Friday, April 7, 2023

रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप


Three Popes in a single frame !!!

A rare photo of three Popes - in a single frame
Pope John Paul II with his two successors - Cardinal Ratzinger - (later Pope Benedict XVI ) and Cardinal Bergoglio (now Pope Francis)

 गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या - आता राजे चार्ल्स - आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप.

 पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, तेव्हा नभोवाणी मंत्री असलेल्या इंदिरा गांधी ,राजीव गांधी, अटळ बिहारी वाजपेयी आणि आता अलिकडेच  नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान पोपमहाशयांना भेटलेले आहेतजानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे.   

पोप यांच्यासंबंधीच्याही बातम्या जगातील अनेक प्रमुख नियतकालिकांत आणि बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तचॅनल्समध्ये आठवड्यातून निदान एकदातरी झळकत असतात. त्याशिवाय नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर आणि इतर सणानिमित्त तसेच त्यांच्या परदेशदौऱ्यानिमित्त पोप यांच्या कार्यक्रमांना आणि प्रवचनांना संपूर्ण जगभर अगदी प्रादेशिक प्रसारमाध्यमांतही हमखास प्रसिद्धी मिळते, यातूनही पोपपदाचे जागतिक महत्त्व अधोरेखीत होत असते.

 व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप यांच्याकडे खरे तर स्वतःचे सैन्य वा खास पोलीस यंत्रणाही नाही तरी त्यांना संपूर्ण जगभर आदर आणि मान आहे. याचे कारण जगात सर्वाधिक संख्येने असलेल्या रोमन कॅथोलिक पंथाचे ते आचार्य आहेत. त्यामुळेच सत्तावीस वर्षे पोपपदावर असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांना राष्ट्रप्रमुख या या नात्याने जगातील अनेक राष्ट्रांना भेटी देण्याचा, सर्वाधिक राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या देशांत किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये भेटण्याचा मान मिळाला. सध्याचे पोप फ्रान्सिस पोप जॉन पॉल दुसरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जुने अनेक संकेत आणि पुरातन भिंती मोडीत काढत विविध राष्ट्रांत जाऊन परधर्मियांच्या नेत्यांना भेटून सुसंवाद साधत आहेत. 

पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, एका अर्थाने येशू ख्रिस्ताचे या भूतलावरील प्रतिनिधी. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांमध्ये एक असलेला सेंट पिटर किंवा संत पेत्र हा पहिला पोप. ख्रिस्ती धर्माच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २६० पोप होऊन गेले आहेत. रोममध्ये मी असताना सेंट पिटर्स बॅसिलिकामध्ये या सर्व पोपमहाशयांच्या नावांची, कालखंडांची यादीच संगमरवरी दगडावर कोरलेली पाहिली तेव्हा पटकन त्या यादीचा मी फोटो काढून घेतला होता. 

बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने पहिला पोप असलेल्या सेंट पिटरला स्वर्गाच्या चाव्या दिल्या असा उल्लेख आहे. सेंट पिटरच्या कुठल्याही पुतळ्यात स्वर्गाच्या चाव्या असतातच, सेट पिटरचा पुतळा ओळखण्याची ती एक खूणच. व्हॅटिकन सिटीतल्या भव्य सेंट पिटर्स स्वेअरमध्ये सेंट पिटर आणि सेंट पॉल यांचे दोन भव्य पुतळे आहेत, त्यात सेंट पिटरच्या हातात स्वर्गाच्या या चाव्या आहेत तर ख्रिस्ती धर्माला तत्त्वज्ञानाचा आणि धर्मसिद्धान्ताचा पाया उभारणाऱ्या सेंट पॉलच्या हातात बायबल आहे. 

पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होण्याआधीच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) चे नेते यासर अराफत यांना या अस्तित्व नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून भारताने आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती. त्यांना राष्ट्रप्रमुख म्हणून शिष्टाचारानुसार वागवले जायचे. तीच गोष्ट तिबेटी बौद्धांचे नेते असलेल्या दलाई लामांची. राष्ट्रप्रमुख म्हणून पोप यांचे स्थान मात्र यासर अराफत किंवा दलाई लामा यांच्याहून आगळेवेगळे असे आहे.

राष्ट्रप्रमुख आणि धर्माचार्य अशी दोन पदे असल्याने पोप कधीच कुणाला भेटायला जात नसतात, स्वागत करायला जात नसतात. इतर राष्ट्रप्रमुखच त्यांच्या भेटीला व्हॅटिकन सिटीत किंवा परदेशातील त्यांच्या निवासस्थानी भेटत असतात.

 या शिष्टाचारानुसारच पंतप्रधान मोदी यांच्या आधी एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पत्नीसह व्हॅटिकन येथे जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. 

खरे पाहिले तर व्हॅटिकन सिटी हे सार्वभौम राष्ट्र म्हणजे एक गंमतीची बाब आहे, येथे सातशेआठशे नागरिकही असतात ते म्हणजे तिथले राहणारे कार्डिनल आणि पोपमहाशयांच्या कार्यालयातील अधिकारीवर्ग. या राष्ट्राची चतुःसिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याएव्हढीही नाही. 

व्हॅटिकन सिटीचा आकारच इतका छोटा आहे कि तिथे तुम्हाला तुमचे कुठलेही खासगी वाहन नेता येत नाही. जसे इटलीमध्येच असलेल्या व्हेनिसला मोटारवाहने नसतातच, तिथे बराचसा प्रवास बोटीनेच होत असतो.

रोममधल्या मेट्रोने एक स्टॉपवर उतरले कि तुम्हाला समोर व्हॅटिकन सिटी दिसते अन तिथून तुम्ही चालत गेला कि आत भव्य सेंट पिटर्स स्केअर दिसतो आणि समोर असते सेंट पिटर्स बॅसिलिका. तिथे एकही वाहन आणण्यास मुळी परवानगीच नसते आणि गरजही भासत नाही. काही मिनिटांत चालत तुम्ही सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या प्रवेशदारापाशी आलेले असतात. व्हिव्हीआयपी, फायरब्रिगेड, ऍम्ब्युलन्स, सुरक्षाकर्मचाऱ्यांची अशी मोजकीच वाहने क्वचित इथे दिसतील.

 रोम ही ख्रिस्ती समाजाची एक पवित्र भूमीच. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने अगदी लहानपणापासून रोमविषयी खूप काही ऐकलेले आणि वाचलेले असते. येशूच्या जन्माच्या वेळी तत्कालीन रोमन सम्राट ऑगस्टस सीझरने जनगणनेचा आदेश दिला होता. त्यामुळेच जोसेफ आपल्या गर्भवती पत्नी मारियासह बेथलेहेम या आपल्या मूळगावी पोहचला होता. रोमन सम्राटाचा येरुशलेम येथील गव्हर्नर पिलातानेच येशूला क्रुसावर खिळण्याचा आदेश दिला होता. ‘प्रेषितांची कृत्येया पुस्तकात आणि नंतर संत पौलांच्या विविध पत्रांत रोममधील कितीतरी घटनांचे वर्णन आढळते.

 व्हॅटिकन सिटी हे आकाराने जगातील सर्वात चिमुकले राष्ट्र. व्हॅटिकन सिटी या जगातील सर्वात छोट्या देशात पोप महाशयांचे वास्तव्य असते. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी मी  रोममध्ये प्रवेश करताना या प्राचीन शहराविषयी मनात प्रचंड औत्सुक्य आणि कुतूहल होते. या राष्ट्राच्या अधिकृत नागरिकांची संख्या केवळ आठशेच्या आसपास आहे. येथे राहणारे पोप महाशय, कार्डिनल, आर्चबिशप, विविध संस्थेच्या सिस्टर्स आणि स्वीस गार्डेस हेच केवळ येथील नागरीक. शंभर एकराच्या आसपास क्षेत्रफळ असलेल्या व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख पोप आहेत. संपूर्ण व्हॅटिकन सिटी हे राष्ट्र सर्व बाजूनी रोम शहराच्या म्हणजेच इटली राष्ट्राच्या सीमेने वेढलेले आहे.

 व्हॅटिकनच्या इमारतीच्या भिंतीनजीकच्या रस्त्याने तुम्ही चालत असला म्हणजे तो रस्ता आणि त्या रस्त्यापलीकडचा परिसर इटली राज्यात असतो, अशी चमत्कारिक स्थिती आपल्याला आढळून येते. हो, व्हॅटिकन सिटी हे स्वतंत्र राष्ट्र केवळ औपचारिकरीत्या आहे, तिथे जायला व्हिसा वगैरे लागत नाही. रस्ता ओलांडून शुक्रवार पेठेतून शनिवार पेठेत जाण्यासारखे ते सोपे आहे. हो, आत शिरण्याआधी सुरक्षा म्हणून तुमची तपासणी होते. 

वर्तुळाकार आकाराचे सेंट पीटर स्क्वेअर -  भव्य आणि दिव्य ही विशेषणे चपखल लागू व्हावी असेच हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाच्या दूरच्या टोकाला सेंट पीटर बॅसिलिकाची वास्तू आहे. पोपमहाशय आपल्या निवासस्थानाच्या खिडकीतून सेंट पीटर स्क्वेअरमध्ये असलेल्या भाविकांना दर्शन देतात आणि प्रवचन करतात, त्यावेळी या मैदानात हजारो भाविक असतात. बॅसिलिकात प्रवेश करण्यासाठी दिवसभर भाविकांची आणि पर्यटकांची लांबवर रंग कायम असते.

 या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी असतात. त्याशिवाय व्हॅटिकन खाजगी विभागाच्या प्रवेशद्वारातच आपल्या खास पारंपरिक टोपी आणि रंगीबेरंगी पोशाखात हातात भाला घेऊन स्मार्टपणे उभे असलेले उंचपुरे गार्डस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. लंडन शहरातील बॉबी गार्ड्ससारखे !

 पोपमहाशयांची आणि व्हॅटिकनची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे हे स्विस गार्डस यांची खासियत म्हणजे गेली पाच शतके स्वित्झर्लंड या देशातील तिशीच्या आतील युवक पोपमहाशयांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थांत हे स्वीस गार्डस हे तसे सेरेमोनियल गार्ड म्हणजे शोभेचे गार्ड म्हणता येईल. आपल्याकडे स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या भोवती असणाऱ्या रंगीबेरंगी पोशाखातील आणि फेट्यांतील रक्षकांसारखे! सुरक्षेची खरी जबाबदारी पाहाणाऱ्या आणि साध्या वेशातील सुरक्षा अधिकाऱ्यांची तीक्ष्ण नजर सगळीकडे सारखी भिरभिरत असते हे आपल्याला माहिती आहेतच. 

मध्ययुगीन काळापासूनचा युरोपच्या इतिहासाचा परिपाक आणि पोपमहाशयांचे जागतिक स्तरावरचे धार्मिक, राजकिय आणि नैतिक पातळीवरचे स्थान लक्षात घेऊन बहुसंख्य राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र दलानेसुद्धा त्यांना राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला आहे. याच नात्याने ते संयुक्त राष्ट्र दलाच्या सभेला संबोधित करत असतात. 

भारतानेही व्हॅटिकन सिटीला सार्वभौम राष्ट्र म्हणून आणि पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिली आहे.

लौकिकार्थाने भौगोलिक सीमा, लष्कर, नागरीकत्व, चलनी नोटा वा पासपोर्ट नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप हे सर्वार्थाने आगळेवेगळे राष्ट्रप्रमुख ठरतात. या राष्ट्राची संकल्पनाच केवळ प्रतिकात्मक असल्याने कुठल्याही राष्ट्रात जन्मलेली आणि कुठल्याही राष्ट्राचे नागरीकत्व असलेली व्यक्ती अगदी एका क्षणात म्हणजे पोपपदी निवड झाल्याक्षणी या व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख बनते. परकीय नागरिकत्वाचा विषय येथे अगदीच गैरलागू ठरतो. पोप पदावर आलेली व्यक्ती वैश्विक असते, त्यांचे अनुयायी संपूर्ण जगभर अगदी धर्मावर आणि कॅथोलिक पंथावर अधिकृत बंदी असलेल्या चीनसारख्या देशांतही असतात.

 चर्चच्या कॅनन लॉनुसार जगभरातील बिशप वयाच्या ७५ व्या वर्षी आणि कार्डिनल वयाच्या ८० व्या वर्षी निवृत्त होतात. नवीन पोपची निवड करण्याच्या प्रक्रियेत केवळ ८० वर्षे वयाखालील कार्डिनल सहभागीं होतात आणि त्यांच्यापैकी कुणाचीही पोप म्हणून निवड होऊ शकते. 

अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ २००८ साली पोपपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी एक ब्रिफकेस घेऊन, विमानाचे परतीचे तिकिट घेऊन व्हॅटिकनला आले आणि त्यांचीच पोपपदी निवड झाल्याने आणि पोप फ्रान्सिस असे नाव घेतलेल्या त्यांनी गेली तेरा वर्षे आजपर्यंत मायदेशी पाऊलही ठेवलेले नाही. 

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या आधीचे पोप म्हणजे जॉन पॉल पहिले यांची कारकिर्द केवळ ३३ दिवसांची होती. पोप पॉल सहावे यांचे निधन झाल्यानंतर २६ ऑगस्ट १९७८ रोजी जॉन पॉल पहिले पोपपदावर आले. त्यानंतर एक महिन्याभरातच झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जगाला बसलेला धक्का मला आजही आठवतो. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ जॉन पॉल पहिले पोपपदावर होते. 

सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य स्वीकारल्यानंतर अचानक बदल झाला आणि रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे रोमन साम्राज्याचा हा अधिकृत धर्म बनला. जेरुसलेम इस्राएल या येशू ख्रिस्ताच्या कर्मभूमीपेक्षा रोमला अधिक महत्त्व आले. रोम शहर ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पीठ आणि पवित्र भूमी बनले. 

रोमविषयी रोम वॉज नॉट बिल्ट इन सिंगल डे अशी एक म्हण आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १६०४ साली मराठीतील महाकाव्य क्रिस्तपुराण गोव्यात रचणाऱ्या ब्रिटिश धर्मगुरू थॉमस स्टिफन्स यांनी या म्हणीचे एके दिवशी रोमनगरी I उभविली नाही I असे मराठमोळे भाषांतर केले आहे ! 

गेले काही शतके ख्रिस्ती धर्माचे प्रमुख आचार्य म्हणून आणि विशेषतः मध्ययुगीन काळात पोप यांच्या हातात अमर्याद सत्ता होती. युरोपातील अनेक देशांतील राजसत्ता त्यांच्या ओजळीने पाणी पित होती हे इतिहासातील अनेक घटनांवरुन दिसते. मध्ययुगीन काळात तर पोप अलेक्झांडर सहावा याने तर वसाहतीसाठी नव्या जगाची पोर्तुगाल आणि स्पेन या दर्यावर्दी राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करुन दिली होती ! त्या काळातला चर्चचा आणि चर्चच्या पोपसारख्या धर्माधिकाऱ्यांचाही इतिहास फारसा अभिमानास्पद नाही. 

आपल्या घटस्फोटास कॅथोलिक चर्च मान्यता देत नाही असे पाहिल्यावर इंग्लंडच्या राजा आठवा हेन्री याने पोप आणि कॅथोलिक चर्चपासूनच घटस्फोट घेत सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले आणि इंग्लंडच्या राजास (किंवा राणीस ) त्या चर्चचे प्रमुख म्हणजे एका अर्थाने पोपच बनवले. ही व्यवस्था आजतागायत चालू आहे. 

त्यानंतर जर्मनीत धर्मगुरु मार्टिन ल्युथर किंगने धार्मिक बंड केल्यानंतर विविध प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाले आणि पोपच्या अमर्याद सत्तेला अंकुश बसला. रेनॉयस्सन्सच्या काळात चर्च आणि धर्मसत्ता यांची फारकत होत गेली आणि पोप हे पद केवळ सन्माननीय पद राहिले, मात्र याच काळात नैतिक प्रश्नांवर म्हणजे अबॉर्शन, समलिंगी संबंध आणि लग्न, फाशीची सजा, युद्ध, मानवी हक्क, पर्यावरण वगैरे प्रश्नांवर देशसीमांच्या पलीकडे भूमिका घेणारी नैतिक सत्ता यादृष्टीने चर्च आणि पोप यांच्याकडे पहिले गेले आहे. 

युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत आजही कागदोपत्री बहुसंख्य ख्रिस्ती लोकसंख्या असल्याने पोप यांचे याबाबतीतील स्थान तसे अबाधित राहिले आहे. 

विमानसेवा सुरु झाल्यावर जगभ्रमंतीवर निघणारे आणि इस्राएलच्या पवित्र भूमीला आणि भारतभूमीलाही भेट देणारे पॉल सहावे हे पहिलेच पोप.  पोप पॉल सहावे यांनी १९६४ साली रोमहून इस्राएलकडे विमानाने प्रयाण केले तेव्हा त्यांनी चर्चच्या इतिहासातील अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. विमानाने प्रवास करणारे ते पहिले पोप, त्याशिवाय त्यापूर्वी दिडशे वर्षे आधी कुठल्याही पोपने इटलीबाहेर पाऊल ठेवले नव्हते. इस्राएल ही येशू ख्रिस्ताची जन्मभूमी, ख्रिस्ती धर्माचे तीर्थक्षेत्र, पवित्र भूमी. मात्र पोप पॉल सहावे यांच्याआधी कुठल्याही पोपने या पवित्र भूमीवर प्रवेश केला नव्हता. 

पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीमध्ये विविध राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटण्याचा विक्रम केला, त्याची तुलना केवळ ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याशीच करता येईल. 

पोप पॉल सहावे यांचे डिसेंबर १९६४ रोजी मुंबई येथे आगमन झाले. भारताला भेट देणारे ते पहिलेच पोप.

आपल्या विमानातून बाहेर पडल्यावर जमिनीवर पाय ठेवताच त्यांनी भारतभूमीचे चुंबन घेतले होते.

जगात प्रवाशी विमान वाहतूक सुरु झाल्यानंतर इटली सोडून जगभ्रमंतीवर निघालेले ते पहिलेच पोप.

गंमत म्हणजे येशू ख्रिस्ताची जन्मभुमी आणि कर्मस्थळ असलेल्या पवित्र भूमि - होली लँड - इस्राएलला - येरुशलेमला आधुनिक काळात भेट देणारेसुद्धा ते पहिलेच पोप.  पोप पॉल हे विमानातून इस्राएलच्या भूमीवर उतरले तेव्हा या पवित्र भूमीचे चुंबन केले, ख्रिस्ताच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या धरतीला त्यांनी वंदन केले.      येथेसुद्धा त्यानीं पवित्र भूमीचे चुंबन घेतले होते. (पहिला पोप म्हणजे सेंट पिटर हा येशूप्रमाणेच ज्यु होता ! ) 

पोप पॉल सहावे यांचे मुंबई विमानतळावर राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, भारताच्या नभोवाणी मंत्री इंदिरा गांधी आणि राज्यसभेच्या उपाध्यक्ष व्हायोलेट अल्वा (मार्गारेट अल्वा याच्या सासुबाई ), गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर  आणि भारताचे पहिले कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस यांनी स्वागत केले होते.  पोप मुंबईत युखारिस्ट काँग्रेससाठी आले होते. 

पोप पॉल सहावे यांच्या या भारत दौऱ्यानिमित्त पोस्ट आणि टेलिग्राफ् खात्यानं भारतात आलेल्या आणि येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमस याच्यावर एक खास पोस्टाचे तिकीट काढले होते.

 पोप जॉन पॉल दुसरे यांच्याप्रमाणेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी म्हणजे पोप बेनेडिक्ट आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनीही होली लँड इस्त्रायलला भेट दिली आहे. 

ज्यु आणि ख्रिस्ती धर्मांसाठी तसेच इस्लाम धर्मांसाठी येरुशलेम आणि इस्राएलचे किती महत्त्वाचे स्थान आहे ते सांगायलाच नको. ज्यु लोकांसाठी इस्राएल म्हणजे देवाने वचन दिलेली भूमी - किंवा प्रॉमिस्ड लँड. येशू ख्रिस्त या प्रदेशात जन्मला आणि फिरला. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांचा देव (खरे पाहता मुस्लिमांचाही) एकच आहे असेही मानले जाते.

 या तिन्ही धर्मियांसाठी प्रेषित असलेल्या अब्राहाम याचे वर्णन या तिन्ही श्रद्धावंतांचा `फादर इन फेथ म्हणजे श्रद्धेमध्ये पिता असे केले जाते. बकरी ईद या सणानिमित्त अब्राहाम आणि त्याने आपल्या मुलाचे देवाला बलिदान करण्यासाठी केलेल्या तयारीची आठवण केली जाते 

रोम हे ख्रिस्ती धर्मियांची नवी पवित्र भूमी बनलेली असली तरी येरुशलेम आणि इस्राएलचे महत्त्व अबाधित राहतेच. हे महत्त्व अधोरेखीत करणारा हा गंमतीदार किस्सा आहे. 

ज्यु धर्मियांचे येरुशलेम येथील प्रमुख धर्मगुरु `रब्बी' एकदा रोमला पोपला भेटले. या भेटीदरम्यान पोप यांनी रब्बी यांना ``देवाशी टेलिफोनवर दिवशी बोलायचे आहे का?’’ असे विचारले. त्यानंतर पोप यांच्या लॅण्डलाइन फोनवरून रब्बी काही काळ देवाशी बोलले. नंतर त्यांनी पोप यांना झालेल्या कॉलच्या फीची रक्कम विचारली आणि चारशे डॉलर्स ही रक्कमही त्यांनी पोप यांना दिली. 

पोप स्वतः इस्त्रायलला येरुशलेम येथे आल्यानंतर त्यांनाही तेथून रब्बी यांच्या लॅण्डलाइनवरुन देवाशी संभाषण करण्याची संधी मिळाली. `कॉलचे चार्जेस किती? असे त्यांनी विचारल्यावर रब्बी म्हणाले, ''हा लोकल कॉल होता, नो चार्जेस !'' 

पोलिश पोप जॉन पॉल दुसरे यांच्यामुळे पोलंडमधील हुकूमशाही कम्युनिस्ट राजवट उलथवून कामगार नेते लेक वालेसा यांची लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होण्यात मदत झाली. इतकेच नव्हे तर पोप जॉन पॉल यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे पुर्व युरोपातील सर्व राष्ट्रांत कम्युनिस्ट हुकूमशाहीचा डोलारा कोसळून लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाली, हे आज इतिहासकारांनी मान्य केले आहे.

 पोप जॉन पॉल दुसरे हे पोपपदावर आल्यानंतर काही वर्षांतच १९८१ साली सेंट पिटर्स चौकात पोपमोबाइलमधून फिरत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते खाली कोसळले. पोटात गोळ्या लागूनही पोप यातून आश्चर्यकारिकरीत्या बचावले आणि त्यांनी सत्तावीस वर्षे या सर्वोच्च पदावर राहण्याचा विक्रम केला.

 पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच याच काळात म्हणजे १९८१ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेनाल्ड रीगन यांच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या. यशस्वीरीत्या उपचार होऊन रीगन बचावले. पोप जॉन पॉल दुसरे आणि राष्ट्राध्यक्ष रीगन यांच्याप्रमाणे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही १९८४ साली असाच भीषण गोळीबार झाला, मात्र त्यांच्या शरीररक्षकाने त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण केल्याने इंदिराजी यातून बचावल्या नाहीत.

 पोलंडचे नागरिक असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांच्या रुपाने इटलीबाहेरचे कार्डिनल पोपपदावर आले आणि याबाबत इटलीची तीनशे वर्षांची मक्तेदारी मोडली, त्यांनतर जर्मनीचे कार्डिनल पोप बेनेडिक्ट बनले आणि आताचे पोप फ्रान्सिस तर युरोप खंडाबाहेरचे पहिलेच पोप असून थेट लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाचे आहेत.

राजीव गांधी पंतप्रधान असताना पोप जॉन पॉल दुसरे हे १९८६ साली दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्या मिरामार बीचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर झालेल्या मिस्साविधीला नवहिंद टाईम्सचा बातमीदार म्हणून मी हजर होतो. शाही विधी काय असतो याचा तो समारंभ उत्तम नमुना होता.

 पोप यांच्यांसाठी खास मंडप उंचावर उभारलेला होता, त्यांच्यापासून कितीतरी दूर अंतरावर मात्र उंचावरील दुसऱ्या मंडपात पत्रकार कक्ष होता. भारतासह आशिया खंडातील आणि जगभरातील करड्या पोशाखातील, लाल हॅटमधील अनेक कार्डिनल, शंभराहूनही अधिक बिशप आणि हजारभर धर्मगुरु पुढच्या रांगेत आणि त्यामागे भाविकांची अलोट गर्दी असे ते दृश्य आजही माझ्या नजरेसमोर आहे.

 त्याकाळात या `पोपमोबाइलविषयी बरीच चर्चा झाली. या दहा दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दोन खास डिझाईन केलेल्या `पोपमोबाईल' होत्या. पोप यांच्या आगमनाआधी प्रत्येक समारंभाच्या ठिकाणी दोनपैकी एक बुलेटप्रुफ पोपमोबाईल विमानाने आधीच आणून ठेवली जायची. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या त्या प्रसिद्ध रथयात्रेआधीचा हा प्रसंग आहे, त्यामुळे या खास डिझाईन केलेल्या पोपमोबाईलचे विशेष अप्रूप होते. आजही जगभर पोप अशाच पद्धतीच्या पोपमोबाईलमधून भाविकांना दर्शन देतात, 

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली पोप जॉन पॉल दुसऱ्यांदा भारत भेटीवर आले. पोप यांना पंतप्रधान वाजपेयी भेटले होते. आधीच्या भेटीत पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी पोप जॉन पॉल यांची भेट घेतली होती. 

पोप यांना संबोधित करताना आदराने `होली फादर' असे म्हटले जाते. मराठीत बिशपांना महागुरुस्वामी म्हटले जाते तसे पोप यांना परमगुरुस्वामी असे म्हटले जाते. हरेगावला सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये असताना आणि श्रीरामपूरच्या देवळात मिस्सामध्ये वर्षांतून काही वेळेस खालील गायन गायले जायचे....

 परमगुरुस्वामीला देव नित्य सुखी ठेवो

मेंढपाळ सद्गुरू तो चिरंजीवी जगी होवो //

 

काही वर्षांपूर्वी इटली येथील वास्तव्यात मला रोम आणि व्हॅटिकन सिटी येथे भरपूर फिरता आले. तेथील ती भव्य सेंट पिटर्स बॅसिलिका, तो जगप्रसिद्ध सेंट पिटर्स स्केअर, व्हॅटिकन म्युझियम, मायकल अँजेलो या चित्रकाराने रंगवलेले सिस्टाईन चॅपेल पाहताना डोळे अक्षरशः फिरतात आणि मती गुंग होते, इतके हे सर्व अगदी प्रेक्षणीय आहे.

 त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व माहित असल्याने, त्याविषयी खूप वाचलेले असल्याने तर तिथे फिरताना काय पाहू आणि किती पाहू अशा संभ्रमात मी पडलो होतो. या सेंट पिटर्स चौकातच एका इमारतीच्या उंच मजल्यावरील बाल्कनीतून दर रविवारी आणि आठवड्यातून काही दिवस तसेच सणासुदीला पोपमहाशय तेथे जमलेल्या हजारो भाविकांशी संवाद साधत असतात..

व्हॅटिकनच्या खाजगी विभागाच्या प्रवेशद्वारातच खास पारंपरिक टोपी आणि रंगीबेरंगी पोशाखात हातात भाला घेऊन स्मार्टपणे उभे असलेले उंचपुरे गार्डस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पोपमहाशयांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे हे स्विस गार्डस. गेली पाच शतके स्वित्झर्लंड या देशातील तिशीच्या आतील युवक पोपमहाशयांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थांत हे स्वीस गार्डस हे तसे सेरेमोनियल गार्ड म्हणजे शोभेचे गार्ड म्हणता येईल. 

सेंट पिटर बॅसिलिका हे सेंट पिटरच्या समाधीवर उभारलेले चर्च आहे. सेंट पिटर बॅसिलिकातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक सेंट सिस्टाईन चॅपेल. नव्या पोपची निवड करण्यासाठी येथे जगभरातील कार्डिनलांची बैठक होते. पोप पदाची गादी रीक्त झाल्यावर जगभरातील कार्डिनल सिस्टाईन चॅपेलमध्ये नवे पोप निवडण्यासाठी एकत्र येतात.

 या प्रसिद्ध ऐतिहासिक सिस्टाईन चॅपलमध्ये दोन शतकांपूर्वी एका भारतीयाने - त्याकाळात पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याच्या एका सुपुत्राने मोलाची कामगिरी बजावली होती. हा गोव्याच्या सुपुत्र म्हणजे आधुनिक वैज्ञानिक संमोहनशास्त्राचा प्रवर्तक ॲबे दि फरिया -   

एक उत्तम प्रवचनकार म्हणून ॲबे  फरिया प्रसिध्द होते. असे म्हटले जाते की रोम येथील प्रसिध्द सिस्टाईन चॅपलमध्ये पवित्र आत्म्याच्या सणानिमित्त उपदेश करण्यासाठी पोप पायस सहावे यांनी ॲबे  फरियांना 1780 साली निमंत्रित केले होते. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते. गोव्यातील ऐतिहासिक राशोल सेमिनरीतील प्राध्यापक फादर आयवो सोझा यांनी लॅटिन भाषेतील या प्रवचनाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. 

पोपपदाची निवडणूक हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सिस्टाईन चॅपेलमध्ये होणारी ही निवडणूक आगळीवेगळी असते, येथे उमेदवार लॉबिंग वा स्वतःचा प्रचार करत नसतात. ही निवडणूक एक दिवसात संपू शकते किंवा मतैक्य होईपर्यंत काही आठवडेही चालू शकते. कार्डिनलांशिवाय इतर कोणालाही त्या आतून बंद असलेल्या सिस्टींन चॅपेलमध्ये कोणालाही प्रवेश नसतो. सिस्टाईन चॅपेलमध्ये पोपपदावर मतैक्य कसे झाले, कितीदा मतदान झाले, कोण उमेदवार होते याची माहिती बाहेर कधीही येत नाही. 

कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह (बैठक) चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर निघाला म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. ही बैठक अनेक दिवस चालू शकते. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला म्हणजे चौकात जमलेल्या हजारो लोकांना आणि संपूर्ण जगाला कळते कि नव्या पोपची निवड झाली आहे. ताजे गवत जाळले कि काळा धूर येतो आणि सुकलेले गवत जाळल्यावर पांढरा धूर येतो. 

असा पांढरा धूर चिमणीतून बाहेर आल्यावर काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते सेंट पिटर्स चौकात जमलेल्या आणि सर्व जगाला मग सांगितले जाते, ''वूई हॅव्ह पोप !''

आणि ते पोपपदी निवड झालेले कार्डिनल मग पोप म्हणून आपले नवे नाव सांगतात. पोपपदाची निवड कशी होती याची माहिती देणारा `शूज ऑफ फिशरमॅन' हा एक अत्यंत गाजलेला चित्रपट आहे. 

काही वर्षांपर्यंत यावेळी नूतन पोपमहाशयांच्या डोक्यावर वर क्रूस असलेला रत्नजडित मोठा मुकुट चढवून त्यांचा राज्याभिषेक केला जाईल, अलिकडच्या काळात सरंजामपद्धतीचे प्रतीक असणारा हा मुकुट पोप कधीही घालत नाही. इंग्लडच्या राणीसुद्धा हल्ली अगदी प्रतिकात्मक स्वरुपात एक छोटासा मुकुट केवळ शाही समारंभाला घालत असतात.

 इंग्लंडच्या गादीवर येणारा राजा अथवा राणी आपले नवे नाव धारण करतो, जसे आताची राणी एलिझाबेथ दुसरी, तसे पोपपदावर येणारे कार्डिनल आपली जुनी ओळख टाकून नवे नाव घेतात. याआधीचे निवृत्त पोप हे बेनेडिक्ट सोळावे तर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांनी पॉप झाल्यावर फ्रान्सिस नाव धारण केले, ते फ्रान्सिस नावाचे पहिलेच पोप आहेत. 

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या निधनानंतर  २००४ साली पोपपदासाठी सिस्टाईन चॅपलमध्ये कार्डिनल कॉन्क्लेव्हमध्ये झालेल्या गुप्त मतदानात जर्मन कार्डीनल जोसेफ अलोशियस रॅतझिंगर यांची नवे पोप - पोप बेनेडिक्ट सोळावे -     म्हणून निवड झाली.  

असं म्हटलं जातं कि त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांना पडली होती.  कार्डिनल बेर्गोग्लिओ  म्हणजे पॉप बेनेडिक्ट यांनीं निवृत्ती घेतल्यानंतर निवडले गेलेले आताचे पोप फ्रान्सिस !  

सोसायटी ऑफ जिझस (जेसुईटस ) या कॅथोलिक धर्मगुरुंच्या संघटनेचे पोपपदावर आलेले ते पहिलेच सदस्य आहेत.. दहशतवादाच्या आरोपात भारतात अलिकडेच तुरुंगात निधन झालेले फादर स्टॅन स्वामी हे सुद्धा जेसुईटच होते. 

जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट फादर जनरल यांना `ब्लॅक पोप' असेही म्हटले जायचे. 

काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. 

पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिलेल्या राष्ट्रांत पोपमहाशयांचे त्त्या राष्ट्रातील प्रतिनिधी (प्रो- नन- शिओ) असलेले आर्चबिशप किंवा बिशप यांना अधिकृतरीत्या राजदूताचा दर्जा असतो, त्यामुळे सूत्रे हाती घेण्याआधी राजदूत म्हणून आपले अधिकारपत्र ते भारताच्या राष्ट्रपतींना किंवा इतर राष्ट्रप्रमुखांना सादर करत असतात. व्हॅटिकन सिटीची स्वतःची अशी राजप्रतिनिधिक स्तराची सेवा असते, त्या सेवेतील धर्मगुरु, बिशप किंवा आर्चबिशप यांना राजदूत म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातील देशांत पाठवले जाते. वसईचे सद्याचे बिशप फेलिक्स मच्याडो यांनीही पूर्वी व्हॅटिकन सिटीच्या एका शाखेत उपसचिवपदावर काम केले आहे. 

पोपचे हे प्रतिनिधी-राजदूत त्या देशातील कॅथोलिक चर्च आणि पोप यांच्यांतील दुवा असतात. उदाहरणार्थ, भारतातील कार्डिनल आणि विविध राज्यातील बिशपपदांवरील नेमणुका, चर्चसंबंधी विविध विषय याबाबत पोपच्या या प्रतिनिधींचा सल्ला मत निर्णायक ठरते.   

कॅथोलिक चर्च ही जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. तिचे जाळे जगभर अगदी वरपासून म्हणजे रोमस्थित धर्मप्रमुख पोप यांच्यापासून थेट गावपातळीपर्यंत पोहचलेले असते. कॅथॉलिक चर्च हे युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक स्तरावरचे आहे. चर्चने स्विकारलेल्या कार्यक्रमांची आणि मोहिमांची संपूर्ण जगभर अंमलबजावणी होत असते   चर्च ही संघटना आपल्या डायोसिसन आणि रिलिजियस धर्मगुरूंच्या आणि नन्सच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असते. कॅथोलिक चर्चसारखे संपर्काचे आणि कार्याचे सर्वदूर जाळे असणारी जगात दुसरी कुठलीही संस्था नसावी. 

कॅथोलिक चर्चमध्ये दोन प्रकारचे धर्मगुरू असतात- सेक्युलर आणि रिलिजियस. एका विशिष्ट डायोसिस म्हणजे धर्मप्रांतात काम करणाऱ्या धर्मगुरूंना डायोसिसन किंवा धर्मप्रांतीय धर्मगुरू म्हटले जाते. डायोसिसन धर्मगुरूंनासेक्युलर धर्मगुरूअसेही म्हटले जाते. 

त्याशिवाय चर्चमध्ये विविध किंवा विशिष्ट कार्यांना स्वतःला वाहून घेणाऱ्या धर्मगुरूंच्या रिलिजियस संस्था-संघटनाही आहेत. त्यांच्या सदस्यांनारिलिजियस धर्मगुरूम्हटले जाते. त्यापैकीच इग्नेशियस ऑफ लोयोलाने स्थापन केलेलीसोसायटी ऑफ जिझसही संस्था. तिच्या सदस्यांनाजेसुईट्सअसे म्हणतात. शक्यतो डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंचीच वरच्या बिशपपदावर नेमणूक होते. आर्चबिशप आणि कार्डिनल ही त्यावरची पदे. जगातल्या ११०च्या आसपास कार्डिनलांमधून एकाची पोपपदावर निवड होते. रिलिजियस संस्थेने परवानगी दिल्यास रिलिजियस धर्मगुरूसुद्धा बिशप होऊ शकतात आणि पोपसुद्धा, 

चर्चच्या इतिहासात आताचे पोप फ्रान्सिस हे पहिलेच जेसुईट आहेत.  

येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट पिटर याचा पोप म्हणून वारसदार असलेले पोप कधीही चुका करु शकत नाही असा एक नंतर वादग्रस्त ठरलेला धर्मसिद्धांत (डॉग्मा ) दोन शतकापूर्वी चर्चमध्ये संमत झाला होता. दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर चर्चमध्ये झालेल्या वैचारीक सुधारणानंतर `पेपल इन्फालीबिलीटी' या डॉग्मावर आता कुणी बोलतही नाही. 

गॅलिलिओ आणि इतर वैज्ञानिकांविषयी चर्चची भूमिका, काही देशांत इन्क्विझिशनचा झालेला अतिरेक, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा झालेला संहार याबाबत चर्चची बोटचेपी भूमिका तसेच गेल्या काही दशकांत युरोपात आणि अमेरिकेत धर्मगुरुंकडून मुलांवर झालेले लैगिक अत्याचार या प्रकरणांमुळे चर्चची मानहानी झाली, त्याबद्दल पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट आणि पोप फ्रान्सिस यांनी खंत आणि खेद व्यक्त करुन संबंधित पिडीत व्यक्तींची आणि त्यांच्या नातलगांची माफी मागितली आहे. 

पोप जॉन तेविसावे यांनी १९६०च्या दशकात आयोजित केलेल्या आणि त्यांच्या निधनानंतर पोप पॉल सहावे यांनी समारोप केलेल्या ऐतिहासिक दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलने चर्चमध्ये प्रागतिकतेचे वारे सुरु केले. चर्चच्या विधींमध्ये आणि प्रार्थनांत लॅटिनऐवजी स्थानिक भाषांचा वापर हे त्यापैकी एक महत्त्वाचे पाऊल. या परिषदेने चर्चच्या खिडक्या पहिल्यांदाच खुल्या केल्या आणि त्यामुळे चर्चमध्ये सुधारणांचे मोकळे वारे वाहू लागले. 

‘’Open the windows. Let the fresh air come in...! ’’ दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलच्या उदघाटनाच्या वेळी पोप जॉन तेविसावे यांचे हे ऐतिहासिक उद्गार. या उद्गारामुळे आजही चर्चमध्ये शतकोनुशतके बंद असलेल्या एकएक खिडक्या उघडून नव्या स्वातंत्र्याच्या ताजेपणा आणणाऱ्या, उत्साहित करणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकांचे सातत्याने स्वागत केले जाते. आताचे पोप फ्रान्सिस यांनीही ही परंपरा चालू ठेवली आहे. 

राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान परदेशदौऱ्यावर निघतात, तेव्हा त्यांच्याबरोबर निवडक पत्रकार असतात. दौरा आटोपल्यावर मायदेशी परतताना मग पत्रकारांशी मुक्त संवाद साधण्याची परंपरा आहे. पोपमहाशय परदेशदौऱ्यावर निघतात तेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे त्यांच्याबरोबरसुद्धा पत्रकारांचा काफिला असतो. रोमकडे परतीच्या प्रवासात पोप जॉन पॉल पत्रकारांशी खुला संवाद साधत असत.. पोप फ्रान्सिस यांनीही परंपरा चालू ठेवली आहे. आम्हा पत्रकारांसाठी अशा दीर्घकाळ चालणाऱ्या पत्रकार परिषदा म्हणजे मोठी पर्वणीच असते.

या पत्रकार परिषदेत चर्चच्या दृष्टीने कळीचे मुद्दे असणाऱ्या काही प्रश्नांची हमखास उजळणी होते. 

समलिंगी संबंध या प्रश्नावर '' त्यांचा न्याय करणारा मी कोण?'' असा उलटपक्षी प्रश्न पत्रकारांना विचारुन पोप फ्रान्सिस यांनी संबंधितांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र गर्भपात, कॅथोलिक धर्मगुरुंचे अविवाहितपणाचे व्रत, स्त्रियांना धर्मगुरुपदाची दीक्षा यावर पोप फ्रांसिस यांनी आपल्या पूर्वसूरींची कर्मठ भूमिका चालू ठेवली आहे.

पोप फ्रान्सिस हे पोप जॉन पॉल दुसरे त्यांच्यासारखेच हटके आणि यात्रेकरु (पिलग्रिम) पोप आहेत. ख्रिस्ती अगदी नाममात्र संख्येने असलेल्या आशियातील म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका येथे पोप फ्रान्सिस यांचे लाल गालिच्यावर स्वागत होत होते. 

व्हॅटिकन सिटीतील ड्रेस कोड विषयीही सांगितले पाहिजे. चर्चच्या सर्व धर्मगुरुंचा, बिशपांचा, कार्डिनल्सचा आणि नन्सचाही विशिष्ट झगा असतो. धर्मगुरु आणि बिशप सफेद किंवा करड्या रंगाचा झगा घालतात. कार्डिनलांचा करड्या रंगाचा झगा, कमरेला लाल पट्टा आणि डोक्यावर छोटीशी लाल गोल टोपी (स्कल कॅप) असते. पोप मात्र सदैव पूर्ण पांढऱ्या झग्यात असतात आणि त्यांच्यासमोर इतरांनी पांढरा पोशाख वा झगा घालू नये असा संकेत आहे. 

जगातील सर्व बिशप पाच वर्षातून एकदा आळीपाळीने पोप यांना व्हॅटिकन सिटीत भेटत असतात, त्यावेळी हे बिशप, कार्डिनल पोपसमोर नेहेमी करडया रंगाच्या झग्यांत असतात ! पुण्याचे बिशप थॉमस डाबरे किंवा वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो यांचे याआधीच्या आणि आताच्या पोपबरोबरचे फोटो पाहिले कि पोप यांच्याबाबतीतील या ड्रेस कोड विषयी कल्पना येईल. 

गेली काही शतके फक्त इटलीच्या कार्डिनलचीच पोपपदावर निवड व्हायची, याचे कारण म्हणजे पोपपदाच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये इटलीच्या कार्डिनलांचाच अधिक भरणा असायचा. आतापर्यंत केवळ युरोपियन आणि सध्याचे पोप फ्रान्सिस यांच्या रुपाने युरोपाबाहेरील लॅटिन अमेरिकेतील व्यक्तीला म्हणजे केवळ गौरवर्णीय पोपपद मिळालेले आहे. 

पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट सोळावे आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनी कॉलेज ऑफ कार्डिनलचा पारंपारिक चेहेरामोहरा बदलून टाकण्यासाठी अशियाई आणि आफ्रिकन बिशपांची कार्डिनलपदी नेमणूक केल्याचे स्पष्ट दिसते. 

पोप फ्रान्सिस यांनी बांगलादेशी आर्चबिशप पॅट्रिक डी रोझारिओ यांची बांगलादेशचे पहिले कार्डिनल म्हणून २०१६ साली नेमणूक केली, २०२० साली कार्डिनलपदावर नेमणूक झालेले विल्टन डॅनियल ग्रेगरी हे अमेरिकेतील पहिलेच आफ्रिकन-अमेरीकन कार्डिनल ठरले आहेत. अर्थात आधी आफ्रिकेतील अनेक कृष्णवर्णियांची कार्डिनलपदावर नेमणूक झालेली आहे. 

मुंबईचे पहिले भारतीय बिशप व्हॅलेरियन ग्रेशियस हे १९५३ साली भारताचे आणि आशिया खंडातलेही पहिले कार्डिनल बनले, मुंबईचे सायमन पिमेंटा हे पहिले मराठीभाषक कार्डिनल. भारताच्या कार्डिनलची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे. सद्याचे मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे तर पोप फ्रान्सिस यांच्या आठ-सदस्यीय सल्लागार मंडळात आहेत. २००८ला पोप बेनेडिक्ट यांनी राजिनामा दिल्यावर झालेल्या पोपपदाच्या निवडणुकीत कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस यांचे नाव चर्चेत होते. 

जगभरातलॆ कार्डिनल २०१३ साली आपापल्या बँगांसह नवे पोप निवडण्यासाठी असेच चालत या भव्य आवारात आले होते त्यांच्यातल्या अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बॉर्गग्लिओ यांची पोप म्हणून निवड झाले तेव्हापासून पोप फ्रान्सिस इथेच राहत आहेत. व्हॅटीकनचे राष्ट्रप्रमुख झाल्यापासून अजूनही ते आपल्या (!) देशात परतले नाहीत. 

कार्डिनलांच्या संख्येत आशियाई, आफ्रिकन किंवा कृष्णवर्णीय कार्डिनल अगदी नगण्य असले तरी मतपेटीतून आणि सेंट पिटर्स बॅसिलिकेच्या चिमणीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरातून काही धक्कादायक निवडीचा संदेश येऊ शकतो हे अलिकडच्या काही दशकांत दिसून आले आहे. 

१९७०च्या दशकात पोलंड या तेव्हाच्या कम्युनिस्ट राजवटीतील क्रेकॉव येथील कार्डिनल कॅरोल जोसेफ वोझत्याला यांची पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड करून या कॉलेज ऑफ कार्डिनल्सने जे धक्कातंत्र वापरले ते त्यानंतर जर्मन कार्डीनल जोसेफ अलोशियस रॅतझिंगर (पोप बेनेडिक्ट सोळावे) आणि नंतर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ ( पोप फ्रान्सिस) यांना निवडून आजतागायत चालू राहिले ठेवले आहे. 

त्यामुळेच भारतातील, आशियातील, आफ्रिकेतील किंवा इतर बिगर-पाश्चात्य कार्डिनल पोपपदावर येऊ शकतात ही आता अशक्यप्राय बाब राहिलेली नाही. एके दिवशी एखादा भारतीय म्हणजे अगदी मुंबईतील मराठीभाषक कार्डिनल सुद्धा व्हॅटिकन सिटीमध्ये पोप आणि या चिमुकल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो. 

आणि हा दावा म्हणजे केवळ स्वप्नरंजन, विशफुल थिंकिंग, सैद्धांतिक किंवा तत्त्वतः पातळीवर नाही, असे भविष्यात कधीही होऊ शकते. सोनियाचा तो दिवस लवकर यावा हीच अपेक्षा. 

Tributes to Pope Benedict XVI who will be laid to rest at St Peter;s Basilica  to rest on January 5, 2023.

No comments:

Post a Comment