नारायण वामन टिळक ख्रिस्ती झाल्यानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतिबरोबर नांदायला तयार नव्हत्या. त्यांना आपल्या बरोबर आणण्यासाठी टिळकांना खूप प्रयत्न आणि कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या, त्यांच्या घरच्यांशी धाकटपटशा करावा लागला आणि खूप प्रयत्नानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतीबरोबर राहू लागल्या, मात्र काही काळ त्या स्वतः चा वेगळा स्वयंपाक करत असत.
असाच प्रकार ख्रिस्ती झालेल्या अनेकांच्या बाबतीत झाला आहे. बाबा पद्मनजी वगैरेबाबत .
यावर तोडगा म्हणून त्याआधी खूप वर्षांपूर्वी घेतलेलं एक पाऊल वाचून मात्र मला हसूच आलं.
वर्ध्याला होऊ घातलेल्या आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या 'सावलीचा शोध’ (मौज प्रकाशन गृह -२०१२) या पुस्तकात ही घटना एका प्रकरणाच्या सुरुवातीलाच दिली आहे.
साल १८५३ आणि स्थळ वाराणशी. इथल्या तुरुंगात प्रत्येक कैद्याला स्वतः स्वयंपाक करण्याची परवानगी रद्द करून सामायिक अन्न शिजवण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं घेतला होता. मात्र त्यामुळे जातीचे रोटी निर्बंध मोडतात म्हणून कैद्यांनी दंगा केला होता. म्हणून वाराणशी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वाजंत्रीसह चक्क एक मिरवणूक निघाली होती.
''चार भोयांच्या खांद्यावर एक मेणा होता. त्यात एक तरुण बसला होता. मेण्यासोबत पंधरावीस लोक हातात काठ्या घेऊन चालले होते,. शिवाय दोनतीन गोरी माणसेही मिरवणुकीबरोबर चालत होती. ही मिरवणूक वाराणशीतील एका मराठी ब्राह्मणाच्या घराजवळ थांबली. घरासमोर थांबलेली ती मिरवणूक पाहून वाड्यातील जोगळेकर मंडळी फार घाबरून गेली. त्यांचा जावई ख्रिस्ती झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी वयात आलेल्या आपल्या लेकीला धर्मांतरित नवऱ्याकडे पाठवायला त्यांनी नकार दिला होता. आता मेण्यात बसून २०-२५ माणसे आणि दोनतीन युरोपियांना घेऊन तो आला होता. त्याचा हेतू दांडगाईचा दिसत होता. जोगळेकरांनी घराचे दर्शनी दार लावून घेतले आणि आतून कडी-आगळ घातली.
मेण्यातून उतरलेल्या निळकंठनें दारावर थाप मारुन लक्ष्मीला - आपल्या बायकोला - आवाज द्यायला सुरुवात केली. जोरजोरात आवाज दिले तरी कोणी दार उघडेना. शेवटी दोनचार आडदांड मंडळींनीं सरळ दार वर उचलून कोंड्यातून उचकटून ते काढले आणि ही मंडळी आत घुसली. चारदोन खोल्यांच्या घरात कोणत्या खोलीत लक्ष्मी आहे हे शोधणे अवघड नव्हते. समोर नवऱ्याला पाहतात लक्ष्मी थरथर कापत स्तब्ध उभी राहिली. नवऱ्याने हात धरून तिला बाहेर काढले. घरातील इतरांचा विरोध मोडून काढण्यात आला, लक्ष्मी आपल्या नवऱ्यासह मेण्यात बसली आणि मेणा परत निघाला. .''
लक्ष्मीच्या वयाच्या सातव्या वर्षी झालेल्या लग्नानंतर त्या दोघांची निघालेली ही दुसरी अशी वरात. फरक इतकाच कि या दुसऱ्या वरातीत त्या दोघांच्याही घरांतली कुणीही नव्हते. मिरवणूक वाराणशीच्या चर्च मिशनरी सोसायटीच्या आवारात गेली आणि तिथे एका छोट्या घरात निळकंठ अन लक्ष्मीचा संसार सुरु झाला.
पतीचे धर्मांतर हा हिंदू कायद्याप्रमाणे पत्नीशी आपोआप होणार विवाहविच्छेद समजला जाई आणि त्यामुळे आपल्या अद्याप हिंदू असलेल्या बायकोला आपल्याजवळ नांदण्यास परत आणणें हा धर्मांतरित नवऱ्यासाठी मोठाच जटिल प्रश्न होऊन जाई असं चपळगावकरांनीं नीलकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे यांच्यावरील या प्रकरणात यासंदर्भात म्हटलं आहे.
आज सकाळीच निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे (किंवा गोऱ्हे) यांच्यावरचे या पुस्तकातलं हे प्रकरण मी वाचत होतो .आणि राज्यात आंतर-जातीय आणि आंतर-धर्मीय विवाहावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वयक समिती नेमण्यात येते आहे असं वृत्तपत्रांत लगेच वाचलं.
प्रखर टिकेमुळं आता आंतर-जातीय विवाह या समितीच्या कचाट्यातून वाचला असंही कळालं.
No comments:
Post a Comment