भारतात मुस्लीम मुलींसाठी पहिली आधुनिक
शाळा सुरु करणारे वझीर बेग
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८४०च्या दशकाच्या मध्यात पुण्यात केवळ मुस्लीम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली होती आणि या शाळेतील शिक्षक होते वझीर बेग.
वझीर बेग यांचे
संपूर्ण शिक्षण पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या जेम्स मिचेल यांच्या शाळांत झाले होते.
जेम्स
मिचेल आणि मिसेस मिचेल या मिशनरी दाम्पत्याचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला. बेग यांचा ख्रिस्ती धर्माकडे १८४२ पासून ओढा होता,
मात्र उघडपणे त्यांनी आपली धर्मश्रद्धा व्यक्त केली नाही. आपल्या धर्मांतराचा
आपल्या मुस्लीम कुटुंबावर काय विपरीत परिणाम होईल या शंकेने त्यांनी आपली धर्मश्रद्धा
लगेचच प्रकट केली नाही. मिशनरी शाळांत शिक्षण
पूर्ण झाल्यानंतर वझीर बेग याच शाळांत ते शिक्षक बनले.
दरम्यान १८४५ च्या काळात पुणे स्कॉटिश मिशनच्या शाळांतले सर्वांत महत्त्वाचे स्थानिक शिक्षक असलेल्या वझीर बेग यांना धारवाड गव्हर्नमेंट स्कुलचे मुख्याध्यापक पद देऊ करण्यात आले होते. यासाठी त्यांना दरमहा शंभर रुपये पगार देण्यात येणार होता. त्याकाळात इतका भरघोस पगार दिला जात असतानासुद्धा वझीर बेग यांनीं मात्र हे पद घेण्यास नकार दिला. (रॉबर्ट हंटर पान २५९)
दरमहा शंभर रुपये पगार असलेली सरकारी नोकरी नाकारुन वझीर बेग यांनीं मोठा आर्थिक त्याग करण्यामागचे
कारण आणि मिशनच्या कार्याबाबत त्यांची आवड ओळखणे काही अवघड नव्हते. लवकरच वझीर बेग यांनीं आपला बाप्तिस्मा करण्यासाठी अर्ज केला.
त्याशिवाय शुक्रवारी १८ सप्टेंबर १८४६ रोजी त्यांनीं मुंबईत असलेल्या आपल्या वडिलांना एक पत्र लिहून याबाबत कल्पना दिली.
वझीर बेग यांचे वडील एच. एम. २२ रेजिमेंटमध्ये मेसमन म्हणून नोकरीला होते. बाप्तिस्मा घेण्याचा आपला बेग यांनी इरादा व्यक्त केल्यानंतर त्यांच्याच सहमतीने या निर्णय स्कॉटिश मिशनच्या शाळांत जाहीर करण्यात आला. साहजिकच पुणे शहरातसुद्धा ही बातमी वेगाने पसरली. वझीर बेग यांचे मित्र आणि नातेवाईक स्कॉटिश मिशनच्या कुंपणात येऊन वझीर बेग यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागले.
शब्बाथच्या दिवशी वझीर बेग यांचा बाप्तिस्मा होणार होता. त्यादिवशी अनेक लोक मिशन हाऊसमध्ये जमले, मुंबईतून तातडीने पुण्याला आलेले वझीर बेग यांचे वडीलसुद्धा तेथे हजर होते. वझीर बेग यांना त्यांच्या घरी काही काळासाठी येण्यासाठी आग्रह करण्यात आला. वझीर बेग एकदा त्यांच्या घरी आले कि त्यांना तेथून परत स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये पाठवले जाईल याबाद्दल शंकाच होती. आणि ते खरेच ठरले.
अखेरीस याबाबत मॅजिस्ट्रेटकडून खातरजमा करण्यात आली आणि वझीर बेग यांना त्यांच्या घरच्या लोकांच्या, नातेवाईकांच्या आणि इतरांच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. वझीर बेग यांचा गुरुवारी २४ सप्टेंबर १८४६ रोजी बाप्तिस्मा झाला. यावेळी वझीर बेग यांचे वय २२ वर्षे होते.
या प्रसंगी वझीर बेग यांच्या वडलांचे आपल्या मुलांबाबतचे वर्तन अत्यंत उल्लेखनीय असेच होते. त्य्यांच्या चिरंजिवाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी त्याचे घरात असलेले सर्व कपडे त्याच्याबरोबर दिले. काही काळापूर्वी त्यानी वझीर यांना एक महागडे सोन्याचे घड्याळ दिले होते, ते घड्याळसुद्धा आणि एक सोन्याची साखळी त्यांनी आपल्या मुलाला दिली. वझीर बेग यांच्याप्रमाणेच त्यांना इतर नातेवाईकांचे आणि मुस्लीम मित्रांची वागणूक होती. त्यानंतर वझीर बेग दररोज स्कॉटिश शाळांत शिकवण्यासाठी घरातून बाहेर पडत तेव्हा त्यांच्या जाण्याच्या आणि परत येण्याच्या वेळी नंतर कुणीही त्यांना त्रास दिला नाही.
स्कॉटिश मिशनच्या शाळेत बेग हे एक उत्तम
शिक्षक मानले जात असत. ख्रिस्ती झाल्यानंतर
स्कॉटिश मिशनच्या आवारातच वझीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक स्वतंत्र
शाळा सुरु केली होती.
बाळा गोपाळ जोशी हा अनाथ असलेला ब्राह्मण तरुण जेम्स मिचेल यांच्या मिशन शाळेत तीन वर्षे शिकत होता. जोतिबा फुले यांचा तोसुद्धा सहाद्यायी. मुंबईहून जॉन मरे मिचेल पुण्यात आले तेव्हा १८४६च्या ऑकटोबरात तो त्यांच्यासह मुंबईला शिकण्यासाठी गेला. मरे मिचेल यांच्या सहवासात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. मात्र बाप्तिस्मा घेण्यासाठी बाळा गोपाळ जोशी यांना पुण्यात जेम्स मिचेल यांच्याकडे परत पाठवण्यात आले.
याचे कारण म्हणजे बाळा यांच्या ख्रिस्ती होण्याच्या उदाहरणाचा पुण्यातल्या त्यांच्या संबंधित विद्यार्थी आणि इतरांवर प्रभाव पडेल अशी मिशनरींना आशा वाटत होती. त्याशिवाय मुंबईत आणखी एक ब्राह्मण विद्यार्थी ख्रिस्ती झाला असता तर या बातमीने तेथे मोठी खळबळ माजणार होती आणि पुन्हा एकदा तिथल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला असता.
मुंबईतल्या जॉन विल्सन आणि रॉबर्ट विल्सन प्रभुतींनी याबाबत आधीच एका प्रकरणात आपले तोंड भाजून घेतले होते. मुंबईत बाप्तिस्मा झाल्यास काही वर्षांपूर्वी म्हणजे १८३९ साली पारशी विद्यार्थ्यांच्या बाप्तिस्म्यानंतर प्रचंड क्षोम निर्माण होऊन तिथल्या शाळा अगदी ओस पडल्या होत्या त्याची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक होते. मुंबईतल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांत त्याकाळात पुन्हा विद्यार्थी यायला लागले होते आणि त्यांच्यामध्ये एका पारशी विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेतील विद्यार्थी बाळा गोपाळ जोशी याने आणि त्या दिवसांत कोर्ट मार्शल होऊन तुरुंगात असलेल्या रुस्तमजी नौरोजी या पारशी तरुणाने २७ डिसेंबर १८४६ रोजी बाप्तिस्मा घेतला तेव्हा पुण्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती. बाळा गोपाळ जोशी यांनी पुण्यातल्या मिशनरी शाळेतले शिक्षक जेम्स मिचेल आणि वझीर बेग यांच्या वर्गांत शिक्षण घेतले होते.
वझीर बेग यांच्या बाप्तिस्म्याच्यावेळी
आणि काही काळानंतर बाळा गोपाळ जोशी यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्कॉटिश मिशन हाऊसपाशी
उडालेला गोंधळ त्यावेळी जेम्स मिचेल यांच्या मिशनरी शाळेत विद्यार्थी असलेल्या जोतिबा
फुले यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून अनुभवला असणार.
पुण्यातील
स्कॉटिश मिशनच्या अधिपत्याखालील स्थानिक चर्चमध्ये नेतेपदासाठी निवडणूक झाली तेव्हा कॅसिडी
नावाच्या इंडो-ब्रिटन व्यक्तीची आणि वझीर बेग तसेच विठोबा
या स्थानिक ख्रिस्ती व्यक्तींची निवड करण्यात आली होती. या स्थानिक चर्चमध्ये
तेव्हा २८
जण फुल कम्युनियनमध्ये होते. कॅसिडी
हे पुण्यातल्या बाजार
स्कुलमध्ये शिक्षक होते तर वझीर बेग
हे शहरातल्या शाळेत शिक्षक होते. यापैकी बाजार शाळॆत १८४९ च्या जुलैत ९० विद्यार्थी होते
तर शहरातल्या बेग यांच्या शाळेत ५० विद्यार्थी होते. (रॉबर्ट हंटर पण २६२)
भिल्ल जमातीच्या एका सोळा ते अठरा वय असणाऱ्या एका प्रमुखाला पुण्यात शिक्षणासाठी सरकारी कॉलेजात आणण्यात आले होते. आसपासच्या अनेक गावांतून मिळणारा महसूल त्याला एकदोन वर्षानंतर वारसाहक्काने त्याच्या मालकीचा होणार होता. या भिल्ल जमातप्रमुखाबरोबर त्याचा वंशपरंपरागत कारभारी किंवा त्याच्या मालमत्तेचा व्यवस्थापकसुद्धा होता. पुण्यात या दोन्ही व्यक्ती वझीर बेग यांच्या निगरानीत ठेवल्या होत्या, त्यांना काय शिक्षण द्यायचे याबाबतचे स्वातंत्र्य बेग यांना देण्यात आले होते. बेग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्या दोघांवर इतका प्रभाव पडला होता कि ते दोघे बेग यांच्या दैनंदिन कौटुंबिक प्रार्थनेत सहभागी होत असत आणि कधीकधी चर्चला त्यांच्यासह जात असत.
या स्कॉटिश शाळांत वझीर बेग यांचे शिक्षण झालं होते त्याच जेम्स मिचेल यांच्या शाळांत आता बेग शिक्षक म्हणून कार्यरत होते. नंतर अशाचप्रकारे जोतिबा फुलेसुद्धा जेम्स मिचेल यांच्या शाळांत शिक्षक म्हणून काम करत होते. हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषांवर वझीर बेग यांचे प्रभुत्व होते. त्याशिवाय अरेबिक, तुर्की आणि इंग्रजी भाषा ते शिकले. पुण्यात ते नंतर लॅटिन आणि ग्रीक भाषासुद्धा शिकले. ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्य करण्याचे आपल्याला पाचारण आहे अशी त्यांची भावना होती.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या `सत्यशोधक' चित्रपटात जोतिबांचे शिक्षक म्हणून रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्यावर काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत.
जॉन टेरेन्स यांनी `स्टोरी ऑफ अवर मिशन्स : वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया’ या १९०२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिले आहे :
``स्कॉटिश मिशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्मातून ख्रिस्ती झालेल्या वझीर बेग यांनी काही काळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालू केली होती. त्याशिवाय डॉ. मरे मिचेल यांनी आपल्या शाळेत सत्तर मुलींना आणण्यास यश मिळवले होते. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे या शिक्षणासाठी एक छोटीशी रक्कम फी म्हणून सुद्धा आकारली जात असे.
त्यानंतर काहीं काळाने अशीच एक शाळा प्रखर विरोधाला तोंड देत एकदोन वर्षे चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या कार्यात सातत्य नव्हते, मिस स्मॉल यांची नेमणूक करण्यात आली तेव्हा समाजाच्या या घटकासाठी काहीच करण्यात येत नव्हते. ‘’.
वझीर बेग यांनी १८५३ साली ईशज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वझीर बेग यांना प्रवचनकार म्हणून १८५३च्या डिसेंबरात प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर २७ जानेवारी १८५४ रोजी त्यांनी पुण्यात मुस्लीम लोकांसाठी एक हिंदुस्थानी शाळा उघडली. या शाळेत सुमारे चाळीस मुलांनी प्रवेश घेतला. त्याकाळात मुस्लीम लोकांना शिक्षणाकडे आकर्षित करणे आणि त्याशिवाय हे शिक्षण ख्रिस्ती धर्माशी संबधित असले तर किती अवघड होते हे लक्षात घेता विद्यार्थ्यांची चाळीस ही संख्या खुपच होती.
वझीर बेग १८५४ साली स्कॉटलंडला गेले, तेथे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे त्यानीं ठरवले होते. या विद्यापीठाच्या कागदपत्रांत मात्र त्यांचे नाव दिसत नाही. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे सदस्यत्व त्यांना १८६१ साली मिळाले. मेलबर्न येथे आल्यानंतर स्थानिक प्रेस्बीटेरियन चर्चच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. पोर्ट अल्बर्ट येथे १८६४ साली धर्मगुरु म्हणून त्यांचा दीक्षाविधी झाला. सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे पौर्वात्य भाषा आणि साहित्य या विषयांवर अरेबिक ही मुख्य भाषा ठेवून व्याख्यातेपद निर्माण केले होते, त्या पदावर १८६६च्या डिसेंबर महिन्यात बेग यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पौवार्त्य संशोधनासाठी एक विभाग स्थापन झाला होता.
त्याशिवाय पौर्वात्य भाषांसाठी अनुवादक म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने बेग यांची नेमणूक केली, मात्र विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी हे व्याख्यातेपद काही काळच टिकले. नॉर्थ कॅरोलिनातील ग्रीनव्हिल येथील बॅप्टिस्ट कॉलेजने त्यांना १८६४साली मानद डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) पदवी प्रदान करुन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला.
वझीर बेग ऑस्ट्रेलियात प्रेस्बीटेरियन चर्चचे धर्मगुरू बनले. बेग यांच्या या आध्यात्मिक जीवनक्रमातील या घटनेचे जॉन टॉरेन्स या लेखकाने आपल्या पुस्तकात भारतातील त्याकाळच्या एका महत्त्वाच्या राजकीय घटनेशी तुलना केली आहे. एका भारतीय नेत्याची लंडनमधल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कायदा करण्यासाठी निवड झाली आहे असे या लेखकाने म्हटले आहे. ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय नागरीक (१८९२-९५) म्हणून निवड होणाऱ्या दादाभाई नौरोजी यांचा हा संदर्भ आहे हे उघड आहे.
क्विन्सलँड येथील प्रेस्बीटेरियन चर्चमध्ये १८६७ साली काही काळ धर्मगुरु म्हणून काम केल्यानंतर बेग चालमर्स चर्चचे प्रमुख होते. या पदाचा त्यांनीं १८८२ साली राजीनामा दिला. प्रेस्बीटेरियन चर्चच्या युतीचे ते खांदे समर्थक होते आणि चर्चच्या अनेक समित्यांवर त्यानीं काम केले. बेग यांनी लिहिलेल्या `मॅन्युअल ऑफ प्रेस्बीटेरियन प्रिन्सिपल’ चे सिडनी येथे १८७० साली प्रकाशन झाले. रोमन कॅथोलिक पंथाचे बेग कट्टर विरोधक होते. बेग यांचा विवाह मार्गारेट रॉबर्टसन स्मिथ यांच्याशी १२ मार्च १८७२ रोजी झाला होता आणि त्यांना दोन मुले होती.
ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाल्यानंतरसुद्धा रेव्हरंड वझीर बेग आपल्याला शिक्षण देणाऱ्या पुणे स्कॉटिश मिशनकेंद्राला विसरले नव्हते. तेथून त्यांनी पाच पौंडाची रक्कम आपल्या पुणे स्कॉटिश मिशनला देणगी म्हणून पाठवली होती यावरुन त्यांचा या मिशनकेंद्राप्रती कृतज्ञताभाव दिसून होतो.
रेव्हरंड वझीर बेग यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे ४ जानेवारी १८८५ रोजी निधन झाले आणि वेव्हर्ले कबरस्थानांत त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.
मुस्लीम समाजातील मुलींना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याच्या कार्यांत स्कॉटिश मिशनच्या वझीर बेग यांना यश आले नाही, तरी काही वर्षांनी स्कॉटिश मिशनच्याच मिशनरींना या कार्यांत अगदी भरीव यश मिळाले.
जोतिबा फुले यांचे एक प्रेरणास्थान असलेल्या,पुण्यातल्या संस्कृत कॉलेजचे म्हणजे आताच्या डेक्कन कॉलेजचे काही काळ प्राचार्य (व्हिझिटर) असलेल्या रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती. या शाळेस मुस्लीम मुलींचा नुसता चांगलाच प्रतिसाद लाभला नाही तर या शाळेची असलेली फी भरण्याससुद्धा मुलींचे पालक तयार होते.
भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणा बत असलेल्या
दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत
विस्तृत माहिती जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. ती अशी :
भारतातील मुस्लीम समाजातील काही समाजसुधारकांनीसुद्धा केवळ मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या, मात्र त्यासाठी खूप काळ जावा लागला होता. त्यादृष्टीने अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात वझीर बेग आणि जॉन मरे मिचेल यांची ही कामगिरी फार मोलाची असे म्हणावे लागेल.
भारतातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात रेव्हरंड वझीर बेग आणि रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी केलेले हे महत्त्वाचे योगदान कदाचित विस्मृतीत गेले असते. मात्र स्कॉटिश मिशनसंबंधीच्या दस्तऐवजांत आणि विविध पुस्तकांत मुस्लीम मुलींसाठी असलेल्या या शाळांबाबत उल्लेख आढळतो. त्यामुळे बेग आणि मरे मिचेल यांच्या या ऐतिहासिक कार्याची नोंद राहिली आहे.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment