Showing posts with label Italy. Show all posts
Showing posts with label Italy. Show all posts

Sunday, June 30, 2024


How do you greet the pope?

पोप यांना भेटल्यावर त्यांना अभिवादन, संबोधित कसे करतात ?
नुकतीच इटली येथे या शहरात G-7 राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद झाली. भारत या राष्ट्र समूहाचा सभासद नाही तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला एक निमंत्रित म्हणून या परिषदेत सहभागी होता आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत हजर होते.
G-7 बैठक इटलीत होती आणि साहजिकच रोम शहरात मद्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून पोप फ्रान्सिससुद्धा एक निमंत्रित म्हणून या दोन दिवसांच्या परिषदेला हजर होते.
देशातील राजकीय नेत्यांना संबोधित करण्याची पोप यांची अर्थातच पहिली वेळ नाही. पोप पॉल सहावे हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला १९६५ साली संबोधित करणारे पहिले पोप.
हा, तर यावेळी या परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी परिषदेला आलेल्या पोप फ्रान्सिस यांना 'होली फादर' असे संबोधित त्यांचे स्वागत केले, असे बातम्यांत म्हटले आहे.
इटलीचे मूळचे बहुतांश नागरिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले असतात. उदाहरणार्थ, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी. तर कॅथोलिक परंपरेत वाढल्या असल्याने इटलीच्या पंतप्रधान मेलोनो पोप फ्रान्सिस यांना `होली फादर' म्हणूनच अभिवादन करणार यात आश्चर्य नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही कॅथोलीक नसल्याने त्यांनी पोप फ्रान्सिस यांना `होली फादर' म्हणून अभिवादन करण्याची गरज नव्हतीच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन हे रोमन कॅथोलीकआहेत. बिडेन श्रद्धावंत कॅथोलीक आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी भारतात आल्यावर त्या रविवारी त्यांच्यासाठी होली मास साजरा करण्यासाठी एक ख्रिस्ती धर्मगुरु अमेरीकन दुतावासातर्फे बोलावण्यात आला होता.
त्यामुळे अमेरीकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन पोप यांना जेव्हाजेव्हा भेटतात तेव्हा ते त्यांना 'होली फादर' असेच संबोधित असतील, याविषयी शंका नसावी.
मागे २०१६साली येमेन येथे मिशनकाम करणाऱ्या मूळचे केरळचे असलेल्या टॉम युझून्नाळील या डॉन बॉस्को संस्थेच्या धर्मगुरुचे अपहरण झाले होते, त्यांना ओलीस म्हणून ठेवण्यात आले होते. सव्वा वर्षानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि व्हॅटिकन सिटीच्या मध्यस्थीने त्यांची सुटका झाली.
त्यानंतर फादर टॉम यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभारही मानले होते.
भारतात येण्याआधी त्यांनी व्हॅटिकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भारतीय ख्रिस्ती धर्मगुरुने आपल्या परमाचार्यांना कशाप्रकारे अभिवादन केले असेल, याची काही कल्पना करता येईल काय?
फादर टॉम यांनी पोप फ्रान्सिस यांना चक्क भारतीय परंपरेनुसार साष्टांग नमस्कार घालून अभिवादन केले होते.
जगभर पोप जातात तेव्हा त्यांना स्थानिक परंपरेनुसार अभिवादन केले जाते, साष्टांग नमस्कार करुन त्यांच्या विषयीचा आदर अशाप्रकारे बहुधा पहिल्यांदा केला गेला असेल.
पोप फ्रान्सिस यांना आलिंगन देऊन, त्यांची गळाभेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही नक्कीच एकमेव व्यक्ती असणार याविषयी शंकाच नाही.
ख्रिस्ती धर्मातील परमगुरुस्वामी आणि त्याशिवाय राष्ट्रप्रमुखही असलेल्या पोप यांच्याशी हस्तांदोलन कुणीही व्यक्ती - अगदी तळागाळातील सामान्य व्यक्ती, स्त्री अथवा पुरुष - करु शकतो हे विशेष आहे.
शिवाशिव आणि विटाळ वगैरे मुद्दाच नाही. लिंगभेद, वर्णभेद आणि वंशभेदसुद्धा नसतो.
पोप आणि इतर कॅथोलीक व्रतस्थ धर्मगुरु आणि नन्स आजन्म ब्रह्मचारी असतात, तरी ते भिन्नलिंगी व्यक्तीशी हस्तांदोलन करु शकतात. त्यामुळे त्यांचे ब्रह्मचर्य अजिबात खतरेमे येत नाही.
निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती धर्म फार पुढारलेला आहे असे म्हणता येईल.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या स्वच्छ या संघटनेने काही कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना रोममध्ये एका परिषदेसाठी नेले होते.
या सफाई कामगारांची जात काय असेल याविषयी तर्क करण्याची गरजच नाही.
तर त्यापैकी रिबेका या नावाच्या दापोडी झोपडपट्टीतील एका ख्रिस्ती महिलेने पोप फ्रान्सिस यांच्याशी हस्तांदोलन केले होते. `सकाळ टाइम्स' या दैनिकात याबाबत माझी बातमी बायलाईनसह प्रसिद्ध झाली होती.
पोप जॉन पॉल हे संत मदर तेरेसा यांचा चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन त्यांचे कपाळावर अत्यंत मायेने चुंबन घेत असत.
इति पंतप्रधान मोदीजी आणि पोप फ्रान्सिस गळाभेट पुराण.
Camil Parkhe,

पोप फ्रान्सिस भारतभेटीला

इटलीच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी G-7 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.

परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांच्यासमवेत मोदीजी आणि पोप फ्रान्सिस यांचे हे छायाचित्र आहे.
मोदीजी यांनी याबाबत समाज माध्यम Xवर खालील टिपण्णी केली आहे.
“Met Pope Francis on the sidelines of the @G7 Summit. I admire his commitment to serve people and make our planet better. Also invited him to visit India. @Pontifex,”
G7 या राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश होत नसला तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला या बैठकीचे आमंत्रण दिले जाते. इटलीत ही बैठक होत असल्याने व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख या नात्याने पोप फ्रान्सिस यांनाही या बैठकीचे आमंत्रण होते.
याआधी मोदीजी पोपमहोदयांना व्हॅटिकन सिटीमध्ये २०२१ साली भेटले होते. तेव्हाही पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण दिले होते.
दरम्यानच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील काही राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.
इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे पोप फ्रान्सिस यांचा दौरा अचानक होत नाही, याचे कारण त्यांची भेट ही नेहमीच धार्मिक उद्दिष्ट्याची ( Pastoral ) असते, त्यासाठी स्थानिक चर्चतर्फे खूप आधीपासून नियोजन केले जाते.
याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात १९८६ साली दहा दिवसांचा दौरा केला होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली ते पुन्हा तीन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले होते.
पोप यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहेमीच विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांना भेटी दिल्या होत्या. या देशांपेक्षा भारतात ख्रिश्चनांचे प्रमाण फार अधिक आहे.
मोदीजी यांचे भारतभेटीचे आमंत्रण केवळ औपचारीकता नसून अगदी मनापासून असेल तर भारतातील चर्चचे पदाधिकारी आनंदून या दौऱ्याच्या तयारीला लागतील.
भारतातील कॅथोलिक चर्च गेली अनेक वर्षे भारताने पोप यांच्या दौऱ्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
पोप हे राष्ट्रप्रमुखसुद्धा असल्याने कुठल्याही दौऱ्यासाठी त्या देशाचे त्यांना औपचारिक आमंत्रण असणे आवश्यक असते.
भारत सरकारने पुन्हा औपचारिक आमंत्रण दिल्यास काही महिन्यांत पोप फ्रान्सिस यांचा भारतदौरा होऊ शकतो.
या वर्षाअखेरीस नोव्हेंबरात गोव्यात संत फ्रान्सिस झेव्हियरच्या पार्थिवाचे अवशेष दोन महिन्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दर दहा वर्षानंतर होणाऱ्या या प्रदर्शनातून गोव्याला चांगला महसूल मिळत असतो.
संत फ्रान्सिस झेव्हियर हे सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट) किंवा येशूसंघ या धर्मगुरूंच्या संस्थेचे एक संस्थापक.
विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर निवड झालेले पहिलेच जेसुईट धर्मगुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यात गोव्याचाही समावेश असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Camil Parkhe

Saturday, June 12, 2021

 

खाद्यसंस्कृतीवरून कुणी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये!
'अक्षरनामा'  
https://www.aksharnama.com/client/article_detail/5230 
पडघम - सांस्कृतिक       
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 12 June 2021
  • पडघमसांस्कृतिकखाद्यसंस्कृतीFood CultureवशटमासेFishमटणMutton

शाळेत असताना वडील मला अनेकदा आमच्या दुकानाशेजारी असलेल्या ‘समाधान’ हॉटेलात घेऊन जात असत. तिथं आम्ही सकाळी बटाटावडा, पुरी-भाजी किंवा संध्याकाळी घावन खात असू. त्या हॉटेलचा तो गोलाकार गरमागरम बटाटावडा, लाल रंगाचा रस्सा, त्यावर बारीक चिरून टाकलेला कांदा आणि शेजारी लिंबूची कापलेली एक फोड. साधारणतः एका वेळी ताटात दोन बटाटेवडे असायचे आणि गिऱ्हाईकाने न मागता दुसऱ्यांदा रस्सा वाढण्याचा शिरस्ता असायचा. रस्स्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी काही जण बटाटेभजेही खात असत. घराबाहेरच्या खाद्यसंस्कृतीची मला झालेली ही पहिली ओळख. आजही त्या बटाटावड्याची आणि चमचमीत रश्श्याची चव माझ्या तोंडात रेंगाळत असते.

श्रीरामपुरातली सोमैया हायस्कूलशेजारची आमची बोरावके चाळ मिश्र जातीधर्मांची होती. तिच्या एका टोकाला बैठी पाच-सहा घरे होती. तिथले भाडेकरू ब्राह्मण, मारवाडी, माळी आणि एक मुसलमान कुटुंब होते (पेशाने तांबोळी असलेले). चाळीच्या मध्ये एकमजली इमारतीत स्वतः चाळमालक बोरावके, माळी, मारवाडी आणि गुजराती घरे होती. चाळीच्या दुसऱ्या टोकाला कुडाच्या असलेल्या चार घरांत दोन मुसलमान, एक मराठा आणि आमचे ख्रिस्ती कुटुंब होते. या चाळीच्या समोरच्या बाजूला स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कुडाच्या घरांत पिठाची गिरणी चालवणारे एक मुसलमान कुटुंब, चार माळी कुटुंबे, एक गवळी आणि सुकी मासळी विकणारे एक कोमटी कुटुंब राहायचे.

वेगवेगळ्या जातीधर्मांच्या, सामाजिक-आर्थिक स्तर भिन्न असलेल्या या कुटुंबांची खाद्यसंस्कृतीही पूर्ण वेगळी होती, हे सांगायला नकोच. आमच्या एका बाजूचे आणि समोरचे शेजारी मुसलमान होते, बाकीचे शेजारी माळी आणि मराठा असल्याने आसपासची सर्वच घरे तशी मांसाहारी होती.

समोरच्या चव्हाण नावाच्या माळी घरात आणि आमच्या घरात कालवणाची, सुक्या भाज्यांची दुपारी आणि रात्री देवाणघेवाण चालू असायची. रविवारी, बुधवारी आणि शनिवारी ही देवाणघेवाण ठप्प व्हायची. कारण या दिवशी आमच्याकडे ‘मटण’ असायचे. (ग्रामीण भागात ‘मटण’ ही संज्ञा सर्वसामान्य नाम म्हणून वापरली जाते, जसे कोंबडीचे मटण, बकरीचे मटण इत्यादी.) “ख्रिस्ती लोक एक वेळ रविवारी चर्चमध्ये मिस्साला जाण्याचे टाळतील, मात्र त्या दिवशी त्यांच्या घरी मटणाचा बेत  कधीही चुकणार नाही’’, अशी एक जुनी म्हण आहे. 

तर या दिवसांत आमच्या घरात काय शिजत असायचे, हे शेजाऱ्यापाजाऱ्यांना माहीत असायचे, मात्र त्याबद्दल कधीही नाराजी किंवा नापसंती व्यक्त होत नसायची.

दिवाळीला समोरच्या आणि बाजूंच्या माळी-मराठ्यांच्या घरांतून आमच्याकडे आणि शेजारच्या मुसलमानांच्या घरी फराळाच्या पराती यायच्या. नाताळाला आमच्याकडून सगळ्या शेजाऱ्यांना गोड फराळ जायचा आणि रमझान ईदच्या दिवशी आम्हां सर्व शेजाऱ्यांकडे त्या तीन मुसलमान घरांतून शीर-कुर्म्याची भांडी पोहोचती व्हायची. त्या घरांत लग्न वा दुसऱ्या काही निमित्ताने जेवण दिले जायचे, तेव्हा बिर्याणी किंवा लाल रश्शाचे चमचमीत मटण कालवण चाखायला आसपासच्या घरांतली कितीतरी माणसे यायची. ‘मटण खावे तर मुसलमानांच्या हातचे’ असा कौतुकाचा बोलबाला असायचा. इतरांची आगळीवेगळी खाद्यसंस्कृती स्वीकारून सहजीवनाची ती पद्धत आजही कायम आहे. 

नगरपालिकेच्या खटोड शाळेत मी सहावीत असताना बळीराम नेरे हा माझा क्लासमेट माझ्या घरी राहायला आला. तो मराठा होता. त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि आई एका खेड्यात सरकारी नोकरीत होती. तो घरात आल्यापासून ‘त्या’ तीन दिवशी त्याच्यासाठी वेगळे कालवण किंवा भाजी होऊ लागली. त्याच्याबरोबर माझीही त्या मटणाच्या कालवणावरची वासना उडाली. वर्षभराने तो आपल्या आईकडे राहायला गेला, तरी नंतर माझ्यासाठी ‘त्या’ ठराविक दिवशी दाळ किंवा काहीतरी खळगुट करावे लागायचे, ते अगदी मी दहावीनंतर घर सोडेपर्यंत. (या परिसरात शाकाहारी लोकांना ‘खळगुठे’ असेही म्हटले जायचे!) 

मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या मामाच्या गावी घोगरगावला एकदा मामेभाऊ शाहूबरोबर गेलो होतो. श्रीरामपूर तालुक्यात मुठेवाडगाव येथे उन्हाळ्यात पार कोरडी असलेली गोदावरी ओलांडून पार करून आम्ही दोघे भामाठाणला पोहोचलो. चालतचालत संध्याकाळी ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या वस्तीवर गेलो. शेतावरची कामे आटोपल्यावर शाहूची थोरली बहीण, मालनबाई तिथे आपल्या नवऱ्या-मुलासह ऊसतोडणीच्या कामाला आपल्या बैलगाडीसह आली होती. त्या वस्तीवर सगळीकडे ऊसाच्या लांबलांब वाड्यांनी बांधलेल्या खोपट्या होत्या. त्यात थोड्याशा सामानासाठी, काही भांड्यांसाठी आणि इनमिन दोनतीन जणांना बसण्यासाठी जागा होती. स्वयंपाक तर बाहेर दगडांच्या चुलीवर व्हायचा.

शाहूला आणि मला पाहून मालनबाई हरखून गेली. आपल्या माहेरच्या पाहुण्यांना म्हणून तिने लागलीच खोपटीत दोरीवर वाळत टाकलेल्या चान्या घेतल्या, साफ केल्या आणि चुलीवरच्या उकळत्या पाण्यात शिजायला टाकल्या. दर चार-पाच दिवसांनंतर ऊसतोडणीची जागा बदल्यावर सगळे बिऱ्हाड बैलगाडीवर टाकून हिंडणारे ऊसतोडणी कामगार मीठ, मिरची आणि तेल याशिवाय किती वस्तू सोबत बाळगणार? खोपीत दोरीवर सुकवून ठेवलेले मांसाचे तुकडे म्हणजे चान्या. त्या ऐनवेळी कुणाचाही पाहुणचारासाठी उपयोगी पडतात. त्यांच्यासाठी चान्या हीच पक्वाने होती. त्या खायची ती माझी पहिली आणि शेवटचीच वेळ.

फादर होण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी मी सातारा जिल्ह्यात कराडला फादर प्रभुधर यांच्या ‘स्नेहसदन’ आश्रमात राहून अकरावी केली. त्या संपूर्ण वर्षभराच्या काळात या आश्रमात योगासने शिकावी लागली. तिथे मांसाहार पूर्णतः वर्ज्य होता. इतका काळ - अगदी एक आठवडाभरही - मी कधीही शाकाहारी राहिलो नव्हतो.   

बारावीला गोव्यातल्या जेसुईट लोयोला हॉल पूर्व-नोव्हिशिएटमध्ये राहायला गेलो, तेथे कराडच्या अगदी उलट स्थिती. बुधवारच्या दुपारचा अपवाद सोडता वर्षभर दुपारी आणि रात्री फक्त मांसाहारी आणि तेसुद्धा केवळ बीफ असायचे. पोर्तुगीज बोलणारा आमचा मेस्ता फ्रान्सिस आठवड्याभर बीफची नारळ घालून केलेली घट्ट मसालेदार शाकुती, कटलेट्स, समोसे, चिली-फ्राय, रोस्ट असे इतके वेगवेगळे पदार्थ बनवायचा की, एक डिश आठवड्यात क्वचितच रिपिट व्हायची! हा बीफचा पुरवठा पणजी मार्केटमध्ये दर शुक्रवारी बंद असायचा, म्हणून गुरुवारीच नेहमीपेक्षा दुप्पट बीफ आणले जायचे.

त्या काळात भाकरी किंवा चपातीचे कधी दर्शन घडले नाही. सकाळी नाश्त्यासाठी कडक भाजलेले गोलगोल उंडो पाव आणि रात्री साधे पाव असा मेन्यू असायचा. त्या सत्तरच्या दशकात गोव्याला बीफचा पुरवठा बेळगावातून व्हायचा, आजही होतो. गेली अनेक वर्षं गोव्यात आणि कर्नाटकातही भाजपचे सरकार असले तरी यात काहीही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रात पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या पराभवानंतर भाजप-शिवसेनेचे सरकार २०१४ साली आले. या युतीच्या सरकारचा पहिला महत्त्वाचा निर्णय होता-मागील १९ वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेला गोवंश हत्याबंदीचा ठराव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा आणि मंजुरीनंतर तातडीने हा कायदा महाराष्ट्रात अमलात आणण्याचा. एक नवी खाद्यसंस्कृती प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते. देशात केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयाच्या कारणाने उत्तर भारतात ‘मॉब लिंचिंग’ होण्याच्या घटना यानंतरच सुरू झाल्या.  

यावरून एक अलीकडची घटना आठवली. गोव्यात सांकवाल येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी नावेलीजवळच्या बस स्टॉपजवळ उभा होते. शेजारीच एक पासरो म्हणजे छोटेसे किराणा दुकान होते. जवळच्या शाळेच्या मैदानावरून धावत एक विद्यार्थी आला आणि त्या दुकानदाराला म्हणाला, “अंकल, माका एक बीफ पॅटीस दी!” ते ऐकून मी चमकलोच, पण लगेच लक्षात आले की, मी आता गोव्यात आहे, महाराष्ट्रात नाही.

या घटनेनंतर काही महिन्यांनी गोव्यातून सिस्टरताई आली आणि आल्याआल्या मला म्हणाली, “मी खिमा आणला आहे. फ्रिजमध्ये लगेच ठेवून दे.” ते ऐकून मी विचारात पडलो, पण काही बोललो नाही. तो खिमा गोव्यातून महाराष्ट्रात आणणे हा कायद्यानुसार दारू आणण्यापेक्षाही भयंकर गुन्हा आहे, हे मी तिला सांगितले नाही. 

गोव्यातील आमच्या जेवणात नाताळ, ईस्टर तसेच सेंट इग्नेशियस लोयोला, सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या फेस्तांनिमित्त पोर्कपासून म्हणजे डुकराच्या मासांपासून केलेले सोरपोतेर, विंदालू, सॉसेजेस अशा पोर्तुगीज वळणाच्या डिशेस असायच्या. आठवड्यातून काही दिवस मासे आणि अंडी यांचाही रतीब असायचा.

किंग प्रॉन्स हा माशांचा एक प्रकार मला आवडत नसायचा. प्रॉन्स बिर्याणीतून मी ते प्रॉन्स ताटात वेगळे काढून ठेवायचो. हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी बसून मी वेगळ्या वाटीत काढून ठेवलेले ते किंग प्रॉन्स मटकावण्यासाठी इतर मुलांची स्पर्धा सुरू झाली. कारण फाईव्ह स्टार हॉटेलांत असलेल्या मागणीमुळे किंग प्रॉन्स अत्यंत महागडे असत, आजही यात बदल झालेला नाही. त्यानंतर किंग प्रॉन्स खाणे मी सुरू केले.

केंद्रात आणि गोव्यातही भाजप हा एकच पक्ष सत्तेवर असला तरी हा पक्ष गोव्यातील खाद्य आणि पेय संस्कृतींबाबतचे नैतिक किंवा कायदेशीर नियम आपली सत्ता असलेल्या इतर राज्यांत किंवा देशभर लागू करण्याचा विचारही कधी करणार नाही. गोव्यात अगदी मॉलमध्येही दारू विकली जाते आणि प्रत्येक मांसाहारी हॉटेलांत बसल्या बसल्या गिऱ्हाईकांपुढे काचेचे ग्लास ठेवले जातात, हे अनेकांनी अनुभवलेले असेलच.  

पत्रकार म्हणून नोकरीला लागल्यावर पणजीला सान्त इनेजपाशी असलेल्या ताळगावला मी राहत असताना माझ्या घरमालकाची म्हातारी आई वारली, तेव्हाची घटना आठवते. मयतीला लोक जमले होते. काही वेळानंतर आम्हा सर्वांच्या हातात फेणीचे ग्लास आणि खाण्यासाठी उकडलेले छोले देण्यात आले, तेव्हा मी थक्कच झालो. किरीस्तांव लोकांच्या घरी किंवा रस्त्यातल्या चौकापाशी असलेल्या क्रुसासमोर कुठल्याही कारणानिमित्त रोझरीची प्रार्थना आणि लदाईन (लितानी) असायची, तेव्हाही अल्तारासमोरच्या मेणबत्त्या विझवण्याआधीच फेणी किंवा उर्राकचे ग्लास आणि उकडलेल्या छोल्यांचे ताट फिरवले जाई. हळूहळू या प्रकारांची सवय झाल्यावर त्याचे आश्चर्य व वैषम्य वाटेनासे झाले. गोव्यात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथेही ख्रिस्ती कुटुंबांतील लग्नांत मांसाहारी पदार्थ असतातच. पाहुणे मंडळींच्या जेवणाच्या प्रत्येक टेबलांवर काचेचे ग्लासही असतात.  

खाण्यावरून शरमिंदा होण्यासारखा एक खूप जुना प्रसंग आठवतो. कॉलेजची सुट्टी संपल्यावर श्रीरामपूरहून मी गोव्याला झेलम एक्सप्रेसने निघालो. १९७०च्या दशकाच्या त्या काळात मिरज ते वॉस्को द गामा या मार्गावर मिटरगेज रेल्वे होती. त्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग मिरजला संपल्यावर तेथून लोंढा-मार्गे वॉस्कोची मिटरगेज रेल्वे पकडावी लागे. या मार्गावर प्रवास केलेल्यांनी ‘दूधसागर धबधबा’ पाहिला असेलच. सह्याद्री घाटात अत्यंत संथ गतीने चालणाऱ्या या मीटरगेज रेल्वेबाबत जुन्या पिढीतील लोक अनेक गंमतीदार किस्से सांगत. जसे की, दूधसागर धबधब्यापाशी या चालत्या गाडीतून उतरून, छायाचित्र काढून, परत मागच्या डब्यात चढणे शक्य होते.

हा, तर या प्रवासासाठी आईने बाजरीच्या भाकरी आणि माझ्या आवडीची लाल मिरच्यांची सुकटाची चटणी कापड्यात बांधून दिली होती. गाडीने मिरज सोडल्यावर डब्यात वरच्या बर्थवर बसून रात्री नऊच्या दरम्यान मी त्या कापडाची गाठ सोडली, दोनतीन घास खाल्ले असतील तोच त्या डब्यातील अनेक प्रवाशांच्या एकापाठोपाठ सटासट शिंका सुरू झाल्या आणि एकच गोंधळ झाला. ‘कुणी वशट पदार्थ आणला?’ असे प्रश्न सुरू झाले. घाबरून मी गडबडीने ती सुकटाची चटणी झाकली. मात्र भूकेने भीतीवर मात केली आणि थोड्याथोड्या वेळाने एकेक घास घेत मी माझे जेवण संपवले. त्यानंतर सुकट, सुके बोंबील असे वशट खाद्यपदार्थ प्रवासात कधी आणायचे नाही, असा कानाला खडा लावला.   

पुणे श्रमिक पत्रकार संघ ( Pune Union of Working Journalists - PUWJ) आपल्या सात्त्विक आहाराच्या आग्रहाविषयी असाच प्रसिद्ध आहे. ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या या संघटनेच्या कार्यकारिणीत १९४०च्या दशकात नथुराम गोडसे होता. नंतरच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी या संघटनेचे अध्यक्ष होते. (१९८०च्या दशकात मीसुद्धा या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत होतो.) संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी सर्व सदस्यांना भोजन दिले जाते. त्याचा मेन्यू वर्षानुवर्षे केवळ श्रीखंड-पुरी, आमरस, फदफदे असा ठेवून पत्रकार संघाने खाद्यसंस्कृतीबाबत आपले सोवळे कायम राखले आहे. इतरांच्या आवडीचा ‘तामसी आहार’ म्हणजे चिकन बिर्याणी किंवा किमान अंडा-करीचा बेत ठेवण्याचा काही सदस्यांचा आग्रह आजतागायत मान्य झालेला नाही.

याच्या अगदी उलट मुंबईतील ‘प्रेस क्लब’ची   (Mumbai Press Club) मानसिकता आहे! तिथं ‘व्हिजिटर’ म्हणून पाहुणचार घेतलेले मुंबईबाहेरचेही अनेक जण कौतुकाची भावना बाळगून असतात.

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ने ऐंशीच्या दशकात मला बल्गेरियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पाठवले होते. तेव्हा आम्हा ३० जणांच्या भारतीय तुकडीमध्ये दिल्ली दूरदर्शनमध्ये एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्या दौऱ्यात मांसाहारी पदार्थांत पोर्क म्हणजे डुकराच्या मांसाचा समावेश असेल या भीतीने तीन महिन्यांच्या या काळात या गृहस्थाने साधे अंडा ऑम्लेटसुद्धा खाल्ले नव्हते!

पूर्ण शाकाहारी असलेले माझ्या परिचयातील एक जण कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये शांघायला दोन महिने होते. तेथून परतून आज तीन वर्षे झाली तरी शांघाय नाव काढताच तिथे खाण्याचे झालेले हाल आठवून आजही त्यांना पोटात मळमळल्यासारखे होत असते.  

मुंबई-पुण्यातल्या इराणी हॉटेलांनी आपली स्वतःची वेगळी खाद्यसंस्कृती जपली होती. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यातले गरवारे पुलाजवळचे हॉटेल गुडलक आणि लकी रेस्टाँरंट ही इराणी हॉटेल्स देव आनंद, दिलीप कुमार वगैरे अभिनेत्यांची आवडती ठिकाणे होती. आता बंद झालेले लकी रेस्टाँरंट हे मस्काबन, चाय, खिमा पाव, चिकन मसाला, चिकन बिर्याणीसाठी प्रसिद्ध होते. नव्वदच्या दशकात आम्ही सडेफटिंग पत्रकारही तिथे बसायचो, तेव्हाही या अभिनेत्यांच्या नावांची तेथे हमखास उजळणी व्हायची.

नॉन-व्हेज समोसा आणि मस्काबन यामुळे पुणे कॅम्पातले हॉटेल ‘महानाझ’ खवय्यांचे आवडते होते. मी नोकरीला असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’चे ऑफिस तेव्हा या ‘महानाझ हॉटेल’च्या समोरच्या अरोरा टॉवर्समध्ये होते. पुणे कॅम्पात अनवाणी पायाने हिंडल्यानंतर चित्रकार मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेन या हॉटेलमध्ये विसाव्यासाठी बसलेले मी पाहिले आहे. त्यांच्या अशा भेटीमुळे आम्हा पत्रकारांना हमखास एक सॉफ्ट स्टोरी मिळायची.  

हवेतल्या प्रवासातील खाद्य आणि पेय संस्कृतीची तर वेगळीच मजा असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईतून पॅरिसच्या दिशेने आमच्या विमानाने उड्डाण केले आणि पंधरा-वीस मिनिटांतच ट्रे घेऊन आलेल्या एयर होस्टेसने मला विचारले- ‘काय घेणार तुम्ही?’ ट्रेकडे निरखून पाहत मी विचारले- ‘व्हॉट चॉइसेस आय हॅव्ह?’ तिने हसत म्हटले- ‘फ्रुट ज्यूस, वाईन, शॅम्पेन...’. ‘तर मग मी शॅम्पेन घेईन!’ मी लगेच म्हटले.

छोट्या आदितीने फ्रुट ज्यूसची ऑर्डर दिली. मात्र माझा उत्साहित झालेला चेहरा पाहून पत्नी, जॅकलीननेही शॅम्पेनची ऑर्डर दिली आणि तिचा ग्लासही माझ्यासमोर ठेवला.

मुंबई ते पॅरिस हा सहा तासांचा तसा कंटाळवाणा प्रवास मग अगदी मजेत गेला, हे सांगायलाच नको. 

ते तीन आठवडे फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये फिरताना विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स आणि पेये यांचा आम्ही पुरेपूर आस्वाद घेतला. या वेगळ्या खाद्य आणि पेय संस्कृतींच्या देशांत वावरताना कधीही ‘होम सिक’ झाल्यासारखे वाटले नाही.      

‘व्हेन इन रोम, डू ऍज द रोमन्स डू’ ही म्हण रोममध्ये आणि युरोपातल्या इतर ठिकाणी सुट्टीवर असताना मी, जॅकलीनने आणि मुलगी आदितीने पुरेपूर अमलात आणली होती. तिथल्या एक युरोला मिळणाऱ्या बिनसाखरेच्या आणि बिनदुधाच्या काळ्या कॉफीची लवकरच आम्हाला सवय झाली. रोममध्ये असताना पास्ता आणि पिझ्झा आदितीने मनसोक्त खाल्ला.  

दोन वर्षांपूर्वी ‘सकाळ टाइम्स’च्या वतीने थायलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या परिषदेत सहभागी झालो. भारतातले आम्ही सहा आणि जगभरातील सुमारे सत्तर पत्रकार त्या वेळी थायलंड सरकारचे पाहुणे म्हणून उपस्थित होतो. प्रवासाआधी थायलंडच्या मुंबईतील वकिलातीने माझ्या आहाराविषयी विचारणा केली, तेव्हा उपलब्ध तीन पर्यायांमध्ये मांसाहारी आणि शाकाहारी या नेहमीच्या दोन पर्यायांशिवाय ‘जैन पद्धती’चा तो तिसरा शाकाहारी पर्याय पाहून मी उडालो होतो! 

अशा भिन्न, तऱ्हेतऱ्हेच्या खाद्य आणि पेय संस्कृतीबद्दल खरे तर काही आक्षेपही नसावा. ज्याला जे खावे, प्यावेसे वाटेल त्याबद्दल आडकाठी नसावी. खाद्यसंस्कृतीनुसार कुणी स्वतःला, आपल्या समाजाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये.

मात्र तसे होण्याऐवजी आजही आहारपद्धतीवरून नाके मुरडली जातात. हल्ली तर खाद्यसंस्कृतीनुसार शेजारी निवडला जातो. काही शहरांत त्यानुसार स्वतंत्र इमारती आणि राहण्याच्या कॉलनीही उभारल्या जात आहेत.

समुद्रातील मासे, आकाशात विहार करणारे पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, वनस्पती आणि फळफळावळ हे तुमचे अन्न आहे,’ असे ‘बायबल’मधील ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकात देवाने मानवाला म्हटले आणि हे वचन आज्ञाधारकपणे मी पुरेपूर अमलात आणतो, असे मी गमतीने म्हणतो. गंमतीने यासाठीच की, ‘बायबल’मधले हे वचन शब्दशः स्वीकारल्यास हे विश्व मानवकेंद्रीत आहे, असे मान्य करून पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टी गौण ठरू शकते.   

अर्थात कुणाला अन्न म्हणून केवळ वनस्पती आणि फळफळावळ पसंत असू शकेल, तर कुणाला प्राणी-पक्षी म्हणजे मांसाहार आवडीचा असेल. त्याशिवाय आहारनिवडीत भौगोलिक संदर्भ महत्त्वाचे असतात. थंड प्रदेशातील इस्किमोंना ताज्या भाजीपाल्याऐवजी मासे, रेनडिअरचे दूध आणि मांसावर गुजराण करावी लागते. भुईमुगाचे पीक होणाऱ्या परिसरात जेवणाच्या पदार्थांत शेंगदाण्याचा मुबलक वापर होतो आणि त्याच पद्धतीने कोकणात नारळाचा!

चंद्र किंवा मंगळासारख्या परग्रहांवर वसती निर्माण करण्याची आस बाळगणाऱ्या मानवाला तिथल्या परिस्थितीनुसार आपला आहार बदलावा लागणार आहेच! की, तिकडेही खाद्यसंस्कृतीबाबत आपण अशीच कडवी भूमिका कायम ठेवणार आहोत?  

Saturday, October 20, 2018

Venice tour


वार, २० ऑक्टोबर, २०१८goo.gl/CRn1Te 


व्हेनिस शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

"बुधवारी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. रोममध्येच राहून व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर स्केअरमध्ये पोप बेनेडिक्ट यांचे प्रवचन ऐकणे किंवा त्या दिवशी व्हेनिस शहराला भेट देण्याचे. ठरवा काय करायचे, व्हेनिसला जायचे असेल तर रेल्वेची तिकिटे आजच बुक करावी लागतील.'  
युरोपच्या तीन आठवड्यांच्या सहलीवर जॅकलीन आणि मुलगी अदितीसह आलेलो असताना रोममध्ये काही दिवस तेथे घालवल्यानंतर फ्रान्सला परतण्याआधी आमच्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे मला काहीच अवघड नव्हते. एक तर गेल्या काही दिवसांत 'रोमा'  शहराच्या वास्तव्यात आम्ही तेथे चांगलेच रुळलो होतो. म्हणजे इटालियन भाषा येत नसली तरी प्राचीन वेशीच्या भिंतीने वेढलेल्या या शहरात तिकिटांचा संच आधीच  विकत घेऊन बसने व ट्रॅमने मुक्तपणे फिरण्याचा आत्मविश्वास आम्ही कमावला होता. 
रोममध्ये असलेल्या मात्र स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असलेल्या तिथल्या व्हॅटिकन सिटीला आम्ही अनेकदा गेलो होतो. तेथील सेंट पिटर्स स्केअर हा जगातील एक महत्त्वाचा लॅन्डमार्कच आहे. मायकल अँजेलोच्या कलाकृतीने अविस्मरणीय बनलेले व्हॅटिकनमधील सिस्टाईन चॅपेल आणि इतर वस्तुसंग्रहालय गॅलऱ्या मी अगदी बारकाईने पाहिल्या होत्या. गेली अनेक शतकांपासून नवीन पोपची निवड याच सिस्टाईन चॅपेलमध्ये होत असते. सेंट पीटर्स बॅसिलिकातील अगदीच दारापाशीच मायकल अँजेलोचे 'ला पिएता' (दु:खी माता) हे मारीया आपल्या पुत्राचे - येशू ख्रिस्ताचे - अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करते आहे हे दाखवणारे प्रसिद्ध संगमरवरी शिल्प अचानक दिसल्यावर मी काही क्षण जागीच खिळलो होतो. येशूचा शिष्य सेंट पिटर याच्या गादीवरचे वारस असणारे कॅथॉलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू असणारे पोप आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी सकाळी जगभरातून आलेल्या भाविकांना सेंट पिटर्स चौकात भेटत असतात. बुधवारचे पेपल ऑडियन्स या नावाने ही घटना ओळखली जाते. पोपसाहेबांचे दर्शन व्हावे, त्यांचे प्रवचन ऐकता यावे अशा रितीने ख्रिस्ती धर्मियांच्या दृष्टीने पवित्र भूमी असलेल्या रोमला भेट देणारे आपला दौऱ्याचा कार्यक्रम ठरवत असतात. त्यामुळे माझ्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.
मात्र मी ताबडतोब दुसऱ्या म्हणजे व्हेनिस भेटीच्या पर्यायाची निवड केली. याचे कारण म्हणजे यापूर्वी एकदा म्हणजे जॉन पॉल दुसरे १९८६ साली भारतभेटीवर होते तेव्हा गोव्यातील पणजीच्या मिरामार बीचशेजारच्या कम्पाल  ग्राऊंडवर झालेल्या त्यांच्या कार्यक्रमात मी पेपल ऑडियन्सचा म्हणजे पोप दर्शन सोहोळ्याचा  अनुभव घेतला होता. बाई आणि दादांना म्हणजे माझ्या आईवडिलांना या पोप भेटीसाठी मी मुद्दाम श्रीरामपूरहून गोव्याला आधीच बोलावून घेतले होते. हजारो धर्मगुरू, भारतीय उपखंडातील शंभराहून अधिक बिशप्स आणि मोठया संख्येने लाल टोपीधारी कार्डिनल्स उपस्थित असलेल्या या पोपमहाशयांच्या मिस्सविधीला लाखो भाविक हजार होते. पोप जॉन पॉल बुलेटप्रूफ काचेच्या पॉपमॉबाईलमधून भाविकांना भेटत हिंडले तेव्हा अगदी काही मीटर्सच्या अंतरावरून मी त्यांना पाहिले होते. (काही वर्षांपूर्वीच झालेल्या व्हॅटिकनमधील सेंट पिटर्स चौकात  पेपल ऑडियन्सदरम्यान खुल्या जीपमधून फिरताना एका माथेफिरुने केलेल्या गोळीबारात  पोप जॉन पॉल पोटात अनेक गोळ्या शिरूनही ह्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते आणि नंतर पोप म्हणून अलीकडच्या काळात सर्वाधिक कालावधीची म्हणजे २७ वर्षांची कारकीर्द  . पोप जॉन पॉल यांना लाभली होती !) याच भारत भेटीदरम्यान पोपमहाशयांनी पुण्याला भेट दिली तेव्हा अहमदनगर रोडवर रामवाडी मैदानावर झालेल्या त्याच्या मिस्साविधीला पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लोक हजर होते. माझा थोरला भाऊ लुईस त्यावेळी श्रीरामपूरहून आणि अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांच्या पदयात्रेत सहभागी झाला होता. यामुळे व्हेनिसचा दुसरा पर्याय असल्याने पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या पेपल ऑडियन्सला न जाण्याचे मी ठरवले.      
आमच्या युरोपच्या सहलीत ऐनवेळी आम्हाला इंग्लंडचा व्हिसा न मिळाल्याने शंगेन व्हिस्यावर इटाली आणि फ्रांस या दोन देशांतच सुट्टी घालविण्याचे आम्ही ठरवले होते. पाच दिवसांनंतर आम्ही पॅरिसला परतणार होते, त्यामुळे इटालीतील उरलेल्या दिवसांत व्हेनिसला जाण्याचे आम्ही ठरविले.रोमच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेथे बुकिंग क्लार्ककडे चौकशी केली तेव्हा रोम -व्हेनिस रेल्वे तिकीट माणशी पंच्याऐशी युरो होते. तीन आठवड्यांच्या युरोप दौऱ्यात आम्ही अत्यंत काटकसरीने वागत होते. पन्नास युरोच्या आत तिकीट असले तरच व्हेनिसला जायचे असे आम्ही ठरवले होते. मी ती खिडकी सोडणार तोच त्या क्लार्कने मला सांगितले कि ''थांबा, दुपारी एका स्लो ट्रेन आहे, आणि तिचे माणशी तिकीट पंचेचाळीस युरो आहे''. मी पटकन आम्हा सर्वांचे येण्याजाण्याचें तिकीट बुक करून टाकले.रोम ते व्हेनिस प्रवास पाच तासांचा होता. फास्ट ट्रेनने कदाचित तीन तास लागले असते. फ्रान्समध्ये पॅरिसहून लुर्डस या मेरीयन तीर्थक्षेत्राकडे जाताना फ्रान्सच्या रेल्वेप्रवासाचा अनुभव घेतला होता, आता इटालीचा हा रेल्वेप्रवास होता. रेल्वेमध्ये बहुसंख्य युरोपियन किंवा श्वेतवर्णीय प्रवाशी होते. आमच्या डब्यात तरी आम्हीच भारतीय किंवा आशियाई प्रवासी होतो. मध्ये कुठल्या तरी स्टेशनावर एका कुटुंब आमच्या डब्यात शिरले. आपल्या छोटया बाळाला घेऊन बसलेल्या त्या महिलेकडे जॅकलीन पाहतच राहिली. पूर्ण गौरवर्णीय कांती, पाठीवर खाली सोडलेले केस आणि कवेत प्रेमाने धरलेले ते बाळ! ''माय गॉड! अगदी मारीयाबाई आणि बाळ येशूची प्रतिकृती आहेत ना ही दोघे ! आपल्या नेहेमीच्या चित्रांत दिसणारी मॅडोना आणि बेबी जिझसच हुबेहूब दिसताहेत हे दोघे!!'' जॅकलीन मला म्हणत होती.माझ्या बायकोच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य होते. ती दोघे मायलेकरे अगदी चित्रांत दाखवल्या जाणाऱ्या मदर मेरी आणि बाळ येशूच्या अगदी प्रतिकृतीच होते. ''तुझे म्हणणे बरोबरच आहे. आपल्याकडे प्रचलीत असलेली येशू ख्रिस्ताची , मारीयाची आणि बायबलची सर्व पात्रे युरोपियन चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी युरोपियन प्रतिमांतूनच साकारलेली आहेत. खरं तर येशू ख्रिस्त, मारीया आणि त्याचे सर्व शिष्य यहुदी म्हणजे ज्यू, मध्य आशियातील, आपल्यासारखेच आशियाई होते. ख्रिस्ती धर्म युरोपियनांच्या माध्यमातून जगभर पसरला आणि मग त्या युरोपियन मिशनरींनी, चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी येशू, त्याची आई मारीया आणि त्याच्या सर्व प्रेषितांना गौरवर्णीय, हिरव्या, निळ्या रंगाच्या डोळ्यांत आणि सोनेरी केसांत उभे केले..'' मी हे म्हणालो. खरे तर मलासुद्धा त्या दोन मायलेकरांमध्ये मारीया आणि बाळ येशूच  दिसत होता, हे खरेच होते. आपल्याकडे राजा रविवर्माने महाराष्ट्रीयन शैलीत नऊवारी साडीत सीता आणि विविध देवतांच्या प्रतिमा उभ्या केल्या, अगदी तसाच हाही प्रकार होता.व्हेनिसच्या व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि विल्यम शेक्सपिअर्सने आपल्या 'मर्चन्ट ऑफ व्हेनिस' या अजरामर साहित्यकृतीने जगभर प्रसिद्ध केलेल्या एका ऐतिहासिक शहरात आपण प्रवेश करत आहोत याची सुखद जाणीव झाली. रेल्वे स्टेशनवरच एका केंद्रांत आम्ही आमचे हॉटेल बुक केले आणि दूरवर असलेल्या त्या हॉटेलकडे पायीच चालू लागलो. याचे कारण दुसरा पर्यायच नव्हता. सगळीकडे पाण्याने वेढलेल्या आणि या जलमार्गातील बोटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन असलेल्या शहरात आम्ही पोहोचलो होतो ! तिथे दुचाकी आणि चारचाकी वाहने नव्हतीच. आणि याच वैशिष्ठ्यपूर्ण कारणामुळे हे शहर संपूर्ण जगभर एका पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय झाले होते.हॉटेलमधल्या आमच्या रूममध्ये प्रवेश केला आणि चटकन कळाले की व्हेनिस हे पर्यटनस्थळ पॅरिसपेक्षाही महागडे आहे. पॅरीसच्या हॉटेलातील आमच्या रूमचे भाडे १०० युरो होते आणि या रूमचे भाडे १४० युरो असले तरी पॅरिसच्या रूमच्या मानाने ती कितीतरी छोटी होती. व्हेनिसची पहिली झलक आम्हाला मिळाली होती !नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठून बाहेर फिरण्यासाठी निघालो. समोरून जाणारी एक बोट किनाऱ्यापाशी आली आणि वृत्तपत्रांचा एका गठ्ठा ठेवून गायब झाली. थोडयावेळाने एक जण ती वृत्तपत्रे घेऊन गेला. पोलिसांची एक तुकडी आपल्या बोटीतूनच शहरात पेट्रोलिंग करत होती. एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यासाठी सगळीकडे छोटेछोटे आकर्षक पूल होते आणि या पुलांवर अनेक पर्यटक स्वतःचे फोटो काढून घेत होते. व्हेनिसच्या पाण्याच्या काठी उभ्या असणाऱ्या इमारतींची ठेवण अत्यंत आकर्षक आहे. यापैकी अनेक राजवाडे, चर्चेस, हवेल्या आणि इतर बांधकामे खूप जुन्या म्हणजे काही शतकांपूर्वी बांधल्या आहेत हे पाहताक्षणी लक्षात येत होते. आम्ही ज्या हॉटेलांत उतरलो होतो ते हॉटेलसुद्धा किमान एक शतक जुने असणार होते. विशेष म्हणजे कुठलेही बांधकाम परिसराशी सुसंगत असेल, विजोड किंवा कुरुप दिसणार नाही अशी राहील याची पूर्ण काळजी अनेक वर्षांपासून घेतली जात होती हे  पण स्पष्ट होते.संपूर्ण दिवस व्हेनिसच्या विविध भागांना भेटी देण्यास गेला. येथे संपूर्ण शहरांत एकही चारचाकी वाहन दिसले नाही, सर्व वाहतूक पाण्यातून म्हणजे नौकानयनाने होत होती. अगदी एक अँब्युलन्स सायरनचा आवाज करत गेली तीसुद्धा एक नौकाच होती! येथे स्थानिक लोकांपेक्षा पर्यटकांची संख्या अधिक होती हे रस्त्यारस्त्यावर घोळक्याने जाणाऱ्या, दुकानांत डोकावणाऱ्या लोंकांच्या वर्तनावरून दिसत होते.व्हेनिसला आले म्हणजे गंदोला नौकानयन व्हायलाच हवे म्हणून कुटुंबासह तोही सोपस्कार उरकून घेतला. पणजीत मांडवीवरचा पूल कोसळल्यानंतर म्हापशाला जायला आणि झुआरी नदीवर पूल नसताना मडगाव आणि वॉंस्कोला जाण्यासाठी बसमधून उतरून आगाशीतून कोरतालीम येथे बोटीने जावे लागायचे, त्यात खूप वेळ वाया जात असे आणि वैतागही  येत असे, त्याची यावेळी आठवण झाली. मात्र तरीसुद्धा व्हेनिसचे हे नौकानयन खूप खूष करून गेले याचे कारण म्हणजे या बोटीतून व्हेनिस शहराच्या अक्षरश: पाण्याच्या काठी उभ्या असलेल्या जुन्या सुंदर इमारतींचे, बंगल्यांचे, हवेलींचे आणि गल्लीबोळींचे अगदी जवळून दर्शन झाले. या गंदोला नौकानयनातच 'ग्रेट गॅम्बलर' या चित्रपटांत अमिताभ बच्चन आणि झीनत अमन यांच्यावर ' दो लफझो की है दिल की कहानी' या गीताचे चित्रीकरण झाले होते हे नंतर कळाले.त्या दोन दिवसांच्या भेटीत व्हेनिस शहराच्या गल्लीबोळांतून पायी हिंडलो. पाण्यात वसलेले एक शहर म्हणून व्हेनिसने सगळ्या जगात नाव कमावले आहे आणि इटालीच्या दौऱ्यावर असणारे बहुतेक पर्यटक या शहराला भेटी देतातच. रोमवरून व्हेनिसला जाताना आधी पादुआ हे एक रेल्वेस्टेशन आणि एक प्रसिद्ध ख्रिस्ती तीर्थक्षेत्र येते. ख्रिस्ती धर्मातील संत फ्रान्सिस झेव्हियरप्रमाणे एक नावाजलेला संत असलेल्या संत अँथनी ऑफ पादुआ याची ही कर्मभूमी. रोम आणि इटालीच्या सहलीवर असणारे ख्रिस्ती भाविक पादुआला हमखास भेट देतातच. कॅथॉलिक पंथामध्ये संतांचे एका आगळेवेगळॆ स्थान असते. चर्चने म्हणजे धर्मपीठाने अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला संतपदाचा सन्मान प्राप्त होतो. अनेक जणांना त्यांच्या मृत्यूनंतर तीन-चार शतकांनंतर संतपद मिळाले आहे. कोलकात्याच्या संत तेरेजा आणि पोप जॉन पॉल दुसरे यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांतच संतपद मिळाले. (माझा जन्म झाला तो दिवस संत कामिल याचा सण, म्हणून श्रीरामपूरचे त्यावेळचे धर्मगुरू असलेले जर्मन मिशनरी फादर आयवो मायर यांनी बाप्तिस्मा करताना या संतांचे नाव दिले. त्याकाळात अनेक पालक आपल्या अपत्याचे नामकरण करण्याचे अधिकार धर्मगुरूंना प्रदान करत असत.) आमच्याकडे वेळ कमी होता नाहीतर आम्हीही पादुआ येथे गेलो असतोच. मात्र व्हेनिसला येतांना आणि रोमला परत जाताना आमची रेल्वे पादुआ येथे थांबली तेव्हा त्या संतभूमीच्या स्टेशनावर उतरून प्लॅटफॉर्मवर भरपूर फोटो काढले. आता कधीकधी संत अँथनीचे नोव्हेना आणि फेस्तला (सण) हजेरी लावताना पादुआ तीर्थक्षेत्रालाही भेट द्यायला हवी होती अशी चुटपूट कधीकधी लागतेच.
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८goo.gl/CRn1Te 


व्हेनिस शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८


"बुधवारी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. रोममध्येच राहून व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर स्केअरमध्ये पोप बेनेडिक्ट यांचे प्रवचन ऐकणे किंवा त्या दिवशी व्हेनिस शहराला भेट देण्याचे. ठरवा काय करायचे, व्हेनिसला जायचे असेल तर रेल्वेची तिकिटे आजच बुक करावी लागतील.'  

युरोपच्या तीन आठवड्यांच्या सहलीवर जॅकलीन आणि मुलगी अदितीसह आलेलो असताना रोममध्ये काही दिवस तेथे घालवल्यानंतर फ्रान्सला परतण्याआधी आमच्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे मला काहीच अवघड नव्हते. एक तर गेल्या काही दिवसांत 'रोमा'  शहराच्या वास्तव्यात आम्ही तेथे चांगलेच रुळलो होतो. म्हणजे इटालियन भाषा येत नसली तरी प्राचीन वेशीच्या भिंतीने वेढलेल्या या शहरात तिकिटांचा संच आधीच  विकत घेऊन बसने व ट्रॅमने मुक्तपणे फिरण्याचा आत्मविश्वास आम्ही कमावला होता.

रोममध्ये असलेल्या मात्र स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असलेल्या तिथल्या व्हॅटिकन सिटीला आम्ही अनेकदा गेलो होतो. तेथील सेंट पिटर्स स्केअर हा जगातील एक महत्त्वाचा लॅन्डमार्कच आहे. मायकल अँजेलोच्या कलाकृतीने अविस्मरणीय बनलेले व्हॅटिकनमधील सिस्टाईन चॅपेल आणि इतर वस्तुसंग्रहालय गॅलऱ्या मी अगदी बारकाईने पाहिल्या होत्या. गेली अनेक शतकांपासून नवीन पोपची निवड याच सिस्टाईन चॅपेलमध्ये होत असते. सेंट पीटर्स बॅसिलिकातील अगदीच दारापाशीच मायकल अँजेलोचे 'ला पिएता' (दु:खी माता) हे मारीया आपल्या पुत्राचे - येशू ख्रिस्ताचे - अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करते आहे हे दाखवणारे प्रसिद्ध संगमरवरी शिल्प अचानक दिसल्यावर मी काही क्षण जागीच खिळलो होतो. येशूचा शिष्य सेंट पिटर याच्या गादीवरचे वारस असणारे कॅथॉलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू असणारे पोप आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी सकाळी जगभरातून आलेल्या भाविकांना सेंट पिटर्स चौकात भेटत असतात. बुधवारचे पेपल ऑडियन्स या नावाने ही घटना ओळखली जाते. पोपसाहेबांचे दर्शन व्हावे, त्यांचे प्रवचन ऐकता यावे अशा रितीने ख्रिस्ती धर्मियांच्या दृष्टीने पवित्र भूमी असलेल्या रोमला भेट देणारे आपला दौऱ्याचा कार्यक्रम ठरवत असतात. त्यामुळे माझ्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.

मात्र मी ताबडतोब दुसऱ्या म्हणजे व्हेनिस भेटीच्या पर्यायाची निवड केली. याचे कारण म्हणजे यापूर्वी एकदा म्हणजे जॉन पॉल दुसरे १९८६ साली भारतभेटीवर होते तेव्हा गोव्यातील पणजीच्या मिरामार बीचशेजारच्या कम्पाल  ग्राऊंडवर झालेल्या त्यांच्या कार्यक्रमात मी पेपल ऑडियन्सचा म्हणजे पोप दर्शन सोहोळ्याचा  अनुभव घेतला होता. बाई आणि दादांना म्हणजे माझ्या आईवडिलांना या पोप भेटीसाठी मी मुद्दाम श्रीरामपूरहून गोव्याला आधीच बोलावून घेतले होते. हजारो धर्मगुरू, भारतीय उपखंडातील शंभराहून अधिक बिशप्स आणि मोठया संख्येने लाल टोपीधारी कार्डिनल्स उपस्थित असलेल्या या पोपमहाशयांच्या मिस्सविधीला लाखो भाविक हजार होते. पोप जॉन पॉल बुलेटप्रूफ काचेच्या पॉपमॉबाईलमधून भाविकांना भेटत हिंडले तेव्हा अगदी काही मीटर्सच्या अंतरावरून मी त्यांना पाहिले होते. (काही वर्षांपूर्वीच झालेल्या व्हॅटिकनमधील सेंट पिटर्स चौकात  पेपल ऑडियन्सदरम्यान खुल्या जीपमधून फिरताना एका माथेफिरुने केलेल्या गोळीबारात  पोप जॉन पॉल पोटात अनेक गोळ्या शिरूनही ह्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते आणि नंतर पोप म्हणून अलीकडच्या काळात सर्वाधिक कालावधीची म्हणजे २७ वर्षांची कारकीर्द  . पोप जॉन पॉल यांना लाभली होती !) याच भारत भेटीदरम्यान पोपमहाशयांनी पुण्याला भेट दिली तेव्हा अहमदनगर रोडवर रामवाडी मैदानावर झालेल्या त्याच्या मिस्साविधीला पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लोक हजर होते. माझा थोरला भाऊ लुईस त्यावेळी श्रीरामपूरहून आणि अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांच्या पदयात्रेत सहभागी झाला होता. यामुळे व्हेनिसचा दुसरा पर्याय असल्याने पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या पेपल ऑडियन्सला न जाण्याचे मी ठरवले.      

आमच्या युरोपच्या सहलीत ऐनवेळी आम्हाला इंग्लंडचा व्हिसा न मिळाल्याने शंगेन व्हिस्यावर इटाली आणि फ्रांस या दोन देशांतच सुट्टी घालविण्याचे आम्ही ठरवले होते. पाच दिवसांनंतर आम्ही पॅरिसला परतणार होते, त्यामुळे इटालीतील उरलेल्या दिवसांत व्हेनिसला जाण्याचे आम्ही ठरविले.
रोमच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेथे बुकिंग क्लार्ककडे चौकशी केली तेव्हा रोम -व्हेनिस रेल्वे तिकीट माणशी पंच्याऐशी युरो होते. तीन आठवड्यांच्या युरोप दौऱ्यात आम्ही अत्यंत काटकसरीने वागत होते. पन्नास युरोच्या आत तिकीट असले तरच व्हेनिसला जायचे असे आम्ही ठरवले होते. मी ती खिडकी सोडणार तोच त्या क्लार्कने मला सांगितले कि ''थांबा, दुपारी एका स्लो ट्रेन आहे, आणि तिचे माणशी तिकीट पंचेचाळीस युरो आहे''. मी पटकन आम्हा सर्वांचे येण्याजाण्याचें तिकीट बुक करून टाकले.रोम ते व्हेनिस प्रवास पाच तासांचा होता. फास्ट ट्रेनने कदाचित तीन तास लागले असते. फ्रान्समध्ये पॅरिसहून लुर्डस या मेरीयन तीर्थक्षेत्राकडे जाताना फ्रान्सच्या रेल्वेप्रवासाचा अनुभव घेतला होता, आता इटालीचा हा रेल्वेप्रवास होता. रेल्वेमध्ये बहुसंख्य युरोपियन किंवा श्वेतवर्णीय प्रवाशी होते. आमच्या डब्यात तरी आम्हीच भारतीय किंवा आशियाई प्रवासी होतो. मध्ये कुठल्या तरी स्टेशनावर एका कुटुंब आमच्या डब्यात शिरले. आपल्या छोटया बाळाला घेऊन बसलेल्या त्या महिलेकडे जॅकलीन पाहतच राहिली. पूर्ण गौरवर्णीय कांती, पाठीवर खाली सोडलेले केस आणि कवेत प्रेमाने धरलेले ते बाळ! ''माय गॉड! अगदी मारीयाबाई आणि बाळ येशूची प्रतिकृती आहेत ना ही दोघे ! आपल्या नेहेमीच्या चित्रांत दिसणारी मॅडोना आणि बेबी जिझसच हुबेहूब दिसताहेत हे दोघे!!'' जॅकलीन मला म्हणत होती.माझ्या बायकोच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य होते. ती दोघे मायलेकरे अगदी चित्रांत दाखवल्या जाणाऱ्या मदर मेरी आणि बाळ येशूच्या अगदी प्रतिकृतीच होते. ''तुझे म्हणणे बरोबरच आहे. आपल्याकडे प्रचलीत असलेली येशू ख्रिस्ताची , मारीयाची आणि बायबलची सर्व पात्रे युरोपियन चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी युरोपियन प्रतिमांतूनच साकारलेली आहेत. खरं तर येशू ख्रिस्त, मारीया आणि त्याचे सर्व शिष्य यहुदी म्हणजे ज्यू, मध्य आशियातील, आपल्यासारखेच आशियाई होते. ख्रिस्ती धर्म युरोपियनांच्या माध्यमातून जगभर पसरला आणि मग त्या युरोपियन मिशनरींनी, चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी येशू, त्याची आई मारीया आणि त्याच्या सर्व प्रेषितांना गौरवर्णीय, हिरव्या, निळ्या रंगाच्या डोळ्यांत आणि सोनेरी केसांत उभे केले..'' मी हे म्हणालो. खरे तर मलासुद्धा त्या दोन मायलेकरांमध्ये मारीया आणि बाळ येशूच  दिसत होता, हे खरेच होते. आपल्याकडे राजा रविवर्माने महाराष्ट्रीयन शैलीत नऊवारी साडीत सीता आणि विविध देवतांच्या प्रतिमा उभ्या केल्या, अगदी तसाच हाही प्रकार होता.व्हेनिसच्या व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि विल्यम शेक्सपिअर्सने आपल्या 'मर्चन्ट ऑफ व्हेनिस' या अजरामर साहित्यकृतीने जगभर प्रसिद्ध केलेल्या एका ऐतिहासिक शहरात आपण प्रवेश करत आहोत याची सुखद जाणीव झाली. रेल्वे स्टेशनवरच एका केंद्रांत आम्ही आमचे हॉटेल बुक केले आणि दूरवर असलेल्या त्या हॉटेलकडे पायीच चालू लागलो. याचे कारण दुसरा पर्यायच नव्हता. सगळीकडे पाण्याने वेढलेल्या आणि या जलमार्गातील बोटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन असलेल्या शहरात आम्ही पोहोचलो होतो ! तिथे दुचाकी आणि चारचाकी वाहने नव्हतीच. आणि याच वैशिष्ठ्यपूर्ण कारणामुळे हे शहर संपूर्ण जगभर एका पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय झाले होते.हॉटेलमधल्या आमच्या रूममध्ये प्रवेश केला आणि चटकन कळाले की व्हेनिस हे पर्यटनस्थळ पॅरिसपेक्षाही महागडे आहे. पॅरीसच्या हॉटेलातील आमच्या रूमचे भाडे १०० युरो होते आणि या रूमचे भाडे १४० युरो असले तरी पॅरिसच्या रूमच्या मानाने ती कितीतरी छोटी होती. व्हेनिसची पहिली झलक आम्हाला मिळाली होती !नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठून बाहेर फिरण्यासाठी निघालो. समोरून जाणारी एक बोट किनाऱ्यापाशी आली आणि वृत्तपत्रांचा एका गठ्ठा ठेवून गायब झाली. थोडयावेळाने एक जण ती वृत्तपत्रे घेऊन गेला. पोलिसांची एक तुकडी आपल्या बोटीतूनच शहरात पेट्रोलिंग करत होती. एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यासाठी सगळीकडे छोटेछोटे आकर्षक पूल होते आणि या पुलांवर अनेक पर्यटक स्वतःचे फोटो काढून घेत होते. व्हेनिसच्या पाण्याच्या काठी उभ्या असणाऱ्या इमारतींची ठेवण अत्यंत आकर्षक आहे. यापैकी अनेक राजवाडे, चर्चेस, हवेल्या आणि इतर बांधकामे खूप जुन्या म्हणजे काही शतकांपूर्वी बांधल्या आहेत हे पाहताक्षणी लक्षात येत होते. आम्ही ज्या हॉटेलांत उतरलो होतो ते हॉटेलसुद्धा किमान एक शतक जुने असणार होते. विशेष म्हणजे कुठलेही बांधकाम परिसराशी सुसंगत असेल, विजोड किंवा कुरुप दिसणार नाही अशी राहील याची पूर्ण काळजी अनेक वर्षांपासून घेतली जात होती हे  पण स्पष्ट होते.संपूर्ण दिवस व्हेनिसच्या विविध भागांना भेटी देण्यास गेला. येथे संपूर्ण शहरांत एकही चारचाकी वाहन दिसले नाही, सर्व वाहतूक पाण्यातून म्हणजे नौकानयनाने होत होती. अगदी एक अँब्युलन्स सायरनचा आवाज करत गेली तीसुद्धा एक नौकाच होती! येथे स्थानिक लोकांपेक्षा पर्यटकांची संख्या अधिक होती हे रस्त्यारस्त्यावर घोळक्याने जाणाऱ्या, दुकानांत डोकावणाऱ्या लोंकांच्या वर्तनावरून दिसत होते.व्हेनिसला आले म्हणजे गंदोला नौकानयन व्हायलाच हवे म्हणून कुटुंबासह तोही सोपस्कार उरकून घेतला. पणजीत मांडवीवरचा पूल कोसळल्यानंतर म्हापशाला जायला आणि झुआरी नदीवर पूल नसताना मडगाव आणि वॉंस्कोला जाण्यासाठी बसमधून उतरून आगाशीतून कोरतालीम येथे बोटीने जावे लागायचे, त्यात खूप वेळ वाया जात असे आणि वैतागही  येत असे, त्याची यावेळी आठवण झाली. मात्र तरीसुद्धा व्हेनिसचे हे नौकानयन खूप खूष करून गेले याचे कारण म्हणजे या बोटीतून व्हेनिस शहराच्या अक्षरश: पाण्याच्या काठी उभ्या असलेल्या जुन्या सुंदर इमारतींचे, बंगल्यांचे, हवेलींचे आणि गल्लीबोळींचे अगदी जवळून दर्शन झाले. या गंदोला नौकानयनातच 'ग्रेट गॅम्बलर' या चित्रपटांत अमिताभ बच्चन आणि झीनत अमन यांच्यावर ' दो लफझो की है दिल की कहानी' या गीताचे चित्रीकरण झाले होते हे नंतर कळाले.त्या दोन दिवसांच्या भेटीत व्हेनिस शहराच्या गल्लीबोळांतून पायी हिंडलो. पाण्यात वसलेले एक शहर म्हणून व्हेनिसने सगळ्या जगात नाव कमावले आहे आणि इटालीच्या दौऱ्यावर असणारे बहुतेक पर्यटक या शहराला भेटी देतातच. रोमवरून व्हेनिसला जाताना आधी पादुआ हे एक रेल्वेस्टेशन आणि एक प्रसिद्ध ख्रिस्ती तीर्थक्षेत्र येते. ख्रिस्ती धर्मातील संत फ्रान्सिस झेव्हियरप्रमाणे एक नावाजलेला संत असलेल्या संत अँथनी ऑफ पादुआ याची ही कर्मभूमी. रोम आणि इटालीच्या सहलीवर असणारे ख्रिस्ती भाविक पादुआला हमखास भेट देतातच. कॅथॉलिक पंथामध्ये संतांचे एका आगळेवेगळॆ स्थान असते. चर्चने म्हणजे धर्मपीठाने अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला संतपदाचा सन्मान प्राप्त होतो. अनेक जणांना त्यांच्या मृत्यूनंतर तीन-चार शतकांनंतर संतपद मिळाले आहे. कोलकात्याच्या संत तेरेजा आणि पोप जॉन पॉल दुसरे यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांतच संतपद मिळाले. (माझा जन्म झाला तो दिवस संत कामिल याचा सण, म्हणून श्रीरामपूरचे त्यावेळचे धर्मगुरू असलेले जर्मन मिशनरी फादर आयवो मायर यांनी बाप्तिस्मा करताना या संतांचे नाव दिले. त्याकाळात अनेक पालक आपल्या अपत्याचे नामकरण करण्याचे अधिकार धर्मगुरूंना प्रदान करत असत.) आमच्याकडे वेळ कमी होता नाहीतर आम्हीही पादुआ येथे गेलो असतोच. मात्र व्हेनिसला येतांना आणि रोमला परत जाताना आमची रेल्वे पादुआ येथे थांबली तेव्हा त्या संतभूमीच्या स्टेशनावर उतरून प्लॅटफॉर्मवर भरपूर फोटो काढले. आता कधीकधी संत अँथनीचे नोव्हेना आणि फेस्तला (सण) हजेरी लावताना पादुआ तीर्थक्षेत्रालाही भेट द्यायला हवी होती अशी चुटपूट कधीकधी लागतेच.

व्हेनिस येथे पहिल्यांदाच येणारा प्रत्येक पर्यटक या शहराच्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्याने भारून जातो. रोमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा एक आगळावेगळा अनुभव आपण घेतला आहे याची जाणीव होती.व्हेनिस येथे पहिल्यांदाच येणारा प्रत्येक पर्यटक या शहराच्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्याने भारून जातो. रोमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा एक आगळावेगळा अनुभव आपण घेतला आहे याची जाणीव होती. 

Saturday, October 22, 2011

Visit to floating city Venice Amid waterways and architecture

Amid waterways and architecture
CAMIL PARKHE
Sakal Times
Monday, October 17, 2011 AT 03:15 PM (IST)
Camil Parkhe shares the thrill of gondola ride on the canals of ‘floating city’ Venice
 
We had just arrived from Rome to our next destination during our Europe tour. After alighting from the bullet train, all of us — my wife, daughter and I — were heading towards our hotel when we heard the siren. We looked in that direction and were shocked to see an ambulance moving speedily on waters. It was a speed boat with the familiar Red Cross symbol! Another siren followed and now it was a police team in another speed boat heading towards the site of their call. It took a few minutes to realise that we had arrived in Venice, the floating city where everything is surrounded by water and also moves on waters.
 
We had arrived on a fortnight-long Europe tour. Although Paris, Lourdes, Rome and Vatican were on our itinerary, Venice was included in it at the last moment as we failed to get the UK visa during our travel schedule. Some fellow travellers had strongly recommended us to visit Venice — a marvel city in the world. And here we were witnessing it within a few minutes of our arrival.
 
We checked into the hotel, refreshed ourselves and hurriedly came out again on the streets. Our stay in Venice was only for two days and so we were very eager to see how the city looked at night. A journalist colleague, who had been to Venice the previous year, had said that she was yet to come out of the chasm of this wonderful city. I could believe in her words now.
 
In Venice (spelled Venezia in Italian), one sees flowing water everywhere just like the land we see elsewhere. Venice is  a famous tourist centre and so we were surrounded by tourists everywhere — moving in pairs or groups, enjoying the boat rides, snapping photographs of the ancient castles and in the churches. The buildings, houses, churches, with typical Venetian Gothic architecture, are located right on the banks of the canals. Naturally, bridges here are in plenty, especially at the Santa Lucia Venezia railway station which is the heart of this famous city. In fact, almost all buildings and structures were not less than minimum 50 years old, our three-storeyed hotel was not an exception either. We did not see any structure with modern architecture, or perhaps they had taken good care to have build new structures in a such way that it would not be an eyesore amid the historic setting.
 
Ride in gondola (boats) in Venice is a must for every tourist, as it offers glimpses into the inner parts of the city. Pope Benedict XVI, who had been here just a couple of weeks before us, too was treated to a royal boat ride in the city. We had a ride  in gondola when the sun was setting; the view of the floating city, lit up with so many lamps everywhere, was just breathtaking. My daughter  went on clicking photographs to capture the beautiful setting.
 
The next morning, I watched a boatman throwing up a parcel of newspapers on the pavement near our hotel. There were also other boats carrying vegetables, stationary and other goods. I also snapped two photographs of a newly-married couple getting into a small hired boat.
 
The only downside of Venice is the high prices of the goods. Unlike the other tourist destinations in Europe, Venice is a costly affair.