोठे महाभारत घडले. त्यानंतर बराचसा काळ ओलांडला आहे.
देहविक्री करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा कायद्याचे सर्व अधिकार समानतेने मिळायला हवेत, वेश्यांनासुद्धा सन्मानपुर्वक, प्रतिष्ठेचे जीवन मिळायला हवे, या शब्दांत आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देहविक्रीबाबत वेगळाच, क्रांतिकारक दृष्टिकोन निर्माण केला आहे.
सोशल माध्यमांत निरोगी आणि आरोग्यदायक कामजीवनाबाबत आता खुलेपणानं लिहिलं आणि वाचलं जात आहे.
तरीदेखील याबाबत अजूनही फार मोठी मजल मारावी लागणार आहे हे निश्चित.
No comments:
Post a Comment