गोवा, दमण आणि दीव
पणजीला मिरामारच्या धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीत होतो तेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त होऊन केवळ एक तप झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरुंनी १९ डिसेंबर १९६१ ला भारतीय लष्कर पाठवून गोवा दमण आणि दीवची मुक्तता केली आणि अरबी समुद्राशेजारचा हा चिमुकला प्रदेश भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनला.
नेहरूंच्या या लष्करी कारवाईमुळे तेव्हा आंतर राष्ट्रीय पातळीवर किती गदारोळ उडाला होता याची आजच्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही. दैनिक गोमंतकने गोवामुक्तीच्या तिसाव्या वर्धापनानिमित्त म्हणजे १९९१ साली यासंदर्भात न्युयॉर्क टाइम्स मध्ये नेहरूंवर टीका करणारे प्रसिध्द झालेले व्यंगचित्र छापले होते. या विशेषांकात गोवामुक्ती चळवळीतील एक अग्रणी समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांची मी घेतलेली मुलाखतही होती.
पंडित नेहरूंच्या कन्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी १७ जानेवारी १९६७ ला गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात सार्वमत घेतले. या मतदानात गोव्यातील लोकांनी महाराष्ट्रात आणि दमण आणि दीव येथील लोकांनी गुजरात मध्ये सामील होण्यास स्पष्ट नकार दिला.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्व काही काळ चालू राहिले. मात्र ज्या पक्षाची स्थापना गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याच्या उद्दिष्ट्याने झाली त्याच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला येथील मतदारांनी सत्तेवर कायम ठेवले. या पक्षाचे दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री.
बांदोड्करांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर या गोवा, दमण आणि दीवच्या मुख्यमंत्री बनल्या. देशातील त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री. उत्तर प्रदेशच्या गांधीवादी नेत्या सूचेता कृपलानी ( आचार्य कृपलानी यांच्या पत्नी) या देशातल्या पहिल्या आणि असामच्या नंदिनी सत्पथी या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री.
महाराष्ट्रात तर अजून एकही महिला राजकारणी मुख्यमंत्रीपदाच्या आसपाससुद्धा आलेली नाही, शालिनीताई पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांचा यास अपवाद. आजसुद्धा महाराष्ट्रातल्या एकही महिला मंत्र्यांचे नावही कुणाला लगेच आठवणार नाही अशी परिस्थिती असताना काकोडकरांनी सत्तरच्या दशकात पक्षावर आणि प्रशासनावर मजबूत पकड राखली होती हे विशेष.
त्याकाळात येथल्या विधानसभेत एकूण तीस आमदार असायचे, त्यापैकी दमण आणि दीव येथील प्रत्येकी एक आमदार असायचा. मंत्रिमंडळात साडेतीन मंत्री असायचे, तीन मंत्री कॅबिनेट दर्जाचे आणि एक राज्यमंत्री पदाचे. विनायक चोडणकर कायदेमंत्री होते, राऊल (राहुल नव्हे, राऊल हे नाव पोर्तुगीज, स्पॅनिश देशांत आढळते) गोन्साल्विस शिक्षण राज्यमंत्री होते हे आजही आठवते. बहुतेक सर्व महत्त्वाची - पर्यटनासह - खाते मुख्यमंत्र्यांकडे असायची.
तर यापैकी राऊल गोन्साल्विस यांच्याविषयी दोन आठवणी आहेत. पहिली घटना १९७८ सालची असेल. एकदा हे मंत्रीमहोदय वॊस्कोजवळच्या दाबोळी विमानतळाकडे निघाले होते आणि उशिर झाल्यामुळे त्यांचे आगमन होईपर्यंत त्यांनी विमान धावपट्टीवर रोखून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी नवहिंद टाइम्सने मंत्रीमहोदय ब्रिफकेस घेऊन धावपट्टीवर धावतायेत आणि 'राव रे' असे म्हणतायेत असे व्यंगचित्र छापले होते.
गोव्यात सगळीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस राव रे (``थांब रे;) म्हटले कि कुठेही थांबतात, हा यामागचा संदर्भ होता !
माजी मंत्री असलेल्या या राऊल गोन्साल्विस यांचे ऐंशीच्या दशकात प्रदीर्घ आजाराने निधन झाले तेव्हा मी नवहिंद टाइममध्ये बातमीदार होतो. त्यावेळच्या रात्रपाळीच्या चिफ सब एडिटरने ही बातमी आठ कलमी छापली होती. दुसऱ्या दिवशी वृत्तसंपादक एम एम मुदलियार यांनी त्या मुख्य उपसंपादकाला त्याबद्दल धारेवर धरले. माजी मंत्र्याच्या निधनाविषयी आठ कलमी बातमी छापली तर विद्यमान मुख्यमंत्री, किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्या अकस्मात निधनाची बातमी किती कलमी छापणार असा त्यांचा सवाल होता !
एक अत्यंत खळबळजनक घटना मुख्यमंत्री शशिकला काकोडकरांच्या काळात घडली. अर्थखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री काकोडकर विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याआधीच तो अर्थसंकल्प त्यातील आकडेवारीसह चौगुले उद्योग समुहाच्या मालकीच्या दैनिक गोमंतकने आधीच छापला आणि एकच हल्लाकल्होळ झाला.
अर्थसंकल्प फुटल्यास, अर्थमंत्र्याला, सरकारला राजिनामा द्यावा लागतो अशी ब्रिटिश संसदीय प्रथा आहे असे म्हणतात.
काँग्रेसचे प्रवक्ते विठ्ठलराव गाडगीळ यांचा ब्रिटिश संसदीय परंपरेचा गाढा अभ्यास होता. बहुधा त्यांनींच लिहिलेल्या दैनिकातील एका लेखातील वाचलेली घटना आठवते. ब्रिटनचे अर्थमंत्री संसदेच्या लॉबीतून जाताना सिगारेट पिणाऱ्या एका पत्रकाराला उद्देशून म्हणतात : '' आजच्या दिवस कर लेका मजा !'' दुसऱ्या दिवशी ते अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार होते. तो पत्रकार त्या दिवशीच आपल्या दैनिकात बातमी देतो: ``अर्थसंकल्पात सिगारेटच्या किंमतीत वाढ होण्याचे अर्थमंत्र्याने दिले संकेत..'' या बातमीमुळे त्या अर्थमंत्र्याला राजिनामा द्यावा लागला.
गोमंतकच्या त्या आठ कलमी बजेटच्या बातमीने बॉम्ब टाकला होता. एखाद्या प्रदेशाचा संपूर्ण अर्थसंकलप जसाच्या तसा, अगदी एकही आकडेवारी न चुकवता छापण्याची जगातील वृत्तपत्र इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. याला शोध पत्रकारिता म्हणता येईल का?
मात्र याबद्दल शशिकला काकोडकर सरकारला आणि त्याचबरोबर गोमंतकच्या त्या तीन पत्रकारांना जबरी किंमत चुकावी लागली होती.
अर्थसंकल्प फोडणाऱ्या दैनिक गोमंतकच्या त्या मुख्य बातमीदाराच्या र वि प्रभुगावकर वृत्तसंपादक शरद कारखानीस आणि संपादक दत्ता सराफ यांच्या नोकऱ्यांवर त्यावेळी गदा आली होती. अटक चुकवण्यासाठी त्यांना अटकपूर्व जामिन घेण्याची पाळी आली. सरकारी यंत्रणांनी आणि नंतर दैनिकाच्या व्यवस्थापनानेसुद्धा त्यांना खूप त्रास दिला. यापैकी प्रभुगावकर हे नवहिंद टाइम्स मध्ये नंतर माझे ज्येष्ठ सहकारी होते.
गोव्यातले माझे एक जुने ज्येष्ठ पत्रकार मित्र वामन प्रभू यांनी आपल्या `ऍक्सीडेन्टल जर्नालिस्ट' या पुस्तकात या बजेट फुटीवर एक प्रकरणच लिहिले आहे.
काकोडकरांच्या काळातच पक्षांतर्गत बंडाळीमुळे विधानसभेत गोंधळ उडाला तेव्हा सभागृहातील बापूंच्या पुतळ्याचा चक्क अस्त्राप्रमाणे वापर केला गेला, ही घटना खूप गाजली. काकोडकर सत्तेतून पायउतार झाल्या त्या कायमच्याच.
मागे पुण्यातल्या काँग्रेस भवनातला मध्यवर्ती ठिकाणी असलेला गांधीजींचा पुतळा असाच एका गोधळाच्या प्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून तेथून हलवला गेला होता, तेव्हा गोव्यातल्या विधानसभेतली ती धुमश्चक्री मला आठवली
माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला आणि त्यांच्या भाषणाची मी लिहिलेली बातमी नवहिंद टाइम्सने छापली. त्यानंतर एका आठवड्यातच शशिकलाताईंनी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा दिला. माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील ती माझी पहिली राजकीय बातमी होती.
प्रतापसिंह राणे काकोडकरांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते, ते पक्षातून बाहेर पडले आणि नंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीचा विक्रम यापुढील काळात कुणाला मोडणे अवघडच असेल.
अगदी पहिल्या विधानसभेपासून येथील सत्ताधारी पक्ष दमण आणि दीव इथल्या आमदारांच्या कुबड्यांवर सत्तेवर असायचा. नारायण फुग्रो त्यामुळेच विधानसभेचे सभापती बनले होते, दुसरे एक आमदार उपसभापती होते. शशिकलाताईंचे सरकार असेच अल्पमतातले, त्यामुळे बंडखोरी होऊन हे सरकार कोसळले आणि इथे १९७८ साली राष्ट्रपती राजवट लागली.
माझ्या बारावीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रकावर (साल १९७८) गोवा, दमण आणि दीव बोर्डाचा शिक्का आहे. गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व डिसेंबर १९६१ ते जून १९८७ इतके काळ राहिले.
गोव्यातील अनेक नागरिकांना आजही दमण किंवा दीव भारताच्या नकाशावर नक्की कुठे आहे हे आजही सांगता येणार नाही. मलासुद्धा दमण कुठे आहे याचा थांगपत्ता गेल्यावर्षी तिथे गेल्यावरच लागला.
गोवा हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला रत्नागिरी जिल्ह्यापाशी तर दमण हे पालघर जिल्ह्याजवळ वसई आणि गुजरातच्या एका टोकाशी आहे ! दीव तेथून आणखी पाचशे किमी दूर आहे. अगदी स्वस्तात मिळणाऱ्या दारुच्या अतिरिक्त या तिन्ही प्रदेशांत तसे काहीच साम्य नव्हते. त्यामुळे १९८७ साली गोवा राज्य झाले, पोर्तुगिजांच्या सत्तेमुळे चारशे वर्षे एकत्र असलेल्या दमण आणि दीवपासून वेगळे झाले तेव्हा कुणीच अश्रू ढाळले नाही.
पोर्तुगीज सत्तेमुळे साडेचार शतके एकत्र असलेल्या गोव्याची दमण आणि दीव पासूनची नाळ १९८७ पासून तुटली आहे. गोवा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर यापैकी दमणशी माझा कधी दुरान्वयानेही संबंध येईल असे कधी वाटले नव्हते पण तसे घडले मात्र. आता दमण या प्रदेशाचे माझे गोव्यासारखेच ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.
१९८७ पासून एक स्वतंत्र राज्य म्हणून गोव्याची अगदी वेगळी राजकीय आणि सांस्कृतिक वाटचाल सुरु झाली .. त्याविषयी नंतर .
Camil Parkhe January
No comments:
Post a Comment