Camil Bulcke
श्रीरामपूरात आमचे घर मध्यवर्ती भागांत बाजारतळापाशी आहे. शहराची विभागणी रेल्वेच्या अलीकडे आणि पलीकडे अशी होते. दर रविवारी सकाळी आमच्या घरातली सर्व मंडळी देवळाला जाण्यासाठी रेल्वे ओलांडून जर्मन दवाखान्यापाशी म्हणजे संत लूक दवाखान्याकडे जायची.
यानिमित्ताने दर वेळेस आजही बेलापूर रेल्वे स्टेशन असे नाव असलेल्या (`बेलापूर स्टेशन: श्रीरामपूरके लिए यहा उतरीये') रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जाणे व्हायचे.
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून वापरली जावे यासाठी काही महनीय व्यक्तींची वाक्ये त्या फलकावर लिहिली होती. महात्मा गांधी, आचार्य काका कालेलकर वगैरेंची वाक्ये त्यात होती.
यापैकी आचार्य काका कालेलकर यांचा पुणे जिल्ह्यातील आणि पुरंदर तालुक्यातील नीरा या गावाविषयीचा एक धडा आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता.
त्या फलकावर असलेल्या एका नावाने मात्र मला अचंबित केले होते.
ते नाव होते फादर कामिल बुल्के !
तोपर्यंत माझ्यासारखे `कामिल' हे नाव असलेली इतर कुठलीही व्यक्ती मी पाहिली नव्हती आणि ऐकली नव्हती.
कोण असतील हे फादर कामिल बुल्के असा प्रश्न मनात यायचा. गोव्यात गेल्यानंतर मात्र कामिल नावाच्या कितीतरी व्यक्ती मला भेटल्या.
नंतर फादर कामिल बुल्के हे नाव मी विसरून गेलो. हिंदी राष्ट्रभाषासंबंधी काहीही विषय निघाला कि मात्र हे नाव लगेचच स्मृतीपटलावर लगेच वर यायचे, अजूनही येत असते.
नंतर मी स्वतःच जेसुईट फादर होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात गेलो, तेथेच अनेक वर्षे स्थिरावलो. जेसुईट असलेल्या आणि तेव्हाही हयात असलेल्या या फादर कामिल बुल्केची मात्र कधीच कुठे, पुस्तकांतसुद्धा गाठभेट झाली नाही.
काही वर्षांपूर्वी `मी ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या विषयावर इंग्रजी आणि मराठी पुस्तके लिहिली, तेव्हा अनेक वर्षे ओळखीचे असूनही गायब झालेल्या या फादर कामिल बुल्के यांची अचानक भेट झाली.
पण तोपर्यंत मी स्वतः संन्याशी जेसुईट होण्याचा विचार सोडून गृहस्थाश्रम स्विकारला होता.
मुळचे बेल्जीयम असलेले फादर कामिल बुल्के हे त्यांच्या हिंदी-इंग्रजी डिक्शनरीसाठी प्रसिद्ध आहेत, संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद त्यानीं केला.
संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पंडित असलेल्या या प्राच्यविद्या तज्ज्ञाचा भारत सरकारने पद्मभूषण 'किताब देऊन मानसन्मान केला आहे. राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांनी हा किताब फादर बुल्के यांना प्रदान केला.
त्याशिवाय भारत पारतंत्र्यात असताना हिंदी भाषेतून हिंदीतून डॉक्टरेट करणारे ते पहिलेच संशोधक.
आणि अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट करण्यासाठी फादर कामिल बुल्के यांनीं प्रबंधासाठी विषय निवडला होता " राम कथा : उत्पत्ती और विकास'
ख्रिस्ती धर्मगुरू असलेले फादर कामिल बुल्के हे आजही राम कथा, तुलसी रामायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या राम चरीत मानस या विषयांवरचे तज्ज्ञ समजले जातात.
माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या इंग्रजी आणि मराठी पुस्तकांत फादर बुल्के यांच्यावर एक प्रकरण आहे.
रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंचा हा थोडक्यात परिचय
No comments:
Post a Comment