रेस कोर्सनजिक असलेल्या सेंट पॅट्रिक्ट्स कॅथेड्रल्समध्ये जाऊन पुण्याचे नवनिर्वाचित बिशप फादर सायमन अल्मेडा यांची आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.
पुणे डायोसिसची स्थापना १८८६ साली झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धर्मप्रांताचे पहिले दोन बिशप जर्मन होते.
कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप या पदाचे महत्त्व आणि अधिकार चर्चबाहेरच्या इतरांना सहसा माहित नसतात.
बिशप हे त्यांच्या डायोसिसमधील असलेल्या सर्व धर्मप्रांतीय शैक्षणिक संस्था - शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि धर्मादाय संस्था यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात.
आताच्या पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली महसूल जिल्हे आणि कोल्हापूर शहर यांचा समावेश होतो.
एके काळी म्हणजे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्या कारकिर्दीच्या काळात १९८७ पर्यंत पुणे धर्मप्रांतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा भाग समाविष्ट होता.
गेल्या काही दशकांत नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग नवे धर्मप्रांत निर्माण झाल्याने पुणे धर्मप्रांताचे क्षेत्र कमी झाले आहे.
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सर्वधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून निवड झाल्याने हे पद गेले एक वर्षभर रिक्त होते.
त्याआधी थॉमस डाबरे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होईपर्यंत पुण्याचे बिशप होते.
प्रत्येक कॅथोलिक व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी संपर्क आलेला असतोच.
याचे कारण कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार (सांक्रामेंत ) देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो.
काही वर्षांपूर्वी फादर सायमन अल्मेडा आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे पाच वर्षे धर्मगुरु होते.
कॅथोलिक चर्चच्या अखत्यारीतल्या चर्चमधील धर्मगुरूंची आणि शाळांच्या प्राचार्यांची ठरविक काळानंतर बदली होत असते.
कॅथोलिक चर्चचे जगभर पसरलेले जाळे, या चर्चच्या विविध संस्थांचे विविध समाजघटकांत चालू असलेले कार्य आणि या चर्चचे व्यवस्थापन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे.
चर्चसारखे नेटवर्क असलेली जगात इतर कुठलीही संस्था वा संघटना नसावी.
फादर सायमन अल्मेडा यांच्या बिशपपदाची घोषणा पोप लिओ चौदावे यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमधून, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाकडून दिल्लीतून आणि पुण्यातील सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमधून एकाच दिवशी आणि एकाच क्षणी व्हावी, त्या घोषणेवेळी चर्चबेलचा घंटानादही व्हावा, या घटनेतून चर्चच्या जागतिक नेटवर्कची थोडीबहुत कल्पना यावी.
मी स्वतः गोव्यात जेसुईट फादर होण्यासाठी काही वर्षे उमेदवारी केली असल्याने कॅथोलिक चर्चच्या कामकाजाची आणि नियमांची मला थोडीफार माहिती आहे.
नूतन वर्षांरंभात फादर सायन अल्मेडा यांचा बिशप म्हणून दीक्षाविधी होईल.
नवनिर्वाचित बिशपांना शुभेच्छा !
Camil Parkhe
