मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन
खरे तर आतापर्यंत मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून गोव्यात आणि नंतर पुण्यात मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किंवा समारोपाचे भाषण कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो, ते केवळ बातमी करण्यासाठी.
१८७८ साली पुण्यात मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पार पडले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे या संमेलनाचा शुभारंभ करण्याचा मान जातो. नंतरच्या काळात ग्रंथकारांचे संमेलन ‘साहित्य संमेलन’ झाले. त्यानंतर ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाले. कालांतराने विद्रोही, विचारवेध, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक अशी विचारनिहाय आणि कोकण, मराठवाडा अशी प्रदेशनिहाय संमेलने सुरू झाली.
मराठी साहित्य संमेलनापासून पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ‘ख्रिस्ती साहित्य संमेलना’ने शंभरेक वर्षांपूर्वीच केले होते, हे मात्र अनेकांना माहीतही नसेल.
आता २६वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीड येथे नोव्हेंबर ६, ७ आणि ८ रोजी पार पडत आहे,संमेलनाध्यक्ष आहेत पौलस वाघमारे आणि स्वागताध्यक्ष आशिष शिंदे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८-१९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष होते- रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह १५० लोक हजर होते.
ख्रिस्ती संमेलनाचा हा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही खळाळता राहिला आहे. गंमत म्हणजे १९९२ पासून मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने स्वतंत्र चूल मांडली आणि आतापर्यंत १० संमेलने भरवली आहेत.
विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांप्रमाणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झालेले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
हा ग्रंथ केवळ एकंदर मराठी साहित्यक्षेत्रासाठीही एक मौलिक ऐवज ठरतो.
१९२७ नंतर गेल्या शतकभरात एकूण ३५ संमेलने झाली असून त्यात २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १० मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो.
आतापर्यंतच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे : दुसरे - मनोहर कृष्ण उजगरे (मुंबई, १९३०), तिसरे - देवदत्त नारायण टिळक (निपाणी, १९३२) चौथे - लक्ष्मीबाई टिळक (नागपूर, १९३३), पाचवे आणि सहावे- सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे, १९७२), सातवे - फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई, १९७३), दहावे - भास्करराव जाधव (बारामती, १९७५), अकरावे - रॉक कार्व्हालो (सोलापूर, १९७७), बारावे - रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर, १९८१), तेरावे - फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई, १९८४), चौदावे - जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर, १९८६), पंधरावे - विजया पुणेकर (मुंबई, १९९०), सोळावे - फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे, १९९२), सतरावे - निरंजन उजगरे (मालवण, १९९४), अठरावे - सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर, १९९८), एकोणिसावे - सिसिलिया कार्व्हालो (नाशिक, २०००), विसावे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, २००१), एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई, २००५) , बाविसावे सुभाष पाटील (जालना, २००७ ), तेविसावे - फादर मायकल जी. (वसई, २००९), चोविसावे - अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४).
दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे : पहिले - अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर, १९९२), दुसरे - सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना, १९९३), तिसरे - अरविंद पी निर्मळ (लोणावळा, १९९४), चौथे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, १९९५), पाचवे - बिशप प्रदीप कांबळे (पुणे, २००१), सहावे - सुभाष चांदोरीकर (संगमनेर, २००४), सातवे - डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर, २००६), आठवे - वसंतराव म्हस्के (उदगीर, २००८), नववे - अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर, २०११) आणि दहावे - फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर, २०१८).
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे. स्त्रीसाहित्याची मोठी परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे.
याउलट केवळ ३५ संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा स्त्रिया संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत. त्यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापैकी काही संमेलनाध्यक्ष एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊ-बहीण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य इत्यादी.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनालध्यक्षपद अनेक धर्मगुरूंनी भूषवले आहे. यात कॅथोलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी. निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरू यांच्याच प्रभावाखाली आहे, हेच यातून दिसून येते.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथोलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटूनपालटून निवडले जातात. या पायंड्याकडे पाहू जाता कॅथोलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसईउर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत.
वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथोलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला एक ख्रिस्ती आणि वाचक म्हणून मी हजर होतो. संमेलनाध्यक्ष होते कवी निरंजन उजगरे, तर तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे प्रमुख पाहुणे. संपादक नारायण आठवले मुख्य पाहुणे होते. संमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे होते.
मालवणच्या मिलाग्रिस चर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या तीन दिवसीय संमेलनातल्या जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने आलेले पाहुणे व रसिक जाम खूष होते.
उदगीर (जि. लातूर) येथे भरलेल्या ‘मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’त मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले, ते त्या वेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे. ‘हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे’, असा आरोप करून ते उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या ‘नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’चे स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे, पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात साहित्यिक वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.
वादविवाद, आरोपप्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ''ख्रिस्ती साहित्य" या शब्दाची व्याख्या, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसावा आकडा आहे, अगदी तशी स्थिती (मुख्य प्रवाहातले !) मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्यात आहे.
अनेक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत `दलित ख्रिस्ती' या शब्दावर आणि वेगळ्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांवर तोंडसुख घेतले आहे. अपवाद फक्त सिसिलीया कार्व्हालो यांचा. आज २०२२ मध्येही यात फार बदल झालेला नाही. आजसुद्धा `दलित ख्रिस्ती' हा शब्द मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातसुद्धा `गावकुसाबाहेरचा' आहे.
ज्यांचे पोट भरले आहे अशांची प्रवृत्ती ख्रिस्ती दलितत्वाचे वास्तव सरळसरळ नाकारण्याची असते. याउलट आपल्या दलितत्वाचे वास्तव नाकारले तर ख्रिस्ती असल्याने इतर दलितांना दिल्या जाणाऱ्या सर्व आरक्षणादी सोयीसुविधांवर पाणी सोडावे लागते म्हणून या दलितत्वावर हक्क सांगितलं जातो.
पूर्वास्पृश्य असलेल्या सर्व हिंदू. शीख आणि बुद्ध समाजाला लागू असलेल्या सोयीसुविधा आणि आरक्षण पूर्वास्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजालाही द्याव्यात आणि त्यासाठी इतरांसारखे त्यांचेही दलितत्व मान्य करावेच लागेल. असा हा तिढा आहे.
साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत नव्हते असे अनेकदा झाले आहे. तर जोसेफ तुस्कानो आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.
आतापर्यंत दोनच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांना मी आवर्जून हजर राहिलो आहे, मालवणचे १९९४ चे संमेलन आणि २०११ चे अहमदनगरचे संमेलन.
मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथल्या अनेक मांडवांत आणि व्यासपीठांवर मात्र मी अगदी हौसेने मिरवलो आहे. सत्कारही करवून घेतला आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य (?) प्रवाहातून पहिल्यांदा वेगळी चूल मांडणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास दाद द्यायला हवी. याचे कारण त्यानंतर अनेकांना असा वेगळा संसार मांडण्याचे धाडस झालं आहे.
बीडला होणाऱ्या २६ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास शुभेच्छा !
(फोटो ओळी : पौलस वाघमारे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलीया कार्व्हालो, अनुपमा उजगरे )
Camil Parkhe
No comments:
Post a Comment