पुण्यातील शनिवार पेठेतील `स्नेहसदन' या जेसुईट फादरांच्या संस्थेच्या वतीने दिवंगत पोप फ्रान्सिस यांना अलीकडेच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शतक ओलांडलेल्या `निरोप्या' या मराठी मासिकाचे संपादक फादर भाऊसाहेब संसारे आणि माधवराव खरात यांनी आयोजित केलेल्या या श्रद्धांजली सभेला
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच शेजारच्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक लोक आणि प्रगत पदवीधर संघटनेचे (पीपीएस) पदाधिकारी हजर होते.
पुणे येशूसंघीय (जेसुईट) प्रांताचे प्रांताधिकारी फादर आग्नेलो मस्करन्हेस, पुणे धर्मप्रांतीय व्यवस्थापक फादर रॉक अल्फान्सो, मेडिकल मिशन सिस्टर्स, बिबवेवाडी प्रमुख सिस्टर उषा गायकवाड (पोप फ्रान्सिस आणि स्त्रियांचा ख्रिस्तसभेमधील सन्मान व सहभाग) आणि मी स्वतः (कामिल पारखे ) यांचा वक्त्यांमध्ये समावेश होता.
या कार्यक्रमात सहभागी होण्यात मला खरोखर आनंद झाला.
जेसुईट फादर होण्यासाठी मी श्रीरामपूर सोडले १९७६ साली तेव्हा माझे गॉडफादर फादर प्रभुधर यांच्यासह येथे मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हापासून मी या संस्थेशी आजतागायत जोडले गेलेलो आहे.
हजारो ग्रंथ असलेल्या इथल्या ग्रंथालयात बसून मी महाराष्ट्र चरित्रकोशसह सातआठ पुस्तके लिहिली.
स्नेहसदन या संस्थेशी पुणेकरांचे फार जुने नाते आहे.
अनेक हौशी, प्रायोगिक मराठी नाटकांच्या तालमी येथे झालेल्या आहेत आणि पहिला अंक ( प्रवेश मूल्य ऐच्छिक ! ) येथेच झालेला आहे.
`स्नेहसदन'चे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांच्या काळापासून नानासाहेब गोरे , पु. ल. देशपांडे, मोहन धारिया, मेधा पाटकर यांच्यासह अनेकांचा येथे नेहेमीच वावर होता.
फादर भाऊसाहेब संसारे यांनी सांगितले कि या वास्तूत पुन्हा एकदा कार्यक्रम आयोजित केले जातील.
या कार्यक्रमात हजर असलेल्या लोंकांचे हे छायाचित्र.
उजवीकडे कोपऱ्यात संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांचा फोटो आहे.
Camil Parkhe May 17, 2025
No comments:
Post a Comment