Showing posts with label Metro. Show all posts
Showing posts with label Metro. Show all posts

Monday, July 27, 2026

 


या नव्या पिढीतील ही पोरंपोरी..

मी मिखाईल गोर्बाचेव्हच्या काळात सोव्हिएत रशियाच्या मॉस्कोत, क्रेमलीनमध्ये हिंडलो आहे.  सोव्हिएत ब्लॉकचाच एक भाग असलेल्या पूर्व युरोपातील बल्गेरियात माझे पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि एकमेव प्रशिक्षण पूर्ण झाले.  बल्गेरियाची राजधानी सोफिया आणि इतर शहरांत संध्याकाळी डिनर झाल्यानंतर पब्समध्ये व्होडका घेऊन संगीताच्या तालावर मनसोक्त नाचलो आहे.

त्याआधी सत्तरच्या दशकात सातारा जिल्ह्यातल्या दगडी बांधकाम असलेल्या आणि गुरुवार वगैरे पेठा असलेल्या कराड शहरात मी शिकलो आहे. कराडमध्ये माझा बालपणीचा काळ संपून उमेदीचा, तरुणाईचा कालखंड सुरु झाला. तरुणाईचे माझे अनुभव आणि आठवणी तिथपासून सुरु होतात.

हल्ली मी पुण्यात जाताना सिटी बसने जातो आणि संध्याकाळी घरी परतताना मेट्रोने प्रवास करतो. मेट्रोच्या या वातावरणात आणि प्रवासातून आजकालच्या तरुणाईचे होणारे दर्शन मला अचंबित करून जाते. कालचाच प्रसंग घ्या ना.

मुठा नदीवर असलेल्या मेट्रोच्या पुलावरुन मेट्रोच्या स्थानकात शिरताना पावसाची रिपरिप कालही चालू होती. माझ्या पायाच्या नखाला जखम झाल्याने त्या जखमेत पाणी शिरू नये, जखम चिघळू नये म्हणून मी काळजी घेत होतो.  

त्याचवेळी नदीवरील मेट्रोच्या पुलाच्या अगदी मधोमध फ्रॉकमधील एक मुलगी पावसात नाचत होती आणि तिच्याबरोबर असलेला तो मुलगा मोबाईलवर तिचे नाचणे टिपत होता.  सिटी बसने प्रवास करताना तरुणाईची अशी हलकीफुलकी, सहजगत्या वावरणारी दृश्ये नजरेस पडत नाही.  मेट्रोचा माहोल काही वेगळाच असतो.

डिस्ट्रिक्ट कोर्ट जंक्शनमध्ये ती दोन तरुणतरुणी एकमेकांच्या हातात हात घेऊन बाहेर पडली. येथून बहुधा त्यांच्या मेट्रोच्या लाईन्स बदलणार होत्या, कारण एकमेकांना जवळ घेऊन, आलिंगन घेऊन त्यांनी निरोप घेतला.  पाठ बदलल्यानंतर चित्रपटांत दाखवतात तसे त्यांनी पुन्हापुन्हा मागे वळून पाहिलेसुद्धा नाही.

या तरुणाईचा पेहराव खास असतो हे सांगायलाच नको.  जो तो आणि जी ती आपल्या मोबाईलमध्ये गुंग असते. त्यामुळे कोचमध्ये कितीही गर्दी असली तरी गोंगाट असा नावालाही नसतो. माझ्या रोजच्या मेट्रो प्रवासात या तरुणाईचे मोहक, आकर्षक आणि उत्साहवर्धक दर्शन घडते.

माझ्या समवयस्कातील पिढीने आपल्या तरुणाईच्या काळात इतिहास घडवला होता.  घोषित आणिबाणीआधी गुजरातमध्ये मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी मोठा उठाव केला होता. या बंडाचे लोण नंतर बिहारमध्ये पोहोचले.

घोषित आणीबाणीविरुद्ध तेव्हाच्या तरुणाईने किती मोठा संघर्ष केला होता हे खरे तर आता सांगायलाच हवे.  कराडच्या टिळक हायस्कुलात अकरावीत शिकताना माझेही त्यात अल्पसे योगदान होतेच.  ` इंडियन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी लॉस्ट इलेक्शन इन हर रायबरेली सिट' हे बीबीसी रेडिओवरून मध्यरात्री ऐकल्यानंतर सातारा मतदार मोजणी केंद्रात आम्ही केलेला जल्लोष आजही मला आठवतो.

विशेष म्हणजे त्यावेळी मी मतदार होण्यासाठी पात्रसुद्धा नव्हतो.  त्याकाळात मतदार नोंदणीसाठी, सज्ञान होण्यासाठी वयाची एकविशी गाठावी लागे. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी मतदारपदाची पात्रता एकवीस वर्षावरुन अठरा वर्षांपर्यंत खाली आणली. यामुळेच काँग्रेस पक्ष नंतर केंद्रातील सत्तेपासून दुरावला गेला असे काहींचे म्हणणे आहे.

आणीबाणीपर्वातल्या राजकीय क्रांतीने अनेक नेत्यांना जन्म दिला. अलीकडेच निधन झालेले युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे त्यापैकी एक.

मी शिकत असताना सत्तरच्या दशकात गोव्यात विद्यार्थी चळवळ खूप प्रभावी होती. आसामच्या विद्यार्थी आंदोलनाने तर देशात इतिहास घडवला. परकी नागरिकांच्या मुद्द्यावर ऑल आसाम स्टुडन्ट्स युनियनने निवडणूक जिंकून विद्यार्थी नेते प्रफुल्ल महंत वयाच्या ३२व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक वर्षे त्यांच्या नावावर होता.

काही वर्षांपूर्वी युरोपात फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये वावरताना तिथला अभ्यासलेला, वाचलेला इतिहास नजरेसमोर येत होता.  पॅरीस, रोम आणि व्हेनिसमध्ये फिरताना तिथल्या बोल्ड तरुणाईचे दर्शन घडले.  पॅरीसमध्ये एका मॉलमध्ये तिथल्या पोरसवदा कॅशियरशी संवाद साधताना त्याचे एक वाक्य आजही आठवते.

आम्ही भारतीय आहोत असे ऐकताच, ''इंडिया, ओह, शाह रुख खान्स इंडिया' असे तो उत्स्फूर्तपणे उद्गारला होता.  पॅरीस आणि इतर शहरांत फिरताना मला फ्रान्सची राज्यक्रांती आठवत होती तर त्या फ्रेंच मुलाला भारतीय अभिनेता शाह रुख खान आकर्षित करत होता.

आज रविवारी सकाळी ब्रून घेण्यासाठी बेकरीत गेलो होतो. तिथला पंचविशीतला भरगच्च केशसंभार असलेला पोरगा मला जंतर मंतरला काय, काय झाले ते मला ऐकवत होता.  तो मूळचा दिल्लीचा, त्याचा एक मित्र दिल्ली आंदोलनात होता, दुसरा एक अमेरीकेतून पाठबळ देत होता.  ''तुला हे सगळे काही कसे कळत होते?'' मी त्याला विचारले. ''मी कायम मोबाईलवर अपडेट्स घेत असतो,'' तो उत्तरला.

याच तरुणाईने देशात आता पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे.  आपले भवितव्य घडवण्यात या पिढीने पुढाकार घेतला आहे.

Camil Parkhe



Sunday, June 30, 2024

केंद्रीय मंत्री

 आज खूप दीर्घ काळानंतर भारतात केंद्रीय मंत्री अशी काही चीज असते हे लक्षात आले.

गेल्या दशकभरात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही दोनच नावे सगळीकडे झळकत होती, अधूनमधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत हे लक्षात यायचे.
रस्ते वाहतूक आणि टोल आकारणी संदर्भात नितीन गडकरी यांचे नाव निदान महाराष्ट्रात तरी लक्षात असते.
दोनअडीच वर्षांच्या त्या भीषण ऐन कोरोना काळात या देशाचे आरोग्यमंत्री आहेत का?, असल्यास कोण आहेत? अशी विचारणा अनेकदा झाल्याचे आपणा सर्वांना आठवत असेलच..
पुणे शहरात मेट्रोच्या विविध टप्प्यांचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनी पुण्यात वारंवार येऊन किंवा त्यांना वेळ नसल्यास दिल्लीतूनच ऑनलाईन केले. काही टप्प्यांचे काम अजून सुरू आहे, त्यामुळे ते पुन्हा अजूनही येतीलच.
त्यामुळे देशात रेल्वेमंत्री किंवा रेल्वे राज्य मंत्री कोण आहेत याची पुण्यातल्या आणि देशातल्या लोकांना कल्पना असेल असे वाटत नाही.
श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली, त्यामुळे काही राजकीय नेत्यांची नावे अणि त्यांनी देशात आणि महाराष्ट्रात सांभाळलेली मंत्रीपदे आजही तोंडपाठ आहेत.
उदाहरणार्थ, बांगलादेश निर्मितीप्रसंगी १९७१ साली परराष्ट्रमंत्री असलेले सरदार स्वर्णसिंग, आरोग्यमंत्री करण सिंग, अर्थमंत्री मधू दंडवते, परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी, नभोवाणी मंत्री लाल कृष्ण अडवानी, पहिले मनुष्यबळ संसाधन मंत्री पी. व्ही. नरसिंह राव, रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र, टी ए पै, जॉर्ज फर्नांडिस, नेहेमी काळा गॉगल वापरणारे गानी खान चौधरी, ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव, संरक्षण मंत्री मुलायम यादव आणि शरद पवार, अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख, वगैरे वगैरे.
या केंद्रीय मंत्र्याची नावे आणि खाते लक्षात राहण्याचे कारण म्हणजे हे मंत्री खरेच त्यांच्या खात्याचा कारभार सांभाळायचे, त्यांच्या खात्याच्या कामासाठी देशभर हिंडायचे, त्यांचे फोटो आणि बातम्या देशभर वृत्तपत्रांत जाहिरातीत आणि इतरत्र झळकायचे.
त्यांच्या खात्याबाबत हे मंत्री पत्रकार परिषदा घेत असत, धोरणे ठरवत असत, निर्णयसुद्धा स्वतः घेत असत.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या सहा महिन्यात पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते.
त्या काळात त्यांनी पुणे, शिवाजीनगर आणि चिंचवड रेल्वे स्थानकांचा केलेला कायापालट आजही नजरेसमोर दिसतो.
भारतीय लोकशाही व्यवस्थेत गेले दशकभर हे सर्व बंद झाले होते.
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला हे वाचून हे मंत्री नक्की होते तरी कोण याबाबत मला उत्सुकता वाटली आणि त्या तीन मंत्र्यांची नावे मला कळाली.
उत्सुकता असल्यास तुम्हीही ही तीन नावे शोधू शकता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा रामदास आठवले यांनी आपल्या खात्याशी निगडित असलेल्या कुठल्या कार्यक्रमाचे कधी उद्घाटन केल्याचे किंवा पत्रकार परिषद घेतल्याचे आठवते का?
जिथे राष्ट्राचे आणि संसदेचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपती यांचें पदसिध्द असलेले अधिकार आणि परदेशात देशाचे प्रतिनिधित्व वगैरे कामेसुद्धा त्यांना करु देली जात नाही, तिथे केंद्रीय किंवा राज्यमंत्री असलेल्या लोकांची काय अवस्था असेल?
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे कालपरवा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री असलेल्या जनता दल (सेक्युलर ) पक्षाच्या एच. डी. कुमारस्वामी यांचे त्यांच्या खात्याशी निगडित असलेले एक विधान वाचले.
आपण यासंदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊ ,असे त्यांचे ते विधान होते.
आज त्यांनी त्याबाबत सारवासारव केल्याची बातमी आहे.
बैलाला आणि रेड्याला औताला, जोत्याला जुंपण्याआधी ठराविक सोपस्कार करावे लागतात, ते बहुधा या नव्या राजवटीत अजून झालेले नसावे.
केंद्रात नव्या आघाडी सरकारच्या राजवटीत ते शक्य नसल्यास लोकशाही व्यवस्थेसाठी ती इष्टापत्ती म्हणावी लागेल.
Camil Parkhe.