Friday, January 26, 2024

   वझीर बेग  


भारतात मुस्लीम मुलींसाठी पहिली आधुनिक शाळा सुरु करणारे  वझीर बेग  

 अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात पाय रोवू लागली आणि त्यानंतर  देशात आधुनिक शिक्षणपद्धत रुढ झाली. अमेरिका आणि इंग्लंडमधून धर्मप्रसारासाठी  आलेल्या ख्रिस्ती मिशनरींनी  या देशात पहिल्यांदाच विविध धर्मांच्या आणि जातीजमातींच्या मुलांमुलींसाठी आधुनिक शिक्षणाची दरवाजे खुली केली.  या शिक्षणास सर्वांत प्रखर विरोध झाला तो इथल्याच लोकांकडून. या शाळांत शिकण्यासाठी मुलांमुलींना गोळा करणे हे अत्यंत अवघड काम होते. अनेकदा या मुलांमुलींनी शाळेत यावे यासाठी दरवेळेस त्यांना पैसे, कपडेलत्ते पुरवावे लागत असे. मुलांमुलींच्या पालकांच्या शिक्षणाबाबतच्या अनास्थेमुळे नव्याने सुरु झालेल्या  या शाळा अल्पावधीत बंद पडत असत. 

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८४०च्या दशकाच्या मध्यात पुण्यात केवळ मुस्लीम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली होती आणि या शाळेतील शिक्षक होते वझीर बेग.   

 पुण्यातच एका मुस्लीम कुटुंबात जन्म झालेल्या आणि तरुणपणात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या वझीर बेग यांच्याकडे भारतात केवळ मुस्लीम मुलींसाठी आधुनिक शिक्षणपद्धतीची असलेली पहिलीवहिली शाळा सुरु करण्याचे श्रेय जाते.      

 

वझीर बेग यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या जेम्स मिचेल यांच्या शाळांत झाले होते.    जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल या मिशनरी दाम्पत्याचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला.  बेग यांचा ख्रिस्ती धर्माकडे १८४२ पासून ओढा होता, मात्र उघडपणे त्यांनी आपली धर्मश्रद्धा व्यक्त केली नाही. आपल्या धर्मांतराचा आपल्या मुस्लीम कुटुंबावर काय विपरीत परिणाम होईल या शंकेने त्यांनी आपली धर्मश्रद्धा लगेचच प्रकट केली नाही.  मिशनरी शाळांत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वझीर बेग याच शाळांत ते शिक्षक बनले.

दरम्यान १८४५ च्या काळात पुणे स्कॉटिश मिशनच्या शाळांतले सर्वांत महत्त्वाचे स्थानिक शिक्षक असलेल्या वझीर बेग यांना धारवाड गव्हर्नमेंट स्कुलचे मुख्याध्यापक पद देऊ करण्यात आले होते. यासाठी त्यांना दरमहा शंभर रुपये पगार देण्यात येणार होता.  त्याकाळात इतका भरघोस पगार दिला जात असतानासुद्धा वझीर बेग यांनीं मात्र हे पद घेण्यास नकार दिला. (रॉबर्ट  हंटर पान २५९

 वझीर बेग यांचा जन्म १८२४ चा. जोतिबा फुले यांच्यापेक्षा वझीर बेग तीन वर्षांनी मोठे होतेजोतीराव फुले यांनी जेम्स मिचेल यांच्या शाळांत १८४१ ते १८४७ या काळात इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. याचा अर्थ काही काळ वझीर बेग आणि जोतिबा फुले रेव्हरंड मिचेल यांच्या शाळेत सहाद्यायी होते. वझीर बेग १८४५ ला या मिशनरी शाळेत शिक्षक होते आपल्याहून वयाने काही वर्षे लहान असलेल्या जोतिबांना बेग  यांनी नक्कीच शिकवले असणार.

 

दरमहा शंभर रुपये पगार असलेली सरकारी नोकरी नाकारुन वझीर बेग यांनीं  मोठा आर्थिक त्याग करण्यामागचे  कारण आणि मिशनच्या कार्याबाबत त्यांची आवड ओळखणे काही अवघड नव्हते. लवकरच वझीर बेग यांनीं आपला बाप्तिस्मा करण्यासाठी अर्ज केला.  त्याशिवाय शुक्रवारी १८ सप्टेंबर १८४६ रोजी त्यांनीं मुंबईत असलेल्या आपल्या वडिलांना एक पत्र लिहून याबाबत कल्पना दिली.

 

वझीर बेग यांचे वडील एच. एम.  २२ रेजिमेंटमध्ये मेसमन म्हणून नोकरीला होते. बाप्तिस्मा घेण्याचा आपला बेग यांनी इरादा व्यक्त  केल्यानंतर  त्यांच्याच सहमतीने या निर्णय स्कॉटिश मिशनच्या शाळांत जाहीर  करण्यात आला. साहजिकच पुणे शहरातसुद्धा ही बातमी वेगाने पसरली. वझीर बेग यांचे मित्र आणि नातेवाईक स्कॉटिश मिशनच्या कुंपणात येऊन वझीर बेग यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागले. 

शब्बाथच्या दिवशी वझीर बेग यांचा  बाप्तिस्मा होणार होता. त्यादिवशी अनेक लोक मिशन हाऊसमध्ये जमले, मुंबईतून तातडीने पुण्याला आलेले  वझीर बेग यांचे वडीलसुद्धा  तेथे हजर होते. वझीर बेग यांना  त्यांच्या घरी काही काळासाठी येण्यासाठी आग्रह करण्यात आला. वझीर बेग एकदा त्यांच्या घरी आले कि त्यांना तेथून परत स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये पाठवले जाईल याबाद्दल शंकाच होती. आणि ते खरेच ठरले. 

अखेरीस याबाबत मॅजिस्ट्रेटकडून खातरजमा करण्यात आली आणि वझीर बेग यांना त्यांच्या घरच्या लोकांच्या, नातेवाईकांच्या  आणि इतरांच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. वझीर बेग यांचा गुरुवारी २४ सप्टेंबर १८४६ रोजी बाप्तिस्मा झाला. यावेळी वझीर बेग यांचे वय २२ वर्षे होते.   

या प्रसंगी वझीर बेग यांच्या वडलांचे आपल्या मुलांबाबतचे वर्तन अत्यंत उल्लेखनीय असेच होते.  त्य्यांच्या चिरंजिवाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी त्याचे घरात असलेले सर्व कपडे त्याच्याबरोबर दिले. काही काळापूर्वी त्यानी वझीर यांना एक महागडे सोन्याचे घड्याळ दिले होते, ते घड्याळसुद्धा  आणि एक सोन्याची साखळी त्यांनी आपल्या मुलाला दिली. वझीर बेग यांच्याप्रमाणेच त्यांना इतर नातेवाईकांचे आणि मुस्लीम मित्रांची वागणूक होती. त्यानंतर  वझीर बेग दररोज स्कॉटिश शाळांत शिकवण्यासाठी घरातून बाहेर पडत तेव्हा त्यांच्या जाण्याच्या आणि परत येण्याच्या वेळी नंतर कुणीही त्यांना त्रास दिला नाही. 

स्कॉटिश मिशनच्या शाळेत बेग हे एक उत्तम शिक्षक मानले जात असत.  ख्रिस्ती झाल्यानंतर स्कॉटिश मिशनच्या आवारातच वझीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु केली होती.

 पुण्यामुंबईत स्कॉटिश मिशनच्या शाळांतले ब्राह्मण आणि पारशी  विद्यार्थी ख्रिस्ती झाल्यानंतर या दोन्ही शहरांत खळबळ माजली होती, मुंबईत पारशी समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने तर बराच काळ तणाव निर्माण झाला होता.  अशाच प्रकारचे प्रसंग वझीर बेग यांच्या ख्रिस्ती होण्याने पुण्यात निर्माण होईल असे वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही.  या घटनेच्या वेळी पुण्यातल्या स्कॉटिश शाळांत १३० विद्यार्थी होते. त्यानंतर ही संख्या १०७ पर्यंत कमी झाली होती, मात्र यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनीं या शाळांतील आपला अभ्यासक्रम संपवून पुढील शिक्षणासाठी ही शाळा सोडली होती.     

बाळा गोपाळ जोशी हा अनाथ असलेला  ब्राह्मण तरुण जेम्स मिचेल यांच्या मिशन शाळेत तीन वर्षे शिकत होता. जोतिबा फुले यांचा तोसुद्धा सहाद्यायी.  मुंबईहून जॉन मरे मिचेल पुण्यात आले तेव्हा १८४६च्या ऑकटोबरात तो त्यांच्यासह मुंबईला शिकण्यासाठी गेला.   मरे मिचेल यांच्या सहवासात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. मात्र बाप्तिस्मा घेण्यासाठी बाळा गोपाळ जोशी यांना पुण्यात जेम्स मिचेल यांच्याकडे परत पाठवण्यात आले. 

याचे कारण म्हणजे बाळा यांच्या ख्रिस्ती होण्याच्या उदाहरणाचा पुण्यातल्या त्यांच्या संबंधित विद्यार्थी आणि इतरांवर प्रभाव पडेल अशी मिशनरींना आशा वाटत होती. त्याशिवाय मुंबईत आणखी एक ब्राह्मण विद्यार्थी ख्रिस्ती झाला असता तर या बातमीने तेथे मोठी खळबळ माजणार होती आणि पुन्हा एकदा तिथल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला असता.  

मुंबईतल्या जॉन विल्सन आणि रॉबर्ट विल्सन प्रभुतींनी याबाबत आधीच एका प्रकरणात आपले तोंड भाजून घेतले होते. मुंबईत बाप्तिस्मा झाल्यास काही वर्षांपूर्वी म्हणजे १८३९ साली पारशी विद्यार्थ्यांच्या बाप्तिस्म्यानंतर प्रचंड क्षोम निर्माण होऊन तिथल्या शाळा अगदी ओस पडल्या होत्या त्याची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक होते. मुंबईतल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांत त्याकाळात पुन्हा विद्यार्थी यायला लागले होते आणि त्यांच्यामध्ये एका पारशी विद्यार्थ्यांचाही समावेश होता.    

पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेतील विद्यार्थी बाळा गोपाळ जोशी याने आणि त्या दिवसांत कोर्ट मार्शल होऊन  तुरुंगात असलेल्या रुस्तमजी नौरोजी  या पारशी तरुणाने  २७  डिसेंबर १८४६ रोजी बाप्तिस्मा घेतला तेव्हा पुण्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती.   बाळा गोपाळ जोशी यांनी पुण्यातल्या मिशनरी शाळेतले शिक्षक  जेम्स मिचेल आणि वझीर बेग यांच्या वर्गांत शिक्षण घेतले होते.    

वझीर बेग यांच्या बाप्तिस्म्याच्यावेळी आणि काही काळानंतर बाळा गोपाळ जोशी यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्कॉटिश मिशन हाऊसपाशी उडालेला गोंधळ त्यावेळी जेम्स मिचेल यांच्या मिशनरी शाळेत विद्यार्थी असलेल्या जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून अनुभवला असणार.     

 ``इ. स. १८४६ मध्ये रे. जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला.’’  

पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या अधिपत्याखालील स्थानिक चर्चमध्ये नेतेपदासाठी निवडणूक झाली तेव्हा  कॅसिडी नावाच्या इंडो-ब्रिटन व्यक्तीची आणि वझीर बेग तसेच  विठोबा या स्थानिक ख्रिस्ती व्यक्तींची निवड करण्यात आली होती. या स्थानिक चर्चमध्ये तेव्हा  २८ जण फुल कम्युनियनमध्ये होते.  कॅसिडी हे पुण्यातल्या  बाजार स्कुलमध्ये शिक्षक होते तर वझीर बेग हे शहरातल्या शाळेत शिक्षक होते. यापैकी बाजार शाळॆत १८४९ च्या जुलैत ९० विद्यार्थी होते तर शहरातल्या बेग यांच्या शाळेत ५० विद्यार्थी होते.    (रॉबर्ट हंटर पण २६२)

भिल्ल जमातीच्या एका सोळा ते अठरा वय असणाऱ्या एका प्रमुखाला पुण्यात शिक्षणासाठी सरकारी कॉलेजात आणण्यात आले होते. आसपासच्या अनेक गावांतून मिळणारा महसूल त्याला एकदोन वर्षानंतर वारसाहक्काने  त्याच्या मालकीचा होणार होता. या भिल्ल जमातप्रमुखाबरोबर  त्याचा वंशपरंपरागत कारभारी किंवा त्याच्या मालमत्तेचा व्यवस्थापकसुद्धा होता.  पुण्यात या  दोन्ही व्यक्ती  वझीर बेग यांच्या निगरानीत ठेवल्या होत्या, त्यांना काय शिक्षण द्यायचे याबाबतचे स्वातंत्र्य बेग यांना देण्यात आले होते. बेग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्या दोघांवर इतका प्रभाव पडला होता कि ते दोघे बेग यांच्या दैनंदिन कौटुंबिक प्रार्थनेत सहभागी होत असत आणि  कधीकधी चर्चला त्यांच्यासह जात असत.  

या स्कॉटिश शाळांत वझीर बेग यांचे  शिक्षण झालं होते त्याच जेम्स मिचेल यांच्या शाळांत आता बेग शिक्षक  म्हणून कार्यरत होते.  नंतर अशाचप्रकारे जोतिबा फुलेसुद्धा जेम्स मिचेल  यांच्या शाळांत शिक्षक म्हणून काम करत होते.   हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषांवर वझीर बेग यांचे प्रभुत्व होते. त्याशिवाय अरेबिक, तुर्की आणि इंग्रजी भाषा ते शिकले.  पुण्यात ते नंतर लॅटिन आणि ग्रीक भाषासुद्धा शिकले. ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्य करण्याचे आपल्याला पाचारण आहे अशी त्यांची भावना होती.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या   `सत्यशोधक' चित्रपटात जोतिबांचे शिक्षक म्हणून रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्यावर काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत.    

जॉन टेरेन्स यांनी   `स्टोरी ऑफ अवर मिशन्स : वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया’  या १९०२ साली प्रकाशित झालेल्या   पुस्तकात लिहिले आहे : 

``स्कॉटिश मिशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्मातून ख्रिस्ती झालेल्या वझीर बेग यांनी काही काळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालू केली होती. त्याशिवाय डॉ.  मरे मिचेल यांनी आपल्या शाळेत सत्तर मुलींना आणण्यास यश मिळवले होते. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे  या शिक्षणासाठी एक छोटीशी रक्कम फी म्हणून सुद्धा आकारली जात असे.    

त्यानंतर काहीं काळाने अशीच एक शाळा प्रखर विरोधाला तोंड देत एकदोन वर्षे चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या कार्यात सातत्य नव्हते, मिस स्मॉल यांची नेमणूक करण्यात आली तेव्हा समाजाच्या या घटकासाठी काहीच करण्यात येत नव्हते. ‘’. 

वझीर बेग यांनी १८५३ साली ईशज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वझीर बेग यांना प्रवचनकार म्हणून १८५३च्या डिसेंबरात प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर २७ जानेवारी १८५४ रोजी त्यांनी पुण्यात मुस्लीम लोकांसाठी एक हिंदुस्थानी शाळा उघडली. या शाळेत सुमारे चाळीस मुलांनी प्रवेश घेतला. त्याकाळात मुस्लीम लोकांना शिक्षणाकडे आकर्षित करणे आणि त्याशिवाय हे शिक्षण ख्रिस्ती धर्माशी संबधित असले तर किती अवघड होते हे लक्षात घेता विद्यार्थ्यांची चाळीस ही संख्या खुपच होती. 

वझीर बेग १८५४ साली  स्कॉटलंडला गेले, तेथे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे त्यानीं ठरवले होते. या विद्यापीठाच्या कागदपत्रांत मात्र त्यांचे नाव दिसत नाही. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे सदस्यत्व त्यांना १८६१ साली मिळाले. मेलबर्न येथे आल्यानंतर स्थानिक  प्रेस्बीटेरियन चर्चच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले.  पोर्ट अल्बर्ट येथे  १८६४ साली धर्मगुरु म्हणून त्यांचा दीक्षाविधी झाला. सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे पौर्वात्य भाषा आणि साहित्य या विषयांवर अरेबिक ही मुख्य भाषा ठेवून व्याख्यातेपद निर्माण केले होते, त्या पदावर १८६६च्या डिसेंबर महिन्यात बेग यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पौवार्त्य संशोधनासाठी एक विभाग स्थापन झाला होता. 

त्याशिवाय पौर्वात्य भाषांसाठी अनुवादक म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने बेग यांची नेमणूक केली, मात्र विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी हे व्याख्यातेपद काही काळच टिकले.  नॉर्थ कॅरोलिनातील ग्रीनव्हिल येथील बॅप्टिस्ट कॉलेजने त्यांना १८६४साली मानद डॉक्टर ऑफ लॉ  (एलएलडी) पदवी प्रदान करुन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला.     

वझीर बेग ऑस्ट्रेलियात  प्रेस्बीटेरियन चर्चचे धर्मगुरू बनले.  बेग यांच्या या आध्यात्मिक जीवनक्रमातील या घटनेचे  जॉन टॉरेन्स  या लेखकाने आपल्या पुस्तकात भारतातील त्याकाळच्या एका महत्त्वाच्या राजकीय घटनेशी तुलना केली आहे. एका  भारतीय नेत्याची लंडनमधल्या हाऊस  ऑफ कॉमन्समध्ये कायदा करण्यासाठी निवड झाली आहे असे या लेखकाने  म्हटले   आहे.  ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय  नागरीक  (१८९२-९५)  म्हणून निवड होणाऱ्या दादाभाई नौरोजी यांचा हा संदर्भ आहे हे उघड आहे.  

क्विन्सलँड येथील प्रेस्बीटेरियन चर्चमध्ये १८६७ साली काही काळ धर्मगुरु म्हणून काम केल्यानंतर बेग चालमर्स चर्चचे प्रमुख होते. या पदाचा त्यांनीं १८८२ साली राजीनामा दिला.  प्रेस्बीटेरियन चर्चच्या युतीचे ते खांदे समर्थक होते आणि चर्चच्या अनेक समित्यांवर त्यानीं काम केले. बेग यांनी लिहिलेल्या `मॅन्युअल ऑफ  प्रेस्बीटेरियन प्रिन्सिपल’ चे सिडनी येथे १८७० साली प्रकाशन झाले.  रोमन कॅथोलिक पंथाचे बेग कट्टर विरोधक होते. बेग यांचा विवाह मार्गारेट रॉबर्टसन स्मिथ यांच्याशी  १२ मार्च १८७२ रोजी झाला होता आणि  त्यांना दोन मुले होती.

ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाल्यानंतरसुद्धा रेव्हरंड वझीर बेग आपल्याला शिक्षण देणाऱ्या  पुणे स्कॉटिश मिशनकेंद्राला विसरले नव्हते. तेथून त्यांनी  पाच पौंडाची रक्कम आपल्या पुणे स्कॉटिश मिशनला देणगी म्हणून पाठवली होती यावरुन त्यांचा या मिशनकेंद्राप्रती कृतज्ञताभाव दिसून होतो.  

रेव्हरंड वझीर बेग  यांचे  वयाच्या ५८ व्या वर्षी  त्यांचे ४ जानेवारी  १८८५ रोजी निधन झाले आणि वेव्हर्ले कबरस्थानांत त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.  

मुस्लीम समाजातील मुलींना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याच्या कार्यांत स्कॉटिश मिशनच्या वझीर बेग यांना यश आले नाही, तरी काही वर्षांनी स्कॉटिश मिशनच्याच मिशनरींना या कार्यांत अगदी भरीव यश मिळाले. 

जोतिबा फुले यांचे एक प्रेरणास्थान असलेल्या,पुण्यातल्या संस्कृत कॉलेजचे म्हणजे आताच्या डेक्कन कॉलेजचे काही काळ प्राचार्य (व्हिझिटर) असलेल्या रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी पुण्यात  केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती. या शाळेस मुस्लीम मुलींचा नुसता चांगलाच प्रतिसाद लाभला नाही तर या शाळेची असलेली फी भरण्याससुद्धा मुलींचे पालक तयार होते.

भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणा बत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत विस्तृत माहिती जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे.   ती अशी :

 ``ब्राह्मण आणि इतर जातींचे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूप उत्साही होते तरी आपल्या मुलींच्या शिक्षणाबाबत ते बेफिकीर होते. मिशनरींच्या  आणि  स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या  शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे   होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.

 सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची  एक मुस्लिम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता.  या शाळेत  विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती. त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती.

 त्याकाळात  शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फी घेणे  ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोलकाता, नंतर मुंबईत, अहमदनगर  आणि पुण्यात ख्रिस्ती मिशनरींनी  शाळा सुरु केल्या तेव्हा शाळेतल्या मुलांमुलींसाठी अन्न, कपडेलत्ता किंवा काही रक्कम यासारखे आमिष देणे आवश्यक असायचे.  नंतरच्या काळातसुद्धा म्हणजे अगदी जोतिबा आणि सावित्रीबाई  फुले यांनासुद्धा आपल्या शाळांत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी असे करावे लागत असे.   

 स्कॉटिश मिशनच्या शिक्षणकार्याबाबतची माहिती दूरवर पसरत होती आणि आपल्याही शहरांत,  गावांत अशा शाळा सुरु व्हाव्यात असे तेथील लोकांना वाटायला लागले होते. पुण्याजवळ इंदापूर येथे सुरु झालेली एक शाळा नंतर बंद पडली तेव्हा तेथील गावकऱ्यांनी स्कॉटिश मिशनने तेथे शाळा चालवावी असा आग्रह केला.  शाळा सुरु करण्याबाबत हे ग्रामस्थ इतके आग्रही होते कि पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी असलेल्या शाळांची फी मुलींचे पालक  देतात त्याप्रमाणे .इंदापूरच्या शाळेची फी भरण्याससुद्धा  स्थानिक विद्यार्थ्यांचे पालक तयार आहेत असे त्यांनी कळवले होते.  

भारतातील मुस्लीम समाजातील काही समाजसुधारकांनीसुद्धा केवळ मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या, मात्र त्यासाठी खूप काळ जावा लागला होता. त्यादृष्टीने अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात वझीर बेग आणि जॉन मरे मिचेल यांची ही कामगिरी फार मोलाची असे म्हणावे लागेल.  

भारतातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात रेव्हरंड वझीर बेग आणि रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी केलेले हे महत्त्वाचे योगदान कदाचित विस्मृतीत गेले असते.  मात्र स्कॉटिश मिशनसंबंधीच्या दस्तऐवजांत आणि विविध पुस्तकांत  मुस्लीम मुलींसाठी असलेल्या या शाळांबाबत उल्लेख आढळतो. त्यामुळे बेग आणि मरे मिचेल यांच्या या ऐतिहासिक कार्याची नोंद राहिली आहे.

Camil Parkhe 


Saturday, January 20, 2024

गोवा, दमण आणि दीव

 पणजीला मिरामारच्या धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीत होतो तेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त होऊन केवळ एक तप झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरुंनी १९ डिसेंबर १९६१ ला भारतीय लष्कर पाठवून गोवा दमण आणि दीवची मुक्तता केली आणि अरबी समुद्राशेजारचा हा चिमुकला प्रदेश भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनला.

नेहरूंच्या या लष्करी कारवाईमुळे तेव्हा आंतर राष्ट्रीय पातळीवर किती गदारोळ उडाला होता याची आजच्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही. दैनिक गोमंतकने गोवामुक्तीच्या तिसाव्या वर्धापनानिमित्त म्हणजे १९९१ साली यासंदर्भात न्युयॉर्क टाइम्स मध्ये नेहरूंवर टीका करणारे प्रसिध्द झालेले व्यंगचित्र छापले होते. या विशेषांकात गोवामुक्ती चळवळीतील एक अग्रणी समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांची मी घेतलेली मुलाखतही होती.
पंडित नेहरूंच्या कन्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी १७ जानेवारी १९६७ ला गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात सार्वमत घेतले. या मतदानात गोव्यातील लोकांनी महाराष्ट्रात आणि दमण आणि दीव येथील लोकांनी गुजरात मध्ये सामील होण्यास स्पष्ट नकार दिला.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्व काही काळ चालू राहिले. मात्र ज्या पक्षाची स्थापना गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याच्या उद्दिष्ट्याने झाली त्याच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला येथील मतदारांनी सत्तेवर कायम ठेवले. या पक्षाचे दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री.
बांदोड्करांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर या गोवा, दमण आणि दीवच्या मुख्यमंत्री बनल्या. देशातील त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री. उत्तर प्रदेशच्या गांधीवादी नेत्या सूचेता कृपलानी ( आचार्य कृपलानी यांच्या पत्नी) या देशातल्या पहिल्या आणि असामच्या नंदिनी सत्पथी या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री.
महाराष्ट्रात तर अजून एकही महिला राजकारणी मुख्यमंत्रीपदाच्या आसपाससुद्धा आलेली नाही, शालिनीताई पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांचा यास अपवाद. आजसुद्धा महाराष्ट्रातल्या एकही महिला मंत्र्यांचे नावही कुणाला लगेच आठवणार नाही अशी परिस्थिती असताना काकोडकरांनी सत्तरच्या दशकात पक्षावर आणि प्रशासनावर मजबूत पकड राखली होती हे विशेष.
त्याकाळात येथल्या विधानसभेत एकूण तीस आमदार असायचे, त्यापैकी दमण आणि दीव येथील प्रत्येकी एक आमदार असायचा. मंत्रिमंडळात साडेतीन मंत्री असायचे, तीन मंत्री कॅबिनेट दर्जाचे आणि एक राज्यमंत्री पदाचे. विनायक चोडणकर कायदेमंत्री होते, राऊल (राहुल नव्हे, राऊल हे नाव पोर्तुगीज, स्पॅनिश देशांत आढळते) गोन्साल्विस शिक्षण राज्यमंत्री होते हे आजही आठवते. बहुतेक सर्व महत्त्वाची - पर्यटनासह - खाते मुख्यमंत्र्यांकडे असायची.
तर यापैकी राऊल गोन्साल्विस यांच्याविषयी दोन आठवणी आहेत. पहिली घटना १९७८ सालची असेल. एकदा हे मंत्रीमहोदय वॊस्कोजवळच्या दाबोळी विमानतळाकडे निघाले होते आणि उशिर झाल्यामुळे त्यांचे आगमन होईपर्यंत त्यांनी विमान धावपट्टीवर रोखून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी नवहिंद टाइम्सने मंत्रीमहोदय ब्रिफकेस घेऊन धावपट्टीवर धावतायेत आणि 'राव रे' असे म्हणतायेत असे व्यंगचित्र छापले होते.
गोव्यात सगळीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस राव रे (``थांब रे;) म्हटले कि कुठेही थांबतात, हा यामागचा संदर्भ होता !
माजी मंत्री असलेल्या या राऊल गोन्साल्विस यांचे ऐंशीच्या दशकात प्रदीर्घ आजाराने निधन झाले तेव्हा मी नवहिंद टाइममध्ये बातमीदार होतो. त्यावेळच्या रात्रपाळीच्या चिफ सब एडिटरने ही बातमी आठ कलमी छापली होती. दुसऱ्या दिवशी वृत्तसंपादक एम एम मुदलियार यांनी त्या मुख्य उपसंपादकाला त्याबद्दल धारेवर धरले. माजी मंत्र्याच्या निधनाविषयी आठ कलमी बातमी छापली तर विद्यमान मुख्यमंत्री, किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्या अकस्मात निधनाची बातमी किती कलमी छापणार असा त्यांचा सवाल होता !
एक अत्यंत खळबळजनक घटना मुख्यमंत्री शशिकला काकोडकरांच्या काळात घडली. अर्थखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री काकोडकर विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याआधीच तो अर्थसंकल्प त्यातील आकडेवारीसह चौगुले उद्योग समुहाच्या मालकीच्या दैनिक गोमंतकने आधीच छापला आणि एकच हल्लाकल्होळ झाला.
अर्थसंकल्प फुटल्यास, अर्थमंत्र्याला, सरकारला राजिनामा द्यावा लागतो अशी ब्रिटिश संसदीय प्रथा आहे असे म्हणतात.
काँग्रेसचे प्रवक्ते विठ्ठलराव गाडगीळ यांचा ब्रिटिश संसदीय परंपरेचा गाढा अभ्यास होता. बहुधा त्यांनींच लिहिलेल्या दैनिकातील एका लेखातील वाचलेली घटना आठवते. ब्रिटनचे अर्थमंत्री संसदेच्या लॉबीतून जाताना सिगारेट पिणाऱ्या एका पत्रकाराला उद्देशून म्हणतात : '' आजच्या दिवस कर लेका मजा !'' दुसऱ्या दिवशी ते अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार होते. तो पत्रकार त्या दिवशीच आपल्या दैनिकात बातमी देतो: ``अर्थसंकल्पात सिगारेटच्या किंमतीत वाढ होण्याचे अर्थमंत्र्याने दिले संकेत..'' या बातमीमुळे त्या अर्थमंत्र्याला राजिनामा द्यावा लागला.
गोमंतकच्या त्या आठ कलमी बजेटच्या बातमीने बॉम्ब टाकला होता. एखाद्या प्रदेशाचा संपूर्ण अर्थसंकलप जसाच्या तसा, अगदी एकही आकडेवारी न चुकवता छापण्याची जगातील वृत्तपत्र इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. याला शोध पत्रकारिता म्हणता येईल का?
मात्र याबद्दल शशिकला काकोडकर सरकारला आणि त्याचबरोबर गोमंतकच्या त्या तीन पत्रकारांना जबरी किंमत चुकावी लागली होती.
अर्थसंकल्प फोडणाऱ्या दैनिक गोमंतकच्या त्या मुख्य बातमीदाराच्या र वि प्रभुगावकर वृत्तसंपादक शरद कारखानीस आणि संपादक दत्ता सराफ यांच्या नोकऱ्यांवर त्यावेळी गदा आली होती. अटक चुकवण्यासाठी त्यांना अटकपूर्व जामिन घेण्याची पाळी आली. सरकारी यंत्रणांनी आणि नंतर दैनिकाच्या व्यवस्थापनानेसुद्धा त्यांना खूप त्रास दिला. यापैकी प्रभुगावकर हे नवहिंद टाइम्स मध्ये नंतर माझे ज्येष्ठ सहकारी होते.
गोव्यातले माझे एक जुने ज्येष्ठ पत्रकार मित्र वामन प्रभू यांनी आपल्या `ऍक्सीडेन्टल जर्नालिस्ट' या पुस्तकात या बजेट फुटीवर एक प्रकरणच लिहिले आहे.
काकोडकरांच्या काळातच पक्षांतर्गत बंडाळीमुळे विधानसभेत गोंधळ उडाला तेव्हा सभागृहातील बापूंच्या पुतळ्याचा चक्क अस्त्राप्रमाणे वापर केला गेला, ही घटना खूप गाजली. काकोडकर सत्तेतून पायउतार झाल्या त्या कायमच्याच.
मागे पुण्यातल्या काँग्रेस भवनातला मध्यवर्ती ठिकाणी असलेला गांधीजींचा पुतळा असाच एका गोधळाच्या प्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून तेथून हलवला गेला होता, तेव्हा गोव्यातल्या विधानसभेतली ती धुमश्चक्री मला आठवली
माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला आणि त्यांच्या भाषणाची मी लिहिलेली बातमी नवहिंद टाइम्सने छापली. त्यानंतर एका आठवड्यातच शशिकलाताईंनी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा दिला. माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील ती माझी पहिली राजकीय बातमी होती.
प्रतापसिंह राणे काकोडकरांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते, ते पक्षातून बाहेर पडले आणि नंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीचा विक्रम यापुढील काळात कुणाला मोडणे अवघडच असेल.
अगदी पहिल्या विधानसभेपासून येथील सत्ताधारी पक्ष दमण आणि दीव इथल्या आमदारांच्या कुबड्यांवर सत्तेवर असायचा. नारायण फुग्रो त्यामुळेच विधानसभेचे सभापती बनले होते, दुसरे एक आमदार उपसभापती होते. शशिकलाताईंचे सरकार असेच अल्पमतातले, त्यामुळे बंडखोरी होऊन हे सरकार कोसळले आणि इथे १९७८ साली राष्ट्रपती राजवट लागली.
माझ्या बारावीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रकावर (साल १९७८) गोवा, दमण आणि दीव बोर्डाचा शिक्का आहे. गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व डिसेंबर १९६१ ते जून १९८७ इतके काळ राहिले.
गोव्यातील अनेक नागरिकांना आजही दमण किंवा दीव भारताच्या नकाशावर नक्की कुठे आहे हे आजही सांगता येणार नाही. मलासुद्धा दमण कुठे आहे याचा थांगपत्ता गेल्यावर्षी तिथे गेल्यावरच लागला.
गोवा हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला रत्नागिरी जिल्ह्यापाशी तर दमण हे पालघर जिल्ह्याजवळ वसई आणि गुजरातच्या एका टोकाशी आहे ! दीव तेथून आणखी पाचशे किमी दूर आहे. अगदी स्वस्तात मिळणाऱ्या दारुच्या अतिरिक्त या तिन्ही प्रदेशांत तसे काहीच साम्य नव्हते. त्यामुळे १९८७ साली गोवा राज्य झाले, पोर्तुगिजांच्या सत्तेमुळे चारशे वर्षे एकत्र असलेल्या दमण आणि दीवपासून वेगळे झाले तेव्हा कुणीच अश्रू ढाळले नाही.
पोर्तुगीज सत्तेमुळे साडेचार शतके एकत्र असलेल्या गोव्याची दमण आणि दीव पासूनची नाळ १९८७ पासून तुटली आहे. गोवा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर यापैकी दमणशी माझा कधी दुरान्वयानेही संबंध येईल असे कधी वाटले नव्हते पण तसे घडले मात्र. आता दमण या प्रदेशाचे माझे गोव्यासारखेच ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.
१९८७ पासून एक स्वतंत्र राज्य म्हणून गोव्याची अगदी वेगळी राजकीय आणि सांस्कृतिक वाटचाल सुरु झाली .. त्याविषयी नंतर .
Camil Parkhe January