गोपाळराव जोशी.. सिर्फ नाम ही काफी है..
अव्वल ब्रिटिश अमदानीचा इतिहास गोपाळराव जोशींच्या उल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही इतके त्यांचे महत्त्व किंवा उपद्रवमूल्य आहे.परदेशात जाऊन डॉकटर होण्याचे शिक्षण घेणाऱ्या डॉ आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून त्यांची एक ओळख आहे.
आपली पत्नी शिकावी, डॉकटर व्हावी म्हणून त्यांनी काय काय केले नाही ?
लोकमान्य टिळकांचे चरित्रकार न चिं केळकर, रमाबाई रानडे वगैरेंच्या पुस्तकांतून या गोपाळराव जोशींच्या कारवायांविषयी माहिती मिळते.
पुण्यातली ही एक अत्यंत वादग्रस्त वल्ली.
डोकयावरुन पाणी घेऊन बाप्तिस्मा स्विकारुन ख्रिस्ती होणार आणि मग धोतर आणि जानव्यासह रविवारी चर्चमध्ये हजेरी लावून धर्मांतराचा फोलपणा दाखवून देणारी ही व्यक्ती कशी असणार याबाबत फक्त कल्पना करणे शक्य आहे.
तर या गोपाळराव जोशींनी आपल्या बायलाईनसह ``पुणे वैभव'' या त्यांच्याइतक्याच वादग्रस्त नियतकालिकात एक वृत्तांत लिहिला आणि भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात एक प्रकरण लिहिले गेले.
त्या बायलाईनसह प्रसिद्ध झालेल्या बातमीने पुण्यातल्या भल्याभल्या लोकांना जेरीस आणले, यापैकी सर्वात मोठे नाव होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातले हे पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन.
निमित्त काय तर वेताळ पेठेतील म्हणजे आजच्या गुरुवार पेठेतील पंचहौद चर्चच्या एका कार्यक्रमात १४ ऑकटोबर १८९० रोजी काही लोकांनी चहापान केले, ख्रिस्ती लोकांच्या घरात बिस्किटे खाल्ली आणि धर्मद्रोही कृत्य केले.
गोपाळरावानी हे सर्वकाही घडवून आणले होते. Planned and executed.
“भरलेल्या जठरांत एकादा विषारी कण गेला म्हणजे जसे सगळे अन्न ढवळून निघते, तशी स्थिती पुणे-वैभवाच्या या अंकाने सगळ्या पुण्याची केली.'' इति न चिं केळकर
गोपाळरावांच्या त्या बातमीने अनेकांना कामाला लावले, खुद्द शंकराचार्याना या प्रकरणी चौकशीसाठी ग्रामण्य (आयोग) नेमावा लागला, आपल्यामागची ही पीडा संपावी म्हणून टिळकांना दोनदा प्रायश्चित घ्यावे लागले.
समाजातील सर्व लोकांचा म्हणजे जहाल, कर्मठ, सनातनी मंडळींची दांभिकता, ढोंगीपणा, आचारविचारातली विसंगती चव्हाट्यावर आणणे हा एकमेव उद्देश या स्टिंग ऑपरेशनमागे होता, तो बहुतांशी सफल झाला हे नंतर दिसून आले.
आजच्या पत्रकार दिनानिमित्त गोपाळराव जोशी यांना विसरता कामा नये.
त्यांच्यासारखे काम करण्याचे धाडस हल्ली कुठलाही पत्रकार करेल असे वाटत नाही.
Camil Parkhe, January 6, 2024
No comments:
Post a Comment