हरेगावच्या संत तेरेजा शाळेच्या बोर्डिंगमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत असताना पहिल्यांदा माझी मिशनरींच्या जीवनाशी ओळख झाली. त्या काळात म्हणजे 1960 च्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक फादरबाडींमध्ये पन्नाशी पार केलेले युरोपियन धर्मगुरू काम करत होते. कडक शिस्तीचे फादर ह्युबर्ट सिक्स्त हे आमच्या शाळेचे मुख्य होते, तर काटकुळ्या प्रकृतीचे आणि साठी ओलांडलेले फादर रीचर्ड वासरर हे त्यांचे सहायक होते. शरीरप्रकृतीने आणि स्वभावप्रकृतीनेही या दोन फादरमध्ये बराचसा फरक होता.
म्हातारे फादर वासरर यांच्या अंगाखांद्याला लहान मुले सदैव झोंबत असत. त्यावेळी संत तेरेजा शाळा कौलारू खोल्यांमध्ये भरत असे. या खोल्यांच्या मागे शाळेच्या मालकीच्या असलेल्या शेतीजवळ त्यावेळी नव्यानेच एक मोठा पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. या हौदात सकाळची शाळा सुरू होण्याआधी भल्या पहाटे फादर वासरर आम्हा बोर्डिंगच्या मुलांना घेऊन पोहत असत. नदीची वा विहिरीची ओळख नसलेल्या आम्हा अनेक मुलांना त्यांना येथेच पोहण्याचे धडे दिले. म्हाताऱ्या फादरच्या पाठीवर पडून पाण्यात हात-पाय हलवून त्यावेळी अनेक मुले पोहायला शिकली.
एकदा पोहण्याचा कार्यक्रम चालू असताना हौदाची एक भिंत वाहून गेली. सुदैवाने फादर यांच्यासह इतर कुणाही मुलाला दुखापत झाली नाही.
मध्यम उंचीचे आणि अल्सेसियन कुत्रा पाळणारे फादर सिक्स्त हे स्वत: या आजारी मुलांना तपासत असत. स्वत:जवळ असलेल्या बटव्यातून औषध आणि गोळ्या देत असत. गरज भासल्यास मुलांना इंजेक्शनदेखील देत असत. हे इंजेक्शनदेखील त्या फादरबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण करण्याचे एक कारण असावे असे आता मला वाटते.
जर्मन नागरिक असलेल्या हुबर्ट सिक्त यांना सक्तीच्या लष्करभरतीमुळे दुसऱ्या महायुद्धात भाग घ्यावा लागला होता, तेव्हा त्यांनी जखमींना मदत करणाऱ्या मेडिकल कोअरमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारांची माहिती होती. (हे मला अर्थात अलिकडेच जर्मनीत तीन दशकांपासून स्थायिक असलेल्या अजित लोखंडे यांनी लिहिलेल्या 'मिशन, मिशनरी आणि मी' या पुस्तकातील लेखावरून कळाले. गोव्यात कळंगुटजवळच्या बागा बिचवर पोहोताना फादर सिक्त यांचे १९८७ साली निधन झाले.)
बोर्डिंगमध्ये मार्शल आणि पेत्रस हे माझे थोरले दोन भाऊही होते. हरेगाव (बेलापूर) शुगर फॅक्टरीच्या आसपास असलेल्या उंदीरगाव आणि एकवाडी, दोनवाडी, तीनवाडी अशा वाड्यांतील मुले या शाळेत शिकत असत. बोर्डिंगच्या मुलांना राहण्याची आणि जेवणाची मासिक पाच रुपये फी होती. मात्र ही फीसुद्धा वेळेवर कधी भरली जात नसे. मात्र फी न भरल्यामुळे एखाद्या मुलाला तंबी मिळाली वा बोर्डिंगमधून काढूनटाकले असा प्रकार मात्र कधीही झाला नाही.
आज अहमदनगर जिल्ह्यात अनेक शहरात आणि गावात ख्रिस्ती धर्मगुरूंतर्फे वा सिस्टर्सतर्फे अनेक शाळा चालविल्या जातात. त्याकाळात मात्र जिल्ह्यातील मागासवर्गीय ख्रिस्ती समाजासाठी हरेगावची संत तेरेजा शाळा आणि संगमनेरची ‘ज्ञानमाता’ ही दोनच प्रमुख शिक्षण केंद्रे होती. श्रीरामपूर आणि शेजारील तालुक्यातील मुले हरेगावला बोर्डिंगमध्ये राहून सातवीपर्यंत शिकत आणि पास झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी संगमनेरच्या ज्ञानमाता बोर्डिंगचा रस्ता धरत. त्याकाळातील सर्वच मिशन केंद्रे येशूसंघीय (जेसुईट) फादरांची होती.
आठवी-नववीनंतर, मॅट्रीकमध्ये सुटल्यानंतर वा सुटले नाही तरी यापैकी अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येशूसंघातर्फेच पुण्यात फादर आयवो मायर यांनी चालविलेल्या सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भरती होत. (बाय द वे, फादर मायर यांनीच माझा श्रीरामपुरला बाप्तिस्मा करुन मला 'कामिल' हे नाव दिले होते!) सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये तेथील बोर्डिंगमध्ये राहून टर्नर, फिटर, वायरमन वगैरेंचे शिक्षण घेत. पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेण्याची पूर्वाश्रमीचे दलित असलेल्या या ख्रिस्ती समाजाची आर्थिक वा सामाजिक कुवत त्यावेळी नव्हती.
त्याकाळात अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील स्थानिक फादरबाडींतील बोर्डिंगमध्ये आणि नंतर ज्ञानमातेत शिकून पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकलकडे प्रवास केलेल्यांची संख्या प्रचंड आहे. किमान दोन पिढ्यांनी ही पायवाट वापरली आहे. पुण्यात व्यावसायिक शिक्षण घेऊन नंतर पुण्यातीलच बजाज, टेल्को, फिलिप्स, ग्रीव्हज वगैरे कंपन्यांत यापैकी अनेकांनी प्रवेश मिळविला.
या दोन जिल्ह्यांतून पुण्यात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती गावी मागे राहिलेल्या त्यांच्या इतर समाजकुटुंबीयांपेक्षा कितीतरी चांगली आहे. उपेक्षित ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी दिलेल्या पाठबळामुळे अर्थात हे शक्य झाले. दलित असूनही धर्मांतरामुळे हा समाज राखीव जागांच्या सवलतीस मुकला.
ख्रिस्ती दलितांचा - किंबहुना पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या कुठल्याही दलितांचा - सर्व प्रकारच्या घटनात्मक आरक्षणावर पूर्णतः अधिकार नव्हे हक्क आहे, भले घटनेने आणि कायद्याने तो त्यांना आजपर्यंत नाकारला आहे ही बाब दुसरी. मिशनरींनी मात्र आपल्या मर्यादित कुवतीनुसार या समाजाला स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आणि दलित असूनही या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या या समजात न्यूनगंडाची भावना आढळत नाही ती यामुळेच.
‘मनुष्य केवळ भाकरीवरच जगत नाही’, हे ख्रिस्ताचे वचन सांगतानाच गरीब ख्रिस्ती कुटुंबांना रोजची रोटी कशी मिळविता येईल याकडेही मिशनरींनी लक्ष दिले. भारतातील ख्रिस्तीसमाजापैकी बहुतांश लोक पूर्वाश्रमीच्या अनुसूचित जाती-जमातींमधून (एस सी आणि एस टी) आले आहेत. या दलित समाजाच्या प्रगतीत मिशनरींनी केलेले योगदान स्पष्ट करण्यासाठी येथे मुद्दामच अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्याचा एक उदाहरण म्हणून उल्लेख केला आहे.
देशातील विविध राज्यांतील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी असाच मदतीचा हात दिला आहे. नवख्रिस्ती समाज बाल्यावस्थेत असताना मिशनरींनी केलेल्या मदतीबद्दल समाजाच्या या पिढ्या कृतज्ञ राहिलेल्या आहेत.
हरेगावची संत तेरेजा, संगमनेरची ज्ञानमाता, पुण्यातील सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट, लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज, बंगलोरचे सेंट जॉन मेडिकल कॉलेज, मदर तेरेसांची जगभर पसरलेली अनाथगृहे या सर्व ख्रिस्ती धर्मीयांनी चालविलेल्या संस्था आहेत. मात्र यापैकी सर्वच संस्थांतील बहुतांश लाभार्थी हे अख्रिस्ती समाजातील असतात हे विशेष. याचे कारण म्हणजे या सर्व संस्था सर्व धर्माच्या आणि जातीच्या व्यक्तींसाठी खुल्या आहेत. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह देशातील विविध क्षेत्रांतील नामवंतांनी ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेतले आहे. ख्रिस्ती मिशनरींनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेले हे एक मोठे योगदान आहे.
ख्रिस्ती मिशनरी आपल्या संस्थांचा वापर छुप्या पद्धतीने, आर्थिक प्रलोभन दाखवून वा सक्तीने धर्मांतर करण्यासाठी करतात असा अनेकदा आरोप केला जातो. ख्रिस्ती शाळा-कॉलेजात शिकलेल्या, मिशनरींच्या इस्पितळात उपचार घेतलेल्या वा इतर मिशनरी संस्थांच्या सेवेचा लाभ घेतलेल्या अख्रिस्ती व्यक्तीच या आरोपात कितपत तथ्य आहे हे सांगू शकतील.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वर्षे मिशनरींनी दुर्लक्षित ग्रामीण भागात शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मुक्तपणे पुरविली. लाभार्थींच्या जाती-धर्माचा त्यांनी कधी विचार केला नाही. मिशनरी वृत्तीची सेवा हा वाक्प्रचार त्यांच्या या नि:स्वार्थी सेवेमुळेच रूढ झाला आहे. धार्मिक कार्य करतानाच धर्मप्रचाराच्या अनुषंगाने ख्रिस्ती मिशनरींनी गेल्या पाच शतकांच्या काळात भारताच्या विविध राज्यात साहित्य, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्र वगैरे क्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. यापैकी केवळ काही मिशनरींच्या कार्याचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.
त्यापैकी विल्यम केरी, पंडिता रमाबाई, रेव्ह. ना. वा. टिळक, बाबा पदमनजी, मदर तेरेसा आदींचे कार्य सर्वपरिचित आहे. ‘निरोप्या’कार आर्चबिशप हेन्री डोरिंगसारख्या मिशनरींचे कार्य मात्र आज विस्मृतीच्या छायेत गेले आहे. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करूनही कालौघात विस्मृतीत गेलेले असे अनेक मिशनरी आहेत.
भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास या धर्माच्या इतिहासाइतकाच म्हणजे दोन हजार वर्षांचा आहे. येशू ख्रिस्ताचा शिष्य असलेल्या संत थॉमसने भारतभूमीवर केरळ राज्यात ख्रिस्ताचे वचन सांगितले तेव्हापासून या देशात ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे. ख्रिस्ती धर्म पाश्चियमात्य आहे असा बहुप्रचलित गैरसमज आहे. मध्ययुगीन काळात हिंदुस्थानात युरोपातून आलेल्या मिशनरींनी देशाच्या इतर राज्यात या धर्माचा प्रसार केला, त्यावर हा गैरसमज आधारित आहे.
ख्रिस्ताचा जन्म आशियातील इस्राएलमध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे संपूर्ण जीवितकार्य इस्राएलच्या एका छोट्याशा परिसरात मर्यादित होते. त्यामुळे हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध आणि शीख धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्माचेही उगमस्थान आशिया खंडातीलच. ख्रिस्ताच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म प्रथम रोममध्ये आणि नंतर इतर राष्ट्रात पसरविला.
भारतातील विविध राज्यांतील धर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी धर्मांतरानंतरही आपलीमूळची भारतीय वा हिंदू संस्कृती बदललेली नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ख्रिस्ती स्त्रिया आजही नऊवारी वा सहावारी साड्या नेसतात. कुंकू लावतात आणि बांगड्या घालतात. पुरुषमंडळीही इतर बहुसंख्य पुरुषांप्रमाणेच पोशाख वापरतात. ख्रिस्ती धर्मीय व्यक्ती म्हणजे फाडफाड इंग्लीश बोलणारी, फ्रॉकमध्ये वा सुटाबुटात वावरणारी आणि मद्यपान करणारी व्यक्ती हा समज हिंदी चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रूढ झालेला आहे.
देशातील बहुतांश ख्रिस्ती समाजाने मात्र अजूनही आपल्या मूळ संस्कृतीची नाळ कायम राखली आहे. याचे कारण म्हणजे ख्रिस्ती धर्म आणि स्थानिक संस्कृती परस्परविरोधी असू शकत नाही, अशी मिशनरींनी घेतलेली ठाम भूमिका होय. रॉबर्ट डी नोबिली आदींसारख्या मिशनरींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मसंस्थेत वादळ निर्माण झाले होते. मात्र धर्मसंस्थेने हे सत्य नंतर मान्य केले.
ख्रिस्ती धर्माच्या या सांस्कृतीकरणाच्या (इनकल्चरेशन) तत्त्वामुळेच देशातील ख्रिस्ती समाज आपली मातृभाषा आणि इतर संस्कृतीच्या इतर अंगांशी इमान राखून आहे आणि गेल्या दोन-तीन शतकांपासून ही परंपरा चालू आहे. त्यामुळेच अनेक पिढ्यांपासून ख्रिस्ती असलेली केरळ, तामिळनाडूमधील तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आणि मूळची गोमंतकीय असलेली अनेक बार्देस्कर ख्रिस्ती कुटुंबे पूर्णत: शाकाहारी आहेत असे आढळते. ही कुटुंबे मूळच्या ज्या उच्च जातींतून ख्रिस्ती धर्मात आली त्या जातींमध्ये मांसाहार वर्ज्य असे. धर्मांतरानंतर कित्येक दशके त्यांनी आपल्या संस्कृतीत बदल केलेला नाही हे विशेष.
`‘ख्रिस्त महाराष्ट्रात जन्मला असता तर त्यानेही खास मराठमोळ्या पद्धतीने पागोटे वापरले असते. मराठी माणसाप्रमाणे तो जगला असता’, असे ‘निरोप्या’चे तेव्हाचे संपादक फादर प्रभुधर यांनी आपल्या एका संपादकीयात लिहिले होते ते याच अर्थाने.
ख्रिस्ती समाजाची अशी आचारप्रवृत्ती निर्माण करण्यात मिशनरींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मूळचे युरोपियन असले तरी या मिशनरींनी नवधर्मांतरित समाजात स्थानिक संस्कृतीविषयी दुस्वास पेरला नाही. याउलट स्थानिक भाषावाङ्मय वा इतर संस्कृती क्षेत्रात भर घालून या स्थानिक संस्कृतीची जोपासनाच केली. या प्रकल्पासाठी संशोधन करताना तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या अनेक मिशनरींच्या कार्याची ओळख झाली. या सर्वांच्याच कार्याची ओळख ('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या छोट्याशा पुस्तकातून करून देणे शक्य नव्हते.'
('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (२००३) कामिल पारखे या पुस्तकाची प्रस्तावना_)
हरेगावचे हे भव्य संत तेरेजा चर्च
No comments:
Post a Comment