Showing posts with label Camil Parkhe. Show all posts
Showing posts with label Camil Parkhe. Show all posts

Tuesday, January 9, 2024


                                                                नरेंद्र चपळगावकर

औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला १९८८ साली मी नव्यानेच रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीतल्या 'नवहिंद टाइम्स' ला आठ वर्षे असताना तेथे मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. साहजिकच औरंगाबादला लोकमत टाईम्स येथेसुद्धा या बिट्सपैकी कोर्ट ही जबाबदारी माझ्याकडे आली.

बॉंबे हायकोर्टाचे एक खंडपीठ पणजी येथे होते, मांडवीच्या तिरावरच्या या हायकोर्टात मी दररोज दुपारी साडेचारला जायचो, तिथल्या रजिस्ट्रारला भेटून मुख्य बातम्या समजावून घ्यायचो आणि नंतर त्या बातम्या मिळवायला लागायचो. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश असताना त्यावेळीं तिथे काफेफोसा ॲक्ट् म्हणजे तस्करीच्या आणि हेबियस कॉर्पसच्या (बेकायदेशीर अडकवून ठेवणे) खूप केसेस असायच्या.
इथे औरंगाबादलासुद्धा हायकोर्टाचे खंडपीठ होते. पणजीला एकावेळी फक्त दोन न्यायमूर्ती असायचे . त्यापैकी एक पणजीला मुंबईचे हायकोर्ट जज्ज 'व्हिजिटिंग जज्ज' म्हणून यायचे ते अक्षरशः ' व्हेकेशन जज्ज' म्हणूनच. एका जिल्ह्यासारख्या लहान असणाऱ्या गोव्याच्या परिसरात हायकोर्टाची किती प्रकरणे आणि सुनावण्या असणार ? दुपारी अडीच तीनच्या सुमारास पुढील लिस्टेड, नोंदणी झालेले सुनावणी नाही म्हणून कोर्टाचे त्या दिवसाचे कामकाज तहकूब व्हायचे..!
औरंगाबाद खंडपीठाच्या हद्दीत मात्र मराठवाड्याचे नऊ जिल्हे आणि शेजारचा अहमदनगर जिल्हा आहे, त्यामुळे तिथे न्यायमूर्ती अधिक असायचे आणि भरपूर प्रकरणेही असायची. भरपूर कोर्टप्रकरणे म्हणजे भरपूर बातम्या... पण बातमीदाराच्या छोटयाशा झोळीत किती आणि कोणत्या बातम्या घेणार ?
मात्र माझ्यासमोरचा हा प्रश्न अपेक्षेपेक्षा लवकर आणि खूपच समाधानकारकरित्या सुटला.
त्यावेळी त्या खंडपीठात नरेंद्र चपळगावकर हे एक सिनियर वकील होते. त्यांची ओळख झाली आणि मग चांदणी चौकाशेजारच्या हायकोर्टात आल्यावर मी तडक चपळगावकर यांना भेटायचो आणि ते मग मला त्या दिवसाची हायकोर्टातली सर्वात मोठी बातमी काय ते सांगायचे, का महत्त्वाची हे सांगायचे आणि कुठल्या वकिलाकडे ती बातमी मिळणार हेही सांगायचे.
यात अहमदनगरच्या सहकारी साखर कारखान्याची कोर्टकेस असायची, कधी कायद्याच्या दृष्टीने अगदी वेगळा निकाल असायचा, कधी ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी असायची.
कधीकधी चपळगावकर म्हणायचे, ``कामिल, आज बातमीसारखे काहीच नाही हायकोर्टात..'' अन मी लगेच माझ्या ऑफिसची वाट धरायचो. आठवड्यातून एकदोनदा असे व्हायचे.
मला आठवते एकदा कोर्टात आल्याआल्या चपळगावकरांनी मला सांगितले
"आज छान बातमी आहे.. बॉम्बे हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सुजाता मनोहर आजपासून येथे खंडपीठात काही काळासाठी व्हिजिटिंग जज्ज म्हणून आल्या आहेत.."
अशा खूप बातम्या मला या काळात चपळगावकरांनी दिल्या..
इतर वकील मात्र आपल्याकडचे कोर्ट प्रकरण खूप महत्वाचे आहे असा दावा करायचे. प्रत्यक्षात तसे काही नसायचे हे लक्षात आल्यानंतर मग मी अशा वकिलांना टाळायला लागलो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुद्द चपळगावकर यांच्याकडे महत्त्वाची कोर्ट बातमी असल्यावर जे घडायचे तो अनुभव मी कधीच विसरणार नाही.
``हा, तर घ्या लिहून,'' अशी सुरुवात चपळगावकर वकील करायचे.
मी इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून इंग्रजीत ते सांगायचे.
''A Division Bench of the Bombay High Court, comprising Mr Justice... and Mr. Justice... here on Monday set aside an order issued by ....""
कोर्टाच्या बातमीचा इंट्रो कसा असावा, त्यातील बातमीच्या संदर्भाचा क्रम कसा असावा आणि पूर्ण बातमी कशी असावी याचे चपळगावकर यांचे ते डिक्टेशन म्हणजे एक वस्तुपाठ होता.
माझे वय त्यावेळी अठ्ठावीस होते. कायद्याचा पदवीधर नसलो तरी गोव्यात हायकोर्ट कव्हर केलेले असल्याने कोर्टाच्या बातम्या किती काळजीपूर्वक कराव्या लागतात हे मला पूर्ण माहिती होते. कोर्टाच्या माझ्या कुठल्याही बातमीत माझ्या संमतीशिवाय काहीही फेरफार करायचे नाहीत अशी वृत्तसंपादकांची डेस्कवरच्या लोकांना सक्त ताकिदच असायची. ( 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये माझ्या कोर्टाच्या बातमीत एकदा असे एडिटिंग झाले होते तर आठ दिवसांत शिर्डीहून एका वकिलाची नोटीस येऊन धडकली होती.) चपळगावकर वकिलांनी याबाबतीत माझ्या माहितीत आणि कोर्ट बातमीदार म्हणून माझ्या कौशल्यात खूप काही भर घातली.
औरंगाबादला केवळ एक वर्ष राहून इंडियन एक्सप्रेसला रुजू होण्यासाठी मी पुण्याला आलो. पुण्याला हायकोर्टाचे खंडपीठ नाही, त्यामुळे नंतर लिगल रिपोर्टींग सुटले ते कायमचेच.
पण लिगल रिपोर्टींगची आठवण झाली कि आजही नरेंद्र चपळगावकर हमखास आठवतात.
पुण्यात इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्समध्ये पोलिटिकल रिपोर्टींग आणि लेख यात माझे स्पेशलायझेशन होते. पुण्यात नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला समाजवादी नेते आणि माजी खासदार ना. ग. किंवा नानासाहेब गोरे यांची कुठल्याही महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनेवर प्रतिक्रिया आम्ही बातमीदार घेत असू.
त्यावेळी लॅण्डलाइनवर तिकडे आल्यावर नानासाहेब म्हणायचे, हा, घ्या लिहून.. ''
आणि नंतर नानासाहेब अक्षरशः बातमी डिक्टेट करायचे, हे डिक्टेशन गरजेनुसार इंग्रजीत किंवा मराठीत असायचे. त्यात एका शब्दाचाही फेरफार करण्याची गरज नसायची. नानासाहेबांचे विचार असे अगदी स्पष्ट असायचे.
आणि नानासाहेबांची अशी प्रतिक्रिया लिहून घेताना मला औरंगाबादचे वकील नरेंद्र चपळगावकर आठवायचे...
नंतर एकदोन वर्षांतच नरेंद्र चपळगावकर यांची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली याचा मला आनंद झाला,, त्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली याचाही आनंद होताच.
आज सकाळी महाराष्ट्र फौंडेशनने नरेंद्र चपळगावकर यांची पुरस्कारासाठी निवड केली याचा तर खूपच आनंद झाला..
विशेष म्हणजे या वर्षीच्या महाराष्ट्र फौंडेशनने निवडलेल्या पुरस्कारार्थीमध्ये आणखी दोन जणांना मी व्यक्तिशः ओळखतो.
त्यापैकी `अक्षरनामा'चे संपादक राम जगताप हे माझे लेख अधूनमधून प्रकाशित करत असतात, वसईच्या लेखिका आणि कार्यकर्त्या सेसिलीया कार्व्हालो आहेत.
या तिघांसह इतर सर्वच पुरस्कारार्थींचे अभिनंदन.... !!
Camil Parkhe January 10, 2022

Friday, November 4, 2022

 मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

खरे तर आतापर्यंत मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून गोव्यात आणि नंतर पुण्यात मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किंवा समारोपाचे भाषण कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो, ते केवळ बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे तत्कालिन उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त इतर विषयांवर त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आमच्या वृत्तपत्राच्या अमराठी वाचकांसाठीसुद्धा त्यांचे मत महत्त्वाचे ठरायचे.
१८७८ साली पुण्यात मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पार पडले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे या संमेलनाचा शुभारंभ करण्याचा मान जातो. नंतरच्या काळात ग्रंथकारांचे संमेलन ‘साहित्य संमेलन’ झाले. त्यानंतर ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाले. कालांतराने विद्रोही, विचारवेध, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक अशी विचारनिहाय आणि कोकण, मराठवाडा अशी प्रदेशनिहाय संमेलने सुरू झाली.
मराठी साहित्य संमेलनापासून पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ‘ख्रिस्ती साहित्य संमेलना’ने शंभरेक वर्षांपूर्वीच केले होते, हे मात्र अनेकांना माहीतही नसेल.
आता २६वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीड येथे नोव्हेंबर ६, ७ आणि ८ रोजी पार पडत आहे,संमेलनाध्यक्ष आहेत पौलस वाघमारे आणि स्वागताध्यक्ष आशिष शिंदे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८-१९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष होते- रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह १५० लोक हजर होते.
ख्रिस्ती संमेलनाचा हा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही खळाळता राहिला आहे. गंमत म्हणजे १९९२ पासून मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने स्वतंत्र चूल मांडली आणि आतापर्यंत १० संमेलने भरवली आहेत.
विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांप्रमाणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झालेले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
हा ग्रंथ केवळ एकंदर मराठी साहित्यक्षेत्रासाठीही एक मौलिक ऐवज ठरतो.
१९२७ नंतर गेल्या शतकभरात एकूण ३५ संमेलने झाली असून त्यात २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १० मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो.
आतापर्यंतच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे : दुसरे - मनोहर कृष्ण उजगरे (मुंबई, १९३०), तिसरे - देवदत्त नारायण टिळक (निपाणी, १९३२) चौथे - लक्ष्मीबाई टिळक (नागपूर, १९३३), पाचवे आणि सहावे- सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे, १९७२), सातवे - फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई, १९७३), दहावे - भास्करराव जाधव (बारामती, १९७५), अकरावे - रॉक कार्व्हालो (सोलापूर, १९७७), बारावे - रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर, १९८१), तेरावे - फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई, १९८४), चौदावे - जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर, १९८६), पंधरावे - विजया पुणेकर (मुंबई, १९९०), सोळावे - फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे, १९९२), सतरावे - निरंजन उजगरे (मालवण, १९९४), अठरावे - सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर, १९९८), एकोणिसावे - सिसिलिया कार्व्हालो (नाशिक, २०००), विसावे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, २००१), एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई, २००५) , बाविसावे सुभाष पाटील (जालना, २००७ ), तेविसावे - फादर मायकल जी. (वसई, २००९), चोविसावे - अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४).
दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे : पहिले - अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर, १९९२), दुसरे - सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना, १९९३), तिसरे - अरविंद पी निर्मळ (लोणावळा, १९९४), चौथे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, १९९५), पाचवे - बिशप प्रदीप कांबळे (पुणे, २००१), सहावे - सुभाष चांदोरीकर (संगमनेर, २००४), सातवे - डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर, २००६), आठवे - वसंतराव म्हस्के (उदगीर, २००८), नववे - अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर, २०११) आणि दहावे - फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर, २०१८).


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे. स्त्रीसाहित्याची मोठी परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे.
याउलट केवळ ३५ संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा स्त्रिया संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत. त्यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापैकी काही संमेलनाध्यक्ष एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊ-बहीण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य इत्यादी.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनालध्यक्षपद अनेक धर्मगुरूंनी भूषवले आहे. यात कॅथोलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी. निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरू यांच्याच प्रभावाखाली आहे, हेच यातून दिसून येते.


मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथोलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटूनपालटून निवडले जातात. या पायंड्याकडे पाहू जाता कॅथोलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसईउर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत.
वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथोलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला एक ख्रिस्ती आणि वाचक म्हणून मी हजर होतो. संमेलनाध्यक्ष होते कवी निरंजन उजगरे, तर तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे प्रमुख पाहुणे. संपादक नारायण आठवले मुख्य पाहुणे होते. संमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे होते.
मालवणच्या मिलाग्रिस चर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या तीन दिवसीय संमेलनातल्या जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने आलेले पाहुणे व रसिक जाम खूष होते.
उदगीर (जि. लातूर) येथे भरलेल्या ‘मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’त मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले, ते त्या वेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे. ‘हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे’, असा आरोप करून ते उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या ‘नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’चे स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे, पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात साहित्यिक वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.
वादविवाद, आरोपप्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ''ख्रिस्ती साहित्य" या शब्दाची व्याख्या, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसावा आकडा आहे, अगदी तशी स्थिती (मुख्य प्रवाहातले !) मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्यात आहे.
अनेक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत `दलित ख्रिस्ती' या शब्दावर आणि वेगळ्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांवर तोंडसुख घेतले आहे. अपवाद फक्त सिसिलीया कार्व्हालो यांचा. आज २०२२ मध्येही यात फार बदल झालेला नाही. आजसुद्धा `दलित ख्रिस्ती' हा शब्द मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातसुद्धा `गावकुसाबाहेरचा' आहे.
ज्यांचे पोट भरले आहे अशांची प्रवृत्ती ख्रिस्ती दलितत्वाचे वास्तव सरळसरळ नाकारण्याची असते. याउलट आपल्या दलितत्वाचे वास्तव नाकारले तर ख्रिस्ती असल्याने इतर दलितांना दिल्या जाणाऱ्या सर्व आरक्षणादी सोयीसुविधांवर पाणी सोडावे लागते म्हणून या दलितत्वावर हक्क सांगितलं जातो.
पूर्वास्पृश्य असलेल्या सर्व हिंदू. शीख आणि बुद्ध समाजाला लागू असलेल्या सोयीसुविधा आणि आरक्षण पूर्वास्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजालाही द्याव्यात आणि त्यासाठी इतरांसारखे त्यांचेही दलितत्व मान्य करावेच लागेल. असा हा तिढा आहे.
साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत नव्हते असे अनेकदा झाले आहे. तर जोसेफ तुस्कानो आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.
आतापर्यंत दोनच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांना मी आवर्जून हजर राहिलो आहे, मालवणचे १९९४ चे संमेलन आणि २०११ चे अहमदनगरचे संमेलन.
मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथल्या अनेक मांडवांत आणि व्यासपीठांवर मात्र मी अगदी हौसेने मिरवलो आहे. सत्कारही करवून घेतला आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य (?) प्रवाहातून पहिल्यांदा वेगळी चूल मांडणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास दाद द्यायला हवी. याचे कारण त्यानंतर अनेकांना असा वेगळा संसार मांडण्याचे धाडस झालं आहे.
बीडला होणाऱ्या २६ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास शुभेच्छा !
(फोटो ओळी : पौलस वाघमारे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलीया कार्व्हालो, अनुपमा उजगरे )

Camil Parkhe