Saturday, May 22, 2021

 

हुतात्म्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहता ‘हुतात्मा’ होण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असेच वाटते!
‘अक्षरनामा    पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 31 March 2021
  • पडघममाध्यमनामाअण्णा हजारेAnna Hazareशेतकरी आंदोलनFarmers' Protestहुतात्माMartyr

पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला बातमीदार म्हणून १९८९च्या नोव्हेंबरात रुजू झालो. त्यानंतर काही दिवसांनी एक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे वाढत्या वीजदराबद्दल आणि अनियमित वीजपुरवठ्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला बसले होते. आठव्या-नवव्या दिवशी राळेगण सिद्धीजवळ आंदोलन चिघळून झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात काही शेतकरी ठार झाले होते.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांनी मला ताबडतोब घटनास्थळी जाण्यास सांगितले. ‘लोकसत्ता’चे बातमीदार सुनील कडुस्कर आणि छायाचित्रकार मिलिंद वाडेकर यांच्याबरोबर शिरुरच्या दिशेने निघालो.

पुणे-अहमदनगर हमरस्त्यावर पारनेर फाट्यावर वाडेगव्हाण गावापाशी पोहोचलो. तिथला सन्नाटा थरकाप उडवत होता. रस्त्यालगत असलेल्या त्या गावातल्या चाळीवजा बैठ्या घरांना बाहेरून कड्याकुलुपे लावून लोक गायब झाले होते. शेताकडे गेलो तसे तिथे बायामुलांच्या आणि इतरांच्या रडण्याने काळीज फाटत गेले. रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर कपड्याने झाकलेले मृतदेह दिसत होते. आसपास उभे असलेले शस्त्रधारी पोलीससुद्धा सुन्न दिसत होते. चार-पाच शेतकऱ्यांनी या गोळीबारात जीव गमावला होता. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात ही प्राणहानी झाली, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांच्या गुंडांबरोबर झालेल्या चकमकीच्या म्हणजे एनकाऊंटरच्या घटनेत असे स्पष्टीकरण देण्यात येते.

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर म्हणून याआधी मी सात-आठ वर्षे काम केले होते, पण मृत्यूचे असे तांडव इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ. गोव्यात त्या काळी प्राणघातक अपघात किंवा एखाद्या खुनाची घटना क्वचितच घडायची. दरोड्याची तर एकही घटना मी कव्हर केली नव्हती. त्या वेळी ती झाकलेली प्रेते पाहून मी हबकून गेलो होतो. काही तासांनी पुण्याला परत आलो, तेव्हा अहमदनगरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या वतीने वीजप्रश्नाचा विचार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अण्णा हजारे यांनी लिंबूरस घेऊन आपले बेमुदत उपोषण मागे घेतल्याची बातमी वृत्तसंस्थांनी दिली आहे, असे समजले.

हजारे यांचे हे पहिले बेमुदत उपोषण. यात तीन-चार शेतकऱ्यांनी जीव गमावला, त्यामुळे साहजिकच या आंदोलनाची राज्यभर आणि काही प्रमाणात देशपातळीवर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. त्या काळी अहमदनगर शहरातील किंवा जिल्ह्यातील विविध दैनिकांचे स्थानिक बातमीदार हजारे यांना फारशी प्रसिद्धी देत नसत. त्यांची बातमी द्यावी, असा मुख्यालयातून निरोप आला किंवा अगदी टाळता येत नसेल तरच नाईलाज म्हणून बातमी दिली जात असे. यामागे स्थानिक ताकदवान राजकीय नेतृत्वाचा हजारे यांच्याविषयीचा राग होता, असे मला नंतर समजले.

हजारे आणि माझे पुढच्या काळात व्यक्तिगत संबंध निर्माण झाले. हजारे स्वतः आपली टंकलिखित प्रसिद्धीपत्रके आणि इतर माहिती पोस्टाने पाठवत असत. त्या खाली ‘किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे’ अशी सही असे. मी नियमितपणे या बातम्यांना प्रसिद्धी देत असे.

ही ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यातील काही पत्रे आजही माझ्याकडे आहेत. मात्र ज्या आंदोलनाने हजारे यांना पहिल्यांदाच राज्य पातळीवर आणि देशपातळीवर ओळख निर्माण करून दिली, त्या आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलांचे काय झाले, त्यांना नुकसानभरपाई मिळाली का, वगैरे प्रश्न मला आजही सतावतात. त्यांना हुतात्मे म्हणून कुणी सन्मान दिला नाही, कारण त्या आंदोलनाला कुठल्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे पाठबळ नव्हते.

हजारे यांनीही नंतर या मृत शेतकऱ्यांचा विषय लावून धरल्याचे आठवत नाही. हजारे यांनी राळेगण सिद्धीत ग्रामविकासाचे काम केले. नंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या टर्मच्या अखेरीस जनलोकपालच्या नेमणुकीसाठी अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह ‘जनआंदोलना’चे नेतृत्व करून अण्णा हजारे ‘नव्या स्वातंत्र्यचळवळीचे महात्मा गांधी’ बनले. त्यांच्या सामाजिक चळवळीतील या वाढत्या आलेखाविषयी लिहिणाऱ्यांना त्या चार गरीब शेतकरी आंदोलक हुतात्म्यांविषयी माहितीही नसते.

पुण्याहून अहमदनगरला जाताना वा पुण्याला येताना शिरुरजवळ असलेल्या पारनेर फाट्यापाशी वाडेगव्हाण गावाला आल्यावर आताही मला ते झाकलेले मृतदेह आणि बायामुलांचा तो आक्रोश आठवतो.

बातमीदारांना घटनेचे वार्तांकन करताना प्रत्यक्ष घटनास्थळी असावे लागते, आंदोलन करणाऱ्या लोकांत मिसळावे लागते, अशा वेळी अचानक हिंसाचार झाला तर पत्रकार म्हणून आम्हाला वा त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर कुणालाही कसले संरक्षण असते?

गोव्यात पणजी येथे १९८०च्या दशकात रांपणकारांचे म्हणजे समुद्रात जाळे टाकून मासे पकडणाऱ्या मच्छिमारांचे आंदोलन चालू होते. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी त्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानापाशी असताना कुठूनतरी दगडफेक झाली आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्यसा लाठीमार केला. तेवढ्याने गर्दी न पांगल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मी इतरांप्रमाणेच दिशा दिसेल तिकडे धावू लागलो. पत्रकारितेत नवखा असलो तरी अशा घटनेत स्वतःच्या रुमालाने अश्रुधुरापासून स्वतःचे कसे संरक्षण करावे, हे मी शिकलो होतो. शिवाय अश्रुधुरानंतर गोळीबारही होऊ शकतो, हे मला पक्के ठाऊक होते. निष्कारण हुतात्मा होण्याची गरज नव्हती, हे खरेच होते.

या घटनेनंतर पणजीतल्या मध्ययुगीन राजवाडा असलेल्या सचिवालयातील प्रेसरूममधील काही पत्रकारांनी आंदोलनाच्या आणि इतर संवेदनाशील घटनांचे वार्तांकन करणाऱ्या बातमीदारांनी ‘प्रेस’ असे लिहिलेले आर्म बँड्स वापरावेत अशी सूचना केली होती. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टच्या प्रमोद खांडेपारकर आणि बालाजी गावणेकर वगैरेंनी ती सूचना ‘हास्यास्पद’ म्हणून धुडकावून लावली. अशा ओळखचिन्हामुळे पत्रकार आपसूकच हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते.

औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’मध्ये बातमीदारी करताना घडलेला एक प्रसंग. शहरातल्या गुलमंडी परिसरात काही खोदकाम चालू असताना जमिनीत अचानक मोठे भगदाड पडले आणि खाली वेगवान पाण्याचा प्रवाह दिसू लागला. मध्ययुगीन म्हणजे मुस्लीम आणि नंतरच्या मुघल अमदानीच्या काळात पाणीपुरवठ्याच्या भूमिगत यंत्रणेचे असे अवशेष औरंगाबाद आणि अहमदनगर  शहरांत अधूनमधून दिसतात.

माझा सहकारी असलेला एक तरुण अतिउत्साही बातमीदार लगेचच स्वतःच्या कमरेला दोरखंड बांधून त्या भुयारात शिरून त्या पाण्याच्या प्रवाहाचे स्तोत्र शोधण्याच्या कामाला लागला. त्याला रोखण्याचा मी खूप प्रयत्न केला. त्या अंधाऱ्या भुयारात उतरण्यात खूप जोखीम आहे. दुसरे म्हणजे हे बातमीदाराचे काम नाही. यात काही बरेवाईट झाले तर महिना बाराशे पगार देणारे आमचे दैनिक आतल्या पानावर किंवा फार तर पान एकवर ‘बातमीदाराचे कर्तव्य पार करताना हौतात्म्य’ अशी छायाचित्रासह बातमी छापेल. पण त्याने माझे ऐकले नाही. सुदैवाने त्या पाण्याचा वाहता प्रवाह काही मिनिटांत थांबला. तो सहकारी बातमीदार सुखरूपपणे त्या भगदाडाबाहेर आला आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. तिथे नंतर पोहोचलेल्या महापालिकेच्या लोकांना त्यात फार काही विशेष महत्त्वाचे आढळले नाही.   

पुण्यात ‘सकाळ टाइम्स’साठी पिंपरी चिंचवड शहराचा बातमीदार असताना २०११ साली घडलेली एक घटना आठवते. मावळ तालुक्यातल्या पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बंद पाइपलाइन टाकण्याची योजना मंजूर झाली होती. त्या वेळी विरोधात असलेल्या राजकीय पक्षाने या योजनेस विरोध करून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले होते. अचानक या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि पोलिसांच्या गोळीबारात तीन लोक ठार झाले. आज त्या घटनेस दहा वर्षे झाली, पण निवडणुकीच्या काळात हमखास त्या मृत लोकांना ‘हुतात्मे’ संबोधून प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाविरुद्ध आजही तोफ डागली जाते. ‘या हुतात्म्यांनी सांडलेले रक्त वाया जाऊ देणार नाही’ अशा घोषणांनी आपल्या पारड्यात मते टाकण्यास सांगितले जाते.

या हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याच्या, त्यांच्या मुलाबाळांना सरकारी, महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या आश्वासनांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, अशा बातम्या अधूनमधून येतात. त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांची आज काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत नाही. ‘ज्याचे जळते, त्याला कळते’ असे म्हणतात.

अशा प्रकारे प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या नावावर होणारे राजकारण, सत्ताकारण आणि त्याच वेळी हुतात्म्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहता ‘हुतात्मा’ होण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असे वाटते.

No comments:

Post a Comment