Tuesday, August 12, 2025

 

अँजेला त्रिंदाद  यांची भारतीय शैलीतील ख्रिस्ती चित्रे

 इतर कुठल्याही धर्मग्रंथांप्रमाणे बायबलमध्येसुद्धा स्त्रियांना गौण किंवा नगण्य स्थान आहे. संपूर्ण बायबलमध्ये म्हणजे जुन्या आणि नव्या करारांत स्त्रियांची पात्रे क्वचितच आढळतातअनेकदा या पात्रांना स्वतःचा चेहेरा, नावगाव म्हणजे ओळखसुद्धा नसते. अमुक याची आई, तमुकची पत्नी, एलीया या संदेष्ट्याला ऐन दुष्काळात तेल आणि पीठ पुरवणाऱ्या स्त्रीची ओळखसुद्धा शेवटपर्यंत `एक गरीब विधवा' अशीच राहते.

जुन्या करारात पहिला मानव असलेल्या आदामची सहचारिणी इव्ह, नुकत्याच जन्मलेल्या मोझेसचा जीव क्लुप्तीने वाचवणारी त्याची आई आणि बहिण,  रुथ, राणी इस्थेर अशा काही मोजक्याच  स्त्रियांना थोडेफार स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. 

नव्या करारात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतरच्या भागातसुद्धा काही मोजक्याच स्त्रियांची पात्रे येतात.  येशूची आई  मारीया, सेंट जॉन बॅप्टिस्टची आई एलिझाबेथ. मेरी माग्दालेन आणि कुकर्म करत असताना पकडलेली आणि त्यामुळे मॉब लिंचिंगची बळी होऊ शकणारी एक स्त्री येशूमुळे वाचते.

त्याचे कारण म्हणजे `तुमच्यापैकी जो कुणी निष्पाप  असेल  त्याने हिच्यावर पहिला धोंडा  उचलावा' असा येशूचा त्या झुंडशाहीला सल्ला असतो.

बायबलमधल्या जुन्या करारातील सर्व नायक, राजे आणि संदेष्टये पुरुषमंडळी आहेत.  नव्या करारात  येशूच्या बारा शिष्यांमध्ये एकही स्त्री नाही. त्याचप्रमाणे नव्या ख्रिस्ती मंडळींना पत्रे लिहून  ख्रिस्ती  धर्मतत्त्वांची मांडणी करणाऱ्या सेंट पॉल, सेंट पिटर, सेंट जॉन  वगैरे व्यक्तींमध्येही एकाही महिलेला जागा नाही.   

`बायबलमधील स्त्रिया' या एकाच शिर्षकाची मराठीत अलीकडेच दोन नवी पुस्तके आली आहेत. एक आहे सरोजिनी नीलकंठ साळवी यांनी लिहिलेले. (चेतक बुक्स, पुणे ) आणि दुसरे आहे डॉ. अनुपमा निरंजन उजगरे, वर्णमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलेले. बायबलमध्ये किंवा इतर कुठल्याही धर्मग्रंथांत स्त्रियांची पात्रे पुरुषांच्या  तुलनेने खूप कमी आढळतात, मात्र यातून या धर्मग्रंथांचे उणेपण दिसून येत नाही,. याचे कारण म्हणजे  संपूर्ण जगात त्यात्या काळी आणि आजही सर्वच क्षेत्रांत असलेले पुरुषी वर्चस्व.   

इतर विविध क्षेत्रांप्रमाणेच भारतात आणि जगातही फार कमी संख्येने महिलांनी चित्रकलेत नाव कमावले आहे. भारतातल्या  पहिल्या काही महिला चित्रकारांमध्ये  मूळ गोव्याच्या असलेल्या अँजेला त्रिंदाद (१९०९-१९८०)  यांचा समावेश होतो.

साधना बहुलकर  यांनी लिहिलेल्या `बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार (१८५७-१९५०)'  या पुस्तकाचे (राजहंस प्रकाशन, २०२१) मुखपृष्ठ वैष्टिट्यपूर्ण  आहे. आहे. या मुखपृष्ठावर एकूण चार चित्रे आहेत आणि त्यापैकी एक चित्र अर्धे पानभर आहे. अँजेला त्रिंदाद यांनी काढलेल्या या चित्रात झाडाखाली बसलेले भगव्या वस्त्रांतले एक गुरु शेजारी एक मडके घेऊन उभ्या असलेल्या स्त्रियेला काही सांगत आहेत आणि या गुरूच्या चरणाशी बसलेली आणखी एक स्त्री आहे.

विशेष म्हणजे हे चित्र भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करून काढलेले आहे. दोन्ही स्त्रिया घागरा वगैरे भारतीय पारंपरिक वेशात आहे, भारतीय  स्त्रियांप्रमाणे त्यांनी  हातांत, गळ्यांत आणि कानांत  विविध आभूषणे \घातली आहेत, डोक्यावरून पदर घेतलेला आहे. त्याशिवाय  चित्रात झाडाखाली एक तुळशी वृंदावनसुद्धा आहे. खास भारतीय शैलीत  काढलेले हे चित्र पाहून त्यामागचा संदर्भ बहुतेक बिगरख्रिस्ती लोकांना चटकन समजणार नाही. या चित्रातील दोन महिला आणि ते गुरु  कोण आहेत, त्यांच्यात काय संभाषण चालू आहे याचे स्पष्टीकरण दिल्याशिवाय समजणार नाही. 

मात्र या चित्राचा संदर्भ बायबल अगदी थोडेफार माहित असलेल्या  व्यक्तीला अगदी सहज देता येईल. .या दोघी बहिणी आहेत मारिया आणि मार्था. दोन प्रसंगांत या दोन बहिणींचा येशूच्या चरित्रात  म्हणजे शुभवर्तमानांत – गॉस्पेलमध्ये - होतो.

वरील चितारलेल्या प्रसंगाचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोकृत `सुबोध बायबल'मध्ये खालील शब्दांत वर्णन आहे :

``प्रवास करीत असता येशू बेथानीला आला, तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले, तिला मारीया नावाची बहीण होती. ती प्रभूच्या चरणी बसून त्याची अमृतवाणी ऐकत होती. स्वयंपाकघरात मार्थाला पाहुणचाराचे पुष्कळ काम पडल्यामुळे  तिची तारांबळ उडाली. ती येशूकडे येऊन त्याला म्हणाली "प्रभुजी, माझ्या बहिणीने कामाचा सगळा भार माझ्या एकटीवर टाकला आहे. ह्याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? मला मदत करायला तिला सांगा ना:" 

प्रभुने  तिला उत्तर दिले, ' मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी  काळजी दगदग करतेस,  परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मारीयेने जे चांगले आहे, त्याची निवड केली आहे. ते तिच्यापासून हिरावून घेतले जाणार नाही.''

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील कलेचे शिक्षण पूर्णतः पाश्चिमात्य धाटणीचे होती, अशाप्रकारे भारतीय कलेचे एक नवे पर्व सुरु झाले. ब्रिटिशकाळात बंगाल स्कुल ऑफ आर्ट आणि मुंबई स्कुल ऑफ आर्ट या दोन कलाशाखा उगमास आल्या, त्यापैकी अँजेला  त्रिंदाद या मुंबई स्कुल ऑफ आर्ट  परंपरेतील.

मुंबई विद्यापीठाची स्थापना  १८ जुलै १८५७  रोजी  झाली होती.  त्याच्याआधी काही महिने म्हणजे मार्च १८५७ रोजी मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली होती. जमशेटजी जीजीभाई  यांनी या संस्थेच्या उभारणीसाठी  एक लाख रुपयाची देणगी सरकारला दिली त्यामुळे त्यांचेच नाव या कला शाळेला देण्यात आले. सध्याची जेजे स्कूल ऑफ आर्ट ची  वास्तू  १८७८ साली उभारण्यात आली आणि त्यासाठी जमशेटजी जीजीभाई   यांचे  चिरंजीव रुस्तुमजी यांनी दिड लाख रुपयांची देणगी दिली होती

अँजेला त्रिंदाद  आणि  अंबिका धुरंधर (१९०९- २००९)   या महाराष्ट्रातील आद्य महिला चित्रकार आहेतबॉम्बे स्कूल कला परंपरेतील आद्य महिला चित्रकार  असलेल्या  या दोघींनीही जे.जे.  स्कूल ऑफ मध्ये शिक्षण घेतले आणि या दोघांचेही वडील त्या काळातले ख्यातनाम चित्रकार होतेमुंबईत जन्मलेल्या अँजेला त्रिंदाद यांचे एक  प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारतीय परंपरेतील म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करुन  ख्रिस्ती धर्मसंकल्पनांतील अनेक चित्रे  रेखाटली. वर नमूद केलेले हे चित्र यापैकी एक आहे.

अँजेला त्रिंदाद यांचे वडील अंतोनिओ शेव्हियर त्रिंदाद हेसुद्धा त्याकाळातले  प्रख्यात चित्रकार होते. अँजेला  यांच्या आईचे नाव फ्लोरेंटिना  होते. सात भावंडे असलेल्या अँजेला यांचे बालपण मुंबईत माहिम येथे  गेले. त्यांचे वडील अंतोनिओ त्रिंदाद हे जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये २८ वर्षे कला शिक्षक होते. एम. व्ही.  धुरंधर हे अंबिका धुरंधर यांचे वडील अंतोनिओ यांचे सहकारी होते.  

आपल्या वडलांकडून अँजेला यांनी कलेचे धडे गिरवले आणि नंतर जे. जे ,स्कुल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जेजेमध्ये १९२६ ते १९३२ या काळात अँजेला विद्यार्थी असताना त्यांचे वडील तिथे शिक्षक होते.  याच काळात जेजे स्कुलमध्ये शिक्षक असणारे जे. एम.  अहिवासी  आणि प्राचार्य डब्ल्यु  इ. ग्लॅडस्टोन  सालोमन यांच्या त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला आणि  या दोघांमुळे अँजेला त्रिंदाद भारतीय  पुनरुज्जीवनवादी कलेच्या  किंवा  इंडियन रिव्हायव्हलिस्ट  मुव्हमेन्टच्या एक प्रमुख चित्रकार बनल्या.  ग्लॅडस्टोन सालोमन यांनी भारतीय कलेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास वर्ग सुरु केले आणि त्यांच्या या वर्गात सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांत अँजेला यांचा समावेश होता 

 ख्रिश्चन आणि बायबलमधील संकल्पनावरील आधारीत चित्रांमधील रुढ वसाहतवादी प्रभाव दूर करुन खास भारतीय प्रतिमा आणि शैली वापरुन भारतीय  ख्रिस्ती कला हा प्रवाह समृद्ध करण्याचे योगदान अँजेला त्रिंदाद  यांनी केले आहे.   या भारतीय पुनरुज्जीवन प्रवाहाचा एक भाग म्हणून अँजेला यांच्या चित्रांत पात्रांना  भारतीय पेहेराव,   तुळशी वृंदावन, हाताची मुद्रा, कमळ,  छात्र, वगैरे प्रतीके झळकतात.  मॅडोना अँड चाईल्ड म्हणजे बाळ येशूसह मदर मेरी या विषयावर अँजेला त्रिंदाद यांनी अनेक चित्रे रेखाटली आहेत.

मात्र भारतीय शैलीत ख्रिस्ती संकल्पनांवर चित्रे काढणाऱ्या अँजेला या पहिल्याच किंवा एकमेव चित्रकार नाहीत. अगदी मुघल सम्राट अकबर यांच्या काळापासून भारतीय शैलीत ख्रिस्ती चित्रे काढण्याची परंपरा आढळते.  अँजेला यांचेच समकालीन असणारे अँजेलो दा फोन्सेका (१९०२-१९६७)  यांनीही भारतीय प्रतिमांचा वापर करत ख्रिस्ती धर्मावर आधारित चित्रे रेखाटली आहेत. फोन्सेका यांचा जन्म गोव्यातलाच. फोन्सेका यांनीसुद्धा जे. जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला, मात्र नंतर ते कोलकात्याला गेल्यानंतर बंगाल स्कुल आर्ट परंपरेचा  त्यांच्यावर  प्रभाव पडला. अँजेलो द फोन्सेका  हे  बंगाल आणि  बॉंबे  या दोन्ही  कला  परंपरेतील समतोल साधणारे अखिल भारतीय चित्रकार आहेत असे कला समीक्षक विवेक मिनेझेस यांनी म्हटले आहे.

आर्ट इंडिया, पुणे या जेसुईट फादरांच्या संस्थेने यांची अनेक ख्रिस्ती धार्मिक चित्रे ग्रिटींग कार्ड्स, पोस्टर्स साठी छापली होती. अँजेला त्रिंदाद  यांची चित्रे अनेक प्रकाशनसंस्थांनी आपल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी वापरली होती. अँजेला त्रिंदाद यांनी चितारलेल्या महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांची व्यक्तित्रांचा समावेश होतो.  

ख्रिस्ती धर्मसंकल्पना आपल्या चित्रांत भारतीय प्रतिमांसह म्हणजे पूर्णतः भारतीय शैलीत आणणाऱ्या चित्रकार अँजेला त्रिंदाद यांचे फार मोठे योगदान आहे. 

पोर्तुगीज सरकारतर्फे ` हॉल ऑफ जस्टीस'  शिर्षकाचे  गोव्यातील संत फ्रान्सिस झेव्हियरच्या कार्याबाबत चित्र बनवण्यासाठी  अँजेला त्रिंदाद  यांना आमंत्रित करण्यास  आले होते. गोवा त्याकाळात  पोर्तुगालचाच भाग होता. अँजेलाच्या ख्रिस्ती संकल्पनाविषयीच्या चित्रांसाठी रोममध्ये पोप बारावे पायस यांच्या हस्ते अँजेला यांचा  १९५५ साली सत्कार करण्यात आला. त्यावेळी पोपकडून त्यांना `प्रो एक्लेशिया एत पॉंतिफिस'   (चर्च आणि पोप यांच्यासाठी) हे पेपल डेकोरेशन किंवा 'किताब प्रदान करण्यात आला.  


भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीतील अँजेला यांच्या चित्रांनी निश्चितच एक वेगळी उंची गाठली आहे असे साधना बहुलकर यांनी म्हटले आहे. .``बायबलमधील किंवा  ख्रिस्तजीवनाच्या अन्य प्रसंगांवरील पुनरुज्जीवनवादी शैलीतील चित्रे हे अँजेला यांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य'' असे त्या म्हणतात.   

अँजेला यांची एक विवाहित  बहीण  एस्थेर अमेरिकेत स्थायिक झाली होती. ख्रिस्ती धार्मिक कला या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या अँजेला यांनी युरोप आणि अमेरिकेला अनेकदा भेटी देऊन तिथे आपल्या चित्रांचे प्रदर्शने भारावली, व्याख्याने दिली.  न्यूयॉर्क येथील आपल्या बहिणीकडे कायमचे राहण्यासाठी  त्या  अमेरिकेत  १९६८ साली आल्या आणि शेवटी १९७८  साली आपल्या बहिणीसह राहण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते.    

समकालीन स्त्री चित्रकारांच्या तुलनेत अँजेला यांच्या चित्र काढण्यात सातत्य होते आणि त्यांच्या चित्रनिर्मितीचा परीघ विस्तृत होता. ''त्या  बॉंबे स्कूल परंपरेच्या मुशीत घडलेल्या, तडफदार व्यक्तिमत्वाच्या, विविध शैलींत दर्जेदार काम करणाऱ्या हुन्नरी स्त्री-चित्रकार होत्या,'' असे  अँजेलाच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन बहुलकर करतात. 

अँजेला यांचे आपले वडील अंतोनिओ त्यांच्यावर खूप प्रेम होते. आपल्या वडलांच्या अखेरच्या आजारात त्यांनी त्यांची शुश्रूषा केली होती. आपल्या वडलांच्या चित्रांचे भारतात किंवा अमेरिकेत जतन व्हावे यासाठी अँजेला नि अमेरिकेतील बहीण यांनी अतोनात प्रयत्न केले, त्यासाठी खूप खर्चही केला,. ब्राझील येथे आपली दुसरी बहीण  अंतोनिते  हिच्याकडे अँजेला १९७९च्या नोव्हेंबरात  गेल्या तेव्हा तिथे त्या आजारी पडल्या आणि तिथेच त्यांचे   २० मार्च १९८० रोजी निधन झाले. त्यानंतर  त्यांची बहीण एस्थेर यांचे १९९५ ला निधन झाले.  आपल्या पित्याच्या चित्रांचे जतन करण्यासाठी संग्रहालय व्हावे ही या दोन बहिणींची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही.

अखेरीस अंतोनिओ आणि अँजेला यांच्या काही चित्रांचे संवर्धन अखेरीस त्यांच्या मूळच्या प्रदेशात म्हणजे गोव्यातच  झाले.  पणजीमध्ये  फॉंटइनेस येथे  फुन्दाकाओ ओरिइंते म्युझियम  या पोर्तुगाल संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या गॅलरीत या चित्रकार पितापुत्रींच्या कलाकृती  जपून ठेवण्यात आल्या आहेत. अँजेला यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या बहिणीने स्थापन केलेल्या ए. एक्स. त्रिंदाद  फौंडेशनने पितापुत्रीच्या चित्र कलाकृती संवर्धनासाठी फुन्दाकाओ ओरिइंते म्युझियमकडे  स्वाधीन केल्या होत्या. हे दालन  २०१२ साली कलारसिकांसाठी खुले झाले.  त्यामुळे या महान चित्रकार असलेल्या  बापलेकींच्या काही  मूळ कलाकृती पुढच्या  पिढींना  पाहण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.    


Camil  Parkhe 

  %%%%

 


Wednesday, July 30, 2025


श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना आमच्या पारखे टेलरिंग दुकानासमोर असलेल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात मी जाऊ लागलो. तिथे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचण्याची सवय लागली. नंतर हे वाचनालय स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले तेव्हा जरासे दूर अंतरावर असलेल्या या नव्या इमारतीत मी जाऊ लागलो. चारपाच वर्षांनी शिक्षणासाठी मीच श्रीरामपूर सोडले, गोव्यात कॉलेज शिक्षणासाठी आणि व्यवसायानिमित्त राहिलो, औरंगाबाद आणि पुण्यात इतकेच नव्हे तर युरोपात राहिलो पण माझे वाचन कायम राहिले. पुस्तकांची साथ मी सोडली नाही आणि ही पुस्तके कायम माझी साथीदार बनून राहिली आहेत.
माझ्या वाचनाच्या आवडीचा श्रीगणेशा झाला तो श्रीरामपुरच्या नगरपालिका लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बालविभागात. तिथे जगातल्या विविध नामवंतांची विविध भाषांतली मराठीत आणलेली पुस्तके होती. इथे मी संस्कृतमधल्या शाकुंतल, मेघदूत, मृच्छकटिक अशा साहित्यरचना वाचल्या तशीच इसापनीती, ग्रीक भाषेतली इलियड ही पुस्तके वाचली आणि भा. रा. भागवत यांची `फास्टर फेणे' हा नायक असलेली पुस्तके, रवींद्रनाथ टागोरांची साने गुरुजींनी मराठीत आणलेली कितीतरी पुस्तके आणि कादंबऱ्या वाचल्या.
विल्यम शेक्सपियरची अनेक नाटके मी या शालेय जीवनात वाचून काढली. या सर्वच पुस्तकांची कथानके आणि पात्रे आज आठवत नसली तरी त्या काळात या पुस्तकांनी मला भुरळ घातली होती हे नक्की. मराठीतलं ‘ऑल टाइम बेस्ट सेलर’ ठरलेलं साने गुरुजींचं 'श्यामची आई' पण वाचलं. नंतर आचार्य अत्रे यांचं तीन-चार खंडांत असलेलं 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र वाचलं. खूप वर्षांनंतर विस्टन चर्चिल यांनीही असंच खंडात्मक लिहिलेलं आत्मचरित्र सहज चाळलं.
माध्यमिक शाळेत आल्यावर मग वडिलांकडे हट्ट लावून या लोकमान्य टिळक वाचनालयाची वर्गणी भरली आणि मोठमोठ्या लेखकांची पुस्तके वाचायचा सपाटाच लावला. यापैकी काही लेखक आणि त्यांच्या नावाजलेल्या, आजही मनावर भूरळ असलेल्या साहित्यकृती आजही आठवतात.. मराठीतले पहिले ज्ञानपीठ वि. स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीला १९७४ साली मिळाले आणि लगेच ही कादंबरी वाचून काढली आणि मग खांडेकरांच्या 'दोन मेघ' सारख्या इतर पुस्तकांचा वाचून फडशा पाडला.
कुणा लेखकाचे एखादे पुस्तक आवडले कि मग लगेच त्याची इतरही पुस्तके वाचायला घ्यायची असा प्रकार असायचा. या पद्धतीने मी पु. ल. देशपांडे यांची 'बटाट्याची चाळ', असा मी असामी' वगैरे पुस्तके वाचली. शंकर पाटील, द, मा. मिरासदार, त्यावेळच्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत, रविंद्र गुर्जर यांनी मराठीत आणलेली 'पॉपिलॉन' `गॉडफादर’ सारखी पुस्तके वाचली. त्या सत्तरच्या दशकात गुरुनाथ नाईक यांच्या गुप्तहेरांच्या, रहस्यकथा असलेल्या पुस्तकांच्या मालिका इतर वाचकांप्रमाणे मलाही भुरळ घातली होती.
`ललित' या मासिकात `ठणठणपाळ' या सदरात हातात हातोडा घेऊन भारदस्त मिशी असलेल्या व्यक्तीच्या चित्रासह लिखाण प्रसिद्ध व्हायचे. नंतर ते सदर जयवंत दळवी लिहित असत असा यथाकाश गौप्यस्फोट झाला आणि मग जयवंत दळवी यांची खूप पुस्तके वाचली.
लहानपणी घरी `चांदोबा’ मासिक यायचे, त्यातले `विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही; या वाक्याने सुरु होणारे सदर आणि महाभारतातल्या विविध कथा रंगीत चित्रांसह देणारे सदर माझे अत्यंत आवडीचे. महाभारताच्या या कथामालिकेमुळे या महाकाव्याच्या कायमच्या प्रेमात पडलो. त्यामुळे महाभारतातील पात्रे आणि उपाख्याने मला अगदी दुष्यंत, भरतापासून तो थेट राजा परिक्षित आणि जन्मेजय आणि उषा -अनिरुद्ध या प्रेमी युगुलापर्यंत परिचित आहेत किंवा अधुंकसे आठवतात. `बायबल’मधली पात्रे आणि छोटीमोठी कथानके आठवतात अगदी तसेच.
पुढच्या काळात दुर्गा भागवत यांचे `व्यासपर्व’ आणि कॉम्रेड शरद पाटील यांचे महाभारतावरील विश्लेषण तर खूपच भावले. आजही महाभारतावर काहीही लिहिलेले दिसले की अधाशासारखे मी वाचतो. महाभारतावर नऊ तास चालणारे नाटक दिग्दर्शित करणारे पिटर ब्रुक यांचे या जुलै महिन्यात निधन झाले तेव्हा त्यांच्यावर इंग्रजी आणि मराठी दैनिकांतले आलेले लेखसुद्धा अशाच उत्सुकतेने वाचले.
गो. नि. दांडेकर यांच्या 'मृन्मयी', 'कुणा एकाची भ्रमणगाथा' या कादंबऱ्या वाचल्या. गोनिदांची आगळीवेगळी लेखनशैली खूप भावली आणि रणजित देसाई यांच्या `स्वामी’ आणि `श्रीमान योगी’ या कादंबऱ्याने मला पार इतिहासकाळात फिरवून आणले होते.
`स्वामी'मधला एक प्रसंग मी आजपर्यंत विसरलो नाही. पेशवे माधवरावांनी कोठडीत ठेवलेल्या राघोबा दादांना भेटायला साडेतिन शहाण्यातील एक असलेले सखाराम बापू बोकिल आल्यावर बुद्धीबळाचा खेळ होतो. तेव्हा या खेळादरम्यान 'तुमचा राजा दोन घरे मागे घ्या' असा सल्ला दिला जातो. या सल्ल्याची माधवरावांना कल्पना दिली जाते. पेशव्यांच्या मदतीसाठी नागपूरहून निघालेले भोसल्यांचे सैन्य परत जाते आणि मग पेशवे माधवराव भोसल्यांच्या वकिलांना तंबी देतात असा तो प्रसंग. त्याशिवाय पानिपतच्या रणभूमीवर गायब झालेल्या सदाशिवराव पेशव्यांचा तोतयाबद्दलचे `स्वामी’ कादंबरीतील प्रकरणही अंधुकसे आठवते.
यानंतर आठदहा वर्षांनी गोव्यात म्हापसा येथे कोकणी साहित्य संमेलनाचे रणजित देसाई स्वागताध्यक्ष होते तेव्हा त्यांचे भाषण ऐकताना या पेशवाकालीन बुध्दीबळाच्या डावाची आठवण झालीच.
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या अशा अनेक पुस्तकांतील काही प्रसंगानी आजही मनात घर केलेले असते.
गोव्यात पणजीला शिक्षणासाठी गेलो आणि तिथे संभाषणाची भाषाच बदलली. इंग्रजी संभाषण आणि लिहिणे शिकायचे असेल तर मराठी, कोकणी आणि हिंदीत बोलायचे नाही असा आमच्या निवासस्थानी नियम होता. तो नियम पाळला, मात्र त्याने माझे वाचन थांबले नाही.
फरक एव्हढाच कि आता मी केवळ इंग्रजी पुस्तके वाचू लागलो आणि ज्ञानाचे केवढे मोठे दालन माझ्यासमोर खुले झाले आहे याचा मलाच अचंबा वाटला.
माझ्याबरोबर राहणारी आणि शिकणारी इंग्लिश माध्यमाची बेनेडिक्त फरीया, लेस्टर फर्नांडिस आणि जेम्स पैस अशी मुले 'द रुटस' सारख्या जाडजूड कादंबऱ्या तिनचार दिवसांत (आणि रात्रींत ) वाचून संपवत. मलाही तशीच सवय लागली. `फ्रिडम ऍट मिडनाईट' ही लॉरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांची गाजलेली साहित्यकृती हे मी इंग्रजीत वाचलेले पहिले पुस्तक.
एक मात्र खरे कि महाराष्ट्राबाहेर राहिल्याने, मराठी भाषेशी संपर्क खंडित झाल्याने या दिडदशकाच्या काळात मराठीत आलेले उत्तमोत्तम साहित्य माझ्या वाचनात आले नाही, त्यामुळे अनेक नामवंत लेखकांच्या साहित्यकृती माझ्या वाचनात आल्या नाहीत ही खंत आहेच. मात्र या काळात इंग्रजी साहित्याचा परिचय झाला ही एक जमेची बाजू.
दरम्यान काळाच्या ओघात वाचनाची आवड बदलत गेली आहे. लहानपणी सुरुवातीच्या काळात हातात पडेल ते पुस्तक वाचण्याचा छंद होता, प्रामुख्याने कादंबऱ्या, ललित साहित्य, ऐतिहासिक, रहस्यमय साहित्य, चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचली जायची. नंतर ललित साहित्याऐवजी वैचारीक, गंभीर आणि समीक्षणात्मक साहित्य अधिक वाचले जाऊ लागले. बा. सी मर्ढेकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्या कविताही वाचल्या, आणि दलित आत्मकथनांची बाबुराव बागुल, लक्ष्मण माने, दया पवार यांची अनेक पुस्तके वाचली.
पुस्तक वाचनाच्या वेडापायी एक धडा मी काही फार कटू अनुभवातून शिकलो. आपल्याला फार आवडलेले पुस्तक आपल्या एखाद्या मित्राला वाचायला दिल्यावर काय होते याची मला आजही आठवण होते आणि मी अस्वस्थ होतो.
गोव्यात नोकरी करत असताना पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी युरोपात बल्गेरियात काही महिने गेलो होतो , या दरम्यान रशियाला भेट दिले. या काळात अनेक इंग्रजी पुस्तके आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या स्मरणिका मी गोळ्या केल्या. परत आल्यावर या पुस्तकांचा आणि स्मरणिकांचा अनेक लेख लिहिण्यासाठी वापर केला. यापैकी एक पुस्त्रक चक्क बल्गेरियातले खास विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरावर आधारित होते. पुण्यात आल्यावर एका मित्राला यापैकी आवडती पुस्तके मी वाचण्यासाठी दिली आणि आजतागायत ती पुस्तके मला परत मिळालेली नाहीत.
असेच पुणे शहराचे ऐतिहासिक संदर्भ असलेला पुणे महापालिकेने तयार केलेला डॉ मं. पा. मंगुडकर संपादित दुर्मिळ वर्धापन विशेषांक एका मित्राला वाचण्यासाठी दिला तोसुद्धा माझ्या संग्रहातून कायमचा नाहीसा झाला. या अनुभवातून कुणाला कधीही आपले आवडते पुस्तक देऊ नये असा कानाला खडा लावला आहे.
एक मात्र खरं कि अनेक पुस्तकं मी वाचत असलो तरी कितीतरी नामवंत नामवंत मराठी साहित्यिकांची एकही साहित्यकृती मी वाचलेली नाही आणि आता या नावाजलेली पुस्तकं वाचण्याची इच्छाही राहिलेली नाही, हा, मात्र या साहित्यिकांवर वेळोवेळी लिहिले जाणारे लेख आणि पुस्तके मी आवर्जून वाचतो, हे नक्की कशामुळे हे मात्र समजत नाही.
उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णी यांचे मूळ साहित्य मी वाचलेले नाही, मात्र त्यांच्या गूढ कथांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिले गेलेले भरपूर साहित्य मी वाचले आहे. उदाहरणार्थ, जी ए कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांचा पत्रव्यवहार आणि जीएंची पुण्यात राहणारी बहीण नंदा पैठणकर यांनी आपल्या भावाविषयी लिहिलेल्या गोष्टी.
गौरी देशपांडेंची पुस्तकेसुद्धा कशी कुणास ठाऊक माझ्या कधीच वाचनात आली नाहीत, मात्र त्यांच्या लिखाणावर आणि व्यक्तिमत्वावर असलेले लिखाण मला आजही आकर्षित करतात.
कपाटात कधी काळी विकत घेतलेली पण न वाचलेली कितीतरी पुस्तके आहेत, तरीही आणखी पुस्तके घेण्याचा घेण्याचा मोह टाळता येतच नाही. मागच्या आठवड्यात म्हणूनच मग 'महर्षी ते गौरी' हे पुस्तकसुद्धा `साधना' पुस्तकाच्या दुकानात विकत घेतले. या पुस्तकाचे मुख्य आकर्षण अर्थात `समाजस्वास्थ' र. धो. कर्वे यांच्यावरचा विस्तृत लेख होता. `रधों' सारख्या व्यक्तींची चरित्रे मला कायम आकर्षित करत असतात.
नवीन पुस्तके विकत न घेण्याचा माझा निर्धार मला कधीच पाळता येत नाही. सुगावा बुक स्टॉलमध्ये अनेकदा चाळलेले आणि विकत घ्यायचे नाही म्हणून पुन्हापुन्हा रॅकमध्ये ठेवलेले लोकवाड्मय गृहाचे अर्जुन डांगळे यांचे नवे पुस्तक 'दलित पँथर – अधोरेखित सत्य ' मागच्या आठवड्यात असेच मग माझ्या बॅगेत आले. लोकवाड्मय गृहाचे दुसरे पुस्तक, `ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे' असेच अगदी अनिच्छेनेच माझ्या बागेत आले.
या दोन्ही पुस्तकांबद्दल मी येथे लिहिणार आहेच
या वाचनाच्या वेडाचे अखेर फलीत काय? आयुष्यातल्या अनेक वर्षांच्या दिवसांचे आणि रात्रींचे तास असे वाचन करण्यात गेले. त्याचे नक्की फलित काय असे गणित मांडायला गेले तर कितीतरी सकारात्मक बाबी नजरेसमोर येतात. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची बाब म्हणजे वाचनाने अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर नेत्यांनी ग्रंथांमुळे आणि वाचनामुळे त्यांच्या जीवनांत कसा आमूलाग्र बदल घडवला हे लिहिले आहे.
माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर केवळ भौतिक प्रगतीचाच विचार केला तर वाचनामुळे मला पुढे उच्च शिक्षण घेता आले आणि माझे काही भाऊ घरच्या शिंपी कामाकडे वळाले तसे माझ्या बाबतीत न घडता राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरच्या इंग्रजी दैनिकांत पत्रकार म्हणून माझी कारकीर्द झाली.
पुस्तक वाचनाचा छंद आणि आवड असणाऱ्या इतर अनेक लोकांचा अनुभव असाच असणार आहे. त्याशिवाय, वाचनसंस्कृतीच्या भौतिक लाभांपेक्षाही ग्रंथ वाचनामुळे समृद्ध होणारे जीवन अधिक मोलाचे महत्त्व असते.
आजच्या मोबाईलच्या युगात पुस्तकांचे वाचन झपाट्याने कमी होत चालले आहे. नव्या जमान्यात कदाचित छापील पुस्तकांऐवजी ई-पुस्तके अधिक वाचली जातील. नव्या पिढीला ही नव्या धर्तीची पुस्तके अधिक भावतील. मात्र पुस्तके छापील वा डिझिटल स्वरुपांत असोत, मुळात पुस्तके अथवा ग्रंथ वाचण्याचा आनंद आणि त्यापासून मिळणारे भौतिक आणि इतर लाभ नेहेमीच कालातीत असणार आहे,
Camil Parkhe, July 31, 2022