Showing posts with label Peter Alvares. Show all posts
Showing posts with label Peter Alvares. Show all posts

Monday, June 23, 2025

 

                                        टी. बी कुन्हा


                                               पीटर अल्वारीस
खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मतदारांनी जन्माने ख्रिस्ती असलेली एक व्यक्ती लोकसभेवर निवडून दिली होती.

महाराष्ट्र राज्य त्यावेळी त्यावेळी नुकतेच अस्तित्वास आले होते. महाराष्ट्रातून ख्रिस्ती व्यक्ती देशाच्या संसदेवर निवडून येणे ही फार मोठी ऐतिहासिक घटना होती, त्या निवडणुकीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक खूप ताकदवान राजकीय नेता दिला.
निवडून आलेल्या त्या व्यक्तीने देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर फार मोठा दूरगामी प्रभाव केला.
लोकसभेत पाठवलेल्या त्या नेत्याचे नाव होते जॉर्ज फर्नांडिस.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस यांची १९६७ साली निवड करताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी फर्नाडिस किंवा काँग्रेसचे स. का. पाटील यांचा धर्म किंवा जात विचारात घेतलीच नव्हती.
अरुण साधू यांच्या ‘आज दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबरींवर आधारीत असलेल्या जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेल्या `सिहासन' चित्रपटातील डिकॉस्टा या कामगार नेत्याचे पात्र हे जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बेतलेले आहे असे म्हणतात.
सतीश दुभाषी यांनी हे पात्र साकारले होते.
त्यावेळची १९६७ ची लोकसभा निवडणुकीत आजही ऐतिहासिक ठरते याचे कारण त्यावेळी पहिल्यादाच बलाढ्य गणल्या गेलेल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात अपयश चाखावे लागले.
त्यावेळी देशात अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रातसुद्धा विरोधी पक्षांचे नेते लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यापैकी बहुतेकांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला.
जॉर्ज फर्नांडिस यांचासुद्धा.
जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर अनेकदा बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीप्रमाणेच धर्माची बाब त्यांच्या या निवडणुकांत कधीही आडवी आली नाही.
मूळचे मॅंगलोरचे असलेले जॉर्ज तरुणपणी फादर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत दाखल झाले होते ! ( दहावीच्या परीक्षेनंतर मी पण जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात आलो होतो. )
जन्माने ख्रिस्ती असलेली आणखी दोन व्यक्ती ख्रिस्ती बहुसंख्य नसलेल्या मतदारसंघातून अनेकदा निवडून आलेल्या आहेत. जॉर्ज फर्नाडिस यांच्याप्रमाणेच ही व्यक्ती सर्वांना परिचित आहे. त्या आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी.
त्याशिवाय तिसरी व्यक्ती म्हणजे एन. के. पी. साळवे.
'महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाची ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे एन. के. पी.
(नरेंद्र कुमार प्रसादराव) साळवे. ते १९६७ ते १९७७ या काळात लोकसभेचे सभासद होते.
त्याशिवाय राज्यसभेवर ते चार वेळेस निवडून गेले होते आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्रीसुद्धा होते.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस किंवा सोनिया गांधी यांना ख्रिस्ती व्यक्ती म्हणून संबोधने त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, त्यांना ते आवडले नसते याची मला पूर्ण कल्पना आहे.
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे किंवा समाजवादी नेते ना. ग. गोरे यांना ब्राह्मण म्हणून संबोधने असाच काहीसा हा प्रकार आहे.
रोमन कॅथोलिक कुटुंबांत जन्मलेल्या जॉर्ज फर्नांडिस आणि सोनिया गांधी यांचा परंपरेनुसार बाप्तिस्मा झाला होता. त्याचप्रमाणे नानासाहेब गोरे किंवा कॉम्रेड डांगे हे ब्राह्मण कुटुंबांत जन्मले होते आणि त्यांनी आपले ब्राह्मण्यत्व कधीही मिरवले नव्हते.
जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच इतरही अनेक ख्रिस्ती व्यक्ती मुंबईच्या समाजकारणात आणि राजकारणात त्याकाळात सक्रीय होत्या.
जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या क्षितिजावर अवतरण्यापूर्वी खूप वर्षे आधीच त्यांचा मुंबईच्या समाजकारणात आणि चळवळीत वावर होता.
वसईचे `काका' जोसेफ बॅप्टिस्टा असेच एक नाव. बाळ गंगाधर टिळक यांचे एक जवळचे सहकारी.
चिरोल बदनामी खटल्यात विलायत वारीत जोसेफ बॅप्टिस्टा यांनी टिळकांना साथ दिली होती. त्याशिवाय `होम रुल' चळवळीचे ते एक प्रमुख नेते होते.
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे टिळकांचे ऐतिहासिक वाक्य मूळचे काका जोसेफ बॅप्टिस्टा यांचे आहे असेही काही जण म्हणतात.
वसईत आता त्यांच्या नावाने एक ज्युनियर कॉलेज आहे.
जॉर्ज फर्नाडिस यांच्यापूर्वी खूप वर्षे आधी एका ख्रिस्ती कामगार नेत्याची मुंबईतून आमदार म्हणून निवड झाली होती.
समाजवादी पक्षाचेच असलेले पीटर अल्वारीस हे त्यांचे नाव.
पीटर अल्वारीस हे मूळचे गोव्याचे. गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध उठाव करण्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गोवा सोडून मुंबईत त्यांनी गोवा मुक्तीसाठी कार्य सुरु केले.
पीटर अल्वारीस हे मुंबई विधानसभेचे ते १९४९ ते १९५२ या काळात आमदारसुद्धा होते. त्यांच्या रूपाने एक कामगार नेता पहिल्यांदा आमदार झाला होता.
गोवा १९६१ साली मुक्त झाल्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून पीटर अल्वारीस पणजी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने अल्वारीस यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला होता.
गोव्यातल्या पोर्तुगीज वसाहत राजवटीविरुद्ध संघर्ष उभारणारे टी. बी कुन्हा (त्रिस्ताव डी ब्रागांझा कुन्हा) यांनी मुंबईतून आपले राजकीय कार्य सुरु ठेवले होते.
येथे अधिक ठळकपणे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच या सर्व व्यक्ती केवळ जन्मानेच रोमन कॅथोलिक होत्या.
यापैकी बहुतेक जण एकतर डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीच्या होत्या. काही पूर्ण नास्तिक होते.
नास्तिक असल्यामुळे टी. बी. कुन्हा यांना मुंबईतील कॅथोलिक कबरस्थानात चिरविश्रांतीसाठी जागा मिळाली नव्हती. त्याऐवजी त्यांचे पार्थिव प्रोटेस्टंट कबरस्थानात पुरण्यात आले होते.
एके काळी नाकारलेल्या गेलेल्या टी. बी. कुन्हा यांच्या याच पार्थिवाच्या अवशेषाला आता पणजीतल्या आझाद मैदानातील स्मारकात अत्यंत सन्मानाची जागा मिळाली आहे.
प्रजा समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो हे सत्तरच्या दशकात माटुंगा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जात असत. मुंबईच्या माटुंगा, चेंबूर, बांद्रा, अंधेरी, आणि इतर परिसरांत मूळचे गोमंतकीय तामिळ आणि मल्याळी असलेल्या ख्रिस्ती लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे.
खूप वर्षांपूर्वी जनता दलाचे डॉमिनिक गोन्सालवीस वसईतून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते.
डॉ. लिऑन डिसोझा यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होते. आमदार म्हणून निवडले गेल्यानंतर काही काळ ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीसुद्धा होते.
नव्वदच्या दशकात महाराष्ट्र मंत्रिमंडळात सेलीन डिसिल्व्हा या मंत्री होत्या.
सेलीन डिसोझा यांच्या कन्या जेनेट डिसोझा यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या उपाध्यक्षा म्हणून कार्य केले आहे.
आता हा भूतकाळ झाला आहे. मात्र हा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.

Camil Parkhe

Sunday, May 8, 2022

 

 गोवा मुक्ती  - नानासाहेब गोरे

पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात  स्पष्ट केली होती. ‘’आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.

‘’परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत  बंधुप्रेमाने एकत्र येतील,  शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.

पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल.  पण अखेर असेच घडले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.

कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या पंतकालीन मराठी साहित्यिकांची तोपर्यँत गोमंतकाबाहेरच करत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावे’ अशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.

पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी दिवंगत एस. एम. जोशी यांची घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. ‘’एसेम  यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले. पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली,’’  जुन्या आठवणींना उजाळा देत नानासाहेब म्हणत होते.

ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मग ती सशस्त्र असो व निशस्त्र पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.

गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा विमोचन सहायक समितीचे नानासाहेब गोरे एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली. समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही येवेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती. आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस, त्रिस्तव बॅ ब्रागांझा कुन्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वात्यंत्रसेनानींची  याप्रसंगी भाषणे झाली होती.

नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी  व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८  पर्यंत पोहोचली. यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. ३ उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती.

या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात,  ‘’ गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. भारत छोडो ये १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती यावेळीही आम्हाला दिसून आली.’’

आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते,  ‘’ ज्या परिस्थितीत गोवा, दमण आणि  दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही कारणीभूत  होऊ इच्छितो, ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा-दमण-दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे.  तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकराव्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढा दिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील.”

या पत्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू याना पाठविण्यात आली होती.

या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना  यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. त्रिदिबकुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अम्नेस्टी इंटरनॅशनलमुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.

केवळ  स्वातंत्र्याचे  नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती.

“या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आईवडिलांना धक्काच  बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले,’’  असे नानासाहेब म्हणतात. नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.

नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात अशी विचारणा पंतप्रधान नेहरूंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली. ”पण ही  पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत,”  नानासाहेबांनी मला हसत हसत सांगितले.

नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेवढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.

या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळ सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू श्री. पीटर अस्वारीस,  बॅरिस्टर नाथ पै आणि श्री. गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली.   ‘’ गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र करू शकतील काय?’’  असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला. पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचे कधीच मागे गेला आहे आता एकाच पर्याय राहिलेला  आहे म्हणजे लष्करी कारवाई ‘’ असे मी पंडितजींना दिले असे श्री.  गोरे  म्हणतात .

” लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले व पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती,”  श्री. गोरे पुढे म्हणतात.

स्वातंत्र्यसैनिकांचा सशस्त्र निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला.  अन शेवटी नेहरुंच्या आदेशावरुन भारतीय सेनेने  गोवा, दमण आणि दिवमध्ये प्रवेश केला अन गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्म्यांनी सांडलेले रक्त आणि  स्वातंत्र्यसैनिकांचे  श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला.