Wednesday, October 2, 2019

शरद पवारांच्या गंभीर आजारात झालेल्या २००४ च्या निवडणुका!

शरद पवारांच्या गंभीर आजारात झालेल्या २००४ च्या निवडणुका!
पडघम - राज्यकारण 
कामिल पारखे      



  • शरद पवार
  • Tue , 01 October 2019
  • पडघमराज्यकारणशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस
लोकसभेच्या २००४ निवडणुकांचा प्रचार महाराष्ट्रात नुकताच सुरू झाला होता आणि त्याचवेळी एक छोटीशी बातमी बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापली. शरद पवार यांच्यावर मुंबईतील दवाखान्यात एक ‘किरकोळ’ सर्जरी करण्यात आली आहे, अशी ती बातमी होती. बातम्यांत सर्जरी किरकोळ आहे, असे म्हटले जात असले तरी आतल्या गोटातील माहितीप्रमाणे हा आजार गंभीर आहे, असे आम्हा पत्रकारांना समजले होते. सुरुवातीला दबक्या आवाजात चर्चिल्या जाणाऱ्या या आजाराचे गांभीर्य लवकरच सर्वांच्याच लक्षात आले.
शरद पवार यांना वयाच्या ६४व्या वर्षी घशाचा कॅन्सर झाला होता आणि त्यानंतर पार पडलेल्या सर्जरीनंतर त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या अखेरीस दोन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा शरद पवार प्रचार करू शकणार नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला हा मोठा धक्का होता. खुद्द पवार बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार होते, प्रचार न करताही ते तेथून निवडून येतील, याबद्दल कुणालाच शंका नव्हती, मात्र त्या काळात महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची धुरा आता कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्रात त्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार होते, तर केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार होते. देशात ‘शायनिंग इंडिया’चे अनुकूल वातावरण असल्याने रालोआने देशात सहा महिने आधी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या.
शरद पवार महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारच्या रिंगणात यावेळी असणार नाहीत, या बातमीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गोटात सन्नाटा पसरला होता, तर भाजप-शिवसेना युतीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
१९७८ला वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री बनल्यापासून शरद पवार यांना महाराष्ट्रातील एक आघाडीचे राजकीय नेते असे स्थान प्राप्त झाले होते. काँग्रेसपासून दुसऱ्यांदा म्हणजे १९९९ साली फारकत घेऊन राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानंतरही त्यांचे हे स्थान अढळ राहिले होते. राज्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या रणांगणात पवार यांची तोफ विरोधकांना आव्हान देत असे. त्यांची ही जागा त्यांच्या पक्षाचे नेते छागन भुजबळ, अजित पवार किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे घेऊ शकणार नव्हते. सुप्रिया सुळे यांचा त्या वेळी राजकारणात प्रवेश झालेला नव्हता. आघाडीच्या दृष्टीने हा मोठा बाका प्रसंग होता.
लोकसभेच्या या २००४ च्या निवडणुकांआधी मी अनेकदा शरद पवार यांच्या निवडणूक सभांचे आणि दौऱ्यांचे ‘इंडियन एक्स्प्रेस’साठी वार्तांकन केले होते. १९९१च्या मे महिन्यात राजीव गांधींची हत्या झाल्याने पवार यांनी स्वत:ला काँग्रेसतर्फे पंतप्रधानपदासाठी दावेदार म्हणून घोषित केले होते. तेव्हा बीबीसीचे दिल्लीतील वार्ताहर सॅम मिलर यांचा स्थानिक सहाय्यक पत्रकार म्हणून त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या पवार यांच्या गाडीतून बारामतीहून पुणे विमानतळावर प्रवास करत त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला लाभली होती. १९९४च्या महाराष्ट्र विधानसभेच्या पवार यांच्या निवडणूक प्रचाराचे मी वार्तांकन केले होते. त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रचार सभेच्या शैलीची आणि पद्धतीची मला बऱ्यापैकी माहिती होती.
निवडणूक प्रचारमोहिमेच्या समाप्तीच्या आधल्या दिवशी पवार पुणे शहरात कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर वगैरे भागांत निवडणूक सभा घेत असत. पुण्यात लक्ष्मी रोडवर संध्याकाळी झालेल्या अशा दोन कोपरासभांना मी हजर होतो. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी आपल्या बारामती मतदारसंघात सभा घेऊन प्रचार दौऱ्याची सांगाता करण्याचा पवार यांचा नेहमीचा शिरस्ता असायचा आणि आहे. पवारांच्या या आजारपणामुळे त्यांच्या या नेहमीच्या झंझावती प्रचार दौऱ्यात खंड पडणार होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निवडणूक यशावर त्याचा विपरीत परिणाम होणार, हे उघडच होते.  
पवार यांची सर्जरी झाल्यानंतर एक आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराने जोर घेतला. त्या काळात मोबाईल नुकताच सामान्य माणसांच्या हातात स्थिरावू लागला होता, फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपचा जमाना यायचा होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शरद पवार यांच्या अनुपस्थितीत प्रचाराचे वेगळे धोरण राबवण्याचे ठरवले. शरद पवारांच्या गंभीर आजाराचे स्वरूप एव्हाना राज्यातील सर्व मतदारांना कळाले होते. आजच्या तुलनेत त्या काळात उपलब्ध असलेल्या माफक तंत्रज्ञानाच्या मदतीने शरद पवार यांची जुनी भाषणे टेपरेकॉर्डर, ऑडिओ कॅसेटस आणि इतर साधनांच्या मदतीने मतदारांना ऐकवण्याची मोहीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली. भुजबळ, आर. आर. पाटील वगैरे नेत्यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. पवार यांचे गंभीर आजारपण आणि त्यामुळे त्यांची निवडणूक प्रचार दौऱ्यातील अनुपस्थिती हा एव्हाना निवडणूक काळातील एक चर्चेचा विषय बनला होता.
निवडणूक प्रचाराच्या समाप्तीच्या एक-दोन दिवस आधी शरद पवार यांनी आजारपणातील सक्तीची रजा संपवून एक-दोन प्रचारसभेत भाषण केले, तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंद आणि जोशाला सीमा नव्हती. मात्र पवारांच्या या गंभीर आजारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी मतदारांमध्ये सहानुभूतीची भावना निर्माण झाली होती, याचा उलगडा मतपेटीतून निकाल बाहेर आले, तेव्हाच झाला. त्या लोक्सभा निवडणुकीत राज्यातील सत्तारूढ काँग्रेसने एकूण ४८ जागांपैकी १३ तर राष्ट्रवादी पक्षाने ९ जागा जिंकल्या. रालोआतील भाजपने १३ तर शिवसेनेने १२ जागा जिंकल्या होत्या. देशात मात्र वाजपेयांच्या नेतृत्वाखालील रालोआच्या सरकारचा पराभव होऊन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आले. डॉ. मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालील हे सरकार १० वर्षे टिकले. आजारातून पूर्णत: बरे झालेले शरद पवार या दशकाच्या काळात केंद्रीय कृषीमंत्री होते.
चालू वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील रथी, महारथी आणि अधिरथी पक्षत्याग करून भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांत सामील होत आहेत. अशा वेळी पवार वयाच्या ८०व्या वर्षीही पुन्हा एकदा राजकीय रणांगणावर स्वत: अगदी आघाडीवर राहून आक्रमक होताना दिसत आहेत. राज्यातील गेल्या पन्नास वर्षांतील त्यांच्या राजकीय सामर्थ्यांत तसूभरही फरक पडलेला नाही, याबद्दल कुणाला शंका असणार नाही.  

No comments:

Post a Comment