मिसेस मिचेल आणि रेव्हरंड जेम्स मिचेल.
मुलींसाठी आणि शुद्रांसाठी पहिली शाळा काढणारे एतद्देशीय दाम्पत्य सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दोघांचेही शिक्षक होते अनुक्रमे मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि त्यांचे पती रेव्हरंड जेम्स मिचेल.
महात्मा फुले स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत शिकले आणि मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून सावित्रीबाई प्रशिक्षित शिक्षिका बनल्या हे सर्वश्रुत आहे.
रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांच्यासह त्यांनी पुण्यात १८३० साली स्कॉटिश मिशन उभारले, स्टिव्हसन्स यांनी लगेचच मिशनरीपद सोडून ईस्ट इंडिया कंपनीचे चॅप्लेनपद स्वीकारले. जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल मात्र पुण्यात शैक्षणिक आणि मिशनकार्य करत राहिले.
आपले विद्यार्थी असलेल्या फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा सुरु करून भारतात मोठी सामाजिक क्रांती केल्याबद्दल जोतिबांचा शालजोडी देऊन झालेल्या जंगी सत्कारात निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचे सुख आणि भाग्य जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांना लाभले.
पुण्यात साडेतीन दशके कार्यरत राहून या देशातच महाबळेश्वर येथे रेव्हरंड जेम्स मिचेल यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी आपला देह ठेवला.
जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांच्याविषयी खूप काही एकोणिसाव्या शतकातच लिहिले गेले आहे. स्कॉटिश मिशनच्या दस्तऐवजांत आणि अनेक पुस्तकांत ही माहिती आढळते.
जेम्स मिचेल आणि नॉमल स्कुल चालवणाऱ्या मिचेलबाईंचा उल्लेख जोतिबांचे आणि सावित्रीबाईंचे बहुतेक सर्वच चरीत्रकार करतात. मात्र यापैकी कुठल्याही चरित्रांत महात्मा फुले यांचे शिक्षक म्हणून जेम्स मिचेल यांचा कधीही उल्लेख होत नाही.
त्याचबरोबर नॉर्मल स्कुलच्या मिचेलबाई म्हणजेच जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल हे स्पष्ट केले जात नाही.
फुले दाम्पत्याविषयी लिहिलेल्या पुस्तकांच्या अखेरच्या पानांत संदर्भांची यादी चाळली कि यामागचे कारण उलगडते.
बहुतेक चरीत्रे ही आधी लिहून गेलेल्या ग्रंथांवर आणि चरित्रांवर आधारित असतात, त्यात भर अशी क्वचितच टाकलेली दिसते. `समग्र फुले' चे संपादक हरी नरके यांनी आपल्या संपादकियात याबाबत खंत व्यक्त केली आहे.
मागच्या महिन्यात तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महात्मा फुले यांचे लिहिलेले आणि नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले एक संक्षिप्त चरित्र मोठ्या उत्सुकतेने हाती घेतले आणि घोर निराशा झाली.
अर्थात याबाबत तर्कतीर्थांनी स्वतःच खुलासा केला आहे. थोड्या कालावधीत त्यांच्याकडून या चरित्राची मागणी केली आणि त्यामुळे धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या चरित्रावर पूर्णतः आधारीत त्यांनी हे चरित्र लिहिले आहे.
दुसरे म्हणजे फुले दाम्पत्याच्या बहुतेक चरित्रांत आणि पुस्तकांत संदर्भसूचीमध्ये दिलेले बहुतांश संदर्भ मराठी पुस्तके असतात.
त्यामुळे इंग्रजी साहित्यात फुले दाम्पत्याविषयी आणि त्याकाळासंबंधी असलेल्या प्रचंड आणि बहुमूल्य माहितीकडे या चरित्रकारांचे दुर्लक्ष होते.
त्यामुळेच सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांतील अनेक बाबींकडे आजही प्रकाशझोत टाकला गेला नाही, असे म्हणता येईल.
म्हणूनच फुले दाम्पत्याला शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि मिचेलबाई या स्कॉटिश मिशनरी दाम्पत्याचे पहिलेच छोटेखानी चरित्र लिहिताना मला खूपच आनंद वाटला.
Camil Parkhe, December 31, 2023
No comments:
Post a Comment