Showing posts with label St. Thomas. Show all posts
Showing posts with label St. Thomas. Show all posts

Monday, August 24, 2026


मानवी इतिहासातील धर्मांतरे .. स्वातंत्र्याची ऐंशी वर्षे साजरा करणाऱ्या देशाने अलीकडेच स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि लागोपाठ राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्रात धर्मांतर स्वातंत्र्य कायदा मंजूर केला.

पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च शहराचा एक मौलिक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा आहे.
या पवित्र नाम देवालयाच्या एकशेतीस फूट उंचीच्या टोलेगंज मनोऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या जाडजूड घंटांच्या नादांतून नियमितपणे संगीत निर्माण केलं जाते.
दरवर्षी ख्रिस्तजयंतीला या घंटानादातून ख्रिस्तजन्माची मराठी मधुर गीते किंवा ख्रिस्तमस कॅरोल्स गायली जातात. तसेच देशाच्या स्वातंत्र्यादिनी `जन गण मन अधिनायक जय हे' हे राष्ट्रगीत गायले जाते.
ख्रिस्ती देवळाच्या घंटानादातून स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीताचे स्वर गायले जाण्याची देशातील ही बहुधा एकमेव प्रथा असावी.
तर एकशेचाळीस वर्षे जुने असलेल्या या देवालयाच्या वर्धापनदिनानिमित्त येथे सप्ताहभर उपासना चालू होत्या.
त्यानिमित्त येथे मराठी गायने, भजने आणि कीर्तने टाळ, तबला वगैरे पारंपरिक भारतीय वाद्यसंगीताच्या सुरात होत असल्याने `हा तर चक्क धर्मातराचा प्रयत्न' असा आरोप झाला आहे.
संपूर्ण जगात केवळ आशिया खंडात प्राचीन काळापासून विविध धर्मांची आणि साहजिकच त्याचबरोबरच धर्मपरिवर्तनाची परंपरा आहे.
भारतात प्राचीन काळापासून आस्तिक आणि नास्तिक विचारधारा किंवा दर्शने परंपरा आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात नास्तिक आणि आस्तिक या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आस्तिकता आणि नास्तिकतेसाठी भारतीय दर्शनशास्त्रात ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा वेदप्रामाण्य हाच निकष आहे.
वेदप्रामाण्य मानणाऱ्या तसेच वेद अपौरुषेय आहेत, मानवनिर्मित नाहीत असे मानणाऱ्या विचारधारांना किंवा दर्शनांना आस्तिक दर्शने संबोधली जातात.
चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत, म्हणून ही दर्शने नास्तिक समजली जातात.
सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे भारतीय इतिहासातील एक मोठे, दूरगामी परीणाम करणारे धर्मांतर मानले जाते.
अशोकाने आपला बौद्ध धर्माचा केवळ भारतवर्षांत नव्हे तर इतरही देशांत प्रचार केला, त्यामुळे आशियातील अनेक देशांतील लोक बौद्धधर्मीय बनले.
भारतातील वेरुळ, कैलास वगैरे प्राचीन गुंफा आणि लेणी यावरून देशात एके काळी बौद्ध धर्माचे लोण किती खोल आणि दूरपर्यंत पोहोचले होते याची साक्ष देतात.
भारतीय उपखंडात सम्राट अशोक यांचे बौद्ध धर्मप्रसाराच्या जे स्थान आहे तेच स्थान पाश्चात्य राष्ट्रांत रोमचा सम्राट कॉन्स्टंटाईन द ग्रेट याचे ख्रिस्ती धर्मप्रसाराबाबत आहे.
तिसऱ्या दशकात या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्विकारुन त्या धर्माला राजाश्रय पुरवला. ख्रिस्ती धर्माला आपल्या साम्राज्याचा अधिकृत धर्म बनवला. याचाच परिणाम म्हणून नंतर ख्रिस्ती धर्म युरोपात आणि इतरत्र पसरला.
आद्य शंकराचार्य यांनी वैदिक धर्माचा संपूर्ण देशभर पुन्हा प्रचार केला आणि त्यानंतर बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ नामशेष झाला.
तेराव्या शतकात उत्तर भारतात सुलतानी राजवट सुरु झाली, तेव्हा इस्लाम धर्माची देशात बीजे रोवली गेली. सुलतानी राजवटीनंतर बाबरपासून तो थेट बहादूर शाह जफरपर्यंत तब्बल सहाशे वर्षे अख्ख्या भारतात म्हणजे दख्खनपर्यंत मुघल राजवट म्हणजे मुस्लिमांची सत्ता होती.
जवळजवळ आठ शतकांच्या या दीर्घ कालावधीत येथील बहुसंख्य जनता हिंदूच राहिली हे विशेष.
वसईत अल्पकाळात आणि दक्षिण गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत जसे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर झाले तसे मुस्लीम राजवटींत इस्लाममध्ये घाऊक धर्मांतर झाले नाही हा मोठा फरक आहे.
सम्राट अकबर यांच्या काळात तर धर्मपरिवर्तनाचा एक आगळावेगळा प्रयोग झाला.
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्माच्या पंडितांशी वेळोवेळी चर्चा करुन अकबराने स्वतःचाच `दिने इलाही’ हा धर्म स्थापन केला. हा धर्म अकबरानंतर लयास गेला.
मुसलमान झालेल्या नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मांत आणले गेले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातले एक गाजलेले धर्मांतर प्रकरण.
येशू ख्रिस्त हा स्वतः आशियाई राष्ट्रातल्या इस्राईलमधील गॅलिली प्रांताचा. येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी संत थॉमस भारतात इसवी सन ५२ला आला आणि त्यांनी दक्षिणेत केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची बीजे रोवली.
भारतात ख्रिस्ती धर्माची अशी दोन हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्यामुळे केरळमधील ख्रिश्चन समुदाय स्वतःला सेंट थॉमस ख्रिश्चन्स किंवा ख्रिश्चन्स असे संबोधतो.
तामिळनाडू तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले डॉ. पी. सी. अलेक्झांडर आणि बुकर प्राईझ विजेत्या अरुंधती रॉय या सिरियन ख्रिश्चन समाजाचे काही नावाजलेले प्रतिनिधी.
गोव्यात आणि दक्षिणेत तामिळनाडू परिसरात मध्ययुगात पाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला.
देशातील वरच्या आणि खालच्या जातींजमातींतील लोक अशाप्रकारे ख्रिस्ती झाले, त्यामुळेच भारतातील ख्रिस्ती समाजात या देशातील बहुसंख्य समाजात असलेल्या सर्वच जाती आणि जमाती आढळतात, जातीभेदसुद्धा असतात.
मध्ययुगात वसई आणि `ओल्ड काँक्वेस्ट’ म्हणून गणल्या गेलेल्या दक्षिण गोव्यात पोर्तुगीज राजसत्तेच्या मदतीने ख्रिस्ती धर्माचा जोरदार प्रचार झाला.
त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या साधनांचा सर्रास वापर करण्यात आला आणि तेथील बहुसंख्य लोक ख्रिस्ती झाले.
नंतरच्या काळात मात्र ख्रिस्ती धर्मांतराची लाट पूर्णतः थंडावली आणि न्यु काँक्वेस्ट म्हणजे उत्तर गोव्यातली, तसेच दमण, दीव आणि सिल्व्हासा येथील बहुसंख्य जनता हिंदुच राहिली.
या पोर्तुगीजांकडूनच ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट हे लग्नात आंदण, हुंडा म्हणून मिळाले आणि या व्यापारी कंपनीने मग संपूर्ण भारत देशच आपल्या ताब्यात घेतला.
मात्र पोर्तुगीजांप्रमाणे ब्रिटिश सत्तेने ख्रिस्ती धर्मांतरास कधीही, कुठल्याही प्रकारे पाठबळ दिले नाही.
भारतात दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतसुद्धा ख्रिस्ती धर्मांतरांचे प्रमाण अगदी अल्प आणि नॉर्थ ईस्टसारख्या काही ठराविक प्रदेशांपुरते मर्यादित राहिले.
ख्रिस्तीधर्मिय ब्रिटिश राजवटीतसुद्धा येथील ख्रिस्ती लोकांची संख्या दोन टक्क्यांहून अधिक पुढे जाऊ शकली नाही.
ब्रिटिश अमदानीत एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मांतरांच्या अनेक घटनांनी खळबळ माजवली.
कारण सुरुवातीच्या काळातली ही सर्व धर्मपरिवर्तने त्यावेळी उच्चभ्रू आणि सधन पारशी आणि ब्राह्मण वर्गांतून झाली होती.
चित्पावन ब्राह्मण पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, `स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, `यमुनापर्यटन' कादंबरी लेखक मराठीतले पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी वगैरेंच्या धर्मांतरांनंतर महाराष्ट्रात मोठी वादळे निर्माण झाली होती.
त्यावेळी देशात पहिल्यांदाच कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले होते, त्यामुळे धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या पारशी तरुणांच्या धर्मांतरांबाबत मुंबईत स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन यांच्याविरुद्ध अनेक कोर्ट कचेऱ्या, हेबियस कॉर्पस याचिका दाखल झाल्या.
या पारशी तरुणांच्या ख्रिस्ती धर्मपरिवर्तनांमुळे मुंबईत सुरु झालेल्या स्कॉटिश मिशनच्या पहिल्यावहिल्या आधुनिक शाळा काही काळ विद्यार्थ्यांअभावी ओस पडल्या होत्या.
भारतातील पहिल्या महिला वकील कोर्नेलिया सोराबजी यांचे वडील सोराबजी खारसेटजी लांगराना यांना ख्रिस्ती झाल्यामुळें मोठया संकटांना सामोरे जावे लागले होते.
पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत जोतिबा फुले शिकत असताना त्यांच्या काही सहअध्यायी तरुणांनीसुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.
``इ. स. १८४६ मध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला,’’ असे ग. बा. सरदार यांनी लिहिले आहे.
ख्रिस्ती न होता महात्मा जोतिबा फुले यांनी प्रागतिक विचाराच्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि लग्न वगैरे कार्यांत पुरोहित वर्गाची दलाली पूर्णतः नाकारली.
हिंदू धर्मांतून ही ख्रिस्ती धर्मांतरे झाली त्याचप्रमाणे विसाव्या शतकात ख्रिस्ती धर्मांतून हिंदू धर्मांत झालेली धर्मांतरेसुद्धा विविध कारणांनी गाजली.
या उलट्या प्रवाहातील काही धर्मांतरांचे मोठया उत्साहात स्वागत झाले तर काही व्यक्तींना त्यामुळे समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावामुळे ब्रिटिश तरुणी एलिझाबेथ मार्गारेट नोबल यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्या भगिनी निवेदिता बनल्या.
`सकाळ' दैनिकाचे संस्थापक संपादक नारायण भिकाजी नानासाहेब परुळेकर यांचा विवाह फ्रेंच महिला जेनेव्हिव्ह यांच्याशी झाला आणि विवाहानंतर त्यांनी शांताबाई हे नाव स्वीकारले.
`ज्ञानकोश'कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जर्मन ज्यू असलेल्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि शीलवती हे नाव धारण केले. त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिलेले आहे.
डॉ. केतकरांच्या पश्चात शीलवती केतकर यांनी केतकरांचे ज्ञानकोशांची विक्री करण्यासाठी किती खस्ता खाल्या याविषयी दुर्गा भागवत यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेले एक धर्मांतर म्हणजे `केसरी' दैनिकाचे संपाद्क आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू (मुलीचा मुलगा) असलेले ग. वि. (गजानन विनायक) केतकर यांनी एका परदेशी महिलेशी केलेला विवाह.
केतकर यांनी एका परदेशी ख्रिस्ती महिलेशी प्रेमविवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहानंतर पुणतात मोठे वादळ निर्माण झाले होते आणि केतकरांना 'केसरी' चे संपादकपद सोडावे लागले होते.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी बौद्ध धर्मात आपल्या असंख्य अनुयायांसमवेत केलेल्या धर्मांतराची मानवी इतिहासात एक खूप आगळेवेगळे धर्मांतर म्हणून केली जाईल. '
नाशिक जिल्ह्यात येवला येथे १९३५ साली `` मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी प्रतिज्ञा केली.
धर्मांतर रोखण्यासाठी आज कायकाय केले जाते. मात्र नवलाची बाब म्हणजे बाबासाहेबांचे धर्मांतर रोखण्यासाठी तेव्हाच्या सामाजिक आणि धार्मिक पुढाऱ्यांनी कसलीही पावले उचलली नव्हती.
ही घोषणा तब्बल तीन दशकांनी प्रत्यक्षात उतरवली गेली तेव्हा या महामानवाबरोबर नव्या धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपुरात हजारो लोक जमले होते.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील वंचित समाजात ख्रिस्ती धर्मपरिवर्तन सुरु झाले तेव्हासुद्धा बहुसंख्य समाजाने त्याकडे सरळसरळ कानाडोळा केला होता.
याचाच परिणाम म्हणून एकोणिसाव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा,, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यातील अनेक गावाच्या गावे पुर्णतः ख्रिस्ती बनली होती.
अर्थातच हे सर्व लोक वंचित जातींजमातींतील होते.
स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतरानंतर यापैकी अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी नंतर स्वतःहून घरवापसी केली अन हिंदू किंवा बुद्ध धर्मांत राहणे पत्करले.
कुठलाही गाजावाजा न करता झालेले हे पुनर्धर्मांतर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना वगैरे जिल्ह्यांत आणि विदर्भात अमरावती, नागपूर वगैरे परिसरात घडले.
त्या कुटुंबांच्या दृष्टीने एका अर्थी हे बरेच घडले.
कारण त्यामुळे अनुसूचित जातींसाठी असलेल्या सर्व आरक्षणादी सुविधा त्यांना मिळत राहिल्या, त्यांचेच भाऊबंद असलेली ख्रिस्ती कुटुंबे मात्र त्यापासून वंचित राहिले.

Camil Parkhe

नाशिकच्या बाळ येशू तीर्थक्षेत्रातील हा फोटो

Saturday, August 26, 2023

 


मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…