Monday, April 1, 2024

मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट''

`द लास्ट सपर' किंवा `येशूचे शेवटचे भोजन या विषयाने जगभरातील चित्रकारांना आकर्षित केले आहे.
लिओनार्दो दा व्हिन्सी याने रेखाटलेले ते प्रसिद्ध चित्र किंवा त्या चित्राची प्रतिकृती ख्रिश्चनांच्या घरात विशेषतः डायनिंग टेबलाच्यावर भिंतीवर असतेच.
माझ्याही घरात आहेच.
गुड फ्रायडेला क्रुसावर दुःखसहन करून देहत्याग करणाऱ्या ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांसह आज पवित्र गुरुवारी ( Maundy Thursday) संद्याकाळी आपले `शेवटचे भोजन' केले. `The Last Supper '
त्यावेळी ज्युडास इस्किर्योत हा त्याचे चुंबन घेऊन विश्वासघात करणारा शिष्यसुद्धा होता.
त्यावेळचे येशू आणि त्याच्या शिष्यांचे चित्रण करण्याचे आव्हान चित्रकारांसमोर असते.
जेवणासाठी बसण्याची आसनव्यवस्था, बाराही शिष्यांचे ओळख पटण्यासारखे चित्रण आणि 'तुमच्यापैकी एक जण आता माझा विश्वासघात करणार आहे' हे येशूने सांगितल्यावर या शिष्यांमध्ये उमटणारी अस्वस्थता लिओनार्दो द व्हिन्सीने The Last Supper ' या चित्रात उत्तमरीत्या सादर केली आहे.
भारतातील अनेक चित्रकारांनी `द लास्ट सपर' रेखाटण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.
मकबूल फिदा (एम. एफ.) हुसेन, जेमिनी रॉय, फ्रान्सिस न्युटन सोझा, अँजेलो दा फोन्सेका वगैरेंनी.
ही सर्व चित्रे अर्थातच भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांसह आहेत.
एम. एफ. हुसेन यांनी ख्रिस्ती धर्माच्या संकल्पनेवर खूप चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांचा अर्थातच `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला जातो.
एम. एफ. हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' चे (२००८) हे एक चित्र.
हे चित्र हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो.
चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील.
Camil Parkhe

No comments:

Post a Comment