Saturday, September 6, 2025

 

                                                    इन्स्पेक्टर मधुकर झेंडे,  चार्ल्स सोबराज

गोव्यात म्हापशात त्या रात्री साध्या वेशात असलेले इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि मी कदाचित समोरासमोर आलोही असेल, मात्र त्यांच्याशी काही बोलणे शक्यच नव्हते.

आपल्या मुंबई पोलीस टिममधल्या चारपाच लोकांव्यतिरिक्त कुणाशीही एक शब्दसुद्धा बोलण्याच्या मनःस्थितीत ते त्यावेळी नव्हते.

त्या रविवार ६ एप्रिल १९८६च्या रात्री तिथे जमलेल्या आम्हा काही मोजक्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांना अजिबात स्वारस्य नव्हते.

पर्वरी येथील `हॉटेल ओ कोकेरो' येथे चार्ल्स सोबराजच्या शिताफीने मुसक्या बांधल्यानंतर म्हापसा हॉटेलातून चेक-आऊट करून सोबराजसह शक्य तितक्या लवकर गोवा सोडून मुंबई गाठण्याच्या घाईत ते होते.

काल शुक्रवार दुपारी घरच्या टिव्हीवर पिक्चर सुरु झाल्यानंतर `इन्स्पेक्टर झेंडे' असे चित्रपटाचे शिर्षक झळकले आणि डोक्यात तिडीक उठली.

''इन्स्पेक्टरसाठी हेच नाव निवडण्याची काही गरज होती काय?'' असे मी मोठ्याने बोललोसुद्धा.

दोनचार मिनिटे गेली आणि लक्षात आले, ``अरे हो, हा तर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज यांच्यावर चित्रपट आहे !''

त्यानंतर मी टिव्हीवरुन नजर वळवली.

आज माझ्या टेबलावर पणजी येथील `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात सोमवार ७ एप्रिल १९८६ रोजी पान एकवर बॅनर म्हणून प्रकाशित झालेली बातमी आहे.

``Sobhraj arrested in Goa ?'' असा प्रश्नात्मक मथळा असलेली जुन्या महाकाय लायनो सेट मशीनवर कंपोझ केलेली ही बातमी आहे.

बातमीला जोड बायलाईन अशी आहे : By Jovito Lopes and Camil Parkhe

प्रश्नात्मक मथळा आहे याचा अर्थ आम्हा दोघा बातमीदारांनासुद्धा पकडलेली व्यक्ती चार्ल्स सोबराजच आहे याची खात्री नव्हती.

साध्या वेशातील इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि त्यांच्या टिममधील कुणीही तोंड उघडण्यास तयार नव्हते.

प्रायव्हेट टॅक्सीमधून लवकरात लवकर त्यांना मुंबई हेडक्वार्टरला जाऊन आपल्या जाळ्यात गवसलेल्या मोठ्या प्राईझ कॅचविषयीची बातमी त्यांना जगजाहीर करायची होती.

आमच्या बातमीत इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांचा उल्लेख `एम झेंडे' असा करण्यात आला होता.

आमच्याकडे खूपच तुटपुंजी आणि ऐकीव माहिती होती,

रात्रीचे नऊ वाजत आले होते आणि जोवितो लोपीस यांच्या स्कुटरवरुन म्हापशाहून पणजीला परतून डेडलाईन वाढवून ती बातमी आम्ही छापण्यात यश मिळवले होते.

दिल्लीतल्या हाय सेक्युरीटी तिहार जेलमधून १६ मार्च १९८६ ला परागंदा झालेल्या चार्ल्स सोबराजला पुन्हा पकडण्यात इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या टिमला यश आले होते.

तसे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज खूप जुने संबंध होते.

इन्स्पेक्टर झेंडे यांनी याच चार्ल्स सोबराजला आधीही एकदा जेरबंद केले होते.

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी सोमवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळावरून मी दिल्लीला गेलो होतो, तेथून लगेच त्याकाळच्या सोव्हिएत रशिया आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी गेलो होतो.

त्यानंतरच्या पुढील काही महिन्यांत चार्ल्स सोबराज प्रकरणात गोव्यात, मुंबईत आणि भारतात काय घडले हे मला काहीच माहित नाही.

`बदलती पत्रकारीता' या माझ्या पुस्तकात (सुगावा प्रकाशन, २०१९) 'गोव्यात चार्ल्स सोबराजला अटक झाली तेव्हा' हे पहिलेच प्रकरण आहे.

वयोवृद्ध चार्ल्स सोबराज मागच्या वर्षीच नेपाळ तुरुंगातून फ्रान्समध्ये परतला आहे.

मधुकर झेंडे यांचे हल्ली पुण्यात कात्रजला आणि मुलाकडे सिंगापूरमध्ये वास्तव्य असते. झेंडे हे समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचे जवळचे नातलग.

म्हापशात आलो कि आजही बस स्टॅण्डसमोरच्या जीटीडीसी मालकीच्या `म्हापसा रेसिडेन्सी'कडे माझी नजर जातेच.

तेथून पणजीला जाताना पर्वरीला आजही त्याच अवस्थेत असलेल्या `हॉटेल ओ कोकेरो'कडे नजर जाते. कितीतरी गोष्टी नजरेसमोर झळकतात.

साडेचार दशकांच्या माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दितील ही माझी सर्वांत मोठी आणि सर्वाधिक स्मरणीय आणि गाजलेली बातमी.

Camil Parkhe September 6, 2025 




Saturday, August 30, 2025

 

                                                                  Francisco Luis Gomes

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर डोना पॉलच्या दिशेने जाणाऱ्या दयानंद बांदोडकर मार्गावर मांडवीच्या किनाऱ्यापाशी कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची गोवामुक्तीनंतर उचलबांगडी करुन त्यांची रवानगी वस्तूसंग्रहालयांत करण्यात आली आहे.
पणजी येथील मध्ययुगीन आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कला अकादमीशेजारच्या कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा. या दोन्ही पुतळ्यांबाबत यामागील कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती ` नीज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील कमरेवर एक हात ठेवून असलेल्या या व्यक्तीच्या पुतळ्याकडे सहसा लक्ष जात नाही किंवा अगदी क्वचित लक्ष जाते.
सुरुवातीला शिक्षणानिमित्त आणि नंतर `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदारी करताना अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर शेजारच्या ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी नेहेमीच कुतूहल वाटायचे.
हा पुतळा आहे डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स (Francisco Luis Gomes) यांचा. पोर्तुगीज उच्चारांनुसार फ्रांसिश्कु लुईश गोमिश. गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्यता कमीच आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते.
त्याशिवाय फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे एक अगदी महत्त्वाचे आगळेवेगळेपण आहे.
एकोणिसाव्या शतकात जेव्हा निम्म्याहून अधिक जग वसाहतवादाने वेढले होते तेव्हा पारतंत्र्यात असलेल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे फ्रान्सिस्को लुईस गोम्स हे पहिलेच राष्ट्रवादी नेते होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९३१ साली साली पोर्तुगाल राजवटीतच डॉ. गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोम्स यांच्या जन्मशताब्दीच्या दिनी म्हणजे ३१ मे १९२९ रोजी या पुतळ्याची कोनशिला बसवण्यात आली होती. या पुतळ्याचे ब्राँझ कास्टिंग इटालीमधील फ्लॉरेन्स शहरात झाले होते.
गोव्यातील तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर जनरल जोआओ कार्लोस क्राव्हेइरो लोपेश आणि आणि ईस्ट इंडिजचे पॅट्रियार्क हे पद असलेले गोव्यातील चर्चप्रमुख डॉम तिओटोनिओ डी कॅस्ट्रो यांनी २३ डिसेंबर १९३१ रोजी या पूर्णाकृती पुतळ्याचे या कंपाल गार्डनमध्ये अनावरण केले.
डॉ. गोम्स यांनी २२ डिसेंबर १८६० रोजी लिस्बनमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवून संसदेच्या आपल्या खासदारकीची सुरुवात केली होती.
पोर्तुगीज राजवटीतच त्यांचा पूर्णाकृती पुतळा पणजी येथे उभारला गेला तेव्हा पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांसाठी आपली प्रतिभा आणि सर्व गुण समर्पित करणारा देशभक्त म्हणून तेथील शिलालेखात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
या पुतळ्याच्या चौथऱ्यावर पोर्तुगीज भाषेत खालील शिलालेख आहे . त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे:
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या गौरवशाली स्मृतीस
स्वातंत्र्याचे निर्भयी पुरस्कर्ते
प्रखर वक्ते
थोर साहित्यिक
विद्वान अर्थशास्त्रज्ञ
देशभक्त
ज्यांनी आपल्या तेजस्वी बुद्धीच्या
सर्व शक्ती
भारत आणि पोर्तुगालच्या कल्याणासाठी अर्पण केल्या
जन्मशताब्दीप्रित्यर्थ
१८२९–१९२९
" हा पुतळा पोर्तुगीज भारताच्या ७ व्या प्रांतीय अधिवेशनाच्या अभ्यास समितीने सुचवला.
अध्यक्ष डॉ. अँटोनिओ मारिया दा कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली,
प्रख्यात खासदार आणि नामांकित लेखकाचा गौरव करण्यासाठी,
ज्यांनी द ब्राह्मिन्स, द मार्क्विस ऑफ पोम्बाल, राजकीय अर्थशास्त्र आणि भूमी स्वातंत्र्य यांसारखी साहित्यकृती निर्माण केली."
गोव्यात आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या भारताच्या इतर प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात १८२२ नंतर गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली यांचा समावेश असलेल्या पोर्तुगीज इंडियातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगीज नागरिकांप्रमाणे पोर्तुगालच्या सर्व वसाहतीमध्ये स्थलांतर करण्याचे अधिकार आणि हक्क गोवा, दमण आणि दीव दादरा, नगर हवेली यासारख्या इतर सर्व पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनाही होते.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोवामुक्तीआधी म्हणजे १९ डिसेंबर १९६१ आधी पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना पोर्तुगीज नागरिकत्वावरचा हक्क आजही शाबूत आहे.
इतकेच नव्हे तर त्यांच्या पुढच्या दोन पिढ्यांनासुद्धा हा हक्क आहे.
पोर्तुगालमध्ये 1822 सालच्या राज्यघटनेनुसार गोव्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी लिस्बनमध्ये सत्तेवर आलेल्या लिबरल पार्टीने सर्व नागरिकांना मतदानाचे अधिकार दिले होते. विशेष म्हणजे पोर्तुगाल साम्राज्याच्या जगभरातील सर्व वसाहतीतील - पोर्तुगीज इंडियासह- सर्व नागरिकांचा त्यात समावेश होता.
लोकशाही तत्त्वानुसार ही फार मोठी राजकीय घटना होती. अर्थात निवडणुकीत मतदानाचे हे अधिकार काही विशिष्ट लोकाना होते. पोर्तुगीज बऱ्यापैकी लिहू आणि वाचू शकणारे आणि काही किमान सरकारी कर भरणारे पोर्तुगाल साम्राज्यातील वसाहतींतील सर्व नागरिक या मतदानासाठी पात्र होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते. .
मात्र फ्रान्सिस्को लुईस गोम्स हेसुद्धा गोव्यातून पोर्तुगाल संसदेवर निवडून जाणारे पोर्तुगीज इंडियातले - गोव्यातले - पहिले नागरिक नव्हते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याआधी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीच बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा यांची आणि कॉन्स्टॅनशिओ रॉक दा कोस्टा या दोन गोवन नागरिकांची सर्वप्रथम यांची पोर्तुगालच्या संसदेवर चार जानेवारी १८२२ रोजी निवड झाली होती.
यापैकी बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा (१७७५- १८४४) हे पोर्तुगाल संसदेवर गोव्यातून तब्बल तीनदा निवडून गेले होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मात्र इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, साहित्य अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान केले आणि जागतिक कीर्तीला पात्र ठरले. गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरु ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे इंग्रजी भाषेत लिहिलेले विस्तृत चरित्र नॅशनल बुक ट्रस्टने २०१० साली प्रकाशित केले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा जन्म दक्षिण गोव्यातील नावेली येथे ३१ मे १८२९ रोजी झाला. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी तरुण वयातच पोर्तुगीज भाषेबरोबरच फ्रेंच, लॅटिन, मराठी, कोकणी भाषांत प्राविण्य मिळवले.
पणजीतल्या गोवा मेडिकल कॉलेजात त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पणजी येथे १८०१ साली स्थापन झालेले हे स्कूल ऑफ मेडिसिन अँड सर्जरी हे केवळ भारताततली नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली आधुनिक वैद्यकीय शिक्षण संस्था होती.
या वैद्यकीय शिक्षणानंतर गोम्स यांनी सहा महिने ब्रिटिश भारतातील मुंबईत वास्तव्य केले.
मुंबईतल्या या अल्प काळात त्यांचा या शहरातल्या मूळच्या गोमंतकीय, अँग्लो इंडियन तसेच पारशी कुटुंबांशी संबंध आला. पोर्तुगीज इंडियाच्या म्हणजे गोव्याबाहेरील इतर भारतीय भागांत प्रचलीत असलेल्या समाजव्यवस्थेची त्यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे ओळख झाली.
याच काळात त्यांनी मुंबई सोडून उत्तर भारतातील काही प्रदेशांना भेटी दिल्या असाव्यात. याचे कारण म्हणजे पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांच्या लिखाणात उत्तर भारतातील समाज व्यवस्थेचे चित्रण आढळते. विशेषत त्यांनी पुढे लिहिलेल्या `द ब्राह्मण' या पोर्तुगीज कादंबरीत उत्तर भारतातील समव्यवस्थेचे चित्रण आहे.
ब्रिटिश भारतात असताना याच काळात गोम्स यांनी इंग्रजी, मराठी आणि इतर भारतीय भाषांत प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
गोव्यात परतल्यानंतर गोम्स यांनी गोवा सरकारच्या आरोग्य सेवा खात्यातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेतला. त्यानंतर त्यांची सहाय्यक सर्जन पदावर निवड झाली आणि पणजी येथील सैन्यदलात त्यांची नेमणूक झाली. नंतर त्यांची पोंडा येथे सहायक सर्जन या पदावर बढती मिळाली.
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची १८६०च्या ऑगस्ट महिन्यात दक्षिण गोव्यातून सालसेट- काणकोण मतदारसंघातून पोर्तुगाल संसदेवर निवड झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे बत्तीस वर्षे होते.
पोर्तुगीज संसदेत त्यांनी उदारमतवादी विरोधी पक्षात प्रवेश केला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लवकरच ते आपल्या पक्षाचे एक प्रमुख नेते बनले. पोर्तुगालच्या विविध नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. पट्टीचे वक्ते म्हणूनसुद्धा ते गाजले. पोर्तुगीज पार्लमेंटमधील त्यांची भाषणे माहितीपूर्ण असत.
अफोन्सेका नावाच्या एका खासदाराने पोर्तुगीज संसदेतील वसाहतींचे प्रतिनिधित्व रद्द करावे असे एक विधेयक 1861 च्या जानेवारीत आणले होते. इंग्लंडने आपल्या संसदेतील कॅनडाचे प्रतिनिधित्व रद्द केले होते, त्या धर्तीवर हा ठराव दाखल करण्यात आला होता.
आपल्या भाषणातून गोम्स यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. पोर्तुगीज वसाहतीतील लोकांच्या राजकीय हक्कांचा धडाडीने समर्थन करत त्यांनी या विधेयकास विरोध केला.
वसाहतींमधील शेकडो लोकांना त्यांचा केवळ जन्म परदेशातील वसाहतींमध्ये झाला या एकाच कारणास्तव त्यांच्या राजकीय हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये असे त्यांनी ठामपणे मांडले. `परदेशातील वसाहतींमधील लोक सुसंकृत नाहीत, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये' या अफोन्सेका यांच्या मुद्द्यात तथ्य नाही असेही गोम्स यांनी ठणकावून मांडले.
त्यांच्या या भूमिकेमुळे हे विधेयक बारगळले.
फ्रान्समधील साहित्यिक अल्फान्सो डी लामार्तिन (१७९० – १८६९) यांच्यापासून गोम्स यांनी प्रेरणा घेतली होती.
लामार्तिन यांना पाच जानेवारी १८६१ रोजी फ्रेंच भाषेत लिहिलेल्या एका पत्रात गोम्स यांनी म्हटले होते:
``भारत देशात माझा जन्म झाला. जो देश एके काळी काव्य, तत्त्वज्ञान, इतिहास यांचा पाळणा होता व जो आज दुदैवाने त्याचे थडगे होऊन राहिला आहे. ज्या देशाने महाभारत निर्माण केले व बुद्धिबळाचा शोध लावला, तो देश माझा आहे. या दोन महान कृतींत दिक्कालातीत असे काहीतरी आहे. पण हे राष्ट्र ज्याने आपल्या संहितांना कवितेत लिहिले, ज्याने आपल्या राजकारणाला खेळामधून प्रकट केले ते राष्ट्र आता मुळी अस्तित्वातच नाही! हा देश आपल्या मातृभूमीतच कैद झाला आहे, स्वतःच्या समृद्धीनेच पार थकलेला आहे आणि स्वतःच्या वैभवाच्या तेजोमयतेतच झाकोळून गेलेला आहे.
आपल्या पंखांच्या मदतीने हिमालयाच्या उंच शिखरांवर भरारी मारणाऱ्या या पक्ष्याने आता आपल्याच पिंजऱ्याच्या गजांशी झुंजत आपली पिसे गमावली आहेत. कोणे एकेकाळी या पक्ष्याच्या गीताचे स्वर संपूर्ण आकाश व्यापत असत, आता स्वातंत्र्य गमावल्यामुळे आक्रोश करणारी ही कोकिळा आपला मंजुळ स्वरच विसरुन गेली आहे. मी भारतासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहे.”
कल्पना करा कि फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी पारतंत्र्याच्या जोखंडात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी १८६१ साली केली.
गोम्स यांनी या पत्रात गुलामगिरीत जखडलेल्या आपल्या देशाची व्यथा मांडत व्यक्त केलेली ही भूमिका तेव्हा गुलामगिरीत असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामाच म्हणता येईल.
त्या काळात भारत हा प्रदेश एक एकसंघ राष्ट्र आहे अशी संकल्पना या भूमीवर राहणाऱ्या लोकांमध्येसुद्धा सोडा, येथील राज्यकर्त्यांमध्येसुद्धा रुजली नव्हती. या उपखंडातील छोटेमोठे राज्यकर्ते शतकोनुशतके आपापसांत लढत होती.

गोम्स यांनी हे ऐतिहासिक विधान केले त्याच्या चार वर्षे आधीच भारतातील विविध संस्थानिक मांडलिक आणि राजेमहाराजे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या विरोधात दिल्लीतील शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जाफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ साली उठाव केला होता. आपापल्या मुलखांत आपली सत्ता कायम राहावी यासाठी त्यांनी केलेली ही अखेरची धडपड होती.
त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी समुद्रापार युरोपात केलेली ही मागणी विलक्षण आणि ऐतिहासिक ठरते.
भारताला स्वातंत्र्य मिळावे, या देशाची गुलामी संपायला हवी अशी मागणी गोम्स त्याकाळात केली होती आणि तीसुद्धा युरोपात आणि पोर्तुगालच्या भुमीवर ही महत्त्वाची बाब आहे.
भारताला परकीय सत्तेतून मुक्ती मिळावी अशी मागणी तोपर्यंत देशात कुणीही केली नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्याची अशी मागणी करणारे गोम्स हे पहिलेच भारतीय नेते.
त्यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनंतर १८९२ साली ब्रिटिश भारतातून दादाभाई नौरोजी यांची इंग्लंडच्या संसदेवर निवड झाली. इंग्लंडच्या संसदेवर खासदार म्हणून निवड झालेले दादाभाई हे पहिलेच आणि एकमेव भारतीय.
भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करण्याची मानसिकता भारतीय नेत्यांमध्ये निर्माण होण्यासाठी पुढे बराच काळ लागला. त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे भारतीय राष्ट्रवादी असणे अधिक ठळक होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी आपल्या याच पत्रात एक महत्त्वाची टिपण्णी केली होती. विशेष म्हणजे गोम्स यांचा हा उतारा देताना त्यातील पुढील वाक्य अनेकदा गाळले जाते, असे गोम्स यांचे चरित्रकार ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी म्हटले आहे.
मात्र या वाक्यातील मतितार्थ खूप महत्त्वाचा आहे. त्या पत्रातील हे वाक्य पुढीलप्रमाणे आहे :
“ही शीर्षके माझ्या देशावर प्रेम करणाऱ्या आणि मानवजातीवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासाठी पुरेशी शिफारस ठरतील. माझ्याबद्दल सांगायचे झाले, तर मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. `Civis Sum'
या वाक्यानंतर त्यांनी `civis sum' (एक नागरिक आहे) हा अभिजात लॅटिन भाषेतला वाक्प्रचार वापरला होता.
` मी सर्वार्थाने सर्व नागरी हक्क आणि अधिकार असलेला एक नागरिक आहे.’ असे या वाक्प्रचारातून स्पष्ट होते.
`मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. मी `नागरिक’ आहे,’’ या वाक्यात गोम्स यांनी ब्रिटिश भारतात आणि पोर्तुगीज भारतात लोकांना दिल्या जाणाऱ्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे आणि आपल्या भारतीय देशबांधवांपेक्षा आपण अधिक आनंदी आहोत असे म्हटले आहे.
हे स्पष्ट करताना ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी पोर्तुगाल आणि इंग्लंडने जगभरातील आपल्या वसाहतींतील लोंकाना दिलेल्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे.
``कारण पोर्तुगालने गोव्यातील आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना आपल्या राष्ट्राचे नागरिक मानले होते आणि त्या सर्वांना समान अधिकार दिले होते. परंतु फ्रान्सिको लुईस गोम्स यांचे जे भारतीय देशबांधव इंग्रजांच्या राजवटीखाली होते ते त्यांच्यासारखे पोर्तुगीजांच्या राजवटीतील ‘नागरिक’ नव्हते, तर त्यांना नेहेमीच केवळ दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती, ” असे ओलिव्हियानो गोम्स यांनी लिहिले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे हे पत्र त्याकाळात खूप गाजले होते. फ्रान्समध्ये हे पत्र वाचल्यानंतर लामार्तिन आनंदाने बेहोश झाला होता असे म्हणतात. खूप सुंदर, खूप सुंदर.पत्र. हे पत्र लिहिणारा नक्कीच खूप प्रतिभासंपन्न आहे. मला या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. ‘’
लामार्तिन यांची इच्छा लवकरच पूर्ण झाली.
युरोपमध्ये डॉ गोम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे जोरदार स्वागत झाले. पॅरिस येथील दौऱ्यात ते लामार्तिन यांना १८६६ साली भेटले तर याच वर्षी इंग्लंडमध्ये लंडन येथे जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्यांचे स्वागत केले.
गोम्स यांनी १८६६ साली Os Brâmanes किंवा द ब्राह्मण ही कादंबरी पोर्तुगीज भाषेत लिहिली. भारतातील जातिव्यवस्थेवर या कादंबरीत लिहिण्यात आले आहे.
लक्ष्मणराव सरदेसाई यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीं अध्यक्ष असताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा अनुवाद १९७३ साली पहिल्यांदा प्रकाशित केला होता.
विशेष म्हणजे आपल्या या कादंबरीसाठी गोम्स यांनी गोव्याऐवजी उत्तर भारतातील फैजाबाद जिल्ह्यातील एक खेडे निवडले आहे.
गोम्स यांच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीत वाढलेला ता तरुण मनाने भारतीयच राहिला, आपल्या भारतीयत्वाचा विसर त्यांना कधीही पडला नाही असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
पोर्तुगीज संसदेतील गोव्याचे प्रतिनिधी या नात्याने फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी गोव्याच्या हिताची अनेक कामे करवून घेतली, गोव्यासाठी अनेक सवलती मिळवल्या, करांचे ओझे कमी केले, त्याशिवाय गोव्यातील सरकारी नोकरांचा दर्जा पोर्तुगालमधील सरकारी नोकरांच्या बरोबरीचा करून घेतला.
गोव्यातील ख्रिस्ती लोकांना अंत्यसंकारासाठी आणि कबरस्थानात मृतदेह पुरण्यासाठी सरकारला मोठ्या रकमेचा कर भरावा लागत असे, त्यामुळे गरीब लोकांना खूप त्रास होत असे. संसदेतील आपल्या भाषणांत गोम्स यांनी या जाचक करांवर सडकून टीका होती.
आपल्या भाषणात उपहासात्मक शैलीत गोम्स यांनी म्हटले होते:
``सरकारी कर गोळा करणाऱ्या लोकांचा हात इतका लांब की तो मृत माणसाच्या थडग्यापलीकडेही शिरतो आणि मृतांकडून त्याचा ‘मांसाचा हिस्सा’ खेचून घेतो. गोव्यात मेलेल्या लोकांनासुद्धा कर द्यावा लागतो ! अंत्यसंकारासाठी कर असलेली ही १५० रईसांची रक्कम त्या मृत व्यक्तींच्या शाश्वत निद्रेत आणि एकांतात व्यत्यय आणते. ‘’
पोर्तुगालच्या संसदेत बोलताना फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मतदानाचा हक्क केवळ पोर्तुगीज वाचु आणि लिहू शकणाऱ्या आणि सरकारला कर देणाऱ्या लोकांपुरता ठेवणाऱ्या कायदेशीर तरतुदींवर टीका केली
``मी स्वतः जरी जवळजवळ एक लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करत असलो तरी त्यापैकी प्रत्यक्षात फक्त दोन हजार लोक मला मतदान करु शकले आहेत. याचे कारण कि या नागरिकांपैकी खूप कमी लोक पोर्तुगीज वाचू आणि लिहू शकतात किंवा सरकारला कर देत असतात. पोर्तुगीज भाषा येणे आणि सरकारला कर देणे या दोन गोष्टी मतदानासाठी अटी असल्याने हे नागरिक मतदानासाठी पात्र नसतात.''
पोर्तुगालच्या सर्व वसाहतींतील लोकांसाठी असलेला या अटी अर्थातच अन्यायकारक होत्या. उदाहरणार्थ, गोव्यात राहणाऱ्या लोकांना हिंदू लोकांपैकी अनेकांना कोकणी आणि मराठी भाषा लिहिता आणि वाचता येत असे, मात्र त्यांना पोर्तुगीज भाषेचे ज्ञान नसे. पोर्तुगीज भाषा प्रामुख्याने गोव्यातल्या ख्रिस्ती लोकांना येत असे, स्थानिक समाजातील उच्च वर्णातील म्हणजे शेणवी, सारस्वत वगैरे जातींची पार्श्वभूमी असलेल्या ख्रिस्ती लोकांनी पोर्तुगाल भाषेला स्वीकारले होते. त्यामुळेच पोर्तुगालची राजधानी लिस्बनकडे यापैकी अनेकांचा ओढा असे.
ऍबे फरीया यासारखी काही उदाहरणे यासंदर्भात देता येईल. त्यामुळेच या वसाहतीकाळात पोर्तुगीज इंडियातून पोर्तुगाल संसदेसाठी मतदान करणारे बहुसंख्य नागरिक कॅथोलिक असत आणि खासदार म्हणून निवडून येणारेसुद्धा कॅथोलिकच असत.
अर्थात पोर्तुगालच्या जुन्या आणि नव्या मुलखांत या देशाची सत्ता बळकट झाल्यानंतर ख्रिस्ती लोकांबरोबरच हिंदू लोकांनीही पोर्तुगीज भाषेला जवळ केले होते, शिक्षण, व्यवसाय वगैरे मूलभूत गोष्टींसाठी राज्यकर्त्यांची भाषा शिकणे गरजचे होते.
अर्थात तरीही पोर्तुगाल इंडिया १९६१ साली भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत एकाही हिंदू गोवन नागरिकांची पोर्तुगालच्या संसदेवर निवड झाली नव्हती.
पोर्तुगालच्या एकतंत्री राजवटीचा अनेक वर्षे पंतप्रधान असलेल्या मार्केज द पोम्बाल याचे चरित्र गोम्स यांनी लिहिले, मार्केज द पोम्बालच्या या ले मार्कीस द पोंबाल : एस्कीस द सा वि पब्लिक ( Le Marquis de Pombal : Esquisse de sa vie publique ) चरित्रात गोम्स यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील समग्र राजकीय इतिहास उभा केला त्यामुळे युरोपात त्यांना इतिहासकार म्हणून मान्यता मिळाली.
पोम्बालने गोव्याच्या बाबतीत केलेली अनेक स्मरणीय कामे गोम्स यांनी “मार्कीस दे पोंबाल : त्याच्या सार्वजनिक जीवनाची रूपरेषा’’ या चरित्रात विस्ताराने सांगितली आहेत. पोर्तुगालच्या नागरीकांना मिळणारे हक्क आणि सवलती गोव्यातील लोकांनाही देण्याचा प्रयत्न पोम्बाल याने केला होता, त्याची कारकीर्द गोव्यासाठी हितकारक ठरली असे गोम्स यांनी या चरित्रात मांडले आहे.
गोम्स यांनी लिहिलेल्या एका अर्थशास्त्रातील ग्रंथाने त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. एस्से सुर ला थेओरी द ल'एकोनोमी पॉलिटिक ( Essai sur la théorie de L 'Economie Politiquen) हा तो ग्रंथ. गोम्स यांनी हे दोन्ही ग्रंथ फ्रेंच भाषेत लिहिले होते.
डॉ. गोम्स यांच्या गौरवार्थ मुंबईतील रॉयल आशियाटीक सोसायटीने त्यांची सदस्य म्हणुन निवड केली होती.
युरोपातील रोमँटिसिझम काळात ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यावेळी त्यांच्यावर व्हिक्टर ह्युगो आणि लामार्तिन यांचा प्रभाव होता. या कादंबरीच्या तात्त्विक बाजूचे श्रेय व्हिक्टर ह्युगो यांच्याकडे तर भावनात्मक बाजूचे श्रेय लामार्तिन यांच्याकडे जाते असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दुदैवाने गोव्याच्या या महान सुपुत्राला फार कमी आयुष्य लाभले.
त्याकाळात बरा न होणाऱ्या क्षयासारख्या रोगाची लागण झाल्यामुळे आपले उर्वरित आयुष्य गोव्यात घालवण्याच्या इराद्याने त्यांनी पोर्तुगाल सोडले, मात्र बोटीवर प्रवासात असतानाच त्यांचे ३० सप्टेंबर १८६९ रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे चाळीस वर्षे होते.
गोम्स यांच्या पार्थिव देहाला मग जलसमाधी देण्यात आली. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची आपल्या जन्मभूमीत परतण्याची इच्छा अपुरीच राहिली.
आपल्या मायदेशात शेवटचा श्वास घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या गोम्स यांना घेऊन येणारी ती बोट गुजरातमधील पोरबंदर या बंदरात 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोहोचली.
तेव्हा या बोटीतल्या प्रवाश्यांमध्ये फ्रान्सिस्को लुईस गोम्स नव्हते.
योगायोग म्हणजे गोम्स यांच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी यशस्वीरीत्या लढणाऱ्या एका नेत्याचा याच दिवशी पोरबंदर येथे जन्म झाला होता.
मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे नाव.
आपल्या भारत देशाची गुलामी संपून पूर्ण स्वातंत्र्य लाभावे अशी खुली मागणी पहिल्यांदाच करणाऱ्या फ्रान्सिस्को लुईस गोम्स या राष्ट्रवादी नेत्याची ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी अपार कष्ट घेतले.
Camil Parkhe, August 23, 2025



Monday, August 18, 2025

 

Chandu Borde

परवा एका कार्यक्रमानिमित्त अचानक क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्याशी संवाद घडला.

'शब्दसेवा' या नव्या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनासाठी ते व्यासपीठावर असणार होते.
मासिकाचे प्रकाशक व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांनी मलाही तिथे बोलण्यास सांगितले होते.
क्वार्टर गेटपाशी असलेल्या वायएमसीए सभागृहात कार्यक्रम होता. पत्रकार आणि शतायुषी ज्ञानोदय मासिकाचे माजी संपादक अशोक आंग्रे या नव्या मासिकाचे संपादक आहेत. डॉ. अमित त्रिभुवन सूत्रसंचालक होते.
या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या बारामतीच्या आणि वैद्यकीय सेवेची दीर्घ परंपरा असलेल्या कोल्हटकर कुटुंबाचे बारामतीच्या पवार कुटुंबाशी तीन पिढ्यांचे खूप जवळचे नाते.
या संबंधामुळेच डॉ संजीव कोल्हटकर यांच्या आग्रहामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा ऑगस्ट या भरगच्च कार्यक्रमांच्या दिवशीसुद्धा या कार्यक्रमास येण्याचे तात्काळ मान्य केले होते.
डॉ. दादासाहेब कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना अचानक पुण्याऐवजी बीड येथे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यास जावे लागल्याने ते या कार्यक्रमास येऊ शकणार नव्हते.
हा बदल अचानक झाला होता.
कार्यक्रमाआधी आम्ही चहापानासाठी एका टेबलापाशी जमलो असताना अचानक आयोजकांनी ही बातमी चंदू बोर्डे यांना कळवली
आणि आता `तुम्हीच मुख्य पाहुणे म्हणून बॅट हातात घ्यावी' अशी जरा भीतभीतच विनंती केली.
मी त्यांच्या समोरच बसलो होतो, त्यांच्या चेहेऱ्यावरची प्रतिक्रिया न्याहाळत होतो.
पाचसहा वाक्यांच्या प्रस्तावनेनंतर चंदू बोर्डे यांनी `हा राखीव खेळाडू आता मैदानावर जाईल' अशी संमती दिली आणि आयोजकांचा जीव भांड्यात पडला.
चंदू बोर्डे यांच्या अनेक कार्यक्रमाला बातमीदार म्हणून मी हजेरी लावली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याशी संभाषण करण्याची माझी ही पहिलीच वेळ.
आमच्याबरोबर असलेले एक गृहस्थ चंदू बोर्डे यांच्याशी क्रिकेटबाबत बोलत होते.
सत्तरच्या दशकातील आघाडीच्या क्रिकेटपटूंची नावे आणि त्यांच्या खेळण्याच्या तऱ्हा आणि विशिष्ट लकबी याविषयी बोलणे चालू होते.
इतर खेळाडूंबरोबर एकनाथ सोलकर यांचाही विषय निघाला होता .
त्या सर्वच क्रिकेटपटूंची नावे मला माहित होती तरी विषय तिथेच समाप्त होत होता.
क्रिकेटक्षेत्रात एके काळी ` चंदया' आणि `पँथर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतःविषयीसुद्धा ते बोलले.
चंदू बोर्डे यांनी अलीकडेच जुलै २१ला वयाची नव्वदी पार केली आहे, हे लक्षात ठेवून मी हे सर्व ऐकत होते. इतर अनेक गोष्टी मनात टिपून घेत होतो.
चंदू बोर्डे हे पुण्यातल्या रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्चचे सभासद.
पद्मश्री आणि पद्मभूषण किताबाचे मानकरी. राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले पुण्याचे एक भूषण.
आपल्या भाषणात चंदू बोर्डे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
या कार्यक्रमानंतर लवकरच त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला हवा असे त्याच क्षणी ठरवले.

Camil Parkhe August 17, 2025


Tuesday, August 12, 2025

 

अँजेला त्रिंदाद  यांची भारतीय शैलीतील ख्रिस्ती चित्रे

 इतर कुठल्याही धर्मग्रंथांप्रमाणे बायबलमध्येसुद्धा स्त्रियांना गौण किंवा नगण्य स्थान आहे. संपूर्ण बायबलमध्ये म्हणजे जुन्या आणि नव्या करारांत स्त्रियांची पात्रे क्वचितच आढळतातअनेकदा या पात्रांना स्वतःचा चेहेरा, नावगाव म्हणजे ओळखसुद्धा नसते. अमुक याची आई, तमुकची पत्नी, एलीया या संदेष्ट्याला ऐन दुष्काळात तेल आणि पीठ पुरवणाऱ्या स्त्रीची ओळखसुद्धा शेवटपर्यंत `एक गरीब विधवा' अशीच राहते.

जुन्या करारात पहिला मानव असलेल्या आदामची सहचारिणी इव्ह, नुकत्याच जन्मलेल्या मोझेसचा जीव क्लुप्तीने वाचवणारी त्याची आई आणि बहिण,  रुथ, राणी इस्थेर अशा काही मोजक्याच  स्त्रियांना थोडेफार स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. 

नव्या करारात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतरच्या भागातसुद्धा काही मोजक्याच स्त्रियांची पात्रे येतात.  येशूची आई  मारीया, सेंट जॉन बॅप्टिस्टची आई एलिझाबेथ. मेरी माग्दालेन आणि कुकर्म करत असताना पकडलेली आणि त्यामुळे मॉब लिंचिंगची बळी होऊ शकणारी एक स्त्री येशूमुळे वाचते.

त्याचे कारण म्हणजे `तुमच्यापैकी जो कुणी निष्पाप  असेल  त्याने हिच्यावर पहिला धोंडा  उचलावा' असा येशूचा त्या झुंडशाहीला सल्ला असतो.

बायबलमधल्या जुन्या करारातील सर्व नायक, राजे आणि संदेष्टये पुरुषमंडळी आहेत.  नव्या करारात  येशूच्या बारा शिष्यांमध्ये एकही स्त्री नाही. त्याचप्रमाणे नव्या ख्रिस्ती मंडळींना पत्रे लिहून  ख्रिस्ती  धर्मतत्त्वांची मांडणी करणाऱ्या सेंट पॉल, सेंट पिटर, सेंट जॉन  वगैरे व्यक्तींमध्येही एकाही महिलेला जागा नाही.   

`बायबलमधील स्त्रिया' या एकाच शिर्षकाची मराठीत अलीकडेच दोन नवी पुस्तके आली आहेत. एक आहे सरोजिनी नीलकंठ साळवी यांनी लिहिलेले. (चेतक बुक्स, पुणे ) आणि दुसरे आहे डॉ. अनुपमा निरंजन उजगरे, वर्णमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलेले. बायबलमध्ये किंवा इतर कुठल्याही धर्मग्रंथांत स्त्रियांची पात्रे पुरुषांच्या  तुलनेने खूप कमी आढळतात, मात्र यातून या धर्मग्रंथांचे उणेपण दिसून येत नाही,. याचे कारण म्हणजे  संपूर्ण जगात त्यात्या काळी आणि आजही सर्वच क्षेत्रांत असलेले पुरुषी वर्चस्व.   

इतर विविध क्षेत्रांप्रमाणेच भारतात आणि जगातही फार कमी संख्येने महिलांनी चित्रकलेत नाव कमावले आहे. भारतातल्या  पहिल्या काही महिला चित्रकारांमध्ये  मूळ गोव्याच्या असलेल्या अँजेला त्रिंदाद (१९०९-१९८०)  यांचा समावेश होतो.

साधना बहुलकर  यांनी लिहिलेल्या `बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार (१८५७-१९५०)'  या पुस्तकाचे (राजहंस प्रकाशन, २०२१) मुखपृष्ठ वैष्टिट्यपूर्ण  आहे. आहे. या मुखपृष्ठावर एकूण चार चित्रे आहेत आणि त्यापैकी एक चित्र अर्धे पानभर आहे. अँजेला त्रिंदाद यांनी काढलेल्या या चित्रात झाडाखाली बसलेले भगव्या वस्त्रांतले एक गुरु शेजारी एक मडके घेऊन उभ्या असलेल्या स्त्रियेला काही सांगत आहेत आणि या गुरूच्या चरणाशी बसलेली आणखी एक स्त्री आहे.

विशेष म्हणजे हे चित्र भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करून काढलेले आहे. दोन्ही स्त्रिया घागरा वगैरे भारतीय पारंपरिक वेशात आहे, भारतीय  स्त्रियांप्रमाणे त्यांनी  हातांत, गळ्यांत आणि कानांत  विविध आभूषणे \घातली आहेत, डोक्यावरून पदर घेतलेला आहे. त्याशिवाय  चित्रात झाडाखाली एक तुळशी वृंदावनसुद्धा आहे. खास भारतीय शैलीत  काढलेले हे चित्र पाहून त्यामागचा संदर्भ बहुतेक बिगरख्रिस्ती लोकांना चटकन समजणार नाही. या चित्रातील दोन महिला आणि ते गुरु  कोण आहेत, त्यांच्यात काय संभाषण चालू आहे याचे स्पष्टीकरण दिल्याशिवाय समजणार नाही. 

मात्र या चित्राचा संदर्भ बायबल अगदी थोडेफार माहित असलेल्या  व्यक्तीला अगदी सहज देता येईल. .या दोघी बहिणी आहेत मारिया आणि मार्था. दोन प्रसंगांत या दोन बहिणींचा येशूच्या चरित्रात  म्हणजे शुभवर्तमानांत – गॉस्पेलमध्ये - होतो.

वरील चितारलेल्या प्रसंगाचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोकृत `सुबोध बायबल'मध्ये खालील शब्दांत वर्णन आहे :

``प्रवास करीत असता येशू बेथानीला आला, तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले, तिला मारीया नावाची बहीण होती. ती प्रभूच्या चरणी बसून त्याची अमृतवाणी ऐकत होती. स्वयंपाकघरात मार्थाला पाहुणचाराचे पुष्कळ काम पडल्यामुळे  तिची तारांबळ उडाली. ती येशूकडे येऊन त्याला म्हणाली "प्रभुजी, माझ्या बहिणीने कामाचा सगळा भार माझ्या एकटीवर टाकला आहे. ह्याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? मला मदत करायला तिला सांगा ना:" 

प्रभुने  तिला उत्तर दिले, ' मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी  काळजी दगदग करतेस,  परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मारीयेने जे चांगले आहे, त्याची निवड केली आहे. ते तिच्यापासून हिरावून घेतले जाणार नाही.''

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील कलेचे शिक्षण पूर्णतः पाश्चिमात्य धाटणीचे होती, अशाप्रकारे भारतीय कलेचे एक नवे पर्व सुरु झाले. ब्रिटिशकाळात बंगाल स्कुल ऑफ आर्ट आणि मुंबई स्कुल ऑफ आर्ट या दोन कलाशाखा उगमास आल्या, त्यापैकी अँजेला  त्रिंदाद या मुंबई स्कुल ऑफ आर्ट  परंपरेतील.

मुंबई विद्यापीठाची स्थापना  १८ जुलै १८५७  रोजी  झाली होती.  त्याच्याआधी काही महिने म्हणजे मार्च १८५७ रोजी मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली होती. जमशेटजी जीजीभाई  यांनी या संस्थेच्या उभारणीसाठी  एक लाख रुपयाची देणगी सरकारला दिली त्यामुळे त्यांचेच नाव या कला शाळेला देण्यात आले. सध्याची जेजे स्कूल ऑफ आर्ट ची  वास्तू  १८७८ साली उभारण्यात आली आणि त्यासाठी जमशेटजी जीजीभाई   यांचे  चिरंजीव रुस्तुमजी यांनी दिड लाख रुपयांची देणगी दिली होती

अँजेला त्रिंदाद  आणि  अंबिका धुरंधर (१९०९- २००९)   या महाराष्ट्रातील आद्य महिला चित्रकार आहेतबॉम्बे स्कूल कला परंपरेतील आद्य महिला चित्रकार  असलेल्या  या दोघींनीही जे.जे.  स्कूल ऑफ मध्ये शिक्षण घेतले आणि या दोघांचेही वडील त्या काळातले ख्यातनाम चित्रकार होतेमुंबईत जन्मलेल्या अँजेला त्रिंदाद यांचे एक  प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारतीय परंपरेतील म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करुन  ख्रिस्ती धर्मसंकल्पनांतील अनेक चित्रे  रेखाटली. वर नमूद केलेले हे चित्र यापैकी एक आहे.

अँजेला त्रिंदाद यांचे वडील अंतोनिओ शेव्हियर त्रिंदाद हेसुद्धा त्याकाळातले  प्रख्यात चित्रकार होते. अँजेला  यांच्या आईचे नाव फ्लोरेंटिना  होते. सात भावंडे असलेल्या अँजेला यांचे बालपण मुंबईत माहिम येथे  गेले. त्यांचे वडील अंतोनिओ त्रिंदाद हे जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये २८ वर्षे कला शिक्षक होते. एम. व्ही.  धुरंधर हे अंबिका धुरंधर यांचे वडील अंतोनिओ यांचे सहकारी होते.  

आपल्या वडलांकडून अँजेला यांनी कलेचे धडे गिरवले आणि नंतर जे. जे ,स्कुल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जेजेमध्ये १९२६ ते १९३२ या काळात अँजेला विद्यार्थी असताना त्यांचे वडील तिथे शिक्षक होते.  याच काळात जेजे स्कुलमध्ये शिक्षक असणारे जे. एम.  अहिवासी  आणि प्राचार्य डब्ल्यु  इ. ग्लॅडस्टोन  सालोमन यांच्या त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला आणि  या दोघांमुळे अँजेला त्रिंदाद भारतीय  पुनरुज्जीवनवादी कलेच्या  किंवा  इंडियन रिव्हायव्हलिस्ट  मुव्हमेन्टच्या एक प्रमुख चित्रकार बनल्या.  ग्लॅडस्टोन सालोमन यांनी भारतीय कलेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास वर्ग सुरु केले आणि त्यांच्या या वर्गात सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांत अँजेला यांचा समावेश होता 

 ख्रिश्चन आणि बायबलमधील संकल्पनावरील आधारीत चित्रांमधील रुढ वसाहतवादी प्रभाव दूर करुन खास भारतीय प्रतिमा आणि शैली वापरुन भारतीय  ख्रिस्ती कला हा प्रवाह समृद्ध करण्याचे योगदान अँजेला त्रिंदाद  यांनी केले आहे.   या भारतीय पुनरुज्जीवन प्रवाहाचा एक भाग म्हणून अँजेला यांच्या चित्रांत पात्रांना  भारतीय पेहेराव,   तुळशी वृंदावन, हाताची मुद्रा, कमळ,  छात्र, वगैरे प्रतीके झळकतात.  मॅडोना अँड चाईल्ड म्हणजे बाळ येशूसह मदर मेरी या विषयावर अँजेला त्रिंदाद यांनी अनेक चित्रे रेखाटली आहेत.

मात्र भारतीय शैलीत ख्रिस्ती संकल्पनांवर चित्रे काढणाऱ्या अँजेला या पहिल्याच किंवा एकमेव चित्रकार नाहीत. अगदी मुघल सम्राट अकबर यांच्या काळापासून भारतीय शैलीत ख्रिस्ती चित्रे काढण्याची परंपरा आढळते.  अँजेला यांचेच समकालीन असणारे अँजेलो दा फोन्सेका (१९०२-१९६७)  यांनीही भारतीय प्रतिमांचा वापर करत ख्रिस्ती धर्मावर आधारित चित्रे रेखाटली आहेत. फोन्सेका यांचा जन्म गोव्यातलाच. फोन्सेका यांनीसुद्धा जे. जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला, मात्र नंतर ते कोलकात्याला गेल्यानंतर बंगाल स्कुल आर्ट परंपरेचा  त्यांच्यावर  प्रभाव पडला. अँजेलो द फोन्सेका  हे  बंगाल आणि  बॉंबे  या दोन्ही  कला  परंपरेतील समतोल साधणारे अखिल भारतीय चित्रकार आहेत असे कला समीक्षक विवेक मिनेझेस यांनी म्हटले आहे.

आर्ट इंडिया, पुणे या जेसुईट फादरांच्या संस्थेने यांची अनेक ख्रिस्ती धार्मिक चित्रे ग्रिटींग कार्ड्स, पोस्टर्स साठी छापली होती. अँजेला त्रिंदाद  यांची चित्रे अनेक प्रकाशनसंस्थांनी आपल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी वापरली होती. अँजेला त्रिंदाद यांनी चितारलेल्या महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांची व्यक्तित्रांचा समावेश होतो.  

ख्रिस्ती धर्मसंकल्पना आपल्या चित्रांत भारतीय प्रतिमांसह म्हणजे पूर्णतः भारतीय शैलीत आणणाऱ्या चित्रकार अँजेला त्रिंदाद यांचे फार मोठे योगदान आहे. 

पोर्तुगीज सरकारतर्फे ` हॉल ऑफ जस्टीस'  शिर्षकाचे  गोव्यातील संत फ्रान्सिस झेव्हियरच्या कार्याबाबत चित्र बनवण्यासाठी  अँजेला त्रिंदाद  यांना आमंत्रित करण्यास  आले होते. गोवा त्याकाळात  पोर्तुगालचाच भाग होता. अँजेलाच्या ख्रिस्ती संकल्पनाविषयीच्या चित्रांसाठी रोममध्ये पोप बारावे पायस यांच्या हस्ते अँजेला यांचा  १९५५ साली सत्कार करण्यात आला. त्यावेळी पोपकडून त्यांना `प्रो एक्लेशिया एत पॉंतिफिस'   (चर्च आणि पोप यांच्यासाठी) हे पेपल डेकोरेशन किंवा 'किताब प्रदान करण्यात आला.  


भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीतील अँजेला यांच्या चित्रांनी निश्चितच एक वेगळी उंची गाठली आहे असे साधना बहुलकर यांनी म्हटले आहे. .``बायबलमधील किंवा  ख्रिस्तजीवनाच्या अन्य प्रसंगांवरील पुनरुज्जीवनवादी शैलीतील चित्रे हे अँजेला यांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य'' असे त्या म्हणतात.   

अँजेला यांची एक विवाहित  बहीण  एस्थेर अमेरिकेत स्थायिक झाली होती. ख्रिस्ती धार्मिक कला या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या अँजेला यांनी युरोप आणि अमेरिकेला अनेकदा भेटी देऊन तिथे आपल्या चित्रांचे प्रदर्शने भारावली, व्याख्याने दिली.  न्यूयॉर्क येथील आपल्या बहिणीकडे कायमचे राहण्यासाठी  त्या  अमेरिकेत  १९६८ साली आल्या आणि शेवटी १९७८  साली आपल्या बहिणीसह राहण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते.    

समकालीन स्त्री चित्रकारांच्या तुलनेत अँजेला यांच्या चित्र काढण्यात सातत्य होते आणि त्यांच्या चित्रनिर्मितीचा परीघ विस्तृत होता. ''त्या  बॉंबे स्कूल परंपरेच्या मुशीत घडलेल्या, तडफदार व्यक्तिमत्वाच्या, विविध शैलींत दर्जेदार काम करणाऱ्या हुन्नरी स्त्री-चित्रकार होत्या,'' असे  अँजेलाच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन बहुलकर करतात. 

अँजेला यांचे आपले वडील अंतोनिओ त्यांच्यावर खूप प्रेम होते. आपल्या वडलांच्या अखेरच्या आजारात त्यांनी त्यांची शुश्रूषा केली होती. आपल्या वडलांच्या चित्रांचे भारतात किंवा अमेरिकेत जतन व्हावे यासाठी अँजेला नि अमेरिकेतील बहीण यांनी अतोनात प्रयत्न केले, त्यासाठी खूप खर्चही केला,. ब्राझील येथे आपली दुसरी बहीण  अंतोनिते  हिच्याकडे अँजेला १९७९च्या नोव्हेंबरात  गेल्या तेव्हा तिथे त्या आजारी पडल्या आणि तिथेच त्यांचे   २० मार्च १९८० रोजी निधन झाले. त्यानंतर  त्यांची बहीण एस्थेर यांचे १९९५ ला निधन झाले.  आपल्या पित्याच्या चित्रांचे जतन करण्यासाठी संग्रहालय व्हावे ही या दोन बहिणींची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही.

अखेरीस अंतोनिओ आणि अँजेला यांच्या काही चित्रांचे संवर्धन अखेरीस त्यांच्या मूळच्या प्रदेशात म्हणजे गोव्यातच  झाले.  पणजीमध्ये  फॉंटइनेस येथे  फुन्दाकाओ ओरिइंते म्युझियम  या पोर्तुगाल संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या गॅलरीत या चित्रकार पितापुत्रींच्या कलाकृती  जपून ठेवण्यात आल्या आहेत. अँजेला यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या बहिणीने स्थापन केलेल्या ए. एक्स. त्रिंदाद  फौंडेशनने पितापुत्रीच्या चित्र कलाकृती संवर्धनासाठी फुन्दाकाओ ओरिइंते म्युझियमकडे  स्वाधीन केल्या होत्या. हे दालन  २०१२ साली कलारसिकांसाठी खुले झाले.  त्यामुळे या महान चित्रकार असलेल्या  बापलेकींच्या काही  मूळ कलाकृती पुढच्या  पिढींना  पाहण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.    


Camil  Parkhe 

  %%%%