महाराष्ट्रातील ख्रिस्ती मतदारांचा कौल कुणाला?
पडघम - राज्यकारण कामिल पारखे
- प्रातिनिधिक छायाचित्र
- Mon , 22 April 2019
- पडघमराज्यकारणख्रिस्ती समाजChristian SocietyगोवाGoaवसईVasaiअहमदनगरAhmednagar
महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ख्रिस्ती समाजाचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे! लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील ख्रिस्ती समाजाची सर्वाधिक संख्या आहे ती कॉस्मोपॉलिटन मुंबई आणि या महानगराच्या उपनगरांत. याचे कारण म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीचा वारसा असलेला मूळचा गोवन आणि त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील वसईचा कॅथॉलिक समाज इथे मोठ्या संख्येने स्थायिक आहे. तसेच दक्षिणेतील कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथीय केरळी, तामिळ, तेलुगू, बंगाली, कारवारी, मँगलोरीयन ख्रिस्ती समाज आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व इतर प्रदेशातील लोक मुंबई आणि नजीकच्या परिसरात असल्याने तेथील अनेक विधानसभा-लोकसभा मतदारसंघांत ख्रिस्ती समाजाची मते निर्णायक नसली तरी महत्त्वाची ठरू शकतात.
मुंबईखालोखाल ख्रिस्ती समाजाचे सर्वाधिक प्रमाण वसई तालुक्यात आहे. वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांच्या ताब्यातील आणि चिमाजीअप्पांनी चढाई केलेला वसईचा किल्ला अजूनही एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. वसईच्या या पोर्तुगीजांनीच मुंबई बेट इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून दिले आणि हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेचा शिरकाव झाला, हा इतिहास आहे. वसई तालुक्यात सर्वच खेड्यापाड्यांत कॅथॉलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे फिरताना चौकाचौकांतील क्रूस आणि मदर मेरीचे पुतळे पाहून नवागताला गोव्यात आल्याचा आभास होतो.
यामुळेच व्हॅटिकनने या तालुक्यासाठी १९९८ साली खास नवा धर्मप्रांत स्थापून तेथे थॉमस डाबरे या भूमिपुत्राची बिशप म्हणून नेमणूक केली होती. भौगोलिकदृष्ट्या भारतातील हा एक अगदी छोटा धर्मप्रांत! येथील ख्रिस्ती लोकांची स्वत:ची वेगळी बोलीभाषा आहे, आगळीवेगळी संस्कृती आहे. दोन दशकांपूर्वी अल्पसंख्याकांचा प्रतिनिधी महाराष्ट्र मंत्रिमंडळात हमखास असे. त्या काळी वसईतून किंवा मुंबईतून निवड झालेल्या ख्रिस्ती आमदाराची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निवड होत असे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
मुंबई आणि वसाईखालोखाल पुणे जिल्ह्यात आणि त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाची संख्या लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज मुंबईप्रमाणेच स्थलांतरित कुटुंबांचा आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून कामधंद्यानिमित्त मोठ्या संख्येने पुणे आणि पिंपरी चिचंवड या उद्योगनगरीत स्थलांतरित झाले आहेत. याशिवाय या ख्रिस्ती समाजात गोवन, मूळचा गोवन असलेला सीमाभागेतील बार्देसकर समाज, मल्याळी, तामिळ वगैरे लोकांची संख्या लक्षणीय आहे. अहमदनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतल्या काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीत या समाजाचे मतदान निर्णायक ठरू शकते अशी परिस्थिती आहे.
अहमदनगर शहर आणि जिल्हा हे महाराष्ट्रीयन ख्रिस्ती जनतेचे ‘जेरुसलेम’ मानले जाते, इतके या परिसराचे या समाजाशी ऋणानुबंध आहेत. याचे कारण दोनशे वर्षांपूर्वी येथे प्रथमच मोठ्या प्रमाणात धर्मांतर होऊ लागले आणि धर्मांतराची ही लाट अनेक दशके चालू राहिली. त्याचे लोण नंतर शेजारच्या गोदावरीच्या तीरावरील औरंगाबाद जिल्ह्यात पसरले. त्यामुळेच या दोन जिल्ह्यांत गावोगावी चर्च आढळतात. या चर्चतर्फे मराठी-इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि दवाखाने चालवले जातात.
मराठवाड्याच्या लातूर वगैरे जिल्ह्यातही ख्रिस्ती समाज आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मारियामातेच्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने येतो, तेव्हा मराठी ख्रिस्ती समाजाचे राज्यातील अस्तित्व, जनसंख्येचे प्रमाण आणि संभावित व्होट बँक यांचा थोडाबहुत अंदाज येतो. मतमाऊलीच्या यात्रेच्या वेळी मारियामातेच्या दर्शनाला फुले-हार आणि मेणबत्त्या घेऊन येणारे विविध पक्षांचे स्थानिक राजकीय पुढारी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या आगमनाची वर्दी जमलेल्या गर्दीला करून देता असतात ते यामुळेच.
पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील ख्रिस्ती जनता पूर्वाश्रमीची दलित असली तरी रिपब्लिकन पक्षांशी वा दलित चळवळीशी क्वचितच एकरूप झाली. दलित वर्गांतून ख्रिस्ती झालेली जनता अनेकदा ‘जय भीम’ आणि ‘जय ख्रिस्त’ या संबोधनाच्या पेचात अडकलेली असते. दादासाहेब रूपवतेंच्या काळात पहिल्यांदाच राज्यातील सत्ताधारी पक्षाला अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील एक व्होट बँक म्हणून ख्रिस्ती समाजाची ओळख पटली होती. नंतर मात्र हा समाज विशिष्ट पक्षाच्या दावणीला जुंपला गेला किंवा गृहित धरला गेला. राज्यातील प्रत्येक जातीजमातीला राजकीय नेतृत्व लाभले, तसे या समाजाचे झाले नाही. त्यामुळे कदाचित असे झाले असेल.
महाराष्ट्राच्या सीमेच्या असलेल्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील बेळगाव या जिल्ह्यांत बार्देस्कर समाज या नावाने ओळखला जाणारा एक वेगळाच ख्रिस्ती समाजघटक आहे. घरांत कोकणी भाषा बोलणाऱ्या आणि डिसोझा, फर्नांडिस, गोन्सालवीस अशी पोर्तुगीज धाटणीची आडनावे धारण करणारा हा समाज मूळचा गोव्यातील बार्देस या तालुक्यातील. अठराव्या शतकामध्ये पोर्तुगीज राजवटीत बार्देस तालुक्यातील अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी ब्रिटिश इंडियातील सीमाभागांत स्थलांतर केले आणि तेथेच आपले मूळ धरले. तेथे शेतजमिनी घेतल्या, मासेविक्रीचा व्यवसाय केला. मात्र गेली दोन-तीन शतके या बार्देस्कर मंडळींनी गोव्यातील आपल्या मूळ गावाशी, तेथील जमीनजुमल्याशी आणि कोकणी भाषेशीही फारकत घेतलेली नाही हे विशेष.
त्यांच्या गोवा या मूळ वतनभूमीत मात्र त्यांची संभावना ‘घाटी’, ‘घाटावरचे’ अशीच केली जाते! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तालुक्यांत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, इचलकरंजी तालुक्यांत बार्देस्कर समाजाची संख्या लक्षणीय आहे. या तालुक्यातील जुनी चॅपेल्स आणि चर्च शंभर-दोनशे वर्षांची जुनी आहेत. सीमाभागातील ही बार्देस्कर मंडळी खरे तर समाजशास्त्रज्ञांसाठी आणि कोकणी-मराठी भाषाअभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरू शकतात. या बार्देस्कर मंडळींपैकी अनेकजण आज पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत स्थायिक झाले आहेत.
महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज असा विविध शहरांत आणि जिल्ह्यांत विभागला आहे. एकच धर्म असलेला हा समाज कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स वगैरे पंथांत विभागला आहे. या समाजातील विविध प्रदेशांतील विविध समाजघटकांची संस्कृती, जीवनशैली, आर्थिक राहणीमान, भाषा आणि बोलीभाषाही विभिन्न आहेत. त्याचप्रमाणे मूळ हिंदू धर्मातील अठरापगड जातीजमाती पोटजाती ख्रिस्ती मानल्या जाणाऱ्या लोकांतही असतात. उदाहरणार्थ, सारस्वत, नायर, नंबुद्रीपाद, रेड्डी, महार, मातंग, भंडारी, क्षत्रिय, चर्मकार वगैरे वगैरे. आपल्या महाराष्ट्रात कांबळे, केळकर, टिळक, सोनकांबळे, वाघ, बनसोडे वगैरे ख्रिस्ती आडनावांवरून जाणकारांना त्यांच्या मूळ जातीचा लगेच संदर्भ लागतो, त्याचप्रमाणे गोन्सालवीस, मॅथ्यू, अब्राहाम, थॉमस, फर्नांडिस, नायडू, वर्गिस संगमा, मुंडा या नावावरून त्या ख्रिस्ती व्यक्तीची मूळ प्रादेशिक पार्श्वभूमी चटकन लक्षात येते.
वसईतील ख्रिस्ती समाजाचे लातूरच्या वा अहमदनगरच्या ख्रिस्ती समाजाशी किंवा मालवणच्या बार्देस्कर समाजाशी कुठलेच साम्य नाही. तसेच गोवन ख्रिस्ती लोकांचे तामिळ व मल्याळी ख्रिस्ती लोकांशी रोटीबेटीचे व इतर कसलेही संबंध नसतात. अगदी एकाच शहरात राहणारे हे लोक एकाच चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थनेसाठी एकत्र येत असले तरीसुद्धा! एवढी वैविधता आणि विरोधाभास देशातील इतर कुठल्याही धार्मिक समुदायात आढळणार नाही. हा विरोधाभास असूनसुद्धा इतरांच्या म्हणजे बहुसंख्य समाजाच्या दृष्टिकोनातून हा ख्रिस्ती समाज हा एकगठ्ठा, एकजिनसी एक धार्मिक समूहच असतो. याचे कारण बहुतेकांना ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक स्वरूपाची आणि त्याचप्रमाणे पंथीय भेदांची माहिती नसते. त्यामुळे अनेकदा काही विचित्र प्रसंग आणि गंमतीजमतीही होतात.
तर असा हा महाराष्ट्रातील अठरापगड जातीजमातींचा, विभिन्न भौगोलिक संस्कृतींचा, वेगवेगळ्या बोलीभाषा आणि भाषा बोलणाऱ्या आणि विविध पंथांच्या ख्रिस्ती समाजाला देश वा महाराष्ट्र पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भात व्होट बँक म्हणून एक समुदाय म्हणून संबोधता येईल काय? देशात लोकसंख्येच्या दोनअडीच टक्के प्रमाण असल्याने या समाजाला राजकीय पक्षांना दुर्लक्षित करता येणे शक्य नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना त्यांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००४ साली अल्पमतांच्या फरकाने निवडणूक हरले, तेव्हा त्या मतदारसंघात काही भागात लक्षणीय संख्या असलेल्या ख्रिस्ती मतदारांची नाराजी त्यांना भोवली, असा जाहीर ठपका त्यावेळी ठेवण्यात आला होता
ख्रिस्ती समाजात प्रचंड वैविधता असली तरी त्यांना एकत्र गुंफणारे काही समान धागे आहेत. देशातील बहुसंख्य ख्रिस्ती समाज हा पूर्वाश्रमीच्या मागासवर्गीय आणि ईशान्य राज्यांत आदिवासी समाजांतून आला आहे. त्यांचे सण आणि उपासनापद्धती आणि अगदी आहारसुद्धा (मांसाहार आणि बीफसेवन) सर्वसाधारणपणे समान आहे. देशांत विविध ठिकाणी संघ परिवाराच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यांचे हा समाज लक्ष्य बनलेला आहे. या सगळ्या बाबींचा परिपाक म्हणून एक व्होट बँक म्हणून एका विशिष्ट पक्षाला व विचारधारेला मते देण्याची या समाजाची अगदी जुन्या काळापासूनची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत मात्र गोव्यात आणि अगदी अलीकडेच ईशान्य प्रांतांतील ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या राज्यांतील मतदारांनीही भाजपसारख्या खुलेपणाने हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या पक्षाला मते दिली आहेत! अर्थात तिथल्या निवडणुकांत भाजपने विकासावर भर देऊन हिंदुत्व, घरवापसी, बीफ बॅन वगैरे मुद्दे गुंडाळून ठेवले होते.
गेल्या वर्षी दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांनी आपल्या धर्मप्रातांतील ख्रिस्ती जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेराव यांनीही आपल्या पास्टरल पत्रात देशाची राज्यघटना धोक्यात आहे, असे विधान केले होते. या दोन्ही घटनांनंतर त्यावेळी मोठा गहजब माजला होता. देशातील राजकीय परीस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्याचे काही कारण नाही, असाच त्यावेळी सगळ्यांचा सूर होता. मात्र काही महिन्यानंतर चित्र पालटले आणि आता राजकीय नेत्यांबरोबरच इतरही अनेक जण असाच सूर आळवत आहे हे विशेष! देशातील ख्रिस्ती जनता अल्पसंख्य असली तरी पूर्णतः दुर्लक्षित करण्यासारखी नाही हे यावेळी सिद्ध झाले.
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे एप्रिल २३ ला पुणे, अहमदनगर, शिर्डी, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. येथे ख्रिस्ती मतदारांची संख्या अगदी लक्षणीय आहे. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात एप्रिल २९ रोजी मुंबई आणि पालघर येथे मतदान होणार आहे. तेथे तर राज्यांतील सर्वाधिक ख्रिस्ती मतदार आहेत. महाराष्ट्रातील हे ख्रिस्ती मतदार एका विशिष्ट पक्षाला एकगठ्ठा मतदान करतात का, त्यांची समाज म्हणून इतर जातीजमातींप्रमाणे एक व्होट बँक असते काय, असे प्रश्न विचारात घेण्यासारखे आहेत.
ख्रिस्ती समाजाचा राजकीय चेहरा म्हणून एकाही व्यक्तीला राज्यपातळीवर मान्यता मिळालेली नाही. पालघर जिल्ह्यात वसईत एखाद-दुसऱ्या आमदारकीवर या समाजाला समाधान मानावे लागते आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एखाद्या विशिष्ट समाजाने एखाद्या मतदारसंघात व राज्यपातळीवर कुठल्या उमेदवाराला वा पक्षाला मत दिले हे उघड होतेच. पुढील दोन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील ख्रिस्ती मतदारांची सुप्त स्वरूपातील व्होट बँक कुणाला झुकते माप देते, हे २३ मेच्या निकालानंतर कळेलच.
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
No comments:
Post a Comment