चर्चबेल ... काल संध्याकाळी शनिवारी होणाऱ्या मिस्सेसाठी चर्चच्या आवारात शिरत होतो. गाडी पार्क केली अन् चर्चबेलचा घंटानाद सुरु झाला. चर्चची घंटा आणि मिस्साविधी होण्याआधी?
चर्चच्या घंटानादाची सांकेतिक भाषा असते त्यातून ऐकणाऱ्या लोकांना योग्य तो संदेश पोहोचतो. माझ्या लहानपणी श्रीरामपूरजवळ असलेल्या हरेगावात मी दुसरीत आणि तिसरीत असताना जर्मन, स्विस आणि इतर युरोपियन जेसुईट फादर लोकांनी चालवलेल्या संत तेरेजा शाळेच्या बोर्डिंग मध्ये होतो. तेव्हापासून चर्चबेलचा घंटानाद डोक्यात बसलेला आहे.
तिथे दिवसातून चारपाच वेळेला हा घंटानाद व्हायचा. सकाळी सहाला देऊळ भरण्याआधी. तो घंटानाद ऐकून भाविक देवळाकडे येण्याची तयारी करायचे. नंतर मिस्सा सुरु होण्याआधी. दुपारी बाराच्या ठोक्याला आणि संध्याकाळी सहाला पुन्हा चर्च बेल वाजायची. पण ती विशिष्ट पद्धतीने. थांबून थांबून तीन वेळा आणि नंतर लागोपाठ सलगतेने जोरजोरात ..
हा घंटानाद ऐकला की आम्ही मुले इतर लोक आणि फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वास्सरर वगैरे असेल तिथे थांबायचे. `जन गण मन' ची धून ऐकल्याप्रमाणे. हा घंटानाद असायचा अंजेलास म्हणजे रोझरी पवित्र माळेच्या प्रार्थनेसाठी. ग्रँब्रीएल देवदूताने मरियेला येशूच्या गर्भधारणेविषयी दिलेला निरोप. मुसलमान दिवसातून काही ठराविक वेळेला नमाज पढतात तसेच खिस्ती भाविकांची ही प्रार्थना. त्याकाळात फादरबाडीत अशी प्रार्थना नियमित पणे व्हायची. आता बहुतेक नाही.
दिवसारात्री, अवेळी चर्चबेल वाजली तर काही धक्कादायक, अशुभ, कुणाचातरी मृत्यू झाल्याचा संदेश पोहोचतो. लोक ताबडतोब काय झाले अशी चौकशी करू लागतात आणि बातमी सगळीकडे पोहोचते. ओडिशातील एका खेड्यात जग नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर असताना ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहॅम स्टेंस आणि त्याची दोन छोटी मुले जीपमध्ये झोपली असताना त्या काळरात्री जिवंत जाळली गेली तेव्हा भयभीत झालेल्या स्थानिक लोकांनीं असाच घंटानाद केला होता असे म्हणतात.
चर्चबेलचा घंटानाद अगदी आनंददायी अंगावर रोमांच आणणारा असतो तो ख्रिसमस मध्यरात्री होतो तेव्हा. नाताळच्या या प्रार्थनेत कोपऱ्यात असलेल्या बाळ येशूचा पुतळा फादर समारंभपूर्वक केंद्रस्थानी सजवलेल्या गव्हाणीत आणताना `ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ' हे लॅटिन भाषेतले अभिजात कडवे गायले जाते आणि त्यावेळेस हा घंटानाद जोरजोरात चालू असतो.
एका मोठ्या चर्चमध्ये म्हणजे बॅसिलिकात विशिष्ट वेळी वाजवल्या जाणाऱ्या चर्चबेलच्या घंटानादाची जगभरातील भाविक आणि माझ्यासारखे पत्रकार आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहत असतात.
पोपपद रिकामे झाले की जगभरातील सर्व लाल टोपीधारी कार्डिनल् रोमची वाट धरतात. त्यांच्यामधून कुणा एकाची पोप म्हणून निवड करण्यासाठी. मायकल अँजेलोची चित्रे छतावर आणि भिंतीवर असलेल्या सिस्टाईन चॅपेलमध्ये होणारी ही निवडणूक किती दिवस चालेल हे कुणालाच माहित नसते. काही वर्षांपूर्वी या सिस्टाईन चॅपेलमध्ये मी स्वतः गेलो तेव्हा तिथली लास्ट जजमेंट आणि द क्रिएशन वगैरे चित्रे पाहताना माझी मती गुंग झाली होती !
या कार्डिनल कॉन्क्लेव्हमध्ये प्रत्येक मतदानानंतर सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर सोडला जातो. म्हणजे ओले गवत जाळून.. याचा अर्थ निवडणूक मतदान अनिर्णीत ...
सुके गवत जाळून चिमणीतून पांढरा धूर आला की समोर सेंट पिटर्स चौकात जमलेल्या लोकांत आणि जगभर कमालीची ताणलेली उत्सुकता.
मग एक कार्डिनल बाल्कनीत येतात आणि लॅटिनमध्ये सांगतात We have a Pope... आणि मग बॅसिलिकाच्या चर्चबेलचा जोरदार सतत घंटानाद सुरु होतो. हा घंटानाद जगात जिथेजिथे ऐकला जाईल किंवा ही बातमी तिथे पोहोचेल तिथेही चर्चबेलचा घंटानाद सुरु होतो..
हे चर्चबेल आख्यान मला पुढेही चालू ठेवता येईल. पण आता आवरते घेतो.
तर काल संध्याकाळी अचानक चर्चबेल का वाजते आहे याबद्दल उत्सुक होऊन घाईघाईने मी कारमधून बाहेर आलो आणि चर्चच्या मुख्यदारापाशी असलेल्या बेलच्या दिशेने धावलो. घंटानाद थांबला होता आणि घंटा वाजवून पांढऱ्या झग्यात असलेले आमचे पॅरीश प्रिस्ट लाझारस चावडी आपल्या कार्यालयाकडे जात होते.
चर्चच्या सॅक्रेटिएशनऐवजी आज फादर स्वतः चर्चची बेल का वाजवत आहेत? असा मनात विचार आला, पण तो लगेच झटकून मी चर्चमध्ये शिरलो. तिथे पहिल्या गायनास सुरुवातही झाली होती.
मिस्सा संपल्यावर मी गाडीकडे आलो. कार सुरु करण्याआधी सवयीने आधी मोबाईल पाहिला. इथे फेसबुकवर आलो आणि पहिलेच नोटीफिकेशन पाहिले आणि मग लगेच एका क्षणात सगळा उलगडा झाला.
एक तासापूर्वी व्हॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांनी पुणे डायोसिसचे नवे बिशप म्हणून मुंबईतील ऑक्सिलरी बिशप जॉन रॉड्रिग्स यांच्या नेमणूकीची घोषणा केली होती. सत्त्यात्तर वर्षांचे आताचे बिशप थॉमस डाबरे कॅथोलीक चर्चच्या कॅनॉन लॉनुसार निवृत्त झाले आहेत.
ही बातमी ऐकल्याबरोबर लगेचच आमच्या चर्चमध्ये हा घंटानाद झाला होता..
मी स्वतः वयाच्या सोळाव्या वर्षी जेसुईट फादर होण्यासाठी गोव्यात गेलो होतो. फादर झालो असतो तर यदाकदाचित या वयात बिशपपदासाठी मीसुद्धा एक संभावित, पात्र उमेदवार असलो असतो.
त्यामुळे चर्च कामकाजाचा मला बऱ्यापैकी अनुभव आहे. Believe me, it's very difficult task to choose a person for the post of a bishop. हा शोध एकदोन वर्षे चालू असतो. चारित्र्य, व्यवस्थापन कौशल्य, अनुभव, धार्मिकता वगैरे खूपखूप कसोट्या असतात. अशी गुणसंपन्न व्यक्ती या काळात दुर्लभच..
यथावकाश (म्हणजे किमान दिडदोन महिन्यानंतर) नव्या बिशपांचा अभिषेक किंवा कोंसेक्रेशन होईल. तेव्हा पुन्हा या विधिदरम्यान पुन्हा असाच घंटानाद होईल. संपूर्ण पुणे दायोसिसमधल्या सगळ्या चर्चेसमध्ये.
तोपर्यंत नूतन बिशप रॉड्रिग्ज यांना शुभेच्छा आणि मावळते बिशप थॉमस डाबरे यांना त्यांच्या सेवेबाबत धन्यवाद....
Camil Parkhe March 26, 2023
No comments:
Post a Comment