Showing posts with label painting. Show all posts
Showing posts with label painting. Show all posts

Monday, April 1, 2024

मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट''

`द लास्ट सपर' किंवा `येशूचे शेवटचे भोजन या विषयाने जगभरातील चित्रकारांना आकर्षित केले आहे.
लिओनार्दो दा व्हिन्सी याने रेखाटलेले ते प्रसिद्ध चित्र किंवा त्या चित्राची प्रतिकृती ख्रिश्चनांच्या घरात विशेषतः डायनिंग टेबलाच्यावर भिंतीवर असतेच.
माझ्याही घरात आहेच.
गुड फ्रायडेला क्रुसावर दुःखसहन करून देहत्याग करणाऱ्या ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांसह आज पवित्र गुरुवारी ( Maundy Thursday) संद्याकाळी आपले `शेवटचे भोजन' केले. `The Last Supper '
त्यावेळी ज्युडास इस्किर्योत हा त्याचे चुंबन घेऊन विश्वासघात करणारा शिष्यसुद्धा होता.
त्यावेळचे येशू आणि त्याच्या शिष्यांचे चित्रण करण्याचे आव्हान चित्रकारांसमोर असते.
जेवणासाठी बसण्याची आसनव्यवस्था, बाराही शिष्यांचे ओळख पटण्यासारखे चित्रण आणि 'तुमच्यापैकी एक जण आता माझा विश्वासघात करणार आहे' हे येशूने सांगितल्यावर या शिष्यांमध्ये उमटणारी अस्वस्थता लिओनार्दो द व्हिन्सीने The Last Supper ' या चित्रात उत्तमरीत्या सादर केली आहे.
भारतातील अनेक चित्रकारांनी `द लास्ट सपर' रेखाटण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.
मकबूल फिदा (एम. एफ.) हुसेन, जेमिनी रॉय, फ्रान्सिस न्युटन सोझा, अँजेलो दा फोन्सेका वगैरेंनी.
ही सर्व चित्रे अर्थातच भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांसह आहेत.
एम. एफ. हुसेन यांनी ख्रिस्ती धर्माच्या संकल्पनेवर खूप चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांचा अर्थातच `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला जातो.
एम. एफ. हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' चे (२००८) हे एक चित्र.
हे चित्र हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो.
चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील.
Camil Parkhe

Thursday, June 3, 2021

  दीनानाथ दलाल यांची चित्रे


पूर्वीच्या काळात म्हणजे सत्तरच्या दशकात घरोघरी विविध देवदेवतांची चित्रे असलेली कॅलेंडर्स भिंतींवर लटकलेली असत. राम, कृष्ण, शंकर वगैरे देवदेवतांवर अगदी मोहक शैलीत ही चित्रे असायची. पाचवी-सहावीत असताना तशी चित्रे काढण्याचा, रंगविण्याचा मी प्रयत्न केल्याचे आजही आठवते. नंतर खूप वर्षांनी पत्रकारितेत आल्यानंतर ही आकर्षक शैलीतील चित्रे दीनानाथ दलाल यांची होती असे कळाले.
तीस वर्षांपूर्वी १९९१ साली पुण्यातील सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी यांच्या युनिक फीचर्ससाठी दलाल यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त मी लेख लिहिला, तो सिंडिकेटेड लेख विविध दैनिकांनी छापला होता.
तो हा लेख-----


चित्रकार दीनानाथ दलाल यांची कलाकृती पाहिली नाही असा मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ नागरिक मराठी वाचक शोधूनही मिळणार नाही. दलालांची चित्रकलेतील कारकीर्द 1940 ते 1970 या दरम्यानची. तीन दशकांच्या या कालखंडात त्यांच्या कुंचल्याने कलेच्या विविध प्रातांत अमाप संचार केला, त्यामुळे दोन दशकांपूर्वी मृत्यू पावलेल्या या प्रतिभावान कलाकाराचा गाढा प्रभाव नव्या पिढीतील चित्रकारांवर अजूनही कायम आढळतो.
दीनानाथ दामोदर दलाल हे मूळचे गोव्याचे. मडगावात 30 मे 1916 रोजी त्यांचा जन्म झाला. चित्रकलेतील त्यांचे कौशल्य त्यांच्या लहानपणीच इतरांच्या निदर्शनास आले.
असे सांगतात की, पोर्तुगीज राजवटीत शाळेत शिकत असताना छोट्या दीनानाथने हेडमास्तरांचे चित्र रेखाटले. ते हुबेहुब रेखाटन पाहून `हे चित्र तूच काढले काय ?' असा प्रश्न हेडमास्तरांनी दीनानाथास विचारला.
त्या मुलाचे चित्रकलेतील कौशल्य पाहून कलाशिक्षणासाठी त्यास मुंबईस पाठवावे असा आग्रह हेडमास्तरांनी दीनानाथांच्या वडिलांना केला आणि दलालांचे मुंबईत आगमन झाले.
एका प्रगल्भ चित्रकाराच्या गौरवशाली कारकीर्दीची ती सुरूवात होती.
आपल्या कादकीर्दीच्या सुरुवातीस काही काळ दलाल यांनी एका चित्रपट जाहिरातीच्या संस्थेत काम केले पण दीनानाथ दलाल एक चित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. ते `चित्रा' या साप्ताहिकाचे राजकीय व्यंगचित्रकार म्हणूनच.
अनंत काणेकर आणि म. गो. रांगणेकर या जोडगोळीने हे साप्ताहिक काढले होते.
पण दलालांचे नाव मराठी वाचकांच्या घरोघरी पोहोचविले ते ना. धों ताम्हणकरांच्या `गोट्या' या मालिकेने. या मालिकेसाठी दलालांनी सुरेख रेखाटन पुरविले होते.
त्यानंतर दलालांनी अनेक नामवंत मराठी लेखकांच्या पुस्तकांना चित्रे पुरविली. माणदेशी माणसं, `गावाकडच्या गोष्टी', `बनगरवाडी' ही त्यापैकी काही प्रसिद्ध पुस्तके.
आपल्या कारकीर्दीत म्हणजे 1940 ते 1971 पर्यंत या काळातील सर्वच नामवंत मराठी लेखकांच्या पुस्तकांना मुखपृष्ठे अथवा रेखाटने दलालांनी पुरविली.
साने गुरूजी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक वि.स. खांडेकर आणि वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज,, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई अशी या नावांची यादी प्रचंडच आहे.
त्याशिवाय दलालांनी अनेक दिवाळी अंकांना मुखपृष्ठे पुरविली. हिंदीतील प्रसिद्ध व्यक्तींची व्यक्तीचित्रेही अत्यंत प्रसिद्ध आहेत. ’महात्मा गांधी, पंडित नेहरू, विनोबा भावे, ही त्यापैकी काही अत्यंत नावाजलेली व्यक्तिचित्रे.
दलालांच्या व्यक्तिरेखाटन शैलीने वाचकांना अत्यंत प्रभावित केले होते. लेखक शब्दरुपाने एखाद्या व्यक्तीचे वा प्रसंगाचे वर्णन करतो. त्या व्यक्तींना अथवा प्रसंगांना आपल्या कुंचल्याद्वारे आकार देऊन जिवंत करण्याची क्रिया दलाल करीत. त्यामुळेच या पुस्तकातील घटना आठवल्या म्हणजे आजही वाचकांच्या डोळ्यासमोर ताबडतोब दलालांची चित्रे उभी राहतात.
दलालांनी आपल्या चित्रासाठी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय असे अनेक विषय हाताळले. दिवाळी अंकासाठी तसेच पुस्तकांसाठी मुखपृष्ठे पुरविणसाठी त्यांच्याकडे सतत प्रकाशकांची अन् लेखकांची मागणी असे.
त्यांना भरपूर व्यावसायिक यश मि’ळाले, पण त्यामुळे कलेकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष केले नाही.

``चित्रकार दलाल यांनी व्यावसायिक कला आणि अभिजात कला यामधील दरी दूर केली हा त्यांचा सर्वात मोठेपणा'', असे नव्या पिढीतील चित्रकार आणि दलालांस गुरू म्हणणारे अनिल उपळेकर म्हणतात ते यामुळेच.
चित्रकलेत अमाप लोकप्रिय आणि व्यावसायिक यश मिळविल्यानंतर दलालांनी चित्रकलेत नाना प्रकारची तंत्रे हाताळून पाहिली. नवनवे प्रयोग केले. दलालांच्या चित्रकलेचा अभ्यास असणाऱ्यांना त्यांच्या कलेतील हा बदल, नवनवे प्रयोग विशेषतः 1960 सालानंतरच्या चित्रकलेत आढळून येतो.
दलालांनी सुरू केलेले `दीपावली' हे मासिकही त्या काळात, अत्यंत लोकप्रिय झाले होते.
वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी म्हणजे 1971 साली दलालांचा मृत्यु झाला. पण त्यांनी आपल्यामागे अमूल्य किमतीचा चित्रसंग्रह ठेवला. दलालांच्या चित्रकलेने प्रेरित झालेली चित्रकाराची एक पिढी आज निर्माण झाली आहे.
या महान चित्रकाराच्या पंचाहत्तराव्या जन्मदिनानिमित्त यावर्षी (1991) वेगवगळ्या शहरांत त्यांच्या निवडक चित्रांची प्रदर्शने आयोजित केली जात आहेत.
दलालांच्या चित्रकलेशी दोन पिढीतील ’मराठी वाचकांचा अत्यंत जवळून संबंध आलेला आहे. त्यांच्या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने या चित्रांशी निगडीत असलेल्या आठवणींना निश्चितच उजाळा मिळेल.