सिडने पॉइटिए "Oh, It's red blood.... !!''
पणजीला मिरामार येथे जेसुईट प्री-नोव्हिशिएटमध्ये असताना आम्हा हायर सेकंडरी आणि कॉलेज विद्यार्थ्यांना विविध शाखांतील आणि कलांमधील धड दिले जायचे. जेसुईट धर्मगुरुचे फॉर्मेशन पिरियड धर्मप्रांतीय ( सेक्युलर किंवा डायोसिसन) धर्मगुरुंपेक्षा अधिक वर्षांचे - बारा तेरा वर्षांचे - आणि अधिक खडसर असते. त्यामुळे इथे गळतीचे प्रमाणही अधिक.
तर १९७७ ला आम्हा pre-novice मुलांना लॅटिन भाषेची तोंडओळख करुन दिली गेली, त्याचप्रमाणे वक्तृत्वाचेही धडे गिरवावे लागले. आणि एक गंमतीदार आणि रंजक प्रशिक्षण होते, ते म्हणजे फिल्म ऍप्रिसिएशन किंवा चित्रपटांचा आस्वाद घेणे. हे सर्व प्रशिक्षण म्हणजे धर्मगुरु होऊ इच्छिणाऱ्या आम्हा तरुणांच्या व्यक्तीमत्व विकासाचा भाग होता हे नंतर कळाले.
या फिल्म ऍप्रिसिएशनचा एक भाग म्हणून पणजीच्या कुठल्याशा थिएटरमध्ये पहिल्यांदा चित्रपट पहिला तो होता बेनहर.
रोमन साम्राज्याशी संबंधित असलेल्या या चित्रपटात येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी असलेला भाग अगदी शेवटी आणि काही मिनिटांचा आहे. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे येशूचा चेहेरासुद्धा या चित्रपटात दाखवला नव्हता. या चित्रपटातील जीवघेणी रथस्पर्धा या चित्रपटाचा कळस म्हणायला हवा.
या चित्रपटाचा संध्याकाळचा शो पाहिल्यानंतर रात्री जेवणानंतर आम्ही सर्व प्री-नोव्हिसेस आणि आमचे प्री-नोव्हिस मास्टर फादर इनोसंट पिंटो या चित्रपटाविषयी बोलायला जमलो. या चित्रपटात आपल्याला काय आवडले, काय नाही आवडले, चित्रपटाची कथा, अभिनय, त्रुटी, फोटोग्राफी, शेवट कसा होता, कसा असायला पाहिजे होता, याविषयीचे आपले स्वतःचे निरीक्षण प्रत्येकाने मांडायचे होते.
खरे पाहिले तर मी हा चित्रपट अगदी समरसून पाहिला होता, त्यामुळे ह्या गोष्टींबाबत मी काही विचारच केला नव्हता. बाकीच्या बहुतेक मुलांची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. तरीसुद्धा एकेक जण बोलत गेला तसतसे इतरांचेही तोंड उघडत गेले.
अर्ध्याएक तासांच्या चर्चेनंतर फादर इनो यांनी चित्रपटाचा कसा आस्वाद घ्यायचा, याचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व जण पुन्हा बेनहर चित्रपट पाहायला गेलो आणि या चित्रपटाचा वेगळ्या दृष्टिकोनांतून आस्वाद घेतला. त्या रात्री अर्थातच पुन्हा एकदा त्या फिल्म ऍप्रिसिएशनवर चर्चा होती. मात्र यावेळी अनेकांना खूपखूप काही बोलायचे होते.
फादर इनो यावेळी फक्त ऐकत होते. त्यानंतर या फिल्म अप्रेसिसेशनचा भाग म्हणून याकाळात पणजीच्या तीन थिएटरांत खूपखूप इंग्रजी चित्रपट पाहिले.
रॉबिन्सन क्रुसो, टेन कमांडमेंट्स, ब्रूस ली वगैरे त्यापैकी काही चित्रपट आजही आठवतात. हा बेनहर चित्रपट फिल्म उद्योगातील एक मैलाचा दगड आहेत. टेन कमांडमेंटसुद्धा.
अकिरा कुरासोवा (Akira Kurosawa या जपानी चित्रपट दिग्दर्शकाचे कितीतरी चित्रपट या काळात पाहिले.
यापैकी To Sir With Love चित्रपटात अगदी सुरुवातीला दिलेले हे वाक्य आणि त्यावेळची चित्रपटातील घटना आणि मुख्य अभिनेत्यांचा अभिनय आजही डोळ्यांसमोर आहे.
To Sir With Love या चित्रपटातल्या (१९६७) तरुण काळ्या शिक्षकाला हाताच्या तळव्यावर जखम होते. या चित्रपटातील छोटीछोटी गोऱ्या वर्णाची विद्यार्थी मुलेमुली या काळ्या शिक्षकाचा तिरस्कार करत असतात. या काळया शिक्षकाच्या हाताच्या तळव्यातील जखमेतील भळभळते रक्त पाहून एक गोरा विद्यार्थी थक्क होतो.
आपले शिक्षक एक काळा माणूस असला तरी त्याचे रक्त आपल्यासारखेच लाल रंगाचे आहे हे पाहून बसलेला धक्का तो या '' Oh, It's red blood'' उत्फुर्त वाक्यातून व्यक्त करतो.
आणि या घटनेपासून या गोऱ्या मुलांमुलींचा त्यांच्या या काळ्या शिक्षकांविषयीचा दृष्टीकोनच बदलतो, त्यांच्या वागणुकीतसुद्धा सकारात्मक बदल होतो.
सिडने पॉइटिए (Sidney Poitier ) या काळ्या अभिनेत्याने या चित्रपटात या तरुण शिक्षकाची भूमिका केली आहे.
काल ७ जानेवारीला या गुणी अभिनेत्याचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले तेव्हा या अभिनेत्याने एक कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून चित्रपटसृष्टीत कसा इतिहास घडवला हे आठवले.
समाजातील निग्रो किंवा कृष्णवर्णीय या दुर्लक्षित, उपेक्षित घटकांतील लोकांना त्याकाळात खूप तुच्छतेची वागणूक मिळायची. याकाळात सिडने यांचे व्यक्तीमत्व आणि कामगिरी या समाजघटकांना खूपच आश्वासक आणि अभिमानस्पद ठरली.
ऑस्कर हे फिल्मजगतातले सर्वोच्च पारितोषक मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णिय अभिनेते. `लिलिज ऑफ द फिल्ड' या चित्रपटासाठी त्यांना १९६३ साली हा पुरस्कार मिळाला. नो वे आऊट, इन द हिट ऑफ द नाईट', 'गेस व्हू इज कमिंग टू डिनर' वगैरे चित्रपटांतील त्यांच्या भुमिका खूप गाजल्या.
उपेक्षित आणि तिरस्कारणीय असलेल्या समजघटकातील एक निग्रो व्यक्ती इंग्रजी मुख्य प्रवाहातील सिनेमातील प्रमुख भुमिका, नायकाचे पात्र, सकारात्मक भुमिका रंगवतो आहे हे खूप महत्त्वाचे होते.
आपल्याकडे असे व्हायला खूप वेळ लागला, किंबहुना अजूनही तसे झालेले नाही..
ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी १९७४ साली `सर' ही पदवी देऊन सिडने यांचा सन्मान केला.
To Sir Sidney With Love...... !!
^^^
(संस्कृतीची विविध रुपे - कामिल पारखे (चेतक बुक्स २०२२) मधील एक प्रकरण )
No comments:
Post a Comment