Wednesday, May 1, 2013

पोप फ्रान्सिस निवड चर्चचा युरोपकेंद्रित चेहरामोहरा बदलणार

Update:  Wednesday, May 01, 2013 5:26:44 PM IST

   
मुख्यपान » संपादकीय » बातम्या
चर्चचा युरोपकेंद्रित चेहरामोहरा बदलणार
- कामिल पारखे
शुक्रवार, 15 मार्च 2013 - 12:00 AM IST

चर्चच्या विविध प्रश्‍नांवरील भूमिकेमध्येही काही मूलगामी बदल होतील काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांची 266 वे पोप म्हणून निवड झाल्याने जगभर पसरलेल्या कॅथॉलिक चर्चच्या इतिहासात नवे पायंडे पडले आहेत. ख्रिस्ती धर्माला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. अनेक शतकांच्या कालावधीनंतर पहिल्यादांच या सर्वोच्च धार्मिक पदावर युरोपबाहेरील कार्डिनलची निवड झाली आहे. नव्या पोपची निवड करण्यासाठी जगभरातील 115 कार्डिनल व्हॅटिकनच्या ऐतिहासिक "सिस्टाईन चॅपेल'मध्ये एकत्र आले, तेव्हा नवा पोप कोण असेल, कुठल्या देशातील वा खंडातील वा वंशाचा असेल याविषयी अनेक अंदाज व्यक्त केले जात होते. युरोपबाहेरील कार्डिनलची पोप म्हणून निवड झाल्याने कॅथॉलिक चर्चच्या युरोपकेंद्रित भूमिकेत निश्‍चितच बदल होईल. त्याशिवाय चर्चचा विविध प्रश्‍नांबाबतचा दृष्टिकोन तसेच सामाजिक आणि नैतिक प्रश्‍नांबाबतच्या धोरणांतही काही बदल या निवडीमुळे होऊ शकेल. अन्य धार्मिक समुदायांबाबतच्या दृष्टिकोनातही बदल होतो का ते पाहावे लागेल. लॅटिन अमेरिकी देशांचे विकासासाठी जसे प्रयत्न चालू आहेत, त्याचप्रमाणे इतिहासात अनियंत्रित राजसत्तांच्या विरोधात वेळोवेळी उठावही झाले आहेत. चर्चने लोकांच्या अशा काही चळवळींना पाठिंबा देऊन त्यांना मोठा दिलासा दिला होता.

पोप जॉन पॉल यांनी चार दशकांपूर्वी कॅथॉलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी शांतिदूत म्हणून लौकिक मिळवला; मात्र कॅथॉलिक चर्चच्या धोरणांत मूलगामी असे बदल केले नाहीत. त्यांच्यानंतर आलेल्या पोप बेनेडिक्‍ट यांनीही सहा वर्षांच्या कालावधीत चर्चमध्ये फारसे बदल केले नाहीत. त्यामुळेच जगभर पसरलेल्या कॅथॉलिक पंथीय लोकांना नवे पोप फ्रान्सिस यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.

ख्रिस्ती धर्म मूळचा इस्राईलचा असला तरी नंतरच्या काही ऐतिहासिक घडामोडींमुळे या धर्माला पाश्‍चिमात्य विशेषत: युरोपियन चेहरामोहरा प्राप्त झाला होता. गेल्या काही शतकांत ख्रिस्ती धर्माचा आशिया आणि आफ्रिका खंडात प्रसार झाला तरी या युरोपकेंद्रित स्वरूपात फारसा बदल झाला नाही, याचे कारण कॅथॉलिक चर्चच्या धर्मगुरूंत आणि उच्चाधिकाऱ्यांमध्ये युरोपियन व्यक्तींचीच संख्या अधिक होती. गेल्या काही दशकांत या परिस्थितीत बदल झाले आहेत. चर्चच्या कार्डिनलमध्ये विशेषत: आफ्रिकन व्यक्तींचाही समावेश आहे. पोपच्या निवडणुकीत सहभागी झालेल्या आणि ज्यांना पोप होण्याचीही संधी होती अशा कार्डिनलमध्ये भारतातील पाच जणांचा समावेश होता. भारताच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या संख्येने भारतीय कार्डिनलनी या निवडणुकीत भाग घेतला होता.

नवे पोप फ्रान्सिस यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. गेल्या काही दशकांत कॅथॉलिक चर्चला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले होते. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप पाश्‍चिमात्य राष्ट्रांतील अनेक धर्मगुरूंवर झाले आहेत. या घटनांमुळे कॅथॉलिक चर्चची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. चर्चच्या समलिंगी सबंधविरोधी धोरणाविरुद्धही अनेक संघटनांनी आवाज उठवला आहे. कुठल्याही प्रकारच्या गर्भपातास कॅथॉलिक चर्चचा अगदी पूर्वीपासून ठाम विरोध आहे. या व अशा सर्वच प्रश्‍नांबाबत नवे पोप काय भूमिका घेतात, याकडे सर्व जगाचे लक्ष असेल.

आफ्रिका, आशिया खंडांत कॅथॉलिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. या देशांतील धर्मगुरूंची बिशप अणि कार्डिनल पदांवर चर्चने नेमणूक करावी, अशी या लोकांची अपेक्षा आहे. भविष्यात भारतीय कार्डिनलचीसुद्धा पोपपदावर निवड होऊ शकते.

फोटो गॅलरी