Showing posts with label Lokpal. Show all posts
Showing posts with label Lokpal. Show all posts

Saturday, May 22, 2021

 

हुतात्म्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहता ‘हुतात्मा’ होण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असेच वाटते!
‘अक्षरनामा    पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 31 March 2021
  • पडघममाध्यमनामाअण्णा हजारेAnna Hazareशेतकरी आंदोलनFarmers' Protestहुतात्माMartyr

पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला बातमीदार म्हणून १९८९च्या नोव्हेंबरात रुजू झालो. त्यानंतर काही दिवसांनी एक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे वाढत्या वीजदराबद्दल आणि अनियमित वीजपुरवठ्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला बसले होते. आठव्या-नवव्या दिवशी राळेगण सिद्धीजवळ आंदोलन चिघळून झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात काही शेतकरी ठार झाले होते.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांनी मला ताबडतोब घटनास्थळी जाण्यास सांगितले. ‘लोकसत्ता’चे बातमीदार सुनील कडुस्कर आणि छायाचित्रकार मिलिंद वाडेकर यांच्याबरोबर शिरुरच्या दिशेने निघालो.

पुणे-अहमदनगर हमरस्त्यावर पारनेर फाट्यावर वाडेगव्हाण गावापाशी पोहोचलो. तिथला सन्नाटा थरकाप उडवत होता. रस्त्यालगत असलेल्या त्या गावातल्या चाळीवजा बैठ्या घरांना बाहेरून कड्याकुलुपे लावून लोक गायब झाले होते. शेताकडे गेलो तसे तिथे बायामुलांच्या आणि इतरांच्या रडण्याने काळीज फाटत गेले. रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर कपड्याने झाकलेले मृतदेह दिसत होते. आसपास उभे असलेले शस्त्रधारी पोलीससुद्धा सुन्न दिसत होते. चार-पाच शेतकऱ्यांनी या गोळीबारात जीव गमावला होता. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात ही प्राणहानी झाली, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांच्या गुंडांबरोबर झालेल्या चकमकीच्या म्हणजे एनकाऊंटरच्या घटनेत असे स्पष्टीकरण देण्यात येते.

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर म्हणून याआधी मी सात-आठ वर्षे काम केले होते, पण मृत्यूचे असे तांडव इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ. गोव्यात त्या काळी प्राणघातक अपघात किंवा एखाद्या खुनाची घटना क्वचितच घडायची. दरोड्याची तर एकही घटना मी कव्हर केली नव्हती. त्या वेळी ती झाकलेली प्रेते पाहून मी हबकून गेलो होतो. काही तासांनी पुण्याला परत आलो, तेव्हा अहमदनगरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या वतीने वीजप्रश्नाचा विचार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अण्णा हजारे यांनी लिंबूरस घेऊन आपले बेमुदत उपोषण मागे घेतल्याची बातमी वृत्तसंस्थांनी दिली आहे, असे समजले.

हजारे यांचे हे पहिले बेमुदत उपोषण. यात तीन-चार शेतकऱ्यांनी जीव गमावला, त्यामुळे साहजिकच या आंदोलनाची राज्यभर आणि काही प्रमाणात देशपातळीवर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. त्या काळी अहमदनगर शहरातील किंवा जिल्ह्यातील विविध दैनिकांचे स्थानिक बातमीदार हजारे यांना फारशी प्रसिद्धी देत नसत. त्यांची बातमी द्यावी, असा मुख्यालयातून निरोप आला किंवा अगदी टाळता येत नसेल तरच नाईलाज म्हणून बातमी दिली जात असे. यामागे स्थानिक ताकदवान राजकीय नेतृत्वाचा हजारे यांच्याविषयीचा राग होता, असे मला नंतर समजले.

हजारे आणि माझे पुढच्या काळात व्यक्तिगत संबंध निर्माण झाले. हजारे स्वतः आपली टंकलिखित प्रसिद्धीपत्रके आणि इतर माहिती पोस्टाने पाठवत असत. त्या खाली ‘किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे’ अशी सही असे. मी नियमितपणे या बातम्यांना प्रसिद्धी देत असे.

ही ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यातील काही पत्रे आजही माझ्याकडे आहेत. मात्र ज्या आंदोलनाने हजारे यांना पहिल्यांदाच राज्य पातळीवर आणि देशपातळीवर ओळख निर्माण करून दिली, त्या आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलांचे काय झाले, त्यांना नुकसानभरपाई मिळाली का, वगैरे प्रश्न मला आजही सतावतात. त्यांना हुतात्मे म्हणून कुणी सन्मान दिला नाही, कारण त्या आंदोलनाला कुठल्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे पाठबळ नव्हते.

हजारे यांनीही नंतर या मृत शेतकऱ्यांचा विषय लावून धरल्याचे आठवत नाही. हजारे यांनी राळेगण सिद्धीत ग्रामविकासाचे काम केले. नंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या टर्मच्या अखेरीस जनलोकपालच्या नेमणुकीसाठी अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह ‘जनआंदोलना’चे नेतृत्व करून अण्णा हजारे ‘नव्या स्वातंत्र्यचळवळीचे महात्मा गांधी’ बनले. त्यांच्या सामाजिक चळवळीतील या वाढत्या आलेखाविषयी लिहिणाऱ्यांना त्या चार गरीब शेतकरी आंदोलक हुतात्म्यांविषयी माहितीही नसते.

पुण्याहून अहमदनगरला जाताना वा पुण्याला येताना शिरुरजवळ असलेल्या पारनेर फाट्यापाशी वाडेगव्हाण गावाला आल्यावर आताही मला ते झाकलेले मृतदेह आणि बायामुलांचा तो आक्रोश आठवतो.

बातमीदारांना घटनेचे वार्तांकन करताना प्रत्यक्ष घटनास्थळी असावे लागते, आंदोलन करणाऱ्या लोकांत मिसळावे लागते, अशा वेळी अचानक हिंसाचार झाला तर पत्रकार म्हणून आम्हाला वा त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर कुणालाही कसले संरक्षण असते?

गोव्यात पणजी येथे १९८०च्या दशकात रांपणकारांचे म्हणजे समुद्रात जाळे टाकून मासे पकडणाऱ्या मच्छिमारांचे आंदोलन चालू होते. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी त्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानापाशी असताना कुठूनतरी दगडफेक झाली आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्यसा लाठीमार केला. तेवढ्याने गर्दी न पांगल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मी इतरांप्रमाणेच दिशा दिसेल तिकडे धावू लागलो. पत्रकारितेत नवखा असलो तरी अशा घटनेत स्वतःच्या रुमालाने अश्रुधुरापासून स्वतःचे कसे संरक्षण करावे, हे मी शिकलो होतो. शिवाय अश्रुधुरानंतर गोळीबारही होऊ शकतो, हे मला पक्के ठाऊक होते. निष्कारण हुतात्मा होण्याची गरज नव्हती, हे खरेच होते.

या घटनेनंतर पणजीतल्या मध्ययुगीन राजवाडा असलेल्या सचिवालयातील प्रेसरूममधील काही पत्रकारांनी आंदोलनाच्या आणि इतर संवेदनाशील घटनांचे वार्तांकन करणाऱ्या बातमीदारांनी ‘प्रेस’ असे लिहिलेले आर्म बँड्स वापरावेत अशी सूचना केली होती. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टच्या प्रमोद खांडेपारकर आणि बालाजी गावणेकर वगैरेंनी ती सूचना ‘हास्यास्पद’ म्हणून धुडकावून लावली. अशा ओळखचिन्हामुळे पत्रकार आपसूकच हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते.

औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’मध्ये बातमीदारी करताना घडलेला एक प्रसंग. शहरातल्या गुलमंडी परिसरात काही खोदकाम चालू असताना जमिनीत अचानक मोठे भगदाड पडले आणि खाली वेगवान पाण्याचा प्रवाह दिसू लागला. मध्ययुगीन म्हणजे मुस्लीम आणि नंतरच्या मुघल अमदानीच्या काळात पाणीपुरवठ्याच्या भूमिगत यंत्रणेचे असे अवशेष औरंगाबाद आणि अहमदनगर  शहरांत अधूनमधून दिसतात.

माझा सहकारी असलेला एक तरुण अतिउत्साही बातमीदार लगेचच स्वतःच्या कमरेला दोरखंड बांधून त्या भुयारात शिरून त्या पाण्याच्या प्रवाहाचे स्तोत्र शोधण्याच्या कामाला लागला. त्याला रोखण्याचा मी खूप प्रयत्न केला. त्या अंधाऱ्या भुयारात उतरण्यात खूप जोखीम आहे. दुसरे म्हणजे हे बातमीदाराचे काम नाही. यात काही बरेवाईट झाले तर महिना बाराशे पगार देणारे आमचे दैनिक आतल्या पानावर किंवा फार तर पान एकवर ‘बातमीदाराचे कर्तव्य पार करताना हौतात्म्य’ अशी छायाचित्रासह बातमी छापेल. पण त्याने माझे ऐकले नाही. सुदैवाने त्या पाण्याचा वाहता प्रवाह काही मिनिटांत थांबला. तो सहकारी बातमीदार सुखरूपपणे त्या भगदाडाबाहेर आला आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. तिथे नंतर पोहोचलेल्या महापालिकेच्या लोकांना त्यात फार काही विशेष महत्त्वाचे आढळले नाही.   

पुण्यात ‘सकाळ टाइम्स’साठी पिंपरी चिंचवड शहराचा बातमीदार असताना २०११ साली घडलेली एक घटना आठवते. मावळ तालुक्यातल्या पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बंद पाइपलाइन टाकण्याची योजना मंजूर झाली होती. त्या वेळी विरोधात असलेल्या राजकीय पक्षाने या योजनेस विरोध करून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले होते. अचानक या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि पोलिसांच्या गोळीबारात तीन लोक ठार झाले. आज त्या घटनेस दहा वर्षे झाली, पण निवडणुकीच्या काळात हमखास त्या मृत लोकांना ‘हुतात्मे’ संबोधून प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाविरुद्ध आजही तोफ डागली जाते. ‘या हुतात्म्यांनी सांडलेले रक्त वाया जाऊ देणार नाही’ अशा घोषणांनी आपल्या पारड्यात मते टाकण्यास सांगितले जाते.

या हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याच्या, त्यांच्या मुलाबाळांना सरकारी, महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या आश्वासनांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, अशा बातम्या अधूनमधून येतात. त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांची आज काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत नाही. ‘ज्याचे जळते, त्याला कळते’ असे म्हणतात.

अशा प्रकारे प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या नावावर होणारे राजकारण, सत्ताकारण आणि त्याच वेळी हुतात्म्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहता ‘हुतात्मा’ होण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असे वाटते.

Friday, October 5, 2018

Anna Hazare गेल्या तीन दशकांतील अण्णा हजारे



शनिवार, ६ ऑक्टोबर,  २०१८


गेल्यातीन दशकांतील अण्णा
गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८     goo.gl/mq788E  कामिल पारखे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या गेल्या तीन दशकांतील प्रवासाचा आलेख असंख्य चढउतारांनी भरलेला आहे. एक पत्रकार म्हणून जवळून बघितलेल्या प्रवासाचा हा आढावा.
पुण्यात नव्यानेच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसच्या आवृत्तीत  बातमीदार म्हणून मी नुकताच रुजू झालो होतो. एक दिवस पुणे-अहमदनगर रस्त्यावर  शिरूरजवळ पारनेर फाट्यापाशी शेतकऱ्यांच्या आंदोलनात गोळीबार झाला अशी वृत्तसंस्थांनी बातमी दिली आणि मी, लोकसत्ताचा एका बातमीदार फोटोग्राफरसह लगेचच घटनास्थळी रवाना झालो. हमरस्त्यावर असलेल्या वाडेगव्हाण येथे अगदी हृदयद्रावक परिस्थिती होती.  वीजदर वाढीच्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांचे त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते आणि पोलिसांच्या गोळीबारात पाचसहा शेतकरी ठार झाले होते. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेले होते पण त्या शेतकऱ्यांच्या घरच्या लोकांचा शोक मनाला पिळवटून टाकता होता. तेथून आम्ही तडक अहमदनगरला गेलो. वीजदरवाढीविरुद्ध शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे समाजकार्यकर्ते अण्णा हजारे यांचे तेथे आमरण उपोषण सुरू केले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपोषणाच्या त्या नवव्या दिवशी मिळालेल्या एका राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन मागे घेतले होते. 
आतापर्यंत राळेगण सिद्धीच्या आदर्श गाव चळवळीत स्वतःस झोकून देणाऱ्या अण्णा हजारेंचे हे पहिलेच आंदोलन आणि पहिलेच उपोषण होते! अण्णांची  आणि माझी ही पहिली गाठभेट. सन १९८९च्या अखेरची ही घटना. तेव्हापासून राळेगण सिद्दीची आणि आदर्श गाव योजनेची सीमा ओलांडून अण्णा इतर आंदोलने छेडू  लागले. त्यामुळे एका राष्ट्रीयपातळीवरील  इंग्रजी वृत्तपत्राचा बातमीदार म्हणून माझा त्यांच्याशी  वेळोवेळी संबंध येऊ लागला आणि मग व्यक्तिगत पातळीवरही आमचे नातेसंबंधही  निर्माण झाले.  
त्याकाळात पुण्यात असले की अण्णांचा नारायण पेठेतील मोदी गणपतीच्या जवळ असलेल्या राष्ट्रभाषा समितीच्या इमारतीत मुक्काम असे. राष्ट्रभाषा समितीचे मोहन धारीया आणि अण्णांचे त्यावेळी घनिष्ठ संबंध होते. त्याकाळात इंडियन एक्सप्रेसमधली आम्ही बॅचलर रिपोर्टर मंडळी डेक्कन जिमखान्यातल्या  रानडे इन्स्टिट्यूटसमोरच्या एका लॉजवर कॉट बेसिसवर राहत असू. त्यामुळे अण्णांची माझी वेळोवेळी  भेट होई. आपल्या कामाविषयी, आंदोलनाविषयी अण्णा अनेकदा निळ्या अंतर्देशीय पत्रांवर मराठीत टाईप केलेली पत्रे मला पाठवत असत, त्यांच्याविषयी छापलेल्या बातम्यांची, लेखांची कात्रणे मी त्यांना पोस्टाने पाठवत असे, त्याबद्दल आभार मानण्यासाठीही अण्णा मला पत्र पाठवत असत. मजकुराखाली कि. बा. हजारे (आण्णा) अशी सही असे. (जपून ठेवलेली ही  पत्रे आता वाचताना त्याकाळात पुन्हा एकदा जाऊन आल्यासारखे होते.)
वाडेगव्हाण येथील गोळीबारात सहा शेतकरी ठार झाल्याने या घटनेची इंडियन इक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन पोस्टसारख्या इंग्रजी आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांनी दखल घेतली. त्यावेळी राष्ट्रीय वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर अण्णा पहिल्यांदाच झळकले! अण्णांचे व्यक्तिमत्व हे  वेळोवेळी होऊ शकणाऱ्या बातमीचे एक चांगले स्रोत असू शकतात हे  इंग्रजी वृत्तपत्रांतील आम्हा समवयस्क तरुण पत्रकारांच्या लक्षात आले आणि आम्ही सर्वानीच आपल्या परीने हे न्युज सोर्स बऱ्यापैकी कल्टिवेट केले. यात मी अण्णांच्या सर्वांत जवळचा होतो, म्हणून इतर पत्रकार मित्र माझी वेळोवेळी मदत घेत असत. केवळ एस्क्ल्युझिव्ह बातम्यांच्या वेळीच 'प्रतिस्पर्धी पत्रकार'  म्हणून आम्ही हात आखडून घेत असू आणि यात काही वावगे आहे असे कुणालाच वाटत नसे. 
त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकांत त्याकाळात स्थानिक वृत्तपत्रे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मराठी पत्रकार मंडळी अण्णांविषयी फारसे लिहित नसत. या दशकाच्या उत्तरार्धात अण्णांना इंग्रजी वृत्तपत्रांत आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आणण्यात त्यावेळचे  माझे समवस्यक आणि मित्र असलेले टाइम्स ऑफ इंडियाचे  अभय वैद्य, इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरन आणि मी स्वतः  मोलाची कामगिरी केली. अर्थात यात आमची व्यावसायिक जबाबदारीही होती आणि  आमची वृत्तपत्रे राष्ट्रीय पातळीवर असण्याचा एक मोठा फायदा होता.  त्यामुळे अण्णांचेही न्युज व्हॅल्यू वाढत होते. एकदा तर  अण्णांच्या  विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी माझ्या एका पत्रकार मित्राबरोबर राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता. मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती. शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता  ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या बॅगेत अलगदपणे टाकले होते. अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत मला जाणीव झाली!

याचकाळात राज्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी पहिल्यांदाच दंड थोपटले आणि यासंबंधीची भली मोठी फाइलच त्यावेळच्या राज्य सरकारला सादर केली. त्यानंतर भ्रष्ठाचारी व्यक्तीविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांनी राळेगणात मौनव्रत सूरू केले. त्यांची मुलाखत घेण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि मी राळेगणला तेव्हा गेलो होतो. आम्ही प्रश्न विचारायचो आणि अण्णा एका नोटपॅडवर त्यांची लांबलचक उत्तरे लिहून द्यायचे. तो एकूण प्रकारच खूप गंमतीदार होता. मी त्यावेळी नुकतीच गद्ध्ये पंचविशी ओलांडली होती. अण्णांच्या समोरच बसलेलो असूनही त्यावेळी येणारे हसू रोखणे मला खूपच  कठीण गेले. त्यावेळी  अभयने अण्णांसोबतचा माझा घेतलेला  कृष्णधवल फोटो  आणि आता पिवळी पडलेल्या कागदांवर अण्णांनी लिहिलेली ती प्रश्नोत्तरे आजही  माझ्याकडे आहेत. त्यानंतर  ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनानिमित्त सुरू होणाऱ्या अण्णांच्या आमरण उपोषणाची वार्षिक मालिकाच सुरू झाली. 
अण्णांनीच सांगितलेला वा  मी  कुठेतरी वाचलेला तो एक  किस्सा आजही आठवतो. सन १९९२ची ही घटना. एके सकाळी पारनेर तालुक्याच्या तहसीलदारांची जीप राळेगण सिद्धीला आली आणि अण्णांना घेऊन तातडीने पारनेर तहसीलदार कचेरीत परतली.  दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयातून निरोप आला होता की पंतप्रधानांना अण्णांशी बोलायचे आहे. त्याकाळात लँडलाईन फोन केवळ शहरांतच आणि तेही फक्त श्रीमंतांकडे आणि  मोठया सरकारी कार्यालयातच असत. राळेगणला फोन नव्हताच. त्यामुळे अण्णांना फोन असलेल्या त्यांच्या सर्वांत जवळच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात आले होते. पी. व्ही. नरसिंह राव त्यावेळी पंतप्रधान होते. 
अण्णा तहसीलदार कचेरीत आल्यावर तेथून दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयात फोन लावला गेला आणि अण्णा तेथे आल्याची माहिती देण्यात अली. थोड्या वेळाने दिल्लीहून परत फोन आला आणि काही क्षणात स्वतः पंतप्रधानच फोनवर आले. नरसिह रावांचे मराठीवर चांगलेच प्रभुत्व असल्याने सर्व बोलणे अर्थातच मराठीत झाले. पंतप्रधानांना अण्णांकडून एक हमी हवी होती आणि त्यासाठी त्यांना राळेगणहून बोलावण्यात आले होते. पंतप्रधान अण्णांना पद्मभूषण किताब देणार  होते,  मात्र आपल्या सवयीनुसार अण्णा हा किताब कुठल्याही कारणासाठी  परत करण्याची धमकी देणार नाही अशी हमी नरसिह राव मागत होते.  याआधी मिळालेला पदमश्री हा किताब आपल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात परत करण्याची अण्णांनी अनेकदा धमकी दिली होती. अण्णांनी हसून पंतप्रधानांना तसे वचन दिले आणि काही काळानंतर पद्मभूषण पुरस्कारार्थींमध्ये अण्णांचे नाव झळकले.    
 
यानंतरच्या काळात  पत्रकारीतेतील माझी बीट आणि नंतर कामाचे स्वरूप  बदलल्याने अण्णांशी माझा संपर्क राहिला नाही. याकाळात अण्णांच्या कर्तृत्वाचा आणि प्रसिद्धीचा आलेख सतत वाढतच गेला. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीं - चंद्राबाबू नायडूंनी - आदर्श ग्राम योजनेत त्यांची मदत घेतली. युपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात  लोकपालच्या  नेमणुकीसाठी झालेल्या आंदोलनात तर अण्णांना 'दुसरे गांधी'च संबोधण्यात आले. त्याकाळात अण्णा, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनी देशभर लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले होते. किरण  बेदी गोव्यात वाहतूक खात्याच्या पोलीस उपायुक्त असताना पणजीतील बातमीदार या नात्याने मी त्यांना नेहेमी भेटत असे. लोकपाल आंदोलनाच्या काळात  दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर अण्णा  आणि किरण  बेदी सतत झळकत असताना वृत्तपत्रातील माझे काही सहकारी मला विचारत असत की अण्णा आणि बेदी मला आजही ओळखत असतील काय? यावर  'छे, शक्यच नाही'  असे माझे उत्तर असे !  
लोकपाल आंदोलनानंतर केंद्रांत आणि अनेक राज्यांत सत्तापालट झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतापासून अण्णा फार लांबवर फेकले गेले. त्यानंतर त्यांनी केलेल्या आंदोलनाकडे लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनीही दुर्लक्ष केले. या आठवडयात पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याचा अण्णांनी क्षीण प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने जुन्या काळातील या आठवणींना उजाळा मिळाला.

Bhausaheb Nevarekar
मी कुकडी प्रकल्पावर सन 10/1989 ते 6/1993 या कालावधीत कार्यकारी अभियंता होतो .तेव्हा राळेगणला नेहमीच जाणं होत असे व अण्णाही आमचेकडील कार्यक्रमास येत असत .
अण्णा मुळचे अहमदनगर नजिकच्या भिंगारचे .
राळेगाव सुरवातीस टाटा सोशल फौंडेशनने विकसीत करण्यास घेतले होते .टाटा गृपचे चेअरमन एअर मार्शल मुळगांवकर होते .त्यांच्या पत्नी सौ लिला मुळगावकर या फौंडेशनच्या अध्यक्षा होत्या त्या स्वतः अहमदनगर चे श्री भारदे मंत्री ' उद्योगपती नवलकिशोर यांच्या माध्यमातून राळेगण येथे जलसंधारणाचं काम सुरू केले होते .श्री मुळगावकरांचा अचानक मृत्यू झाला व तो सहन न झाल्याने सौ मुळगावकरांनी फौंडेशन सोडले .राळेगणचे काम रेंगाळले .त्या दरम्यान फौजेतून सेवा निवृत्त अण्णा हे मंत्री भारदेच्या परिचयात होते .मंत्री भारदे व नवलकिशोर फिरोदियानी राळेगणला अण्णा हजारेना पाठवले .

Camil Parkhe
Bhausaheb Nevarekarतुमचे म्हणणे बरोबर आहे. अण्णांच्याही आधी राळेगाव गाव टाटा सोशल फौंडेशनने विकसीत करण्यास घेतले होते चिंचवडचे माझे एक शेजारी त्या प्रोजेक्ट्वरच होते. तेथे जलसंधारणाचं काम आधीच सुरू होते, अण्णांनी ते पुढे नेले. मात्र दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यात ग्रामविकास आणि जलसंधारणाचे पायोनियरींग स्वरूपाचे काम करण्याचे श्रेय फादर हर्मन बाखर या येशूसंघीय (जेसुइट ) ख्रिस्ती धर्मगुरूला द्यावे लागेल. त्यांनी आपला मायदेश स्वित्झलँडच्या मदतीने १९७२च्या दुष्काळात संगमनेर तालुक्यात काम सुरू केले होते. मला वाटते श्री Ramesh Zawar सर यांना याबाबत अधिक माहिती असेल
3
  • Like
Ramesh Zawar
Camil Parkhe ही माहिती मला नवी आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री अण्णासाहेबांच्या पुस्तकातही ही माहिती नाही. पीटीआयचे ज्येष्ठ वार्ताहर नारायण हरळीकर ह्यांनी ह्या विषयावर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांना एक अभ्यास अहवाल सादर केला होता. त्या अहवालातही तुम्ही दिलेली माहिती नव्हती.

Ramesh Zawar
मी बाळासाहेब भारदेंना ज्या ज्या वेळी भेटायला गेलो त्या त्या वेळी बाळासाहेब म्हणायचे, आमचा अण्णा पाहा. पाणी अडवून सिंचनाची योजना राबवण्यासाठी किती धडपड करतोय्!..तुम्ही पत्रकारांनी मुद्दाम राळेगणला येऊन पाह्यलं पाहिजे. भारदे गेल्यानंतरच अण्णांकडे मिडियाचं लक्ष गेलं. तुमची पोस्ट वाचून सगळाच उलगडा झाला!

  • Prasanna Keskar
    फादर बाखर संगमनेर तालुक्यात काम करत होते ना?
    1
    • Like
    • Reply
    • 3 y
  • Ramesh Zawar
    Prasanna Keskar संगमनेर तालुक्यात काम केलेअसेल तर रमेश गुणेंना माहित असेल.
    2
    • Wow
    • Reply
    • 3 y
  • Prasanna Keskar
    Ramesh Zawar फादर बाखर यांनी काम केलं ते नक्की माहिती आहे. राळेगणसिद्धी, निमगाव केतकी, म्हैसाळ वगैरे प्रकल्पाच्या बरेच आधीपासूनच ते काम सुरू होतं हे पण मला माहिती आहे. मी बाखर प्रकल्प संगमनेर तालुक्यात पाहिलेत. माझी आठवण बरोबर असेल तर तिथेच कुठंतरी त्यांचं ट्रेनिंग सेंटर पण आहे. पण फादर बाखर यांचं काय तेव्हा खूप विस्कळीत आणि लहान प्रकल्पाच्या स्वरूपात होतं.
    4
    • Wow
    • Reply




Sukhadeo Kale
अण्णा यांच्या पाणलोट विकास कामाच्या पाठीमागे पाणी पंचायत चे विलासराव साळुंखे यांचे तांत्रिक मार्गदर्शन होते
फादर बाखर यांनी वॉटर ही संस्था स्थापन केली आणि त्यानीं ही काम केले पण एकसलग एक खेडे सर्वांगानी प्रथम विकसित झाले ते मात्र राळेगण सिद्धीचं,नापासाची शाळा,सोलर ऊर्जा, सामूहिक गोबर गॅस ई
जमिनीतर्गत बंधारे(underground dam) ही संकल्पना आम्ही शिकवायचो पण विध्यार्थ्याना ती प्रत्यक्ष काम चालू असताना दाखविण्याची संधी मला मिळाली ती राळेगण लाच
असे अनेक प्रयोग
हिवरेबाजार त्याची आधुनिक आवृती असे म्हटले तर वावगे ठरू नये अशी अनेक गावे विकसित होऊ शकली असती