गोव्यातला पोर्तुगाल :
महाराष्ट्र किंवा कर्नाटक सीमा ओलांड़ून गोव्यात प्रवेश केला कि एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन घडू लागते. कोकणातली हिरवी जर्द झाडी आणि विविध दिशेने उंच झेपावलेली नारळाची झाडे इथेही असतात. पण गोव्याचे वेगळेपण जाणवते ते इथल्या टुमदार, बैठ्या कौलारू घरांमध्ये, उंच टेकडीवर मोक्याच्या जागी असलेल्या चर्च आणि छोट्यामोठ्या चॅपेल्समध्ये, वेगळ्या धर्तीच्या मंदिरामध्ये. म्हापसा आणि पणजी शहरांकडे आपण येतो तेव्हा गोव्याचे हे वैशिष्ठय अधिक ठळकपणे जाणवते. लांबवर पसरलेले समुद्रकिनारे, तिथल्या अरबी समुद्रात आजही स्वच्छ असलेले पाणी आणि तिथली स्वच्छ वाळू कुणालाही मोहित करतात.
मात्र गोवा याहून कितीतरी अधिक वैशिष्ठयपूर्ण आहे, भारतीय संघराज्यातल्या इतर राज्यांपेक्षा गोवा अनेक बाबतीत आपले वेगळेपण आजही राखून आहे. हे सांस्कृतिक, धार्मिक, आणि ऐतिहासिक वेगळेपणाचे एक मुख्य कारण म्हणजे गोवा हा चिमुकला प्रदेश तब्बल साडेचारशे वर्षे पौर्तुगिज वसाहत होती. पन्नास वर्षांपूर्वी - १८डिसेंबर १९६१ रोजी - हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामील झाला तरी पोर्तुगीजांच्या दीर्घ राजवटीच्या अनेक पाऊलखुणा गोवा आजही बाळगून आहे. आणि यापैकी अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैशिष्ठ्ये अभिमानास्पद आहेत. `वैविध्यतेतून एकता' असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या या वैशिष्ठ्यात गोव्याचेही योगदान आहे
पोर्तुगालच्या अल्फान्सो डी अल्बुकर्कने गोव्यावर १५१० साली राजकीय सत्ता मिळवली, ओल्ड गोवा येथे आपल्या या वसाहतीची राजधानी बनवली आणि त्यानंतरच्या पोर्तुगीज गव्हंर्नर जनरल यांनी गोव्याच्या इतरत्र भागांवर सत्ता मिळवली. पोर्तुगिज राजकन्या कॅथरीन हिचा ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स दुसरा याच्याशी १६६१ साली लग्न झाले तेव्हा पोर्तुगालने आपल्या ताब्यात असलेली मुंबईची सात बेटे ब्रिटिशांना चक्क आंदण म्हणून देऊन टाकली होती !
वसई येथील पोर्तुगीज अंमल चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या सैन्याने संपवला होता. ब्रिटिश सत्तेने संपूर्ण भारतभर राजकीय सत्ता मिळवली, मात्र गोव्यातील पोर्तुगीज सत्तेशी ब्रिटिशांनी कधी स्पर्धा केली नाही.
गोव्यापासून दूर अंतरावर, गुजरातपाशी असलेल्या दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीव हे चिमुकले प्रदेशसुद्धा पोर्तुगीज इंडिया म्हणजेच पोर्तुंगीज इस्तादिओ चा भाग होते. साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेने या प्रदेशांत दुरगामी परिणाम केले. पोर्तुगिजांचा हा प्रभाव त्यांच्या या वसाहतीत सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषा, वास्तुकला, खाद्मसंस्कृती, संगीत, नृत्य, आणि इतर क्षेत्रांत आजही ठळकपणे दिसून येतो.
गोव्याची राजधानी पणजी या शहरात प्रवेश केला. तिथल्या आदिलशहा पॅलेस परीसर, अल्तिन्हो (पोर्तुगीज भाषेत टेकडी), किंवा फॉन्तइनेझ अथवा मांडवीच्या तिरावरच्या कंपाल परिसरात तुम्ही फिरला कि पोर्तुगीज राजवटीचा वास्तुशास्त्रीय वारसा तुम्हाला ठळकपणे लक्षात येईल. इथल्या इमारतींचा, बंगल्यांचा. छोट्यामोठ्या घरांचा रंग यामध्ये एक कमालीचे सातत्य आहे हे तुम्ही लक्षपूर्वक पहिले तर लगेच तुमच्या लक्षात येईल.
या वास्तूंचा रंग केवळ दोन रंगात असतो, पिवळा आणि सफेद, लाल आणि सफेद, निळा आणि सफेद. फॉन्तइनेझ परिसरातले रचनाबद्ध रस्ते आंणि तिथली घरे गोव्यातल्या पोर्तुगीज शैलीच्या वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मागे एका संस्थेने तर आपले पूर्ण वार्षिक कॅलेंडर फॉन्तइनेझ परिसरावर काढले होते !
इथे गेल्या आठवड्यात फेसबुक फ्रेंड विवेक मिनिझेस यांनी त्यांच्या पॉंडिचेरी भेटीत तिथले फोटो शेअर केले तेव्हा बराच काळ फ्रेंचांची वसाहत असलेल्या या शहरातली घरे आणि वास्तुशास्त्र गोव्यासारखेच आहे असं मला जाणवलं .
गोव्यातल्या जुन्या सरकारी, खासगी इमारती, इथले तीनशेचारशे वर्षे जुनी असलेली चर्चेस वगैरे वास्तु इथल्या पोर्तुगीज राजवटीच्या खुणा दृश्यपणे आपल्या अंगाखांद्यांवर बाळगून आहेत त्याचप्रमाणे या प्रदेशातल्या इतर कितीतरी अदृश्य बाबी पोर्तुगीज राजवटीचा आणि संस्कृतीचा वारसा मिरवत आहेत.
यात परदेशी राजवटीचा व संस्कृतीचा अभिमान नसला तरी त्याबाबत लज्जा राखण्याचेही काही कारण नाही.
भारतीय उपखंडातील पोर्तुगिजांच्या वसाहतीचा एक महत्त्वपूर्ण प्रभाव म्हणजे या प्रदेशात म्हणजे वसई, गोवा, दमण आणि दादरा, नगर हवेली येथील ख्रिस्ती लोकसंख्येचे मोठे प्रमाण. गोव्यात विशेषतः दक्षिण गोव्यात विविध जातींतले स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती झाले.
पोर्तुगीज हे कॅथोलिक पंथीय त्यामुळे साहजिकच गोव्यातली ख्रिस्ती समाज कॅथोलिक आहे. पोर्तुगिजांचा विविध क्षेत्रांतील प्रभाव प्रामुख्याने या कॅथोलिक समाजात आढळतो.
गोवा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेजवळचा एक अगदी छोटासा, महाराष्ट्रातील एका जिल्ह्यांच्या आकाराएवढा. गोवा, दमण आणि दीव हा एक केंद्रशासित प्रदेश होता. १९८७ साली दीव आणि दमण यांना वेगळं करून गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.
गोवा हे समुद्रकाठचं स्थळ, त्यात पाश्चिमात्य वळणाची जीवनशैली, खाद्य \आणि पेय संस्कृती, गोव्यामध्ये शेजारच्या राज्यांच्या तुलनेत पेट्रोलप्रमाणेच मद्यही खूप स्वस्त आहे, हे आता संपूर्ण देशभर माहीत आहे.
मात्र पोर्तुगीज राजवटीचा वारसा असलेला ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ (समान नागरी कायदा) गोव्यात जवळजवळ शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे आज अनेकांना ठाऊकही नसेल. लग्न, मालमत्तासंबंधी वारसाहक्क आणि स्त्री-पुरुषांना समान हक्क, ही या कायद्याची काही वैशिष्ट्ये!
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७०च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपसांत पोर्तुगीज भाषेत बोलता. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. गोव्यातून पोर्तुगीज भाषा आता हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात
भारतातील पहिले नि शेवटचे सार्वमत : भारतात सामिल झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या छोट्या प्रदेशाचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला. गोव्यात हिंदू समाजातील सर्व लोक आपसांत कोकणीत बोलत असले तरी सर्वांना मराठी कळते, लिहिता-वाचता येते. अनेकांना गोवा हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन व्हावा, असे वाटणे साहजिकच होते. मात्र मराठी न समजणाऱ्या, देवनागरी लिपीचे फारसे ज्ञान नसणाऱ्या, कोकणी आणि पोर्तुगीज बोलणाऱ्या गोव्यातील ख्रिस्ती लोकांसाठी गोवा महाराष्ट्रात विलीन करणे धक्कादायक होते.
त्यानंतर १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्यात सार्वमत घेण्यात आले अखेर ५४ टक्के लोकांनी या प्रदेशाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने कौल दिला, तर ४३ टक्के लोकांनी गोव्याच्या विलिनीकरणाच्या बाजूने. हे सार्वमत भारतातील पहिले नि शेवटचे ठरले.
.
जेसुईट धर्मगुरुंनी पणजीत येथे चालविलेल्या प्री-नोव्हिशिएटमध्ये धर्मगुरु होण्यासाठी दाखल झालेले आम्ही वीस तरुण उमेदवार पाच वर्षे उच्च माध्यमिक शिक्षण घेत होतो. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या आमच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये मूळ दमणचा रहिवासी असलेला फ्रान्सिस हा मेस्ता किंवा आचारी होता. तो फक्त पोर्तुगीज, कोंकणी आणि थोडीफार हिंदी बोलायचा. संध्याकाळी कामातून मोकळा झाल्यावर फेणी घेतल्यावर तो आपल्या कर्कश आवाजात पोर्तुगीज गाणी गायचा.
आमच्या जेवणासाठी तो रोज बनवत असलेल्या बिफच्या विविध पाककलाकृती, केक आणि त्याची जीवनशैली दमण येथील त्याकाळातही कायम असलेल्या पोर्तुगीज प्रभावाचे प्रतिक होते.
मेस्ता फ्रान्सिसमुळेच पोर्तुगीज भाषेत दमण ह्या शब्दाचा उच्चार ‘दमॉव’ असा करतात, पोर्तुगालची राजधानी लिस्बन चा पोर्तुगीजमध्ये उच्चार 'लिसबॉव' असा करतात हे मला कळाले होते. या मेस्ताकडून मी 'ओब्रिगाद' (थॅक्स) असे अनेक पोर्तुगीज शब्द शिकलो.
चर्चमधील मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थनांसाठी गोव्यातील कॅथोलिक समाज पोर्तुगीज प्रभावामुळे आजही फक्त रोमन लिपीत लिहिलेल्या कोकणी भाषेचाच वापर करतो.
गोवा भारतात सामिल होण्याआधी गोव्यात ख्रिस्ती समाजाचे प्रमाण जवळजवळ 3० टक्के होते. पण नंतरच्या काळात त्यांच्या भारतात आणि परदेशात होणाऱ्या स्थलांतराने आणि भारतीय लोक गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक होत गेल्याने ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या वेगाने खाली येऊन आता २५ टक्क्यांवर आली आहे.
अलीकडेच मी दमणला भेट दिली दमण मधील ख्रिश्चन समाजाची संख्या झपाट्याने कमी होत आहे कारण त्यांच्यापैकी बरेच लोक पाश्चात्य देशात स्थायिक झालेले आहेत, अजूनही पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने आजही युरोप आणि इतर देश त्यांना खुणावत आहेत.
पुढे चालू ...
No comments:
Post a Comment