Showing posts with label Esakal. Show all posts
Showing posts with label Esakal. Show all posts

Wednesday, November 19, 2014

कामिल पारखे यांना फादर स्टाफनर पुरस्कार

कामिल पारखे यांना फादर स्टाफनर पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 21, 2011 AT 02:32 PM (IST)
पुणे - प्राच्यविद्यापंडित, पुण्यातील डी नोबिली कॉलेज आणि ज्ञानदीप विद्यापीठातील शिक्षक फादर हान्स स्टाफनर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या द्विवार्षिक पुरस्कारासाठी "सकाळ टाइम्स'चे वरिष्ठ उपसंपादक, लेखक कामिल पारखे यांची निवड झाली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील फादर हान्स स्टाफनर प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

याआधी हा पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा समावेश होता. ऑस्ट्रियात 1909 मध्ये जन्म झालेले फादर स्टाफनर येशूसंघीय धर्मगुरू म्हणून 1934 मध्ये भारतात आले. तीन वर्षांतच त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. फादर स्टाफनर यांनी हिंदू धर्मावर, ख्रिस्ती ईशज्ञानावर आणि धार्मिक सुसंवादावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. यापैकी काही पुस्तकांचे मराठीत भाषांतर झाले आहे. थॉमस स्टीफन्स या ब्रिटिश धर्मगुरूंनी सतराव्या शतकात गोव्यात मराठी भाषेत लिहिलेल्या ख्रिस्त पुराणाची पहिली देवनागरी आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी स्टाफनर यांनी प्रयत्न केले. पारखे यांनी मीडिया डिक्‍शनरी, महाराष्ट्र चरित्रकोश, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे योगदान वगैरे 12 पुस्तके मराठी आणि इंग्रजी भाषांत लिहिली आहेत. स्नेहसदन येथे 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांच्या हस्ते हा पुरस्कार पारखे यांना देण्यात येईल. येशूसंघीय पुणे प्रांताचे प्रमुख फादर भाऊसाहेब संसारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 
फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
On 21/11/2011 09:17 PM जनार्दन माळी, mangirish.mali@gmail.com said:
पुस्तकाद्वारे स्वतःचे एखाद्या धर्माबद्द्ल विचार अक्षर रुपाने व्यक्त होतात. ते विचार कालातीत आहेत की कालाधिन आहेत हे काळच ठरवितो. कोणताही धर्म वाईट नाही.धर्माचे प्रतिकात्मक व आचरणात्मक हे दोन भाग असतात.आचरणात्मक धर्माला सार्वभौमिक मान्यता असते पण लोक तो विसरले आहेत.हल्ली प्रतिकात्मक धर्माला जास्त महत्व दिले जाते.जसे तीर्थयात्रा करणे,मुर्ति पूजा करणे ,बाबा-बुवांच्या समाधिंना भेटी देणे.
On 21-11-2011 05:15 PM Nana Parkhe said:
अभिनंदन"
On 21/11/2011 04:38 PM shrikant said:
फादर हान्स स्टाफनर यांच्याऐवजी कमिल पारखे यांची माहिती द्या . त्यांना कोणत्या कार्यासाठी पुरस्कार मिळाला.
On 21/11/2011 04:08 PM Sandeep Tamhankar said:
अभिनंदन कमिल, बातमी वाचून अतिशय आनंद झाला. कार्यक्रमाला येण्याचा जरूर प्रतन करतो. संदीप ताम्हनकर.
On 21/11/2011 04:06 PM Milton said:
Congratulation and best wishes from Konkani kristha sabha pune

Wednesday, May 1, 2013

पोप फ्रान्सिस निवड चर्चचा युरोपकेंद्रित चेहरामोहरा बदलणार

Update:  Wednesday, May 01, 2013 5:26:44 PM IST

   
मुख्यपान » संपादकीय » बातम्या
चर्चचा युरोपकेंद्रित चेहरामोहरा बदलणार
- कामिल पारखे
शुक्रवार, 15 मार्च 2013 - 12:00 AM IST

चर्चच्या विविध प्रश्‍नांवरील भूमिकेमध्येही काही मूलगामी बदल होतील काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांची 266 वे पोप म्हणून निवड झाल्याने जगभर पसरलेल्या कॅथॉलिक चर्चच्या इतिहासात नवे पायंडे पडले आहेत. ख्रिस्ती धर्माला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. अनेक शतकांच्या कालावधीनंतर पहिल्यादांच या सर्वोच्च धार्मिक पदावर युरोपबाहेरील कार्डिनलची निवड झाली आहे. नव्या पोपची निवड करण्यासाठी जगभरातील 115 कार्डिनल व्हॅटिकनच्या ऐतिहासिक "सिस्टाईन चॅपेल'मध्ये एकत्र आले, तेव्हा नवा पोप कोण असेल, कुठल्या देशातील वा खंडातील वा वंशाचा असेल याविषयी अनेक अंदाज व्यक्त केले जात होते. युरोपबाहेरील कार्डिनलची पोप म्हणून निवड झाल्याने कॅथॉलिक चर्चच्या युरोपकेंद्रित भूमिकेत निश्‍चितच बदल होईल. त्याशिवाय चर्चचा विविध प्रश्‍नांबाबतचा दृष्टिकोन तसेच सामाजिक आणि नैतिक प्रश्‍नांबाबतच्या धोरणांतही काही बदल या निवडीमुळे होऊ शकेल. अन्य धार्मिक समुदायांबाबतच्या दृष्टिकोनातही बदल होतो का ते पाहावे लागेल. लॅटिन अमेरिकी देशांचे विकासासाठी जसे प्रयत्न चालू आहेत, त्याचप्रमाणे इतिहासात अनियंत्रित राजसत्तांच्या विरोधात वेळोवेळी उठावही झाले आहेत. चर्चने लोकांच्या अशा काही चळवळींना पाठिंबा देऊन त्यांना मोठा दिलासा दिला होता.

पोप जॉन पॉल यांनी चार दशकांपूर्वी कॅथॉलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी शांतिदूत म्हणून लौकिक मिळवला; मात्र कॅथॉलिक चर्चच्या धोरणांत मूलगामी असे बदल केले नाहीत. त्यांच्यानंतर आलेल्या पोप बेनेडिक्‍ट यांनीही सहा वर्षांच्या कालावधीत चर्चमध्ये फारसे बदल केले नाहीत. त्यामुळेच जगभर पसरलेल्या कॅथॉलिक पंथीय लोकांना नवे पोप फ्रान्सिस यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.

ख्रिस्ती धर्म मूळचा इस्राईलचा असला तरी नंतरच्या काही ऐतिहासिक घडामोडींमुळे या धर्माला पाश्‍चिमात्य विशेषत: युरोपियन चेहरामोहरा प्राप्त झाला होता. गेल्या काही शतकांत ख्रिस्ती धर्माचा आशिया आणि आफ्रिका खंडात प्रसार झाला तरी या युरोपकेंद्रित स्वरूपात फारसा बदल झाला नाही, याचे कारण कॅथॉलिक चर्चच्या धर्मगुरूंत आणि उच्चाधिकाऱ्यांमध्ये युरोपियन व्यक्तींचीच संख्या अधिक होती. गेल्या काही दशकांत या परिस्थितीत बदल झाले आहेत. चर्चच्या कार्डिनलमध्ये विशेषत: आफ्रिकन व्यक्तींचाही समावेश आहे. पोपच्या निवडणुकीत सहभागी झालेल्या आणि ज्यांना पोप होण्याचीही संधी होती अशा कार्डिनलमध्ये भारतातील पाच जणांचा समावेश होता. भारताच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या संख्येने भारतीय कार्डिनलनी या निवडणुकीत भाग घेतला होता.

नवे पोप फ्रान्सिस यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. गेल्या काही दशकांत कॅथॉलिक चर्चला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले होते. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप पाश्‍चिमात्य राष्ट्रांतील अनेक धर्मगुरूंवर झाले आहेत. या घटनांमुळे कॅथॉलिक चर्चची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. चर्चच्या समलिंगी सबंधविरोधी धोरणाविरुद्धही अनेक संघटनांनी आवाज उठवला आहे. कुठल्याही प्रकारच्या गर्भपातास कॅथॉलिक चर्चचा अगदी पूर्वीपासून ठाम विरोध आहे. या व अशा सर्वच प्रश्‍नांबाबत नवे पोप काय भूमिका घेतात, याकडे सर्व जगाचे लक्ष असेल.

आफ्रिका, आशिया खंडांत कॅथॉलिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. या देशांतील धर्मगुरूंची बिशप अणि कार्डिनल पदांवर चर्चने नेमणूक करावी, अशी या लोकांची अपेक्षा आहे. भविष्यात भारतीय कार्डिनलचीसुद्धा पोपपदावर निवड होऊ शकते.

फोटो गॅलरी

Saturday, July 21, 2012

बिशप डिसोझा यांची 'फेसबुक'वरून जगभर प्रवचने


बिशप डिसोझा यांची 'फेसबुक'वरून जगभर प्रवचने
Tuesday, July 17, 2012 AT 01:15 AM (IST)
बिशप डिसोझांचा 79व्या वर्षी उपक्रम 

कामिल पारखे 
पुणे- ख्रिश्‍चन समाजाच्या पुणे धर्मप्रांताचे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांनी वयाच्या 79व्या वर्षी "फेसबुक'च्या माध्यमातून प्रवचने देण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या उपक्रमाला अल्पावधीतच चांगलाच प्रतिसाद मिळत असून, जगभरातून सुमारे अठराशे मित्र जोडले गेले आहेत.

डिसोझा यांनी 126 वर्षांच्या पुणे धर्मप्रांताच्या इतिहासात तब्बल 31 वर्षे बिशपपद भूषविले. या कालावधीत त्यांनी शेकडो मोठी प्रवचने देऊन भक्तांना प्रभू येशूचा मार्ग दाखविला. प्रवचन देताना स्वतःच गिटार वाजवीत गाणी म्हणण्याची सवय असल्याने त्यांना "सिंगिंग बिशप' म्हणून ओळखले जात असे. अशा या उत्साही धर्मगुरूंनी मार्च 2010 मध्ये सुरू केलेल्या फेसबुक अकाउंटला सर्वाधिक प्रतिसाद तरुणवर्गाकडून मिळत आहे.

यासंदर्भात ते म्हणाले, ""मी आतापर्यंत 1,775 मित्र फेसबुकमार्फत जोडले असून, दररोज त्यात सरासरी दहा जणांची भर पडत आहे.'' सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली तेव्हाही ते लॅपटॉप घेऊनच बसले होते. प्रवचन पोस्ट करण्याबरोबरच परिचितांना लग्न आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही ते नियमित पाठवीत असतात.

पुणे धर्मप्रांताचे बिशप असताना डिसोझा यांना देशात आणि युरोपात अनेक ठिकाणी धार्मिक प्रवचन देण्यासाठी मोठी मागणी असे. त्यांच्या प्रवचनांचे तीन खंड प्रसिद्ध झाले आहेत. गुड फ्रायडे आणि ईस्टरदरम्यान एका स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्या प्रवचनांचे प्रक्षेपण अगदी अलीकडील काळापर्यंत करण्यात येत होते.