Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe

No comments:

Post a Comment