बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन
६ नोव्हेंबर २०२२ पासून बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातून तिसेक वर्षांपूर्वी मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी वाट धरुन वेगळी चूल मांडली. तेव्हापासून मुख्य (!) प्रवाहातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या बहुसंख्य अध्यक्षांनी या वेगळ्या प्रवाहावर टीका केली आहे, भरपूर तोंडसुख घेतले आहे.
दलित समाजाची पार्श्वभूमी नसलेल्या पूर्वसंमेलनाध्यक्ष डॉमिनिक ऑब्रिओ आणि सेसिलिया कार्व्हालो यांनी मात्र या वेगळ्या प्रवाहाबद्दल सहानुभूतीची भूमिका घेतली होती. गंमत म्हणजे दलित ख्रिस्ती संमेलनांवर टीका करणाऱ्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी पूर्वाश्रमीचे दलितत्व निदान मान्य केले होते, वाघमारे यांनीं मात्र आपला समाज मुळी दलितच नाही, अशीच भूमिका घेतली आहे.
या दलित ख्रिस्ती चळवळीविषयी संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे आपल्या भाषणात म्हणतात : (हे भाषण `अक्षरनामा'ने काल प्रसिद्ध केले आहे. )
``अलीकडच्या काही दशकांत ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ अस्तित्वात आली. खेड्यातील अस्पृश्य, दलित गणले गेलेल्या लोकांना त्यांचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने ही चळवळ मूळ धरु लागली. महाराष्ट्रात रेव्ह. डॉ. अरविंद निर्मळ यांनी या चळवळीचा पाया घातला. आपला विचार रुजावा, फोफवावा, दबलेले लोक जागृत व्हावेत म्हणून त्यांनी विविध प्रयत्न केले. चळवळीसाठी पैसा उभा केला. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. सुरुवातीची काही वर्षे निर्मळांच्या नेतृत्वामुळे ही चळवळ जीव धरुन होती. पुढे डॉ. निर्मळ ख्रिस्तवासी झाले, चळवळ खंडीत झाली.
मुळात दलित नसलेले आमचे लोक आहेत, कानामागून आलेल्या सवर्णांनी दलितत्व, अस्पृश्यता आमच्यावर लादलेली आहे. आमच्या असहायतेचा फायदा उठवत आम्हाला त्यांनी दास्यात ठेवले आहे. आणि त्यांचीच री ओढत, स्वतःला पुन्हा पुन्हा दलित म्हणवून घेत ही चळवळ पुढे रेटायचा प्रयत्न चालू आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या आधाराने शिक्षण, आत्मसन्मान लाभलेले आणि आत्मभान लाभलेल्या लोकांनी या चळवळीला मान्यता दिली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत ही चळवळ खुजी, खुरटी राहिली. याविषयीचे आत्मपरीक्षण या चळवळीतील कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
अस्पृश्य नसताना दुसरे म्हणतात, वागवतात म्हणून किती दिवस स्वतःला ‘दलित’ म्हणवून घेणार आहोत आपण? आम्हाला केव्हा आत्मभान येणार? मिशनरींनी केलेले संस्कार, आम्ही विसरुन गेलो की काय? मिशनरींच्या प्रेरणेने स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीचा आम्हाला विसर पडला की काय? राजांचा राजा, प्रभुंचा प्रभू असलेल्या ख्रिस्ताच्या प्रजेने स्वतःला अस्पृश्य, दलित म्हणून स्वत:ला हिनवून घ्यायचे, ही शरमेची बाब आहे.
या चळवळीतील कार्यकर्ते वारंवार वास्तवतेचा टाहो फोडतात, खेड्यातील वास्तवता दाहक आहे, अजूनही सवर्ण आम्हाला आमचा दर्जा देत नाहीत. या वास्तवतेला खरे पाहिल्यास आम्हीच जबाबदार आहोत. सवर्णांप्रमाणेच आम्हीच आम्हाला वारंवार दलित म्हणवून घेतल्याने ‘दलितत्व’ जाण्याऐवजी टिकून राहत आहे, ही खरी वास्तवता आहे.
कोणतीही गोष्ट वारंवार घोकल्याने ती सत्य वाटू लागते, या नियमानुसार आम्ही दलित नसतांना, अस्पृश्य नसतानादेखील दुसरे म्हणतात\ गणतात, म्हणून आम्ही स्वतःला दलित म्हणवून घ्यायचे, यात पुरुषार्थ नाही. ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ दलितत्व घालवण्यासाठी आहे की, टिकवण्यासाठी, असा विरोधाभास जाणवतो. हे या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांने आत्मपरीक्षण केल्यास निश्चितच पटेल.''
---
`ख्रिस्ती दलित' ही मुळी संकल्पनाच पौलस वाघमारे यांनी नाकारल्याने हा प्रपंच..
....
``अहमदनगर येथे २३ आणि २४ मे १९९२ रोजी पहिले ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन पार पडले. सन २००४ पर्यंत अशी एकूण सहा ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. सन १९९२ मध्ये भरलेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष रेव्ह. अरविंद निर्मळ यांनी विशेष पुढाकार घेऊन चार संमेलने आयोजित केली होती. सन १९९० मध्ये महाराष्ट्रात सुरु झालेल्या ख्रिस्ती दलित मुक्ती चळवळ, पुण्यातील समता विचार मंच आणि आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील दलित मुक्ती विद्यापीठाच्या सहकार्याने चेन्नईमधील गुरुकुल महाविद्यालयाने ही संमेलने प्रायोजित केली होती.
सन १९९३ मध्ये जालना येथे `आपण'कार सत्यवान नामदेव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन भरले. लोणावळ्यात तिसरे संमेलन भरण्याआधीच या संमेलनाचे अध्यक्ष कवी विश्वासकुमार उर्फ संपत विश्वास गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे हे संमेलन अध्यक्षाविना पार पडले. चौथे ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनानंतर २३ सप्टेंबर १९९५ रोजी रेव्ह. निर्मळ यांचे निधन झाले.
पाचवे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन पुण्यात बिशप प्रदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली २००१ साली पार पडले. सहावे संमेलन नाशिक येथे ८ आणि ९ मे २००४ रोजी पार पडले. रेव्ह. सुभाष चांदोरीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नागपुरला झालेल्या सातव्या संमेलनाचे गिल्बर्ट लोंढे अध्यक्ष होते तर लातुर जिल्हात उदगीरच्या आठव्या संमेलनाचे वसंत म्हस्के अध्यक्ष होते. श्रीरामपुरच्या २०१४ सालच्या नवव्या आणि २०१८च्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अनुक्रमे अनुपमा डोंगरे जोशी आणि फादर ज्यो गायकवाड यांनीं भुषवले.
चेन्नईमधील गुरुकुल ईश्वरविज्ञान महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या दलित ईश्वरविज्ञान विभागाचे अरविंद निर्मळ प्रमुख होते. सन १९८० मध्ये मंडळ आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर एक वर्षानंतर दक्षिण भारतात वेल्लोर येथे ख्रिश्चन दलित लिबरेशन मुव्हमेंट सुरु झाली. ख्रिस्ती दलितांची ही चळवळ महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय निर्मळ याना दिले जाते. निर्मळ यांच्या निधनानंतर ही चळवळ काही काळ क्षीण झाली होती. प्रा. देवदत्त हुसळे, सुभाष चांदोरीकर आणि डॉ. गिल्बर्ट लोंढे यांनी या चळवळीला पुन्हा संजीवनी प्राप्त करून दिली.
विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजात चालू असलेल्या आरक्षणासाठीच्या चळवळीची वा या विषयाची साधी दाखलसुद्धा या काळात झालेल्या बहुतांश मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी घेतलेली नाही. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांची परंपरा नाशिक येथे १९२७ साली झालेल्या संमेलनापासून सुरु होते. अर्थात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्यातून वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतूनही बहुजन समाजाच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पडतेच असे नाही. तसाच प्रकार येथेही घडला होता. सन १९२७ पासून २०२२ पर्यंत एकूण सहवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने पार पडली आहेत.
या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
आरक्षणाच्या या महत्वाच्या मुद्द्यावर ख्रिस्ती समाजाच्या या प्रमुख व्यासपीठावर दलित ख्रिश्चनांच्या खास समस्यांवर चर्चा झाली नाही. याचे दुसरे कारण म्हणजे या समाजातील आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेल्या समाजघटकाचा बराच काळ दलित ख्रिश्चनांना आरक्षण देण्यास ठाम विरोध होता. या परिस्थितीत आज फार मोठा बदल झाला आहे. असेही म्हणता येणार नाही. मुख्य म्हणजे या प्रगत घटकास आरक्षणाच्या कुबड्यांची आता गरज नाही. या लोकांची संख्या अगदी मूठभर असली तरी शिक्षित असल्याने ह्या प्रश्नाबाबत केवळ तेच पुढाकार घेऊ शकतात. त्यांचाच या सवलतीस तत्वतः विरोध असल्याने वा या बाबत ते निरुत्साही असल्याने बहुसंख्य ख्रिस्ती समाजाचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे शीतपेटीतच राहिला आहे.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आरक्षणाच्या हक्काचे पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांनी जोरदार समर्थन केले. बहुसंख्य मराठी ख्रिस्ती समाज दलित असून आरक्षण वगैरे सवलतींवर त्यांचा हक्क आहे असे त्यांनी म्हटले. ख्रिस्ती समाजावर झालेल्या अन्यायासंदर्भात ते म्हणतात :
खेड्यापाड्यातील लाखो ख्रिस्ती दलित असून साक्षरावस्थेत पोहोचलेले नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून त्यांना भेटलेच नाहीत. पूर्वी सरकारी सवलती, आरक्षण केवळ हिंदू धर्मातील दलितांनाच मिळत असत. नंतर शीख धर्मात गेलेल्या दलितांना या सवलती खुल्या झाल्या. परवा त्या नवबौद्धांनाही देण्यात आल्या. परंतु धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिस्ती दलितांना या सवलती अजूनही मिळत नाही. आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना,'' अशी ख्रिस्ती दलितांची अवस्था आहे असे निर्मळ यांनी आपल्या या भाषणात पुढे म्हटले आहे.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची विद्रोही, आक्रमक भूमिका
पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांचे भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण तितकेच विद्रोही विचार अगदी ठामपणे मांडणारे आहेत. खरी सामाजिक बांधिलकी उराशी बाळगणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणावे, पहिल्या मराठी ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करावे. पंधरा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आम्ही वाट चुकलो आहोत, आता नवी वाट तुडवायला हवी. मराठी ख्रिस्ती साहित्याला नवी दिशा द्यायला हवी. आमच्या मूक-बधिर समाजाला लिहिते, वाचते, बोलते व ऐकते करायला हवे, असे त्यांनी म्हटले होते.
आपण कोणत्या अर्थाने वाट चुकलो हे सांगताना अरविंद निर्मळ पुण्यातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या उदघाटक शांता शेळके यांच्या भाषणाचा संदर्भ देतात.
पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना मराठी ख्रिस्ती साहित्य परंपरेचे विश्लेषण करताना शांताबाई शेळके म्हणाल्या होत्या ``फादर स्टीफन्सची पुराण ही संकल्पनाच हिंदू होती. साहित्यातील ही समन्वयाची भूमिका बाबा पदमनजी, रेव्ह. ना. वा टिळक, लक्ष्मीबाई आणि दे. ना. टिळक यांनीही पुढे चालू ठेवली. त्यामुळे मराठी माणसांमध्ये आणि मराठी साहित्यामध्ये त्यांना प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे.''
या संदर्भात निर्मळ म्हणतात कि वर उलखलेली सर्व मंडळी म्हणजे सवर्ण धर्मांतरित ख्रिस्ती. त्यांना ख्रिस्ती धर्मात वैदिक धर्माची पूर्ती झाल्याचेही वाटले असेल. म्हणून त्यांनी ही समनव्याची भूमिका चालू ठेवली. आम्ही दलितांनी मात्र ख्रिस्ती धर्म पत्करला तो चातुर्वर्णाधिष्ठित हिंदू धर्माला पर्याय म्हणून. त्याचेशी समन्वय साधायला म्हणून नव्हे समन्वयाकडून संघर्षाकडे अशी वाटचाल आम्ही करायला हवी. याचा अर्थ असा नाही कि आम्हाला समेट नको आहे. समन्वय तडजोडीवर आधारित असतो परंतु समेटाला न्याय अभिप्रेत असतो.
संघर्षातून न्याय मिळवून मग आम्ही समेटाकडे वळू. समन्वय साधणाऱ्या सवर्ण ख्रिस्ती साहित्यिकांना मराठी साहित्यामध्ये प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळालेले आहे. परंतु संघर्षाची वाट तुडविणारे सूर्यवंशी मात्र मराठी साहित्यात उपेक्षितच राहतात, हेदेखील येथे लक्षात घेतले पहिजे'' असे निर्मळ यांनी ठासून सांगितले आहे.
``ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करून त्या धर्माच्या नावाने जगणाऱ्या माणसांच्या जीवनाचं दर्शन घडवणारं, ते जीवन प्रतिबिबित करणारं साहित्य ते ख्रिस्ती साहित्य'' अशी नवी व्याख्या निर्मळ यांनी केली आहे.
ही व्याख्या स्वीकारली तर महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्म जगणारी बहुसंख्य माणसं दलित अस्मितेची, दलित मानसिकतेची, दलित जाणिवा उराशी बाळगणारी अशी त्रस्त, ग्रस्त माणसं आहेत, हेही आमच्या लक्षात येईल. त्यांच्या व्यथावेदना, त्यांची सुखदुःख, त्यांची तडफड, त्यांचा विद्रोह आणि त्यांचा नकार मग आमच्या साहित्यातून साकार होईल आणि आमच्या साहित्याला जिवंतपणा येईल. आमचे साहित्य मग विद्रोहाची आग ओकू लागेल. ते विषमतेविरुद्ध बंद पुकारील. मग ही विषमता आणि अन्याय स्वसमाजातील असली तरीही आमची लेखणी गय करणार नाही'' असे निर्मळ म्हणतात.
या नव्या वाटेवरील आणखी एक पाऊल म्हणजे आमच्या इतर दलित बांधवांशी आणि दलित साहित्याशी संबंध जोडणे, असे निर्मळ म्हणतात. इतर दलितांशी नाते जुळवून आम्ही एक भारतव्यापी दलित साहित्यिक चळवळ निर्माण केली पाहिजे. निदान महाराष्ट्रापासून आम्ही ही सुरुवात करायला हवी. आमच्या धर्मप्रेरणा वेगवेगळ्या असतील, आहेत. त्या कुणी कुणावर लढायला नकोत. परंतु दलितत्व हे आमचं सामान नातं आहे आणि विषमता हा आमचा समान वैरी आहे.
``आमच्या जालन्यात ख्रिस्तजयंतीच्या वेळी मोठी धामधूम असते. ख्रिस्तजयंतीच्या पूर्वसंध्येला कॅरोल राउंड निघतात. ख्रिस्तजन्माची स्तुतिगीते गेली जातात.
अशीच एक ख्रिस्तजयंती मी माझ्या सासूबाईंच्या येथे होतो. बाहेर मुलांचं एक टोळकं मध्यरात्री आलं, ते गाऊ लागले.
``उघडा हो दार आता / कुठवरी झोप घेता /
अंगात एक बंडी / वाजते फार थंडी /
नंतर' गद्यात ``आंटी उघडा ना आता दार अन द्या आम्हाला थोडीशी चिल्लर'. ' या गीताचा विषय ख्रिस्तजन्म नाहीच मुळी. पण माझ्या समाजाचं वास्तव त्यात उघड पडलं आहे.
``अंगात एक बंडी वाजते फार थंडी'' हा आहे माझा समाज, उघडा नागडा, थंडीत कुडकुडणारा अंगात उष्णता नाही म्हणून चहा प्यायला रुपयांऐवजी चिल्लर मागणारा. अंगात थंडी घालून ख्रिस्तजयंतीला थंडीने कुडकुडणाऱ्या या समाजाच्या व्यथावेदना माझ्या साहित्यात उतरल्या पाहिजेत याला म्हणतात सामाजिक बांधिलकी .दलित लेखक कवी हे आमचे खरे स्वजन: ''असं निर्मळ म्हणतात
`आपण'कार सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांनी १९७२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ख्रिस्ती समाज इतर दलित, अल्पसंख्य समाजाहून वेगळा नाही,या इतर समाजघटकांबरोबर राहून त्यांच्यासह झगडून ख्रिस्ती लोकांनी आपल्या हितसंबंधांचे रक्षण केले पाहिजे असा विचार मांडला होता.
जालना येथे १४ मे १९९३ रोजी पार पडलेल्या दुसऱ्या ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यवंशी यांनी दलित लेखक कवी हेच आमचे खरे स्वजन आहेत असे स्पष्ट केले.
आपल्या भाषणात सूर्यवंशी म्हणतात ``हे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन आहे पण हा सवतासुभा नाही. ख्रिस्ती लेखक म्हणून इतर दलित लेखकांवेगळे आम्ही स्वतःला मनात नाही. दलित हा धर्म नाही कि जात नाही . दलित ही चिरडल्या, भरडल्या गेलेल्या व जात असलेल्या जित्या जागत्या माणसाची अगतिक बनवून सोडणारी अवस्था आहे. ती गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून बाहेर पडा हा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि दलित मुक्ती लढा सुरु झाला. तो आमचा लढा आहे आणि त्या लढ्यात उतरलेला प्रत्येक लेखक, कवी, पत्रकार, वक्ता आमचा भाऊ आहे, असे सूर्यवंशींनी यावेळी जाहीर केले.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात ख्रिस्ती दलित लेखककवींच्या लिखाणाचा मागोवा घ्यायला हवा. इतर समाजी दलित लेखकांची आणि आपली चूल वेगळी नाही हे संमेलन हा विचार पुढे ठेवण्यास बोलावण्यास आले आहे. स्वतःभोवती भिंतीही उभारू नयेत आणि ब्राह्मणी शैलीचे साहित्य लिहीत बसण्याचा व्यर्थ आटापिटाही करू नये. `विशाल प्रवाह' ही खोटी हूल आहे. या देशात प्रस्थापित म्हटले जातात त्यापेक्षा दलितांची संख्या अधिक आहे. विशाल प्रवाह आमचा आहे, त्यांचा नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यास सर्व दलित लेखकांनी धर्मभेद या तथाकथित जातीभेद विसरून एकत्र आले पाहिजे असे आवाहन यावेळी सूर्यवंशींनी केले.''
दलित ख्रिस्ती समाजाने आपल्या सभा आणि शिबिरांत इतर समाजी दलित नेते आणि साहित्यिकांना बोलावून त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. यामध्ये बाबुराव बागुल, वामन निंबाळकर, विलास वाघ, उषा वाघ, नागपूरच्या कुमुद पावडे, औरंगाबादचे शांताराम पंदेरे, गोपाळ गुरु, डॉ लता मुरुणकर यांचा समावेश होता असे सांगून सूर्यवंशी म्हणतात कि ख्रिस्ती लेखकांबरोबरच बौद्ध, हिंदू, मुसलमान, शीख वगैरे समाजातील लेखकांनांही आम्ही वेळोवेळी बोलावतो याचे कारण म्हणजे ते आणि आम्ही वेगळे नाही, ही भावना आहे.
सूर्यवंशी यांनी 'जय हिंद ! जय भीम ! जय ख्रिस्त !' असे अभिवादन करुन आपले भाषण संपविले . .
सन १९७५च्या मुंबई येथील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष फादर डॉमिनीक ऑब्रिओ (नंतरचे औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप ) यांनी या व्यासपीठावरून सर्वप्रथम ख्रिस्ती दलितांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला.
''महाराष्ट्राच्या खेडोपाडी विखुरलेले आमचे असंख्य ख्रिस्ती बांधव केवळ ख्रिस्ती असल्यामुळे हलाखीचे व अपमानित जीवन जगात आहेत. कारण धर्मांतरामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती मुळात बदललेली नाही, याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे व इतरांना मिळणाऱ्या अल्पस्वल्प सवलती त्यांना मिळवून देण्यासाठी ख्रिस्ती लेखकांनीं पुढे सरसावले पाहिजे. ''
नाशिक येथे २००० साली भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष सेसिलीया कार्व्हालो यांनी `दलित ख्रिस्ती' या संकल्पनेविषयी सहाभूतीची भूमिका घेतली होती.
सेसिलीया कार्व्हालो म्हणतात : एक उपेक्षित घटक म्हणजे दलित ख्रिस्ती. समाज आणि साहित्य या दोन्हींनी या घटकाची फारशी दाखल घेतलेली नाही. वास्तविक ख्रिस्ती धर्म कोणताही जातिभेदभाव मानत नाही ही फारच चांगली गोष्ट आहे. मात्र भारतीय मातीत आणि रक्तात जातिव्यवस्था भिनलेली असल्याने आणि ख्रिस्ती समाज या मातीतला असल्याने व्यवहारात मात्र जातिभेद मानला जातो. तळागाळातील लोकांनी ज्या कळाझळा सोसलेल्या आहेत ते त्या ख्रिस्ती दलितांच्या 'गावा' आणि 'वंशा' गेल्याशिवाय कळणार नाही .''
( ' दलित ख्रिश्चनांचा आरक्षणासाठी लढा '' लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन २००६) मधील एक प्रकरण )
Camil Parkhe
No comments:
Post a Comment