Sunday, July 12, 2026

 


आम्हा पत्रकारांची आणि इतर वाचकांची दैनिके आणि नियतकालिके वाचण्याची तऱ्हा एका बाबतीत तरी वेगळी असते.
कुठलाही वाचक एखाद्या बातमीचा, लेखाचा मथळा वाचून ती बातमी वाचण्याबाबत ठरवत असतो. वाचून झाल्यानंतर दुसऱ्या बातमी किंवा लेखांकडे हे वाचक वळत असतात.
आम्ही पत्रकार मंडळीसुद्धा बातमीचा मथळा आणि उपशिर्षक वाचल्यानंतरच अधिक खोलात जायचे कि नाही हे ठरवत असतो.
मात्र बातमी आवडली, म्हणजे बातमी लिखाणाची पद्धत आवडली, न आवडली, एकांगी आणि अपूर्ण वाटली तर ती बातमी, लेख कुणा बातमीदारानी, लेखकाने दिली हे हमखास चिकित्सेने पाहत असतो,
अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांत काम केल्याने आणि काही ठराविक दैनिकांचे अनेक वर्षे वाचत करत असल्याने एखाद्या बिट्समधील बातमीचे शीर्षक किंवा बातमीचा कल पाहताच ती बातमी कुणा बातमीदाराने लिहिली असावी याचा लगेच अंदाज येतो.
त्या बातमीला बायलाईन असल्यास हा कयास अनेकदा खरा ठरतो.
बहुतेक इतर वाचकांना मात्र बायलाईन या प्रकाराशी काही सोयरसुतक नसते.
या रविवारी `महाराष्ट्र टाईम्स'ची `संवाद' पुरवणी हातात पडली तेव्हा लेखांची शिर्षके पाहतपाहत शेवटच्या पानावर आलो तेव्हा लेखाचा मथळा पाहिला, लेखाच्या मध्यभागी असलेला तो ग्रुप फोटो पाहिला.
तो फोटो आणि मथळ्यामुळे नजर आपसूप बायलाईनवर स्थिरावली.
मग उत्सुकतेने लेख भराभरा वाचून काढला.
लेखातील काही संदर्भ लगेच कळाले नाही म्हणून लेख पुन्हा एकदा वाचून काढला.
लेखाबरोबर असलेल्या फोटोतील बहुतांश व्यक्ती परिचयाच्या होत्या, म्हणजे त्यांच्यापैकी काहींशी माझा एकेकाळी चांगला वैयक्तिक संबंध होता.
काहींना एकदोनदा भेटलो होतो आणि दोनेक व्यक्ती खूप प्रसिद्ध व्यक्ती असल्याने फोटोओळ नसली तरी त्यांची ओळख पटत होती.
लेखाचे शिर्षक आहे `१ झपुर्झा, साहित्य सहवास'.
मुंबईतले हे प्रसिद्ध `साहित्य सहवास' मी कधी पाहिले नसले तरी तो लेख लगेच वाचून काढला अन नंतर `महाराष्ट्र टाइम्स'च्या ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांना मॅसेज टाकून हा लेख लिहिणाऱ्या अनुराधा आठवले यांचा नंबर मागवला.
या लेखात अनुराधा आठवले यांनी आपल्या ५७ वर्षे निवासस्थान असलेल्या या घराविषयीच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत.
लेख वाचून गेल्या चाळीस वर्षांतील अनेक घटनांचा पट नजरेसमोर तरळून गेला होता म्हणून हा उद्योग.
ऐंशीच्या दशकाच्या अगदी सुरुवातीला गोव्यात पणजीमध्ये `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात मी शिकाऊ बातमीदार म्हणून लागलो होतो.
मुंबई विद्यापीठाची तत्त्वज्ञानाची पदवी परीक्षा देऊन निकाल लागण्याआधीच नोकरी धरली होती. त्या दैनिकात माझे काम तसे खरेच काही नव्हते.
आमच्या ऑफिसात मी अक्षरशः लिंबूटिंबू म्हणून वावरायचो, मी दिली तर बातमी वापरली जायची, ``कामिल, आज काहीच बातमी कशी नाही?'' असा जाब कुणी विचारत नसायचे.
पहिल्याच नोकरीत आणि तेही ऐन उमेदवारीच्या काळात असले सुख इतर कुणीही पत्रकारितेच्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रांत अनुभवले असेल असे मला वाटत नाही.
वृत्तपत्र कामगारांना असलेला न्यायमूर्ती देविदास पालेकर वेतन आयोग मला लागू नव्हता तरी साडेतीनशे रुपये मासिक पगार बऱ्यापैकी होता. दर महिन्याअखेरीस खिशात काही रक्कम शिल्लक असायची.
त्या काळात महाराष्ट्र सरकारच्या गोव्यात पणजी येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालिका अनुराधा आठवले होत्या.
महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राबाहेर ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ चालवली जातात.
दिल्लीत आणि इतरत्र. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतर राज्यांतील लोकांना परिचय व्हावा, या हेतूने या केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातील साहित्यिकांची, इतर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे हा त्यापैकीच एक उपक्रम.
या काळात नारायण आठवले (अनिरुद्ध पुनर्वसु ) पणजीतील दैनिक ‘गोमंतक’चे संपादक होते. अनुराधा आठवले या त्यांच्या पत्नी.
ते बहुधा १९८२-८३ साल असावे. महाराष्ट्र परिचय केंद्राने पु. ल. देशपांडे यांची पणजीत तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती.
पणजीतील महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असलेल्या सभागृहात पुलंची ही व्याख्यानमाला होती. `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून त्या व्याख्यानाची बातमी देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते.
त्यासाठी पहिल्या दिवशी मी तेथे वेळेत गेलो. मात्र बातमीदाराचे ओळखपत्र असूनही मला बसण्यासाठी जागा मिळाली नाही इतकी चिक्कार गर्दी तेथे होती.
पुलंचे भाषण सुरू झाले आणि त्यापाठोपाठ सभागृहात हास्यकल्लोळ.
दुसऱ्या दिवशी `गोमंतक', `नवप्रभा' आणि मडगावातून प्रकाशित होणाऱ्या `राष्ट्रमत' या मराठी दैनिकांत पान एकवर अँकरला पुलंच्या भाषणाचे फोटो आणि क्षणचित्रांसह विस्तृत बातम्या छापून आल्या होत्या.
आमच्या इंग्रजी द नवहिंद टाइम्समध्ये मात्र आतल्या पानासाठी एक छोटीशी बातमी आणि फोटोओळ यावर मी वेळ निभावून नेली होती.
पुलंच्या मराठी भाषेतील विनोदांचे इंग्रजीत भाषांतर कसे करणार ?
व्याख्यानाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मला हॉलमध्ये प्रवेश मिळालाच नव्हता. लाऊडस्पीकरमुळे सभागृहाबाहेर व्याख्यान फक्त ऐकता आले.
पुलंचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व, ओघवते वक्तृत्व आणि प्रचंड लोकप्रियता याचा प्रत्यक्ष अनुभव या तीन दिवसांत मी घेतला.
साहित्यरसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी किंवा त्या निमित्ताने माझी अनुराधा आठवले यांच्याशी बहुधा पहिल्यांदा गाठभेट झाली होती.
आता नक्की आठवत नाही
त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने पणजीत राम शेवाळकर यांची रामायणावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. य. दि. फडके यांची गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यावर तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती.
या दोन्ही व्याख्यानमालांना बातमीदार म्हणून मी हजर होतो, त्या दोन्ही व्याख्यानमुलांवर आधारित मी आमच्या इंग्रजी दैनिकात ‘नवहिंद टाइम्स’मध्ये बातम्या आणि विस्तृत लेखही लिहिले होते.
जुन्या महाकाय आणि अवजड लायनो टाईप सेटिंग मशीनवर कंपोझ केलेल्या त्या लेखांची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राने कवी नारायण सुर्वे यांनासुद्धा असेच गोव्यात निमंत्रित केले होते.
त्याकाळात विविध वृत्तपत्रांतल्या बातमीदारांमधे कडवी व्यावसायिक स्पर्धा असायची. आजकाल विविध प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे वरचे नेते एकमेकांशी सोयरीक करतात, बड्डे अटेंड करतात आणि खालच्या पातळीवरील कार्यकर्ते मात्र एकमेकांना मारझोड, शाईफेक करतात तसलाच हा प्रकार होता.
आमच्या डेम्पो उद्योगसमूहाच्या `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाचे `नवप्रभा' हे मराठी भावंड, चौगुले उद्योगसमूहाच्या `गोमंतकचे ते स्पर्धक. `द नवहिंद टाइम्स' आणि `नवप्रभा'ची त्याकाळची जुनी एकमजली कौलारी इमारत पणजी मार्केटला अगदी लागून होती,
नवी इमारत आता त्याच जागी आहे.
सकाळच्या बातम्या गोदरेज टाइपरायटरवर बडवून झाल्यानंतर आमच्या दैनिकाचे मुख्य वार्ताहर दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी घरी जाण्याआधी फिश मार्केटमध्ये जायचे ते प्रतिस्पर्धी इंग्रजी दैनिक `हेराल्ड' एखादी प्रत घेऊनच .
विकत घातलेले ताजे मासे `हेराल्ड'च्या प्रतीत गुंडाळून ते चेतक स्कुटरच्या डिकीत ठेवून ते पर्वरीच्या पत्रकार नगरला जायचे.
पत्रकारांची अशी व्यावसायिक स्पर्धा असतानासुद्धा गोमंतक संपाद्क नारायण आठवले यांच्या पत्नी अनुराधा आठवले यांच्याशी माझी जवळीक निर्माण कशी झाली याचे मला आजही आश्चर्य आठवते.
दैनिक `गोमंतक' मध्ये वामन प्रभू, सुरेश काणकोणकर, मोहन वैद्य असे अनेक बातमीदार आणि उपसंपादक असताना त्यांनी अनेकदा मला बोलावून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामात माझी मदत घेतली होती.
अर्थात या कामात मीसुद्धा आनंदाने सहभागी झालो होतो तो भाग अलाहिदा.
आता त्यापैकी ही पुढील एक कामगिरी होती.
“नारायण सुर्वे सपत्नीक पणजीला आले आहेत, अल्तिनोला गेस्ट हाऊसवर उतरले आहेत. त्यांना ‘गोवादर्शन’ घडवून आणशील का?”
एक दिवस गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी अनुराधा आठवले यांचा निरोप आला. लँडलाईन फोन दुर्मीळ आणि मोबाईलची संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या त्या काळात हा निरोप माझ्यापर्यंत कसा आला आता आठवत नाही.
इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या बातमीदाराकडे या कामगिरीसाठी अनुराधाबाईंनी विचारणा करावी, याचे मला आश्चर्य वाटले. आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार या कामगिरीसाठी परवानगी देतील, याची खात्री असल्याने मीही लगेच होकार कळवला.
सकाळीच अल्तिनोला गेस्ट हाऊसला जाऊन नारायण सुर्वे याना भेटलो. त्यांच्याबरोबर त्यांच्या `सावली' कृष्णाबाई होत्या.
नारायण सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हे दोन्ही काव्यसंग्रह त्यावेळी माझ्याकडे होते. त्या दोन दिवसांत मी सुर्वे दाम्पत्याला गोव्याच्या काही प्रसिद्ध ठिकाणी घेऊन गेलो.
आठवले यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोजमाई यांना कारमधून गोव्यात फिरवून आणण्याची अशीच एक संधी मिळाली.
आता नारायण सुर्वे किंवा एन. डी. पाटील यांच्याशी काय गप्पा झाल्या, ते काही आठवत नाही, पण त्या भेटींची स्मरणचित्रे अजूनही ताजी आहेत.
ही एक अगदी अलीकडची घटना.
दोन महिन्यापूर्वी गोव्यात होतो तेव्हा अपरिचित नंबरवरून फोन आला. दुसऱ्या दिवशी त्या मिस्ड कॉलवर फोन केला.
सांगलीचे राहुल थोरात संपाद्क असलेल्या `अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राच्या महात्मा फुले द्विशताब्दी विशेषांकात मी एक लेख लिहिला आहे.
त्यामध्ये सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या जेम्स मिचेल आणि मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्याबद्दल तसेच फुले दाम्पत्याच्या पुणे कॅम्पातील आजही चालू असलेल्या स्कॉटिश मिशन शाळांवर मी विस्तृत लिहिले आहे.
त्या लेखाबद्दल आणि फुले दाम्पत्याच्या शाळा शोधून काढण्याच्या माझ्या यशस्वी प्रयत्नाबद्दल माझे कौतुक करण्यासाठी मला हा फोन करण्यात आला होता.
फोन करणाऱ्या व्यक्ती होत्या `अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एक विश्वस्त सरोजमाई पाटील.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या थोरल्या बहिण.
`या कामगिरीबद्दल तुमचा खरे तर सत्कार करायला हवा. लेख वाचल्यानंतर लगेच मी फोनवर याबाबत हमीद (दाभोलकर) शी बोलले आहे. '' सरोजमाई बोलत होत्या.
आणि मी गप्प राहून ऐकत होतो.
सरोजमाईंशी बोलताना माझ्या डोळ्यांसमोर चाळीस वर्षांपूर्वीची आमची गोव्यातील ती भेट समोर आली होती.
मागच्या वर्षीच सरोजमाईंच्या धाकटी भावाने, शरद पवार यांनी माझ्या `सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक दाम्पत्य मिचेल आणि स्त्रीशिक्षणाचे पूर्वसुरी' या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.
आणि या कार्यक्रम पुण्यातील दीपक गिरमे यांच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच आयोजित केला होता.
अर्थात हे दोन्ही विषय मी आमच्या त्या फोनवरच्या संभाषणात काढले नाही.
ऐंशीच्या दशकात गोव्यात मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा सरचिटणीस तसेच नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा दैनिकांतील कामगार संघटनेचा सरचिटणिस होतो.
`गोमंतक'चे संपादक नारायण आठवले तर एक खंदे चळवळ्ये नेते. कामगार दिनानिमित्त एक मे रोजी पणजीत वृत्तपत्र कामगारांचे मोर्चे आणि काही वेळा संप यामुळे त्यावेळी कामगार चळवळीत मी खूप सक्रिय होतो आणि त्यामुळे नारायण आठवले मला चांगले ओळखत होते.
`गोमंतक'चे आधीचे संपादक माधव गडकरी हे एक पट्टीचे वक्ते. लेखणीबरोबरच गोव्यात ते सभाही गाजवत असत.
नारायण आठवलेसुद्धा याच परंपरेतील. लोकसत्तेचे माजी संपादक विद्याधर गोखले यांच्याप्रमाणेच आठवलेसुद्धा नंतर शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते.
असे असले तरी मी त्यांना गोमंतक भवनच्या त्यांच्या केबिनमध्ये एकदाही भेटलो नाही किंवा एकमेकांशी कधी संभाषणसुद्धा झाले नाही याचे मला आजही आश्चर्य वाटते.
नारायण आठवले यांच्यासंदर्भात आणखी एक घटना आठवते.
पुण्यात मुठा नदीच्या किनारी शनिवार पेठेत `स्नेहसदन' हा आश्रम १९६७ साली सुरु करणाऱ्या जर्मन जेसुईट फादर मॅथ्यू लेदर्ले यांची १९८५ साली येशूसंघांच्या (सोसायटी ऑफ जिझस) गोवा-पुणे-बेळगाव प्रॉव्हिन्सचे प्रांताधिकारी म्हणून नेमणूक झाली.
फादर लेदर्ले पणजीतल्या आझाद मैदानापाशी आणि कॅफे टॅटोच्या अगदी समोर असलेल्या जेसुईट हाऊसमध्ये राहायला आले.
त्यांची मी घेतलेली मुलाखत `द नवहिंद टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाली.
फादर मॅथ्यू लेदर्ले हे मराठी भाषा पंडित, पुणे विद्यापीठातील त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता `महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधन'.
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात स्नेहसदनचे स्थान हा तर एक स्वतंत्र विषय आहे.
तर फादर लेदर्ले यांची मी घेतलेली आमच्या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी आमच्या ऑफिसात आलो तत्क्षणी आमचे ज्येष्ठ वार्ताहर असलेल्या र. वि. प्रभुगावकर यांनी मला सांगितले कि माझ्या मुलाखतीवर आधारीत `गोमंतक'मध्ये आज अग्रलेख छापून आला आहे.
नारायण आठवले यांनी लिहिलेल्या त्या अग्रलेखाचे शीर्षक होते :
` या पुणेकराचे गोमंतकात स्वागत असो ! '
अग्रलेख प्रसिद्ध झाला त्याच दिवशी मी फादर लेदर्ले यांना माझ्या दुचाकीवरुन गोमंतक भवनला घेऊन गेलो, तेथे आठवले आणि फादर लेदर्ले यांच्या गप्पागोष्टी झाल्या होत्या.
गोव्यात शिक्षण आणि नंतर पत्रकारिता करून गोवा सोडून पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो. कालांतराने नारायण आठवले हे `गोमंतक' संपादकपदातून मुक्त होऊन मुंबईला परतले.
निरंजन हरिश्चंद्र उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली १९९४ साली सोळावे ख्रिस्ती साहित्य संमेलन झाले मालवणला झाले तेव्हा मी तेथे तिन्ही दिवस हजर होते.
या संमेलनाच्या उदघाटनाला मुलुखमैदानी तोफ म्हणून नाव कमावलेले दोन `नारायण' उपस्थित होते.
पत्रकार, संपादक आणि विविध सामाजिक चळवळींचे म्होरके असणारे नारायण आठवले आणि त्यावेळचे शिवसेनेचे लढाऊ नेते म्हणून नाव कमावलेले स्थानिक आमदार नारायण राणे.
फादर नेल्सन मच्याडो यांनी अगदी अखेरच्या क्षणी नारायण राणेंना या कार्यक्रमाला येण्यासाठी राजी केले होते.
या संमेलनाला अनुराधा आठवलेसुद्धा असणार यात शंकाच नाही.
अनुराधा आठवले यांच्या या लेखात प्रसिद्ध झालेल्या फोटोत नारायण आठवले, अनुराधा आठवले, विंदा करंदीकर, सुमा करंदीकर यांच्यासह त्या वर्षातले दोन साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत.
नारायण सुर्वे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि निरंजन हरिश्चंद्र उजगरे यांची मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
या दोन्ही साहित्य संमेलनाध्यक्षांचा आठवले दाम्पत्याने आपल्या घरी म्हणजे १, झपुर्झा येथे सत्कार केला होता.
त्यानंतर एकदा पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटसमोर नारायण आठवले यांची आणि माझी ओझरती भेट झाली. त्यावेळी मी बहुधा फर्ग्युसन कॉलेज रोडवरील `टाइम्स ऑफ इंडिया'त किंवा `सकाळ टाइम्स'मध्ये होतो.
`गोमंतक'चे संपादक म्हणून तरुण साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांची नेमणूक झाल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले तेव्हा मी चकित झालो होतो.
विष्णू सूर्या वाघ आणि मी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात जवळचे मित्र होतो, ते मला एक वर्षाने ज्युनियर होते.
धेम्पे कॉलेजात हस्तलिखित `आर्ट सर्कल'चा मी संपादक असताना विष्णू सूर्या वाघ यांच्या वळणदार अक्षरात लिहिलेल्या कविता मी नियमाने प्रकाशित करायचो.
`तरुण रक्ताला वाव द्यायला हवा' असे त्यावेळी मला नारायण आठवले म्हणाले होते.
नारायण आठवले यांची ती अखेरची भेट.
मात्र नारायण आठवले यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि स्वभावाच्या विविध पैलूंचा मला परिचय अगदी अलीकडेच झाला तो नामदेव ढसाळ आणि दलित पॅन्थरच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वाचन करताना.
ते वाचताना नामदेव ढसाळ या मराठी साहित्यातील एक सर्वोत्तम हिरा असलेल्या ढसाळ यांना प्रकाशझोतात आणण्याचे श्रेय नारायण आठवले यांना जाते हे वाचून सुखद धक्का बसला होता.
नारायण आठवले यांनी ढसाळ यांच्याकडून त्यांच्या कवितांचे बांड मागवून घेतले, त्या कवितांचा संग्रह छापण्याची परवानगी ढसाळ यांना मागितली, न मागता रॉयल्टीसुद्धा देऊ केली.
ढसाळांनी चारपाचशे रुपये मागितले तेव्हा आठवले यांनी हजारभर रुपये आगाऊ रॉयल्टी दिली, असे खुद्द ढसाळ यांनीच लिहून ठेवले आहे.
`गोलपिठा' काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना त्यातील शब्दांचा आणि भाषांचा अर्थ आणि संदर्भ समजून घेण्यासाठी विजय तेंडुलकरांनी कामाठीपुरात भरपूर वणवण केली होती.
आपल्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकरांनी नामदेव ढसाळ यांच्या भाषेची तुलना थेट संत तुकारामांच्या भाषेशी केली आहे !
नारायण आठवले यांच्या `अनुराधा प्रकाशना'ने १९७१ साली `गोलपिठा' प्रकाशित केला आणि मराठी साहित्य विश्वात इतिहास घडला गेला.
`१ झपुर्झा, साहित्य सहवास' लेखाने हा सगळा फ्लॅशबॅक घडवून आणला.

Camil Parkhe

Monday, July 6, 2026


सकाळी सातचा सुमार. नळाला पाणी नव्हते आणि त्याचवेळी इमारतीखाली लोकांची धांदल जाणवली. वरुनच खाली डोकावले तर पालिकेच्या पाण्याच्या नळापाशी काही पुरुष मंडळी पाण्यासाठी थांबलेले दिसले. याचा अर्थ खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी खेचणारी मोटार बिघडली होती.

परत किचनमध्ये येत आपल्याच कामात गुंतलेल्या बायकोला मी म्हटलं, ` बरं झालं, आज पालिकेचे पाणी येण्याचा वार आहे. निदान खालच्या नळाला तरी पाणी येते आहे त्यामुळे लिफ्टने सर्वांना आपापल्या घरी पाणी आणता येईल. फारशी गैरसोय होणार नाही.आपल्याकडे एक बरे आहे. म्हणजे विहिरीचे आणि बोअर वेलचे पाणी असे इतरही दोन पर्याय आहेत, जे लोक केवळ पालिकेच्या पाण्यावर अवलंबून असतात त्यांचे किती हाल होत असतील नाही?''
``आणि दुसरं म्हणजे आपण शेजारच्या इमारतींखालच्या नळांचेसुद्धा पाणी भरु शकतो, अशा अडचणीच्या वेळी कोण नाही म्हणणार? आणि एक बरं म्हणजे आपल्याकडे निदान दर दिवसाड तरी पाणी येते, आठवड्यातून एकदा-दोनदा पाणी मिळणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील नाही?’’
शाळेला जाण्याच्या घाईत असल्याने बायकोच्या निर्विकार चेहऱ्याकडे मी पाहिले आणि मी पण एकदम गप्पगार झालो.
क्षणभर स्तब्ध झालो आणि एकदम चमकलोच.
आतापर्यंत ``मी हे बरं झालं, ते बरं झालं हे’’ हे माझ्यामधलं कोण म्हणत होतो ते माझ्या लक्षात आलं होतं.
``हे बरं झालं, ते बरं झालं’’ ची मालिका अशी खूप लांबवर चालली असती हे माझ्या लक्षात आलं होतं.
हे असं `बरं झालं, ते तर खूपच बरं झालं’’ असं म्हणत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असताना मला अनेकदा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या मोझेसची आठवण येते.
मी त्याला भेटलो तेव्हाच मोझेस पंधरासोळा वर्षाचा असावा. शरीराने वाढला तरी मोझेसचा बुद्ध्यांक वयाच्या मानानं थोडा कमीच होता. लहानथोर माणसं त्याची थट्टा करत असायची ती त्याच्या एका आगळ्यावेगळ्या दृष्टिकोनामुळे. काहीही विपरीत घडलं तरी त्याकडे सकारात्मक नजरेनं पहायचं अशी त्याची नेहेमीच विचारधारा असायची.
एकदा शाळा सुटल्यानंतर पोरांची थोडी दंगामस्ती झाली आणि त्यात मोझेसला बारीकसा दगड नेमका डोक्यावर लागला, खोच पडली आणि त्यातून रक्ताची धार वाहायला लागली. जमलेल्या लोकांनी वेळीच कापडानं जखम दाबली आणि रक्त वाहण्याचं थांबलं.
त्यानंतर मोझेसचा तिथल्या पोरांशी आणि लोकांशी झालेली संवाद मला आजही आठवतो. थोडक्यात त्याची उत्तरे अशी होती.
``बरं झालं, दगड बारीकसा होता. बरं झालं, रक्त वाहायचं लगेच थांबलं.. बरं झालं, फक्त टकुऱ्याला लागलं, मेंदूला मार नाही बसला... मी नशिबवान, अगदी थोडक्यात वाचलो.. बरं झालं अन बरं झालं’’ असं तो बोलत राहिला आणि मग तिथं जमलेली सगळी मंडळी त्याला हसायला लागली.
मोझेसच्या बुद्धीची वाढ मंद झाली होती तरी त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भल्याभल्या विचारवंतानासुद्धा चकित करणारा होता.
तशी ही खूप वर्षांपूर्वीची घटना, मोझेस आता कुठे आहे, काय करतो हे मला माहितीसुद्धा नाही, मात्र त्याची बाळबोध विचारसरणी मला आजही खूप प्रभावित करत असते.
आजरा इथल्या या मोझेसच्या या सकारात्मक वृत्तीवर मी एक छोटासा इंग्रजीत लेख लिहिला होता. `Incorrigible Optimist'' या शिर्षकासह `टाइम्स ऑफ इंडिया'ने आपल्या राष्ट्रीय आवृत्तीच्या संपादकीय पानावर `मिडल' म्हणून हा लेख १९९१च्या आसपास छापला होता. त्याकाळात मी फ्रि-लान्स जर्नालिस्ट होतो.
कधीतरी हा लेखसुद्धा इथे मी टाकेल.
आणि हा दुसरा तसा गंमतीदार प्रसंग आहे.
शाळा सुटल्यावर आदितीला घरी आणण्यासाठी मी जायचो तेव्हा गेटपाशी अनेकदा ही घटना घडायची. दुसरी-तिसरीत असलेली एक मुलगी आपलं खांद्यावरचं दफ्तर सावरत पळत यायची आणि शेजारी असलेल्या रिक्षावाल्या काकांच्या गुडघ्यांना बिलगत आनंदाने म्हणायची, '' काका, आज फ्रायडे !''
एकदा ती मुलगी अशीच ''काका, आज थर्सडे !'' असं म्हणताना पाहिलं अन न राहवून मी त्या रिक्षावाल्या काकांना हा काय प्रकार आहे ते विचारले.
हसून ते म्हणाले, '' शनिवार-रविवारची सुट्टी जवळ येते म्हणून पिंटी दरदिवशी खूष असते.''
``तर मग सोमवारी ती काय म्हणून खूष असते?'' मी विचारले.
``सोमवारी पण ती खूषच असते, `आज मंडे'' म्हणून !'' गोड हसणाऱ्या पिंटीकडे पाहत मी थक्क झालो.
सदानकदा प्रत्येक गोष्टींतून - मग तो शुक्रवार असो वा सोमवार - जीवनाचा आनंद लुटण्याचा त्या चिमुरडीचा स्वभाव नक्कीच कौतुकास्पद होता.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात `फाईव्ह डे विक' असणाऱ्या तरुण मुलं-मुली शुक्रवारच्या विक-एन्डची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात, त्यांच्याशी बोलताना, त्या दोन दिवसांच्या सुट्टीबाबत त्यांचे मनोरथ ऐकताना मला नेहेमीच त्या शाळेच्या गणवेशात नेहेमीच खुश असणाऱ्या पोरीची आठवण येते. वाटते कि आज मोठी झालेली ती पिंटी या धकाधकीच्या जीवनात शुक्रवारइतकाच सोमवारसुद्धा त्याच आनंदी वृत्तीत घालवत असेल.
सकाळी जाग आल्याआल्या बिछान्यातून टुणकन उडी मारुन दिनक्रम सुरु करण्याची मला लहानपणापासून सवय आहे. `आज सुट्टी आहे' म्हणून बिछान्यातच लोळू शकणाऱ्या लोकांविषयी मला हेवा वाटत नाही, मात्र आश्चर्य नक्कीच वाटते.
गोव्यात पणजीला बॅचलरचे जीवन जगताना माझे काही मित्र सकाळी नऊपर्यंत गाढ झोपलेले असायचे, त्यावेळी मी मात्र अस्वस्थ असायचो. माझ्या या स्वभावामुळे एकदा त्यापैकी एक मित्र असाच चिडून बिछान्यावर उठून बसला आणि मला म्हणाला,'' कामिल, इतक्या लवकर उठून करायचे तरी काय ?''
तो प्रश्न ऐकून मी थक्क झालो. ''करायचे तरी काय?'
`दिवसभर `काय करु आणि काय नको करु' असा प्रश्न मला पडत असताना 'करायचे तरी काय?'' असा त्याला प्रश्न पडत होता !
मागे समाजमाध्यमांवर वाचलेले आठवते. काही व्यक्ती सकाळी उठल्याउठल्या 'अरे वा, आणखी एक नवा दिवस !'' असे म्हणत नव्या दिवसाला सामोरे जातात तर काही व्यक्ती ''बापरे, उगवला आणखी एक दिवस !'' असे म्हणत कपाळाला हात लावत असतात. यापैकी कुणाचे अनुकरण करायचे हे आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवायचे असते.
आणि ही एक दुसरी मनात घर करून बसलेली घटना. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये घडलेली. आमच्या कुटुंबाला जवळचे असलेले डॉकटर एक जीवघेण्या अपघातात अगदी थोडक्यात वाचले. नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते आणि मुंबई-पुणे महामार्गावर फुटपाथवर ते चालत असताना वेगात असलेला एक ट्रक फुटपाथवर चढला आणि या डॉकटरांच्या एका पायावरुन ट्रकचे चाक गेले.
जवळजवळ सहासात महिने डॉक्टर जायबंदी होते, लिगामेंट इंज्युरीमुळे काही काळ पूर्णतः परावलंबी होते. जॅकलीन आणि मी अनेकदा त्यांना भेटायला जायचो, त्यावेळी ते भयंकर अस्वस्थ असायचे. खूप धार्मिक असलेले आणि वेळोवेळी पुजापाठ करणारे डॉक्टर ``माझ्याच बाबतीत असे का घडावे ?'' असे म्हणायचे.
मी डॉकटरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझी प्रतिक्रिया मात्र वेगळीच होती.
''डॉक्टर, नशिबवान आहात तुम्ही कि ट्रकचे चाक फक्त टाचेवरून गेले. अगदी थोडक्यात वाचला ना तुम्ही ! ट्रकचे चाक काही इंचाने पुढेमागे गेले असते तर काय भयानक झाले असते, तुम्ही एका बाजूला पडला म्हणून चाक फक्त टाचेवरुन गेले, डोक्यावरून किंवा पोटावरुन नाही गेले! Doctor, Really you should bless your stars !''
“I cried because I had no shoes until I met a man who had no feet, ” हे एक प्रसिद्ध वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवे
त्यादिवशी सकाळी आवरुन मी घराबाहेर पडत होतो तेव्हा शेजारच्या एका समवयस्क व्यक्तीने मला म्हटले, ''किती छान नाही असे दररोज कामाला बाहेर पडायचे. पाहा ना, मला इथे दिवसभर सगळे घर खायला उठते !''
याउलट दररोज कामाला जावे लागणारे लोक घरी बसून आराम करायचा विचार करत असतात. वय झाल्यावर निवृत्त होऊन घरी बसून करायचे तरी काय असे प्रश्न अनेकांना आणि त्यांच्या घरच्यांनाही पडत असतात.
काहींना असे प्रश्न मुळीच पडत नसतात, करण्यासाठी कितीतरी कामांची आणि योजनांची त्यांच्याकडे भलीमोठी यादीच असते.
सत्तरीकडे वाट करणारी एक नामवंत लेखिका मला काही महिन्यांपूर्वी मला म्हणाली, ''दर दिवसांची सुरुवात मी भल्या पहाटे करते, दिवसभर करण्यासाठी खूपखूप कामे असतात ना!'' मी त्यांना मनापासून सलाम केला.
पावसाळी वातावरण, मस्तपैकी गुलाबी किंवा थंडी बोचरी थंडी, स्वच्छ निरभ्र आभाळ, आकाशातला चंद्र, उगवता किंवा मावळता सूर्य, यापैकी काहीही सुखद किंवा निराशाजनक नसते, त्या वातावरणाकडे आपण कसे पहातो याकडे सर्वकाही अवलंबून असते.
चंद्रकोर, अष्टमीचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र काही क्षण थांबून निरखून पाहायला मला आवडते, तसेच अमावस्येच्या रात्री तारांनी पार उजळून टाकलेले आभाळसुद्धा.
सकारात्मक दृष्टिकोन एकदा अंगिकारला कि मग त्याच चष्म्यातून जगाकडे आणि आजूबाजूच्या पाहता येते. त्यासाठी तसा दृष्टिकोन मात्र ठेवायला हवा. आपल्या आजूबाजूचे जग कसे आहे हे आपण ठरवण्यावर असते. सभोवतालचे जग काही आपण बदलू शकत नाही, मात्र या जगाकडे पाहण्याची आपली वृत्ती मात्र आपण बदलू शकतो.

`दिव्यमराठी' रविवार पुरवणी \

Camil Parkhe July 7, 2022


Sunday, June 28, 2026

 


ज्या व्यक्तीने भारतात मुंबईत आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया घातला, महाराष्ट्रात मराठी भाषेत पहिल्यांदाच पुस्तके छापली, मराठीतली आणि इंग्रजीतलीसुद्धा पहिली शालेय पाठ्यपुस्तके तयार केली त्या व्यक्तीची महाराष्ट्राला ओळखही असू नये, मागील दोनशे वर्षात या व्यक्तीचे - गॉर्डन हॉल यांचे - मराठीत एकही चरित्र लिहिले गेले नाही हे निश्चितच खेदजनक आहे.

गॉर्डन हॉल यांच्याआधीसुद्धा मराठी पुस्तकांची छपाई झाली होती, मात्र ती छपाई महाराष्ट्राबाहेर झाली होती.
मराठीतील पहिले मुद्रित पुस्तक फादर थॉमस स्टिफन्स यांचे `ख्रिस्तपुराण' रोमी लिपीत पोर्तुगीज गोव्यात १६१६ साली प्रकाशित झाले होते.
त्यानंतर विल्यम कॅरी यांनी डॅनिश वसाहतीत बंगालमधील सेरामपूर येथे संत मॅथ्यूकृत शुभवर्तमान १८०५ साली छापले होते.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात गॉर्डन हॉल यांनी पहिले मराठी पुस्तक लाकडी छापखान्यात छापले.
अमेरिकेतून येऊन १२ फेब्रुवारी १८१३ रोजी गॉर्डन हॉल यांनी मुंबई बंदरात पाऊल ठेवले.
त्यानंतर वर्षभरात त्यांनी आणि त्यांच्या सहकारी अमेरिकन मिशनरींनी मुंबईत मराठी आणि इंग्रजी शाळा सुरु केल्या आणि त्याद्वारे संपूर्ण देशात आधुनिक शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले.
हे शिक्षण सर्व जातीधर्माच्या लोकांना, पुरुषांना आणि स्त्रियांना, सवर्णांना आणि अस्पृश्यांना खुले होते.
याच अमेरिकन मिशनरींनी देशातली पहिली मुलींची शाळा मुंबईत १८२४ साली सुरु केली
नाशिक परिसरात कॉलऱ्याच्या रुग्णांना गॉर्डन हॉल औषधोपचार करताना त्यांनाच कॉलऱ्याची लागण होऊन २० मार्च १८२६ रोजी सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांचे निधन झाले.
या महान व्यक्तीचे मराठीतले पहिलेवहिले चरित्र असलेल्या '`गॉर्डन हॉल - गाथा मिशनरी शौर्याची' पुस्तकाचे पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात बुधवारी २५ मार्च रोजी प्रकाशित झाले.
``I cannot Turn Back The Adventures of Gordon Hall'' या जॉन क्रोझियर यांनी लिहिलेल्या या इंग्रजी पुस्तकाचा हरियाणामधील गुरुग्राम येथील कालेब इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉ विश्वास वळवी यांनी अनुवाद आणि पुनर्लेखन केले आहे.
गॉर्डन हॉल यांच्या मराठी भूमीवरील सेवेचे आणि बलिदानाचे या द्विशताब्दी वर्षानिमित्त (1826- 2026) व्हाईटलाईट पब्लिकेशन्स, पुणे, आणि नॅशनल सेंटर फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, बेंगळुरू) यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
यावेळी बेंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशनचे डॉ. अतुल यशवंतराव अघमकार, `शब्दसेवा' मासिकाचे संपादक अशोक आंग्रे, चरित्रलेखक डॉ विश्वास वळवी, पत्रकार कामिल पारखे आणि व्हाईटलाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांची याप्रसंगी भाषणे झाली.
Camil Parkhe

Tuesday, April 28, 2026

 

एक ख्रिस्ती धर्मगुरू असूनही वेगळी वाट चाललेले सुभाष चांदोरीकर हे एक अनोखे व्यक्तिमत्व होते. चांदोरीकर हे पुण्यातील युनायटेड थिऑलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र  (यू.टी.एस.एम.) येथे अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राध्यापक होते. मात्र त्यांनी आपले कार्य केवळ आपल्या विद्यार्थ्यांशी आणि वर्गाच्या चार भिंतींशी कधीच मर्यादित ठेवले नव्हते. यामुळेच पुण्यात शुक्रवारी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालेले चांदोरीकर यांनी आपल्यामागे ठेवलेले कार्य आणि वारसा महत्त्वाचा ठरतो. 

चांदोरीकर हे मूळचे मराठवाड्यातील उदगीर परिसरातले.  धार्मिक किंवा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांसाठी ते अखेरपर्यंत झगडत राहिले. आपल्या धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून समाजाच्या विविध दुर्लक्षित घटकांसाठी विशेषतः पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी,  एड्सग्रस्तांसाठी आणि तृतीयपंथीयांसाठी समाजकार्य केले.  

तृतीयपंथियांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या दोन कार्यक्रमांना अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रीराम लागू यांनी हजेरी लावलेली होती.

चांदोरीकरांच्या अशा चाकोरीबाहेरच्या वर्तनामुळे ख्रिस्ती समाजातील अनेक लोंकांचा त्यांना रोष पत्करावा लागला, मात्र चांदोरीकर यांनी माघार कधी  घेतली नाही.

रेव्हरंड डॉ. अरविंद निर्मळ हे भारतातील दलित ख्रिस्ती चळवळीचे एक मुख्य प्रणेते. अहिल्यानगर येथे १९९१ मध्ये पहिले दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून निर्मळ यांनी ख्रिस्ती समाजाची महाराष्ट्रातील दलित चळवळीशी नाळ जोडली. त्यानंतर अशी चार  साहित्य संमेलने त्यांनी आयोजित केली.  

निर्मळ यांचे १९९५ साली निधन झाल्यानंतर सुभाष चांदोरीकर यांनी दलित ख्रिस्ती साहित्य चळवळीची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आणि विविध शहरांत या संमेलनांचे एकाहाती आयोजन केले.  उत्कृष्ठ वक्तृत्वशैली लाभलेले चांदोरीकर हे कुशल संघटकसुद्धा होते.  विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरुन त्यांनी राज्यात अनेक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने भरविली. 

त्यांच्या पुढाकाराने पाचवे दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन (अध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे - पुणे २००१), सहावे संमेलन (अध्यक्ष सुभाष चांदोरीकर, संगमनेर २००४), सातवे संमेलन (अध्यक्ष डॉ. गिलबर्ट लोंढे, नागपूर २००६), आठवे संमेलन (अध्यक्ष वसंत म्हस्के, उदगीर २००८), नववे संमेलन (अध्यक्ष अनुपमा डोंगरे जोशी, श्रीरामपूर २०१२) आणि दहावे संमेलन (अध्यक्ष फादर ज्यो गायकवाड, श्रीरामपूर २०१२) येथे भरवण्यात आली होती.

सुभाष चांदोरीकर यांच्याच प्रेरणेने या सर्व अध्यक्षीय भाषणांचे संकलन 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या माझ्या  पुस्तकात करण्यात आले आहे. 

अखेरच्या आजारपणातसुद्धा चांदोरीकर अकराव्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची जुळवाजुळव करत होते.  दलित ख्रिस्ती समाजाला आपले न्याय्य हक्क, सवलती मिळाव्यात यासाठी ते तळमळत होते, त्यासाठी आपली लेखणी वापरत होते.  

उषाताई आणि विलास वाघ यांच्या `सुगावा प्रकाशना'ने चांदोरकरांची काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. `गवंड्यांचे पोर' हे आत्मचरित्र  हे चांदोरीकरांचे अखेरचे प्रकाशित पुस्तक.

चांदोरीकर यांचा बंडखोर वारसा आणि त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला क्रूस त्यांच्यामागे कोण स्विकारणार या प्रश्नाचे उत्तर आताच देणे अवघड आहे. `दलित ख्रिस्ती' या शब्दाबद्दल ख्रिस्ती समाजात घृणा आहे.  सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या शब्दाबद्दल आक्षेप घेतला आहेच. त्यामुळे `ख्रिस्ती अस्मिता' या नावाने काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अधिकृत नोंदणीकरण करण्यात आले आहे आणि साहित्य संमेलनांची निर्मळ आणि चांदोरीकर यांनी चालवलेली दीर्घ परंपरा चालू ठेवण्याचा निर्धार या समाजातील काही युवा  कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

हा निर्णय निश्चितच  स्वागतार्ह आणि सर्वमान्य होण्यासारखा आहे. 

Camil Parkhe