Sunday, June 30, 2024


How do you greet the pope?

पोप यांना भेटल्यावर त्यांना अभिवादन, संबोधित कसे करतात ?
नुकतीच इटली येथे या शहरात G-7 राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद झाली. भारत या राष्ट्र समूहाचा सभासद नाही तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला एक निमंत्रित म्हणून या परिषदेत सहभागी होता आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत हजर होते.
G-7 बैठक इटलीत होती आणि साहजिकच रोम शहरात मद्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून पोप फ्रान्सिससुद्धा एक निमंत्रित म्हणून या दोन दिवसांच्या परिषदेला हजर होते.
देशातील राजकीय नेत्यांना संबोधित करण्याची पोप यांची अर्थातच पहिली वेळ नाही. पोप पॉल सहावे हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला १९६५ साली संबोधित करणारे पहिले पोप.
हा, तर यावेळी या परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी परिषदेला आलेल्या पोप फ्रान्सिस यांना 'होली फादर' असे संबोधित त्यांचे स्वागत केले, असे बातम्यांत म्हटले आहे.
इटलीचे मूळचे बहुतांश नागरिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले असतात. उदाहरणार्थ, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी. तर कॅथोलिक परंपरेत वाढल्या असल्याने इटलीच्या पंतप्रधान मेलोनो पोप फ्रान्सिस यांना `होली फादर' म्हणूनच अभिवादन करणार यात आश्चर्य नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही कॅथोलीक नसल्याने त्यांनी पोप फ्रान्सिस यांना `होली फादर' म्हणून अभिवादन करण्याची गरज नव्हतीच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन हे रोमन कॅथोलीकआहेत. बिडेन श्रद्धावंत कॅथोलीक आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी भारतात आल्यावर त्या रविवारी त्यांच्यासाठी होली मास साजरा करण्यासाठी एक ख्रिस्ती धर्मगुरु अमेरीकन दुतावासातर्फे बोलावण्यात आला होता.
त्यामुळे अमेरीकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन पोप यांना जेव्हाजेव्हा भेटतात तेव्हा ते त्यांना 'होली फादर' असेच संबोधित असतील, याविषयी शंका नसावी.
मागे २०१६साली येमेन येथे मिशनकाम करणाऱ्या मूळचे केरळचे असलेल्या टॉम युझून्नाळील या डॉन बॉस्को संस्थेच्या धर्मगुरुचे अपहरण झाले होते, त्यांना ओलीस म्हणून ठेवण्यात आले होते. सव्वा वर्षानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि व्हॅटिकन सिटीच्या मध्यस्थीने त्यांची सुटका झाली.
त्यानंतर फादर टॉम यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभारही मानले होते.
भारतात येण्याआधी त्यांनी व्हॅटिकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भारतीय ख्रिस्ती धर्मगुरुने आपल्या परमाचार्यांना कशाप्रकारे अभिवादन केले असेल, याची काही कल्पना करता येईल काय?
फादर टॉम यांनी पोप फ्रान्सिस यांना चक्क भारतीय परंपरेनुसार साष्टांग नमस्कार घालून अभिवादन केले होते.
जगभर पोप जातात तेव्हा त्यांना स्थानिक परंपरेनुसार अभिवादन केले जाते, साष्टांग नमस्कार करुन त्यांच्या विषयीचा आदर अशाप्रकारे बहुधा पहिल्यांदा केला गेला असेल.
पोप फ्रान्सिस यांना आलिंगन देऊन, त्यांची गळाभेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही नक्कीच एकमेव व्यक्ती असणार याविषयी शंकाच नाही.
ख्रिस्ती धर्मातील परमगुरुस्वामी आणि त्याशिवाय राष्ट्रप्रमुखही असलेल्या पोप यांच्याशी हस्तांदोलन कुणीही व्यक्ती - अगदी तळागाळातील सामान्य व्यक्ती, स्त्री अथवा पुरुष - करु शकतो हे विशेष आहे.
शिवाशिव आणि विटाळ वगैरे मुद्दाच नाही. लिंगभेद, वर्णभेद आणि वंशभेदसुद्धा नसतो.
पोप आणि इतर कॅथोलीक व्रतस्थ धर्मगुरु आणि नन्स आजन्म ब्रह्मचारी असतात, तरी ते भिन्नलिंगी व्यक्तीशी हस्तांदोलन करु शकतात. त्यामुळे त्यांचे ब्रह्मचर्य अजिबात खतरेमे येत नाही.
निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती धर्म फार पुढारलेला आहे असे म्हणता येईल.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या स्वच्छ या संघटनेने काही कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना रोममध्ये एका परिषदेसाठी नेले होते.
या सफाई कामगारांची जात काय असेल याविषयी तर्क करण्याची गरजच नाही.
तर त्यापैकी रिबेका या नावाच्या दापोडी झोपडपट्टीतील एका ख्रिस्ती महिलेने पोप फ्रान्सिस यांच्याशी हस्तांदोलन केले होते. `सकाळ टाइम्स' या दैनिकात याबाबत माझी बातमी बायलाईनसह प्रसिद्ध झाली होती.
पोप जॉन पॉल हे संत मदर तेरेसा यांचा चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन त्यांचे कपाळावर अत्यंत मायेने चुंबन घेत असत.
इति पंतप्रधान मोदीजी आणि पोप फ्रान्सिस गळाभेट पुराण.
Camil Parkhe,

केंद्रीय मंत्री

 आज खूप दीर्घ काळानंतर भारतात केंद्रीय मंत्री अशी काही चीज असते हे लक्षात आले.

गेल्या दशकभरात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही दोनच नावे सगळीकडे झळकत होती, अधूनमधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत हे लक्षात यायचे.
रस्ते वाहतूक आणि टोल आकारणी संदर्भात नितीन गडकरी यांचे नाव निदान महाराष्ट्रात तरी लक्षात असते.
दोनअडीच वर्षांच्या त्या भीषण ऐन कोरोना काळात या देशाचे आरोग्यमंत्री आहेत का?, असल्यास कोण आहेत? अशी विचारणा अनेकदा झाल्याचे आपणा सर्वांना आठवत असेलच..
पुणे शहरात मेट्रोच्या विविध टप्प्यांचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनी पुण्यात वारंवार येऊन किंवा त्यांना वेळ नसल्यास दिल्लीतूनच ऑनलाईन केले. काही टप्प्यांचे काम अजून सुरू आहे, त्यामुळे ते पुन्हा अजूनही येतीलच.
त्यामुळे देशात रेल्वेमंत्री किंवा रेल्वे राज्य मंत्री कोण आहेत याची पुण्यातल्या आणि देशातल्या लोकांना कल्पना असेल असे वाटत नाही.
श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली, त्यामुळे काही राजकीय नेत्यांची नावे अणि त्यांनी देशात आणि महाराष्ट्रात सांभाळलेली मंत्रीपदे आजही तोंडपाठ आहेत.
उदाहरणार्थ, बांगलादेश निर्मितीप्रसंगी १९७१ साली परराष्ट्रमंत्री असलेले सरदार स्वर्णसिंग, आरोग्यमंत्री करण सिंग, अर्थमंत्री मधू दंडवते, परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी, नभोवाणी मंत्री लाल कृष्ण अडवानी, पहिले मनुष्यबळ संसाधन मंत्री पी. व्ही. नरसिंह राव, रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र, टी ए पै, जॉर्ज फर्नांडिस, नेहेमी काळा गॉगल वापरणारे गानी खान चौधरी, ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव, संरक्षण मंत्री मुलायम यादव आणि शरद पवार, अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख, वगैरे वगैरे.
या केंद्रीय मंत्र्याची नावे आणि खाते लक्षात राहण्याचे कारण म्हणजे हे मंत्री खरेच त्यांच्या खात्याचा कारभार सांभाळायचे, त्यांच्या खात्याच्या कामासाठी देशभर हिंडायचे, त्यांचे फोटो आणि बातम्या देशभर वृत्तपत्रांत जाहिरातीत आणि इतरत्र झळकायचे.
त्यांच्या खात्याबाबत हे मंत्री पत्रकार परिषदा घेत असत, धोरणे ठरवत असत, निर्णयसुद्धा स्वतः घेत असत.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या सहा महिन्यात पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते.
त्या काळात त्यांनी पुणे, शिवाजीनगर आणि चिंचवड रेल्वे स्थानकांचा केलेला कायापालट आजही नजरेसमोर दिसतो.
भारतीय लोकशाही व्यवस्थेत गेले दशकभर हे सर्व बंद झाले होते.
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला हे वाचून हे मंत्री नक्की होते तरी कोण याबाबत मला उत्सुकता वाटली आणि त्या तीन मंत्र्यांची नावे मला कळाली.
उत्सुकता असल्यास तुम्हीही ही तीन नावे शोधू शकता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा रामदास आठवले यांनी आपल्या खात्याशी निगडित असलेल्या कुठल्या कार्यक्रमाचे कधी उद्घाटन केल्याचे किंवा पत्रकार परिषद घेतल्याचे आठवते का?
जिथे राष्ट्राचे आणि संसदेचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपती यांचें पदसिध्द असलेले अधिकार आणि परदेशात देशाचे प्रतिनिधित्व वगैरे कामेसुद्धा त्यांना करु देली जात नाही, तिथे केंद्रीय किंवा राज्यमंत्री असलेल्या लोकांची काय अवस्था असेल?
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे कालपरवा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री असलेल्या जनता दल (सेक्युलर ) पक्षाच्या एच. डी. कुमारस्वामी यांचे त्यांच्या खात्याशी निगडित असलेले एक विधान वाचले.
आपण यासंदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊ ,असे त्यांचे ते विधान होते.
आज त्यांनी त्याबाबत सारवासारव केल्याची बातमी आहे.
बैलाला आणि रेड्याला औताला, जोत्याला जुंपण्याआधी ठराविक सोपस्कार करावे लागतात, ते बहुधा या नव्या राजवटीत अजून झालेले नसावे.
केंद्रात नव्या आघाडी सरकारच्या राजवटीत ते शक्य नसल्यास लोकशाही व्यवस्थेसाठी ती इष्टापत्ती म्हणावी लागेल.
Camil Parkhe.

पोप फ्रान्सिस भारतभेटीला

इटलीच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी G-7 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.

परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांच्यासमवेत मोदीजी आणि पोप फ्रान्सिस यांचे हे छायाचित्र आहे.
मोदीजी यांनी याबाबत समाज माध्यम Xवर खालील टिपण्णी केली आहे.
“Met Pope Francis on the sidelines of the @G7 Summit. I admire his commitment to serve people and make our planet better. Also invited him to visit India. @Pontifex,”
G7 या राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश होत नसला तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला या बैठकीचे आमंत्रण दिले जाते. इटलीत ही बैठक होत असल्याने व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख या नात्याने पोप फ्रान्सिस यांनाही या बैठकीचे आमंत्रण होते.
याआधी मोदीजी पोपमहोदयांना व्हॅटिकन सिटीमध्ये २०२१ साली भेटले होते. तेव्हाही पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण दिले होते.
दरम्यानच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील काही राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.
इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे पोप फ्रान्सिस यांचा दौरा अचानक होत नाही, याचे कारण त्यांची भेट ही नेहमीच धार्मिक उद्दिष्ट्याची ( Pastoral ) असते, त्यासाठी स्थानिक चर्चतर्फे खूप आधीपासून नियोजन केले जाते.
याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात १९८६ साली दहा दिवसांचा दौरा केला होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली ते पुन्हा तीन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले होते.
पोप यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहेमीच विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांना भेटी दिल्या होत्या. या देशांपेक्षा भारतात ख्रिश्चनांचे प्रमाण फार अधिक आहे.
मोदीजी यांचे भारतभेटीचे आमंत्रण केवळ औपचारीकता नसून अगदी मनापासून असेल तर भारतातील चर्चचे पदाधिकारी आनंदून या दौऱ्याच्या तयारीला लागतील.
भारतातील कॅथोलिक चर्च गेली अनेक वर्षे भारताने पोप यांच्या दौऱ्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
पोप हे राष्ट्रप्रमुखसुद्धा असल्याने कुठल्याही दौऱ्यासाठी त्या देशाचे त्यांना औपचारिक आमंत्रण असणे आवश्यक असते.
भारत सरकारने पुन्हा औपचारिक आमंत्रण दिल्यास काही महिन्यांत पोप फ्रान्सिस यांचा भारतदौरा होऊ शकतो.
या वर्षाअखेरीस नोव्हेंबरात गोव्यात संत फ्रान्सिस झेव्हियरच्या पार्थिवाचे अवशेष दोन महिन्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दर दहा वर्षानंतर होणाऱ्या या प्रदर्शनातून गोव्याला चांगला महसूल मिळत असतो.
संत फ्रान्सिस झेव्हियर हे सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट) किंवा येशूसंघ या धर्मगुरूंच्या संस्थेचे एक संस्थापक.
विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर निवड झालेले पहिलेच जेसुईट धर्मगुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यात गोव्याचाही समावेश असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Camil Parkhe