Tuesday, May 4, 2021

सुगावा प्रकाशन'चे विलास वाघ सर

 

विलास वाघ सर 

गोवा सोडून पुण्यात स्थायिक झालो त्याला आज तीन दशके झालीत. याकाळात पिंपरी चिंचवडला राहत असलो तरी नोकरी मात्र इंडियन एक्सप्रेस (पुणे कॅम्प), टाइम्स ऑफ इंडिया (हॉटेल वैशालीपाशी डेक्कनला) आणि नंतर सकाळ माध्यमसमूहाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांच्या (बुधवार पेठ आणि नंतर न. ता. वाडी, शिवाजीनगर ) पुण्यातील ऑफिसांत केली.
चिंचवडने दररोज सिटी बसने पुण्याला जाऊन तिथल्या भोज्याला शिवून परत रात्री बसने घरी हा दररोजचा कार्यक्रम. त्यामुळे ना पुण्यात ना चिंचवडला तसे कुठले मूळ धरले नाही, अपवाद फक्त पेठेतल्या भाऊ महाराज बोळातल्या पत्रकार मित्र पराग रबडेच्या घराचा. कामावरुन सुट्टी घेतली आणि पुण्यात असलो तर माझी भेटीगाठीची आणि विसाव्याची एकमेव तीन ठिकाणे होती हे आता माझ्या लक्षात आले.
'वाट चुकलेला फकिर मशिदीत' या नियमाने यासुट्टीच्या काळात पुण्यात मी हमखास सापडणार ती तीन-चार ठिकाणे आहेत. ती म्हणजे शनिवार पेठेतले मॅजेस्टिक बुकच्या समोरचा येशूसंघीय (जेसुइट ) धर्मगुरूंचा स्नेहसदन आश्रम, त्याजवळचेच सदाशिव पेठेतले चित्रशाळा बिल्डिंगमधले सुगावा प्रकाशनचा बुक स्टॉल, शुक्रवार पेठेतला साधनाचा बुक स्टॉल आणि बुधवार पेठेतील सकाळ माध्यमसमूहाचे तळमजल्यावरील ग्रंथालय.
यातील जर्मन फादर आणि मराठी भाषापंडित डॉ. मॅथ्यू लेदर्ले यांनी स्थापन केलेला `स्नेहसदन आश्रम' हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग, यासंबंधी नंतर कधीतरी सांगेन. या ‘स्नेहसदन`मधूनच तेथील ग्रंथपाल आणि जवळचा मित्र जयंत गायकवाड याने मला सुगावा प्रकाशनाची वाट दाखविली, तेथे नेऊन सुगावाच्या प्रा. विलास वाघ आणि उषाताई वाघ यांची ओळख करुन दिली. त्यावेळी 'सकाळ'मधला पत्रकार म्हणून मला `अहोजाहो' करणारे वाघ सर मला कधी अरेतुरे म्हणायला लागले हे आम्हा दोघांनाही कळाले नाही.
आम्ही पत्रकार मंडळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना चांगले जोखून असतो, जात्यात सिनिकल असल्याने त्यानुसार आमचे त्यांच्यांशी पूर्णतः प्रोफेशनल संबंध असतात. महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाशी वाघ सरांचे किती घनिष्ठ संबंध होते हे मला खूप उशिरा कळाले आणि मग माझा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोनच बदलून गेला. वाघ सरांचे व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने आदरणीय बनले.
ख्रिस्ती समाजातील दोन अत्यंत ऋषीतुल्य व्यक्ती असलेल्या सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि रेव्हरंड अरविंद निर्मळ यांच्याबरोबर तीन दशकांपूर्वी उषाताईंनी आणि वाघ सरांनी काम केले होते, ही बाब त्या दोघांविषयी मला खूप काही सांगून गेली
`अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील आद्य दलित आत्मकथन १९७६ साली लिहिणारे स. ना. सूर्यवंशी हे नाशिकमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' साप्ताहिकाचे संपादक आणि एक गाजलेले किर्तनकार. रेव्ह. निर्मळ हे भारतातल्या दलित लिबरेशन थियॉलॉजीचे प्रणेते. 'संदेष्ट्याला आपल्या गावात सन्मान मिळत नसतो' या बायबलमधल्या वचनाप्रमाणे निर्मळ यांना महाराष्ट्रात वंदनीय स्थान मिळाले नसले तरी दक्षिण भारतात दलित ख्रिस्ती चळवळीत त्यांना खूप मानले जाते.
रेव्ह. निर्मळ यांनी १९९०च्या दशकात महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती दलित साहित्य संमेलने भरविण्यात सुरुवात केली तेव्हा या संमेलनांना उषाताई आणि वाघ सरांनी साथ दिली होती. मराठी ख्रिस्ती स्त्रियांची एक खास कार्यशाळा अहमदनगरच्या निलीमा बंडेलू यांच्या मदतीने भरवून त्यांचे प्रश्न मांडणारी एक पुस्तिकाही उषाताई आणि वाघ सरांनी छापली, त्याची एक दुर्मिळ प्रत मी जपून ठेवली आहे.
महाराष्ट्रातील दलित ख्रिस्ती समाजाविषयी दलित चळवळीतील नेत्यांची मते आणि पूर्वग्रह ठराविक, एका साच्याची असतात. ख्रिस्ती समाज कुठल्याही चळवळीत नसतो, इतरांपासून फटकून असतो, ही त्यांची एक समान तक्रार. वाघ सर या दलित ख्रिस्ती समाजात वावरले होते, या समाजाच्या लोकांना त्यांनी समजून घेतले, त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध केली. गॅब्रिएल जाधव आणि सुभाष चांदोरीकर ही त्यांपैकी काही नावे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत १९९२ ला अहमदनगर येथे भर सभेत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करणारे 'ख्रिस्ती महार' या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक बाळासाहेब गायकवाड यांचा भ्रमनिरास झाल्यावर वाघ सरांनी गायकवाड यांना खूप मदत केली, त्यांची ख्रिस्ती समाजाविषयीची पुस्तकेही प्रसिद्ध केली. अर्थात हा इतिहास मला नंतर, खूप उशिरा कळाला.
वाघ सरांच्या सुगावा प्रकाशनाने माझी पुस्तकेही प्रकाशित केली. गावकुसाबाहेरचाा ख्रिस्ती समाज, दलित ख्रिस्ती समाजाचा आरक्षणासाठी लढा, अमेरिकेतील वेश्याव्यवसाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर), अस्पृश्यता आणि वर्णभेदाविरुद्ध लढा, ही ती पुस्तके. त्याशिवाय माझ्या इतर पुस्तकांचेही सुगावा प्रकाशन वितरक आहेत.

आणि हे सर्वांत महत्त्वाचे. दरवर्षी सुगावाचे उषाताई आणि वाघ सर आपल्या सर्व लेखकांना त्यांच्या पुस्तकाच्या रायल्टीची रक्कम इमानेइतबाने चेकने पोस्टाने पाठवित असतात. यावर्षी मला आलेली ही रॉयल्टीची ही रक्कम. पुस्तकाची किंमत चाळीस आणि पस्तीस रुपये असल्यामुळे तशी ही रक्कम अगदीच मामुली आहे. मात्र मराठीतील किती दैनिके, नियतकालिके आणि पुस्तक प्रकाशने अशा प्रकारे आपल्या लेखकांना असे मानधन देत असतील ?
सुगावातर्फे दरवर्षी चळवळीतल्या लोकांना दिला देणारा जाणारा सन्मान काही वर्षांपूर्वी वसईच्या लेखिका आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा सेसिलीया कार्व्हालो यांना दिला गेला.
जातीनिर्मुलनाच्या चळवळीचा एक भाग म्हणून उषाताई आणि वाघ सर गेली अनेक वर्षे आंतरजातीय वधूवर संमेलन घेत असत आणि त्यासाठी स्नेहसदनने आपली जागा त्यांना वापरण्यासाठी दिली होती. कोरोनाची साथ सुरु होईपर्यंत ही संमेलने जेसुईट फादरांच्या संस्थेच्या 'स्नेहसदन'मध्ये पार पडली. आज कोरोनामुळे वाघ सरांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना सलाम आणि आदरांजली.

No comments:

Post a Comment