पोप फ्रान्सिस भारतभेटीला
इटलीच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी G-7 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.
परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांच्यासमवेत मोदीजी आणि पोप फ्रान्सिस यांचे हे छायाचित्र आहे.
मोदीजी यांनी याबाबत समाज माध्यम Xवर खालील टिपण्णी केली आहे.
G7 या राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश होत नसला तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला या बैठकीचे आमंत्रण दिले जाते. इटलीत ही बैठक होत असल्याने व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख या नात्याने पोप फ्रान्सिस यांनाही या बैठकीचे आमंत्रण होते.
याआधी मोदीजी पोपमहोदयांना व्हॅटिकन सिटीमध्ये २०२१ साली भेटले होते. तेव्हाही पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण दिले होते.
दरम्यानच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील काही राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.
इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे पोप फ्रान्सिस यांचा दौरा अचानक होत नाही, याचे कारण त्यांची भेट ही नेहमीच धार्मिक उद्दिष्ट्याची ( Pastoral ) असते, त्यासाठी स्थानिक चर्चतर्फे खूप आधीपासून नियोजन केले जाते.
याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात १९८६ साली दहा दिवसांचा दौरा केला होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली ते पुन्हा तीन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले होते.
पोप यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहेमीच विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांना भेटी दिल्या होत्या. या देशांपेक्षा भारतात ख्रिश्चनांचे प्रमाण फार अधिक आहे.
मोदीजी यांचे भारतभेटीचे आमंत्रण केवळ औपचारीकता नसून अगदी मनापासून असेल तर भारतातील चर्चचे पदाधिकारी आनंदून या दौऱ्याच्या तयारीला लागतील.
भारतातील कॅथोलिक चर्च गेली अनेक वर्षे भारताने पोप यांच्या दौऱ्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
पोप हे राष्ट्रप्रमुखसुद्धा असल्याने कुठल्याही दौऱ्यासाठी त्या देशाचे त्यांना औपचारिक आमंत्रण असणे आवश्यक असते.
भारत सरकारने पुन्हा औपचारिक आमंत्रण दिल्यास काही महिन्यांत पोप फ्रान्सिस यांचा भारतदौरा होऊ शकतो.
या वर्षाअखेरीस नोव्हेंबरात गोव्यात संत फ्रान्सिस झेव्हियरच्या पार्थिवाचे अवशेष दोन महिन्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दर दहा वर्षानंतर होणाऱ्या या प्रदर्शनातून गोव्याला चांगला महसूल मिळत असतो.
संत फ्रान्सिस झेव्हियर हे सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट) किंवा येशूसंघ या धर्मगुरूंच्या संस्थेचे एक संस्थापक.
विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर निवड झालेले पहिलेच जेसुईट धर्मगुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यात गोव्याचाही समावेश असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment