Showing posts with label Haregaon. Show all posts
Showing posts with label Haregaon. Show all posts

Tuesday, October 11, 2022


पापक्षालन - प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.

साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता. तर या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.

दर शनिवारी संध्याकाळीं किंवा रविवारच्या सकाळच्या मिस्साविधिपूर्वी आम्हा मुलांची संत तेरेजा देवळात रांग लागायची. उंचच उंच शिखर असलेल्या त्या भव्य देवळाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा तीन फादर - फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर ज्यो पिंटो - प्रायश्चित ऐकण्यासाठी आपल्या खुर्चीवर बसलेले असायचे. त्यांच्या खुर्चीच्या एका बाजूला जाळीधारी लाकडी फळी असायची, त्या फळीच्या खाली असलेल्या लाकडी पट्टीवर गुडघे टेकून मुलं त्या आठवड्यात आपण केलेल्या लहानमोठ्या पापांची यादी फादरांना सांगत असत.
प्राथमिक शाळातील मुलांनीं केलेली ती पापं शांतपणे ऐकत ते फादर मुलांना पापक्षालन म्हणून एकदोन `आमच्या बापा' अन एक `नमो मारिया' या प्रार्थना म्हणायला सांगत, नंतर आपला उजवा हात उंचावून पवित्र क्रुसाची खूण करत ते मुलांच्या पापांची क्षमा करत.
त्यानंतर रांगेतला दुसरा मुलगा आपली पापं कबूल करायला, त्या पापांची क्षमा मागण्यासाठी त्या फळीवर गुडघे टेकायचा.
अशाप्रकारे पापक्षालन झाल्यावर पापमुक्त झालेली ही मुले नंतर होणाऱ्या मिस्साविधीत पवित्र कम्युनियन किंवा ख्रिस्तशरीर सेवन करण्यासाठी पात्र असायची.
आम्हा सर्व मुलांचे जन्मल्यानंतर काही महिन्यांतच बाप्तिस्मे झाले होते, त्यानंतरचे दोन महत्त्वाचे सांक्रामेन्त प्रथम कम्युनियन आणि प्रायश्चित या शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना झाले.
जन्मानंतर कुठलीही व्यक्ती देवाने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांचे (टेन कमांडमेंट्स) उल्लंघन करतेच आणि पाप करते. या पापांचे क्षालन होण्यासाठी प्रायश्चित किंवा कन्फेशन हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत.
या `टेन कमांडमेंट्स'मध्ये मुर्तीपुजा करु नकोस, आईवडलांचा सन्मान कर, रविवार (शब्बाथ) पवित्र पाळ, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करु नकोस, खून करु नकोस, वगैरेंचा समावेश होतो.
आता दहाबारा वर्षांची मुलंमुली असं कोणतं पाप करणार आहेत ? मात्र त्याकाळात प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.
हल्ली रविवारी किंवा सणावाराला चर्चला आवर्जून जाणाऱ्या भाविकांपैकी अनेकांना त्यांनी प्रायश्चित कधी घेतले होते हे आठवणारसुद्धा नाही. मीसुद्धा याला अपवाद नाही
कॅथोलिक धर्मात सप्त स्नानसंस्कार म्हणजे सात सांक्रामेंत असतात. जन्मानंतर काही दिवसांत होणारा बाप्तिस्मा (नामकरण विधी) , बालपणी कम्युनियन, प्रायश्चित किंवा कन्फेशन, पौंगडावस्थेत कन्फर्मेशन किंवा दृढीकरण, तरुणपणी लग्नविधी किंवा दिक्षाविधी, आणि पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे ते सप्त स्नानसंस्कार.
यापैकी बाप्तिस्मा, लग्नविधी, दीक्षाविधी आणि अंतिम संस्कार हे सांक्रामेंत आयुष्यातून एकदाच होतात तर कम्युनियन आणि प्रायश्चित हे दोन सांक्रामेंत भाविक वारंवार घेऊ शकतात. लग्नाचा विधी अर्थात काहींच्या बाबतीत एकापेक्षा अनेकदा होऊ शकतो !
कॅथोलिक देवळात रविवारीही (आणि दररोजही) होणाऱ्या मिस्साविधीत भाविकांना ख्रिस्तशरीर किंवा कम्युनियन दिले जाते. प्रायश्चित या सांक्रामेंतचा लाभ भाविक त्यांना हवे तेव्हा घेऊ शकतात.
मात्र कन्फर्मेशन (दृढीकरण), लग्न, दीक्षाविधी यासारख्या महत्त्वाचे सांक्रामेंत स्विकारण्याआधी त्या व्यक्तींनी प्रायश्चित घेऊन म्हणजे एकप्रकारे अध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध, पवित्र होऊन पुढले पाऊल उचलावे अशी अपेक्षा असते.
ख्रिस्ती धर्मानुसार जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मूळ पापाचा कलंक घेऊन येत असते. आदाम आणि ईव्ह या पृथ्वीतलावरील पहिल्या पुरुष आणि स्त्रीने देवाची आज्ञा मोडली. इदेन बागेतलं देवाने मना केलेलं एक फळ (सफरचंद? ) इव्हने सैतानाच्या सांगण्यानुसार खाल्ले, आदामालाही खाल्लेलं अर्धे फळ खाण्यास दिलं, हेच ते मूळ पाप किंवा ओरिजिनल सिन. येशू ख्रिस्ताने क्रुसावर मरण पत्करुन मानवजातीची मूळ पापापासून सुटका केली.
बाप्तिस्मा घेणारी प्रत्येक व्यक्ती जन्मतः येणाऱ्या या मूळ पापापासून मुक्त होते. येशूची आई मदर मेरी मात्र या मूळ पापाच्या कलंकाशिवाय जन्माला आली, असा कॅथोलिक धर्माचा एक धर्मसिद्धांत ( डॉक्टरीन) आहे.
``ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता, त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची पापे तुम्ही तशीच राहू द्याल, ती तशीच राहतील,'' असं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, त्या आधारावर पापक्षालन या स्नानसंस्काराची स्थापना झाली आहे.
कुठल्याही कॅथोलिक चर्चच्या सणानिमित्त, यात्रेनिमित्त जमलेले अनेक भाविक पापक्षालन सांक्रामेंत घेत असतात.
धर्मगुरु, बिशप, आर्चबिशप आणि कार्डिनल्स, पोपसुद्धा मानवच असल्याने पापं करणारच, त्यामुळे तेसुद्धा वेळोवेळी प्रायश्चित घेत असतात.
पोप हे भुतलावरचे येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी, सेंट पिटरचे उत्तराधिकारी, त्यांना `होली फादर' असेच संबोधले जाते. तर सर्वोच्च धर्माचार्य असलेले सद्याचे पोप फ्रान्सिस हे सुद्धा आपल्या पापक्षालनासाठी एखाद्या धर्मगुरुकडे आपल्या पापांची कबुली देऊन पापक्षालन करत असतात, हे वाचून अनेकांना धक्का बसायची शक्यता आहे.
यावरुन एक आठवलं. पोपपदावर आल्यानंतर लगेचच पोप जॉन पॉल दुसरे यांच्यावर व्हॅटिकन सिटीत सेंट पिटर्स चौकात दर्शनासाठी भाविकांमध्ये वाहनातून फिरत असताना जीवघेणा गोळीबार झाला. पोटात तीनचार गोळया जाऊनसुद्धा आश्चर्यकारकरित्या ते बचावले आणि पुढे सत्तावीस वर्षे पोप राहण्याचा आणि जगाचा राजकीय आणि भौगोलिक इतिहास बदलण्याचा विक्रम त्यांचा नावावर जमा झाला.
पोप यांच्यावर हल्ला करणाऱ्या अली अगका नावाच्या तुर्किश तरुणाला पुढे जन्मठेपेची सजा झाली. पोप जॉन पॉल या स्वतःच्या मारेकऱ्याला तुरुंगात जाऊन भेटले आणि त्याला त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची आपण क्षमा केली आहे असे त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर सांगितले.
अर्थात अली अगकाच्या पापाचे क्षालन झाले तरी या लौकिक जगातल्या न्यायानुसार अली अगका याला तुरुंगवासाची शिक्षा मात्र माफ झाली नव्हती. (पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच प्रियंका गांधीसुद्धा त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात भेटल्या आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात कटुता नाही असं नंतर त्यांनी सांगितलं.)
मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या मृत्यूच्या सजेआधी त्यांचं प्रायश्चित ऐकून घेतले जाते.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचेही प्रायश्चित ऐकून घेतल्यानंतर, पापांची कबुली ऐकल्यावर ती कबुली धर्मगुरुंना इतर कुणालाही अगदी न्यायालयांतसुद्धा उघड करण्याची परवानगी नसते. मग ही पापाची कबुली एखाद्या चोरीबद्दल, खुनाबद्दल, बलात्कारासारख्या किंवा खुनासारख्या मोठ्या गुन्ह्यांबद्दल असो. ही पापकबुली धर्मगुरुंना स्वतःपाशीच ठेवावी लागते.
अशा प्रकारचे कन्फेशन करणे किंवा पापांची कबुली देणे याचे फायदे खूप असतात आणि त्यामुळे धार्मिक बाब एकवेळ बाजूला ठेवली तरी मानसशास्त्रात त्यास फार महत्त्वाचे मानले गेले आहे.
मूळ पाप हे जन्मतः येते, तर काही पापे अथवा गुन्हे सामूहिक असतात. उदाहरणार्थ, अडॉल्फ हिटलरच्या कारकिर्दीत जर्मनीत लाखो निरपराध ज्यु लोकांना मृत्युदंडाची सजा देण्यात आली, अगणित लोकांचा छावण्यांत छळ करण्यात आला आणि त्याकडे इतर समाजघटकांनी, देशांनी आणि कॅथोलिक चर्चसारख्या सामर्थ्यवान संस्थांनी सरळसरळ काणाडोळा केला.
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्लंडच्या राजघराण्याने किंवा प्रतिनिधींनी भारताची माफी मागावी, पापक्षालन करावे अशीसुद्धा मागणी केली जाते.
तसेच युरोपात आणि अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरुंनी लहान मुलांवर केलेल्या लैगिक अत्याचाराबाबत म्हणता येईल, त्याबद्दल संबंधीत लोकांची आणि कुटुंबियांची पोप बेनेडिक्त सोळावे आणि पोप फ्रान्सिस यांनी माफी मागून एकप्रकारे पापक्षालनाची विनंती केली आहे.
तर अशा या पापक्षालनाविषयी अजून बरंच काही लिहिता येईल.

^^^^
Camil Parkhe, October 10, 2022

Wednesday, October 5, 2022

  पहिला कम्युनियन विधी


काही तारखा मनाच्या पटलावर कायमच्या कोरलेल्या असतात. आजची तीन ऑकटोबर तारीख तशीच. तीन ऑकटोबर हा कॅथोलिक चर्चच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये संत तेरेजा हिचा सण, फेस्त किंवा फिस्ट. श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव येथे संत तेरेजा चर्च आहे, तिथल्या संत तेरेजा शाळेत आणि बोर्डिंगमध्ये मी होतो. जर्मन जेसुईट फादरांनी या ग्रामीण भागात स्थापन केलेल्या या शाळेत त्या दिवशी खास कार्यक्रम असायचा. साठीच्या दशकाच्या अखेरीस त्या वर्षी आमच्या शाळेच्या बोर्डिंगमध्ये त्यादिवशी तीन ऑकटोबरला माझे आईवडील श्रीरामपूरहून भल्या पहाटे आले आणि देवळातल्या त्या कार्यक्रमासाठी माझी तयारी करु लागले. 
 
त्या वेळी मी तिसरीत असेल. बाईने मला धुऊनपुसून स्वच्छ केले, दादांनीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानात शिवलेले नवेकोरे कपडे माझ्या अंगावर चढवले. पांढरी पॅन्ट, पांढराच शर्ट, पांढरे मोजे आणि लेस असलेले पांढरे कापडी बूट. माझ्या डोक्याला तेल लावून कुरळे केस विंचरुन, भांग पडून केसाचा पुढे कोंबडा काढला, चेहेऱ्यावर पावडरचा हलकासा हात फिरवला, सावळ्या गालावर एक बारीकसा काजळाचा ठिपका लावला. नजर लागू नये म्हणून.. देवळात इतर मुलांसह जाण्यास मी आता तयार झालो होतो. 
 
उत्सवमुर्ती बनण्याची माझ्या आयुष्यातली ही पहिली घटना, त्याकाळात कुणाचाही वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नव्हती. आमच्या शाळेला आणि देवळाला जिचे नाव दिले होते त्या संत तेरेजाच्या सणानिमित इथल्या बोर्डिंगमधल्या लहान मुलां-मुलींच्या पहिल्या कम्युनियनचा सामुदायिक विधी या दिवशी व्हायचा. 
 
ही संत तेरेजा म्हणजे मदर तेरेसा ऑफ कोलकता नव्हे. सेंट तेरेजा ऑफ द चाइल्ड जिझस ही एकोणिसाव्या शतकातली कार्मेलाईट संस्थेची फ्रेंच नन. या संत तेरेजाच्या या सणानिमित्त ``स्वर्गबागेतील लहान फुला, संत तेरेजा प्रणाम तुला, प्रणाम तुला'' हे गायन पेटी तबल्याच्या सुरांत हमखास गायले जायचे ! 
 
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या सैन्यात वैद्यकीय पथकात काम केलेले फादर ह्युबर्ट सिक्स्थ आणि फादर रिचर्ड वासरर हे संत तेरेजा देवळात त्यावेळी धर्मगुरु आणि शाळेचे प्रमुख होते. 
 
कॅथोलिक धर्मात सप्त स्नानसंस्कार म्हणजे सात सांक्रांमेंत असतात. जन्मानंतर काही दिवसांत होणारा बाप्तिस्मा (नामकरण विधी) , बालपणी कम्युनियन, प्रायश्चित किंवा कन्फेशन, पौंगडावस्थेत कन्फर्मेशन किंवा दृढीकरण, तरुणपणी लग्नविधी किंवा दिक्षाविधी, आणि पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे ते सप्त स्नानसंस्कार. 
 
कॅथोलिक देवळात रविवारीही (आणि दररोजही ) होणाऱ्या मिस्सा विधीत भाविकांना ख्रिस्तशरीर किंवा कम्युनियन दिले जाते. 
 
दहाव्या वर्षांच्या आसपास असणाऱ्या मुलांमुलींना पहिल्यांदा या सांक्रामेंतसाठी भरपूर पुर्वतयारी करून म्हणजे नेहेमी म्हटल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना शिकवून सामुहिकरीत्या पहिल्यांदा कम्युनियन दिला जातो त्या विधीत मी आज सामील होणार होतो. 
 
या विधीसाठी मुलींना अगदी नववधुसारख्या पांढरे गाऊन, हातमोजे आणि तोंडावर व्हेल वगैरे वेशात सजवलं जातं .
या विधीसाठी मला दादा-बाईनं असं नटूनथटून तयार केलं हे आजही आठवतं तसा पहिला कम्युनियनचा तो विधी मात्र आठवत नाही.  
 
इव्हेंट्सच्या आजच्या जमान्यात घरातल्या मुलां-मुलींचा फर्स्ट कम्युनियन हा ख्रिस्ती कुटुंबांसाठी मोठा समारंभ असतो. 
 
कुठल्याही ख्रिस्ती - कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट - व्यक्तीसाठी त्यांचा पहिला कम्युनियन विधी असा अविस्मरणीय असतो, याचं कारण म्हणजे श्रद्धाळू असेपर्यंत आणि देवळांत उपासनेसाठी ते जातील तोपर्यंत या उपासना विधिदरम्यान ते या ख्रिस्तभोजनात किंवा युखिरिस्ट विधीत ते सहभागी होत असतात. 
 
 
Camil Parkhe, October 3, 2022

Friday, June 4, 2021


श्रीरामपुरातल्या ‘लोकमान्य टिळक वाचनालया’ने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली!
‘अक्षरनामा’   ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 04 June 2021
  • ग्रंथनामावाचणारा लिहितोपुस्तकेBooksगो. नि. दांडेकरG. N. Dandekarवि. स. खांडेकरV. S. Khandekarसाने गुरुजीSane Gurujiश्यामची आईShyamchi Aaiसाने गुरुजी कथामालाSane Guruji KathamalaचांदोबाChandobaहंसHansनवलNavalकिर्लोस्करKirloskarललितLalitअनिल बर्वेAnil Barveद. मा. मिरासदारD. M. Mirasdarपु. ल. देशपांडेP. L. DeshpandeकेशवसुतKeshavsutआचार्य अत्रेAachary Atre

श्रीरामपुरात मेन रोडवरील सोनार आळीतील आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानासमोर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते. अगदी जुनाट दिसत असलेल्या या वाचनालयात पाचव्या इयत्तेत असल्यापासून मी नियमितपणे जायला सुरुवात केली. संध्याकाळी साडेपाचला शाळा सुटली की, मी आमच्या दुकानाकडे येई आणि वाचनालयाच्या सहा वाजता खुला होणाऱ्या बालविभागाच्या कक्षात जाऊन बसे. १९७०-७१सालची ही घटना. त्या काळात महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या या लोकमान्य टिळक वाचनालयाचा समावेश होई. 

या वाचनालयाच्या बालविभागाने मला संपूर्ण जगाच्या, भारताच्या आणि मराठीच्या समृद्ध साहित्याची तोंडओळख करून दिली. ‘इसापनीती’, ‘गुलबकावली’, ‘ग्रीक साहित्यातील महाकाव्ये’, कालिदासाची ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ वगैरे नाटके, वासवदत्ता वगैरे संस्कृतमधील अनेक अभिजात साहित्य, विल्यम शेक्सपियरची ‘हॅम्लेट’ आणि इतर नाटके, रविंद्रनाथ टागोर यांची मराठीत भाषांतरीत झालेली अनेक पुस्तके, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’, ‘सिंदबादच्या कथा’, बिरबल आणि अकबरच्या सुरस कथा, साने गुरुजींची ‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, अमर चित्र कथा मालिकेतली रंगीबेरंगी चित्रांची पुस्तके’ आणि आता न आठवणारी कितीतरी पुस्तके मी पाचवी, सहावी आणि सातव्या इयत्तांत  असताना अगदी अधाशीपणे वाचली.

यांपैकी बऱ्याचशा पुस्तकांचे कथानक काय होते, हे आता मला आठवतही नाही. त्याशिवाय ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘आनंद’, ‘किशोर’ अशी किती तरी बालमासिके तिथे असायची. बालविभागाच्या दारापाशी चपला काढून फरशीवर पसरलेल्या लाल चादरीवर बैठक घालून आम्ही मुले वाचत बसायचो. या बालविभागात उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘साने गुरुजी कथामाला’ चालायची. या कथामालेमुळे गो. नि. दांडेकर वगैरे नामवंत साहित्यिकांच्या तोंडून त्यांच्या साहित्याची ओळख झाली. 

बालविभागाची वेळ फक्त सहा ते साडेसात अशी असायची आणि ती संपल्यावर नाराजीनेच मी बाहेर पडायचो. आणि सर्वांत वाईट बाब म्हणजे हा बालविभाग वर्षांतून काही महिनेच म्हणजे फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतच चालू असायचा! पण या इष्टापतीमुळेच मला वाचनालयाच्या दुसऱ्या म्हणजे मोठ्या माणसांसाठी असलेल्या वाचनकक्षाची ओळख झाली.   

वाचनालयाच्या या मुख्य कक्षात लाकडी प्लॅटफॉर्मवर जाड दोरीने बांधलेली श्रीरामपूर शहरात येणारी सर्व मराठी वृत्तपत्रे उभ्याने वाचण्याची सोय होती. त्याशिवाय काही इंग्रजी, हिंदी आणि एकदोन गुजराती दैनिकेसुद्धा होती. सर्वांत महत्त्वाचे आणि आनंदाचे म्हणजे या कक्षात मराठी भाषेत प्रसिद्ध होणारी विविध साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी लांबलचक लाकडी टेबले आणि खुर्च्यांची सोय होती. ‘धर्मयुग’ हे हिंदी साप्ताहिक, ‘इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ हे खुशवंत सिंग संपादित आणि मारिओ मिरांडा यांची ‘सेंट्रल स्प्रेड’वर रंगीत व्यंगचित्रे असलेले इंग्रजी साप्ताहिक ही नियतकालिकेदेखील मी चाळीत असे. माझ्यासाठी एक मोठे आनंदमय भांडार उघडले गेले आहे, अशीच त्या वेळी माझी भावना होती. या वाचनालयाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. बुधवार हा आठवड्यातला माझा सर्वाधिक नावडता आणि कंटाळवाणा दिवस असायचा, याचे कारण म्हणजे वाचनालय या दिवशी बंद असायचे.

वाचनालयाचे ग्रंथपाल हरीभाऊ कुलकर्णी होते. गोरेपान, मध्यम उंचीचे आणि नाजूक चष्मा वापरणारे हरीभाऊ आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात दादांकडून आपला सफेद शर्ट आणि सफेद पायजमा शिवून घ्यायचे आणि आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे या शिलाईची पूर्ण रक्कम लगेचच रोख द्यायचे. दादांबरोबर वा दुकानातील इतर कुणाबरोबरही गप्पा मारताना मी त्यांना कधी पाहिले नाही. एक खूप शिकलेली, सुसंस्कृत आणि आदर करण्यासारखी व्यक्ती म्हणून हरिभाऊ कुलकर्णी ही माझ्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती.

दादांचे शिक्षण केवळ दुसरीपर्यंत झालेले असले तरी वाचनाचे त्यांना प्रचंड वेड होते. दिवसभर चहा आणि त्यानंतर केवळ कात आणि चुना लावलेले पान खायची सवय वगळता त्यांना इतर कुठलेही व्यसन नव्हते. आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात कुणी गिऱ्हाईक नसले, आजूबाजूचे कुणी गप्पागोष्टीसाठी जमलेले नसले की, मग दादा ‘सकाळ’ किंवा ‘नवा मराठा’ ही वृत्तपत्रे वाचायचे. शिवून झालेली कपडे ठेवायच्या कपाटातच एका कोपऱ्याला अवांतर वाचनासाठी काही साप्ताहिके, मासिके, पुस्तके असायची. यामध्ये ‘चांदोबा’ हे रंगीबेरंगी चित्रांचे मासिक, जेसुईट संस्थेतर्फे श्रीरामपुरातूनच संपादक फादर प्रभुधर प्रकाशित करत असलेले ‘निरोप्या’ हे मासिक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी-संपादित जेसुइटांमार्फतच नाशिकहून प्रकाशित होणारे ‘आपण’ हे साप्ताहिक, ‘स्वराज्य’ हे सकाळ ग्रुपतर्फे प्रकाशित केलेले लोकप्रिय साप्ताहिक यांचा हमखास समावेश असायचा.

त्याशिवाय आमच्या दुकानात आणि घरीही अनेक मराठी पुस्तकांचा संच असायचा आणि त्यात कायम भर पडत राहायची. श्रीरामपूरजवळच असलेल्या हरेगाव येथे दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी मारिया मातेच्या जन्मानिमित्त मतमाऊलीची यात्रा भरते. त्यात असलेल्या बुकस्टॉलमध्ये दादा दरवर्षी नवनवी पुस्तके विकत घ्यायचे. आमच्या कुडाच्या घरातील तिन्हीही खोल्यांत - अगदी स्वयंपाकघरातही - पितळी भांड्यांच्या फळीवर, रेडिओशेजारी, इकडेतिकडेही साप्ताहिके, पुस्तके असायची. 

या पुस्तकांपैकी सगळीच पुस्तके मी अधाशासारखी वाचली. मला वाचायला येण्याआधीपासून दादा ही पुस्तके विकत घेत असत, स्वतः वाचत बसत असत. त्यांचे पाहून मीही ती पुस्तके हातात घेऊ लागलो आणि नंतर अधाशाप्रमाणे ती वाचू लागलो. नंतरनंतर तर हरेगावच्या मतमाऊली यात्रेत घेतलेली पुस्तके माझ्यासाठीच घेतलेली असायची. 

आमच्या घरातील इतर जण म्हणजे माझे मोठे भाऊ किंवा बहिणी यांना कधीही ही पुस्तके वाचताना मी पाहिले नाही. बाई - माझी आई - तर निरक्षरच होती. भिंतीवरच्या येशू ख्रिस्ताचा पुतळा असलेल्या अल्तारापाशीच सुबक कोरीव लाकडी पेटीमध्ये ठेवलेल्या गोल आकाराचे घड्याळ वाचण्यापलीकडे तिची मजल गेली नव्हती. 

मला आणि माझ्या भावंडांना दुसरी-तिसरीत असताना ते घड्याळ वाचण्यास बाईनेच शिकवले. शाळेची तयारी करण्यासाठी हे घड्याळ वाचणे गरजेचे होते. ते जुने घड्याळ बंद पडल्यावर नव्या पद्धतीचे घड्याळ आले आणि बाईची तेव्हढीही साक्षरता संपली. जेव्हा माझ्या लक्षात हे आले, तेव्हा मला खूप वाईट वाटले होते.

त्यानंतर खूप वर्षांनी, वयाची पंच्याऐशी ओलांडल्यानंतर दादांना चष्मा लावल्यानंतरही वाचता येईना, म्हणून मी त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तेव्हा ‘यापुढे त्यांना वाचणे शक्य होणार नाही’ असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मला असेच खूप वाईट वाटले होते.                

तर त्या वेळी घरच्या संग्रहातील वाचलेल्यांपैकी आजही आठवणाऱ्या या पुस्तकांमध्ये ‘यात्रेकरूचा प्रवास’ (जॉन बनयान यांच्या सोळाव्या शतकातील गाजलेल्या ‘द पिलग्रिम्स प्रोग्रेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद), सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांच्या ‘चांदवडचा मधू’ वगैरे कादंबऱ्या, सेंट हेलेना, डॉन बॉस्को, डॉमिनिक साव्हियो वगैरे संतांची रंगीत कव्हर असलेली चरित्रे, ‘हैती’ ही जाडजूड आकाराची भाषांतरीत कादंबरी वगैरेंचा समावेश होता. पुण्यातील ‘जीवनप्रकाश’ या जेसुईट प्रकाशन संस्थेतर्फे त्या काळात मराठीत अनेक पुस्तके प्रकाशित व्हायची. ही मूळ मराठीतील आणि भाषांतरीत पुस्तके कुणाच्या संग्रहात असली तर पुढच्या पिढीसाठी ती जपून ठेवायला हवी.

एकदाची शाळा सुटली की, मी घरात दफत्तर ठेवून जवळच असलेल्या आमच्या दुकानाकडे सुसाट पळत यायचो. मी कायम आमच्या या दुकानात पडीक असायचो. दादांकडे हट्ट करून नव्या शिवलेल्या कपड्यांना काजे करायचे, बटणे लावायचे मी शिकलो. इतर मोठ्या भावांप्रमाणे मात्र शिलाई मशीनवर बसून कपडे शिवण्याचे तंत्र मी शिकलो नाही. मित्रांबरोबर कधी धप्पारप्पी, क्रिकेट, विट्टी-दांडू, पतंग, लंगोरी किंवा गोट्या खेळणे अशा खेळांत मी कधी रमलोच नाही. या सांघिक खेळांत मी फक्त शाळेच्या पीटीच्या क्लासमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे त्या काळात माझ्या घराशेजारी भरत असलेल्या शाखेमध्ये सहभागी व्हायचो. दादांमुळे मलाही दुकानात रस्त्याशेजारी असलेल्या त्या बाकावर बसून मग ‘चांदोबा’, ‘स्वराज्य’, ‘निरोप्या’,  ‘आपण’, ‘श्री’ अशी  नियतकालिके, मासिके वाचायची सवय लागली ती लागलीच. 

मी सहावी-सातवीला असेन तेव्हा श्रीरामपूरच्या मेन रोडवर किशोर टॉकीजशेजारी एका हातगाडीवर सार्वजनिक वाचनालय चालायचे. या हातगाडीवर छोट्याछोट्या पुस्तकांचा ढीग लावलेला असायचा आणि वर्गणीदार दरदिवशी किंवा आठवड्यातून दोन-तीन वेळेस पुस्तके बदलून घ्यायला यायचे. माझा दोन नंबरचा भाऊ लुईस - नाना - हा या वाचनालयाचा वर्गणीदार होता. त्याच्या संगतीने मलाही या वेगळ्याच प्रकारच्या, साहसी, रहस्यमय, उत्कंठा वाढवणारी पुस्तके वाचण्याची सवय लागली.

या वाचनालयाची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तके म्हणजे गुरुनाथ नाईक यांच्या पाच-सहा मालिकांत दर आठवड्याला प्रसिद्ध होणारी पॉकेट बुक्स. यामध्ये ‘तिरंदाज’, ‘कॅप्टन भोसले’, ‘भारतीय गुप्तहेराच्या  पाकिस्तानातील करामती’, ‘काळा पहाड’ असे नायक असलेली पॉकेट बुक्स शुक्रवारी हाती पडायच्या आणि त्यावर वर्गणीदारांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. (काही वर्षांनंतर गोव्यात एका संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत एका सहकारी पत्रकाराने तेथे हजर असलेल्या गुरुनाथ नाईक यांची ओळख करून दिली, तेव्हा त्यांना पाहून मी थक्क झालो होतो!)  बाबुराव अर्नाळकर यांच्या  भयकथांच्या पुस्तकांनाही या वाचनालयात भरपूर मागणी असायची, पण अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या वाटेला मी कधी गेलो नाही.

मी आठवीत गेल्यावर लोकमान्य टिळक वाचनालय श्रीरामपूर नगरपालिकेच्या आझाद मैदान येथील प्रशस्त जागेत गेले. तोपर्यंत वाचनाचे मला व्यसन लागल्याने मी एकटा मेन रोडने चालत जाऊन तिथे वाचत बसू लागलो. सुट्टीच्या काळात मी तेथे सकाळी नऊपासून अकरापर्यंत तर संध्याकाळीही रात्री आठपर्यंत वाचनात घालवत असे. ‘वाट चुकलेला फकिर मशिदीत’ या नियमाने या काळात मी कोठे असेल असा प्रश्न माझ्या आईवडलांना कधी पडत नसे. श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा रात्री साडेआठला वाजल्यानंतर शहरातील सर्व दुकाने बंद व्हायची, या भोंग्याआधीच मी आमच्या दुकानात वा घरी पोहोचलेलो असायचो.  

त्या काळात खूप लोकप्रिय असलेली साप्ताहिके, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक, ‘डेबेनॉर’, ‘फेमिना’, ‘करंट’ आणि ‘ब्लिट्झ’ साप्ताहिके, ‘ठणठणपाळ’ हे लोकप्रिय साहित्यिक टवाळक्या करणारे सदर असणारे ‘ललित’ मासिक, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘नवल’, ‘मोहिनी’, ‘हंस’, ‘जत्रा’, तसेच य. गो. जोशी यांचे धार्मिक विषयाला वाहिलेले ‘प्रसाद’ मासिक वगैरे मासिके आणि विविध विषयांना वाहिलेले दिवाळी अंक हे सर्व या वाचनालयात अगदी फुकटात वाचायला मिळणे म्हणजे एक मोठी मेजवानीच होती.

यापैकी प्रत्येक साप्ताहिकाचा, मासिकाचा, दिवाळी अंकाचा स्वतःचा असा वेगळा बाज असे. कुठले तरी एक साप्ताहिक त्यातल्या पान दोनवर प्रसिद्ध होणाऱ्या बिकिनीतील ललनेसाठी लोकप्रिय होते. ‘हंस’, ‘नवल’ आणि ‘मोहिनी’ ही तिन्ही मासिके एकाच प्रकाशनसंस्थेची, अनंत अंतरकर यांनी सुरू केलेली. मात्र यापैकी ‘नवल’ हे गूढ आणि रहस्यकथांना वाहिलेले होते. ‘मोहिनी’ आणि ‘हंस’ यांचे वेगवेगळे विषय कोणते होते, ते आता आठवत नाही, मात्र हे तिन्ही मासिके मी वाचत असे हे मात्र नक्की. अशीच गोष्ट किर्लोस्कर कंपनीतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ या मासिकांची होती. ही तिन्ही मासिके त्या काळात खूप लोकप्रिय होती. त्या तीन मासिकांची  आद्याक्षरे असलेले ‘किस्त्रीम’ नावाचे मासिक आता प्रसिद्ध होते.

विशेष म्हणजे लोकमान्य टिळक वाचनालयात ही सर्व  साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके ती अगदी ताजीतवानी असतानाच वाचकांच्या टेबलांवर असायची, साधारणतः महिन्याच्या सातआठ तारखेपर्यंत सर्व नियतकालिके वाचकांच्या पुढ्यांत असायची. तीच गोष्ट दिवाळी अंकांची. याबद्दल ग्रंथपाल हरीभाऊ कुलकर्णी यांना श्रेय देऊन त्यांचे याबाबतीत ऋण मान्य केलेच पाहिजे. ग्रंथपाल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लवकरच दुदैवाने हरीभाऊ यांचे हृदयविकाराने निधन झाले, हे दादांकडून ऐकले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. ज्येष्ठ असलेल्या या व्यक्तीशी मी एक शब्दही कधी बोललो नव्हतो, मात्र ग्रंथपाल म्हणून त्यांनी माझ्यासारख्या अनेकांची वैचारीक, बौद्धिक जडणघडण केली आहे हे नक्कीच. 

‘पॅपिलॉन’, अनिल बर्वे यांचे ‘थँक यू मिस्टर ग्लॅड’ वगैरे पुस्तके, ‘मनोहर’ या नियतकालिकांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेतून मी पहिल्यादा वाचली. रवींद्र गुर्जर यांनी इंग्रजीतील अनेक लोकप्रिय पुस्तके मराठीत आणली त्यापैकी अनेक पुस्तके मी या काळात वाचली.  

टिळक वाचनालयात दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत साने गुरुजी कथामालेअंतर्गत साहित्यिकांची व्याख्याने आयोजित केली जायची. हे वाचनालय आपल्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाल्यावर तेथे गो. नि. दांडेकर यांचे व्याख्यान झाले होते. तेव्हा शिवरायांचे किल्ले चढणारे दांडेकर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी त्या चक्राकार पायऱ्या अगदी वेगाने कसे चढले होते, ते आताही आठवते.    

अजूनही माझ्या आवाक्यात न आलेले एक भले मोठे भांडार त्या लोकमान्य टिळक वाचनालयात होते. ते भांडार म्हणजे वाचनालयात असलेली हजारो पुस्तके. मात्र ही पुस्तके केवळ वाचनालयाच्या वर्गणीदारांना घरी घेऊन वाचायला मिळायची. अनामत रक्कम भरून मासिक वा वार्षिक वर्गणीदार  झालेल्या लोकांना ही पुस्तके काही ठराविक दिवसांसाठी मिळायची. पुस्तक परतण्यास उशीर झाल्यास दरदिवशी काही पैसे दंड बसायचा. दादांना मी पुष्कळ तगादा करुनही त्यांनी वाचनालयाची वर्गणी भरली नव्हती. अखेरीस मी आठवी की, नववीला गेल्यावर एकदाचे दादांनी ही अनामत  रक्कम  आणि वर्गणी भरली आणि मी एकदम खुश्श झालो.  

आता या कक्षात बसून लाकडी खोक्यांमधील लेखकाच्या किंवा पुस्तकाच्या आद्याक्षरानुसार जाड कागदांवर लिहिलेली यादी पाहून पुस्तके निवडणे म्हणजे आनंदच होता. त्यानंतर मराठीतील अनेक नामवंत लेखकांची एकामागून एक पुस्तके वाचण्याचा मी सपाटा लावला. यामध्ये गो. नि. दांडेकर होते. त्यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘मृन्मयी’, ‘माचीवरला बुधा’ यांसारख्या पुस्तकांनी मला भारावून टाकले होते. इतर लेखकांमध्ये वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील होते. त्या काळात म्हणजे १९७०च्या दशकात त्या टिळक वाचनालयाच्या सर्व सुविधांचा सर्वाधिक पुरेपूर लाभ घेणारा माझ्या वयातील मी एकमेव वाचक होतो. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषक मिळाल्यावर ‘ययाती’ कादंबरी वाचून काढली. ‘खांडेकरांच्या रूपाने मराठीला पहिले ज्ञानपीठ’ असा मी दिलेला दहाबारा ओळींचा लेख माझ्या नावानिशी त्या वेळी ‘निरोप्या’ मासिकात प्रसिद्ध झाला होता.  

दहावीनंतर शिक्षणासाठी कराडला गेलो तेथे ज्यांच्याबरोबर मी राहात होतो, त्या ‘निरोप्या’ मासिकाचे संपादक असलेल्या फादर प्रभुधर यांच्या मराठी ग्रंथसंग्रहाची दोन-तीन स्टीलची, पारदर्शक काचांची कपाटेच होती. त्यामध्ये ‘ज्ञानेश्वरी’ होती, केशवसुतांच्या कविता  होत्या, स्वामी रामदासांचे ‘दासबोध’  आणि संत तुकारामांची ‘गाथा’ होती. मराठीतील पहिले छापिल पुस्तक असलेले फादर थॉमस स्टिफन्स यांचे ‘ख्रिस्तपुराण’, ‘कऱ्हेचे  पाणी’ या आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राचे तीन-चार खंड होते. त्या वर्षभराच्या काळात अशी ही अनेक पुस्तके एकतर वाचून किंवा नजरेखालून काढली.

पुढील शिक्षणासाठी मी गोव्याला गेलो आणि तिथे इंग्रजी बोलता आणि वाचता यावे म्हणून आम्हा मुलांवर मराठी वा कोकणी बोलण्यावर बंदीच आली आणि त्यामुळे मी इंग्रजी बोलू लागलो, लिहू आणि वाचू लागलो.

पदवी शिक्षण संपल्यानंतर गोव्यातच मी पत्रकार बनलो, तेही इंग्रजी दैनिकात. तेथून आजवर पूर्णतः इंग्रजी वृत्तपत्रांतच कारकीर्द घालवली आहे.गोव्यातील माझ्या वास्तव्याचा काळ हा माझ्या आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ. या काळात मी विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकांशिवाय इतर कुठली मराठी पुस्तके वाचलीही नाहीत. त्या कॉलेज आणि हॉस्टेल जीवनात मित्रांच्या संगतीने हेराल्ड रॉबिन्स, जेफ्री आर्चर, मारिओ पुझो (गॉडफादरफेम) वगैरेंची भरपूर लोकप्रिय इंग्रजी पुस्तके वाचली, इंग्रजी चित्रपट पाहिले.

मी केवळ इंग्रजी पत्रकारितेतच काम केले असले तरी तेव्हापासून आजपर्यंत मराठीतही माझे लिखाण असतेच. काही जण म्हणतात, दोन्ही भाषांत मी बऱ्यापैकी लिहू शकतो. लहानपणी भरपूर वाचन केल्यामुळे असे दोन्ही भाषांतही लिहिणे शक्य झाले असावे. 

आता मागे वळून पाहताना वाटते कि सत्तर, ऐशी आणि नव्वदच्या दशकांचा तो काळ मराठी साप्ताहिके, मासिके आणि इतर नियतकालिकांचा सुवर्णकाळच होता. वाचनसंस्कृतीचाच तो सुवर्णकाळ म्हटले तरी चालेल. दूरदर्शन किंवा मोबाईल येण्याच्या आधीच्या त्या काळात बहुतेक घरात किमान एक तरी दैनिक यायचे. शेजाऱ्यांकडून दैनिके वाचण्यासाठी घेऊन जाण्याची पद्धत होती. शहरांत चौकाचौकांत वर्तमानपत्रांचा, इतर नियतकालिकांचे स्टॉल्स असायचे आणि रस्त्यांवर सायकलने हिंडत मोठ्याने ओरडून, बस स्टॅण्डवर प्रत्येक बसमध्ये शिरून ‘ताज्या’ बातम्या असणारी दैनिके विकली जायची. चहाची तलफ भागवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अमृततुल्य’ सारख्या हॉटेलांत, तसेच कटिंग सलूनमध्येही दैनिके, साप्ताहिके ठेवण्याची प्रथा होती.   

अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील कुठल्या तरी  वाचनालयाचे सदस्य असणे प्रतिष्ठेचे समजले जायचे. मी पुण्यात डेक्कनला १९८९ला राहायला आलो, तेव्हा माझ्या लॉजच्या शेजारी असलेल्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे सदस्य होण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असायची, हे अजूनही आठवते. नेहमी सिटी बसने प्रवास करणाऱ्या मी स्वतः  अनेक वर्षे बसची वाट पाहत असताना काही वाचावे म्हणून बॅगमध्ये नेहमी पुस्तक वा मासिक आवर्जून ठेवत असायचो. मोबाईलमुळे माझी ही सवय आता गेली आहे.

या दोन-तीन दशकांच्या काळात ‘स्वराज्य’, ‘श्री’, ‘मार्मिक’, ‘विवेक’, ‘आपण’, ‘मनोहर’, ‘ब्लिट्झ’, ‘करंट’ अशी भिन्न विचारसरणींची, प्रवृत्तींची दैनिकांच्या, नियतकालिकांच्या कट्ट्यांवर एकमेकांशेजारी गुण्यागोविंदाने राहिली. वाचकांनी ती सार्वजनिक वाचनालयांत किंवा आपापल्या घरी वाचली. तरी या वाचकांना डावा, उजवा, पुरोगामी, भक्त, अर्बन नक्सली किंवा कुठलेही ‘वादी’ अशी लेबले त्या काळात लावली जात नसायची. अशीच स्थिती देशभरही होती का ते माहीत नाही. या सगळ्या विचारांची त्या काळात सरमिसळ होत राहायची. हे विचार ‘स्टेटस को’ किंवा ‘जैसे थे’वादी, डबके न बनता सतत प्रवाही राहिले हे नक्की!


Tuesday, May 4, 2021

ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकाची प्रस्तावना

 



हरेगावच्या संत तेरेजा शाळेच्या बोर्डिंगमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत असताना पहिल्यांदा माझी मिशनरींच्या जीवनाशी ओळख झाली. त्या काळात म्हणजे 1960 च्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक फादरबाडींमध्ये पन्नाशी पार केलेले युरोपियन धर्मगुरू काम करत होते. कडक शिस्तीचे फादर ह्युबर्ट सिक्स्त हे आमच्या शाळेचे मुख्य होते, तर काटकुळ्या प्रकृतीचे आणि साठी ओलांडलेले फादर रीचर्ड वासरर हे त्यांचे सहायक होते. शरीरप्रकृतीने आणि स्वभावप्रकृतीनेही या दोन फादरमध्ये बराचसा फरक होता.
म्हातारे फादर वासरर यांच्या अंगाखांद्याला लहान मुले सदैव झोंबत असत. त्यावेळी संत तेरेजा शाळा कौलारू खोल्यांमध्ये भरत असे. या खोल्यांच्या मागे शाळेच्या मालकीच्या असलेल्या शेतीजवळ त्यावेळी नव्यानेच एक मोठा पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. या हौदात सकाळची शाळा सुरू होण्याआधी भल्या पहाटे फादर वासरर आम्हा बोर्डिंगच्या मुलांना घेऊन पोहत असत. नदीची वा विहिरीची ओळख नसलेल्या आम्हा अनेक मुलांना त्यांना येथेच पोहण्याचे धडे दिले. म्हाताऱ्या फादरच्या पाठीवर पडून पाण्यात हात-पाय हलवून त्यावेळी अनेक मुले पोहायला शिकली.
एकदा पोहण्याचा कार्यक्रम चालू असताना हौदाची एक भिंत वाहून गेली. सुदैवाने फादर यांच्यासह इतर कुणाही मुलाला दुखापत झाली नाही.
मध्यम उंचीचे आणि अल्सेसियन कुत्रा पाळणारे फादर सिक्स्त हे स्वत: या आजारी मुलांना तपासत असत. स्वत:जवळ असलेल्या बटव्यातून औषध आणि गोळ्या देत असत. गरज भासल्यास मुलांना इंजेक्शनदेखील देत असत. हे इंजेक्शनदेखील त्या फादरबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण करण्याचे एक कारण असावे असे आता मला वाटते.
जर्मन नागरिक असलेल्या हुबर्ट सिक्त यांना सक्तीच्या लष्करभरतीमुळे दुसऱ्या महायुद्धात भाग घ्यावा लागला होता, तेव्हा त्यांनी जखमींना मदत करणाऱ्या मेडिकल कोअरमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारांची माहिती होती. (हे मला अर्थात अलिकडेच जर्मनीत तीन दशकांपासून स्थायिक असलेल्या अजित लोखंडे यांनी लिहिलेल्या 'मिशन, मिशनरी आणि मी' या पुस्तकातील लेखावरून कळाले. गोव्यात कळंगुटजवळच्या बागा बिचवर पोहोताना फादर सिक्त यांचे १९८७ साली निधन झाले.)
बोर्डिंगमध्ये मार्शल आणि पेत्रस हे माझे थोरले दोन भाऊही होते. हरेगाव (बेलापूर) शुगर फॅक्टरीच्या आसपास असलेल्या उंदीरगाव आणि एकवाडी, दोनवाडी, तीनवाडी अशा वाड्यांतील मुले या शाळेत शिकत असत. बोर्डिंगच्या मुलांना राहण्याची आणि जेवणाची मासिक पाच रुपये फी होती. मात्र ही फीसुद्धा वेळेवर कधी भरली जात नसे. मात्र फी न भरल्यामुळे एखाद्या मुलाला तंबी मिळाली वा बोर्डिंगमधून काढूनटाकले असा प्रकार मात्र कधीही झाला नाही.
आज अहमदनगर जिल्ह्यात अनेक शहरात आणि गावात ख्रिस्ती धर्मगुरूंतर्फे वा सिस्टर्सतर्फे अनेक शाळा चालविल्या जातात. त्याकाळात मात्र जिल्ह्यातील मागासवर्गीय ख्रिस्ती समाजासाठी हरेगावची संत तेरेजा शाळा आणि संगमनेरची ‘ज्ञानमाता’ ही दोनच प्रमुख शिक्षण केंद्रे होती. श्रीरामपूर आणि शेजारील तालुक्यातील मुले हरेगावला बोर्डिंगमध्ये राहून सातवीपर्यंत शिकत आणि पास झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी संगमनेरच्या ज्ञानमाता बोर्डिंगचा रस्ता धरत. त्याकाळातील सर्वच मिशन केंद्रे येशूसंघीय (जेसुईट) फादरांची होती.
आठवी-नववीनंतर, मॅट्रीकमध्ये सुटल्यानंतर वा सुटले नाही तरी यापैकी अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येशूसंघातर्फेच पुण्यात फादर आयवो मायर यांनी चालविलेल्या सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भरती होत. (बाय द वे, फादर मायर यांनीच माझा श्रीरामपुरला बाप्तिस्मा करुन मला 'कामिल' हे नाव दिले होते!) सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये तेथील बोर्डिंगमध्ये राहून टर्नर, फिटर, वायरमन वगैरेंचे शिक्षण घेत. पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेण्याची पूर्वाश्रमीचे दलित असलेल्या या ख्रिस्ती समाजाची आर्थिक वा सामाजिक कुवत त्यावेळी नव्हती.
त्याकाळात अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील स्थानिक फादरबाडींतील बोर्डिंगमध्ये आणि नंतर ज्ञानमातेत शिकून पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकलकडे प्रवास केलेल्यांची संख्या प्रचंड आहे. किमान दोन पिढ्यांनी ही पायवाट वापरली आहे. पुण्यात व्यावसायिक शिक्षण घेऊन नंतर पुण्यातीलच बजाज, टेल्को, फिलिप्स, ग्रीव्हज वगैरे कंपन्यांत यापैकी अनेकांनी प्रवेश मिळविला.
या दोन जिल्ह्यांतून पुण्यात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती गावी मागे राहिलेल्या त्यांच्या इतर समाजकुटुंबीयांपेक्षा कितीतरी चांगली आहे. उपेक्षित ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी दिलेल्या पाठबळामुळे अर्थात हे शक्य झाले. दलित असूनही धर्मांतरामुळे हा समाज राखीव जागांच्या सवलतीस मुकला.
ख्रिस्ती दलितांचा - किंबहुना पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या कुठल्याही दलितांचा - सर्व प्रकारच्या घटनात्मक आरक्षणावर पूर्णतः अधिकार नव्हे हक्क आहे, भले घटनेने आणि कायद्याने तो त्यांना आजपर्यंत नाकारला आहे ही बाब दुसरी. मिशनरींनी मात्र आपल्या मर्यादित कुवतीनुसार या समाजाला स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आणि दलित असूनही या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या या समजात न्यूनगंडाची भावना आढळत नाही ती यामुळेच.
‘मनुष्य केवळ भाकरीवरच जगत नाही’, हे ख्रिस्ताचे वचन सांगतानाच गरीब ख्रिस्ती कुटुंबांना रोजची रोटी कशी मिळविता येईल याकडेही मिशनरींनी लक्ष दिले. भारतातील ख्रिस्तीसमाजापैकी बहुतांश लोक पूर्वाश्रमीच्या अनुसूचित जाती-जमातींमधून (एस सी आणि एस टी) आले आहेत. या दलित समाजाच्या प्रगतीत मिशनरींनी केलेले योगदान स्पष्ट करण्यासाठी येथे मुद्दामच अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्याचा एक उदाहरण म्हणून उल्लेख केला आहे.
देशातील विविध राज्यांतील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी असाच मदतीचा हात दिला आहे. नवख्रिस्ती समाज बाल्यावस्थेत असताना मिशनरींनी केलेल्या मदतीबद्दल समाजाच्या या पिढ्या कृतज्ञ राहिलेल्या आहेत.
हरेगावची संत तेरेजा, संगमनेरची ज्ञानमाता, पुण्यातील सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट, लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज, बंगलोरचे सेंट जॉन मेडिकल कॉलेज, मदर तेरेसांची जगभर पसरलेली अनाथगृहे या सर्व ख्रिस्ती धर्मीयांनी चालविलेल्या संस्था आहेत. मात्र यापैकी सर्वच संस्थांतील बहुतांश लाभार्थी हे अख्रिस्ती समाजातील असतात हे विशेष. याचे कारण म्हणजे या सर्व संस्था सर्व धर्माच्या आणि जातीच्या व्यक्तींसाठी खुल्या आहेत. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह देशातील विविध क्षेत्रांतील नामवंतांनी ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेतले आहे. ख्रिस्ती मिशनरींनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेले हे एक मोठे योगदान आहे.
ख्रिस्ती मिशनरी आपल्या संस्थांचा वापर छुप्या पद्धतीने, आर्थिक प्रलोभन दाखवून वा सक्तीने धर्मांतर करण्यासाठी करतात असा अनेकदा आरोप केला जातो. ख्रिस्ती शाळा-कॉलेजात शिकलेल्या, मिशनरींच्या इस्पितळात उपचार घेतलेल्या वा इतर मिशनरी संस्थांच्या सेवेचा लाभ घेतलेल्या अख्रिस्ती व्यक्तीच या आरोपात कितपत तथ्य आहे हे सांगू शकतील.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वर्षे मिशनरींनी दुर्लक्षित ग्रामीण भागात शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मुक्तपणे पुरविली. लाभार्थींच्या जाती-धर्माचा त्यांनी कधी विचार केला नाही. मिशनरी वृत्तीची सेवा हा वाक्प्रचार त्यांच्या या नि:स्वार्थी सेवेमुळेच रूढ झाला आहे. धार्मिक कार्य करतानाच धर्मप्रचाराच्या अनुषंगाने ख्रिस्ती मिशनरींनी गेल्या पाच शतकांच्या काळात भारताच्या विविध राज्यात साहित्य, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्र वगैरे क्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. यापैकी केवळ काही मिशनरींच्या कार्याचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.
त्यापैकी विल्यम केरी, पंडिता रमाबाई, रेव्ह. ना. वा. टिळक, बाबा पदमनजी, मदर तेरेसा आदींचे कार्य सर्वपरिचित आहे. ‘निरोप्या’कार आर्चबिशप हेन्री डोरिंगसारख्या मिशनरींचे कार्य मात्र आज विस्मृतीच्या छायेत गेले आहे. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करूनही कालौघात विस्मृतीत गेलेले असे अनेक मिशनरी आहेत.
भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास या धर्माच्या इतिहासाइतकाच म्हणजे दोन हजार वर्षांचा आहे. येशू ख्रिस्ताचा शिष्य असलेल्या संत थॉमसने भारतभूमीवर केरळ राज्यात ख्रिस्ताचे वचन सांगितले तेव्हापासून या देशात ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे. ख्रिस्ती धर्म पाश्चियमात्य आहे असा बहुप्रचलित गैरसमज आहे. मध्ययुगीन काळात हिंदुस्थानात युरोपातून आलेल्या मिशनरींनी देशाच्या इतर राज्यात या धर्माचा प्रसार केला, त्यावर हा गैरसमज आधारित आहे.
ख्रिस्ताचा जन्म आशियातील इस्राएलमध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे संपूर्ण जीवितकार्य इस्राएलच्या एका छोट्याशा परिसरात मर्यादित होते. त्यामुळे हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध आणि शीख धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्माचेही उगमस्थान आशिया खंडातीलच. ख्रिस्ताच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म प्रथम रोममध्ये आणि नंतर इतर राष्ट्रात पसरविला.
भारतातील विविध राज्यांतील धर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी धर्मांतरानंतरही आपलीमूळची भारतीय वा हिंदू संस्कृती बदललेली नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ख्रिस्ती स्त्रिया आजही नऊवारी वा सहावारी साड्या नेसतात. कुंकू लावतात आणि बांगड्या घालतात. पुरुषमंडळीही इतर बहुसंख्य पुरुषांप्रमाणेच पोशाख वापरतात. ख्रिस्ती धर्मीय व्यक्ती म्हणजे फाडफाड इंग्लीश बोलणारी, फ्रॉकमध्ये वा सुटाबुटात वावरणारी आणि मद्यपान करणारी व्यक्ती हा समज हिंदी चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रूढ झालेला आहे.
देशातील बहुतांश ख्रिस्ती समाजाने मात्र अजूनही आपल्या मूळ संस्कृतीची नाळ कायम राखली आहे. याचे कारण म्हणजे ख्रिस्ती धर्म आणि स्थानिक संस्कृती परस्परविरोधी असू शकत नाही, अशी मिशनरींनी घेतलेली ठाम भूमिका होय. रॉबर्ट डी नोबिली आदींसारख्या मिशनरींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मसंस्थेत वादळ निर्माण झाले होते. मात्र धर्मसंस्थेने हे सत्य नंतर मान्य केले.
ख्रिस्ती धर्माच्या या सांस्कृतीकरणाच्या (इनकल्चरेशन) तत्त्वामुळेच देशातील ख्रिस्ती समाज आपली मातृभाषा आणि इतर संस्कृतीच्या इतर अंगांशी इमान राखून आहे आणि गेल्या दोन-तीन शतकांपासून ही परंपरा चालू आहे. त्यामुळेच अनेक पिढ्यांपासून ख्रिस्ती असलेली केरळ, तामिळनाडूमधील तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आणि मूळची गोमंतकीय असलेली अनेक बार्देस्कर ख्रिस्ती कुटुंबे पूर्णत: शाकाहारी आहेत असे आढळते. ही कुटुंबे मूळच्या ज्या उच्च जातींतून ख्रिस्ती धर्मात आली त्या जातींमध्ये मांसाहार वर्ज्य असे. धर्मांतरानंतर कित्येक दशके त्यांनी आपल्या संस्कृतीत बदल केलेला नाही हे विशेष.
`‘ख्रिस्त महाराष्ट्रात जन्मला असता तर त्यानेही खास मराठमोळ्या पद्धतीने पागोटे वापरले असते. मराठी माणसाप्रमाणे तो जगला असता’, असे ‘निरोप्या’चे तेव्हाचे संपादक फादर प्रभुधर यांनी आपल्या एका संपादकीयात लिहिले होते ते याच अर्थाने.
ख्रिस्ती समाजाची अशी आचारप्रवृत्ती निर्माण करण्यात मिशनरींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मूळचे युरोपियन असले तरी या मिशनरींनी नवधर्मांतरित समाजात स्थानिक संस्कृतीविषयी दुस्वास पेरला नाही. याउलट स्थानिक भाषावाङ्मय वा इतर संस्कृती क्षेत्रात भर घालून या स्थानिक संस्कृतीची जोपासनाच केली. या प्रकल्पासाठी संशोधन करताना तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या अनेक मिशनरींच्या कार्याची ओळख झाली. या सर्वांच्याच कार्याची ओळख ('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या छोट्याशा पुस्तकातून करून देणे शक्य नव्हते.'
('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (२००३) कामिल पारखे या पुस्तकाची प्रस्तावना_)



                                                            हरेगावचे हे भव्य संत तेरेजा चर्च

Saturday, September 12, 2020

पुणेरी ख्रिश्चन्स पुणे पिंपरी-चिंचवड ख्रिस्ती संस्कृती






 एके काळी ‘कॅम्प’ या भागाबद्दल सर्वांना बरंच आकर्षण होतं. तिथले रस्ते, तिथली दुकान, तिथली राखण्यापिण्याची चंगल वगैरेंमुळे पुणेकर कॅम्पात खेचले जायचे. हा भाग ख्रिश्‍चनबहुल. त्यामुळे त्याबद्दलही एक वेगळंच आकर्षण होतं. आता कॅम्पचं स्वरूप बदललं आहे आणि हीच ख्रिश्‍चनधर्मीय मंडळीही तिथून बाहेर पडली आहेत. आजमितीला कॅम्पशिवाय पुण्याच्या विविध भागांमध्ये ख्रिश्‍चन समाजवास्तव्य करत आहे. एका अर्थाने पुण्याच्या सामाजिक जीवनात हा समाज मिसळून गेला आहे.

ख्रिस्ती संस्कृतीचा पुण्याशी संबंध आला अठराव्या शतकात. पेशव्यांच्या राजवटीत ख्रिस्ती मंडळींचं आणि पुण्याचं नातं सैन्यातील व्यवहारांच्या निमित्ताने जुळू लागलं होतं. मुळात गोमंतकीय पोर्तुगीज नागरिक पशेव्यांच्या आणि ख्रिस्ती समाजाच्या संपर्कातील सेतू ठरले. त्यानंतर काही ख्रिस्ती लोक पेशव्यांच्या सैन्यात अधिकारपदावर किंवा तोफांच्या कारखान्यातले कर्मचारी म्हणून किंवा व्यापारी म्हणून सामील होत गेले. पुणे कॅम्प ही तेव्हाची लष्कराची छावणी. त्यामुळे पूर्वी मराठ्यांच्या लष्करातील सहभागाच्या निमित्ताने शहरात आलेले ख्रिश्‍चन अधिकारी व सैनिक या परिसरात स्थायिक झाले. याशिवाय खडकी, वानवडी या बाजूलाही ख्रिस्ती सैनिक व अधिकारी वसू लागले.

मराठी फौजेतील युरोपीय वंशाच्या किंवा गोमंतकीय ख्रिस्ती लष्करी अधिकारी व सैनिकांसाठी पुणे कॅम्पात 1792 साली एक चर्च बांधण्यात आलं. अनेकांना माहीत नसेल, परंतु सवाई माधवराव पेशव्यांनी देणगी म्हणून दिलेल्या जागेवर हे सिटी चर्च (इमॅक्युलेट कन्फेशन चर्च) उभं राहिलं. क्वार्टर गेट परिसरातलं हे चर्च पुण्यातील ख्रिस्तीधर्मीयांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी सर्वात जुनी खूण. या चर्चचं मूळ बांधकाम माती आणि चुन्याच्या साहाय्याने केलेलं होतं. 1852 साली जुनं बांधकाम पाडून चर्चचं सध्याचं रूप घडवण्यात आलं. पुणे आणि ख्रिस्तीधर्मीयांचं नातेसंबंध घडण्याची आखणी एक खूण म्हणजे कॅम्पातच, सोलापूर रोडवर असलेलं सेंट मेरीज चर्च. हे चर्च 1823 साली बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मराठा फौजेतील ख्रिस्ती अधिकारी व सैनिकांसाठी लष्करी तळांच्या परिसरात अनेक चर्च बांधली गेली.

अव्वल बि‘टिश आमदनीत पुण्यातील ख्रिश्‍चन समाज मु‘यत्वे फौजेतील युरोपीय या गोमंतकीय अधिकारी व सैनिक आणि त्यांची कुटुंबं असा मर्यादित होता. त्यामुळेच पुण्यातील सर्वांत जुनी कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्च केवळ पुणे कम्प, खडकी आणि वानवडी या लष्करी तळांत दिसतात. पुणे स्वातंत्र्यपूर्व काळात लष्करातील किंवा रेल्वे खात्यातील नोकरीच्या निमित्ताने अनेक दाक्षिणात्य  ख्रिस्ती कुटुंबं पुणे कँपात आणि खडकीत स्थायिक झाली. त्यातून हा भाग ख्रिश्‍चनबहुल बनत गेला. गेल्या तीन-चार दशकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत जी अनेक ख्रिस्ती चर्च उभी राहिलेली दिसतात ती ख्रिश्‍चनांच्या सं‘येत या परिसरात मोठी वाढ झाल्याचं दर्शवतात.

भारताच्या अनेक भागांत ख्रिस्ती समाज आढळतो आणि त्यांच्या चालीरीती त्या त्या भागांतील स्थानिक संस्कृतीनुसार असतात. पुण्यात देशातील सर्वच भागांतील ख्रिस्ती स्थलांतरित झाले असल्याने धर्माने एकच असलेल्या या समाजाच्या विविध घटकांत खूपच सांस्कृतिक विविधता आढळते. पुण्यातील ख्रिस्ती समाज हा बहुभाषिक, विविध पंथीय, भिन्न भिन्न संस्कृतींचा आणि आपल्या मूळ प्रांतांच्या संस्कृतीनुसार वेशभूषा करणारा आहे, त्याचप्रमाणे तो अठरापगड जातींचाही आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ख्रिस्ती समाजाच्या कॅथॉलिक आणि प्रॉस्टेस्टं या दोन्ही पंथांचे लोक आहेत. कॅथॉलिकांची सं‘या तुलनेने अधिक आहे. कॅथॉलिक चर्चतर्फे चालवल्या जाणार्‍या शाळा, प्रशिक्षण केंद्र, दवाखाने आणि इतर संस्थांची सं‘याही अधिक आहे. या दोन्ही पंथांतील लोक मराठी भाषक, कोकणी भाषक गोवन, कोकणी भाषक मंगलोरियन, तमिळ, मल्याळी आणि तेलुगू वगैरे भाषिक गटांत विभागलेले आहेत.

विशेष म्हणजे खुद्द मराठी भाषक ख्रिस्ती समाजसुद्धा महाराष्ट्रातील चार प्रदेशांतून इथे स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या संस्कृती किंवा बोलीभाषा एकमेकांपासून भिन्न आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातून स्थलांतरित झालेला, मूळचा गोमंतकीय असलेला बार्देकर समाज; पश्‍चिम महाराष्ट्रातील अहबदनगर-कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतून आलेला आणि मराठवाड्यातून स्थलांतरित झालेला ख्रिस्ती समाज अशा चार गटांत मराठी भाषिक ख्रिस्ती समाज विभागलेला आहे. गोवा मंगळूर, बार्देस आणि वसई इथून स्थलांतरित झालेल्या ख्रिस्ती समाजात डिसूझा, गोन्साल्विस, फर्नांडिस अशी पाश्‍चिमात्य धर्तीची आडनावं आढळतात, याचं कारण म्हणजे या समाजघटकांना लाभलेला पोर्तुगीज राज्यकर्त्यांचा वारसा.

पुण्यातील काही नामांकित व्यक्तींमधील पुण्याचे निवृत्त बिशप वॅलेरीन डिसूझा हे मूळचे गोमंतकीय आहेत, विद्यमान बिशप थॉमस डाबरे हे वसईचे आहेत, नाशिकचे निवृत्त बिशप थॉमस भालेराव हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, तर पुणेकर असलेले आणि सध्याचे नाशिकचे बिशप असलेले लुईस डॅनियन हे मूळचे तमिळ आहेत. पुण्यातील ख्रिस्ती समाजातील आडनावांवरूनसुद्धा जाणकार मंडळींना त्यांची प्रादेशिक, भाषिक आणि जातीय पार्श्‍वभूमी समजते.

भारतात ख्रिस्ती समाज हिंदू धर्मातील विविध जाती-जमातींतून आलेला आहे. गोव्यात आणि वसईत धर्मांतर होऊन ती-चार शतकांचा काळ उलटला, तरी तेथील ख्रिस्ती समाजात त्यांच्या मूळ हिंदू उच्च-नीच समजल्या जाणार्‍या जाती आजही ठाम पाय रोवून आहेत. विशेषतः लग्नसंबंधात या जातींची उतरंड आणि प्रदेश विशिष्ट पार्श्‍वभूमी काम करताना दिसते. पुण्यातील गोवन तरुणाचं लग्न पुण्यातील गोवन तरुणीशी किंवा गोव्यात स्थायिक असलेल्या तरुणीशी होतं, तसंच पुणेस्थित मूळचे अमदनगर, औरंगाबाद किंवा कोल्हापूर जिल्ह्यांतील आणि त्याचप्रमाणे मूळ वसईकर, बार्देस्कर किंवा तमिळ ख्रिस्ती तरुणांचे विवाह जुळत असतात. प्रेमविवाहाचा अर्थात या प्रथेला अपवाद असतो.

मुंबईप्रमाणेच पुणे शहरात कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट मिशनर्‍यांनी अनेक शाळा आणि संस्था उभारलेल्या असल्या तरी या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेली नाहीत. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात धर्मांतरं झाली ती ठाणे जिल्ह्यात वसई येथे आणि उर्वरित महाराष्ट्रात अमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती वगैरे ठिकाणी. रेव्हरंड नारायण वामन टिळक, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड निळकंठशास्त्री नहेम्या गोर्‍हे आणि पंडिता रमाबाई वगैरे उच्चवर्णीय व्यक्तींचा अपवाद वगळता ही सर्व धर्मांतरं हिंदूंमधल्या अस्पश्य गणल्या जाणार्‍या दलित समाजपुरती मर्यादित होती.

मराठी ख्रिस्ती समाजपुरतं बोलायचं झाल्यासहा समाज इतर मराठी समाजापेक्ष्ज्ञा काही वगेळा आहे अशी जाणीवही होणार नाही. कारण या मातीतच इतरांसारखी मराठी ख्रिस्ती व्यक्ती वाढली आहे. त्यांचे संस्कार, चालीरीती, भाषा आणि संस्कृती या भूमीतीलच आहे. ख्रिस्त धर्म स्वीकारला म्हणून येथील भाषा, संस्कृती आणि चालीरीतींचा त्याग करण्याची या समाजाला गरज भासलेली नाही. ज्या युरोपीय मिशनरींनी त्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली त्यांनादेखील येथील संस्कृती ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांशी विसंगत आहे असं वाटलं नाही. त्यामुळे हिंदू धर्मातील चांगल्या परंपरा आणि रीती कायम ठेवून नवधर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी आपली जीवनशैली कायम ठेवली. गोव्यात आणि वसईत मात्र पोर्तुगीजांनी स्थानिक मराठी-कोकणी भाषांची गळचेपी केली. महाराष्ट्राच्या इतर भागांत असा प्रकार सुदैवाने झाला नाही. त्यामुळे ख्रिस्ती झाल्यानंतरही नारायण वामन टिळक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, पंडिता रमाबाई किंवा लक्ष्मीबाई टिळक ही नावं ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत आहेत असं कुणालाही वाटलं नाही. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या ख्रिस्ती समाजातही गायवाकड, सोनवणे, कांबळे, भालेराव, तांबे अशी खास मराठमोळी आडनावं आहेेत.

असाच काहीसा प्रकार मराठी ख्रि‘स्ती समाजाच्या वेशभूषेबाबत आणि काही स्थानिक (हिंदू) सणांबाबत घडला आहे. आपल्या धर्माच्या तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता पुण्यातील मराठी ख्रिस्ती समाजाने या परंपरा चालू ठेवल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कुठल्याही कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी उपासनाविधीत सहभागी होणार्‍या जेष्ठ महिला नऊवारी किंवा गोल साडी, कुंकू आणि मंगळसूत्र आणि डोक्यावर पूर्ण पदर घेणार्‍या आहेत, असं दिसून येईल. हिंदू समाजात कुंकू, मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी समजली जातात. कॅथॉलिक धर्मपीठालाही या समजुती ख्रिस्ती धर्मविरोधी आहेत असं वाटत नाही. त्यामुळेच मराठी ख्रि‘स्ती विवाह चर्चमध्ये होताना लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर धर्मगुरू मंगळसूत्र, अंगठी, जोडवी आशीर्वादित करतो आणि त्यानंतर नवरदेव वधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र विधिपूर्वक घालतो. काही प्रॉटेस्टंट पंथीयांनी मात्र कुंकू आणि मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी ख्रिस्ती धर्मतत्त्वांविरुद्ध आहेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रॉटेस्टंट पंथातील बहुतेक महिला कुंकू लावत नाहीत.

पिंपरी-चिंचवड परिसरात काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी या परिसरात मराठी ख्रिस्ती भाषकांची सं‘या लक्षणीय आहे. यापैकी सध्या ज्येष्ठ नागरिक असणार्‍या या कुटुंबप्रमुखांची पार्श्‍वभूमी औद्योगिक कामगाराची आहे. यामागेही एक इतिहास आहे. पुण्यात स्वारगेटजवळ शंकरशेट रोडवर सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट ही एकेकाळी नावाजलेली संस्था आहे. येशूसंघीय (जेझुइट) या कॅथॉलिक पंथीय धर्मगुरूंनी चालविलेल्या या संस्थेने पुण्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार पुरविले आहेत. 1960 आणि 1970 च्या दशकांत येशूसंघीय धर्मगुरूुंच्या संपर्काने अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेली अनेक मुलं या प्रशिक्षण संस्थेत दाखल झाली आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होताच टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ग‘ीव्ह्ज वगैरे प्रमुख कंपन्यांत त्यांना नोकर्‍या मिळाल्या. अशा प्रकारे अहमदनग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक पिढी त्या काळात पुण्यात स्थिरावली. पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत मराठी भाषक ख्रिस्ती नागरिकांची मोठी सं‘या असल्याचं हे एक प्रमुख कारण. आज या कुटुंबांच्या दुसर्‍या-तिसर्‍या पिढ्या कार्यरत झाल्या आहेत.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत गेली तीन-चार दशकं स्थिरावूनही मराठी ख्रिस्ती भाषिक समाजाने आपल्या मूळ भूमीशी नातं कायम राखलं आहे. अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्यांतील आपल्या मूळ गावी जुन्या पिढीतील व्यक्ती वर्षातून एकदा तरी भेट देतातच. नव्या पिढीतील मंडळी लग्न वा इतर कार्यक‘मासाठी गावी जात असतात. पुण्यातील वसईकर मंडळी या बार्देस्कर मंडळीसुद्धा आपल्या मूळ भूमीशी कायम संपर्क राखून असतात. विशेषतः लग्नासाठी सोयरीक जुळवताना मूळ गावातील नातेवाईक मंडळींचं साहाय्या घेतलं जातं.

मराठी भाषक खिस्ती समाज कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट या पंथांत विभागला असून त्यांच्यात जसे विवाहसंबंध होत नाहीत. तसंच कुठल्याही धार्मिक वा इतर कारणामुळे या दोन्ही पंथांच्या लोकांना परस्परसंबंधदेखील होत नाहीत. मराठी साहित्य चळवळ मात्र यास अपवाद म्हणावी लागेल. ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलना’च्या निमित्ताने या दोन्ही पंथांतील लोक एकत्र येतात. सन 1927 पासून ख्रिस्ती साहित्य संमेलनं भरत असून ती परंपरा आजही सुरू आहे. पुण्यातील मराठी ख्रिस्ती साहित्य संघाची दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी वायएमसीएच्या हॉलमध्ये नियमितपणे बैठक होत असते.

पुण्यातील कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्चमध्ये मराठी उपासनाविधी होतो तेव्हा तिथे रेव्हरंड ना. वा. टिळक, कृष्णाची सांगळे वगैरे नामवंतकवींनी केलेल्या रचना गायल्या जातात. मराठी ख्रिस्ती समाजाच्या या गायनप्रथेला शंभर-सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. ज्या चर्चमध्ये यूथ ग‘ुप या गायकवृंद असेल तिथे हार्मोनियम, तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गीतं गायली जातात. नाताळच्या आधी आठवडाभर कॅरोल सिंगर्स नाताळची गाणी गात ख्रिस्ती कुटुंबांच्या घरी भेटी देतात, तेव्हाही नामांकित कवींनी विशिष्ट रागांत रचलेली गायनं गायिली जातात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी भाषकांसाठी खास वेगळी मिस्सा किंवा उपासना केली जाते. धर्मगुरू आशीर्वाद देतात तेव्हा सर्व महिला डोक्यावर पूर्ण पदर घेतात, त्याचप्रमाणे तामिळ किंवा मल्ल्याळी भाषकांसाठीही त्यांच्या भाषांत प्रार्थना केल्या जातात. याशिवाय इंग‘जी भाषेत होणार्‍या प्रार्थनेसाठी सर्वच भाषक नाताळला एकत्र जमतात.

विवाह समारंभाच्या बाबतीतही मराठी ख्रिस्ती समाजाने सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे वगैरे परंपरा कायम ठेवल्या आहेत. यातही भारतीय आणि पाश्‍चिमात्य परंपरेची सांगड घातली जाते. युरोपियन पद्धतीनुसार चर्चमध्ये लग्नात नववधूने सफेद गाऊन घालण्याची परंपरा आहे. आपल्याकडे मात्र गाऊनऐवजी सफेद साडी नेसली जाते. मात्र, डोक्यावर पांढरा जाळीदार व्हेल (पडदा) आणि हातात पांढरे हातमोजे असतात. लग्नविधीनंतर रिसेप्शनला मात्र भारतीय परंपरेनुसार शालू हवाच. बिगरमराठी भाषक ख्रिस्ती समाजानेही अशाच प्रकारे दोन्ही संस्कृतींची सांगड घातलेली दिसते.

स्वातंत्र्यपूर्व काळत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही दशकांत गोव्यातील अनेक कॅथॉलिक कुटुंब पुणे कँपात स्थायिक झाली. त्यामुळे तिथे आणि नजीकच्या परिसरात सिटी चचर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट झेवियर्स ही देवळं उभारण्यात आली. दोन-अडीच दशकांपूर्वी गोव्यातील बार्देस तालुक्यातून अनेक ख्रिस्ती कुटुंबं नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील घाटावरील प्रदेशात स्थलांतरित झाली. त्या वेळी गोवा पोर्तुगीज अमलाखाली होता. इन्क्विझिशनच्या काळात नवधर्मांतरित ब‘ाह्मण आणि इतर जातींतील ख्रिस्ती समाजावर पाश्‍वात्य संस्कृती स्वीकारण्यासाठी अत्याचार झाल्यामुळे, प्लेगच्या साथीमुळे आणि इतर काही कारणांमुळे हे स्थलांतर झालं, असं म्हणतात. मात्र या दोन-अडीच दशकांत या बार्देस्कर समाजाने आपली गोमंतकीय संस्कृती आणि कोकणी भाषा जतन केली. धर्मगुरू नसतानाही ख्रिस्ती धर्माचं आचरण चालू ठेवलं. हा एक मोठा सामाजिक चमत्कारच म्हटला पाहिजे. गेल्या दोन-अडीच दशकांत घाटावरील हा बार्देस्कर समाज पुण्यात आणि चिंचवड इथे स्थायिक झाला आहे.

पुण्यातील तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती कुटुंबं पूर्वी कँपात छोट्याशा भाडोत्री घरात किंवा स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असत. गेल्या तीन दशकांच्या काळात जमिनींच्या किमती स्वमालकीची जागा विकून त्या बदल्यात मिळालेल्या रकमेत पुणे शहराबाहेर असलेल्या वानवडी वगैरे परिसरांत जागा घेऊन घ्ज्ञरं बांधली किंवा नवे फ्लॅट्स खरेदी केले. पुण्यातील सदाशिव, नारायण वगैरे पेठांतील वाडा संस्कृतीत राहणार्‍या लोकांनी जागा विकून शहराबाहेर म्हणजे कोथरूड परिसरात जागात किंवा फ्लॅट्स विकत घेऊन स्थलांतर केलं, अगदी तसाच हा प्रकार होता.

दरम्यान, याच काळात धर्मगुरू होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रशिक्षण देणार्‍या ‘डी नोबिली कॉलेज’ आणि ‘पेपर सेमिनरी’ यासार‘या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नगर रोडवर सुरू झाल्या. या संस्थांच्या अनुषंगाने अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील अनेक कुटुंबं नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने रामवाडी, येरवडा आणि वडगाव शेरी या परिसरात स्थायिक झाली. खिस्ती समाजाचं प्राबल्य असलेल्या अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. आज या परिसरात होणार्‍या महानगरपालिकेच्या निवणुकीत मतपेटीचा कौल फिरवू शकेल इतकी या समाजाच्या मतदाराची सं‘या आहे; या परिसरातील ख्रिस्ती समाजात मराठी भाषकांची सं‘या अधिक आहे, तर वानवडी, फातिमानगर आणि पुणे कँप परिसरात गोवन ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या अधिक आहे. खडकी कँटोन्मेंट क्षेत्रात आणि शेजारच्या भागात तमिळ ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या लक्षणीय आहे. केरळमधून अलीकडील काही वर्षांत स्थलांतरित झालेली कुटुंबं मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात विखुरलेली आहेत.

शहरातील गोवन समाजाने कुटुंबात, नातलगांत आणि मित्रांशी कोकणी भाषेत बोलून आपली ही भाषा जतन केली आहे. गोव्यात ख्रिस्ती धर्मप्रसारात महत्त्वाची भूमिका करणारे सेंट फान्सिस झेवियर हे या गोमंतकीय समाजाचं प्रमुख श्रद्धास्थान. या ‘गोयंच्या सायबा’चया 3 डिसेंबरच्या सणाला हा समाज चर्चमध्ये मोठ्या सं‘येने उपस्थित असतो. पुणे कॅम्पात ‘पूना गोवन इन्स्टिट्यूट’ इथे होणार्‍या अनेक सभा-समारंभांत शहरातील गोमंतकीय ख्रिस्ती समाज आवर्जून उपस्थित राहतो. ख्रिस्ती गोमंतकीय संस्कृतीतील अनेक उत्सव इथे उत्साहपूर्वक साजरे केले जातात. पुणे कॅम्पातील एम. जी. रोडपाशी काही दुकानं गोवन किंवा ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीशी निगडित असलेल्या विविध चालीरीत, स्नानसंस्कार किंवा पुण्यस्मरण यासार‘या विधींसाठी लागणारं विविध साहित्य, उपकरणं पुरवत असतात. नाताळपूर्वी तर कॅम्पातील अनेक दुकानं या सणासाठी अगदी सजलेली असतात. नाताळचा खास फील अनुभवण्यासाठी, त्या फेस्टिव्ह मूडमध्ये जाण्यासाठी अनेक बिगरख्रिस्ती कुटुंबं आपल्या लहान मुलांसह कॅम्पचा फेरफटका मारतात, तो केवळ यासाठीच.

जगभरात सर्व पसरलेल्या गोवन ख्रिस्ती कुटुंबांत सेंट फान्सिस झेवियर हे एक महत्त्वाचं श्रद्धास्थान असतं. गोव्यातील ‘बॉम जेसू बॅसिलिका’त या पंधराव्या शतकातील संतांच्या शरीराचे अवशेष आजही जतन करण्यात आले आहेत. पुण्यातील गोवन ख्रिश्‍चनांच्या या श्रद्धास्थानाकडे विशेष ओढा असतो. तर अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून पुण्यात आलेले ख्रिस्ती समाजातील हजारो लोक दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी-रविवारी हरेगावच्या मतमाउलीच्या सणाला आवर्जून जात असतात. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरजवळील या खेड्यात येशूची आई मारिया हिच्या जन्मतिथीनिमित्त ही यात्रा गेली सहा दशकं भरत आहे. लाखो लोक आकर्षित करणार्‍या या यात्रेमुळेच हरेगावला मराठी ख्रिस्ती समाजाची पंढरी असं संबोधलं जातं.

तमिळ ख्रिस्ती समाजात सेंट अँथनी या संताला विशेष मान दिला जातो. हा समाज या संताच्या सणाला शहरातील विविध चर्चमध्ये आवर्जून हजरत असतो. हरेगावला मतमाउलीचा सण साजरा होतो, त्याच दरम्यान पुण्यातील खडकी येथील सेंट इग्नेशियस चर्चमध्येही माता मारियेची यात्रा नऊ दिवस भरवली जाते. पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातील ख्रिस्ती आणि इतरही भाविक या नऊ दिवसाच्या प्रार्थनेला - ‘नोव्हेना’ला उपस्थित असतात. या वेळी चर्चमधील मारियेच्या पुतळ्याला साडी चढवली जाते. हिंदू देवळांत ज्याप्रमाणे देवीला साडली नेसवली जाते, तीच परंपरा इथेही चालू ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथे साडीबरोबर नारळसुद्धा अर्पण केला जातो.

ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना स्थानिक संस्कृतीतील चांगल्या परंपरांचा स्वीकार करण्याची भूमिका अनेक ख्रिस्ती मिशनर्‍यांनी संपूर्ण जगभर घेतल्याचं दिसून येतं. मदुराई भागांत उच्चवर्णीय ब‘ाह्मणांमध्ये कार्य करणार्‍या सेंट रॉबर्ट डी नोबिली याने धर्मांतर केल्यानंतरही धर्मांतरीतांना डोक्याचं मुंडन करून शेंडी राखावयास आणि कपाळावर भस्म राखण्यास मुभा मिळवली. यासाठी त्याने अगदी रोमपर्यंत लढा दिला होता. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणार्‍या थॉमस स्टीफन्स या बि‘टिश धर्मगुरूने हिंदू धर्मातील अनेक संकल्पनांचा या महाकाव्यात वापर केला आहे. 

स्थानिक संस्कृतीतील काही चांगल्या परंपरांचा, रीतिरिवाजांचा ख्रिस्ती धर्मातही वापर करण्याच्या प्रथेला ‘सांस्कृतिकीकरण’ किंवा ‘इनकल्चरेशन’ असं म्हटलं जातं. कॅथॉलिक चर्चने गेल्या काही दशकांत या संकल्पनेचा हिरिरीने पुरस्कार केला आहे. यामुळेच पुण्यात किंवा महाराष्ट्रातही अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आखपल्या पांढर्‍या झग्यावर खांद्यावर शाल गुंडाळून उपासना करताना दिसतात. अनेक मराठी ख्रिस्ती कुटुंबांत रक्षाबंधन, भाऊबीज वगैरे परंपरा आजही पाळल्या जातात. तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती समाजातही पोंगल आणि ओणम वगैरे सण उत्साहपूर्वक साजरे केले जातात.

पुण्यातील ख्रिस्ती समाजातील विविध घटकांनी आपली खास वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, चालीरीती ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी तडजोड न करता अशा प्रकारे जतन केली आहे. भाषा, आहार अशा गोष्टींमध्येही या मंडळींनी आपली वैशिष्ट्यं जपली आहेत. ही जपणूक करताना ते पुण्याच्या स्थानिक संस्कृतीपासून वेगळे पडले नाहीत, तर या मंडळींच्या संस्कृतिवैविध्यामुळे पुण्याच्या संस्कृतीलाही नवीन आयाम मिळाले.

कामिल पारखे