गोव्यातला पोर्तुगाल .. भाग दोन .. पुढे चालू
Urrak getting fermented
हा मार्च अखेरचा काळ म्हणजे गोव्यात उर्राकचा सिझन. उन्हाळ्यात काही ठराविक कालावधीत हे पेय मिळते. निरा जशी ठराविक काळात मिळते आणि बाटलीमधून मिळत नसते तसेच उर्राकच्या बाबतीत आहे. फेणीसारखे हे पेय बाटलीबंद केले जात नाही.
गोव्याच्या संस्कृतीचा विषय निघाल्यावर तिथल्या पेयपानाबद्दल ( कि अपेयपान ?) कसे टाळता येईल ? गोव्यातल्या कुठल्याही मांसाहारी जेवणाच्या हॉटेलांत तुम्ही बसला कि वेटर ताबडतोब टेबलावर काचेचे रिकामे ग्लास ठेवतो. उडुपी हॉटेलांत टेबलावर पाण्याचे ग्लास ठेवतात तसे. याचे कारण म्हणजे गोव्यात परमिट रुम हा प्रकारच नाही. हा पोर्तुगीज संस्कृतीचा आणखी एक परिपाक.
भारतात पोर्तुगिजांचा अंमल जिथेजिथे होता तिथेतिथे कॅथोलिक समाजात ही पेयसंस्कृती हमखास आढळते. इथे माहितीसाठी, पोर्तुगीज हे राष्ट्र कॅथोलिक होते, जसे इंग्लंड (आयरीश वगळता ) प्रोटेस्टंट. अर्थात या पेयसंस्कृतीबाबत इतरांचे काही भलेबुरे आक्षेप असू शकतात. तर कुठलेही गेट-टुगेदर वा समारंभ पेयपानाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही,
मग निमंत्रितांसह आयोजित केलेली लादालिन (लितानी) प्रार्थना असो, किंवा वाढदिवस आणि लग्नासारखा आनंदी कार्यक्रम असो किंवा अंतःविधीसारखी दुःखद घटना असो. छोटयाशा काचेच्या ग्लासात फेणी किंवा इतर पेय घोटभर का होईना घेतले जातेच.
कामावरुन संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी अंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे ही गोव्यातील अनेक लोकांची सवय हा त्यापैकी एक पोर्तुगिज सांस्कृतिक वारसा. कामावरुन रात्री घरी आल्यावर आधी अंघोळ करायची माझी सवय आहे ती गोव्यातील माझ्या वास्तव्याचा परीणाम.
``गोव्यात आम्ही लोक रात्री अंघोळ करतात ते झोपायला जाण्याआधी फ्रेश होण्यासाठी!'' (We Goans have bath in the evening to be fresh before going to bed!'') असे आमच्याबरोबर मिरामारला राहणारे इतिहासकार फादर थिओटोनिओ डिसोझा माझ्याशी बोलताना म्हणाले होते ते आजही आठवते.
गोव्यात या उन्हाळ्याच्या काळात असताना टेबलावर अनेक परदेशी उंची पेये असली तरी खास चवीचे लोक उर्राकच पसंत करत असतात, मीही त्याला अपवाद नाही. कधीकाळी पोर्तुगीज वसाहत असलेल्या वसईत सुद्धा असाच अनुभव येतो. अर्थात तिथे स्थानिक पेय वेगळे असते.
गोव्यात फिश-करी राईस व्यतिरिक्त चिकन शाकुती, सोरपोतेल, विंदालू, चोरीस पाव सारख्या इतर खास गोवन तथा पोर्तुगीज खाद्यपदार्थांचाही आस्वाद घ्यायला हवा.
गोव्यात कॅथोलिक व्यक्तींमार्फत चालविलेल्या हॉटेलांत बिफ-स्टीक वगैरे पदार्थ मिळतात. कॅथोलिक कुटुंबात पाहुणचाराचा योग्य लाभला तर डुकराच्या मांसाचे (पोर्क) केलेले सोरपोतेर, चिकन वा पोर्क विंदालू या मांसाहारी पदार्थांची चव घेता येईल.
मांसाहाराचे शौकीन असलेलया मंडळींनी चोरिस पाव हे पोर्कपासून बनवलेले चमचमित, मसालेदार सँडविच खायलाच हवे. याशिवाय पणजी चर्चपाशी असलेल्या मिस्टर बेकर- 1922 या दुकानात आणि म्हापसा मार्केटमध्ये अनेक दुकानांत गोव्याची खासियत असलेल्या बिबिन्का, काळ्या गुळापासून बनवलेल्या दोदलसारखे विविध बेकरी पदार्थ, केक वगैरे मिळतात.
१९७०च्या दशकात गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारी निर्जन असायचे. कलंगुट आणि कोलवा हे बिच तेव्हाही लोकप्रिय असले तरी अंजुना-वागातोर, वारका वगैरे समुद्रकिनारी कुणी फिरकतही नसायचे. अंजुना बिचवर दर बुधवारी भरणारे ;फ्ली -मार्केट'' त्याकाळीही एक आकर्षण असायचे. या फ्ली-मार्केट परदेशी पर्यटक आपल्याकडील विविध वस्तू विकायला काढीत असत आणि यापैंकी अनेक वस्तू दुर्मिळ किंवा कलात्मक असत.
मागे युरोपला सहलीला असताना पॅरीसमध्ये मोन्तमार्ट परिसरात भुयारी मेट्रोच्या वर असलेल्या वॉकिंग प्लाझावर असाच बाजार भरलेला दिसला. तेथे अनेक लोक आपल्या कुटुंबियांबरोबर घरातील कितीतरी नको असलेल्या वस्तू - पुस्तके, फर्निचर, कपडे - विकत होते.
पॅरीसमधला तो बाजार पाहिला आणि मला सत्तरच्या दशकातला गोव्यातल्या अंजुना बिचवरच्या फ्ली-मार्केटची लगेचच आठवण आली.
गोव्यातल्या जुन्या वास्तु त्याचप्रमाणे अशा इतर कितीतरी अदृश्य बाबी पोर्तुगीज राजवटीचा आणि संस्कृतीचा वारसा मिरवत आहेत. यात परदेशी राजवटीचा व संस्कृतीचा अभिमान नसला तरी त्याबाबत लज्जा राखण्याचेही काही कारण नाही.
क्रमशः ...
Caption : Cashew juice getting fermented
No comments:
Post a Comment