Showing posts with label Aurangabad. Show all posts
Showing posts with label Aurangabad. Show all posts

Tuesday, January 9, 2024


                                                                नरेंद्र चपळगावकर

औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला १९८८ साली मी नव्यानेच रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीतल्या 'नवहिंद टाइम्स' ला आठ वर्षे असताना तेथे मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. साहजिकच औरंगाबादला लोकमत टाईम्स येथेसुद्धा या बिट्सपैकी कोर्ट ही जबाबदारी माझ्याकडे आली.

बॉंबे हायकोर्टाचे एक खंडपीठ पणजी येथे होते, मांडवीच्या तिरावरच्या या हायकोर्टात मी दररोज दुपारी साडेचारला जायचो, तिथल्या रजिस्ट्रारला भेटून मुख्य बातम्या समजावून घ्यायचो आणि नंतर त्या बातम्या मिळवायला लागायचो. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश असताना त्यावेळीं तिथे काफेफोसा ॲक्ट् म्हणजे तस्करीच्या आणि हेबियस कॉर्पसच्या (बेकायदेशीर अडकवून ठेवणे) खूप केसेस असायच्या.
इथे औरंगाबादलासुद्धा हायकोर्टाचे खंडपीठ होते. पणजीला एकावेळी फक्त दोन न्यायमूर्ती असायचे . त्यापैकी एक पणजीला मुंबईचे हायकोर्ट जज्ज 'व्हिजिटिंग जज्ज' म्हणून यायचे ते अक्षरशः ' व्हेकेशन जज्ज' म्हणूनच. एका जिल्ह्यासारख्या लहान असणाऱ्या गोव्याच्या परिसरात हायकोर्टाची किती प्रकरणे आणि सुनावण्या असणार ? दुपारी अडीच तीनच्या सुमारास पुढील लिस्टेड, नोंदणी झालेले सुनावणी नाही म्हणून कोर्टाचे त्या दिवसाचे कामकाज तहकूब व्हायचे..!
औरंगाबाद खंडपीठाच्या हद्दीत मात्र मराठवाड्याचे नऊ जिल्हे आणि शेजारचा अहमदनगर जिल्हा आहे, त्यामुळे तिथे न्यायमूर्ती अधिक असायचे आणि भरपूर प्रकरणेही असायची. भरपूर कोर्टप्रकरणे म्हणजे भरपूर बातम्या... पण बातमीदाराच्या छोटयाशा झोळीत किती आणि कोणत्या बातम्या घेणार ?
मात्र माझ्यासमोरचा हा प्रश्न अपेक्षेपेक्षा लवकर आणि खूपच समाधानकारकरित्या सुटला.
त्यावेळी त्या खंडपीठात नरेंद्र चपळगावकर हे एक सिनियर वकील होते. त्यांची ओळख झाली आणि मग चांदणी चौकाशेजारच्या हायकोर्टात आल्यावर मी तडक चपळगावकर यांना भेटायचो आणि ते मग मला त्या दिवसाची हायकोर्टातली सर्वात मोठी बातमी काय ते सांगायचे, का महत्त्वाची हे सांगायचे आणि कुठल्या वकिलाकडे ती बातमी मिळणार हेही सांगायचे.
यात अहमदनगरच्या सहकारी साखर कारखान्याची कोर्टकेस असायची, कधी कायद्याच्या दृष्टीने अगदी वेगळा निकाल असायचा, कधी ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी असायची.
कधीकधी चपळगावकर म्हणायचे, ``कामिल, आज बातमीसारखे काहीच नाही हायकोर्टात..'' अन मी लगेच माझ्या ऑफिसची वाट धरायचो. आठवड्यातून एकदोनदा असे व्हायचे.
मला आठवते एकदा कोर्टात आल्याआल्या चपळगावकरांनी मला सांगितले
"आज छान बातमी आहे.. बॉम्बे हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सुजाता मनोहर आजपासून येथे खंडपीठात काही काळासाठी व्हिजिटिंग जज्ज म्हणून आल्या आहेत.."
अशा खूप बातम्या मला या काळात चपळगावकरांनी दिल्या..
इतर वकील मात्र आपल्याकडचे कोर्ट प्रकरण खूप महत्वाचे आहे असा दावा करायचे. प्रत्यक्षात तसे काही नसायचे हे लक्षात आल्यानंतर मग मी अशा वकिलांना टाळायला लागलो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुद्द चपळगावकर यांच्याकडे महत्त्वाची कोर्ट बातमी असल्यावर जे घडायचे तो अनुभव मी कधीच विसरणार नाही.
``हा, तर घ्या लिहून,'' अशी सुरुवात चपळगावकर वकील करायचे.
मी इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून इंग्रजीत ते सांगायचे.
''A Division Bench of the Bombay High Court, comprising Mr Justice... and Mr. Justice... here on Monday set aside an order issued by ....""
कोर्टाच्या बातमीचा इंट्रो कसा असावा, त्यातील बातमीच्या संदर्भाचा क्रम कसा असावा आणि पूर्ण बातमी कशी असावी याचे चपळगावकर यांचे ते डिक्टेशन म्हणजे एक वस्तुपाठ होता.
माझे वय त्यावेळी अठ्ठावीस होते. कायद्याचा पदवीधर नसलो तरी गोव्यात हायकोर्ट कव्हर केलेले असल्याने कोर्टाच्या बातम्या किती काळजीपूर्वक कराव्या लागतात हे मला पूर्ण माहिती होते. कोर्टाच्या माझ्या कुठल्याही बातमीत माझ्या संमतीशिवाय काहीही फेरफार करायचे नाहीत अशी वृत्तसंपादकांची डेस्कवरच्या लोकांना सक्त ताकिदच असायची. ( 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये माझ्या कोर्टाच्या बातमीत एकदा असे एडिटिंग झाले होते तर आठ दिवसांत शिर्डीहून एका वकिलाची नोटीस येऊन धडकली होती.) चपळगावकर वकिलांनी याबाबतीत माझ्या माहितीत आणि कोर्ट बातमीदार म्हणून माझ्या कौशल्यात खूप काही भर घातली.
औरंगाबादला केवळ एक वर्ष राहून इंडियन एक्सप्रेसला रुजू होण्यासाठी मी पुण्याला आलो. पुण्याला हायकोर्टाचे खंडपीठ नाही, त्यामुळे नंतर लिगल रिपोर्टींग सुटले ते कायमचेच.
पण लिगल रिपोर्टींगची आठवण झाली कि आजही नरेंद्र चपळगावकर हमखास आठवतात.
पुण्यात इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्समध्ये पोलिटिकल रिपोर्टींग आणि लेख यात माझे स्पेशलायझेशन होते. पुण्यात नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला समाजवादी नेते आणि माजी खासदार ना. ग. किंवा नानासाहेब गोरे यांची कुठल्याही महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनेवर प्रतिक्रिया आम्ही बातमीदार घेत असू.
त्यावेळी लॅण्डलाइनवर तिकडे आल्यावर नानासाहेब म्हणायचे, हा, घ्या लिहून.. ''
आणि नंतर नानासाहेब अक्षरशः बातमी डिक्टेट करायचे, हे डिक्टेशन गरजेनुसार इंग्रजीत किंवा मराठीत असायचे. त्यात एका शब्दाचाही फेरफार करण्याची गरज नसायची. नानासाहेबांचे विचार असे अगदी स्पष्ट असायचे.
आणि नानासाहेबांची अशी प्रतिक्रिया लिहून घेताना मला औरंगाबादचे वकील नरेंद्र चपळगावकर आठवायचे...
नंतर एकदोन वर्षांतच नरेंद्र चपळगावकर यांची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली याचा मला आनंद झाला,, त्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली याचाही आनंद होताच.
आज सकाळी महाराष्ट्र फौंडेशनने नरेंद्र चपळगावकर यांची पुरस्कारासाठी निवड केली याचा तर खूपच आनंद झाला..
विशेष म्हणजे या वर्षीच्या महाराष्ट्र फौंडेशनने निवडलेल्या पुरस्कारार्थीमध्ये आणखी दोन जणांना मी व्यक्तिशः ओळखतो.
त्यापैकी `अक्षरनामा'चे संपादक राम जगताप हे माझे लेख अधूनमधून प्रकाशित करत असतात, वसईच्या लेखिका आणि कार्यकर्त्या सेसिलीया कार्व्हालो आहेत.
या तिघांसह इतर सर्वच पुरस्कारार्थींचे अभिनंदन.... !!
Camil Parkhe January 10, 2022

Thursday, December 21, 2023

 मोगलाई आणि अमरावती 

                                       

आम्ही मोगलाईतले म्हणजे मराठवाड्यातले. माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे गेले तरी नाळ मात्र कायम गंगेपलिकडे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आजोळशी राहिली. या मोगलाईतली भामाठाण, पैठण, नागमठाण, वरखेड, बोरसर, लासूर, महालगाव वैजापूर, गंगापूर अशी अनेक नावे बाई-दादांच्या अन आजोळच्या लोंकांच्या बोलण्यातून कायम कानावर पडायची. गंमत म्हणजे वरीलपैकी बहुतेक ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही वा त्यांचे भौगोलिक स्थान मला आजही माहित नाही.
अधूनमधून सणावाराला माळीघोगरगाव येथून पायपीट करत आमचे आजोबा म्हणजे गोविंदराव शिनगारे टिळकनगर श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या मार्थाबाई आणि अनुसयाबाई या आपल्या दोन्ही लेकुरवाळ्या लेकींसाठी पुरणपोळ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे टोपले घेऊन दुपारी बारापर्यंत आमच्या घरी पोहोचायचे. बहुधा भल्या सकाळी गरमागरम पुरणपोळ्याचे टोपले फेट्यावर ठेवून घेऊन ते या पायी प्रवासाला निघत असत. या सगळ्या ऐकिव गोष्टी.
याचे कारण म्हणजे मी जन्मायच्या खूप वर्षे आधीच आजोबा अचानक गेले. एका सकाळी शेतमळ्यात घराबाहेर झोपलेल्या आजोबांचे शरीर काळेनिळे पडलेले दिसले होते, बहुधा विषारी सर्पदंशाने. आजीचे - आईची आई - जिच्याबाबत कधी एक शब्द ऐकलेला आठवत नाही, तिचे तर आजतागायत नावसुद्धा माहित नाही.
दहापंधरा वर्षांपूर्वी बाई असताना काहीही निमित्त नसताना मुद्दामच तिच्याबरोबर तिच्या माहेरी गेलो होतो. तेव्हा शांत्वनमामांच्या थोरल्या मुलाला माझ्या मामेभाऊ शाहूला सहज `आपले शेत कुठपर्यंत आहे ? ' असे विचारले तेव्हा त्याने दोन दिशेला हात उभारुन लांबवरपर्यंतची शेतीची जागा दाखवली होती. ``बहुधा साठ-पासष्ट एकरांपर्यंत असावी,'' असे तो म्हणाला होता.
विशेष म्हणजे ही हाडुळकीची शेती नव्हती. तेव्हा त्यावेळी नाशिकजवळच्या नांदूर-मधमेश्वर धरणाचे पाणी नुकतेच घोगरगावाला पोहोचले होते. तशी शेतात विहीर होती, गरजेनुसार मोटेने पिकांना पाणी दिले जात होते.
विहिरीतून चार बैलांच्या मदतीने मोटेने विहिरीतून पाणी काढून या शेतातल्या भाजीपाल्यांना, वांगे, काकडी वगैरेंना पाणी दिले जाताना मी पाहिले आहे. आता धरणाच्या पाण्याने शेती पूर्णतः बागायती झाल्याने सालातून तीनदा पीक घेणे आज शक्य झाले आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना शाहूभाऊने आमच्या नजरेसमोर जमीनीतून उपटलेला डहाळ, गव्हाच्या कोवळ्या लोंब्या असे कायकाय दिले होते.
बाईची ही तिच्या माहेरची शेवटची गाठभेट ठरली. त्यानंतर घोगरगावातल्या त्या शेतमळ्यात आजपर्यंत मी पाय ठेवलेला नाही.
आता नक्की संदर्भ आठवत नाही मात्र आमच्या आईवडलांच्या संभाषणात अनेकदा येणारा एक शब्द म्हणजे `मोगलाई' हा होता. मोगलाई हा शब्द ऐकून तेव्हा शालेय वयातला मी अचंबित व्हायचो. (तिथल्या `राजवाडा' या शब्दाचा नेमका अर्थ मला तसा फार लवकर समजला होता).
`आम्ही मोगलाईतले', `मोगलाईतला अमुकअमुक परिसर' असे शब्दप्रयोग व्हायचे. ''ही काय मोगलाई हाई काय?'', ''मोगलाई लागून गेली काय?'' असे वाक्प्रचार कानावर पडायचे.
दिल्लीतले मुघल साम्राज्य आणि औरंगाबाद जिल्ह्यातली मोगलाई ही नक्की काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडायचा. नंतरनंतर कळायला लागले कि ही मोगलाई म्हणजे हैदराबाद निजामाच्या अमलाखालील मराठवाडा वगैरे प्रदेश म्हणजे मोगलाईतील भाग. अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरची गोदावरी म्हणजे गंगा ओलांडली कि हा मोगलाईचा भाग सुरु व्हायचा.
घोगरगावच्या फादर गुरियन जाकियरबाबांचे मी चरित्र लिहायला घेतले तेव्हा अगदी पहिल्यांदा 'मोगलाई' हा शब्द त्याच्या समर्पक अर्थासह तोही इंग्रजी पुस्तकांत मी पहिल्यांदा वाचला आणि या शब्दाविषयीच्या माझ्या कुतूहलाला अखेरीस पुर्णविराम मिळाला.
मी वाचलेल्या कुठल्याही मराठी पुस्तकांत `मोगलाई' या शब्द या अर्थाने वापरलेला माझ्या वाचनात आलेला नाही. मी वाचलेले बहुतेक लेखक पुण्यामुंबईतले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले असावेत यामुळेही हे असेल कदाचित.
दुसरा नेहेमी कानावर पडणारा शब्द म्हणजे अमरावती आणि अमरावतीचे बिशप. त्याकाळात औरंगाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीपलीकडचा परिसर अमरावती डायोसिसमध्ये म्हणजे धर्मप्रांतात होता. औरंगाबाद धर्मप्रांताची निर्मिती खूप अलिकडची, १९७७ सालची, पण तोपर्यंत मी माझे घर आणि श्रीरामपूर सोडून गोव्यात फादर होण्यासाठी गेलो होतो
ऐंशीच्या दशकाआधी खूप, खूप वर्षांपुर्वी अखंड नागपूर धर्मप्रांत होता. नागपूरचे फ्रान्सलियन बिशप यांच्या अखत्यारीतला. फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु विशाखापट्टणम येथून मिशनकार्य करण्यासाठी नागपूर आणि वऱ्हाडात पोहोचले होते आणि तेथून ते मोगलाईचे अखेरचे टोक असलेले औरंगाबाद जिल्ह्यात माळीघॊगरगाव येथे १८९२ साली काम करण्यासाठी पोहोचले होते. ही त्यांची मिशनकामाची सीमाहद्द कारण तेथून पुढे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत जर्मन असलेल्या जेसुईट धर्मगुरुंची हद्द.
युरोपातल्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दर्यावर्दी देशांत आपापसांत झगडे नको म्हणून मध्ययुगात पोपमहाशयांनी संपूर्ण जगाची चक्क दोन भागांत वाटणी केली होती ! एक-दुसऱ्यांच्या हद्दीत आक्रमण टाळण्यासाठी.
मोगलाईतल्या गंगेपलीकडे अहमदनगर, पुण्या-मुंबईत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे जर्मन, स्विस, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू कार्यरत होते त्याप्रमाणे विदर्भात, अमरावती आणि मराठवाड्यात फ्रान्समधल्या फ्रान्सलियन संस्थेचे धर्मगुरू कार्यरत होते. या संस्थेच्या कागदपत्रांतून आणि रोजनिशीतून विसाव्या शतकातील येथील ख्रिस्ती मिशन कामाबाबत, शैक्षणिक संस्थाबाबत माहिती मिळते.
फ्रेंच फ्रान्सलियन धर्मगुरु फ्रान्सिस मॉगे ( Francis Moget) यांनी Vagabonds for God : A story of the Catholic Church in India (1846-1907) प्रकाशनवर्ष १९९० आणि Shepherds for Christ : A story of the Catholic Church in Central India 1907-1960) प्रकाशनवर्ष १९९४ हे दोन ग्रंथ विविध संदर्भ आणि रोजनिशींच्या आधारे लिहिलेले आहेत.
सामाजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासण्यासाठी अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे सांगायलाच नको. याच दोन पुस्तकांच्या आधारावर मी स्वतः ``घोगरगावचे जाकियरबाबा : मराठवाडा कॅथोलिक धर्मप्रांताचा इतिहास' हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुध्दातसुद्धा तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातल्या सर्व शत्रुराष्ट्रातील नागरिकांना म्हणजे जर्मन जेसुईट धर्मगुरूंना तुरुंगात वा छावणीत टाकले होते. अशा कठीण आणि युद्धस्थसमयी मोगलाई, अमरावती आणि नागपूर येथील फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु फादर गुरियन जाकियर आणि मेरी बेर्जे पुण्यातल्या आणि इतर जर्मन जेसुइट धर्मगुरूंच्या मदतीला धावले आणि येथील चर्चचे काम पाहिले.
यापैकी फादर बेर्जे यांनी १९१७ साली जन्मलेल्या माझ्या वडलांचा माळीघोगरगाव येथे बाप्तिस्मा केला होता. बाप्तिस्मा सर्टिफिकेटवर फादर बर्जे यांचे आणि गॉडफादरचेही नाव आहे. आपल्याकडे लग्नात नवरीला उचलून मांडवात आणण्यासाठी नवरीच्या मामाची - खऱ्या किंवा मानलेल्या - मामाची गरज असते तसेच बाप्तिस्मा करताना गॉडफादर ( आणि कधीकधी गॉडमदरसुद्धा) पाहिजेच.
पहिल्या महायुद्धात जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरिक असलेले पुण्याचे बिशप हेन्री डोरींग रोममध्येच अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नागपूरचे बिशप फ्रान्सिस कॉपेल बैलगाडीने प्रवास करत मजल दरमजल करत पुण्याला, खडकी, संगमनेर आणि राहाता येथे तीन वेळेस म्हणजे १९१६, १९१७ आणि १९१९ला आले होते !
अन याची परतफेड म्हणून महायुद्ध संपल्यानंतर १९२६ला जपानमधील हिरोशिमातून भारतात परतलेल्या पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग हे ८ जानेवारी १९३३ रोजी मोगलाईतल्या माळीघोगरगावला मुलांमुलींना कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्यासाठी पोहोचले होते. कारण नागपूरचे बिशप कॉपेल त्यावेळी आजारी होते.
कॅथोलिक लोकांच्या जीवनात धर्मप्रांत आणि बिशप यांचे एक अतूट नाते असते कारण आयुष्यात किमान एकदा तरी भाविक लोक काही क्षण बिशपांच्या अगदी जवळ येत असतात. याचे कारण म्हणजे सप्त स्नानसंस्कारांपैकी एक असलेल्या दृढीकरण किंवा confirmation हे सांक्रामेंत केवळ बिशपमहोदयच देऊ शकतात. बाप्तिस्मा, लग्नविधी, अंत्यसंस्कार वगैरे सांक्रामेंतासाठी कुठलाही दिक्षित धर्मगुरु पौराहित्य करू शकतो.
इतर धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मात सश्रद्ध लोकांच्या जीवनात धर्मगुरूंचे अधिक महत्त्वाचे स्थान असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती धर्मात कुणाही व्यक्तीला- हो कुणालाही - धर्मगुरु होता येते, हे पद किंवा अधिकार विशिष्ट समाजघटकाचे नसतात. आता माझेच उदाहरण आहे. कधीकाळी मीसुध्दा गोव्यात फादर होण्यासाठी गेलो नव्हतो का?
तर एकेकाळी अमरावती धर्मप्रांत खूप महत्त्वाचा होता कारण या हद्दीत ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर होती, या भागात अनेक ख्रिस्ती मंदिरे होती. माझ्या आजोळी माळीघोगरगाव येथे 1927 साली गॉथिक वास्तू शैलीत बांधलेले भव्य आणि सुंदर चर्च आहे. चर्चचे नाव आहे ख्रिस्त राजा मंदिर.... Church of Christ the King... आजही अशाप्रकारचे भव्य आणि सुंदर बांधकाम नवलाईची बाब ठरते. या बांधकामासाठी नेवाशाहून खास काळे पाषाण मागवण्यात आले होते.
या भागातील ख्रिस्ती लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अनेक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत.
तर सांगायचा मुद्दा असा कि आम्ही जसे मोगलाईतले तसेच एकेकाळच्या अमरावती धर्मप्रांतातले सुद्धा .
मागच्या आठवड्यात अमरावती येथील बिशपांचे कॅथेड्रल किंवा आसनपीठ (कॅथेड्रॉ म्हणजे आसन, seat ) असलेल्या चर्चमध्ये दुपारी पाचच्या दरम्यान चर्चबेलचा घंटानाद झाला.
त्याचवेळेस व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकामध्येसुद्धा घंटानाद झाला होता.
अमरावती डायोसिसच्या नव्या बिशपांची पोप फ्रान्सिस यांनी नेमणूक केली हे जाहीर करण्यासाठी हा घंटानाद होता.
अमरावतीच्या नव्या बिशपांच्या नेमणुकीची बातमी इथेच फेसबुकवर लगेचच पाचदहा मिनिटांत मला कळाली आणि अमरावतीशी असलेल्या माझ्या खूप जुन्या नातेसंबंधांना उजाळा मिळाला.
अमरावती धर्मप्रांताचे हे नवे बिशप आहेत पुणे धर्मप्रांताचे आताचे व्हिकर जनरल (धर्मसत्तेत पदश्रेणीत बिशपानंतर दुसऱ्या क्रमांकाचे) फादर मॅल्कम सिक्वेरा.
पुढच्या महिन्यात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारीला, अमरावतीचे नवे बिशप म्हणून त्यांचा दीक्षाविधी होईल.

Camil Parkhe

Saturday, April 8, 2023

 कार्यस्थळ माहात्म्य आणि नैतिक जबाबदारी 

मी घर केल्यापासून म्हणजे माझे लग्न झाल्यापासून एक गोष्ट मला अनायासे मिळाली आहे ती म्हणजे भल्या पहाटे किचनमध्ये आल्यावर मला खिडकीतून  शुक्र ताऱ्याचे दर्शन घडतेशुक्र तारा हे  भावगीत आठवते आणि दिवसाची छान सुरुवात होते 

सकाळी मला चहा करताना माझी नजर त्या शुक्र  ताऱ्याकडेअसते आणि एखादे दिवशी मला उशीर झाला किंवा त्या अवकाशातील व्यक्तीने आपली जागा बदलली तर मला चुकल्याचुकल्या सारखे होते. ऋतुमानानुसार यात बदल होत असला तरी शुक्र ताऱ्याच्या दर्शनाने दिवस सुरू करण्यासारखे भाग्य नाही असे मला नेहेमीच वाटत आले आहे. मी कवी मनाचा किंवा रोमँटिक नसलो तरी तो शुक्र   तारा पाहिल्यावर दातेंचे शुक्र तारा मंद वारा हे  भावगीत सुद्धा  हमखास आठवतेच

कामावर जाताना मी कितीतरी वर्षे मी दुचाकी वापरता सार्वजनिक बस सेवेचाच वापर करत आलो आहे. त्यामागे प्रदूषण टाळणे वाहनांची गर्दी टाळणे वगैरे उदात्त हेतु नसून मला अत्यंत प्रिय असणारी निद्रा हे आहे. बसच्या  अर्धा पाऊण तासाच्या प्रवासात मस्त पैकी झोपून मी ऑफिसच्या कामासाठी ताजातवाना होत असतो. या महान कार्यासाठी अर्थात बसमध्ये खिडकीजवळ जागा किंवा बसमध्ये बसण्यासाठी कुठेही जागा मिळणे अत्यावश्यक असते. यासाठी एखादी प्रवाशांनी गच्च भरलेली   बस मी टाळत असतो. शेवटी प्रत्येकाची काही प्राधान्ये असतातच ना. रात्री कामावरून घरी येताना मात्र गर्दी नसल्याने जागा मिळते, नाही मिळाली तरी हरकत नसते कारण  त्यावेळी मला निद्रादेवी ची आराधना करायची नसते

 

मला वाटते विमानाने दिवसा किंवा रात्री ही  काही तासांचा प्रवास करताना मुलांप्रमाणे इतरांनाही खिडकीजवळ जागा मिळावी  असेच वाटत असणार. खूपखूप वर्षांपूर्वी रशिया आणि बल्गेरियाला पत्रकारितेच्या अभ्यास क्रमासाठी जाताना  विमानात आता आपण अमुक अमुक हजार मीटर उंचीवरून हिमालयीन पर्वतांच्या रंगावरून जातो आहोत अशी घोषणा ऐकून अंगावर रोमांच आले होते. अर्थात बाहेर पूर्ण अंधार असल्याने काहीच दिसले नव्हते

 

गोव्यात आणि महाराष्ट्रात  औरंगाबाद, पुणे अशा विविध ठिकाणी काम करताना ऑफिसमध्ये मोक्याची जागा मिळावी असे मला वाटायचे. पणजीला मी ऑफिसात अगदी ज्युनियर असल्याने याबाबत निवडीचा काहीच पर्याय नव्हता तरी सुदैवाने आमच्या लाकडी फ्लोअर आणि कौलारू छत असलेल्या ऑफिसात अगदी गॅलरीपाशी  टेबल मिळाले होते. तिथे टाईपरायटर बडवताना मांडवी नदी आणि नदीशेजारच्या दयानंद बांदोडकर रस्त्यावरची वाहतूक दिसायची. यासारखे सौख्य कुठे मिळणार असे मागे वळून पाहताना आता वाटते.

 

कदाचित हा माझ्या सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा परिणाम असू शकेल मात्र औरंगाबाद आणि पुण्यात कामाच्या जागी दुसरी एक चैन भोगायला मिळाली. ती म्हणजे माझ्या टेबलापाशी  बसलेले असताना मला सतत चालू असलेला टेलिव्हिजन दिसायचा. अर्थात टेलिव्हिजनवर सतत न्युज चॅनेल्स असायचे, पण हरकत नसायची 

मी सध्या राहतो त्या कॉलनी बाबत आणि एकूण परिसराविषयी मी जाम खुष आहे याचे कारण म्हणजे इथल्या इमारतीभोवती असलेली गर्द झाडीबगिचापार्किंग, खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी असलेली मुबलक जागाइमारतींत घर  घेण्यासाठी अर्थात उपलब्ध असलेल्या मजल्यावर आणि खिशाला परवडेल असाच फ्लॅट निवडावा लागला होता, याबाबत फारशी निवडीचा फारसा पर्याय नव्हता, उलट तडजोडच अधिक  होतीमिळेल त्याच्यात आनंद मानावा चित्ती असू द्यावे समाधान अशीच भावना होती 

श्रीरामपुरला व्यवसायाने टेलर असलेलं माझे वडील मला एक गोष्ट सांगायची ती आजही आठवते. कोणा एका  नगरीत असलेला एक माणूस त्याच्या विद्वत्तेमुळे  आणि ज्ञानामुळे खूप प्रसिद्ध झाला होता. मात्र असे असले तरी त्याची मजल बैठे स्वरुप असलेल्या त्याच्या व्यवसायाच्या पुढे गेलेली नव्हती. तो  गरीबच राहिला होता. त्याच्या ज्ञानाची कीर्ती ऐकून त्या नगरीच्या राजाने त्याला बोलावून घेतले. राजदरबारात मात्र त्या माणसाने राजाची आणि दरबारातील इतरांची निराशाच केली. त्या मुखदुर्बळ माणसाच्या तोंडातून एक शब्द उमटत नव्हता.

त्या दरबारातला प्रधान मात्र हुशार होता. त्या माणसाच्या ज्ञानाबद्दल सगळीकडे कौतुक होत असताना प्रत्यक्षात ही व्यक्ती मात्र तशी नाही यात काही तरी गौडबंगाल असावा अशी त्याला शंका आली. तो प्रधान मग त्या माणसाच्या पाठोपाठ वेषांतर करुन पोहोचला. पाहातो तो काय, आपल्या नेहेमीच्या बैठकीवर स्थानापन्न झाल्यावर त्या माणसाला पुन्हा एकदा वाचा फुटली आणि तो आपले ज्ञान इतरांना देऊ लागला.

त्या रात्री  प्रधानाने नोकरांकरवी  त्या माणसाच्या बैठकीची जागा खणून काढली तेव्हा तिथे खूप खोल खड्ड्यात सोने-चांदी आणि हिरेमोती असलेला एक घडा सापडला. त्या दिवसानंतर तो माणूस इतरांसारखा सामान्य झाला, त्याच बैठकीवर बसून निमूटपणे आपले काम करत राहिला.  त्याची नेहेमीची बैठक असलेल्या त्याच्या  कार्यस्थळाचा तोपर्यंत कुणालाही अगदी त्यालाही माहित नसलेला महिमा आता संपला होता.        

 

तत्त्वज्ञान हा माझा एक आवडीचा विषय. पणजीला कॉलेजात असताना तत्त्वज्ञान माझा विषय होता. अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्ववेत्ते त्यांच्या काही प्रमुख सिद्धांतांसाठी प्रसिद्ध आहेत.  उदाहरणार्थ,  आद्य शंकराचार्य यांचा अद्वैत सिद्धांत आहे, प्लॅटो आणि अरिस्टॉटल हे विविध विषयांवरील पायाभूत मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत.   फ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅडले   (१८४६- १९२४) हा तत्त्ववेत्ता `माझे कार्यस्थळ आणि त्यासंबंधीची कर्तव्ये'  किंवा `माय स्टेशन अँड इट्स ड्युटीज' या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे.  या सिद्धांताविषयी विविध अंगांनी मांडणी  होत असली तरी मी स्वतः माझ्यापुरता हा विचार  'आपली या घटकेची किंवा कामाची जागा आणि त्याबाबतची कर्तव्ये' असाच घेत असतो.    

 आयुष्याच्या विविध टप्प्यांत आपल्यापैकी प्रत्येक जण मुलगा/ मुलगी, आईवडील, पतिपत्नी,  कंपनीतला बॉस आणि त्याचे कनिष्ठ सहकारी,  मालक-नोकर, सहकारी, मित्र आणि नातेवाईक अशा विविध वर्क स्टेशनांवर किंवा कार्यस्थळांवर कधी ना कधी पोहोचलेलो असतो, या प्रत्येक कार्यस्थळांची ठराविक कर्तव्ये आणि बांधिलकी असतात. ही कर्तव्ये आणि बांधिलकी कशा प्रकारे पाळली जातात याबाबत आपण कधी विचार करत नाही, मात्र समोरचा  व्यक्ती आपली कर्तव्ये आणि जबाबदारी कितपत पाळतो याविषयी मात्र आपण नेहेमीच सतर्क असतो.           

 `आपण बरे आणि आपले काम बरे' अशी आपल्याकडे एक म्हण आहे.  प्रत्येकाने हा दृष्टिकोन बाळगून  स्वतः बरे म्हणजे चांगल्यापणाने राहून आणि आपले काम चांगल्यापणाने केले तर सर्व जग किती चांगले होईल, जरा कल्पना करा.